Diwali_4 आर्थिक विकासाचे वेध
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

Gu Mu  यांच्या नेतृत्वाखाली 20 सदस्यांच्या शिष्टमंडळाने मे-जून 1978 मध्ये पश्चिम युरोपचा- फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम असा- दौरा केला. भांडवलशाही देश भ्रष्टाचारी व मागासलेले असतात, असे समजणारे चिनी नेते पाश्चात्त्य देशांतील स्वातंत्र्य, प्रगती, पायाभूत सुविधा व सोई हे सर्व पाहून चक्रावले. पाश्चिमात्य भांडवलशाही भयानक व भेसूर असते, असे वारंवार बिंबविले गेलेल्या चिनी नेत्यांना पाश्चिमात्त्य देशांच्या अभ्यास दौऱ्यामध्ये सुखवस्तू व निरोगी समाज, आधुनिक उद्योग, कार्यक्षम शासनव्यवस्था, उच्च दर्जाच्या उत्पादनांची व उपभोग्य वस्तूंची सहज उपलब्धता दिसून आली. त्याप्रमाणेच त्यांना उच्च गुणवत्ता असणारी शिक्षणव्यवस्था, स्वातंत्र्य व खुली राजकीय व्यवस्था यांचेही दर्शन झाले. चीनमध्येही असा समाज निर्माण व्हावा असे त्यांना वाटले नसते, तरच नवल!

मार्च 1977 मधील सेंट्रल पार्टी कॉन्फरन्सचा अजेंडा महत्त्वाचा होता. त्यातही ‘शांघाय गँग’बाबत पुढे काय करावे, सांस्कृतिक क्रांतीचा वेडेपणा थांबवावा, 1977 पासून पुढे आर्थिक धोरण कसे असावे व त्या अनुषंगाने नियोजन कसे असावे,  त्यासाठी पुढील काँग्रेस व कॉन्फरन्स कशी भरवावी- या विषयांबाबत बऱ्यापैकी सहमती होती. याशिवाय पुढील काळात चारकलमी आधुनिकीकरण म्हणजे शेती, उद्योग, तंत्रज्ञान व विज्ञान-संशोधन आणि संरक्षण या चार क्षेत्रांतील आधुनिकीकरणाच्या कार्यक्रमाला मान्यता घ्यायची होती. याशिवाय कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व व एकाधिकारशाही पुढील काळातही सुरू ठेवणे, मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट तत्त्वज्ञानाच्या आधारे पक्षाची, चिनी प्रजासत्ताकाची वाटचाल सुरू ठेवणे, माओंच्या विचारांच्या बैठकीत (फ्रेमवर्कमध्ये) राहून परदेशी भांडवल गुंतवणुकीस परवानगी देणे- अशा अनेक बाबींवर चर्चा अपेक्षित होती.

वरवर पाहता हुआ यांचा मार्ग स्पष्ट दिसत असला, तरी वैचारिक/सैद्धांतिक बाबतीत व अंमलबजावणीबाबत काही महत्त्वाच्या प्रश्नांवर सहमती होत नव्हती. या संदर्भात वरिष्ठ व कनिष्ठ नेत्यांच्या राजकीय भूमिकेत बराच फरक होता. अनेक वरिष्ठ नेते सांस्कृतिक क्रांतीत अवमानित होऊन होरपळले गेले होते. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान तुलनेने कनिष्ठ व तरुण पदाधिकाऱ्यांना त्रास झाला नव्हता. त्यातील अनेकांनी माओंशी जुळवूनच घेतले होते. त्यांचा वरिष्ठ नेत्यांना सत्तेत सामील करून घेण्याबाबत थोडा विरोधच होता. मात्र एकंदरीत बॅलन्स वरिष्ठ नेत्यांकडे झुकलेला होता. विशेष म्हणजे, 1977 च्या अकराव्या पार्टी काँग्रेसच्या मध्यवर्ती समितीत 201 सदस्यांपैकी 180 सदस्य हे 1949 पूर्वी पक्षात आलेले होते. वरिष्ठांचे अशा रीतीने पार्टी काँग्रेस व तिच्या सेंट्रल कमिटीत प्राबल्य होते.

पॉलिटब्युरोच्या स्थायी समितीवर मात्र चार सदस्यांपैकी दोन तुलनेने कनिष्ठ (हुआ गुओफेंग व वँग डाँझिंग) होते. वरिष्ठ नेतृत्वाच्या सुधारणावादी गटाचा वाढता प्रभाव हुआ गुओ फेंग यांना अस्वस्थ करीत होता. डेंग यांचा पक्षात परत येण्याचा मार्ग अशा रीतीने सुकर होत असला, तरी डेंग यांना स्वत:च्या सैद्धांतिक व सुधारणावादी तत्त्वज्ञानाची जपणूक करीत पक्षात परतायचे होते, ही बाब महत्त्वाची होती. कारण पुढे या तत्त्वज्ञानाच्या व भूमिकेच्या आधारेच डेंग यांनी खुल्या आर्थिक व्यवस्थेची धोरणे आखली आणि त्यासाठी पक्षाची सहमतीही मिळवली.

माओ जिवंत असताना प्रत्यक्ष त्यांचे दडपण असतानाही डेंग यांनी सांस्कृतिक क्रांतीचे गोडवे गाण्याचे नाकारले होते. त्यामुळे हुआ यांच्या प्रभावहीन व तुलनेने कमजोर नेतृत्वापुढे डेंग नमते घेतील, हे शक्यच नव्हते. दि.10 एप्रिल रोजी हुआ गुओफेंग, मार्शल ये आणि सेंट्रल कमिटीच्या इतर सदस्यांना लिहिलेल्या दीर्घ पत्रात डेंग यांनी हुआ यांच्या आवडत्या ‘टु व्हॉटेव्हर’ या वादग्रस्त सैद्धांतिक लेखावर आक्षेप घेत त्याबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. याबाबत माओंचा व माओंच्या विचारांचा आदर करीत डेंग यांनी चतुराईने माओंच्या विचारांचा- विशेषत: पक्ष, सैन्यदल व सर्वसामान्य जनता यासंदर्भात- काल व परिस्थितीसापेक्ष तसेच सम्यक्‌पणे व ढोबळमानाने अर्थ लावण्याची गरज प्रतिपादन केली. माओंचे विचार प्रमाण मानीत असतानाच हुआ गुओफेंग यांनी लावलेला अर्थ हाच अखेरचा शब्द मानण्यास त्यांनी नकार दिला. कोणत्याही विचारांचा अर्थ हा विस्तृत संदर्भातच घेतला पाहिजे; तसेच ज्या वरिष्ठ नेत्यांनी माओंबरोबर दीर्घ काळ काम केले असेल, त्यांना भावलेला अर्थ हा हुआ यांच्यापेक्षा जास्त समर्पक व योग्य असणार,  हेही त्यांनी अधोरेखित केले. विशेष म्हणजे 1976 मधील निदर्शने ही क्रांतीविरोधी नसून क्रांतीचाच एक क्षण होता; मात्र हुआ यांनी ‘टू व्हॉटेव्हर’ हा लेख लिहून हा क्षणच नाकारला, असे डेंग यांचे मत होते. मात्र त्याचबरोबर हुआ यांचे नेतृत्व त्यांना मान्य असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले व ते पत्र सर्वांनाच पाठविले.

काहीही झाले तरी डेंग यांनी हुआंचे नेतृत्व मान्य केल्याने हुआंनीही डेंग यांचा मार्ग सुकर केला आणि सैन्यदलातील व परराष्ट्र खात्यातील अधिकारपदे त्यांना देऊ केली. डेंग यांनी विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षण यांची जबाबदारीही स्वत: होऊन स्वीकारली. अशा रीतीने डेंग यांनी हुआ यांच्याबरोबरचे सैद्धांतिक फरक तसेच ठेवून त्यावर कोणतीही तडजोड न करता वरिष्ठ पदे मिळवली. विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षण हे विषय डेंग यांच्या आस्थेचे होते. सर्वांगीण प्रगती होण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षण या तीन प्रेरणा त्यांना अत्यंत महत्त्वाच्या वाटत. डेंग यांचे पुनर्वसन होत असताना 1974-75 च्या सुधारणा कार्यक्रमात ज्या-ज्या नेत्यांनी डेंग यांना मदत केली होती, त्या सर्वांना परत आणले गेले. पक्षाच्या प्रचाराच्या व सैद्धांतिक भूमिका ठरविणाऱ्या पोलिटिकल रिसर्च ऑफिसमध्ये माओंच्या ‘टेन ग्रेट रिलेशनशिप’वर काम करणारे वँग झेन, डेंग लिकन व हू किओमु यांनाही डेंग यांनी परत आणले.

17 जुलै 1977 रोजी डेंग औपचारिक रीत्या पक्षात परतले. जी पदे ते 1974-75 मध्ये उपभोगीत होते, त्यावरच त्यांना नेमण्यात आले. आता पक्षाच्या सेंट्रल कमिटीचे सदस्य, पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीचे सदस्य, पक्षाचे उपाध्यक्ष, सेंट्रल मिलिटरी कमिशनचे उपाध्यक्ष, उपपंतप्रधान व लोकमुक्ती सेनेचे (पीपल्स लिबरेशन आर्मी) सरसेनापती अशी सर्व महत्त्वपूर्ण पदे त्यांना देण्यात आली. कोणत्याही एका व्यक्तीकडे सत्ता न जाता, सामूहिक नेतृत्व महत्त्वाचे ठरणार होते. शिवाय डेंग यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा, कुशल नेतृत्वाचा व सुधारणावादी धोरणांचा पक्षाला फायदा होणार होता. महत्त्वाचे म्हणजे, हुआ गुओफेंग व डेंग यांच्यातील सरळ सत्तासंघर्ष टळला होता. माओंच्या काळातील एका व्यक्तीकडे सत्तेचे अवाजवी केंद्रीकरण, हिंसा, झुंडशाही, हडेलहप्पी हे सारे मागे पडले आणि चीनमध्ये तात्त्विक व धोरणविषयक चर्चा होऊ लागली.

सांस्कृतिक क्रांतीनंतर पक्षांतर्गत मर्यादित लोकशाहीचा हा प्रथमच अनुभव होता. चीनमध्ये लोकशाही नसली तरी पक्षामध्ये थोडीफार लोकशाही असते.

माओंच्या मृत्यूनंतर हुआ यांनी बोलाविलेली अकरावी काँग्रेस व तिचे कामकाज हे लोकशाही पद्धतीने झाले, हे मान्यच केले पाहिजे. या सर्व काळात डेंग उदारमतवादी नसले तरी माओंच्या तुलनेत ते मध्यमवर्गात, बुद्धिमंतांत आणि शैक्षणिक, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात बऱ्यापैकी स्वीकारार्ह होत होते. माओंच्या जुलमी व एकहाती राजवटीने सर्व होरपळून निघाले होते; त्यांचे पुनर्वसन करण्याचे व विस्कटलेली घडी बसविण्याचे ते काम करीत होते. मात्र लोकशाही व मानवी अधिकारांच्या खंद्या पुरस्कर्त्यांना, (डेंग यांच्या टीकाकारांना) असे वाटते की- 1976 ते 78 या काळात पक्षांतर्गत लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या डेंग यांनी पुढे सत्ता आपल्या हाती आल्यानंतर पक्षांतर्गत लोकशाहीला तिलांजली दिली. यात थोडे तथ्य असले तरी 1975 ते 1977 या घटनापूर्ण कालावधीत हिंसेशिवाय सत्ता संक्रमण सुरू होते आणि सत्तेमध्ये डेंग यांच्यासारख्या विचारी, दूरदर्शी व भविष्याबद्दल विश्वास निर्माण करणाऱ्या नेत्याला शासनव्यवस्थेत योग्य रीतीने सामावून घेतले गेले, याचे सर्वत्र स्वागत होत होते.

चीनमधील वर्तमानपत्रे, पाश्चात्त्य माध्यमे या सर्वांनी डेंग याच्या पक्षपरतीचे स्वागत केले. दि.30 जुलै 1977 रोजी हाँगकाँग व चीन यांच्यातील फुटबॉल मॅच पाहावयास गेलेल्या डेंगना पाहताच स्टेडियममधील हजारो प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे जल्लोष करून आपल्या आनंदाला वाट करून दिली. माओंचा वैचारिक क्रांतिकारी वारसा आणि पुढील काळातील लोकांचे राहणीमान वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यांच्यात सांगड कशी घालायची, हे चीनच्या नेतृत्वापुढे महत्त्वाचे आव्हान होते.

सत्तेत परतताच डेंग यांनी उत्साहाने व जोमाने विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षण यासाठी नव्या धोरण आखणीत व नियोजनात स्वत:ला झोकून दिले. सांस्कृतिक क्रांतीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण व संशोधन यातील संस्थांचा आणि त्या संस्थांत चाललेल्या कामांचा चांगलाच खेळखंडोबा झालेला असल्याने या संस्थाची पुनर्बांधणी करणे, दर्जा उंचावणे व गुणवत्तेवर आधारित व्यवस्था निर्माण करणे हे एक मोठे आव्हान होते. विज्ञान व तंत्रज्ञान-क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ली त्सुंग डाओ, यांग झेनिंग व सॅम्युएल टिंग या नोबेलपारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या सहकार्याने डेंग यांनी अनेक कार्यक्रम तयार केले. परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या व चीनमध्ये परतू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन देणारे कार्यक्रम तयार झाले.

उच्च शिक्षण व माध्यमिक शिक्षणात गुणवत्तेवर आधारित प्रवेश परीक्षांचा कार्यक्रमही तयार केला. सांस्कृतिक क्रांतीच्या काळात दुसरा वाईट प्रकार म्हणजे, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून उठवून ग्रामीण भागात काम- विशेष शारीरिक कष्ट- करण्यासाठी, उमेदवारी करण्यासाठी पाठविले जाई. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शिक्षणात काही लक्ष लागत नसे. शिक्षणच खंडित करणारी ही अ-शैक्षणिक पद्धत डेंग यांनी बंद केली व एकत्रित प्रवेश परीक्षा सुरू केली. शैक्षणिक संस्थांमध्ये गुणवत्तेला पोषक वातावरण तयार केले व संस्था खऱ्या अर्थाने शिक्षणतज्ज्ञांकडे सोपविल्या. पुढे-पुढे परिस्थिती दुसऱ्या टोकाला गेली. अगदी प्राथमिक शाळा व बालवाड्यांत प्रवेशासाठीसुद्धा स्पर्धात्मक प्रवेश परीक्षेची पद्धत सुरू झाली. विज्ञान संशोधनाच्या संस्थांमधूनही प्रचारक, पक्षनेते यांना काढून घेण्यात आले. ग्रामीण भागात व इतरत्र पाठविलेल्या संशोधकांना परत बोलावून त्यांना परत या संस्थांमध्ये संशोधन करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले, त्यांचे पुनर्वसन करणाऱ्या योजना तयार करण्यात आल्या.

सांस्कृतिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात विज्ञान संशोधनावर देखरेख ठेवणारे व दिशादर्शन करणारे स्टेट सायन्स टेक्नॉलॉजी कमिशनच रद्द करण्यात आले होते. यापूर्वी माओ यांच्या आधिपत्याखाली 1975 मध्ये काम करीत असताना डेंग यांनी चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसमधील शास्त्रज्ञांच्या मदतीने विज्ञान-तंत्रज्ञानक्षेत्रातील संशोधनाला गती देण्याचा व सांस्कृतिक क्रांतीच्या वणव्यात होरपळलेल्या वैज्ञानिकांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला होता. आता एसएसटीसीचे (स्टेट सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन) पुनरुज्जीवन करून सात वर्षे कालावधीचा एक नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. चिनी-अमेरिकन वैज्ञानिक फँग यी हे पॉलिट ब्युरोचे सदस्य होते. त्यांच्याकडे विज्ञान, तंत्रज्ञान संशोधनाची जबाबदारी देण्यात आली. त्याचप्रमाणे अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र व विविध प्रकारच्या सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी 1975 मध्ये चायनीज ॲकॅडेमी ऑफ सोशल सायन्सेसची सुरुवात केली होती. ते काम अर्धवट राहिले होते. या अकादमीला – CASS ला संबंधित मंत्रालयापासून वेगळे करून स्वायतत्ता दिली गेली.

या अधिवेशनात विज्ञान/ तंत्रज्ञान हा एक स्वतंत्र Force of Production  आहे, असे जाहीर करण्यात आले. त्याद्वारे विज्ञान व तंत्रज्ञान, त्यातील संशोधन व innovation  यांना मार्क्सवादाच्या पारंपारिक विचारांपासून, वर्गकलहाच्या तत्त्वज्ञानापासून व त्यातून उद्‌भवणाऱ्या राजकारणापासून दूर करण्यात येऊन त्याचा स्वतंत्र व स्वायत्तपणे विचार करण्याचे धाडस दाखविले. विज्ञान व तंत्रज्ञान यांतील संशोधन, शिक्षण, सामाजिक शास्त्रांमधील संशोधन, आर्थिक नियोजन इत्यादी क्षेत्रांतील काम करणाऱ्या संस्था व त्यातील तज्ज्ञ मंडळी यांना पुरेसे स्वातंत्र्य व स्वायत्तता दिली. हे पारंपरिक मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट तत्त्वज्ञानाला व विशेषत: माओंच्या विचारांना छेद देणारे होते. डेंग यांनी या तात्त्विक बाबीत न पडता विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, शिक्षण इत्यादी बाबतीत प्रगतीला व गुणवत्तेला महत्त्व दिले आणि पुढे हेच धोरण उच्च आर्थिक विकासदर गाठण्यात उपयोगी पडले.

सांस्कृतिक क्रांतीदरम्यान बंद पडलेले सेंट्रल पार्टी स्कूल पुन्हा सुरू झाले. पार्टी स्कूलमध्ये पक्षातील अनेक अभ्यासू सदस्य पक्षाचे तत्त्वज्ञान, पक्षाचा इतिहास, प्रत्यक्ष समाजात त्यानिमित्ताने होत असलेले काम, पक्षाची धोरणे इत्यादींचा अभ्यास करीत. सांस्कृतिक क्रांतीतील हिंसाचार, गुंडगिरी व विध्वंस याला कंटाळलेल्या अनेक अभ्यासकांना या स्कूलमध्ये जाऊन अभ्यास करावा असे वाटे. सेंट्रल पार्टी स्कूलचे प्रमुख व उपप्रमुख अनुक्रमे हुआ गुओफेंग व वँग डाँझिंग (थरपस ऊेपसुळपस) असले तरी दैनंदिन कारभार हु याओबांग यांच्याकडे होता. सुरुवातीस मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट तत्त्वज्ञान व माओंचे विचार यावर थिऑरेटिकल ट्रेंड्‌स या सदराखाली अनेक लेख लिहून येत होते. दि.10 मे 1978 रोजी प्रकाशित झालेला ‘अनुभव हीच सत्याची खरी कसोटी (Practice is the sole Criteria of Truth)  हा निबंध अतिशय लोकप्रिय झाला.

सत्य पडताळून पाहण्यासाठी सत्य अनुभवणे हेच महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही सिद्धांताची अनुभव हीच खरी कसोटी असते;  आणि म्हणून अनुभवाच्या आधारे विश्लेषण केले जावे, हे तत्त्व या निबंधाने अधोरेखित केले. ही कसोटी मार्क्सिस्ट थिअरीलाही लागू केली गेली, तर मार्क्सिस्ट थिअरी हा अखेरचा शब्द होऊ शकत नाही, असा अर्थ होत होता. अनुभव हीच एक कसोटी मानल्यास अनुभवाच्या आधारे मार्क्सिस्ट थिअरीतही सुधारणा कराव्या लागतील, हा सित मान्य करणे म्हणजे मार्क्सवादाला दुय्यम लेखण्यासारखे होणार होते. त्यामुळे वँग डाँझिंग यांना हे पसंतच नव्हते. याशिवाय Anlao Fenlei म्हणजे झरू Pay according to Work Performance  हा निबंधही चांगलाच गाजला व लोकप्रिय झाला.

हुआ गुओफेंग यांचा टू व्हॉटेव्हर्स (Two Whatevers) व 1978 मधील अनुभव हीच सत्याची खरी कसोटी (Practice is the sole Criteria of Truth) हे दोन महत्त्वाचे लेख व सिद्धांत हे तत्कालीन राजकारणाच्या केंद्रभागी होते. बघता-बघता हे दोन लेख हुआ व डेंग यांच्यातील सत्तेच्या चढाओढीच्या राजकारणातील दोन परस्परविरोधी प्रतीके झाली. मात्र दोघांनीही याबाबतीत कमालीचा संयम दाखवीत ही फूट चव्हाट्यावर आणण्याचे टाळले. एकोणिसाव्या शतकाच्या उतरार्धात अनेक पाश्चात्त्य राष्ट्रे आशिया खंडातील मागासलेल्या देशांमधील वसाहतींवर आपली पकड घट्ट करीत असताना जपान मात्र पाश्चात्त्य राष्ट्रांच्या पावलावर पाऊल टाकून अधिकाधिक आधुनिक होत होता.

जपानमधील या आधुनिक युगाची सुरुवात इवाकुरा मिशनने (Iwakura Mission) झाली. या मोहिमेमध्ये जपानमधील मेजी राजवटीतील विविध क्षेत्रांतील 51 नेत्यांनी इवाकुरा टोमोनी यांच्या नेतृत्वाखाली पाश्चात्त्य देशांचा दौरा केला आणि तेथील उद्योग, खनिजकाम, शेती, बंदरे, म्युझियम्स, वित्तव्यवस्था, संस्कृती व शिक्षणव्यवस्था यांचा अभ्यास करून तशाच प्रकारच्या संस्था जपानमध्ये निर्माण करण्याचे ठरवून आधुनिकतेची मुहूर्तमेढ केली. अशाच पद्धतीने 1977 व 1978 या वर्षांत अनेक चिनी नेत्यांच्या शिष्टमंडळांनी पाश्चात्त्य देशांचे दौरे केले. तरुणपणी फ्रान्स व रशियामध्ये दीर्घ काळ व्यतीत केलेले डेंग यांना पाश्चिामात्य भांडवलशाहीची व संस्कृतीची तोंडओळख होतीच. माओंच्या आधिपत्याखाली 1975 मध्ये काम करीत असताना संयुक्त राष्ट्रसभेच्या बैठकीला ते हजर होते.

या दौऱ्यातही त्यांनी अमेरिका व फ्रान्स येथे अनेक औद्योगिक व वित्तीय संस्थांना भेटी दिल्या होत्या, त्यामुळे पाश्चिमात्य देशांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे, हे त्यांना कळत होते. वरिष्ठ चिनी नेत्यांनी 1977 व 1978 मधील केलेल्या अभ्यासदौऱ्यांमुळे डेंग यांच्या प्रशासनात अनेक वरिष्ठ नेते बदलास अनुकूल झाले, त्यामुळे डेंग यांच्या सुधारणावादी धोरणांना पुढे चांगले पाठबळ मिळाले. मे 1978 मध्ये नियोजन आयोग व विदेश व्यापार विभाग यातील अधिकाऱ्यांनी हाँगकॉगला भेट देऊन त्यांच्याकडून औद्योगिक, वित्तीय व व्यवस्थापकीय सहकार्य मिळेल का, याचा अभ्यास केला. हाँगकाँगपासून जवळ असणाऱ्या ग्वांडाँग राज्यात बाओन जिल्ह्यामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन निर्माण करण्याची संकल्पना पुढे आली. कच्चा माल परदेशातून आयात करून, वस्तूंचे उत्पादन करून त्यावर कोणताही टॅक्स वा ड्युटी न लावता तो इतरत्र निर्यात करण्याचा प्रकल्प नियोजन आयोगाने मंजूर केला.

हाँगकाँगमधील खुल्या व्यवस्थेच्या आकर्षणामुळे व तेथे मिळणाऱ्या रोजगारांच्या संभाव्य संधीमुळे दर वर्षी हजारो तरुण मुले धाडस करून पोहून वा बोटीने हाँगकाँगमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत व त्यात मुत्युमुखी पडत. हे सामाजिक व सुरक्षेविषयक प्रश्न पाहून डेंग यांनी या प्रकल्पास परवानगी दिली होती. या दौऱ्यादरम्यानच Hong kong and Macao Affairs Office या कार्यालयाची स्थापना झाली. परराष्ट्र व्यापार खात्याने चीनचे आधुनिकीकरण करण्यासाठी मदत करण्यासाठीचा करार हाँगकाँगबरोबर केला.

याच वर्षात जपानच्या आर्थिक विकासाच्या धोरणांचा व व्यूहनीतीचा (Strategies) अभ्यास करण्यासाठी एक चिनी शिष्टमंडळ जपानला रवाना झाले. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेल्या जपानने अमेरिकेच्या ‘मार्शल प्लान’च्या अंतर्गत परकीय भांडवल स्वीकारीत आर्थिक सुधारणा केल्या, आधुनिकीकरण केले आणि कार्यक्षम व गुणवत्ताप्रधान उत्पादनासाठी विज्ञान-तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण संशोधनाचा अध्याय सुरू केला. अशा पद्धतीने जपानने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बाजारप्रणीत निर्यातप्रधान अर्थव्यवस्था निर्माण केली आणि त्याद्वारे जगातील बाजारपेठा काबीज केल्या.

ही सर्व धोरणे व त्याची अंमलबजावणी यांचा अभ्यास शिष्टमंडळाने केला. Gu Mu यांच्या नेतृत्वाखाली 20 सदस्यांच्या शिष्टमंडळाने मे-जून 1978 मध्ये पश्चिम युरोपचा- फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम असा- दौरा केला. भांडवलशाही देश भ्रष्टाचारी व मागासलेले असतात, असे समजणारे चिनी नेते पाश्चात्त्य देशांतील स्वातंत्र्य, प्रगती, पायाभूत सुविधा व सोई हे सर्व पाहून चक्रावले. पाश्चिमात्य भांडवलशाही भयानक व भेसूर असते, असे वारंवार बिंबविले गेलेल्या चिनी नेत्यांना पाश्चिमात्त्य देशांच्या अभ्यास दौऱ्यामध्ये सुखवस्तू व निरोगी समाज, आधुनिक उद्योग, कार्यक्षम शासनव्यवस्था, उच्च दर्जाच्या उत्पादनांची व उपभोग्य वस्तूंची सहज उपलब्धता दिसून आली. त्याप्रमाणेच त्यांना उच्च गुणवत्ता असणारी शिक्षणव्यवस्था, स्वातंत्र्य व खुली राजकीय व्यवस्था यांचेही दर्शन झाले. चीनमध्येही असा समाज निर्माण व्हावा असे त्यांना वाटले नसते, तरच नवल!

विशेषत: पाश्चिमात्य देशांतील स्वातंत्र्य, स्थानिक संस्थांचे अधिकार, पर्याय शोधण्याचे स्वातंत्र्य इत्यादी पाहून त्यांना आपल्या मागासपणाची खात्री पटली. पश्चिमात्यांची चीनला मदत करण्याची तयारी व त्यांचे वागणे पाहून तर त्यांना आश्चर्यच वाटले. त्यातील महत्त्वाचे आर्थिक कारण-पाश्चिमात्यांचे कारखाने पूर्ण क्षमतेने चालत नव्हते आणि चीनला मदत करण्याच्या निमित्ताने त्यांचे उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने चालतील, हे लक्षात आल्यानंतर आधुनिक भांडवलशाही परस्परसहकार्यावर अवलंबून असते, हेही त्यांना दिसून आले. शिष्टमंडळाने परत आल्यानंतर पॉलिट ब्युरोला विस्तृत सादरीकरण केले. नेहमी दुपारी 3 वाजेपर्यंत संपणारी पॉलिट ब्युरोची बैठक त्या दिवशी रात्री उशिरा 11 पर्यंत चालली. एकंदरीतच चीनमध्ये धोरणदिशा ठरविणाऱ्या अत्युच्च पातळीवर मोठे गुणात्मक बदल होत होते. परदेश व्यापार, परकीय भांडवलाची आयात, परकीय प्रगत तंत्रज्ञानाची आयात, उद्योगधंदे व उत्पादन यातील गुणवत्ता वाढविण्याची गरज आणि त्यासाठी करावयाची धोरण आखणी याची तयारी सुरू झाली होती.

या पॉलिट ब्युरोच्या मीटिंगनंतर डेंग यांच्याशी सल्लामसलत करून विकास कार्यक्रमासाठी कापड उद्योगाची निवड करण्यात आली. कापडाचा मोठा तुटवडा चीनमध्ये असल्याने कपड्यांसाठी सरकारकडून कुपने दिली जात. सिंथेटिक फायबरचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कापडनिर्मिती करून अर्थव्यवस्थेला गती देण्याचे घाटत होते. पाश्चिमात्य भांडवली देशांबरोबर सहकार्य करीत असताना नियम व कायदे काय असावेत, बाहेरील देशांना आपल्या देशात काम करू देताना बंधने किती असतील, स्वातंत्र्य किती असावे, या देशातील कोणत्या कंपन्यांबरोबर बाहेरील कंपन्या काम करतील, कर्जे कशी उभारावीत व तंत्रज्ञान कसे मिळवावे इत्यादी अनेक तपशिलांचा अभ्यास सुरू झाला. चीनमधील नेतृत्वाला व मध्यमवर्गाला आता खरोखरच मोठ्या आर्थिक विकासाचे वेध लागले होते!

Tags: अर्थव्यवस्था शिक्षण तंत्रज्ञान विज्ञान चीन भांडवलशाही व्हॉटेव्हर डेंग मार्शल हुआ गुओफेंग arthvyawstha shikshan tantrdnyan vidnyan chin bhandawalshahi hotevhar deng marshal hua guofeng weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात