डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

चीनच्या भावी प्रगतीत अमेरिकेचे जे साह्य चीनला मिळाले, त्यात डेंग यांच्या दौऱ्याचा फार मोठा वाटा होता. अमेरिकेमधून चीनमध्ये अनेक उद्योजक व गुंतवणूकदार चीनला भेटी देऊ लागले आणि अमेरिकन भांडवल मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये येऊ लागले. भांडवलाबरोबर प्रगत तंत्रज्ञान व व्यवस्थापन-शास्त्रातील तंत्रेही येऊ लागली. पुढे वर्ल्ड बँकेनेही चीनबरोबर काम करण्यास सुरुवात केली आणि आर्थिक विकासासाठी नवनवीन स्ट्रॅटेजी तयार होऊ लागल्या. चीनमधून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊ लागले व अशा विद्यार्थ्यांची संख्या खूपच वाढली. 1980 पासून 2005 पर्यंत

जवळजवळ 10 लाख विद्यार्थी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आले. त्यापैकी साडेतीन ते चार लाख विद्यार्थी उच्च पूर्ण करून चीनमध्ये परतले. या विद्यार्थ्यांनी चीनमधील विद्यापीठे व उच्च शिक्षणाच्या संस्थांना पुढे नेऊन त्यांची गुणवत्ता वाढविली.

डेंग यांनी 1978 मध्ये आर्थिक सुधारणांची पूर्वतयारी करण्यासाठी अमेरिका व जपान या आर्थिक दृष्ट्या प्रबळ सत्तांशी जवळचे संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला. वित्तीय भांडवल, गुंतवणूक, उच्च दर्जाचे तंत्रज्ञान, प्रभावी व्यवस्थापन तंत्र याबाबतीत हे दोन्ही देश पुढारलेले होते. त्यांची मदत घेऊन, अर्थव्यवस्था खुली करून चीनचा वेगाने आर्थिक विकास त्यांना करायचा होता. डेंग यांनी 1978 ते 1980 या काळात अमेरिका, जपान, युरोपीय देश, दक्षिण कोरिया, हाँगकाँग इत्यादी देशांशी कुशलतेने उत्तम संबंध प्रस्थापित केले. तसेच या देशांना भेटी देऊन त्यांच्याकडून कशा प्रकारचे सहकार्य व साह्य अपेक्षित आहे, हे स्पष्ट केले.

डेंग यांची ऑक्टोबर 1978 मधील दहा दिवसांची जपानभेट ऐतिहासिक स्वरूपाची होती. 1894-95 मधील चीन व जपान यांच्यातील युद्धात चीनला नमवून जपानने चीनकडून तैवान (फार्मोसा) बळकावला होता. शिवाय 1930 च्या दशकात मांचुरिया पादाक्रांत करून चीनवर मोठे आक्रमण केले होते. पुढे दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी सैन्याने चिनी जनतेवर क्रूर अत्याचारही केले. हे सारे चिनी लोक विसरू शकत नव्हते. मात्र बदलत्या आधुनिक काळात हे सर्व विसरून जपानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून सहकार्य घ्यावे, असे डेंग यांना वाटत असे. दुसऱ्या बाजूला अमेरिका व जपान या दोन्ही देशांना सोव्हिएत युनियनच्या वाढत्या प्रभावामुळे चीनला सोव्हिएत युनियनपासून तोडणे आवश्यक वाटत होते. माओ व जपानचे पंतप्रधान टनाका काकुई (Tanaka Kakuei) यांनी 1972 मध्ये चीन व जपानमधील संबंध सुरळीत करण्याकरता ‘शांती आणि मैत्री करार’ करण्याचे प्रयत्न केले होते; मात्र हा करार रखडला होता. त्यानंतर हे संबंध आणखी दृढ होण्यासाठी दोन्ही बाजूने सहा वर्षांत काहीही हालचाल झाली नाही. या दोन्ही देशांतील सागरी प्रदेशावर दोन्ही देशांनी वर्चस्व (hegemony) ठेवू नयेच; परंतु कोणत्याही इतर सत्तेने वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यास दोन्ही देशांनी त्याला विरोध करावा, ही चीनची सूचना जपानला अडचणीची वाटत होती. कारण त्यामुळे सोव्हिएत युनियनला विरोध केल्यासारखे झाले असते. जपानला सोव्हिएत युनियनबरोबर 1976 मध्ये तणावपूर्ण संबंध ठेवणे परवडण्यासारखे नव्हते. मात्र 1977-78 या कालावधीत तत्कालीन पंतप्रधान टाकेओ फुकुडा यांनी याबाबत खास प्रयत्न करून यासंबंधातील कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. शेवटी जुलै 1978 मध्ये डेंग यांनी या करारात जपानला हवी असणारी सवलत देऊ केली. यापूर्वी इतर देशांशी केलेल्या पूर्वीच्या करारांना या कराराने बाधा येणार नाही, अशी तरतूद जपान-चीन यांच्यातील करारात समाविष्ट केल्याने जपानची अडचण दूर झाली. डेंग यांनी ही सवलत देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, व्हिएतनाम व चीन यांच्यातील संघर्ष 1978 मध्ये टोकाला गेला होता आणि व्हिएतनामला धडा शिकविणे हे डेंग यांना अत्यावश्यक वाटत होते. या दृष्टीने जपानशी मैत्रीपूर्ण करार करणे चीनच्या दृष्टीने हितावह होते. या करारावर चीनमध्ये स्वाक्षऱ्या झाल्यावर डेंग यांनी दहा दिवसांचा जपान दौरा केला.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अर्धशतकात जपानला भेट देणाऱ्या तीन परदेशी पाहुण्यांचे जपानमध्ये फार कौतुक झाले. मार्शल प्लॅनमुळे उभारी घेत असलेल्या जपानला 1960 मध्ये जॉन केनेडी यांचे भाऊ रॉबर्ट केनेडी यांनी भेट दिली होती. त्यांचे आकर्षक व उमदे व्यक्तिमत्त्व आणि तरुण व सर्वसामान्य जनता यांच्याशी जवळचा संवाद साधण्याची हातोटी यामुळे जपानी लोक मोहरून गेले होते. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष किम डे जुंग यांनीही 1998 मध्ये जपानच्या जनतेशी असेच जवळचे नाते निर्माण केले होते. डेंग यांनीही 1978 मध्ये अशाच पद्धतीने जपानी जनतेची मने जिंकली आणि चीन व जपान यांच्यातील संबंधांतील एक नवा अध्याय सुरू केला. घराघरात टीव्ही असणाऱ्या जपानी जनतेला संयत आणि प्रामाणिक डेंग आश्वासक वाटले. चीनची प्राचीन संस्कृती व बौद्ध धर्म जपानसाठी प्रेरणादायी आहेत, असा जपानच्या नेत्यांचा व जनतेचा सूर होता. आपल्या प्रभावी भाषणाने डेंग यांनी जपानी जनतेला आपलेसे केले. ‘‘मी तीन बाबींसाठी जपानमध्ये आलो आहे. शांतता व मैत्रीपूर्ण करारावर सही करण्यासाठी; अनेक जपानी मित्रांनी दोन्ही देशांतील संबंध दृढ करण्यासाठी अविरत कष्ट घेतले आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी; प्राचीन काळात एक्स फ्यु हा चीनमधून जपानमध्ये अमृत कुंभ आणण्यासाठी आला होता, त्याची आठवण जागविण्यासाठी. आज मीही अमृत कुंभ घेण्यासाठी जपानमध्ये आलो आहे.’’ या शब्दांनी त्यांनी चीन व जपान यांच्यातील संबंध वेगळ्या उंचीवर नेले. हा अमृत कुंभ म्हणजे अर्थातच आधुनिकीकरणाचे मंत्र आणि तंत्र, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. दोन्ही देशांतील दीर्घकालीन द्वेष व त्यामुळे आलेली राजकीय ताठरता या भेटीमुळे नाहीशी झाली. जपानी नेत्यांनी डेंग यांच्याकडे गतकाळातील चुकांची, क्रौर्याची व हिंसाचाराची कबुली देऊन माफी तर मागितलीच; पण चीनचे राहणीमान वाढविण्यासाठी सहकार्यही देऊ केले. डेंग यांनीही मोकळ्या मनाने जपानी जनतेच्या या भावनेचा आदर करीत ‘झाले-गेले गंगेला मिळाले’, या भावनेने चीन व जपान यांच्या संबंधात मैत्रीपूर्ण अध्याय लिहिण्याचे सूतोवाच केले. जपानमध्ये डेंग यांनी निसान मोटारकार व इतर आधुनिक कारखान्यांना भेटी देऊन तेथील उत्पादनपद्धती पाहिल्या. जपानमधील सार्वजनिक वाहतूकव्यवस्था व लोकोपयोगी सेवांची त्यांनी पाहणी केली. टोकियो ते क्योटोदरम्यान बुलेट ट्रेनने प्रवास केला. जपानमधील बंदरे, मेकॅनाइज्ड स्टील फॅक्टरीज, टेलिव्हिजन व आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचे कारखान्यांना भेटी दिल्या.

डेंग यांच्या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याबरोबर आधुनिक सिनेचित्रण करणारे तंत्रज्ञ व चित्रण करणारी सामग्री असे. जपानमधील आधुनिक कारखाने, तंत्रज्ञान, चीनशी सहकार्यास उत्सुक असणारे कार्यक्षम जपानी लोक या प्रतिमा चीनमध्ये प्रसृत केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम चीनमधील लोकांवर व पक्षातील कार्यकर्त्यांवर होईल आणि आर्थिक विकासाचे नवे पर्व सुरू करण्याच्या दृष्टीने या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील, असा डेंगना विश्वास होता. चीनमधील राष्ट्रबांधणीच्या कामात जपानमधील उद्योगविश्वाला महत्त्वाची संधीही दिसत होती. त्यामुळे चीन-जपान यांच्यातील संबंध दोन्ही देशांच्या दृष्टीने फायदेशीर होते. पुढील वीस वर्षांत चीनने जपानकडून तंत्रज्ञान, व्यवस्थापनशास्त्र, कारखानदारी, गुणवत्ता वाढण्यासाठीचे कार्यक्रम, निर्यातीसाठी परदेशी बाजारपेठा काबीज करण्याची तंत्रे, मार्केट डोळ्यांसमोर ठेवून उत्पादन करण्याच्या शास्त्रीय पद्धती इत्यादी अनेक गोष्टी आत्मसात केल्या. डेंग यांचा जपान दौरा सर्वार्थाने यशस्वी ठरला.

याच काळात डेंग यांनी अमेरिकेबरोबरचे संबंध घनिष्ठ केले आणि चीनचे आधुनिकीकरण अधिक सुकर झाले. रिचर्ड निक्सन आणि हेन्री किसिंजर यांनी 1972 मध्ये चीनला भेट देऊन चीनबरोबर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर हे संबंध फारसे दृढ झाले नाहीत, कारण माओ सातत्याने ‘अमेरिका सोव्हिएत युनियनशी जवळचे संबंध ठेवीत आहे’ असा आरोप करीत असत. शिवाय रिचर्ड निक्सन अमेरिकेला परतल्यानंतर वॉटरगेट प्रकरण सुरू झाले. अमेरिकन राजकारण ढवळून निघाले आणि अमेरिकन राजकारण्यांचे चीनकडील लक्ष कमी झाले. चीनमध्येही नेतृत्वबदल, माओंचा मृत्यू यामुळे चीनचेही अमेरिकेकडील लक्ष कमी झाले. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे एक मिशन कार्यालय बीजिंगमध्ये होते, त्याला राजनैतिक दर्जा नव्हता. कारण दोन्ही देशांमध्ये अनेक विषयांवर ऐक्य नव्हते. अमेरिकेचे सोव्हिएत युनियन व तैवान यांच्याशी असणारे संबंध हे कळीचे मुद्दे होते. डेंग यांचा हुआ गुओफेंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये 1977 मध्ये समावेश झाल्याने अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारण्याबाबत परत लक्ष देण्यात सुरुवात केली. याच काळात अमेरिकेतही नेतृत्वबदल होऊन जिमी कार्टर अध्यक्ष झाले. त्यांनाही चीनबरोबरचे संबंध पूर्ववत्‌ करावयाचे होते. त्यांचे परराष्ट्रमंत्री सायरस व्हान्स यांना मात्र सोव्हिएत युनियनबरोबरची SALT (Strategic Arms Limitations Talks) बोलणी प्रथम करावीत, असे वाटत होते.

शेवटी जिमी कार्टर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झिबेग्न्‌यू ब्रेझेन्स्की यांच्या पुढाकाराने अमेरिका-चीन बोलणी 1977 मध्ये सुरू झाली. चीनचे दोन प्रमुख मुद्दे होते. अमेरिकेकडून विज्ञान, तंत्रज्ञान व अर्थविषयक साह्य चीनला घ्यावयाचे होते; मात्र तैवान (फार्मोसा) बाबत चीन कोणतीही तडजोड करण्यास तयार नव्हता. अमेरिका व चीन यांच्यात राजनैतिक संबंध निर्माण व्हावयाचे असतील तर अमेरिकेला तैवानबरोबर संबंध ठेवता येणार नाहीत, हे स्पष्ट होते. शिवाय अमेरिकेने चीन आणि तैवान यांच्या एकीकरणासाठी मदत करावी, अशी चीनची मागणी होती. ही मागणी अमेरिकेला मान्य होण्यासारखी नव्हती. अमेरिकेत काँग्रेस व सिनेटमध्ये तैवानची मोठी लॉबी होती. अमेरिका व तैवान यांच्यात 1954 मध्ये झालेल्या करारानुसार अमेरिका-तैवान यांच्यातील संबंध फारच जवळचे होते. त्यानुसार अमेरिकेकडून तैवानला नियमित शास्त्रपुरवठा होत असे. तैवान मुद्दा चीनच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा होता, कारण तो कम्युनिस्ट चीनच्या अस्तित्वाचा आणि चिनी जनतेच्या अस्मितेचा प्रश्न होता. तैवानला कोणतीही वैधता देणे याचा अर्थ स्वतःच्या अस्तित्वावर अविश्वास दाखविण्यासारखे होते.

दुसरा मुद्दा सोव्हिएत युनियनबाबतचा होता. सोव्हिएत युनियनबरोबर अमेरिकेने फार जवळचे संबंध ठेवू नयेत, असे चीनला वाटत होते. चीनच्या दक्षिणेस व्हिएतनाम व उत्तरेस सोव्हिएत युनियन यांच्यामुळे चीनला घेरल्यासारखे व असुरक्षित वाटत होते. त्यात दक्षिण व उत्तर व्हिएतनाम यांचे एकीकरण झाल्यानंतर व्हिएतनाम व सोव्हिएत युनियन बरेच जवळ आले आणि चीन व व्हिएतनाम यांच्यात तणावपूर्ण संबंध निर्माण झाले. SALT मुळे (Strategic Arms Limitation Talks) अमेरिका व सोव्हिएत युनियन एकत्र येत होते, ते चीनला नको होते. जेव्हा 1978 नंतर व्हिएतनाम व चीनमधील संबंध तणावपूर्ण झाले, तेव्हा चीनला अमेरिकेबरोबर जवळचे संबंध ठेवणे आवश्यक झाले. या तणावपूर्ण वातावरणात शेवटी डेंगना तैवानच्या मुद्यावर बरेच नमते घ्यावे लागले आणि चीन व अमेरिकेत समझोता घडून आला. दि.6 डिसेंबर 1978 रोजी याची घोषणा करून अमेरिका व चीन यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. चीनशी राजनैतिक संबंध स्थापन करीत असताना अमेरिकेला तैवानबरोबरचे संबंध औपचारिक रीत्या संपवावे लागले. मात्र असे असले तरी अमेरिकेने तैवानबरोबरचे संबंध प्रत्यक्षात इतर मार्गांनी सुरूच ठेवले. या संबंधांना वैधता देण्यासाठी अमेरिकन काँग्रेसच्या प्रतिनिधींनी ‘तैवान रिलेशन्स ॲक्ट 1979’ हा कायदा जिमी कार्टर यांच्या नाकावर टिच्चून पास करून घेतला. हा कायदा एप्रिल 1979 मध्ये पास झाला तरी तो पूर्वलक्ष्यी प्रभावाने दि.1 जानेवारी 1979 पासून अमलात आणण्याची काळजीदेखील काँग्रेसने घेतली. तैवानबरोबर मैत्री निभावण्याच्या अमेरिकेच्या या पद्धतीने डेंग अर्थातच खूप खवळले; मात्र व्हिएतनाम प्रकरणाने त्यांचा नाइलाज झाला.

यानंतर दीड महिन्यातच दि.28 जानेवारी 1979 ते 5 फेब्रुवारी 1979 या काळात डेंग यांनी अमेरिकेचा दौरा सपत्नीक केला. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेच्या महत्त्वाच्या मुत्सद्यांशी व अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध प्रस्थापित केले आणि चीनसाठी अमेरिकेकडून विविध बाबतींत सहकार्य प्राप्त केले. कम्युनिस्ट असूनही आर्थिक विकास, खुली अर्थव्यवस्था व भांडवलशाही देशांबरोबर सहकार्य इत्यादी बाबतींत डेंग उत्सुक होते- ही बाब अमेरिकन लोकांना, राज्यकर्त्यांना व माध्यमांना भावली. शिवाय चीनच्या प्राचीन संस्कृतीबद्दल उत्सुकता असल्याने डेंग अमेरिकेत जिथे जात तिथे त्यांचे उत्तम स्वागत होई. ह्युस्टन येथे नासामधील अवकाश संशोधन केंद्राला भेट दिल्यावर ते प्रभावित झाले. ह्युस्टनमधील खनिजतेल उत्खननाचे तंत्रज्ञान, सिॲटल येथील बोर्इंग विमानांची फॅक्टरी आणि ॲटलांटामधील फोर्ड मोटारींचा कारखाना यांना त्यांनी भेट दिली.

कार्टर यांच्याशी बोलणी करताना डेंग यांनी सोव्हिएत विस्तारवादाला चीन व अमेरिका यांनी एकत्र विरोध करण्याचा मुद्दा काढला. व्हिएतनाम पूर्वेकडील क्युबा आहे, अशी सुरुवात करून डेंग यांनी कार्टर यांना खासगी बैठकीत येत्या काही काळात चीन व्हिएतनामला चांगला धडा शिकविणार, असे स्पष्ट सांगितले. व्हिएतनामला रोखले नाही तर रशिया व व्हिएतनाम पूर्व आशियात प्रबळ होऊन आशियाची शांती नष्ट होईल, असे डेंग यांना वाटत असे. कार्टर यांनी डेंग यांना या हल्ल्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, असे कार्टर यांनी त्यांच्या रोजनिशीत लिहून ठेवले असले तरी, असे काही झाल्यास ते अमेरिकेच्या पथ्यावर पडणारे होते. अमेरिकेच्या भेटीनंतर चीनने व्हिएतनामवर हल्ला केला तर त्याचा विपरीत अर्थ रशिया काढील; तसेच प्रथम हल्ला केल्याने चीन हल्लेखोर आहे, असे समजले जाईल, असे कार्टर यांनी डेंग यांच्या नजरेस आणले. मात्र व्हिएतनामला धडा शिकवून चिनी सैन्य तत्काळ परत येईल, त्यामुळे काही प्रश्न निर्माण होणार नाहीत, असे आश्वासन डेंग यांनी कार्टर यांना दिले. कार्टर यांनी मात्र डेंग यांची पाठ वळताच रशियाला याबाबत माहिती दिली.

विविध प्रकारचे तंत्रज्ञान, विज्ञान यांच्या साह्याबाबत डेंग यांनी अमेरिकेकडे मागणी केलीच; याशिवाय दर वर्षी चिनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत विज्ञान, तंत्रज्ञान व इतर उच्च शिक्षणासाठी पाठविण्यासाठीही डेंग यांनी कार्टर यांचे मन वळविले. याशिवाय चीन व अमेरिका यांच्यात व्यापारी संबंध प्रस्थापित करणे आवश्यक होते. यात एक अडचण अशी होती की, 1974 मध्ये अमेरिकेच्या काँग्रेसने कायद्यात जॅक्सन-वाणिक सुधारणा करून कम्युनिस्ट देशांना अमेरिकेशी व्यापारी संबंध ठेवताना महत्त्वाची अट ठेवली होती. त्या देशांनी त्यांच्या नागरिकांना देश सोडून इतरत्र वास्तव्यास जायचे असेल (Emigration)तर अशा बाबतींत परवानगी दिलीच पाहिजे, अशी अट होती. असे धोरण कम्युनिस्ट देशांचे असेल, तरच अमेरिकेबरोबर ते व्यापार करू शकत. काँग्रेस भेटीच्या वेळी काँग्रेसच्या सदस्यांनी डेंग यांना चीन अशा बाहेर वास्तव्यास जाणाऱ्या लोकांना परवानगी देते का, असे विचारले. डेंग यांनी हसत-हसत ‘तुमच्याकडे किती लोकांना पाठवून देऊ? दहा लाख की पन्नास लाख?’ असे गमतीने विचारल्यावर हा मुद्दा काँग्रेस सदस्यांनी सोडून दिला आणि चीनला या अटीतून सूट देऊन टाकली.

फिलाडेल्फियामधील टेम्पल विद्यापीठाने डेंग यांना ऑनररी डिग्रीने सन्मानित केले तेव्हा, डेंग यांनी अमेरिकन विद्यापीठांतील विचारस्वातंत्र्याचा गौरव करीत हा सन्मान कम्युनिस्ट विचारांचा आहे, असे भाषणात नमूद केले. मात्र चीनमध्ये परतताच अगदी याच वर्षात त्यांनी सांकृतिक क्रांती संपुष्टात आल्यानंतर बहरणाऱ्या अभिव्यक्ती-स्वातंत्र्याला चापही लावला.

चीनच्या भावी प्रगतीत अमेरिकेचे जे साह्य चीनला मिळाले, त्यात डेंग यांच्या दौऱ्याचा फार मोठा वाटा होता. अमेरिकेमधून चीनमध्ये अनेक उद्योजक व गुंतवणूकदार चीनला भेटी देऊ लागले आणि अमेरिकन भांडवल मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये येऊ लागले. भांडवलाबरोबर प्रगत तंत्रज्ञान व व्यवस्थापन-शास्त्रातील तंत्रेही येऊ लागली. पुढे वर्ल्ड बँकेनेही चीनबरोबर काम करण्यास सुरुवात केली आणि आर्थिक विकासासाठी नवनवीन स्ट्रॅटेजी तयार होऊ लागल्या. चीनमधून विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर जाऊ लागले व अशा विद्यार्थ्यांची संख्या खूपच वाढली. 1980 पासून 2005 पर्यंत जवळ-जवळ 10 लाख विद्यार्थी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आले. त्यापैकी जवळजवळ साडेतीन ते चार लाख विद्यार्थी चीनला परतले. या विद्यार्थ्यांनी चीनमधील विद्यापीठे व उच्च शिक्षणाच्या संस्थांना पुढे नेऊन त्यांची गुणवत्ता वाढविली. चीनमधील अनेक विद्यापीठे व संस्था 2005 नंतर जागतिक दर्जाच्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आज चीनने विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, अवकाश संशोधन, संगणक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयांत जागतिक तोडीचे संशोधन चालविले आहे; त्याचा पाया अमेरिकेने दिलेल्या मदतीमध्ये होता. त्याचा थेट संबंध डेंग यांच्या यशस्वी दौऱ्याशी होता.  

डेंग यांनी 1978 मध्ये आशियातील म्यानमार, नेपाळ, मलेशिया, सिंगापूर, थायलंड व उत्तर कोरिया या देशांचेही दौरे केले. आशिया खंडातील या देशांचा तातडीने दौरा करण्याचे कारण थोडे वेगळे होते. अमेरिकेने व्हिएतनाम युद्धातून 1973 मध्ये अंग काढून घेतले. त्यानंतर 1975 मध्ये उत्तर व दक्षिण व्हिएतनाम या दोन देशांचे एकीकरण होऊन एकसंध व्हिएतनाम जन्मास आला. व्हिएतनाम व सोव्हिएट युनियन यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध पूर्वीपासून होते. व्हिएतनामने 1975 नंतर नव्याने राष्ट्रबांधणी करण्यासाठी रशिया व चीन दोघांकडे अधिक मदत मागितली. देशामधील राजकीय रस्सीखेच, नेतृत्वातील बदल व अस्थिरता यामुळे चीनने व्हिएतनामकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे चीन व व्हिएतनाम यांच्या संबंधात अंतर पडत गेले. शिवाय दोन्ही देशांमध्ये सीमारेषेवरून वाद होताच. त्यामुळे सोव्हिएत युनियन व व्हिएतनाम हे उत्तरोत्तर अधिक जवळ येत चालले होते. अमेरिकेने माघार घेतल्यानंतर त्यांच्या मोठ्या आरमाराच्या वापरासाठी बांधलेली आधुनिक बंदरे व्हिएतनामकडे आली होती. व्हिएतनामला प्राप्त होणाऱ्या मदतीच्या बदल्यात व्हिएतनामने रशियाला या बंदरांचा वापर करण्यास परवानगी दिली. व्हिएतनामने चीनच्या शेजारी असलेला लाओस गिळंकृत केला होता, शिवाय कंबोडियाविरुद्ध युद्धाची जय्यत तयारी सुरू केली होती. सप्टेंबर 1978 मध्ये व्हिएतनामने कंबोडियावर हवाई हल्ले सुरू केले होते. दक्षिण व उत्तर व्हिएतनाम यांचे एकीकरण झाल्यानंतर सरकारने महत्त्वाच्या उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला. व्हिएतनाममध्ये चिनी वंशाचे अंदाजे 20 लाख लोक राहात होते; त्यातील बरेचसे छोटे-मोठे व्यापारी व उद्योजक होते. त्यांचा या राष्ट्रीयीकरणाला विरोध होता. या विरोधामुळे व्हिएतनाम सरकारने या मूळच्या चिनी वंशाच्या लोकांवर कारवाई सुरू करून त्यांच्यावर अनेक बंधने आणली. एक लाखावर चीनवंशीय व्हिएतनाम सोडून चीनकडे यावयास निघाले. एकंदरीतच चीन व व्हिएतनाम यांच्यातील संबंध फारच ताणले गेले होते. व्हिएतनामला धडा शिकवावा, असे डेंग यांना तीव्रपणे वाटू लागले. मात्र तसे करण्यापूर्वी चीन व व्हिएतनामशेजारच्या देशांत जाऊन त्यांची भूमिका समजावून घेऊन त्यांना व्हिएतनामबद्दल चीनची भूमिका समजावून सांगावी, असे डेंग यांना वाटत होते. म्हणूनच त्यांनी 1978 मध्ये थायलंड, मलेशिया, सिंगापूर, ब्रह्मदेश, नेपाळ या सर्व देशांचा दौरा केला.

फेब्रुवारी 1979 मध्ये डेंग यांनी व्हिएतनामवर अचानक हल्ला करून व्हिएतनामचे मनसुबे धुळीस मिळविले. एक महिना चाललेल्या या युद्धात चीनने व्हिएतनामची पाच प्रमुख शहरे जलदगतीने काबीज केली आणि तितक्याच त्वरेने व्हिएतनामला ‘धडा’ शिकवून चिनी सैन्यदल माघार घेऊन त्यांच्या नेहमीच्या नियंत्रणरेषेपलीकडे जाऊन थांबले. रशियाने व व्हिएतनामने चीनच्या वाटेला जाऊ नये, असा इशारा या युद्धाने दिला. या युद्धामुळे रशियावर चांगला वचक बसला व दक्षिण-पूर्व आशियामध्ये रशियाला प्रवेश बंद झाला. यानंतर चीन व रशिया यातील संबंध बऱ्यापैकी स्थिरावले. ऑक्टोबर/नोव्हेंबर 1979 मध्ये सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानात सैन्य पाठविले तेव्हा, हे सैन्य मागे घ्यावे अशी जोरदार मागणी चीन करू शकला. चीनच्या या भूमिकेमुळे चीन व अमेरिका यांच्यात सैन्यदल सुरक्षेविषयक सहकार्याबाबत अनेक बाबतींत जवळीक निर्माण झाली. शिवाय डेंग यांच्या खुल्या आर्थिक धोरणामुळे पुढे-पुढे अमेरिका व चीन यातील संबंध दृढ झाले. एकंदरीत, डेंग यांनी चीनच्या आर्थिक विकासासाठी, सुरक्षेसाठी उत्तम आंतरराष्ट्रीय वातावरण तयार केले. डेंग यांनी व्हिएतनामशी केलेल्या युद्धामुळे थायलंडसारख्या ASEAN (Association of South East Nations) मधील देशांची व्हिएतनामबद्दलची भीती कमी झाली व चीनबद्दल त्यांना विश्वास वाटू लागला.

याच वेळी डेंग यांनी अमेरिकेबरोबर सुरक्षाविषयक सहकार्याचे धोरण आखण्यात सुरुवात केली व त्याचे तपशीलही जाहीर केले. त्यामुळे आशियातील चीनचे वर्चस्व मोठ्या प्रमाणावर वाढले. व्हिएतनाममधील मोक्याच्या बंदरांचा सुरक्षाविषयक कारणांसाठी सोव्हिएत युनियन वापर करणार, हे जाणून डेंग यांनी अमेरिकन तेलसंशोधन कंपनी अर्लोला (ARLO) 1979 मध्ये व्हिएतनाम व चीनचे हैनान बेट यातील समुद्राच्या भूगर्भातील तेलसंशोधन करण्यास पाचारण केले. व्हिएतनाममधून माघार घेत असतानाच हा करार झाला, हे महत्त्वाचे. बीजिंग विमानतळावर रशियन एअरोफ्लोटची विमाने ज्या भागात उतरत, त्याच भागात अमेरिकन विमाने उतरण्यास परवानगी दिली. रशियामधील अण्वस्त्रांच्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी विशेष प्रकारची यंत्रसामग्री घेऊन अमेरिकन विमाने तेथे उतरत. ही बाबही चीनने रशियाला अप्रत्यक्षपणे स्पष्ट करून त्यांच्यावर दबाव आणला होता. चीनचे अमेरिकेबरोबरचे सुरक्षा सहकार्य असेच होते. त्यात कोणत्याही प्रकारच्या कराराने बांधून घेतले नसले, तरी त्यात आधुनिक यंत्रसामग्री, काँप्युटर्स इत्यादींचा पुरवठा करण्याबाबतचा समावेश होता. अमेरिकेने चीनला सुरक्षाविषयक शस्त्रास्त्रे व यंत्रसामग्री सढळ हाताने पुरवावी, यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करीत होता. यादरम्यान अमेरिकन व चिनी सैन्यदलांनी परस्परांशी उत्तम संपर्क स्थापन केला होता, तसेच संयुक्त कवायती व इतर सहकार्याचे कार्यक्रमही ते करीत.

याशिवाय डेंग यांनी सैन्यदलाच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम तयार केला होता. मात्र सोव्हिएत आक्रमणाची भीती कमी झाल्यावर, अमेरिकेकडून सुरक्षा सहकार्य सुरू झाल्यावर व व्हिएतनाम युद्ध संपल्यावर डेंग यांनी सैन्यदलाच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम 10 वर्षांनी पुढे ढकलला आणि आर्थिक विकास, शिक्षण, संशोधन, औद्योगिकीकरण व शेतीच्या आधुनिकीकरणाकडे जास्त लक्ष दिले.

Tags: भाग 13 साधना सदर सदर चिनी महासत्तेचा उदय चायना सतीश बागल sadhana series sadar chini mahasattecha uday china satish bagal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात