डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

राजकीय स्वातंत्र्याच्या मुद्द्याने 1978 पासून अखेरपर्यंत डेंग यांना चांगलेच ग्रासले होते. मुळात ते तरुणपणापासून साम्यवादी चळवळीत असल्याने राजकीय स्वातंत्र्य देण्याच्या विरोधातच होते. मात्र कम्युनिस्ट पक्षाला लोकांच्या मनात स्थान मिळवायचे असेल, तर पक्ष व सरकारने लोकांचे राहणीमान उंचावले पाहिजे, त्यांचे जीवन सुकर केले पाहिजे आणि यासाठी वेगाने आर्थिक विकास साधला पाहिजे, हे त्यांना कळत होते. यासाठी किमान स्वातंत्र्य लोकांना दिले पाहिजे, विविध प्रकारचे पर्यांय समोर ठेवून त्याबद्दलचे निर्णय घेऊ दिले पाहिजेत, हे अभिप्रेत होतेच. इथे फार सैद्धांतिक विचार करून चालणार नव्हते. त्यामुळेच 1978 पासून ते 1989 पर्यंत तिआनमेन चौकातील विद्यार्थ्यांच्या निदर्शनांपर्यंत डेंग यांना तारेवरची कसरत करावी लागत होती.

डेंग झिओपेंग आणि चेन युन यांच्या गटांमध्ये आर्थिक सुधारणा व अर्थव्यवस्थेच्या गतीबाबत रस्सीखेच सुरू असताना 1984-85 या वर्षात अतिरिक्त वित्तीय तूट, विशेषतः परकीय चलनाच्या गंगाजळीतून झालेला अतिरिक्त खर्च, यामुळे चलन फुगवटा व भाववाढही झालेली दिसत होती. याबाबत चेन युन यांच्या गोटातून सरकारवर बरीच टीकाही झाली. उच्च आर्थिक दराने आर्थिक विकास होत असतानाच भ्रष्टाचार वाढत होता; म्हणून स्मगलिंग, काळा बाजार व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काही उपाययोजनाही करण्यात आल्या. चेन युन यांनी तर आर्थिक विकासदर 6-7 टक्क्यांपेक्षा जास्त नको तसेच टीव्ही अंतर्गतच्या उद्योगांना (टाऊन अँड व्हिलेज एन्टरप्रायजेस) जास्त साधनसामग्री देऊ नये, कारण त्यांचा सरकारी उद्योगांवर विपरीत परिणाम होईल, याही बाबी मांडल्या. त्यानंतर 1985-86 मध्ये खर्चावर नियंत्रण ठेवून, चलनपुरवठा कमी करून चेन युन यांनी अर्थव्यवस्था पुन्हा मूळ पदावर स्थिर केली. मात्र तरीही उच्च आर्थिक विकासदर व आर्थिक सुधारणा यामुळे अर्थव्यवस्था थोडीफार अस्थिर होत असे. त्यामुळे डेंग आणि चेन युन यांच्यातील आर्थिक धोरणांची जुगलबंदी पुढे अशीच सुरू राहिली. 

डेंग यांनी बाजारचलित अर्थव्यवस्थेकडे जोमदारपणे कूच करण्यासाठी महत्त्वाच्या वस्तूंच्या किंमतीवरील नियंत्रणे पूर्णपणे उठविण्याचा निर्णय 1988 मध्ये घेतला. त्यामुळे तात्पुरत्या किंमती वाढतील, मात्र त्या लगेच खाली येतील, असे सांगण्यात आले. सल्लागारांनी त्यांना इशारा दिला होता की, किंमतीवरील नियंत्रणे उठविण्यापूर्वी त्या वस्तूंची बाजारात उपलब्धता आहे, याची खात्री करावी; शिवाय सध्याच्या चलन फुगवट्यामुळे व तुटवड्यामुळे हा निर्णय पुढे ढकलावा. मात्र डेंग घाईत होते. त्यांना जलद आर्थिक विकास हवा होता, राष्ट्रीय उत्पन्न चौपट करायचे होते. ते आपल्या निर्णयावर हटून बसले. शेवटी पॉलिट ब्युरोने निर्णय घेतला. ‘पीपल्स डेली’मधून हा निर्णय जाहीर होताच घबराट झाली. लोकांनी बँकेतून पैसे काढून मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी करून ठेवल्या आणि अनेक उत्पादने बाजारातून नाहीशी झाली. दि. 15 व 17 ऑगस्टला घेतलेला महत्त्वाचा निर्णय 30 ऑगस्टला रद्द करावा लागला. 

डेंग यांची चूकच झाली होती. आर्थिक सुधारणा, उच्च आर्थिक विकासदर, मोठ्या प्रमाणावर होणारे औद्योगिकीकरण याचे विपरीत परिणाम होतच असतात. वाढत्या अर्थव्यवस्थेला पुरेसा चलनपुरवठा हवा असतो. अशा परिस्थितीत वस्तूंची उपलब्धता नसेल, तर मोठी भाव वाढ होऊ शकते. त्याची फारशी पर्वा न करता फक्त आर्थिक विकासाचे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यांपुढे ठेवले. डेंग यांचे वय झाले होते. त्यांचे वय 83 वर्षांचे! आणि लोकांशी संपर्कही कमी झाला होता. या निर्णयाचे दूरगामी परिणाम डेंग यांच्यावर झाले. इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे थोडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. चेन युन यांचा गट हळूहळू शक्तिशाली होत होता. सुधारणावादी डेंग आणि सावध व धीम्या गतीने अर्थव्यवस्था वाढावी, अशा मताचे चेन युन यांच्या गटांमध्ये चेन युन यांचे वर्चस्व वाढू लागले. याबरोबर पक्षामधील आत्तापर्यंत थोडे दबून राहिलेले कडवे डावे अधिक क्रियाशील होतील, अशी परिस्थिती होती. मात्र डेंग यांनी सर्वांना बोलावून ‘हा माघारीचा निर्णय तात्पुरता असून, सुधारणा होत राहणारच’ असा इशाराही दिला. चेन युन यांना पंतप्रधान झाओ झियांग यांच्यावर टीका करण्याची आयती संधीच मिळाली; त्याचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी झाओ झियांग यांना कडक सूचना दिल्या. या साऱ्यांचा परिणाम व्हायचा तो झाला. वस्तूंचा तुटवडा, भाववाढ, वाढता भ्रष्टाचार इत्यादींमुळे 1988-1989 मध्ये अस्वस्थता व त्यानंतर अक्षरशः अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यातूनच पुढे तिआनमेन प्रकरण घडले.

पक्षात आर्थिक सुधारणांबाबत दोन तट पडले होतेच. पक्षातील तिसऱ्या कट्टर माओवादी गटाला कोणत्याच सुधारणा नको होत्या. पक्षामध्ये आर्थिक सुधारणांचे राजकारण असे वळण घेत असताना पक्षाच्या बाहेर, रस्त्यावर परिस्थिती वेगळीच होती. विद्यापीठे व उच्च शिक्षणसंस्था 1978 नंतर परत एकदा गजबजू लागल्या. कला, साहित्य व विविध प्रकारच्या कथनांना बहर येऊ लागला होता. सांस्कृतिक क्रांतीचा विनाशकारी काळ इतिहासजमा होत होता. त्या आठवणींसंदर्भात बुद्धिमंत, विचारवंत, विद्यार्थी आणि मध्यमवर्ग यांच्यात वेगळीच आकांक्षा निर्माण होत होती. त्यांना राजकीय स्वातंत्र्य हवे होते, पाश्चात्त्य पद्धतीची लोकशाही हवी होती. आर्थिक सुधारणा व डेंग यांचा सुधारणाविषयक दृष्टिकोन पाहता, लोकांना असे वाटत होते की, नजीकच्या भविष्यकाळात चीनमध्ये लोकशाही युग अवतरेल. अस्वस्थ झालेल्या पक्षाच्या दृष्टीने हे सारे अवघड होत चालले होते. लोकांची स्वातंत्र्याची व राजकीय लोकशाहीची मागणी थोडी जरी मान्य केली तर पक्षाची ताकद कमी होणार होती, हे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती होते. 

लोकशाही व स्वातंत्र्य या मुद्द्यांवर डेंग यांच्या कारकिर्दीची सुरुवात 1978 मध्ये जरा चाचपडतच झाली. बीजिंगमधील तिआनमेन चौकाजवळील झिदान ऊर्फ लोकशाहीची भिंत लोकांच्या राजकीय आशा-आकांक्षांनी व स्वातंत्र्याच्या मागणीने अक्षरशः फुलून येत होती. डेंग यांच्याकडे त्याचे अर्थातच उत्तर नव्हते. त्यांना अर्थव्यवस्था खुली करून अधिक आर्थिक विकास साधायचा होता; राजकीय सुधारणा करून लोकांना स्वातंत्र्य द्यायचे नव्हते.  पूर्व युरोपीय देशांमध्ये साम्यवादाविरुद्धची चळवळ 1980 च्या दशकात अधिकाधिक तीव्र होत होती. पोलंडमधील कामगारांची चळवळ प्रखर होऊन तिथे सर्वांत मोठा व लांबलेला कामगार संप सुरू झाला. चीनमधील कम्युनिस्ट नेते व पुढारी यांनी सुरुवातीला संपाला पाठिंबा दिला; मात्र असाच संप चीनमध्ये झाला तर काय करायचे, अशा विवंचनेत ते पडले. चीनमध्ये 1977 पासून सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेने गती घेतली होती; मात्र डेंग व पक्ष प्रमुख हु याओबांग यांना भाववाढ आणि भ्रष्टाचार यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची सारखी भीती वाटत असे. याच काळात  उच्च आर्थिक विकासदर व घाईने चाललेल्या आर्थिक सुधारणा यावरून डेंग आणि पक्षाचे सरसचिव हु याओबांग यांनाचेन युन सातत्याने टार्गेट करीत असत. ऑगस्ट 1980 मध्ये डेंग यांनी लोकशाही व वैयक्तिक स्वातंत्र्य यावर केलेले भाषण चांगलेच वादग्रस्त ठरले. कारण त्यात मतदानाचा अधिकार व वैयक्तिक स्वातंत्र्य याचा उल्लेख नसला, तरी सर्वसामान्य लोक व त्यांच्या आशा-आकांक्षांचा विचार होता. 

या भाषणामुळे  स्वातंत्र्य व लोकशाही या राजकीय मुद्द्यांवर डेंग काय भूमिका घेणार, याबद्दल कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मनात भीती होती. दि. 25 डिसेंबर 1980 रोजी अशाच दुसऱ्या भाषणातून डेग यांनी ते व त्यांचा पक्ष लोकांना अधिक राजकीय स्वातंत्र्य देणार नसल्याचे स्पष्ट केले. माओंइतक्या दडपशाही पद्धतीने कारभार करणार नाही; मात्र उदारमतवादी विचारांना चीनमध्ये रुजूही देणार नाही, हे डेंग यांनी स्पष्ट केले. डेंग यांनी या भाषणात पक्षाची डेमोक्रॅटिक सेंट्रॅलिझम ही संकल्पना स्पष्ट केली. पक्षांतर्गत बंद दाराआड निर्णय घेताना मर्यादित प्रमाणात लोकशाही ठीक; मात्र एकदा निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय अंमलात आणण्याची जबाबदारी सगळ्यांचीच, तिथे वेगळ्या मताला वा अनावश्यक स्वातंत्र्याला वाव नाही. 

राजकीय स्वातंत्र्याच्या मुद्द्याने 1978 पासून अखेरपर्यंत डेंग यांना चांगलेच ग्रासले होते. मुळात ते तरुणपणापासून साम्यवादी चळवळीत असल्याने राजकीय स्वातंत्र्य देण्याच्या विरोधातच होते. मात्र कम्युनिस्ट पक्षाला लोकांच्या मनात स्थान मिळवायचे असेल, तर पक्ष व सरकारने लोकांचे राहणीमान उंचावले पाहिजे, त्यांचे जीवन सुकर केले पाहिजे आणि यासाठी वेगाने आर्थिक विकास साधला पाहिजे, हे त्यांना कळत होते. यासाठी किमान स्वातंत्र्य लोकांना दिले पाहिजे, विविध प्रकारचे पर्यांय समोर ठेवून त्याबद्दलचे निर्णय घेऊ दिले पाहिजेत, हे अभिप्रेत होतेच. इथे फार सैद्धांतिक विचार करून चालणार नव्हते. त्यामुळेच 1978 पासून ते 1989 पर्यंत तिआनमेन चौकातील विद्यार्थ्यांच्या निदर्शनांपर्यंत डेंग यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. ज्या ज्या वेळी या दशकात स्वातंत्र्याचा वा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न आला, विचारस्वातंत्र्याचा प्रश्न आला; त्या-त्या वेळी डेंग यांनी आपल्या मूळ भूमिकेमध्ये जात, स्वातंत्र्य नाकारणारी भूमिका घेतली. असे असले तरी डेंग यांचे अनेक सहकारी उदारमतवादाकडे झुकणारे होते. वॅन ली, पक्ष सरसचिव हु याओबांग, पंतप्रधान झाओ झियांग व अशा सुधारणावादी नेत्यांना डेंग यांनी महत्त्वाची पदे दिली होती. यातील काही नेत्यांची मते लोकशाही व वैयक्तिक स्वातंत्र्य यांना पूरक होती. स्वातंत्र्य किती असावे यावरून बरीच उलटसुलट चर्चा 1983 व 1984 मध्ये सुरू झाली. मार्क्सच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त 1983 मध्ये झाओ झियांग यांनी एक लेख लिहून नव्याच वादाला तोंड फोडले. त्यांच्या मते, कामगारांचे शोषण आणि त्यामुळे (कष्ट करूनही फळाला पारखे झाल्याने) येणारे वैफल्य (Alienation) हे फक्त भांडवलशाहीमध्येच असते असे नव्हे, ते साम्यवादी राजवटीतही होऊ शकते; कारण तेथे कायद्याचे राज्य नसते आणि कायदे असले तरी अधिकारी व राजकारणी सत्तेचा दुरुपयोग करतात. झाओंचे भाषण पीपल्स डेलीमध्ये छापून येऊ नये यासाठी प्रयत्न झाले, तरीही भाषण छापून आलेच. डेंग यांनी सप्टेंबरमध्ये या लेखाला उत्तर देऊन असे म्हटले की, मार्क्सवादाप्रमाणे कामगारांचे शोषण व त्यानंतर त्यांना येणारे वैफल्य हे भांडलवशाहीमध्येच दिसते. कामगारांच्या कामाचा पूर्ण मोबदला न दिल्याने, आर्थिक शोषणामुळे व इतर कारणांनी आलेले वैफल्य फक्त भांडवलशाहीतच होऊ शकते. पुढे डेंग यांनी असेही म्हटले की- सांस्कृतिक क्रांतीदरम्यान व पूर्वीही ज्या मंडळींना थोडाफार त्रास झाला, त्याचे भांडवल करून ती मंडळी वातावरण दूषित करीत आहेत. त्याला त्यांनी ‘स्पिरिच्युअल पोल्युशन’ असे म्हटले. या स्पिरिच्युअल पोल्युशनचा व ते करणाऱ्यांचा राजकीयदृष्ट्या बंदोबस्त कसा करावा आणि बुद्धिमंतांना न दुखवता हा पार्टीपुढचा उठाव कसा दाबून टाकावा, यांची डेंग यांना चिंता होती. 

या काळात साहित्य, कला, सिनेमा यांना बहर येत होता; मात्र त्यातील अभिव्यक्ती पक्षाला रुचणारी नव्हती.  साहित्यिक बाई हुआ यांच्या कुलियान (Bitter Love) या तत्कालीन नाटकावर आधारित Unrequirted Love हा सिनेमा 1981 मध्ये निघाला. जपान-चीन युद्धावेळी चीन सोडून गेलेला कलाकार कम्युनिस्ट क्रांतीनंतर चीनमध्ये परततो. पुढे त्याची मुलगी जेव्हा चीन सोडून परदेशी जाण्याचा विचार करते, तेव्हा तो त्याला नकार देतो. तुम्ही देशावर, पक्षावर प्रेम करता त्याच प्रमाणे तुमचा देश/पक्ष तुमच्यावर प्रेम करतो का, या मुलीच्या प्रश्नाभोवती सिनेमा फिरत राहतो. पुढे रेडगार्ड्‌सच्या छळाला कंटाळून तो देश सोडून जाण्याचा प्रयत्न करतो व त्यातच त्याचे निधन होते. रेडगार्डसपासून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात जेव्हा त्याचे निधन होते, तेव्हा त्याचे प्रेत बर्फातच वेडेवाकडे, प्रश्नचिन्ह या आकारामध्ये पडलेले आहे- या दृश्याने सिनेमाचा शेवट होतो. डेंग यांनी सिनेमा बघितल्यावर आणि त्यातील पक्षावरील व चीनमधील राजकीय व्यवस्थेवरील टीका बघितल्यानंतर ते इतके बिथरले की, त्यांनी सिनेमावर बंदीच आणली. नाटकाचा लेखक बाई हुआ हा कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य होता, हे विशेष. हु याओबांग यांच्या मध्यस्थीमुळे बाई हुआ वाचले. झाऊ यांग हा 1950 च्या दशकात चीनमधील व कम्युनिस्ट पक्षातील संस्कृती, कला, साहित्य या बाबी हाताळत असे. तो सांस्कृतिक क्रांतीदरम्यान चांगलाच होरपळला होता. त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी या सिनेमाला प्रोत्साहन दिले होते.

पक्षप्रमुख हु याओबांगसारख्या नव्या पिढीच्या नेत्यांना साहित्य, उदारमतवादी विचार व बुद्धिमंत यांच्याबद्दल आस्था होती. कुणालाच सांस्कृतिक क्रांतीदरम्यानचा गोंधळ व मुस्काटदाबी नको होती; परंतु कोणालाही 1949 पूर्वीचा, कम्युनिस्ट क्रांतिपूर्व गोंधळही नको होता. चायनीज रायटर्स असोसिएशनच्या सभेत 1985 मध्ये अध्यक्षपदी बा जिन (Ba Jin) या बंडखोर कादंबरीकार लेखकाची निवड झाली. उपाध्यक्षपद लिऊ बिनयुन (Liu Binyun)यांना दिले गेले. या लेखकांच्या संमेलनाला हु याओबांग यांना बोलाविले होते. त्यांनी भाषणात लेखकांच्या स्वातंत्र्याची पाठराखण केली. डेंग व व इतर चिनी नेत्यांनी या वक्तव्याची गंभीर दखल घेतली. नंतर हु याओबांग यांनी आपली भाषा बदलून लेखकांनी अधिक जबाबदारीने वागावे, असे म्हटले. त्यानंतर लगेचच लिऊ बिनयुन यांनी Second Kind of Loyalty हा दीर्घ लेख प्रकाशित करून पक्षाच्या सदस्यांनी सदसद्‌विवेकबुद्धी वापरून पक्षाने दिलेले निर्देश पाळावेत, असे म्हटले. हे पाहून डेंग खवळले आणि त्यांनी लिऊ बिनयुन यांना पार्टीबाहेर काढले. डेंग यांना स्वातंत्र्य व लोकशाही या मुद्द्यावर योग्य अशी भूमिका शेवटपर्यंत घेता आली नाही, हेच खरे. अशा बाबतीत डेंग माओंहून अधिक सॉफ्ट होते. मात्र 1978 ते 1989 पर्यंतचा काळ हा चीनमध्ये अनेक विविध कथनांचा व अभिव्यक्तीचा होता. माओंच्या काळात अशा रीतीने विचार व्यक्त करणे शक्यच नव्हते. मात्र डेंग स्वातंत्र्याच्या विचाराने अस्वस्थ होते.

डेंग यांनी भविष्यकाळाकडे नजर ठेवून काही वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचा महत्त्वाचा निर्णय 1985 मध्ये घेतला. येणाऱ्या 1987 मधील पार्टी काँग्रेसमध्ये हा निर्णय झाला असता, मात्र खास बैठक बोलावून हे बदल करण्यात आले. हु याओबांग हे पार्टीच्या दृष्टीने फारच उदारमतवादी होते. शिवाय ते बुद्धिमंतांत फारच लोकप्रिय होऊ पाहत होते. डेंग यांना हे धोकादायक वाटत होते. म्हणून त्यांना वरिष्ठ पदावर जाण्यापासून रोखण्यात आले. आधुनिक शिक्षण, तरुण वय याचा विचार करून काही नव्या नेमणुका करण्यात आल्या. झाओ झियांग यांचे कौतुक झाले. जियांग झेमिन व हु जिंताव या दोन तरुण व होतकरू नेत्यांना पॉलिट ब्युरोमध्ये घेण्यात आले. डेंगनंतरच्या काळात हे दोघे सर्वोच्चपदी गेले आणि  त्यांनी चीनला जागतिक महासत्तेचा दर्जा मिळवून दिला. 

जगात विशेषत: पूर्व युरोपमधील देशांतील कम्युनिस्ट राजवटीमध्ये अनेक प्रकारच्या राजकीय चळवळी 1980 पासून सुरू होत्या, त्याचा परिणाम म्हणून थोड्याफार राजकीय सुधारणांचा विचारही होत होता. यांचे पडसाद चीनमध्येही उमटत होते. म्हणून 1980 पासून चीनमध्येही पक्षांतर्गत राजकीय सुधारणांबाबत थोडी चर्चा होत असे. फिलिपाइन्सचे अध्यक्ष मार्कोस यांना अशाच राजकीय चळवळीमुळे 1985-86 मध्ये पदच्युत व्हावे लागले. त्या पार्श्वभूमीवर, तैवानचे प्रमुख चियांग चिंग कुओ यांनीही ते राजकीय सुधारणा करण्याचा विचार करीत आहेत, असे जाहीर केले. यामुळेच डेंग यांच्यावरही दडपण होते. तैवानचे राष्ट्रप्रमुख राजकीय सुधारणांबाबत बोलत आहेत, तर चीनमध्येही अशा सुधारणा व्हाव्यात, अशा लोकांच्या अपेक्षा होत्या. त्यामुळे सुधारणांमध्ये आम्हीही मागे नाही, हे दाखविणे आवश्यक होते. 

सन 1987 मध्ये भरणाऱ्या 13 व्या पार्टी काँग्रेसमध्ये राजकीय सुधारणांचा विचार करावयाचे ठरत होते. झाओ झियांग यांच्याकडे राजकीय सुधारणासंबंधीचा अभ्यास गट देण्यात यावा, असे डेंग यांनी ठरविले. प्रशासनातील सर्वच मोक्याच्या जागा पक्षसदस्यांकडे होत्या. प्रत्येक मंत्रालयाचा प्रमुख मंत्री पक्षाचा सदस्य होताच, तरीही पक्षाची स्वतंत्र देखरेख प्रत्येक विभागावर असे. त्यामुळे प्रशासन चालविण्यातही अडचणी येत होत्या. जास्त कार्यक्षमता आणण्याच्या दृष्टीने आणि शासनातील प्रमुखांना थोडी मोकळीक देण्यासाठी प्रशासन व पक्ष यांच्यात थोडे औपचारिक अंतर ठेवणे आवश्यक होते. चीनचे आधुनिकीकरण व दीर्घकालीन राजकीय स्थैर्य ही उद्दिष्टे डोळ्यांपुढे ठेवून हा अभ्यास सुरू झाला. डेंग यांना कार्यक्षम प्रशासन व ध्येयाने प्रेरित झालेला अधिकारी वर्ग हवा होता. झाओ झियांग यांना पक्षाचे राजकारण व प्रशासन यात थोडे औपचारिक अंतर ठेवणे आवश्यक वाटत होते. यासाठी पूर्व युरोपीय व पाश्चात्त्य राज्यव्यवस्था, याबरोबरच 1949 पूर्वीची राज्यव्यवस्था तसेच याबाबतच्या चिनी परंपरांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ समितीत होते. पक्ष व सरकार यात औपचारिक अंतर असावे आणि  ट्रेड युनियन कामगार संघटना-याही पक्षाला संलग्न असल्या तरी त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असावे, पक्षांचा सरकारवरील प्रभाव अप्रत्यक्ष स्वरूपाचा असावा- इत्यादी विचार या समितीने अहवालात मांडले. मात्र इतके स्वतंत्र व क्रांतिकारी बदल डेंग यांना व त्यांच्या इतर सहकाऱ्यांना मानवणारे नव्हते. अशा परिस्थितीत हा अहवाल 1987 मधील तेराव्या पार्टी काँग्रेसपुढे मांडण्यात आला. याच वेळी चीनमध्ये विद्यार्थ्यांची निदर्शने सर्वत्र सुरू झाली आणि हा अहवाल बासनात गुंडाळून ठेवण्यात आला. आर्थिक विकास, चलनवाढीमुळे झालेली भाववाढ, आर्थिक विकासाचे काही मर्यादितच लाभार्थी, वाढता भ्रष्टाचार यामुळे तरुणांमध्ये- विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये मोठी चीड निर्माण झाली. शिवाय या वेळी डेंग यांनी घाईघाईने किमतीवरील नियंत्रणे उठविल्यावर बाजारातून वस्तू गायब झाल्या. यामुळे संत्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी चीनमध्ये सर्वत्र मोठ्या शहरांत निदर्शनांची तयारी केली.  

1986 हे सन चीनमधील महत्त्वाचे वर्ष. पूर्व युरोपमधील चळवळीबरोबरच फिलिपाइन्समध्ये अध्यक्ष मार्कोस व त्यांची पत्नी इमेल्डा यांच्याविरुद्धच्या चळवळीचा आशियातील विशेषत: चीनमधील विद्यार्थ्यांवर चांगलाच परिणाम झाला, विद्यार्थ्यांनी चीनमध्येही निदर्शने  सुरू केली. यापूर्वी अशी निदर्शने 1976 मध्ये झाऊ एन लाय यांच्या मृत्यूनंतर झाली होती. आता तर चीनमधील टीव्हीचा वापर खूप वाढल्याने चीनबाहेरील बातम्याही चीनमध्ये घरोघरी पोहोचत होत्या. चीनमधील विसाव्या शतकातील विद्यार्थ्यांचे सर्व उठाव हे बीजिंगमध्ये सुरू झाले होते. हा 1986 मधील उठाव मात्र अनहुई प्रांताच्या राजधानीतून हफेईमधून (Hefei) सुरू झाला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ फँग लिझी यांच्या भाषणापासून हा उठाव सुरू झाला. सध्याचे चीनमधील सरकार मध्ययुगीन सरंजामशाहीचे आहे; युरोपमधील मध्ययुगीन वैज्ञानिकांनी युरोपची सारंजामशाहीपासून सुटका केली... अशी सुरुवात करून सामान्य अशिक्षित माणूस हा शिकलेल्या माणसापेक्षा अधिक शहाणा असतो, या माओंच्या मताची खिल्ली उडवीत फँग लिझी यांनी सरकारवर तोफ डागली. फँग लिझी यांनी चिनी नेतृत्वावर, अगदी वँग लीसारख्या उदारमतवादी व मवाळ नेत्यांवरही चौफेर टीका सुरू ठेवली. प्रिन्स्टन विद्यापीठातून नुकत्याच परतलेल्या आणि अतिशय प्रभावशाली बुद्धिमंत म्हणून ख्याती असलेल्या फँग लिझींना आवरणे वा डांबून ठेवणे सरकारला शक्य झाले नाही. 

विद्यार्थ्यांमधील असंतोष व त्यांची निदर्शने यांना दुसरीही अनेक कारणे होती. सरकारी अधिकारी व पक्षाचे पदाधिकारी हे भ्रष्टाचारी होत होते. तुलनेने शिक्षणक्षेत्रातील शिक्षक व विद्यार्थी यांची अवस्था चांगली नव्हती. त्यांचे राहणीमानही सामान्य होते. अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत चीनमध्ये स्वातंत्र्य जवळजवळ नव्हतेच, त्यामुळे चीनमधील विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या. जवळजवळ 150 लहान-मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थी-आंदोलने सुरू झाली. या निदर्शनांमुळे डेंग यांचा आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम धोक्यात आला. स्वातंत्र्य व लोकशाही संस्था यासंदर्भात निदर्शकांच्या मागण्या होत्या. कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणांना व वर्चस्वालाच या निदर्शनांनी आव्हान दिले होते. शांघायमध्ये जियांग झेमिन यांनी अतिशय कुशलतेने विद्यार्थ्यांची निदर्शने बंद केली, मात्र इतरत्र ती उत्तरोत्तर तीव्र झाली. हु याओबांग यांना पक्षातर्फे विद्यार्थ्यांना व बुद्धिमंतांना ताब्यात ठेवणे जमले नाही, त्यामुळे त्यांना पदच्युत करण्यासाठी डेंग यांनी पावले उचलली. हे सोपे नव्हते; कारण हु याओबांग थोडे मवाळ असल्याने लोकप्रिय होते, शिवाय सुधारणावादीही होते. त्यांचे सर्वसामान्यांमध्ये तसेच बुद्धिमंतांवरही चांगले वजन होते. डेंग यांनी इच्छा व्यक्त करताच हु याओबांग यांनी राजीनामा दिला. त्यांना पॉलिट ब्युरोमधूनही काढण्यात आले. काढून टाकताना जी कारणे दिली- त्यात त्यांनी बुद्धिमंतांच्या स्पिरिच्युअल पोल्युशनला पुरेसा विरोध केला नाही आणि पक्षाच्या महत्त्वाच्या चार मुद्द्यांना बगल दिली, ही महत्त्वाची होती. याशिवाय आर्थिक विकासदर अनिर्बंधरीत्या वाढू दिला, त्यामुळे अर्थव्यवस्था आटोक्याबाहेर गेली व असमानता वाढली, हीही कारणे देण्यात आली. 

अशा रीतीने 1987 मध्ये आर्थिक सुधारणा, भांडवलशाही आणि त्यातून येणारी स्वातंत्र्याची संकल्पना व राजकीय लोकशाहीची मागणी या गोष्टींनी डेंग पुरते घेरले गेले होते. फँग लिझी, लिऊ बिनयुन व इतर बंडखोर आणि उदारमतवादी बुद्धिमंतांना पक्षातून काढून टाकण्यात आले. विद्यार्थ्यांच्या निदर्शनांचा बीमोड करण्यात आला. तसेच हु याओबांग यांची निर्भर्त्सना केली गेली. पक्षांतर्गत टीका व निर्भर्त्सना इतक्या टोकाला गेली की, एके वेळी हु याओबांग यांना रडू आवरेना. 

सन 1987 मधील 13 व्या पार्टी काँग्रेसमध्ये झाओ झियांग यांना पक्षप्रमुखाचे महत्त्वाचे नेतेपद देण्यात आले आणि धडाकेबाज आर्थिक प्रगती करण्याबाबतचे वातावरण निर्माण करण्यात आले. डेंग यांनी आपली सर्व पदे सोडली व ते फक्त सीएमसीचे चेअरमन म्हणून राहिले. झाओ सुधारणावादी असल्याने त्यांनी पक्ष व सरकार हे परस्परांपासून भिन्न ठेवण्याचे ठरविले. कनिष्ठ अधिकाऱ्यांना अधिक अधिकार दिले. किमतींवरील बंधने काढून टाकण्याचा प्रयत्न डेंग यांच्या अंगाशी आला होता, तो निर्णय मागे घ्यावा लागला. आर्थिक सुधारणांमुळे चलनवाढ व भाववाढ झाली होती. भ्रष्टाचार वाढला होता. एकंदरीतच, डेंग यांच्या आर्थिक सुधारणांनी अनेक प्रश्न निर्माण करून ठेवले होते. हे सर्व प्रश्न पुढे 1989 मधील तिआनमेन दुर्घटनेच्या केंद्रभागी आले. 

Tags: साधना सदर चिनी महासत्तेचा उदय चायना सतीश बागल sadhana series sadar chini mahasattecha uday china satish bagal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात