Diwali_4 दक्षिणायन : आर्थिक सुधारणांचे दुसरे पर्व
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

दक्षिणायन : आर्थिक सुधारणांचे दुसरे पर्व

डेंग यांनी 1978 मध्ये सुरू केलेल्या एका उत्तम प्रयोगाने चीनला 2000 हे वर्ष संपत असताना एक जागतिक महासत्ता म्हणून ओळख दिली. रीतसर निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांनी 1992 मध्ये दक्षिणेचा दौरा करून चीनमधील उद्यमशीलता फुलविली आणि आर्थिक महासत्ता होण्याचा चीनचा मार्ग मोकळा केला. हे फार मोठे काम त्यांनी केले. मात्र राजकीय सुधारणा, लोकशाही आणि स्वातंत्र्य या संकल्पनांवर आधारित समाज निर्माण करण्याचे त्यांनी टाळले. आर्थिक सुधारणा व राजकीय सुधारणा यात काही संबंध असतो, हे त्यांनी नाकारले. असेही म्हणता येईल की, आर्थिक सुधारणा व राजकीय सुधारणा यांची सांगड घालण्याची जबाबदारी त्यांनी पुढे ढकलली व नेतृत्वाच्या नव्या पिढीकडे दिली. 1994 मध्ये नववर्षदिनी डेंग यांचे अखेरचे सार्वजनिक दर्शन झाले.

चीनची धोरणे भांडवलशाहीधार्जिणी बूर्झ्वा होत आहेत, असा आरोप करून 71 वर्षांच्या माओंनी खास रेल्वेमधून दक्षिणेकडे शांघाय, हँगझौ, शाओशान, वुहान या शहरांचा दौरा करीत सांस्कृतिक क्रांतीची सुरुवात 1965 मध्ये केली. डेंग यांनी 1992 मध्ये अगदी त्याउलट पवित्र घेत सध्याची चीनची धोरणे खुल्या अर्थव्यवस्थेला फारशी पूरक नाहीत, त्यामुळे चीनची आर्थिक प्रगती कुंठित होत आहे असे प्रतिपादन करीत माओंप्रमाणेच खास रेल्वेने दक्षिण चीनचा मोठा दौरा केला आणि आर्थिक सुधारणांच्या दुसऱ्या पर्वास सुरुवात केली. या सुधारणापर्वाचा मोठा अनुकूल परिणाम चीनच्या आर्थिक प्रगतीवर झाला. त्यानंतर पंधरा वर्षे प्रचंड वेगाने वाढणारी चीनची अर्थव्यवस्था हा सर्व जगभर कौतुकाचा विषय झाला आणि एक जागतिक महासत्ता म्हणून चीन उदयास आला. याचे खरे मर्म डेंग यांच्या या दक्षिणायनात होते. सन 1978 ते 1989 या दहा वर्षांत केलेल्या आर्थिक प्रगतीच्या विरोधात पक्षाने घेतलेल्या धोरणांमुळे चीन आर्थिक दृष्ट्या मागे लोटला जाईल, ही डेंग यांची भीती होती. म्हणूनच हा दौरा करून डेंग यांनी चीनच्या आर्थिक प्रगतीच्या दुसऱ्या खडतर आर्थिक सुधारणापर्वाची मुहूर्तमेढ रोवली. विशेष म्हणजे, डेंग यांनी सारीच सरकारी औपचारिक पदे जियांग झेमिन यांच्याकडे सुपूर्द केली होती व ते निवृत्त झाले होते. त्यामुळेच डेंग यांचे हे यश पूर्णतः स्वतःचे होते, असेच म्हणावे लागेल.

  डेंग यांनी वुहान, शेंझेन, झुहाई (Zuhai) व शांघाय या ठिकाणी दौरे करून खुल्या बाजारप्रणीत धोरणांचे व वेगवान आर्थिक प्रगतीचे महत्त्व तेथील लोकांना पटवून द्यायला सुरुवात केली. आर्थिक प्रगतीच्या धोरणांची सुरुवात 1978 मध्ये डेंगसोबत काम करणाऱ्या पक्षाच्या बीजिंगमधील सहकाऱ्यांनी केली असली, तरी त्यानंतरच्या दहा वर्षांत दक्षिण किनाऱ्यावरील राज्यांतील कम्युनिस्ट पक्षांच्या प्रमुखांनी व पदाधिकाऱ्यानी अथक कष्ट घेऊन मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास साधला होता. बीजिंगमधील सरकार व नोकरशाही 1989 च्या तिआनमेन प्रकरणानंतर चेन युन यांच्या प्रभावाखाली होती. तरीही दक्षिण किनारपट्टीतील प्रांतांच्या नेत्यांना व अधिकाऱ्यांना डेंग यांनी आवाहन करून विकासाच्या रस्त्यावर पाऊल ठेवण्यास उद्युक्त केले. शांघायमधील पुडाँग (Pudong) भागाचा विकास करण्यासाठी मोठे प्रकल्प घेण्याबाबत डेंग यांनी स्थानिक नेत्यांशी बोलायला सुरुवात केली. पुडाँगमध्ये 188 चौरस मैलांची जागा यासाठी निश्चित केली गेली. या प्रकल्पानंतर चीनची आर्थिक राजधानी पुडाँगच होईल, इतका महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प होता. यामुळे जवळच असलेल्या जिआंगसु व झेझिआंग यातील उद्योग आणि यांगत्सी नदीच्या मुखाशी असणाऱ्या औद्योगिक वसाहतीही भरभराटीस येणार होत्या. शांघाय येथील स्थानिक लोकांमध्ये व स्थानिक पक्षाच्या नेत्यांमध्ये हा बदल घडवून आणण्याची क्षमता आहे, याची डेंग यांना कल्पना होती. दहा वर्षांपूर्वी दक्षिणेकडील ग्वांडुंग व फुजिआन येथे मोठा औद्योगिक विकास झाला. शांघायमधील सुशिक्षित व प्रागतिक समाज याहीपेक्षा अधिक प्रगती करू शकेल, अशी शांघायमधील लोकांची भावना होती. मात्र 1984 ते 1990 मध्ये शांघायला बीजिंगकडून फारशी मदत न मिळाल्याने त्याचा हवा तसा विकास झालेला नव्हता. आता तर प्रगतीसाठी शांघाय तयारही झाला होता. शांघाय हे उत्तम बंदर असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराचे ते पूर्वेकडील अव्वल केंद्रही होते. त्यामुळे तेथील विकासाला एक वेगळे आंतरराष्ट्रीय परिमाण लाभणार होते.

मार्च 1990 पासून पुढे डेंग यांनी शांघायच्या विकासाचा मुद्दा सातत्याने लावून धरला. ‘तुम्ही शांघायला विकसित करा. तत्काळ विकसित करण्यासारखे भाग निवडून तिथे गुंतवणुकीस चालना द्या. शांघाय हा चीनच्या विकासाच्या हुकमी एक्का आहे’, असे डेंग म्हणत असत. सुरुवातीला डेंग यांचे ऐकले गेले नाही. तिआनमेन प्रकरणानंतर सरकारमध्ये- विशेषतः आर्थिक प्रशासनात चेन युन यांचा प्रभाव वाढलेला होता. चेन युन मूळचे शांघायचे. त्यांनी शांघाय एसईझेड प्रकल्प हाणून पाडला होता, कारण शांघायचे लोक परदेशी पाश्चिमात्यांना सहज शरण जातील व पुन्हा 1949 पूर्वीसारखी परिस्थिती येईल, अशी चेन युन व त्यांच्यापेक्षा अधिक कडव्या सहकाऱ्यांना विनाकारण भीती वाटत असे. डिसेंबर 1990 मध्ये सातव्या प्लॅनमध्ये पुढील पंचवार्षिक योजना व त्यात दहा वर्षांचा व्हिजन प्लॅन करताना या दहा वर्षांत राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) दुप्पट करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मात्र त्यासाठी पूरक आर्थिक धोरणे व आर्थिक सुधारणा याबाबत फारशी प्रगती होत नव्हती. अधिक आर्थिक सुधारणा केल्या, तर तिआनमेनसारख्या प्रकरणाला परत तोंड द्यावे लागेल, अशी भीती इतर नेत्यांना वाटत होती. मात्र आर्थिक विकासाची खरी किल्ली दक्षिणेत- विशेषतः शांघायमध्येच आहे हे डेंग जाणून होते. केवळ बीजिंगमध्ये बसून नियोजन करून सरकारी निधीने विकास होणार नाही, हे त्यांना माहीत होते. शांघाय व दक्षिण चीनमधील इतर भागांतील उद्योजकांच्या उद्यमशीलतेला आवाहन करूनच चीनमधील सुबत्तेचे महाद्वार उघडणार होते. जानेवारी 1991 मध्ये डेंग शांघायमध्ये ठिय्या देऊनच बसले. शांघायच्या झु रोंगजी यांच्याबरोबर त्यांनी तेथील एअरोनॉटिकल व ऑटोमोबाईल उद्योगाची पाहणी केली. प्रचंड लांबीच्या नान्पू पुलाचे बांधकाम पाहिले. पुडाँग हे आंतरराष्ट्रीय आर्थिक गुंतवणुकीचे केंद्र होईल, याची त्यांनी खात्री केली. ‘विकासाची गरज’ यावर त्यांनी शांघायमधील वृत्तपत्रांतून अनेक लेख प्रसिद्ध केले, अनेक भाषणे दिली. नियोजन (planning) आणि बाजारपेठा (Markets) परस्परविरोधी नसतात तर परस्परांना पूरक असतात, हे ते भाषणातून आवर्जून सांगत. उच्च आर्थिक विकासदाराची आवश्यकता, लोकांचे राहणीमान उंचावणे, उत्पादकता वाढविणे, नवे तंत्रज्ञान व विज्ञान यांच्या साह्याने आधुनिकीकरण करणे, इत्यादी बाबींवर ते पोटतिडकीने बोलत. प्रत्येक संस्थेने नफा कमावला पाहिजे, कारण नफा हा उत्पादकतेचे परिमाण आहे, असे ते म्हणत. याशिवाय बाजारपेठांचे महत्त्व, गुंतवणुका इत्यादी अनेक विषयांवर ते बोलत. माओंच्या वारसाने असे काही बोलावे, याबाबत आश्चर्य व्यक्त होत असे. मात्र डेंग पुन:पुन्हा त्या विषयावर येत. कडव्या डाव्या तत्त्वज्ञानाने सर्वसामान्य माणसाला चांगल्या राहणीमानापासून लांब ठेवले, असे ते म्हणत.

जानेवारी 1992 मध्ये डेंग परत शांघायला आले. वुहान, चांगशा व हुनान येथेही त्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर ग्वांगडाँग प्रांतातील ग्वांगझाऊ, शेंझेन व झुहाई येथील एसईझेडची पाहणी केली आणि भाषणात इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्‌स (Intellectual property Rights) - आयपीआर यांचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्व विषद केले. झुहाई येथील प्रगती स्थानिक लोकांनी सर्जनशीलतेने केली आहे. किनारी भागात झालेली प्रगती व औद्योगिकीकरण यातून प्रेरणा घेऊन इतर प्रांतातही औद्योगिकीरण होत आहे, याचाही ते वारंवार उल्लेख करीत. या दौऱ्यादरम्यान डेंग जिथे गेले, तेथील लोक त्यांना प्रेमाने अंकल डेंग किंवा Grandpa Deng अशी हाक मारीत व त्यांचे स्वागत उत्साहाने करीत. झुआई (Zhuai) येथे डेंग यांना 1992 मध्ये अनपेक्षितपणे यश आले. डेंग तिथे असताना हाँगकाँगहून बरेच पत्रकार, फोटोग्राफर, वृत्तपत्र प्रतिनिधी डेंग यांच्या दौऱ्यावेळी आले. हाँगकाँगच्या प्रतिष्ठित मिंग बाव (Ming Bao) या वर्तमानपत्राने मोठा मथळा देऊन ‘चीन मोठ्या आर्थिक सुधारणा करून आर्थिक विकास करणार’ अशी बातमी दिली. इतरही वर्तमानपत्रांनी व टीव्ही चॅनेल्सनी- अगदी कडव्या व डाव्या वर्तमानपत्रांनीही- ही बातमी उचलून धरली. आता मात्र डेंग यांच्या दौऱ्याकडे पक्षाला दुर्लक्ष करणे अशक्य झाले. जियांग झेमिन यांच्या भोवतीच्या साऱ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना डेंगच्या धोरणात व सल्ल्यात मोठा अर्थ दिसू लागला. Zhuhai येथे सैन्यदलाच्या बैठकीत डेंग यांनी आर्थिक सुधारणांचा विषय काढून त्या केंद्रभागी आणल्या. या बैठकीस चीनचे उपाध्यक्ष उपस्थित असले, तरीही डेंग यांच्या उपस्थितीने जियांग झेमिन यांच्यावरील दबाव यशस्वी झाला.

या संबंध काळात डेंग सातत्याने दक्षिणेतील शांघाय, शेंझेन व झुहाई येथील एसईझेड, प्रचंड लांबीचे नान्पू आणि यांग्पू पूल येथेच घुटमळत राहिले. आत्तापर्यंत झालेल्या प्रगतीचा व विकासकार्याचा सातत्याने उद्‌घोष करीत पुढील सुधारणांच्या रोडमॅपबद्दल बोलत राहिले. डेंग शांघायहून बीजिंगला जाण्याच्या आत त्यांच्या दौऱ्याचा तपशीलवार अहवाल शांघाय व इतर ठिकाणी करावयाच्या कामाच्या तपशिलासह तयार करण्यात आला. एकंदरीतच डेंग यांनी अतिशय कुशलतेने चेन युन यांच्यावर मात करीत आर्थिक सुधारणा आणि धाडसी आर्थिक निर्णय घेण्यास प्रशासनास भाग पाडले. शांघायच्या सर्वांत मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरला डेंग यांनी भेट दिल्यावर तेथील उपभोग्य वस्तूंचा उठाव व विक्री पाहून त्यांना बरे वाटे. त्यांनी सुधारणांना 14-15 वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. त्या वेळच्या हलाखीच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती आठवल्यानंतर आपल्या सुधारणांना मोठे यश येते आहे, हे त्यांनी पहिले. जियांग झेमिन यांना कळून चुकले होते की, आर्थिक सुधारणांबाबत काही केले नाही तर निवृत्तीनंतरही आपले अस्तित्व दमदारपणे टिकवून असलेले डेंग आपल्याला डच्चू देऊ शकतील. अशा रीतीने चीनमध्ये आर्थिक सुधारणांचे दुसरे पर्व सुरू झाले. पाश्चिमात्य देशांनी चीनविरोधात लादलेली बंदीही या वेळी उठविण्यात आली. त्यापूर्वीच्या कडक चलनपुरवठा धोरणांमुळे चलन फुगवटा कमी झाला होता, निर्यात वाढली, औद्योगिक उत्पन्नात घसघशीत वाढ झाली आणि अधिक खुल्या धोरणासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. डेंग यांनी दक्षिणेत दिलेली भाषणे गाजली. ती Nanxun Tanhua म्हणजे दक्षिणेकडील भाषणे म्हणून प्रसिद्ध आहेत. यापैकी Nanxun हा शब्द नुसता दक्षिण दिशादर्शक नसून, जुन्या साम्राज्यवादी काळात सम्राटाने दक्षिणेकडे दिलेली भेट असाही अर्थ होतो. डेंग यांच्या दक्षिण दौऱ्यावर तयार करण्यात आलेला अहवाल व त्यावर तयार केलेला आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम पॉलिट ब्युरोने स्वीकृत केला व अंमलबजावणी सुरू झाली. यांगत्सी नदीच्या मुखाजवळील पाच मोठ्या शहरांचा व त्याभोवतीच्या प्रदेशात आर्थिक विकासाची केंद्रे स्थापन करण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प होता. या प्रयोगाला ‘सोशलिस्ट मार्केट इकॉनॉमीचा प्रमुख प्रकल्प’ असे नाव दिले गेले. येणाऱ्या चौदाव्या काँग्रेस  पार्टीची थीमच सोशलिस्ट मार्केट इकॉनॉमी होती. सुधारणांच्या मुद्यावर अतिसावध असलेले चेन युन यांच्यातही आवश्यक तो फरक दिसून आला. तेथील एसईझेडचे आता त्यांनीही कौतुक केले. ग्रामीण भागात- विशेषत: शेतीधोरणांत काही बदल करणे आवश्यक होते. शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान व त्याची किंमत शेतकऱ्यांना परवडत नसल्याने त्याबाबत काही संस्थात्मक बदल करणे आवश्यक होते. एकूणच, आर्थिक सुधारणा व आर्थिक प्रगती यावरील धोरण निर्मितीला अनुकूल वातावरण निर्माण झाले.

दि. 12 ते 18 ऑक्टोबर 1992 या कालावधीत चौदावी पार्टी काँग्रेस झाली. त्यात डेंग यांचे कौतुक करून सोशलिस्ट-मार्केट इकॉनॉमी हे व्हिजन ठेवण्यात आले. तसेच डेंग यांच्या विचारांना ‘डेंग झिओपेंग थिअरी’ असे संबोधण्यात येऊन त्यांच्या विचारांचा गौरव करण्यात आला. माओंचे विचार यानंतर महत्त्वाचा विचार म्हणजे सोशलिस्ट-मार्केट इकॉनॉमी हा सिद्धांत. त्यानुसार चिनी वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेला सध्याचा समाजवाद अंतिम जागतिक समाजवादाची पहिली अवस्था वा पायरी असेल, असे मानले गेले. या सिद्धांतात pragmatic धोरणांचा वापर करून बाजारप्रणीत अर्थव्यवस्था वाढविण्याचा विचार आहे. सर्वत्र शासकीय/राज्याची मालकी हा मूलमंत्र असला तरी या संस्था वा कंपन्या प्रत्यक्षात अधिकाधिक स्वतंत्र, स्वायत्त व उत्पादक झाल्या पाहिजेत; शेअर होल्डिंग किंवा भागभांडवलाची संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली पाहिजे; तसेच वस्तूचेच मार्केट नव्हे तर भांडवलाचे, तंत्रज्ञानाचे, माहितीचे, घरांचे किंवा श्रमाचेही मार्केट असणे आवश्यक आहे- हा विचार स्वीकृत करण्यात आला. विज्ञान-तंत्रज्ञान ही केवळ उत्पादकता वाढविणारी साधने नाहीत तर मूळ उत्पादक प्रेरणा आहेत, हे मान्य केले पाहिजे. माओंचे वर्गकलह (class struggle) ) व क्रांती-सातत्य (Continuing Revolution) या दोन मूळ संकल्पना मागे पडल्या. डेंग यांच्या दक्षिण दौऱ्यामुळे समाजवादी विचारांमध्ये मार्केट इकॉनॉमी ही संकल्पना दृढ होऊ लागली. चीनमध्ये 1978 पासून अर्थव्यवस्था खुली करण्याचे काम डेंग यांनी सुरू केले होते. या अधिवेशनात पक्षाने भांडवलशाहीमधील महत्त्वाच्या अनेक संकल्पनांना आपलेसे केले. त्यामुळे चीनमध्ये यापुढे आर्थिक सुधारणा व बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने मान्यता मिळाली.

यापूर्वीच्या काँग्रेसमध्ये झाओ झियांग यांनी पक्ष व सरकार आणि पक्ष व स्वायत्त उत्पादक संस्था आणि शासन यंत्रणा यांच्यामध्ये औपचारिक अंतर असावे, असे तत्त्व मांडले होते. ते आता मागे पडून त्यातील औपचारिक अंतर कमी असावे असा विचार दृढ होऊ लागला. सरकार व सरकारी संस्था-संघटना पक्षाच्या निकट आणून ठेवल्या गेल्या. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाच्या मक्तेदारीचे तत्त्व पुन्हा एकदा मान्य करण्यात आले. अर्थव्यवस्था अधिक खुली व बाजारप्रणीत करीत असताना आणि भांडवलशाहीतील अनेक तंत्रे व पद्धती वापरीत असताना राज्यव्यवस्थेवर व अर्थव्यवस्थेवर कम्युनिस्ट पक्षाचा अंकुश असणे आवश्यक आहे; तसा तो नसेल तर 1989 मधील तिआनमेनसारखे प्रसंग परत घडतील, यावर सर्वांचे एकमत झाले. याच काँग्रेसमध्ये शेवटच्या दिवशी डेंग यांच्याकडून सारी सूत्रे जियांग झेमिन यांच्याकडे गेल्याचे सूचित करण्यात आले. नेतृत्वाच्या तिसऱ्या पिढीची सत्ता अशा रीतीने सुरू झाली. आर्थिक सुधारणा करीत असताना पक्षाची एकाधिकारशाही व वर्चस्व याचा पुनरुच्चार करण्यात आला. ज्या-ज्या आर्थिक सुधारणा 1990 च्या दशकात झाल्या त्यामुळे चीन अधिकाधिक खासगीकरण व भांडवलशाहीकडे झुकेल; त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात पाश्चात्त्य देशांप्रमाणे चीनमध्येही राजकीय लोकशाही व स्वातंत्र्य या संकल्पना रुजतील, असा सर्वांचा समज झाला. चीनमध्ये पूर्वी अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून राहिलेले आणि तिआनमेनच्या व नंतरच्या काळात अमेरिकेचे अध्यक्ष असलेले जॉर्ज बुश (सिनिअर) यांनाही असेच वाटत होते. अमेरिकेचा आणि पाश्चात्त्य देशांचा चीनकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसेच चीनबरोबरची धोरण-आखणी या गृहीतकावर आधारित होती, परंतु पुढे प्रत्यक्षात तसे झाले नाही.

शांघाय व शेंझेन येथे स्टॉक एक्सचेंजेस 1992 मध्ये सुरू झाली. तिथे परदेशी कंपन्यांचे शेअर्स मिळू लागले व चिनी सरकारी कंपन्यांचेही लिस्टिंग होऊ लागले. याच वेळी तरुण पिढीतील उच्च विद्याविभूषित इंजिनिअरिंग व तंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञ तरुण राजकारणात येऊ लागले. चीनचे 85 वर्षांचे राष्ट्राध्यक्ष यांग शांगकुन त्या वर्षी निवृत्त झाले. त्यानंतर पुढील वर्षी त्यांचे 72 वर्षांचे भाऊही निवृत्त झाले. झु रोंगजींसारखे अतिशय निष्णात व कर्तबगार नेते हे जियांग झेमिन यांच्या पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीत आले. चौदाव्या पार्टी काँग्रेसमध्ये पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीचे सर्वांत तरुण सदस्य म्हणून हु जिंताव यांची नेमणूक झाली आणि ते जियांग झेमिननंतरचे त्यांचे वारस नेते म्हणून घोषित झाले. स्थायी समितीत 1992 मध्ये झु रोंगजी, हु जिंताव, ली रुइहान, जियांग झेमिन व चिओ शी (Qio Shi) यांचा मोठा सुधारणावादी गट निर्माण झाला. त्यामुळे परंपरावादी सदस्यांचे नेतृत्व करणारे ली पेंग एकाकी पडले. झु रोंगजी नव्यानेच निर्माण Economic and Trade Office चे प्रमुख बनले. ली पेंग यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर झु रोंगजी हे उपपंतप्रधान झाले आणि पुढे 1997 मध्ये पंधराव्या पार्टी काँग्रेसमध्ये ते पंतप्रधान झाले. जियांग झेमिन यांच्या नेतृत्वाच्या संपूर्ण कालावधीत झु रोंगजी यांनी बँकिंग, वित्तीय व्यवस्थापन, गृहनिर्माण, बाजारपेठ नियमन या अनेक क्षेत्रांत सुधारणा केल्या आणि त्यामुळे गुंतवणुका वाढून चीनची आर्थिक प्रगती वेगाने झाली. त्यांचा सुधारणांचा झपाटा व आलेले यश पाहता, ते जगभर ‘चीनचे इकॉनॉमिक झार’ या नावाने ओळखले जात. चौदाव्या काँग्रेसमध्ये डेंग यांनी त्यापूर्वी निर्णय घेतल्याप्रमाणे सेन्ट्रल ॲडव्हायजरी कमिशन बरखास्त करण्यात आले. हे कमिशन विविध प्रकारच्या नेत्यांची व उच्च अधिकाऱ्यांची महत्त्वाच्या पदांवर नेमणूक करीत असे. हे कमिशन स्थापन करून डेंग यांनी तहहयात नेमणुकांची पद्धत बंद केली होती. अशा रीतीने जियांग झेमिन यांच्याकडे सत्ता सुपूर्द करीत असताना डेंग यांनी जियांग यांच्यावर कोणतीच बंधने ठेवली नाहीत. हे कमिशन बरखास्त केल्यामुळे क्रांतिकाळातील सर्व जुने नेते पडद्याआड गेले. कायद्यानुसारच तहहयात नेमणुकांची पद्धत बंद करून सर्व नेमणुका पाच वर्षांसाठी करण्याबाबत निर्णय झाला. डेंग, चेन युन व त्यांचे क्रांतिकाळातील सहकारी नेते हे सारे यथावकाश पायउतार झाले.

डेंग यांच्या दक्षिण दौऱ्यानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेने उत्तम प्रगती केली. विकासदर, भाववाढ, चलन पुरवठा, उपभोग्य वस्तूंची बाजारातील उपलब्धता इत्यादीं बाबी सुधारल्या. सन 1989 मध्ये 3.5 टक्क्यांवर घसरलेल्या आर्थिक विकासदराने 1991 मध्ये 9.2 टक्क्यांपर्यंत उसळी मारली. तर, 1992 मध्ये 14.2 टक्के, 1993 मध्ये 13.5 टक्के, 1994 मध्ये 12.6 टक्के आणि 1995 मध्ये 10.9 टक्के अशा वेगाने अर्थव्यवस्था जोमाने मार्गक्रमणा करू लागली. एकदा कम्युनिस्ट पक्षानेच डेंग यांच्या आर्थिक सुधारणांना भक्कम पाठिंबा दिल्यानंतर आणि सोशलिस्ट मार्केट इकॉनॉमीची संकल्पना स्वीकारल्यानंतर चीनने मागे वळून पहिले नाही. 1991 पासून सुरुवात करून पुढील वीस वर्षे विकासदर 10 टक्क्यांखाली आलाच नाही. या संपूर्ण काळात काही वर्षांचा अपवाद वगळता चलन फुगवटा आणि भाववाढ आटोक्यात ठेवण्यातही चीनला यश आले. परदेशी गुंतवणूक 1989 ते 1991 च्या दरम्यान दर वर्षी 4 बिलियन डॉलर्स इतकी होती, मात्र 1992 पासून मात्र ती वाढून दर वर्षी सरासरी 35 बिलियन डॉलर्स झाली. काही विशिष्ट स्थानिक कंपन्यांना परदेशी कंपन्यांबरोबर व्यापार करू देण्याचे स्वातंत्र्य मिळाले. तत्पूर्वी, आयात वा निर्यात करणाऱ्यांना शासनाच्या संस्थांमधून व्यवहार व देवाण-घेवाण करावी लागायची. अशा स्वायत्त संस्था व कंपन्यांची संख्या वाढली. पुढे हाउसिंग मार्केटही मोठ्या प्रमाणावर वाढले.

डेंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1989 ते 1992 या काळात आणखी एक महत्त्वाचे तत्त्व मोठ्या प्रमाणावर विकसित केले. आर्थिक सुधारणा करावयाच्या, परंतु राजकीय सुधारणांना हात घालायचा नाही- हे ते तत्त्व. कोणत्याही आर्थिक सुधारणा या प्रचलित राजकीय फ्रेमवर्कमध्ये/चौकटीत केल्या जातात. आर्थिक सुधारणा करताना अनेकदा संबंधित संस्थांना आर्थिक व प्रशासकीय स्वायत्तता देणे, अधिक अधिकार देणे, स्वातंत्र्य देणे यांचा समावेश होतो. आर्थिक सुधारणा, उदारीकरण यांचाच अर्थ- संबंधित संस्थांना, व्यक्तींना वा समूहांना अधिक स्वातंत्र्य देणे, जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करणे, मिळालेल्या स्वातंत्र्याचा अधिकाधिक सकारात्मक उपयोग करणे- असा होतो. या अर्थाने पाहायला गेल्यास आर्थिक सुधारणांमध्ये अधिक स्वातंत्र्य- थोडे राजकीय स्वातंत्र्यही यात आलेच-अभिप्रेत आहेच. म्हणूनच चांगल्या प्रगत समाजामध्ये भांडवलशाहीचा व बाजारप्रणीत अर्थव्यवस्थेचा मूळ पाया उत्तम लोकशाही हाच असतो. केवळ आर्थिक सुधारणा होत आहेत, त्यासाठी आवश्यक स्वातंत्र्य दिले जात आहे; मात्र राजकीय स्वातंत्र्यापासून लोकांना वंचित ठेवले जात आहे, असे सहसा होत नाही. आर्थिक सुधारणा व राजकीय स्वातंत्र्य यांच्यात परस्परसंबंध आहे. राजकीय स्वातंत्र्य लोकांना जबाबदारीने वागायला शिकविते; त्यामुळे बऱ्यापैकी स्वतंत्र असलेल्या नियामक संस्था नियमानुसार आपले काम करतात, अर्थव्यवस्थेला गती देतात तसेच अर्थव्यवस्थेला स्वयंनियंत्रण (self-regulation) देतात, उद्योगधंदे उत्तमपणे चालवायला मदत करतात. म्हणूनच आर्थिक सुधारणा व राजकीय सुधारणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बाजारांचे, भांडवलशाहीचे आणि अर्थव्यवस्थेचे नियमन करणाऱ्या स्वतंत्र संस्था उत्तम व जबाबदार लोकशाहीमध्येच रुजतात व कार्यक्षमतेने चालतात. अर्थकारण व राजकारण आणि आर्थिक सुधारणा व राजकीय सुधारणा यातील हे सूत्रबद्ध नाते मात्र 1989 मध्ये पोळलेल्या चिनी नेतृत्वाला मान्य नव्हते. आर्थिक विकास व्हायला हवा, यासाठी आर्थिक सुधारणा त्यांना हव्या होत्या; मात्र राजकीय सुधारणा नको होत्या. राजकीय सुधारणा म्हणजे लोकांना राजकीय स्वातंत्र्य देणे, लोकशाहीकडे वाटचाल करणे. हे तत्त्व एकदा मान्य केले की, कम्युनिस्ट पक्षाची एकाधिकारशाही संपुष्टात येणार, हे स्पष्ट होते. म्हणून 1992 नंतरच्या काळात चिनी नेतृत्वाने आर्थिक सुधारणा केल्या, परंतु राजकीय सुधारणा करण्याचे टाळले.

डेंग यांनी 1978 मध्ये सुरू केलेल्या एका उत्तम प्रयोगाने चीनला 2000 हे वर्ष संपत असताना एक जागतिक महासत्ता म्हणून ओळख दिली. रीतसर निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांनी 1992 मध्ये दक्षिणेचा दौरा करून चीनमधील उद्यमशीलता फुलविली आणि आर्थिक महासत्ता होण्याचा चीनचा मार्ग मोकळा केला. हे फार मोठे काम त्यांनी केले. मात्र राजकीय सुधारणा, लोकशाही आणि स्वातंत्र्य या संकल्पनांवर आधारित समाज निर्माण करण्याचे त्यांनी टाळले. आर्थिक सुधारणा व राजकीय सुधारणा यात काही संबंध असतो, हे त्यांनी नाकारले. असेही म्हणता येईल की, आर्थिक सुधारणा व राजकीय सुधारणा यांची सांगड घालण्याची जबाबदारी त्यांनी पुढे ढकलली व नेतृत्वाच्या नव्या पिढीकडे दिली. 1994 मध्ये नववर्षदिनी डेंग यांचे अखेरचे सार्वजनिक दर्शन झाले. त्यानंतर ते सार्वजनिक जीवनात कधीच दिसले नाहीत. त्यांची तब्येत ढासळत गेली. पार्किन्सनच्या व्याधीने त्यांना पूर्ण ग्रासले. शेवटी फुप्फुसाच्या संसर्गाने ते बरेच दिवस आजारी होते.

डेंग यांनी हाँगकाँगचा समावेश चीनमध्ये व्हावा यासाठी अथक प्रयत्न केले. सन 1984 मध्ये सुरू झालेल्या या प्रयत्नाचा गोड शेवट 30 जुलै 1997 रोजी झाला. हाँगकाँगचा चीनमध्ये अखेर समावेश झाला. मात्र हा सोनियाचा दिवस बघण्यासाठी डेंग जिवंत नव्हते. हाँगकाँगचे चीनमध्ये विलीनीकरण होण्याच्या चार महिने अगोदरच, 19 फेब्रुवारी 1997 रोजी डेंग यांचे निधन झाले.

(क्रमश:)

Tags: साधना सदर चायना चीन सतीश बागल sadar sadhana series china dr satish bagal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात