डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

हु जिंताव आणि तियानमेन चौकातील कन्फ्युशिअस

हु जिंताव यांनी सरकारी कामकाजात पारदर्शकता आणण्याचाही प्रयत्न केला. भ्रष्टाचाराविरोधातही त्यांनी अनेक उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. मोठे चिनी नेते दर वर्षी बिडेह (Beidaihe) समुद्रकिनाऱ्यावर एकत्र जमत. दैनंदिन जीवनाच्या धबडग्यातून दोन दिवस मुक्त होऊन एकत्र येणे, हे उद्दिष्ट्य असले तरी पुढे-पुढे ही सहल म्हणजे अत्युच्च स्तरावरील शक्तिमान चिनी नेत्यांची दर वर्षी एकत्र येण्याची जागा झाली. पक्षनेत्यांना शिस्त लावण्यासाठी हु जिंताव यांनी हा प्रकार 2004 मध्ये पूर्णपणे बंद करून टाकला. मात्र हु जिंताव यांचे प्रशासन एक हाती एकवटलेले नव्हते, ते सल्लामसलत करून निर्णय घेत. हे चांगले असले तरीही बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने त्याला मर्यादा होत्या. हु यांच्या प्रशासनाचे वर्णन काही चिनी लोक Nine dragons taming the water असे करीत असत. याचा अर्थ असा की, हु यांच्या पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीतील नऊ सदस्य आपापल्या परीने व पद्धतीने त्यांचे स्वतःचे हितसंबंध जपत होते.

2002 च्या शेवटी 16 व्या काँग्रेसमध्ये जियांग झेमिन सत्तेतून पायउतार झाले आणि 2003 पासून हु जिंताव यांच्याकडे सत्ता आली. पक्षाचे प्रमुखपद व राष्ट्राध्यक्षपद हु जिंताव यांच्याकडे या काँग्रेसमध्ये हस्तांतरित झाले खरे; मात्र आणखी एक महत्त्वाचे पद- सेन्ट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्षपद मात्र जियांग झेमिन यांनी सोडले नाही. ते या महत्त्वाच्या पदावर सप्टेंबर 2004 पर्यंत राहिले. हु जिंताव यांनी 2004 मध्ये सप्टेंबरअखेर अनेक अंतर्गत हालचाली करीत व अप्रत्यक्षपणे जियांग यांना शह देत सीएमसीचे अध्यक्षपद स्वतःकडे घेतले. पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीतही 9 पैकी 6 सदस्य जियांग झेमिन यांच्या खास वर्तुळातील होते. हे सारे मुळात शांघायमधील शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या स्थानिक कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. त्याला ‘शांघाय क्लिक’ असेही म्हटले जात असे. अर्थातच पुढे-पुढे यातील काही सदस्य हे हु जिंताव यांचेही हितचिंतक बनले. त्यापैकी झेन शिंगहँग (Zhen Qinghang) हे मुळात जियांग यांचे शिष्य, पण ते पुढे हु जिंताव यांचे समर्थक झाले. कारण हु जिंताव यांच्यातर्फे ते जियांग यांच्याकडे अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर राजकीय सहमती मिळविण्यासाठी प्रयत्नशील असत. तसे पाहिल्यास, हु जिंताव हे चीनचे खऱ्या अर्थाने 2004 मध्ये सर्वेसर्वा झाले.

हु जिंताव 2002 मध्ये सत्तेवर आले आणि 2012 च्या डिसेंबरपर्यंत म्हणजे 10 वर्षे सत्तेवर राहिले. डेंग व जियांग झेमिन या दोघांच्या राजवटीत आर्थिक विकासाला जोरदार सुरुवात झाली. मात्र, आंतरराष्ट्रीय मंचावर व परराष्ट्र धोरणात चीनची भूमिका अमेरिकेशी व इतरांशी जुळवून घेण्याची व थोडी बचावात्मक अशीच राहिली. जगभर कम्युनिझमची पीछेहाट होत असल्याने चीनलाही थोडे सबुरीने घ्यावे लागत होते. हु जिंताव हे मात्र खऱ्या अर्थाने चीनच्या आर्थिक व राजकीय सामर्थ्याबाबत आत्मविश्वास असलेले तडफदार नेतृत्व होते. भविष्यकाळात आपण सामर्थ्यवान होऊ, असा आत्मविश्वास डेंग व जियांग दोघांना होता. मात्र, आंतरराष्ट्रीय पटलावर जागतिक महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आवश्यक असणारे सामर्थ्य व क्षमता चीनमध्ये आली आहे, हे भान हु जिंताव व त्यांचे सहकारी, पंतप्रधान वेन जिआबाओ यांना पूर्णपणे होते. जियांग यांच्या काळात उच्च आर्थिक दरवाढ राखणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात झेप घेऊन जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान मिळविणे ही उद्दिष्टे होती. हु जिंताव यांच्या काळात मात्र चीन एक समर्थ जागतिक सत्ता झालेला होता. त्यामुळे आर्थिक सुधारणा, अंतर्गत सुरक्षा, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, उच्च शिक्षण व संशोधन, प्रगत तंत्रज्ञान, पर्यावरण, शहरविकास आणि नागरिकरण या विषयांबरोबरच संतुलित विकास, सामाजिक स्थैर्य व पर्यावरणविषयक प्रश्न यांचाही विचार सुरू झाला. याशिवाय आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनची भूमिका निश्चितपणे काय असावी, याचेही व्हिजन हु जिंताव यांच्या भूमिकेत होते. चीनमधील आधुनिकीकरणाला व समाज-स्वास्थ्याला पुष्टी देणाऱ्या चिनी संस्कृतीमधील पारंपरिक विचार व पद्धती अशा बाबींचा विचारही हु जिंताव यांच्या व्हिजनमध्ये होता. या अर्थाने पाहू गेल्यास, हु जिंताव यांच्या धोरणांमध्ये चिनी महासत्तेच्या उदयाबद्दलचे व भविष्याचे चिंतन दिसून येते. आंतरराष्ट्रीय प्रश्नांबाबत- विशेषतः अमेरिकेबाबत डेंग आणि जियांग हे अनेकदा सबुरीने घेत, थोडे नमतेही घेत. हु जिंताव यांच्या काळापासून चीनची भूमिका थोडी ताठर झाली, असे म्हणता येईल.

हु जिंताव हे अतिशय हुशार व कार्यक्षम असले, तरी एखाद्या करारी नोकरशहासारखे होते. त्यांची वागण्याची पद्धतही बरीच औपचारिक असे आणि एखाद्या मुद्यावर सहमती मिळविल्याशिवाय ते पुढे जात नसत. सामूहिक नेतृत्वासाठी ते आदर्श होते. हु जिंताव यांचा जन्म जिआंग्सू प्रांतातील जिआंग्यान येथे 1942 मध्ये झाला. मुळात अनहुई प्रांतातील त्यांचे कुटुंब येथे येऊन स्थिरावले होते. वडील छोट्या प्रमाणावर चहाचा व्यवसाय करीत असत. परिस्थिती बेताचीच होती. आई शिक्षिका होती. मात्र, हु जिंताव सात वर्षांचे असतानाच तिचे निधन झाले. त्यामुळे त्याच्या मावशीने त्यांना वाढविले. हु जिंताव हे लहानपणापासूनच तरतरीत व अभ्यासात हुशार होते. चिंगहुआ (Tsinguha) विद्यापीठातून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी 1964 मध्ये घेतली. याच काळात विद्यापीठात त्यांचा परिचय लिऊ याँगशिंगशी झाला. पुढे तिच्याशी त्यांनी लग्नही केले. हु जिंताव यांची 1968 मध्ये गान्सू (Gansu) प्रांतात बदली झाली. तिथे त्यांनी एका मोठ्या जलविद्युत्‌ केंद्राच्या उभारणीच्या प्रकल्पावर काम केले. याच काळात ते स्थानिक कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय सदस्य झाले. इंजिनिअरिंग विषयापेक्षाही कम्युनिस्ट पक्षातील राजकारणात ते हळूहळू अधिक रमू लागले. गान्सू प्रांताच्या बांधकाम विभागाचे 1973 मध्ये ते सचिवही झाले. डेंग झिओपेंग यांनी चार महत्त्वाच्या क्षेत्रांतील आधुनिकी-करणाचा कार्यक्रम 1980 मध्ये सुरू केला. या कार्यक्रमासाठी अधिक कार्यक्षम, निष्ठावंत आणि तांत्रिक व व्यावसायिक ज्ञान असलेले कम्युनिस्ट कार्यकर्ते व पदाधिकारी यांची गरज होती. गान्सू प्रांताचे पक्ष सचिव साँग पिंग (Song Ping) यांनी हु जिंताव यांची कर्तबगारी हेरून या कार्यक्रमांतर्गत मोठ्या पदासाठी त्यांची शिफारस केली. याच प्रांतातील दुसरे असेच कार्यक्षम पदाधिकारी वेन जियाबाओ यांनाही अशीच मोठी जबाबदारी दिली. योगायोग म्हणजे, पुढे 2003 मध्ये हु जिंताव हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हा त्यांचे सहकारी व चीनचे पंतप्रधान म्हणून वेन जियाबाओंची नेमणूक झाली.

हु जिंताव हे 1982 मध्ये गान्सू प्रांतातील कम्युनिस्ट युथ लीगचे सचिव, तसेच चीनच्या युथ फेडरेशनचे अध्यक्ष झाले. नंतर बीजिंगमधील सेन्ट्रल पार्टी स्कूलमध्ये काही काळ व्यतीत केल्यानंतर 1985 मध्ये 42 व्या वर्षी खऱ्या अर्थाने ते राजकारणात आले. पक्षाचे महासचिव हु याओबांग यांनी त्यांना गिझ्हौ (Guizhou) प्रांतात पक्षसचिव या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नेमले. या मागास प्रांताची अर्थव्यवस्था गतिमान करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. त्या निमित्ताने ते प्रांतातील 86 जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष फिरून निर्णयप्रक्रिया गतिमान करीत असत. 1987 मध्ये चीनभर विद्यार्थ्यांची निदर्शने सुरू असताना हु जिंताव यांनी त्यांच्या प्रांतातील विद्यार्थांची निदर्शने फारसा गाजावाजा न करता बंद करण्याची करामत करून दाखवली. हाताबाहेर चाललेल्या निदर्शनांच्या संदर्भात डेंग झिओपेंग यांनी हु याओबांग यांना 1987 मध्ये डच्चू दिला. त्यानंतर झालेल्या राजकीय बदलांमध्ये हु जिंताव यांची नेमणूक बीजिंगपासून दूरवर, स्वायत्त तिबेट प्रांतात पक्षसचिव म्हणून झाली. तिबेटमधील तिबेटी वंशाचे लोक आणि चीनमधील मूळचे हानवंशीय लोक यांच्यात नेहमी संघर्ष सुरू असे. तिबेटमध्ये सैन्यदल अनेकदा स्थानिक बंडखोरी व राजकीय उठाव मोडून टाकत असल्याने पक्षसचिवाच्या पदाबरोबरच हु जिंताव यांना पोलिटिकल कॉमिसारचे काम करावे लागे. त्यामुळे तिबेटसारख्या मोठ्या, अशांत आणि भिन्न संस्कृती, भाषा व परंपरा असलेल्या प्रदेशाच्या प्रमुख नेतेपदाचा अनुभव त्यांना मिळाला. तियानमेन प्रकरणानंतर तिबेटमधील बंडाळी 1989 मध्ये खूप वाढल्याने त्यांना ल्हासामध्ये 2000 हून अधिक सशस्त्र पोलिसांच्या मदतीने शांतता प्रस्थापित करावी लागली.

तिबेटचे चीनमध्ये 1959 मध्ये सामिलीकरण होण्याच्या वेळी तिबेटी लोकांचा मोठा उठाव झाला होता. त्याला तीस वर्षे होऊन गेली. या उठावाच्या तिसाव्या वर्षाच्या आठवणी जागविताना तिबेटी लोकांनी मार्च 1989 मध्ये तीव्र निदर्शने केली. परिस्थिती अतिशय स्फोटक झाली होती. सशस्त्र पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक लोक मारले गेले आणि दुसऱ्याच दिवशी हु जिंताव यांनी केंद्र सरकारला मार्शल लॉ लागू करण्याबाबत प्रस्ताव दिला. हु जिंताव यांनी प्रत्यक्ष गोळीबार करण्याबाबत आदेश दिले किंवा नाही, हे जरी स्पष्ट नसले तरी या मुद्यावर हु जिंताव यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त कठोरपणे पावले उचलली असे म्हटले जाते. किंबहुना, त्यानंतर तीन महिन्यांनी तियानमेन चौकात विद्यार्थ्यांची निदर्शने लष्कराच्या बळावर मोडून काढण्यात आली, तीही हु जिंताव यांच्या तिबेटमधील कठोर कारवाईमधून प्रेरणा घेऊनच, असेही काही म्हणतात. जून 1989 मध्ये लष्कराचे रणगाडे आणि चिलखती गाड्या बीजिंगमधील रस्त्यातून तियानमेन चौकात विद्यार्थी निदर्शकांवर जेव्हा चालून गेल्या, तेव्हा त्या कारवाईचे समर्थन करणारे पहिले प्रादेशिक प्रमुख म्हणजे हु जिंताव!

विरोधकांना कसे नमवयाचे आणि त्यांचा कसा बंदोबस्त थंडपणे करायचा, या कलेत हु जिंताव वाकबगार होते. फारसे भावनिक न होता, कारवाई करण्याची हु जिंताव यांची हातोटी पाहून डेंग यांचे हु जिंताव यांच्याबद्दलचे मत खूपच अनुकूल झाले. पुढे फार उंचीवरील प्रदेशात त्रास होतो, या कारणास्तव हु जिंताव बीजिंगला आले आणि बीजिंगच्या राजकारणाचा एक भाग बनले. राष्ट्रीय स्तरावर असेच नेतृत्व चीनला भविष्यात हवे, हे डेंग यांच्या मनाने घेतले. त्यामुळे वयाची पन्नाशी गाठण्याआधीच हु जिंताव हे अतिशय महत्त्वाच्या व संवेदनशील राजकीय पदावर येऊन पोहोचले. 1992 मध्ये, म्हणजे तीन वर्षांतच जियांग झेमिन यांच्या पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीत सर्वांत तरुण सदस्य म्हणून हु जिंताव यांचा समावेश झाला. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते त्यांच्याकडे जियांग झेमिन यांच्या नंतरचे भावी नेतृत्व म्हणून पाहू लागले. त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या सचिवालयाचा ताबा 1992 मध्ये घेतला आणि केंद्रीय समितीचे (सेन्ट्रल कमिटीचे) दैनंदिन कामकाज ते पाहू लागले. त्यानंतर त्यांनी सेन्ट्रल पार्टी स्कूल स्वतःच्या प्रभावाखाली आणले. पक्षाच्या या दोन्ही महत्त्वाच्या संस्थांशी दैनंदिन निकटचा संबंध आल्याने त्यांना पुढील 7-8 वर्षांत पक्षात व सरकारात चांगला जम बसविता आला. हु जिंताव हे शिस्तीचे व योग्य पद्धतींचे पालन करणारे असल्याने त्यांनी नेहमीच काटेकोरपणे स्वतःला थोडे बाजूला ठेवीत जियांग झेमिन यांनाच प्रकाशात ठेवले. त्यामुळे जियांग झेमिन व हु जिंताव यांच्यात फारसा तणाव निर्माण झाला नाही. उलट, हु जिंताव यांनी जियांग झेमिन यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या थ्री स्ट्रेसेस कँपेन किंवा सैद्धांतिक शुद्धीकरणाच्या त्रिसूत्री मोहिमेचे नेतृत्व करून जियांग झेमिन यांचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला.

आर्थिक समृद्धीमुळे कम्युनिस्ट पक्षातील सदस्य वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संकल्पनेकडे आकर्षित तर होणार नाहीत आणि त्यामुळे भविष्यात पक्षाच्या बांधिलकीवर विपरीत परिणाम तर होणार नाही ना, ही भीती कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाला नेहमीच सतावत असते. म्हणूनच सर्वच सदस्यांचे, पदाधिकाऱ्यांचे व नेत्यांचे सैद्धांतिक शुद्धीकरण होणे वरिष्ठ नेत्यांना आवश्यक भासत असे. माओंनी तर याचा अतिरेक केला होता. वरिष्ठ नेते अनेकदा अशा मोहिमांचा उपयोग इतरांना व प्रतिस्पर्ध्यांना जरब बसविण्यासाठी करीत. या मोहिमेअंतर्गत सर्व स्तरांंतील, संस्थांतील व संघटनांतील कर्मचाऱ्यांना, सदस्यांना कम्युनिस्ट पक्षाची मूळ उद्दिष्टे व तत्त्वे यांचा अभ्यास करून आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि व्यावसायिक, सामाजिक, राजकीय व दैनंदिन जीवनात कम्युनिस्ट पक्षाची उद्दिष्टे व तत्त्वे पाळतो का, याबद्दल विचार करणे अभिप्रेत असे. आपल्या वर्तनात-विचारात त्रुटी असतील तर त्या मोकळेपणे मान्य करून स्वतःची निर्भर्त्सना करणे अपेक्षित असे. इतरांनाही मोकळेपणाने आपल्या वर्तनावर, कृतीवर व विचारांवर टीका करू द्यावी, असाही विचार या मोहिमेत होता. या मोहिमेत संस्था व संघटनांमध्ये विशेष सत्रे आयोजित करून, सर्वांच्या वर्तनाचे पृथःकरण करून, दोष दाखवून सुधारणा करण्याबाबत कार्यवाही होत असे. यातून संस्थेचे, संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारीही सुटत नसत.

जियांग झेमिन यांनी या मोहिमेचा उपयोग करून स्वतःचे स्थान पक्के केले व विरोधकांना चाप लावणेही सुरू केले. हु जिंताव हे जियांग झेमिन यांचे राजकीय वारसदार असल्याने त्यांनी जियांग यांचे स्थान पक्के करण्यात मदत केली. हु जिंताव 1998 मध्ये चीनचे उपाध्यक्ष झाल्यानंतर हे जियांग यांना परराष्ट्र धोरण आखण्यात व त्याबाबत सल्ला देण्यातही मदत करीत. बेलग्रेडमधील चिनी वकिलातीवर NATO च्या विमानांकडून 1998 मध्ये बॉम्बहल्ला करण्यात आल्यानंतर उपाध्यक्ष म्हणून हु जिंताव यांनीच प्रकरण धसास लावले. हु जिंताव आणि त्यांचे सहकारी-पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी वाढती आर्थिक सुबत्ता व राष्ट्रीय उत्पन्न यांच्याबरोबरच लोककल्याणाचा आणि सामाजिक स्थैर्याचाही विचार केला व त्यास महत्त्व दिले. दोन दशकांत केवळ उच्च आर्थिक विकासाला महत्त्व दिल्याने पक्षात व सरकारमध्ये भ्रष्टाचार माजून सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली होती. कम्युनिस्ट पक्षाचे लोकांच्या मनात असलेले नैतिक स्थान डळमळीत होऊ लागले होते. लोक सरकारलाच प्रश्न विचारू लागले होते. यातूनच पुढे राजकीय लोकशाही व वैयक्तिक स्वातंत्र्य यांची मागणी पुढे येऊ शकते, हे त्यांना चांगले ठाऊक होते. म्हणूनच एक सामाजिक उद्दिष्ट म्हणून चीनमध्ये आर्थिक विषमता दूर करणारे, सामंजस्य वाढविणारे आणि संवादी समाज (Harmonious Socialist Society) निर्माण करण्याचे धोरण त्यांनी अंगीकारले. या धोरणात गरीब व मागासलेल्या लोकांसाठी, मागासलेल्या भागांसाठी विशेष कार्यक्रम आखण्यावर भर होता; तसेच भ्रष्टाचाराला पायबंद घालणाऱ्या, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणाऱ्या, ग्रामीण व शहरी भागातील लोकांचे जीवन अधिक सुसह्य करणाऱ्या आणि समतोल विकासावर भर देणाऱ्या उपाययोजनांचा समावेश होता. ग्रीन जीडीपी (ग्रीन ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) ही संकल्पनाही या काळात चीनमध्ये मूळ धरू लागली होती. त्यामुळे परंपरागत आर्थिक सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) मोजताना पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो, त्यामुळे होत असणारे नुकसानही त्या उत्पन्नातून वजा करावे, हा विचार रूढ होत चालला. यासाठी हु जिंताव यांनी शास्त्रीय विकासाची संकल्पना (Scientific Development Concept) विकसित करण्यावर भर दिला. त्यात समग्र विकास आणि आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय प्रश्न सोडविण्यासाठी धीम्या पद्धतीने करावयाची कार्यवाही अपेक्षित होती. शिवाय या कार्यक्रमांतर्गत राजकीय सुधारणांचा उल्लेख नसला तरी पक्षाच्या अंतर्गत व उच्चस्तरीय नेतृत्वामध्ये, आवश्यकता भासेल तेव्हा, राजकीय सुधारणांची गरजही स्वीकारली होती. मात्र या राजकीय सुधारणांबाबत उघडपणे कोणीही बोलत नसे. शास्त्रीय विकासाची संकल्पना (Scientific Development Concept) म्हणजे सर्वांगीण, संतुलित, सर्वांना बरोबर घेऊन जाणारी विकासाची संकल्पना. या संकल्पनेचा चीनच्या राज्यघटनेत 2007-2008 मध्ये अंतर्भाव केलेला होता.

हु जिंताव यांचा दहा वर्षांचा काळ चीनमध्ये मोठ्या घडामोडींचा होता. उच्च आर्थिक विकास, मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक, प्रचंड वाढता व्यापार व औद्योगिकीकरण, अवकाश संशोधन, वाढते नागरीकरण, सैन्यदलाचे आधुनिकीकरण व शहरांची वाढ यामधून अर्थव्यवस्था वाढली. शिवाय 2008 चे बीजिंग ऑलिंपिक आणि 2010 चे शांघाय एक्स्पो हे दोन फार मोठे आंतरराष्ट्रीय उपक्रम हाती घेतले गेले. 2008 मध्ये जागतिक मंदीच्या काळातही चीनची आर्थिक कामगिरी उत्तम होती. इतकेच नव्हे, तर चीनमधील आर्थिक वाढीमुळे जगभरची अर्थव्यवस्था सावरली गेली. तैवानबरोबरचे संबंध सुधारले. शेतीवरील अनेक कर रद्द करण्यात आले, ग्रामीण भागातून शहरांमध्ये कामासाठी येणाऱ्या कामगारांवरील जाचक नियंत्रणे कमी करण्यात आली. संतुलित विकास करून किनारपट्टीचा प्रगत भाग आणि पश्चिमेकडील व पूर्वेकडील कमी विकास झालेल्या भागातील तफावत दूर करण्याचे प्रयत्न झाले. घरबांधणी कार्यक्रम विस्तारला. चीनमधील गरीब व मध्यम-वर्गीयांसाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली. कम्युनिस्ट राजवटी जगभर कोसळल्या असल्याने, हु जिंताव यांना चिनी पारंपरिक संस्कृती व विचार यांच्यातून येणारा राजकीय व सामाजिक विचार महत्त्वाचा वाटत होता. त्या आधारे त्यांनी प्रशासन व आर्थिक विकास यांचे मॉडेल बांधले. माओंच्या काळात सामाजिक सुसंवादाचे तत्त्वज्ञान सांगणारा कन्फ्युशिअस हा प्रतिगामी, क्रांतीचा शत्रू व जैसे थे तत्त्वज्ञानाच्या समर्थनाचे प्रतीक मानला जाई. हु जिंताव यांनी मात्र कन्फ्युशिअस व त्याच्या सामाजिक तत्त्वज्ञानाचे नुसतेच पुनरुज्जीवन केले नाही, तर त्याच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे चिनी समाजाची बांधणी करण्याचे ठरविले. चीनचा 2000 पासून पुढे जसा सर्व जगाशी आर्थिक महासत्ता म्हणून निकटचा संबंध येऊ लागला, तसतसे कन्फ्युशियसचे सोशल हार्मनी व शांततापूर्ण सहअस्तित्वाचे तत्त्वज्ञान हे चीनने स्वतःचे, समाजाचे व आंतरराष्ट्रीय समूहात टिकून राहण्याचे तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारले. कऩ्फ्युशियसच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अनेक संस्था निर्माण झाल्या. या संस्था आणि त्यांचा कारभार आता जगभर पसरला असून, या संस्थांमार्फत चिनी संस्कृती, भाषा व परंपरा यांचा जगभर प्रसार होतो. ऑलिंपिक सामने बीजिंगमध्ये 2008 मध्ये भरले तेव्हा एक खास चिनी वैशिष्ट्य म्हणजे उद्‌घाटनाच्या शानदार संचलनात कऩ्फ्युशियस स्कॉलर्सच्या चमूने भाग घेतला होता. पुढे 2011 मध्ये चीन सरकारने चक्क तियानमेन चौकात मध्यभागी कऩ्फ्युशियसचा एक पुतळा उभारला. तियानमेन चौकात माओच्या स्मृती स्मारकाच्या चौकातच हा पुतळा उभारून हु जिंताव यांच्या सरकारने आपण कऩ्फ्युशियसच्या तत्त्वज्ञानाला किती महत्त्व देतो, हेही स्पष्ट केले. (सध्या हा पुतळा तिथून जवळ असलेल्या म्युझियममध्ये हलविला आहे).

हु जिंताव यांनी सरकारी कामकाजात पारदर्शकता आणण्याचाही प्रयत्न केला. भ्रष्टाचाराविरोधातही त्यांनी अनेक उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. मोठे चिनी नेते दर वर्षी बिडेह (Beidaihe) समुद्रकिनाऱ्यावर एकत्र जमत. दैनंदिन जीवनाच्या धबडग्यातून दोन दिवस मुक्त होऊन एकत्र येणे, हे उद्दिष्ट्य असले तरी पुढे-पुढे ही सहल म्हणजे अत्युच्च स्तरावरील शक्तिमान चिनी नेत्यांची दर वर्षी एकत्र येण्याची जागा झाली. पक्षनेत्यांना शिस्त लावण्यासाठी हु जिंताव यांनी हा प्रकार 2004 मध्ये पूर्णपणे बंद करून टाकला. मात्र हु जिंताव यांचे प्रशासन एक हाती एकवटलेले नव्हते, ते सल्लामसलत करून निर्णय घेत. हे चांगले असले तरीही बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने त्याला मर्यादा होत्या. हु यांच्या प्रशासनाचे वर्णन काही चिनी लोक Nine dragons taming the water  असे करीत असत. याचा अर्थ असा की, हु यांच्या पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीतील 9 सदस्य आपापल्या परीने व पद्धतीने त्यांचे स्वतःचे हितसंबंध जपत होते. म्हणजेच हु यांचा अजेंडा व कार्यक्रम चीनसाठी कितीही चांगला असला तरी खोलवर रुजलेले हितसंबंध, भ्रष्टाचार व अनिष्ट प्रथा यांना ते पायबंद घालू शकले नाहीत.

हु जिंताव यांच्या काळात अधिकाऱ्यांची दंडेली, सत्तेचा गैरवापर, बेकायदारीत्या केलेली कृत्ये याबाबत लोकांकडून जाब विचारणे सुरू झाले होते. इंटरनेटच्या प्रसारामुळे एखाद्या विषयाचा वा प्रकरणाचा तत्काळ बोलबाला होत असे. चीनमध्ये घटना व कायदे असूनही न्यायालये स्वतंत्र नव्हती. ती आजही नाहीत. त्यामुळे निदर्शक व ॲक्टिव्हिस्ट यांना कोणतेही संरक्षण नव्हते. चीनमध्ये 2013 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कायदाक्षेत्रातील नसत, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी वा कायदा व सुरक्षाविषयक अनुभव असलेले अधिकारी असत. हु जिंताव यांच्या काळातील मुख्य न्यायाधीश वँग शेंगजून हे अनहुई प्रांतातील पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी होते. त्यानंतर त्यांनी बीजिंग येथे अंतर्गत सुरक्षा विभागात उच्च पदावर काम केले होते. हु जिंताव यांच्या काळात कायदे एकतर्फी होते आणि मुख्य म्हणजे, न्यायालये स्वतंत्र नव्हती. ती पक्षाच्या विरोधात कधीही जाऊ शकत नसत. हु जिंताव यांच्या नेतृत्वाच्या दुसऱ्या सत्रात 2007 नंतर चीनभर अनेक प्रश्न निर्माण झाले. इंटरनेटच्या प्रसारामुळे चीनमध्ये लोकशाही व स्वातंत्र्याची मागणी मूळ धरू लागली. सिव्हिल सोसायटी व बुद्धिमंत हळूहळू सक्रिय होऊ लागले. इंटरनेटच्या जमान्यात सरकारला प्रत्येक गोष्ट व माहिती दडपणे अशक्य झाले. अर्थव्यवस्था खूप मोठी झाली व प्रबळ झाली हे खरे; परंतु त्याचबरोबर जगभरातील लोक चीनकडून राजकीय लोकशाहीची व नागरिकांच्या स्वातंत्र्याची अपेक्षा करू लागले, मानवी हक्कांची अपेक्षा करू लागले. सरकार व पक्ष यांच्या विरोधात चिनी लोक जाऊ लागले. यावरील उपाययोजना म्हणजे लोकांचे थोडे तरी ऐकून घेणे! त्यासाठी त्यांना काही तरी स्वातंत्र्य देणे आवश्यक होते. मात्र हे पक्षाच्या व सरकारच्या धोरणात बसणारे नव्हते. त्यामुळे 2008 पासून पुढे हु जिंताव आणि वेन जियाबाओ यांच्या सरकारचे अंतर्गत धोरण अधिक दडपशाहीचे झाले.

हु जिंताव यांच्याकडे सत्ता येत असतानाच दक्षिण चीनमध्ये SARS  (सिव्हिअर ॲक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम) या श्वसनाच्या साथीच्या रोगाची लागण झाली. लागण झालेल्या SARS च्या 8000 हून अधिक रुग्णांपैकी 774 मृत्यू पावले. हे प्रकरण वरवर साथीच्या रोगाबद्दलचे व केवळ आरोग्यविषयक वाटले, तरी प्रत्यक्षात त्याचे राजकीय पडसाद फारच खोल व गंभीर होते. ही साथ तत्काळ नियंत्रणात आणली गेली नाही याचे अपयश सरकारचे होतेच; परंतु ज्या पद्धतीने त्यातील माहिती दडपण्याचा प्रयत्न झाला, ज्या पद्धतीने हे सारे प्रकरण उजेडात आले, त्यावरून चीनच्या राजकीय व व्यवस्थापकीय क्षमतांवर प्रश्न निर्माण झाले. एखाद्या बंदिस्त राजकीय व्यवस्थेमध्ये हे खपून गेले असते. परंतु 2001 मध्ये चीन WTO चा सदस्य झाल्यानंतर चीनचा वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार व इतर देशांशी होत असलेले व्यवहार पाहता, या प्रकरणाला वाईट प्रसिद्धी मिळाली. नोव्हेंबर-डिसेंबर 2002 मध्ये या साथीची माहिती मिळाली, तरीही एप्रिल-मे 2003 पर्यंत कार्यवाहीबाबत गोंधळ सुरू होता. सरकारी विभागात तीन दिवस या अहवालाचा लिफाफाही उघडला गेला नव्हता. दक्षिणेकडील ज्या भागात ही साथ पसरली, तो भाग उद्योगधंद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने त्याबद्दलची माहिती सुरुवातीला दडपून टाकण्यात आली. लोकांना सावध न केल्याने व योग्य ती काळजी न घेतल्याने उपचार करणाऱ्या आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रथम लागण झाली. मार्चमध्ये पीपल्स काँग्रेसचे अधिवेशन असल्याने त्याच्यापुढे हे प्रकरण जाऊ नये, म्हणून दडपण्यात आले. WTO चे (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) तज्ज्ञ जेव्हा चीनमध्ये पाहणीसाठी आले, तेव्हा याच भीतीपोटी तज्ज्ञांच्या ग्रुपला आठ दिवस संबंधित इस्पितळात जाऊ दिले नाही. जेव्हा आरोग्यमंत्री व बीजिंगचे मेयरच या प्रकरणी चुकीची आकडेवारी व माहिती देऊ लागले, तेव्हा एका वरिष्ठ डॉक्टरने याला वाचा फोडली आणि परदेशी टीव्हीला याबाबतची माहिती दिली. या प्रकरणाने चीनची नुसती पंचाईतच झाली नाही; तर त्यांच्या प्रशासनाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.

सार्वजनिक महत्त्वाच्या माहितीबाबत अनावश्यक गोपनीयता, स्वातंत्र्याचा अभाव, अपारदर्शी व्यवहार, माहितीचे चुकीचे व्यवस्थापन या साऱ्या बाबी या प्रकरणात दिसून आल्या. कठीण व गुंतागुंतीच्या प्रकरणात विश्वासार्हता व पारदर्शीपणा महत्त्वाचा असतो, हे तत्त्व पक्षाच्या हुकूमशाहीची सवय झालेल्या राज्यकर्त्यांना चटकन लक्षात आले नाही. इंटरनेटच्या प्रसारामुळे असे प्रकार लपविता येत नाहीत आणि त्यासाठी वस्तुस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारला काही बाबतींत तरी लोकांना विश्वासात घ्यावे लागते, हेही सरकारला कळले. हु जिंताव यांनी अखेर आरोग्यमंत्री व मेयर यांना बडतर्फ केले. चीनमध्ये प्रथमच वर्तमानपत्रे व परदेशी टीव्हीवरील बातम्यांमुळे अशा रीतीने माहिती दडवून ठेवल्याच्या आरोपावरून पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर कारवाई झाली.

(क्रमश:)

Tags: साधना सदर चिनी महासत्तेचा उदय सतीश बागल sadar sadhana series chini mahasattecha uday satish bagal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात