डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

उंच आणि उत्तम शरीरयष्टी लाभलेले क्षी जिनपिंग यांना तरुणपणापासून वाचनाची आवड होती. आजही त्यांच्या भाषणातून त्यांनी वाचलेल्या अनेक पुस्तकांचे संदर्भ येत राहतात. जगभरातील अनेक देशांतील महत्त्वाच्या लेखकांशी व त्यांच्या लिखाणाशी ते परिचित असावेत, असे त्यांच्या भाषणांवरून दिसते. अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ‘दी ओल्ड मॅन अँड दी सी’पासून ते डोस्टोवस्की, पुश्किन, टॉलस्टॉय व व्हिक्टर ह्युगोच्या कादंबऱ्या आणि शेक्सपिअरच्या नाटकांपर्यंत त्यांनी बरेच काही वाचले आहे, असे त्यांच्याबद्दल सांगितले जाते. जुने चिनी साहित्य व क्लासिक्स यांचाही त्यांचा अभ्यास आहे. माओंप्रमाणेच क्षी यांच्याही लिखाणात चिनी अभिजात साहित्याचे संदर्भ येतात. तरुणपणी लिआंगझे येथे असताना क्षी बरेच वाचन करीत असत. एकदा गटेचे ‘फाउस्ट’ मिळविण्यासाठी ते 15 किलोमीटर चालत गेले आणि वाचून झाल्यावर ते पुस्तक परत करण्यासाठी त्यांनी परत 15 किलोमीटरची पायपीट केली.

क्षी जिनपिंग चीनच्या नेतृत्वाची पाचवी पिढी. त्यांनी 2013 मध्ये हु जिंताव यांच्याकडून सूत्रे हाती घेतली. पक्षातील जाणकार लोक 2007 पासून त्यांच्याकडे हु जिंताव यांच्यानंतरचे एक संभाव्य नेतृत्व म्हणून पाहत असत. ते 2008 मध्ये चीनचे उपाध्यक्ष झाले. हु जिंताव यांच्या कारकिर्दीतील दुसऱ्या सत्रात- 2007 ते 2012 चीनमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. चीनमधील अनेक भागांत झालेले राजकीय उठाव व बंडाळी, उच्चपदस्थांशी संबंधित उघडकीस आलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे, त्याच वर्षात सुरू झालेली जागतिक मंदी; उत्पादनाच्या मागणीत घट झाल्याने मंदावणारी अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार व सत्तेचा दुरुपयोग या कारणावरून सरकारविरोधात इंटरनेट व सोशल मीडियामधून झालेले तीव्र मतप्रदर्शन आणि त्यातून येणारी लोकशाही व स्वातंत्र्याची वाढती मागणी, वाढत्या प्रदूषणाविरोधात इंटरनेट/सोशल मीडियातून सरकारविरोधात चालणाऱ्या चळवळी- त्या संपविण्यासाठी सरकारची वाढती दडपशाही; अशी अनेक आव्हाने उभी राहिली. या काळात क्षी जिनपिंग चीनचे उपाध्यक्ष होतेच, शिवाय हु जिंताव यांचे वारस नेते म्हणून ते चीनचे नेतृत्वही करणार होते. त्यामुळे ही आव्हाने त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाची होती. या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देत आणि पक्षातील विरोधकांवर मत करीत 2013 मध्ये ते चीनचे सर्वोच्च नेते झाले.

वाढता जागतिक व्यापार व वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था यांच्यामुळे केव्हा तरी चीन लोकशाही मार्गाकडे वळेल, असे पाश्चात्त्य देशांतील नेत्यांना आणि चीनमधील बुद्धिमंत व मध्यमवर्गाला वाटत होते. क्षी जिनपिंग यांच्याकडे सूत्रे आल्यानंतर ते भ्रष्टाचाराविरोधात मोठी कार्यवाही करतील, तसेच राजकीय सुधारणा करून चीनला लोकशाही मार्गाकडे घेऊन जातील, अशी आशा व्यक्त होत होती. उच्च शिक्षित, बुद्धिमान, उत्तम वाचन असणारे क्षी जिनपिंग हे एक भारदस्त व्यक्तिमत्त्व होते. झेजियांग प्रांतात 2003 ते 2007 दरम्यान काम करताना ते झेजियांग डेली या वर्तमानपत्रात स्तंभलेखन करीत असत. प्रशासनाचा भरपूर अनुभव असलेल्या क्षी जिनपिंग यांनी चीनमधील एका लहान गावातील कनिष्ठ सरकारी पदापासून सुरुवात करून राष्ट्राध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यांचा आदर्शवाद, क्षमता व भ्रष्टाचारविरोधातील मते पाहता, ते राजकीय सुधारणा करून चीनला अधिक जबाबदार आणि कायद्यानुसार व राज्यघटनेनुसार चालणारे सरकार देतील, असे वाटत होते. विशेषतः ते न्यायालयीन व कायदेविषयक सुधारणा हाती घेतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र सत्ता हाती आल्यानंतर क्षी जिनपिंग यांची पावले वेगळ्या दिशेने पडू लागली. त्यांच्या काळात सत्तेचे उत्तरोत्तर केंद्रीकरण झाले आणि सर्व संस्थांवर त्यांचे वैयक्तिक नियंत्रण आले.

डेंग, जियांग झेमिन आणि हु जिंताव यांच्या काळात सहमतीचे राजकारण होते, ते संपुष्टात आले. माहिती व इंटरनेटवर मोठे नियंत्रण आले. अंतर्गत व्यवहारात विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे धोरण अस्तित्वात आले. चीनचे परराष्ट्र धोरण अधिक आक्रमक आणि महत्त्वाकांक्षी झाले. लष्करी सामर्थ्यात मोठी वाढ झाली. जगाचे नेतृत्व करण्याची चीनची प्रबळ इच्छा दिसून आली. सत्तेत आल्यानंतर क्षी जिनपिंग यांच्यातील हा बदल त्यांच्यातील वैयक्तिक महत्वाकांक्षेतून आला, की चीनमधील गुंतागुंतीच्या राजकारणामुळे आला, हे कळणार नाही. मात्र हे खरे की, 2013 पासून क्षी जिनपिंग यांनी सर्वांना धक्का देत व त्यांच्याबद्दलचे आडाखे चुकीचे ठरवीत चीनचा गेल्या तीस वर्षांत होणारा प्रवास उलट्या दिशेने सुरु केला.

क्षी जिनपिंग यांचे नावही 1997 पर्यंत कोणी ऐकले नव्हते. त्या वर्षामध्ये पक्षाच्या केंद्रीय समितीमध्ये जे 150 प्रतिनिधी (अल्टरनेट मेंबर) निवडले जात, त्यात सुरुवातीला त्यांचे नावच नव्हते. पक्षाचे सरसचिव जियांग झेमिन यांनी पडद्यामागे हालचाली करून त्यांना मदतीचा हात दिला आणि एक खास बाब म्हणून 151 वे प्रतिनिधी म्हणून ते कसेबसे निवडून आले! मात्र पुढे क्षी जिनपिंग यांना नशिबानेही चांगली साथ दिली आणि 2013 मध्ये ते चीनचे सर्वोच्च नेते झाले. बऱ्याच वर्षांनंतर कम्युनिस्ट पक्षाला सामान्य माणसाप्रति असलेल्या नैतिक उत्तरदायित्वाची आठवण करून देणारा नेता मिळाला, असे म्हटले जाते. माओ यांची जाज्वल्य पक्षनिष्ठा आणि डेंग यांचा सुधारणावाद यांचा मिलाफ त्यांच्यात पाहावयास मिळतो. क्षी यांना भ्रष्टाचाराबद्दल चीड आहे, असेही सांगितले जाते. त्यांनी चीनमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाची जोरदार मोहीम सुरू केली आणि ही मोहीम त्यांच्या राजकीय भूमिकेचा एक अविभाज्य भाग झाला आहे. क्षी यांची धोरणे, भूमिका व मोहिमा या साऱ्याच अतिशय महत्त्वाकांक्षी असून चीन भविष्यकाळात जगात फार मोठी भूमिका बजावणार आहे याचा ते सातत्याने उल्लेख करीत असतात.

आधुनिक चीनची मोठी महत्त्वाकांक्षी स्वप्ने पाहणारे व ती साकार करण्याची तयारी करणारे क्षी जिनपिंग हे जोमदार नेतृत्व असून चीनची पुढील वाटचाल समजून घेण्यासाठी त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची भूमिका व धोरणे अभ्यासणे आवश्यक आहे. भविष्यातील चीनबद्दल एक भव्य स्वप्न व महत्त्वाकांक्षी व्हिजन त्यांनी उरी बाळगले आहे. चीनमधील राजकारण, समाजकारण, आर्थिक धोरणे आणि चीनचे जगातील वाढते प्राबल्य या साऱ्यांवर क्षी जिनपिंग यांचा वैयक्तिक प्रभाव इतका मोठा आहे की, त्यांच्या कालखंडाला क्षी जिनपिंग पर्व असे म्हणणे योग्य ठरेल.

क्षी जिनपिंग यांचा जन्म 1 जून 1953 रोजी बीजिंगमध्ये झाला. ते लहानपणापासूनच प्रभावशाली राजकीय कुटुंबात वाढले. त्यांचे वडील क्षी झाँगशन हे कम्युनिस्ट क्रांतीच्या रणधुमाळीत पीपल्स लिबरेशन आर्मीचे वरिष्ठ अधिकारी होते. क्रांतिकाळात व नंतरही ते माओंचे निकटचे सहकारी होते. विशेष म्हणजे माओ नंतर ते डेंग झिओपेंग यांचेही निकटचे सहकारी होते. जपानने 1940 मध्ये चीनवर स्वारी केली तेव्हा आणि कुओमिंगटांगबरोबरच्या यादवी युद्धातही त्यांनी पीएलएतर्फे उत्तम कामगिरी बजावली होती. तत्पूर्वी 1934 मध्ये कम्युनिस्टांचा माघार घेणारा लाँग मार्च यानान येथे स्थिरावला होता. तेथील सोव्हिएत हे कम्युनिस्टांचा व माओंचा महत्त्वाचा तळ झाला. त्याचे संरक्षण लाल सेना करीत असे. त्या निमित्ताने ते माओंच्या नजीक आले.

क्षी हे त्यांच्या आईवडिलांचे तिसरे अपत्य. दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ अशा चार भावंडांमध्ये ते वाढले. साम्यवादी क्रांतीनंतरच्या राजवटीत त्यांचे वडील कम्युनिस्ट पक्षात प्रचार विभागात उच्चपदावर काम करीत. त्यांची आई बीजिंगमधील पक्षाच्या मार्क्सिझम-लेनिनिझम संस्थेत प्रचाराचे काम करीत असे. साम्यवादी क्रांतीच्या अग्रभागी असलेल्या बड्या नेत्यांचे वास्तव्य बीजिंगमधील झाँगनहाइ या भागात असे. येथेच क्षी जिनपिंग यांचे कुटुंब राहत असे. बडया कम्युनिस्ट नेत्याची मुले बीजिंगमध्ये ज्या शाळेमध्ये जात, त्याच शाळेमध्ये त्यांचे शिक्षण झाले. चीनचे अध्यक्ष लिऊ शाओकी, वित्तमंत्री चेन युन आणि बो यिबो आदी बड्या नेत्यांची मुले त्यांच्या वर्गामध्ये शिकत होती.

क्षी यांचे बालपण तसे सुखदायी आणि आनंदी होते. मात्र लहानपणी वडिलांच्या हातून नकळत झालेल्या किरकोळ चुकीमुळे क्षी त्यांच्या आयुष्यातला आनंद संपुष्टात आला. या चुकीची शिक्षा वडिलांना झालीच; परंतु त्याची किंमत क्षी जिनपिंग यांनाही तरुणपणी चुकवावी लागली. 1956 मध्ये क्षी झाँगशन कम्युनिस्ट पक्षाच्या प्रचार विभागात काम करीत असताना त्यांनी चीनमधील जुने क्रांतिकारी नेते लिऊ झिनडाँग यांच्या जीवनावरील एका कादंबरीच्या प्रकाशनाला परवानगी दिली होती. त्यासाठी आवश्यक असलेले सारे सोपस्कार त्यांनी पूर्ण केले. मात्र त्यांच्या दुर्दैवाने त्या कादंबरीमध्ये गाओ गांग यांचा एक ओझरता उल्लेख आला होता. गाओ गांग हे क्रांतिकाळात व त्यानंतर माओ यांचे जवळचे सहकारी होते. बीजिंगमध्ये नियोजन आयोगाच्या प्रमुखपदी 1952 मध्ये असताना त्यांनी झाऊ एनलाय आणि लिऊ शाओकी अशा वरिष्ठ नेत्यांना शह देत स्वतःचे बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला, असा त्यांच्यावर आरोप झाला. पुढे 1954 मध्ये देशद्रोह आणि पक्षाच्या विरोधात कारवाया करण्याच्या आरोपावरून त्यांना देहांताची शिक्षा दिली गेली. त्या काळात त्यांचे नाव घेणे गुन्हा मानला जात असे. क्रांतिकाळात यानान येथील तळावर पीपल्स लिबरेशन आर्मीत गाओ गांग हे क्षी झाँगशन यांचे सहकारी व मित्र होते. त्यामुळे हे प्रकरण फारच गंभीरपणे घेतले गेले.

आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढण्यासाठी माओ त्यांचे सुरक्षाप्रमुख व गुप्तहेर संघटनेचे प्रमुख कांग शेंग यांच्यावर विसंबून असत. कांग शेंग हे अतिशय निर्दयी व पाताळयंत्री होते. माओ यांना होणारा विरोध मोडून काढणे, गुप्तहेर खात्यातर्फे विरोधकांवर नजर ठेवणे व वेळ आल्यास त्यांना संपवणे- यात कांग शेंग यांचा हातखंडा होता. हे प्रकरण कांग शेंग यांच्या हातात आल्यानंतर त्यांनी क्षी झाँगशन यांचे जीवन अशक्य करून टाकले. त्यांना बडतर्फ करण्यात आले. कांग शेंग यांना झींना अधिक कठोर शिक्षा द्यावयाची होती. परंतु ते माओंचे एके काळी जवळचे सहकारी असल्याने माओनी केवळ बडतर्फीवर भागविले. मात्र ते राजकीय आयुष्यातून पूर्णपणे उठले. त्याचा परिणाम अर्थातच क्षी जिनपिंग यांच्यावर झाला. त्यांचे बालपणच जणू संपुष्टात आले.

माओ यांनी सांस्कृतिक क्रांतीची सुरुवात 1966 मध्ये केली. सांस्कृतिक क्रांतीचे खरे उद्दिष्ट विरोधकांचा बीमोड करणे हेच होते. त्यामुळेच पुढे 1966 मध्ये सांस्कृतिक क्रांतीदरम्यान क्षी झाँगशन यांच्या विरोधातील गाओ गांगचा गौरवपूर्ण उल्लेख केल्याचे प्रकरण उकरून काढण्यात आले. त्याच वेळी उत्तर-पूर्व चीनमध्ये पक्षाच्या विरोधातील एक कटही उघडकीला आला होता. त्यात क्षी झाँगशन यांचा सहभाग होता असा आरोप करण्यात आला. सांस्कृतिक क्रांतीच्या काळात आरोप करणे, जुनी प्रकरणे उकरून काढणे आणि आरोपांचा धुरळा उडवून देणे हे नित्याचे असे. असे केले म्हणजे रेड गाड्‌र्सना आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या नेत्याला छळण्याची संधी मिळत असे. मात्र याही वेळेला क्षी झाँगशन यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागले नाही. त्यांची रवानगी उत्तर चीनमध्ये झाली आणि तिथे माओंच्या विचारांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना विजनवासात पाठविण्यात आले.

तीन वर्षांनी 1969 मध्ये 16 वर्षांच्या क्षी जिनपिंग यांनाही सांस्कृतिक क्रांतीच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून बीजिंगसारख्या मोठ्या शहरातील वास्तव्याचा त्याग करून चीनच्या ग्रामीण भागात जावे लागले. तिथे ते पाच वर्षांहून अधिक काळ राहिले. तरुणपणी ग्रामीण भागात राहून अनेक वर्षे खडतर आयुष्य जगावे लागलेले क्षी जिनपिंग काही एकमेव तरुण नेते नव्हते. सन 1966 ते 1974 या सांस्कृतिक क्रांतीदरम्यान शहरी भागातील 1.7 कोटीहून अधिक हुषार व होतकरू तरुणांना या कार्यक्रमाचा भाग म्हणून ग्रामीण भागात पाठविण्यात आले. ग्रामीण भागातील तुलनेने अशिक्षित लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, प्राथमिक आरोग्यसुविधा देण्यासाठी आणि प्रामुख्याने कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करण्यासाठी शहरी भागातील अशा तरुणांना ग्रामीण भागात पाठविले जात असे. शेती व इतर पूरक उद्योगांचे प्रशिक्षण देण्यासाठी व स्वयंसेवक म्हणून अशा तरुण मुलांचा/विद्यार्थ्याचा उपयोग पक्षाने करून घेतला. साम्यवादी क्रांतीला अधिक ऊर्जा मिळावी, यासाठी माओंनी ही व्यवस्था केली होती. 1960 च्या दशकात 75 टक्क्यांहून अधिक लोक ग्रामीण भागात राहत होते आणि प्रामुख्याने शेती व इतर पूरक उद्योगांवर ते अवलंबून होते. ग्रामीण भागाचे आणि शेतीचे उदात्तीकरण हा माओंच्या विचारांचा, व्यूहनीतीचा एक महत्त्वाचा भाग होता. सांकृतिक क्रांती दरम्यान हे वास्तव क्षी यांनी अनुभवले.

सांस्कृतिक क्रांती प्रतिगामी शक्तींच्या विरोधातील एक मोठे युद्ध आहे, असे माओ म्हणत. ग्रामीण भागात पाठविण्यात येणारे शहरी भागातील तरुण या युद्धातील सैनिक होते; तसेच ते ह्या युद्धाचे बळीही होते. अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील लोक, शेतकरी व पक्षाचे कार्यकर्ते या तरुणांना बराच त्रास देत. कारण या तरुणांमुळे स्थानिक व्यवस्था ढवळून निघे, तसेच स्थानिक हितसंबंधांना बाधाही येत असे. क्षी जिनपिंग यांच्याप्रमाणेच त्यांच्या पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीतील ली केचियांग, वँग किशान आणि इतर सहकाऱ्यांनाही सांस्कृतिक क्रांतीदरम्यान तरुणपणी ग्रामीण भागात काम करण्यासाठी जावे लागले होते. इतर अनेक तरुण विद्यार्थ्यांप्रमाणेच क्षी जिनपिंग यांच्या वाट्याला खडतर व एकाकी आयुष्य आले. मात्र याचा फायदा त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात- विशेषतः त्यांच्या राजकीय कारकिर्दीत- खूप झाला. चीनमधील ग्रामीण भागातील आयुष्य, तेथील लोकांचे रोजचे जगण्याचे प्रश्न, ग्रामीण-शहरी भागातील विषमता, गावपातळीपासून कम्युनिस्ट पक्ष संघटनेचे स्वरूप इत्यादी अनेक बाबींचे त्यांना या काळात आकलन झाले.

क्षी जिनपिंग यांना उत्तर चीनमधील शांझी येथे ग्रामीण भागात काम करण्यासाठी 1969 मध्ये पाठविण्यात आले. या प्रांताचे चीनमध्ये विशेष महत्त्व आहे. हा प्रांत 1930 च्या दशकात चीनमधील कम्युनिस्ट चळवळीचे महत्त्वाचे केंद्र झाला होता. कुओमिंगटांगशी 1935 मध्ये लढता-लढता यशस्वी माघार घेणारा लाँग मार्च शांझी प्रांतात स्थिरावला. माओंनी कम्युनिस्टांचे पहिले सोव्हिएत येथे स्थापन केले होते. तेथील पिवळी माती ही चीनच्या क्रांतीचे व चिनी अस्मितेचे एक प्रतीक झाली. क्षी यांच्या लिखाणात व भाषणात पिवळी माती हा उल्लेख अनेकदा येतो.  या पिवळ्या मातीत तरुणपणी काम करता-करता क्षी त्यांची नाळ सामान्य चिनी माणसाशी जोडली गेली असा क्षी यांचा दावा आहे. पिवळ्या मातीशी जोडलेल्या नात्याची क्षी जिनपिंग अनेकदा आठवण काढतात आणि (राजकीय प्रतिमा-संवर्धनाचा व प्रसिद्धीचा भाग म्हणून) या प्रतीकांमधून थेट कम्युनिस्ट क्रांतिकारी परंपरेशी संबंध जोडतात.

शांझी प्रांतातील यांचुआन जिल्ह्यातील लियांगझे या छोट्या खेड्यात क्षी जिनपिंग यांची रवानगी झाली होती. ते या खेड्यात आणि आजूबाजूच्या परिसरात 1969 ते 1973 अशी पाच वर्षे राहिले. तिथे ते अनेक प्रकारची छोटी मोठी कामे करीत. त्या खेड्यातील कम्युनमधील ट्रॅक्टर व इतर शेतीची अवजारे दुरुस्त करणाऱ्या वर्कशॉपमध्ये ते मेकॅनिक म्हणून काम करीत. अनेक मैल चालत जाऊन रात्री-अपरात्री आजारी असलेल्या लोकांना मदत करणारे मदतनीस, बेअर फूट डॉक्टर म्हणूनही त्यांनी काम केले. शाळेत शिकविण्यापासून ते शेतात खडतर काम करण्यापर्यंत सर्व प्रकारची कामे ते मनापासून आणि कर्तव्यभावनेने करीत असत. या काळात मनापासून केलेल्या कामांमुळे त्या खेड्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक त्यांना चांगले ओळखीत. तरुणपणी अशा प्रकारची समाजोपयोगी कामे केल्यामुळे ते वास्तववादी व प्रॅक्टिकल राहिले.

उंच आणि उत्तम शरीरयष्टी लाभलेले क्षी जिनपिंग यांना तरुणपणापासून वाचनाची आवड होती. आजही त्यांच्या भाषणातून त्यांनी वाचलेल्या अनेक पुस्तकांचे संदर्भ येत राहतात. जगभरातील अनेक देशांतील महत्त्वाच्या लेखकांशी व त्यांच्या लिखाणाशी ते परिचित असावेत, असे त्यांच्या भाषणांवरून दिसते. अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ‘दी ओल्ड मॅन अँड दी सी’पासून ते डोस्टोवस्की, पुश्किन, टॉलस्टॉय व व्हिक्टर ह्युगोच्या कादंबऱ्या आणि शेक्सपिअरच्या नाटकांपर्यंत त्यांनी बरेच काही वाचले आहे, असे त्यांच्याबद्दल सांगितले जाते. जुने चिनी साहित्य व क्लासिक्स यांचाही त्यांचा अभ्यास आहे. माओंप्रमाणेच क्षी यांच्याही लिखाणात चिनी अभिजात साहित्याचे संदर्भ येतात. तरुणपणी लिआंगझे येथे असताना क्षी बरेच वाचन करीत असत. या काळातील त्यांच्या पुस्तकप्रेमाची एक कथा सांगितली जाते. एकदा गटेचे ‘फाउस्ट’ मिळविण्यासाठी ते 15 किलोमीटर चालत गेले आणि वाचून झाल्यावर ते पुस्तक परत करण्यासाठी त्यांनी परत 15 किलोमीटरची पायपीट केली.

सांस्कृतिक क्रांतीची झळ 1972 नंतर कमी झाल्यावर क्षी जिनपिंग बीजिंगला परतले आणि तेथील बीजिंगमधील शिंगहुआ विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण करू लागले. त्यांनी ग्रामीण भागातील कम्युनिस्ट पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता व वर्कर्स ब्रिगेडचा स्कॉलर म्हणून केमिकल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी 1974 मध्ये नाव नोंदवले. याच वेळी त्यांना चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची उमेदवारीही मिळाली. खेडेगावातील लोकांसाठी काम करण्याचा अनुभव प्राप्त झाल्याने त्यांच्यात तरुणपणीच परिपक्वता आली होती.

या काळात क्षी जिनपिंग यांचे वडील क्षी झाँगशन 1976 मध्ये बीजिंगला परतले. डेंग यांनी त्यांना 1978 मध्ये ग्वाँगडाँग प्रांताच्या पक्षाच्या दुय्यम सचिवपदावर नेमले. आधुनिक चीनच्या आर्थिक विकासात ग्वाँगडाँग प्रांतातील आर्थिक विकासाला मोठे महत्त्व आहे. तिथे भांडवलशाही पद्धतीने झालेला विकास, परदेशातून झालेली गुंतवणूक, उत्तम पायाभूत सुविधा व आधुनिक शहरे या साऱ्यात मोठी नवलाई होती. येथील आर्थिक विकासाच्या अनुभवावरून चीनमधील लोकांना बरेच काही शिकायला मिळाले. विशेष म्हणजे, क्षी झाँगशन यांनी हा बदल घडवून आणण्यासाठी बरेच कष्ट घेतले. डेंग झिओपेंग यांनी नुसतेच आर्थिक विकासाला प्राधान्य दिले नाही, तर काही बाबतींत प्रांतिक सरकारांना स्वातंत्र्य दिले होते. क्षी झाँगशनसारख्या सहकाऱ्यांनी डेंग यांच्या धोरणांची यशस्वी अंमलबजावणी केली. या कालावधीत सुधारणावादी डेंग व पुराणमतवादी जहाल कमुनिस्ट नेते यांच्यात सातत्याने तणाव असे. अशा वेळी क्षी झाँगशनसारखे सुधारणावादी नेते डेंग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. 1980 मध्ये क्षी झाँगशन ग्वाँगडाँगमध्ये पक्षाचे प्रथम सचिव झाले. स्पेशल इकॉनॉमिक झोनची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरविण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

चीनमधील अर्थव्यवस्था 1978 मध्ये खुली होत असताना क्षी जिनपिंग यांनी शिंगहुआ विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमधील पदवी घेतली. त्या काळी चीनमधील क्रांतीत सहभाग असलेल्या वरिष्ठ राजकारणी नेत्यांची मुले राजकारणात येण्यासाठी एखाद्या प्रशासकीय सेवेत जात असत. त्याप्रमाणे क्षी जिनपिंग जनरल गेंग बिआओ या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचे तरुण सहाय्यक म्हणून नोकरीत रुजू झाले. चीनमधील लष्कराची सर्वोच्च संस्था म्हणजे सेन्ट्रल मिलिटरी कमिशन. जनरल गेंग बिआओ हे सीएमसीचे वरिष्ठ सदस्य होते. त्यांचे सहायक म्हणून क्षी जिनपिंग सेवेत हजर झाले. गेंग बिआओ यांना तांत्रिक सहकार्य व तंत्रज्ञान करार करण्यासाठी अमेरिकेत दौरा करावयाचा होता. या दौऱ्याची सारी तयारी क्षी जिनपिंग यांनी केली. अमेरिकेच्या दौऱ्याहून परत आल्यानंतर मात्र हाँगकाँग प्रश्नावरून डेंग झिओपेंग आणि जनरल गेंग बिआओ यांच्यात महत्त्वाच्या विषयावर मतभेद निर्माण झाले. आर्थिक विकासाचा ध्यास घेतलेले डेंग यांनी सैन्यदलाचा आकार कमी करण्यास प्राधान्य दिले होते. अनेक अधिकारी व सैनिकांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचे नियोजन सुरू झाले. त्यामुळे सैन्यातील अनेकांचा डेंग यांना छुपा विरोध होताच. अशा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जनरल गेंग बिआओ यांच्याबरोबर काम करण्यात क्षी जिनपिंग यांचा कोणताही फायदा होणार नव्हता. नव्या सरकारपुढील आव्हाने प्रामुख्याने आर्थिक विकास, आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण, शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, ग्रामीण विकास या क्षेत्रांत होती. राजकारणातील करिअरचा मार्गही या क्षेत्रांतून जात असल्याने गेंग बिआओ यांनी क्षी जिनपिंग यांना उज्ज्वल भवितव्यासाठी सीएमसीमधून इतरत्र जाण्याचा सल्ला दिला.

क्षी जिनपिंग यांनी राजकारण व प्रशासन यात करिअर करण्याच्या दृष्टीने प्रांतिक सरकारात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. ते बीजिंग सोडून हेबे प्रांतातील झेंगडिंग या छोट्या गावात प्रशासकीय अधिकारी या पदावर 1983 मध्ये काम करू लागले. शक्यतो 1980 च्या दशकात डेंग यांनी आर्थिक विकासाबरोबरच कायदेविषयक सुधारणा करण्याचे व त्यासाठी काही मूलभूत बदल करण्याचे मनावर घेतले होते. 1986 ची राज्यघटना लागू झाल्यावर ग्रामीण भागात/गावांत निवडणुका सुरू झाल्या. ग्रामीण भागातील कम्युन्स 1981/82 मध्ये रद्द करून त्याभोवतीच्या शेती व्यवस्थापनात आमूलाग्र बदल केले गेले. त्यामुळे ग्रामीण स्तरावरील राज्यव्यवस्थेत मोठे संरचनात्मक बदल झाले. ग्रामीण भागातील आर्थिक विकास व येऊ घातलेल्या राजकीय/आर्थिक सुधारणा लक्षात घेता, 1980 च्या दशकात तेथील प्रशासनाचा अनुभव घेऊन सत्ता राजकारणात प्रवेश करणे सुकर होणार होते.

ग्रामीण भागात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणे मोठे आव्हान होते. सरकारचे अप्रिय कार्यक्रम-कुटुंबनियोजन, एकच मूल कार्यक्रम, स्थानिक करसंकलन, इत्यादींना राबवावे लागत. स्थानिक पातळीवरील राजकारण गुंतागुंतीचे असे. अनेक स्थानिक अधिकारी भ्रष्ट आणि क्रूर होते. त्यांना मोठे स्थानिक अधिकारही असत. या काळात क्षी जिनपिंग यांचे जीवन प्रशासकीय दृष्टीने खडतर होतेच. शिवाय वैयक्तिक/खासगी जीवनही दुःखी व तणावपूर्ण झाले होते. बीजिंगमध्ये असतानाच त्यांचे लग्न हाँगकाँग प्रश्नांवर काम करणाऱ्या बड्या राजनैतिक अधिकाऱ्याच्या मुलीशी झाले होते. हे अधिकारी इंग्लंडमधील चीनच्या दूतावासात कार्यरत होते; मात्र विवाहानंतर क्षी यांची पत्नीही इंग्लंडमध्ये आई-वडिलांकडे राहावयास गेली. हे लग्न यथावकाश मोडले, कारण त्यांची पत्नी चीनमध्ये परत येण्यास राजी नव्हती आणि क्षी जिनपिंग परदेशी जाण्यात तयार नव्हते. बीजिंगसारखे मोठे शहर सोडून हेबे प्रांतातील ग्रामीण भागात सरकारी नोकरी पत्करल्यावर तर हे लग्न टिकणे शक्यच नव्हते. त्यामुळे लग्नानंतर काही दिवसांतच त्यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले. त्यांची पत्नी अनेक वर्षे इंग्लंडमध्ये राहिली व नंतर हाँगकाँगमध्ये राहण्यास गेली. चीन हा देश कुटुंबव्यवस्थेबाबत परंपरावादी व कॉन्झरव्हेटिव्ह असला, तरी त्यांचे तीनही महत्त्वाचे नेते (माओ, डेंग व क्षी जिनपिंग) घटस्फोटित होते.

क्षी जिनपिंग यांनी सांस्कृतिक क्रांतीदरम्यान शांझी प्रांतातील लिआंगझे गावात काम केले होते. असेच काम त्यांनी आता हेबे प्रांतातील झेंगडिंग येथे करण्यात सुरुवात केली. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना ते परके वाटत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याबद्दल असूया वाटत असे. क्षी यांचे वडील जुन्या क्रांतिकारी नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते होते. त्यामुळे क्षी हे आपल्यावर उगीचच वरून लादले गेले आहेत, असे त्यांना वाटे. 

असे असले, तरी क्षी यांच्या वडिलांनी ग्वाँगडाँग प्रांतात मोठा आर्थिक विकास घडवून आणला होता. शिवाय क्षी झाँगशन हे राजकीय वर्तुळात मवाळ, सभ्य व सज्जन गृहस्थ समजले जात. त्याचा अप्रत्यक्ष फायदा क्षी यांना पुढे त्यांच्या राजकीय करिअरमध्ये निश्चितच झाला. सत्तावर्तुळात त्यांचा वावर सुकर झाला. हेबे प्रांतातून क्षी जिनपिंग यांची रवानगी 1985 मध्ये दक्षिण पूर्व भागातील फुजियान प्रांतात झाली आणि येथे त्यांच्या कर्तृत्वाला बहार आला. (क्रमश:)

(पुढील अंकात : क्षी जिनपिंग यांची  राजकीय जडणघडण)

Tags: शी जिनपिंग चिनी महासत्तेचा उदय चीन साधना सदर सतीश बागल chi jinping sadar sadhana series sadhana sadar chini mahasattecha uday china dr satish bagal satish bagal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात