डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

चीनमध्ये 1978 पासून सुधारणावादी नेत्यांकडे सत्ता असली तरीही पक्षात माओवादी व डावे यांचे महत्त्वपूर्ण अस्तित्व आहे. हा गट आर्थिक धोरणांच्या मुद्यांवर सैद्धांतिक भूमिका घेतो. जेव्हा जेव्हा चीनचे आर्थिक वा इतर सामाजिक-राजकीय प्रश्न जिकीरीचे होतात, त्या वेळी हे माओवादी आणि डावे सक्रिय होतात. डेंग, जियांग झेमिन व हु जिंताव यांनी त्यांच्या कालावधीत त्यांना नियंत्रणात ठेवून सुधारणावादी, कॉन्झर्व्हेटिव्ह व डावे यांच्यात संतुलन साधले होते. पुढे 2007-08 नंतर डाव्यांचा प्रभाव थोडा वाढला. क्षी सातत्याने पक्षाला त्याची सामान्य माणसाप्रति असलेल्या नैतिक जबाबदारीची जाणीव करून देतात. त्यामुळे हा डावा माओवादी गटही क्षी यांना या मुद्यांवर मर्यादित समर्थन देतो.

 

बीजिंगसारखे मोठे शहर सोडून क्षी जिनपिंग हेबे प्रांतातील ग्रामीण भागात प्रशासकीय अधिकारी म्हणून आले. त्याबद्दलची माहिती गेल्या लेखात आली आहे. उच्चपदस्थ वडिलांमुळे ते आपल्यावर लादले गेले आहेत, असे तेथील स्थानिक नेत्यांना वाटल्याने त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात तणावपूर्ण होती. मात्र 1985 मध्ये त्यांची नेमणूक दक्षिण-पूर्वेतील व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या फुजियान प्रांतात झाली आणि या ठिकाणी क्षी जिनपिंग यांच्या प्रशासकीय करिअरला बहर आला. क्षी जिनपिंग यांची फुजियान प्रांतातील कामगिरी अव्वल दर्जाची होती. त्यांच्या भावी राजकीय वाटचालीत तिचा त्यांना फायदा झाला. फुजियान प्रांताला मोठी किनारपट्टी लाभली असून, त्या समोरच तैवान बेट असल्याने फुजियान व तैवान यांच्यात फार पूर्वीपासून सागरी व्यापार चालत असे. शिवाय तैवान येथून दक्षिण आणि पूर्व चिनी समुद्रातून इंडोनेशियापर्यंत पूर्वापार व्यापार चालत आला आहे. त्यामुळे चीनबाहेरील देशांमध्ये चिनी व्यापारी वर्गात फुजियानमधील लोकांचे प्रमाण मोठे आहे. या पार्श्वभूमीमुळे 1980 मध्ये डेंग झिओपेंग यांनी अर्थव्यवस्था खुली केली, तेव्हा फुजियान प्रांतात एक स्पेशल इकॉनॉमिक झोन निर्माण केला.

 

क्षी जिनपिंग फुजियानमधील झियामेन या गावी काम करीत. कामाचे स्वरूप विकासात्मक व आर्थिक सुधारणांशी संबंधित असल्याने क्षी यांना नवे कार्यक्षेत्रच गवसले. याचा पुरेपूर फायदा उचलीत त्यांनी तैवानहून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याचे काम केले. फुजियानमध्ये त्यांना पक्षाचे ज्येष्ठ नेते क्षी यांग नान यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. बीजिंगमध्ये अर्थव्यवस्था खुली व गतिमान करण्यासाठी डेंग आवश्यक धोरण आखणी करीत होते, त्या वेळी क्षियांग नान हे फुजियान प्रांतात तर क्षी झाँगशन (क्षी जिनपिंग यांचे वडील) ग्वाँगडाँग प्रांतात त्या धोरणाची अंमलबजावणी करून परदेशातून गुंतवणूक आकर्षित करीत होते. तैवान, जपान व दक्षिण कोरिया येथील गुंतवणूकदारांशी प्रत्यक्ष संबंध आल्याने क्षी जिनपिंग यांना आर्थिक विकासप्रक्रिया, जागतिक अर्थव्यवहार व आंतरराष्ट्रीय व्यापाराची ओळख झाली; तसेच संपत्ती निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा जवळून अभ्यास करता आला.

झियामेन येथे क्षी जिनपिंग चांगलेच रमले. उत्तर चीन व बीजिंगसारख्या प्रगत नागरी भागात राहिल्यानंतर दक्षिणेतील फुजियानमधील झियामेनसारख्या छोट्या गावात राहणे अवघडच होते. मात्र क्षी जिनपिंग यांनी औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले. सरकारने क्षी जिनपिंग यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची नेमणूक फुजियान प्रांतातीलच तुलनेने मागास भागातील निंगडे येथे पक्ष सचिव म्हणून केली. फुजियान प्रांतातील वास्तव्यात क्षी यांच्या खासगी आयुष्यातील रोमान्स मात्र बहरला. येथे त्यांची ओळख पेंग लियून हिच्याशी झाली; पुढे या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. ते 1987 मध्ये दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाले. पेंग लियून चिनी पारंपरिक लोकसंगीतामधील उत्तम गायिका होती. सन 2000 पर्यंत क्षी यांचे नाव फारसे कुणाला ठाऊक नसे. पेंगला मात्र चांगली प्रसिद्धी मिळत असे; आणि पेंग लियून हिचे पती म्हणून क्षी जिनपिंग जास्त ओळखले जात.

बंदिस्त, समाजवादी व्यवस्थेकडून बाजारचलित अर्थव्यवस्थेकडे जात असताना चीनमध्ये भ्रष्टाचार बोकाळला होता. शासकीय जमिनी, इतर साधनसामग्री आणि शासनाच्या मालकीची साधने खासगी उद्योजकांकडे सोपवीत असताना वा सवलती देताना अनेक प्रकरणी अधिकाऱ्यांनी व पक्ष-पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर बरीच माया जमविली. क्षी जिनपिंग यांनी मात्र आर्थिक व प्रशासकीय सुधारणा, औद्योगिकीकरण आणि गरिबांचे राहणीमान उंचावण्यासाठीचे कार्यक्रम या सर्वच क्षेत्रांत चांगली कामगिरी केली. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आजूबाजूला घडत असताना त्यांचे नाव अशा प्रकरणी आले नाही. उलट भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी वैयक्तिक स्तरावर त्यांनी प्रयत्न केल्याचे दिसले. पुढे चीनचे अध्यक्ष व पक्षाचे सरसचिव झाल्यावर भ्रष्टाचार निर्मूलन हा त्यांच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग बनला. त्याची सुरुवात निंगडे येथील त्यांच्या कामापासूनच झाली. मे 1990 मध्ये क्षी जिनपिंग यांना फुजियान प्रांतातील सर्वांत मोठ्या फुझ्हौ शहरात पक्षाचे सचिव म्हणून नेमण्यात आले.

डेंग यांनी 1992 मध्ये दक्षिणेचा दौरा करून शांघाय व दक्षिणेतील इतर राज्यांमध्ये आर्थिक विकासाची हाक दिली. त्यामुळे चीनमध्ये पुन्हा एकदा आर्थिक सुधारणा व उच्चदराच्या विकासाचे पर्व नव्या जोमाने उदयास आले. क्षी यांनी या आर्थिक प्रगतीच्या काळात फुझ्हौ येथील आर्थिक विकासाच्या व औद्योगिकीकरणाच्या कामाला गती दिली. या कामाची पावती म्हणून त्यांची फुजियान प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. राज्यस्तरीय नेत्यांना निवडणूक लढवून पक्षाच्या सेंट्रल कमिटीवर जाता येते. राष्ट्रीय राजकारणात भाग घेण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे असते. मात्र क्षी यांचे नशीब असे की, 1997 मधील नॅशनल काँग्रेसमध्ये 150 जागांच्या निवडणुकीत त्यांचा नंबर लागला नाही. 150 जागा असतानाही ते 151 वे उमेदवार (अल्टरनेट मेंबर) होते. ते केंद्रीय समितीचे सदस्य झाले नसते, तर त्यांना चीनच्या राजकारणात राष्ट्रीय स्तरावर प्रवेशच मिळाला नसता. 150 पदे असणाऱ्या केंद्रीय समितीच्या निवडणुकीत त्यांचा 151 वा नंबर असताना जियांग झेमिन यांनी उच्चस्तरीय हालचाल करीत केंद्रीय समितीची सदस्यसंख्या (अल्टरनेट मेंबर) ऐनवेळी वाढवून 151 केली आणि क्षी जिनपिंग केंद्रीय समितीत कसेबसे दाखल झाले. क्षी यांनी ही किमया जियांग झेमिन यांच्यामार्फत कशी घडवून आणली, हे आजपर्यंत गुलदस्त्यातच राहिले आहे! पुढे 2007 मध्ये जेव्हा हु जिंताव यांच्यानंतरच्या भावी नेत्याच्या निवडीच्या वेळीही जियांग झेमिन हे क्षी जिनपिंग यांच्यामागे उभे राहिले.

झी जिनपिंग हे 2000 मध्ये फुजियान प्रांताचे गव्हर्नर झाले आणि दोन वर्षांनंतर झेजियांग (Zhejiang) प्रांताचे पक्ष सचिव. झेजियांग प्रांतातील हे सर्वोच्च राजकीय पद त्यांच्या सत्ताप्रवासात महत्त्वाचे ठरले. झेजियांग हे चीनमधील फार प्रगत राज्य समजले जात नव्हते. मात्र येथील चिनी लोक व्यापार व धंद्यात फार वाकबगार आहेत. येथील लोकांनी स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीवर जगभर व्यापारी व औद्योगिक साम्राज्ये उभारली आहेत. या प्रांतातील वेन्झ्हौ शहर महत्त्वाचे. येथील विशिष्ट प्रकारे उद्योग व धंदे विकसित करण्याच्या पद्धतीला ‘वेन्झ्हौ मॉडेल’ म्हणतात. वेन्झ्हौमध्ये पायाभूत सुविधा, विज्ञान, तंत्रज्ञानविषयक शिक्षण इत्यादींचा मोठा अभाव 1990 च्या दशकात होता. मात्र तरीही तेथील व्यापारी वर्गाने चीनभर उद्योगधंद्यांचा मागोवा घेत आणि प्रभावी नेटवर्क बांधीत झेजियांगमध्येच नव्हे तर बीजिंग, शांघायपासून दक्षिणेपर्यंत अनेक औद्योगिक केंद्रांमध्ये  परदेशातही उद्योगधंदे प्रस्थापित केले. हे उद्योगधंदे व्यापारी कुटुंबांनी फॅमिली बिझिनेस म्हणून सुरू केले.

कारखानदारी, केमिकल्स, वस्त्रोद्योग, काचसामान अशा धंद्यांत विविध प्रकारे भागीदारी करीत, भांडवल उभे करीत त्यांनी आपले उद्योग इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिका या देशांतही उभारले. प्रथम हॉटेल्स, रेस्टॉरंट, छोटी-मोठी सामानविक्रीची दुकाने उघडायची, मग मोठ्या उद्योगांकडे मोहरा वळवायचा- असे करीत येथील चिनी व्यापाऱ्यांनी जगभर हात-पाय पसरले. इटलीमधील उत्तरेकडे वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असणाऱ्या प्रातो शहरातही चिनी लोकांनी बस्तान बसवून इटलीतील वस्त्रोद्योग अक्षरशः ताब्यात घेतला. अमेरिकेतील न्यूयॉर्क, ऑस्ट्रेलियातील सिडनी, आफ्रिका व मध्य आशियातील अनेक ठिकाणी चिनी लोकांनी विविध उद्योग स्थापन केले. येथील मंडळी उद्यमशील, जोखीम पत्करणारी आणि व्यावसायिक संबंध दृढ करीत व्यवसाय व उद्योगांचे जाळे विणणारी होती. यामुळे साम्यवादी चीनमध्ये 1990 च्या दशकात झेजियांग प्रांताच्या उत्पन्नाचा (SGDP) 70 टक्के हिस्सा खासगी उद्योगधंद्यांतून येत होता.

क्षी जिनपिंग यांना येथे बरेच काही शिकावयास मिळाले. याच काळात चीनने जागतिक व्यापार संघटनेत (WTO) प्रवेश केला होता. त्यासाठी आर्थिक सुधारणा करून चीनने आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढविला. दुसरे म्हणजे, खासगी उद्योजक आणि व्यावसायिकांना चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने दारे उघडली. अनेक उद्योजक पक्षाचे सभासद अथवा पदाधिकारी झाले. त्यामुळे खासगी उद्योगधंद्यांना, उद्योजकांना विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली; उद्योगधंद्यात नवी ऊर्जा खेळू लागली. उद्योगधंद्यांत मोठी गुंतवणूक करणे, अशा गुंतवणुका आकर्षित करण्यासाठी विशेष औद्योगिक केंद्रे स्थापन करणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, नागरीकरण व शहरवाढीचे व्यवस्थापन/ नियमन करणे ही राज्यकर्त्यांपुढील मोठी आव्हाने होती. ही आव्हाने संबंधित नेते व राज्यकर्ते कशी हाताळतात, त्यावर नेत्यांची कामगिरी पाहिली जात असे.

 आशियातील सर्वांत मोठी इंटरनेट स्टार्टअप कंपनी अलिबाबा व पूर्वी इंग्रजीचा शिक्षक असलेला तिचा जनक जॅक मा (मा युन) झेजियांग-मधीलच! याच प्रांतातील गेडी या बड्या खासगी कंपनीच्या उदयालाही क्षी यांचा हातभार लागला आहे. क्षी यांच्या प्रयत्नामुळे मॅकडोनल्ड, मोटोरोला, सिटी बँक अशा तगड्या कंपन्यांनी त्यांच्या शाखा प्रथम झेजियांगमध्ये उघडल्या. तेथील निर्यात दर वर्षी 33 टक्क्यांहून अधिक दराने वाढत होती. याशिवाय येथील 2000 मोठ्या कंपन्यांनी या काळात चीनबाहेरील 116 देशांमध्ये गुंतवणुका करून चीनच्या प्रगतीचा ठसा आंतरराष्ट्रीय व्यापार व अर्थकारणावर उमटविला. क्षी यांनी 2005 मध्ये अमेरिकन लेखक रॉबर्ट लाँरेन्स यांच्याकडून चीनच्या अर्थविकासाबाबत लिखाण करून घेतले आणि अमेरिकेत दर वर्षी झेजियांग वीक साजरा करण्याचा प्रकल्पही साकारला. क्षी जिनपिंग यांनी झेजियांगमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आणि त्याची दाखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली.

क्षी हे झेजियांग प्रांताचे गव्हर्नर असतानाच 2002 मध्ये जियांग झेमिन यांच्या जागी हु जिंताव हे चीनचे अध्यक्ष व पक्षप्रमुख झाले. हु जिंताव यांचे नेतृत्व 10 वर्षांसाठी, 2012 पर्यंत असल्याने त्यांच्या वारसाच्या निवडीची प्रक्रिया अगोदरच- म्हणजे 2007 मध्ये सुरू झाली. त्यासाठीची मोर्चेबंदी 2005 मध्ये सुरू झाली. क्षी जिनपिंग यांनी झेजियांग प्रांताचे गव्हर्नर व पक्ष सचिव म्हणून चांगले काम केले होते. त्यामुळे त्या शर्यतीत क्षी जिनपिंग यांचेही नाव घेतले जाऊ लागले. मात्र 2005 मध्ये क्षी जिनपिंग यांचे नाव शर्यतीत फारसे वर नव्हते. सर्वोच्च नेतृत्वपदासाठी ली केचिआंग, ली युआनचाव व क्षी जिनपिंग ही तीन नावे या क्रमाने घेतली जात. या खालोखाल वँग यांग आणि बो झिलाय ही नावे होती. याशिवाय शांघायचे चेन लिआंग्यू यांचेही नाव घेतले जात असे. मात्र पुढे हळूहळू नेतेपदाच्या शर्यतीत क्षी जिनपिंग यांनी चांगलीच आघाडी घेतली. 


क्षी यांच्या स्पर्धकांमध्ये ली केचिआंग हे हु जिंताव यांच्या निकटचे होते. ते कायद्याचे पदवीधर होते आणि विद्यार्थिदशेतच राजकारणात आले. डेंग यांचे आर्थिक खुलेपणाचे प्रयोग 1978 मध्ये सुरू असताना बीजिंगमधील झिदान वॉल अथवा लोकशाही भिंतीजवळ स्वातंत्र्य व लोकशाहीसाठी निदर्शने होत, त्यात ली केचिआंग भाग घेत असत. शिवाय क्षी जिनपिंग यांच्याप्रमाणे त्यांनाही लायोनिंग आणि हेनान या दोन प्रांतांमध्ये गव्हर्नर व पक्षसचिव म्हणून कामाचा अनुभव होता. या प्रांतामध्ये काम करणे मोठे आव्हान होते. लायोनिंग येथे ते कार्यरत असताना एका नाईट क्लबला लागलेल्या आगीचे प्रकरण खूपच वाढले होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी हे प्रकरण नीट न हाताळल्याने त्यांना त्याचा बराच त्रास झाला. हेनान प्रांतातही त्यांची नेमणूक होण्याआधी एक गंभीर प्रकरण घडले होते. तेथील आरोग्य विभागात रक्तदानातून आलेल्या रक्तामधून HIV ची लागण झाली होती. ही घटना त्यांच्या काळातील नसली, तरी हे प्रकरण दडपून टाकण्याचे बरेच प्रयत्न झाले होते. हे गुंतागुंतीचे व नंतर वाढलेले प्रकरण त्यांना नीट हाताळता आले नाही.

ली युआनचाव हे तुलनेने भरभराटीच्या झिआंग्सू प्रांताचे प्रमुख होते. त्यांनी या प्रांतात बऱ्याच आर्थिक व प्रशासकीय सुधारणा केल्या होत्या. ते प्रयोगशील व तुलनेने खुल्या मनाचे होते. त्यांचे थोडे शिक्षण अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात झाले होते! ली केचियांग यांनी व्यावसायिक कायद्याचा अभ्यास केला होता, ली युआनचाव यांनी इतिहासाचा, तर क्षी जिनपिंग यांनी केमिकल इंजिनिअरिंगचा. या तिघांतला एक समान धागा असा होता की, तिघेही सरकारमधील व पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी संबंधित होते.

सन 1989 मधील तियानमेन प्रकरणानंतर पक्षातील उदारमतवादी आणि मवाळ नेतृत्व जवळजवळ नाहीसे झाले होते. उत्तरोत्तर उग्र राष्ट्रवाद आणि आर्थिक विकास केंद्रभागी येत होता. या वातावरणात 2006 मध्ये क्षी जिनपिंग यांनी झेजियांग प्रांतात व इतरत्र केलेल्या कामामुळे त्यांच्याबद्दलचे मत अनुकूल होऊ लागले, तर ली केचिआंग व ली युआनचाव यांच्या अडचणी वाढू लागल्या. 2006 मध्ये शांघायमध्ये पक्ष सचिव चेन लिआंग्यू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन व इतर फायदे यासाठी जे पेन्शन फंड्‌स असत, त्याचा चेन लिआंग्यू यांनी दुरुपयोग केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यामुळे ते शर्यतीतून बाद झाले. चीनच्या कम्युनिस्ट पक्षात परंपरेने शांघायचे पक्षसचिव पद हे अतिशय प्रतिष्ठेचे समजले जाते. क्षी जिनपिंग 2006 मध्ये तुलनेने कनिष्ठ होते, पॉलिट ब्युरोचे सदस्यही नव्हते, तरीही त्यांना मार्च 2007 मध्ये शांघायच्या पक्षसचिव पदावर नेमण्यात आले. एकंदरीतच पक्षातील वरिष्ठ नेते त्यांना मोठे महत्त्व देत होते. त्यानंतर ते पॉलिट ब्युरोचे सदस्य झाले, 2007 मध्ये ते स्पर्धेत पुढे आले आणि त्यांना पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीचे सदस्य करण्यात आले. क्षी जिनपिंग 2008 मध्ये चीनचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर एका वर्षाने ली केचियांगही पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीचे सदस्य झाले आणि नंतर उपपंतप्रधान. यामुळे क्षी यांच्याकडे हु जिंताव यांच्यानंतरचे संभाव्य नेतृत्व म्हणून पाहिले जाऊ लागले. दरम्यानच्या काळात 2008 नंतर चीनमध्ये पक्षातील डावे गट अधिक सक्रिय होऊ लागले. त्यातील एक महत्त्वाचे नेते बो झिलाय हे बरेच लोकप्रिय होत होते व ते क्षी जिनपिंग यांना शह देऊ शकतील, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र याच वेळी बो झिलाय यांच्या पत्नीवर चीनमधील एका ब्रिटिश व्यावसायिकाची हत्या करण्याच्या कटात सामील असल्याचा आरोप झाला. यामुळे बो झिलाय हे स्पर्धेतून बाद झालेच, पण सार्वजनिक जीवनातूनही हद्दपार झाले. अशा रीतीने क्षी जिनपिंग यांचा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला.

सत्तासंघर्षाच्या या काळात क्षी जिनपिंग यांचे पारडे स्वतःच्या कर्तबगारीमुळे नेहमीच जड राहिले, हे खरे. त्यांच्याबद्दलचे मत चांगले असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, म्हणजे त्यांच्या वडिलांनी- झी झाँगशन यांनी- ग्वांगडाँग प्रांताचा आर्थिक विकास साधण्यात वठवलेली निर्णायक भूमिका. वडिलांच्या उत्तम कामगिरीमुळे क्षी यांचा सत्तावर्तुळातील वावर अधिक सुकर झाला. शिवाय क्षी झाँगशन हे पक्षात अतिशय सभ्य व सज्जन गृहस्थ समजले जात, याचा अप्रत्यक्ष फायदा क्षी यांना त्यांच्या राजकीय करिअरमध्ये निश्चितच झाला.

अनेक नेते व राजकारणी स्वतः भ्रष्टाचार व सत्तेचा दुरुपयोग यांपासून लांब असले तरी त्यांचे कुटुंबीय अशा नेत्यांसाठी अडचणी निर्माण करतात. क्षी हे महत्त्वाकांक्षी राजकारणी असल्याने त्यांनी सावधगिरी बाळगून नातेवाईक आणि जवळचे मित्र यांना जाणीवपूर्वक लांब ठेवले. त्यांच्याबद्दल एक किस्सा असा सांगितला जातो की, त्यांची शांघाय येथे पक्षसचिव म्हणून नेमणूक झाली असताना त्यांनी आपल्या भावाला शांघाय सोडण्यास सांगितले होते. क्षी जिनपिंग हे फुजियान व झेजियांग येथे असताना त्यांची पत्नी पेंग लियून तिच्या व्यवसायानिमित्त बीजिंग येथे असे. त्यांची मुलगी क्षी मिंगझे तिच्या आईबरोबरच असे. एका दृष्टीने ही बाब क्षी यांच्या पथ्यावरच पडली. त्यामुळे भ्रष्टाचार व गैरव्यवहार यांच्यापासून ते मुक्त आहेत, असे चित्र लोकांना दिसले. क्षी यांच्याबाबत त्यांच्या नातेवाइकांनी बराच पैसा मिळविल्याची माहिती नसली, तरी काही प्रकरणांत जी माहिती उघड झाली, त्यानुसार ते व त्यांचे कुटुंबीयही याला अपवाद नाहीत. मात्र तरीही जवळचे स्नेही व नातेवाईक यांना मुद्दाम लांब ठेवून क्षी जिनपिंग यांनी स्वतःसाठी अडचणी निर्माण केल्या नाहीत.

नोव्हेंबर 2012 मध्ये अध्यक्ष हु जिंताव आणि पंतप्रधान वेन जियाबाओ दोघेही त्यांचा कालावधी संपल्यानंतर पायउतार झाले. हु जिंताव यांच्या जागी चीनचे सर्वोच्च नेते म्हणून क्षी जिनपिंग यांची नेमणूक झाली आणि वेन जियाबाओ यांच्या जागी पंतप्रधान म्हणून ली केचियांग यांची नेमणूक झाली. अशा रीतीने चीनमध्ये सत्ताबदल होऊन नेतृत्वाची पाचवी पिढी सत्तेवर आली. चीनमध्ये लोकशाही नाही, हे खरे; मात्र शांततापूर्ण मार्गाने आणि सहमतीने सत्ताबदल होतो, हे सर्वांनी पहिले.

चीनच्या सर्वोच्च नेतेपदाचे क्षी जिनपिंग हे नैसर्गिक दावेदार समजले जात, याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचे प्रभावी तत्त्वज्ञान. चीनच्या व कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी सम्यक्‌ आहे. 1949 ते 2012 पर्यंतचा अंदाजे 60-62 वर्षांचा हा काळ असून त्यात 1978 पूर्वीचा चीन व 1978 नंतरचा चीन असे 30/30 वर्षांचे दोन महत्त्वाचे कालखंड येतात. माओंच्या 1978 पूर्वीच्या काळात पक्षाचे प्रमुख तत्त्वज्ञान मार्क्स--लेनिन-माओ यांचे तत्त्वज्ञान होते. त्यात सामाजिक क्षेत्रांत वर्गकलह, राजकीय क्षेत्रात प्रोलेटरिएटची वा कामगार-वर्गाची सत्ता आणि आर्थिक व्यवस्थेत प्रामुख्याने सरकारची मालकी अशी तीन मूलभूत तत्त्वे होती. 1978 ते 2012 पर्यंतच्या 30 वर्षांच्या कालखंडात आर्थिक विकास, बाजारप्रणीत भांडवलशाहीचा स्वीकार व त्या मार्गाने संपत्ती निर्मिती, थोड्याफार प्रमाणात खासगी मालकी तत्त्व व आंतरराष्ट्रीय व्यापार ही मूलभूत तत्त्वे होती. वर्गकलहाचे तत्त्वज्ञान तर चक्क बासनात गुंडाळून ठेवले गेले होते!

चीनचे 1978 पूर्वीचे व्हिजन व तत्त्वज्ञान आणि 1978 नंतरचे राजकीय/आर्थिक तत्त्वज्ञान परस्परांना छेद देणारे होते. विशेषतः 1978 नंतर आंतरराष्ट्रीय व्यापारसंघटनेत (WTO) प्रवेश केल्यानंतर, चीनने भांडवलशाहीकडे वेगाने आगेकूच केली. समाजात निर्माण होणारी असमानता, वाढता भ्रष्टाचार, पक्षाचे तत्त्वज्ञान व प्रत्यक्ष वाटचाल यातील विरोधाभास यामुळे पक्षाचे नैतिक अधिष्ठान नाहीसे होऊ लागले. कम्युनिस्ट पक्ष लोकांपासून दूर गेला. पक्षनेते पक्षाकडे संपत्ती मिळविण्याचे साधन म्हणून पाहू लागले. या परिस्थितीत पक्षाची लोकांप्रति असणारी जबाबदारी व पक्षाची नैतिकता अधोरेखित करण्याची गरज होती. पक्षाचे लोकांप्रति असणारे उत्तरदायित्व हे पक्षाच्या अस्तित्वाचे मूळ कारण आहे, याची आठवण करून देणे महत्त्वाचे होते. 1978 पूर्वीचे राजकीय तत्त्वज्ञान व अर्थकारण आणि 1978 नंतरचे अर्थकारण यांच्यात सांगड घालण्याचीही गरज होती. अशी (सैद्धांतिक) सांगड घालणे डेंग, जियांग झेमिन व हु जिंताव यांना जमले नाही. कारण त्यात खरोखर परस्परविरोध होता. क्षी जिनपिंग यांचे वैशिष्ट्य हे की, त्यांनी 1978 पूर्वीची पक्षाची भूमिका व 1978 नंतरची भूमिका या दोन्ही एका सूत्रात बांधता येईल, असे सूत्र त्यांच्या विचारातून देण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही कालखंडांत व त्यांतील भूमिकांमध्ये त्यांना विसंगती दिसत नाही. त्यांच्यामते, दोन्ही भूमिका परस्परांना पूरक होत्या व चीनच्या प्रगतीसाठी आवश्यक होत्या.

क्षी जिनपिंग हे डेंग, जियांग झेमिन व हु जिंताव यांच्याप्रमाणे व्यवहारी आहेत. आर्थिक सुधारणा कराव्यात, उत्पादकता वाढवावी; आधुनिकीकरण, विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या साह्याने संपत्ती निर्मिती करावी, या विचारांचे ते होतेच. याशिवाय पक्षाची लोकांप्रति असणारी जबाबदारी व त्यातून येणारी नैतिकता पक्षाच्या अस्तित्वाचे मूळ कारण आहे, हेही ते मानतात. 1978 पूर्वीच्या कालखंडात अभिप्रेत असणारी सामाजिक, आर्थिक व राजकीय भूमिका आणि त्यातून प्रतीत होणारी पक्षाची बांधिलकी/नैतिकता; तसेच 1978 नंतरच्या कालखंडात अभिप्रेत असलेला व्यवहारवाद- ही दोन्ही तत्त्वे क्षी यांना एका सूत्रात गुंफायची आहेत. एका बाजूने आदर्शवादाने लोकांना प्रेरित करीत राहायचे आणि धोरणांची अंमलबजावणी करताना- विशेषतः आर्थिक विकास करीत असताना- व्यवहारी राहावयाचे, अशी ही भूमिका आहे. सर्वकल्याणाचा साम्यवादाचा गाभा आणि भांडवलशाहीतील उपयोगी तंत्रे यांचा ढोबळ (क्रूड) समन्वय त्यांच्या भूमिकेत आहे. पैसा कमवायचा असेल, तर पक्षात व राजकारणात येऊ नका, असे क्षी जिनपिंग उघडपणे म्हणत असत. ते ज्या प्रांतात काम करीत होते, तिथे त्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली, असेच लोकांना दिसले. क्षी व त्यांच्या नातेवाइकांनी पैसा मिळविला, असे म्हटले जाते. अशी प्रकरणे आहेत. मात्र वेन जियाबाओ, बो झिलाय व इतरांच्या तुलनेने ते काहीच नव्हते. क्षी यांची ही वैशिष्ट्यपूर्ण समन्वयवादी मध्यममार्गी भूमिका चीनमध्ये स्वीकृत झाली.

चीनमध्ये 1978 पासून सुधारणावादी नेत्यांकडे सत्ता असली तरीही पक्षात माओवादी व डावे यांचे महत्त्वपूर्ण अस्तित्व आहे. हा गट आर्थिक धोरणांच्या मुद्यांवर सैद्धांतिक भूमिका घेतो. जेव्हा जेव्हा चीनचे आर्थिक वा इतर सामाजिक-राजकीय प्रश्न जिकीरीचे होतात, त्या वेळी हे माओवादी आणि डावे सक्रिय होतात. डेंग, जियांग झेमिन व हु जिंताव यांनी त्यांच्या कालावधीत त्यांना नियंत्रणात ठेवून सुधारणावादी, कॉन्झर्व्हेटिव्ह व डावे यांच्यात संतुलन साधले होते. पुढे 2007-08 नंतर डाव्यांचा प्रभाव थोडा वाढला. क्षी सातत्याने पक्षाला त्याची सामान्य माणसाप्रति असलेल्या नैतिक जबाबदारीची जाणीव करून देतात. त्यामुळे हा डावा माओवादी गटही क्षी यांना या मुद्यांवर मर्यादित समर्थन देतो.

एकंदरीतच क्षी जिनपिंग यांचे कर्तृत्व, स्वच्छ प्रतिमा, त्यांच्या विचारातून प्रतीत होणारी सामाजिक बांधिलकी यामुळे पक्षाला व जनतेला ते स्वीकारार्ह वाटले. 21व्या शतकाच्या सुरुवातील चीन जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत असताना क्षी जिनपिंग हे चीनचे सर्वोच्च नेते झाले खरे. मात्र याच वेळी- हु जिंताव यांच्या दुसऱ्या सत्रात- चीनमध्ये अनेक प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केले होते. वाढत्या व सधन मध्यमवर्गाची वैयक्तिक व राजकीय स्वातंत्र्याची व लोकशाहीची वाढती मागणी; अनेक प्रकारच्या सामाजिक, पर्यावरणविषयक व मानवी हक्कांसंबंधीच्या प्रश्नांवर सरकारला होणारा वाढता विरोध; सोशल मीडिया व इंटरनेट या माध्यमांतून आकार घेत असलेली घटना व कायद्यावर आधारित राज्यकारभाराची मागणी करणारी सिव्हिल सोसायटीची चळवळ- या महत्त्वाच्या प्रश्नांवर दडपशाही हे एकच उत्तर सरकारकडे होते. सरकारमध्ये व पक्षात सर्व स्तरांवर भ्रष्टाचार बोकाळला होता आणि त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर व सरकारवर होत होता. याशिवाय घसरती मागणी, कर्जाने वेढलेली अर्थव्यवस्था, घसरलेला आर्थिक विकासदर, वाढती विषमता आणि प्रचंड वाढलेल्या शहरांच्या व्यवस्थापनाचे गंभीर प्रश्नही होते.

झी जिनपिंग यांना हे प्रश्न सोडवायचे होते आणि तेही एक-पक्षीय राजवटीत, कम्युनिस्ट पक्षाच्या चौकटीत! 

(क्रमश:)

पुढील अंकात वाचा-

चीनचे स्वप्न आणि क्षी जिनपिंग यांचा अजेंडा

'चिनी महासत्तेचा उदय' या लेखमालेतील मागील 25 लेख वाचण्यासाठी लिंक :

https://bit.ly/2Zwo4Rc

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात