गुरुजींनी स्वतः गरिबीचे चटके सोसले होते. अनुभवानेच त्यांना दरिद्री लोकांबद्दल जवळीक वाटायची. आंधळ्या भिकाऱ्याला"अहो बाबूराव' म्हणणारे त्यांच्याशिवाय दुसरे कोण होते? एम्. ए. झाल्यावर मनात आणले असते तर ते प्राध्यापक, प्राचार्य वगैरे होऊन अनेकांप्रमाणे ऐहिक आणि पारमाविक लाभ देखील करून घेते, पण गुरुजींचा पिंडच लाभाचा नव्हता गरीबी हटवण्याचा हेतू असल्यानेच त्यांनी गरीबांशी असलेले नाते कधी तुटू दिले नाही.
साने गुरुजी शिक्षक होते, राजकारणात रस घेणारे सत्याग्रही होते. समाजसेवक होते, लेखक होते, कवी होते, पत्रकार होते. पण त्यांच्या या विविध स्वरूपांत मुख्य सूत्र होते ते त्यांच्यातल्या धर्मभावनेचे होय. साने गुरुजी परम धार्मिक होते, पण त्यांची धर्म भावना संकुचित नव्हती. पंथीय नव्हती. संप्रदायाचे सोवळेपण तिच्यात नव्हते, कारण तिचे नाते सनातन विश्वधर्मासी होते.
कृष्ण, येशू, महंमद त्यांना मिश्र भासत नसत. जे जे म्हणून मानवाचे अंतःकरण उचबळून मोठे करते, शांत प्रकाशाकडे माणसाला ओढून नेते, वाऱ्यासारखे मनमुक्त वाहायला शिकवते हे सारे साने गुरुजीना आवडायचे म्हणूनच जिथे जिथे विभूतिमत्त्व दिसले तिथे तिथे त्यांची माया नम्र झाली. त्यांच्या भावना फार उत्कट होत्या. त्यात संस्कारांची भर पडली. विभूतिमत्व नाही असे निसर्गाठावी त्यांना काहीच दिसेना. पशू, पाखरे, झाडे, फुले, नद्या, समुद्र, डोंगर या साऱ्यांवर त्यांनी अपार प्रेम केले. जग हे श्रध्देने भरलेले आहे. प्रेमनियमांनी बांधलेले आहे. विविध क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी जिथे जिथे जीव ओतून काम केले ते सारे महापुरुष आहेत. मग ते संत असोत, कवी असोत, शास्त्रज्ञ असोत, राजकारणी असोत, त्यांचे आपण गुणगान करावे आणि कृतार्थ व्हावे, असे त्यांना वाटायचे.
देव आणि हे महापुरुष दोन नाहीत असे त्यांना वाटायचे आणि या दोघांचे मधुर रसायन म्हणजे आई? नारी जातीतल्या मातृदेवतांची अपार भक्ती गुरुजींना होती. त्याच्या प्रेमाने विश्वप्रेमाचीच जणू सेवा त्यांना दिली होती. मुक्या कळ्या तोडून फुले जबरदस्तीने फुलवू नकोस, गाय-वासरांना प्रेमाने खाऊ-पिऊ घाल, ती गोयलेवाली आहे तिची पाटी उचलू लाग, दमलेल्यास हात दे, आजाराची शिष्णूशा कर, गरिबीला लाजू नका, पण ऐदीपणाची लाज वाटु दे. अशा किती तरी लहान वाटणाऱ्या पण मूलभूत गोष्टी त्यांच्या आईने शिकवल्या. पण आया खूप शिकवतील, पणं ऐकतो कोण? असे इथे झाले नाही. श्यामच्या आईत गुरुजी म्हणतात, "कधी तो प्रेमाने धोपटी तर कधी रागाने आपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. या बेढव, ऐदी गोळ्याला ती आकार देत होती." मुलगाजवळ पैसा, प्रतिष्ठा नसताना दूर गावी शिकायला गेला तेव्हा ती म्हणाली, ध्रुवाप्रमाणे जा आणि गुरुजी खरोखरंच ध्रुवा प्रमाणे गेले. ध्रुवासारखी साधना त्यांनी आरंभली.
विद्येच्या प्रांगणात त्यांनी भक्ताप्रमाणे ग्रंथांची पूजा बांधली. जेवायचे पैसे त्यांनीच ग्रंथालयात बसून वाचण्यासाठी खर्च केले. उपास काढून पुस्तके वाचणारे विद्यार्थी किती असतील? गुरुजींची एकंदर प्रवृत्ती आणि ग्रंथभक्ती त्यांच्या एका कवितेत दिसते ती अशी.
माते ना ते विभव रुचले राजवाडे नको ते
मातेगोते मजसि नलगे मान मोठे नको ते
वस्त्राची ती तलम न रुची ना अलंकार काम
व्हावे माझ्या निकट परि हे ग्रंथ कैवल्यधाम
ग्रंथांना केवल्यधाम म्हणणे सोपे नाही नी म्हटले तरी त्यांचे ते शुद्ध केवल्य अनुभवणे तर त्याहूनही कठीण! पण ग्रंथांच्या अतंरमातला संजीवन-रस गुरुजींना माहीत होता. तो म्हणजे त्यातल्या विचारांची संपन्नता आणि भावनांचा उद्रेक पुस्तके जण त्यांच्याशी बोलत. त्यांनीच त्यांना लिहते केले. आपल्या या साधनेचे ध्येय गुरुजी असे सांगतात की...
जगात जे जे सुविचार बारे
मवीय भाषेत भरोत सारे
ह्या गुरुजीच्या एका मोठ्या शक्तीचे रहस्य साठलेले आहे ती शक्ती म्हणजे नितांत चांगुलपणा भलेपणा म्हणजेच करुनेला फुटलेला कर्ममब, कोंब. चांगुलपणा माणसाला कार्यान्वित करतो सामान्याशी जखडून ठेवतो आणि तरीही भूत-भविष्यातल्या साऱ्या सतसज्जनांशी अशा माणसाची संगती नियती अचूक घालते गुरुजींचे चांगुल पण असे प्रकाशदर्शी नी कर्मरत होते. अर्पण भाव त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. दिव्यशक्तीने आपल्याला वापरावे अशी त्यांची मनीषा होती देवाला उद्देशून ते म्हणतात,
तुझ्या कर्माचा बनून पावा
कृतार्थ हा जन्म मदीय व्हावा
श्रीकृष्णाच्या वासरीचे लालित्य गुरुजीनी, सर्व वृत्तीत सर्व कृतीत मुरवले. त्यांचा भाषा ललित-मधुर झाली. त्यांच्या वक्तृत्वाने लोक कसे उचमळून जात हे ज्यांनी फैजपूरच्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळी, 1937 साली स्वयंसेवक बनलेल्या गुरुजींची स्थानिक जमावा पुढे जी भाषणे झाली ती ऐकली त्यांना नोट कळले. मलाही तेव्हा ते कळले. शाळेतल्या विद्यार्थ्यांचे तर ते फार आवड होतेच, पण तेव्हाची त्यांची 'काँग्रेस पत्रिका' वाचण्यासाठी शेकडो जणांचा जीव टांगलेला असायचा.
गुरुजींना कृत्रिमपणाचे वावडे. माझ्यात कृत्रिमपणा आला तर मी प्राणत्याग करीन, हे त्यांचे जीवनसूत्र. या निर्व्याजपणामुळेच त्यांनी बायकांच्या ओव्या जमवल्या आईची माया, बहिणीची माया, पतिप्रेम, सासुरवास, संसारातली सुखदुःखे जणू स्त्री होऊनच त्यांनी पाहिले. आत्मविसर्जनाचा गुण अंगी बाळगल्यामुळे स्त्रीजीवनावरची ही माध्ये अतिशय सरस ठरली आहेत. ही हळूवार वृत्ती केवळ कवीची नव्हे, तो हलकीफुलकी शैली तर नव्हेच नव्हे, तो आहे स्त्रीमूर्ती बद्दलचा उमाळा! जशी भारतमाता इतकी दिव्य आणि मध्य असूनही पारतंत्र्यात पिचली होती, दारिद्र्याचे गाजली होती, तशीच भारतीय नारीजात गुरुजींना वाटायची! भारतीय नारीने त्यांच्या मनातल्या भारत मातेला बनवले की भारतमातेच्या मूर्तीने भारतीय नारित्वाच्या कल्पनेला मूर्त आकार दिला, हे सांगणे कठीण
आहे. काही असो, पण गुरुजींच्या मनातली मातृमूर्ती सर्वांगी जिवंत आहे. आई होणे त्यांना जगातले परमोच्च ध्येय वाटे. म्हणूनच आईचे लालित्य त्यांनी जोपासले. मुरलीची आराधना केली. मुलाची सेवा केली आजाऱ्यांचे पव्यपाणी नेटकेपणाने केले. आणि केले ते सहजपणाने केले. ध्येयाचे ओझे त्यांना झाले नाही.
गांधींमध्ये घोर गुण त्यांना दिसले. स्वामी श्रद्धानंदांचा खून झाला त्या वेळी गुरुजीदेखील इतर अनेकांप्रमाणे फार बिव्हल झाले. त्यानंतर त्यांनी प्रथम गांधीना पाहिले आणि ते सद्गदित झाले. गांधींच्या कार्यात त्यांनी आपले तन, मन, धन झोकून दिले. गांधींच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर ते म्हणाले. "भारताची आई गेली!"
गुरुजींनी स्वतः गरिबीचे चटके सोसले होते. अनुभवानेच त्यांना दरिद्री लोकांबद्दल जवळीक वाटायची. आंधळ्या भिकाऱ्याला"अहो बाबूराव' म्हणणारे त्यांच्याशिवाय दुसरे कोण होते? एम्. ए. झाल्यावर मनात आणले असते तर ते प्राध्यापक, प्राचार्य वगैरे होऊन अनेकांप्रमाणे ऐहिक आणि पारमाविक लाभ देखील करून घेते, पण गुरुजींचा पिंडच लाभाचा नव्हता गरीबी हटवण्याचा हेतू असल्यानेच त्यांनी गरीबांशी असलेले नाते कधी तुटू दिले नाही. खालपोटे नि हेरपोटे यांच्यातला भेव पाहून त्यांना चीड यायची. आणि ज्यांनी ज्यांनी म्हणून खालपोट्यांची इज्जत राखली त्याच्याशी त्यांचे प्राणाशी नाते जमले.
भारतमातेच्या शृंखला तोडण्यासाठी हा भक्त प्राणपणाने झिजला. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकांत समतेची भावना आली नाही. म्हणून फार तळमळला. तिथुनच त्यांच्या क्षोभाला सुरुवात झाली असे म्हटले तरी चालेल. स्पृश्य अस्पृश्यांतली दरी रुंदावते आहे का? या शंकेने त्यांना ग्रासले. देवळात अस्पृश्यांना प्रवेश नसावा, या सत्य घटनेने ते शरमिदे झाले. पंढरपूर तर महाराष्ट्राची धर्मपेठ. त्या पेठेत विठोबाला साक्ष ठेवून त्यांनी पंडरीने सत्याग्रह केला. देऊळ उघडे होणार नाही, तोवर अन्न घेणार नाही अशी शपथ घेऊन उपोषणाला आरंभ केला. दिवसामागुन दिवस लोटले. प्राण यायची वेळ आली. आणि त्या आणीबाणीच्या प्रसंगात देऊळ खुले झाले. "पंढरपूरचं भारतातलं प्रसिद्ध देवस्थान हरिजनांना खुले झाले याचे श्रेय साने गुरुजींना आहे" असे उद्गार गांधीजींनी काढले.
'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' असे गाणे समानतेच्या या भोक्त्याने गावले. भेदभावांचे निर्मूलन व्हावे म्हणून गायले ते उगीच नव्हे. आपली आई मोत्यांची नथ घालते. दागिने पालते. ते कुठून आले?
खेडातल्या गरीब बायकांच्या डोळ्यातल्या मोत्यांसारख्या अश्रूंची ते बनले होते? कारण खोत म्हणजे ऐतखाऊ, ही जाणीव गुरुजींना बाळपणीच झाली होती आणि म्हणून वैभव कसे ते त्यांनी आपल्या अंगाला चिकटून दिले नाही.
त्यागी वृत्ती आणि सुबुद्ध अशा भारताच्या राष्ट्रपुरुषाबद्दल त्यांना परमादर वाटत होता, आणि ते त्यांनी लहान चरित्रे लिहून प्रकट देखील केला आहे. पहिला मुजरा त्यांनी गोपाळ कृष्ण गोखल्यांना केला नंतर राजवाडयांचे गुणगान केले. 'आनंदवन भुवनात विहार करणारा व्रतस्थ' असे त्यांचे वर्णन गुरुजीनीच करावे. ईश्वरचंद्र विद्यासागरांचे चरित्र वाचताना विद्यासागरांचा निर्भय निःस्पृह बाणा, त्यांची स्त्रीजातीबद्दलची कणव आपल्याला भारून टाकते आणि ते गुरुजींनी लिहिलेले देशबंधू चित्तरंजन दासाचे चरित्र तर मी कधी विसरणार नाही! त्यानेच मला त्यांच्या सागर- संगीताचे गुज सांगितले. सागरसंगीत बंगालीतून वाचलेच पाहिजे, हा ध्यास माझ्या मनात निर्माण केला तीन तपांनंतर त्याची पूर्ती झाली. मी गुरुजींची आठवण करीत ते वाचले आणि त्याचा अनुवाद केला. माझ्या कुंडीत ती बी मी रुजवावी, हा आनंद खरोखरच अपूर्व होता. आणि स्फूतियाते होते साने गुरुजी!
गुरुजींचे मुलांवर फार प्रेम 'करी मनोरंजन जो मुलांचे, जडले नाते प्रभूशी तयाचे' असे म्हणणारे गुरुजी! केवढ्या गोड गोष्टींचे धन त्यांनी मुलांना दिले. जगातल्या उत्कृष्ट वाड:मयाचा साठा त्यांनी मुलांसाठी आणला, मुलांच्या जगात त्यांची लेखक म्हणून लोकप्रियता अमाप होती. अजूनही मुलांच्यासाठी लिहिलेल्या साहित्याचा आदर्श तो आहे.
असे हे लहान थोरांना मजणारे गुरुजी पूर्ण भावबळ घेऊन जगले. त्यांच्या समग्र वृत्तीचे प्रतीक म्हणजे अश्रु अश्रुवर गीत गाणारे कवी विरळाच. गुरूजीचे अश्रुवरचे कवन संतांच्या अभंगात बसावे असे आहे. त्यांच्या श्रद्धेचा थोर उद्गार तो आहे. साने गुरुजींना समजून घ्यायचे तर हा उद्गार विसरून चालणार नाही, तो उद्गार असा:
इवलासा अश्रू नका तुच्छ लेखू
संसारा महोच्च स्थान त्याचे
इवलासा तारा दिसतो दुरुन
परि तो मोजून कोण घेई
बाळकृष्णाचे ते इवलेसे तोंड
यशोदा, ब्रह्मांड देखे त्यात.
इवलीशी मूर्ति बहु वामनाची
परी त्रैलोक्याची, केली मिती
इवलेसे पान पांचाली अर्पित
स्वामी तप्त होत ब्रह्मांडाचा
इवलेसे पान रुक्मिणी ठेवीत
लीलेने तुळस विश्वंभरा
इवलासा अश्रू तसा माझा आहे
सारे त्यात आहे भाग्य माझे
गुरुजी गेले! तो अश्रूही गेला! असा कोरा लख्ख अश्रू त्यांचाच!!
Tags: संस्कार महात्मा गांधी दुर्गा भागवत साने गुरुजी Sanskar Mahatma Gandhi Durga Bhagwat Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या