डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

तरीही दुर्गाशक्तीचं कौतुक यासाठी करायला हवं की, तिने करिअरच्या सुरुवातीच्या काळातच धाडस दाखवलं! उत्तर प्रदेशसारख्या राज्यात हे अधिक धाडसाचं काम म्हटलं पाहिजे. दंडशक्ती दाखवीत व कायद्याचं कठोर पालन एका तागडीत, तर दुसऱ्या तागडीत विकास प्रशासन आणि समाजोपयोगी काम बरोबरीने तोलत प्रशासनाचा तराजू संतुलित ठेवला; तरच समाजव्यवस्था बदलण्यास मदत होईल..

दुर्गाशक्ती नागपाल ही आजची एक दंतकथा आहे. She caught the imagination of whole Nation! तेही स्वत: निलंबनाच्या बातमीनंतर प्रसारमाध्यमांपुढे एकदाही न येता, कोणतेही विधान न करता.

मागच्या आठवड्याची एक बातमी हे अधोरेखित करते. नांदेडला सरकारी दवाखान्यात तेथील जिल्हाधिकारी गेले असता एका मुलीला जन्म दिलेल्या मातेनं मुलीचं नामकरण त्यांनी करावं, असा आग्रह करताच त्यांनी ‘दुर्गाशक्ती’ हे नाव सुचवले.

याचं कारण काय असावं? एक तर दुर्गा ही नवी तरुण आय.ए.एस. ऑफिसर. पहिलीच एस.डी.एम.ची पोस्टिंग. नोएडासारख्या महत्त्वाच्या शहरात वाळू माफियांवर कोर्ट केसेस करून वेसण घालते व सरकारी जागेवरील मशिदीची भिंत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत पाडते. (हे तिने नाही केले, तर गावकऱ्यांनी आपणहून भिंत काढली- अशी सारवासारवीची बातमी नंतर आली, ही बाब निराळी!)

आजचं वातावरण असं आहे की, जो सिस्टीमविरुद्ध धाडसानं लढाई करतो, त्याला जनता डोक्यावर घेते... पुनश्च मीडिया आणि समाजवादी पार्टी विरुद्ध इतर सर्व राजकीय पक्ष राजकारणासाठी एकत्र आले.. आणि दुर्गाला कदाचित हे अपेक्षितही नसेल. तिनं तर प्रामाणिकपणानं केवळ कर्तव्य बजावलं होतं, पण नॅशनल मीडियानं प्रकरण उचलून धरल्यामुळे ती प्रामाणिकपणा व धाडसी प्रशासकाची प्रतिमा बनली!

भारतीय मानसिकता ही भावनाप्रधान आहे. तिची तिला दबंगगिरी आवडते. 1974 मध्ये अमिताभ ‘जंजीर’द्वारे सडलेल्या समाजव्यवस्थेविरुद्ध संतापाने उठून लढणारा अंडरडॉग हा युवकांसाठी ‘रोल मॉडेल’ बनला आणि त्याला ‘महानायकत्व’ बहाल केलं गेलं! प्रशासन, राजकारण व समाजव्यवस्थेसाठी असेच आयकॉन समाजात लागतात. टी.एन. शेषन, किरण बेदी, विनोद रॉय, आताचा हरियानाचा रॉबर्ट वडेराविरुद्ध बंड करणारा अशोक खेका... कायद्याचं व नियमांचं काटेकोर पालन बड्यांशी टक्कर देऊन करणं- हा सर्वांचा समान धागा. दुर्गाशक्ती त्यात सामील झाली आहे.

महाराष्ट्रातही अरुण भाटिया, गो.रा. खैरनार यांसारखे सनदी अधिकारी घ्या व अण्णा हजारेंसारखे ज्येष्ठ समाजसेवक घ्या. त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा पुकारला. त्या वेळी त्यांची वाहवाही झाली; पण व्यवस्था बदलायची असेल, तर व्यक्तीचा  लढा परिणामकारक ठरत नाही, तर त्यातील पद्धतशीर बदल परिणामकारक ठरतात. कर्नाटकचे चावला यांचा संगणकावर सातबारा व फेरफार देण्याचा ‘भूमी’ प्रयोग घ्या किंवा महाराष्ट्राचे नितीन करीर यांचा भूमिअभिलेख कार्यालयाचे ऑनलाईन करीत जमिनीचे पुरावे, खरेदी व्यवहार संगणकबद्ध करण्याचा ‘सरिता’ उपक्रम घ्या...

त्याने माझ्या मते, भ्रष्टाचारावर अधिक परिणामकारक वेसण बसली, हा माझा स्वत:चा अनुभव आहे. रेल्वे तिकिटाच्या संगणकीय आरक्षणानं किती फरक पडला, हे साऱ्यांना ज्ञात आहे. पण असे प्रशासकीय बदल बातमीचे विषय क्वचितच होतात. कारण त्यात भारतीय मानसिकतेला भेडसावणारी दबंगगिरी किंवा ‘अंडरडॉग’ फायटिंग अगेन्स्ट होल सिस्टीमचा थरार व आकर्षकता नसते... पण व्यवस्था बदलण्यासाठी त्याचा अधिक फायदा होतो, हे नि:संशय.

दुर्गाशक्तीने जी वाळू माफियांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली, तशी कामे अनेक अधिकाऱ्यांनी, तहसीलदार व तलाठ्यांनीही महाराष्ट्रात केली आहेत. कागल-कोल्हापूरमधील अशाच वाळू माफियाविरुद्ध केलेल्या धडक कारवाईच्या प्रकारामुळे सर्व महसूल अधिकाऱ्यांनी तत्कालीन तहसीलदार डॉ. संपत खिलारी यांच्या बाजूने ठाम उभे राहात संप पुकारला होता व मंत्र्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. पण दुर्गाशक्ती प्रकरण गाजलं ते दिल्लीजवळ असलेल्या नोएडामुळे, राजकारण करणाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाला ठोकण्यासाठी त्याचा वापर केला म्हणून व मीडियाला चार-सहा दिवस चघळायला बातमी मिळाली म्हणून.

तरीही मी येथे दुर्गाशक्तीचा प्रामाणिकपणा, धाडसी कामाचे अभिनंदन करेन. कारण आजच्या सामाजिक मूल्यांच्या घसरणीत आपले काम चोख नियमानं करणं पण दुर्मिळ झालं आहे. प्रामाणिक असणं, भ्रष्टाचार न करणं, बेकायदा कामांना नकार देणं हे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे; ते केले तर अशी अफाट प्रशंसा मिळणं याचा अर्थ हेही दुर्मिळ झालं आहे आणि ते खचितच चांगलं नाही. दुर्गाशक्ती प्रकरण याची जाणीव करून देणे, हे लक्षात घेणं जरुरीचं आहे.

धोरणांची अंलबजावणी कसोशीने करून आम नागरिकांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, हे विकसक प्रशासनाचे प्रमुख काम आहे. पण अशा विकसकानां प्रसिद्ध मिळत नाही व असे अधिकारी प्रकाशझोतात येत नाही हेही, तितकेच खरे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा, पुणे अशा अनेक जिल्ह्यांत 90 ते 100 टक्के गावे हागणदारीमुक्त झाली आहेत व हे काम किती कठीण असतं, हे मी स्वानुभवाने सांगू शकतो. जेव्हा एक गटविकास अधिकारी पूर्ण तालुका/ पंचायत समिती हागणदारीमुक्त करतो, एखादा शिक्षक जिल्ह्याची शाळा संगणकयुक्त करतो, एखादी अंगणवाडीसेविका अंगणवाडी तारांकित करते; त्यांचं हे काम भाटिया, खेमकर, केंद्रेकर किंवा दुर्गाशक्ती यांपेक्षा कमी महत्त्वाचे मानायचं? उलटपक्षी ते विकासावं नवं मॉडेल असतं, ज्यानं नागरिकांना दीर्घकालीन लाभ होतो... पण हे घडविणारे अनसंग हीरो/हिरोईन का दुर्लक्षित राहतात?

तरीही दुर्गाशक्तीचं कौतुक यासाठी करायला हवं की, तिने करिअरच्या सुरुवातीच्या काळातच धाडस दाखवलं! उत्तर प्रदेशसारख्या राज्यात हे अधिक धाडसाचं काम म्हटलं पाहिजे. दंडशक्ती दाखवीत व कायद्याचं कठोर पालन एका तागडीत, तर दुसऱ्या तागडीत विकास प्रशासन आणि समाजोपयोगी काम बरोबरीने तोलत प्रशासनाचा तराजू संतुलित ठेवला; तरच समाजव्यवस्था बदलण्यास मदत होईल...

बेदीच्या उदाहरणानं ते स्पष्ट करता येईल. कायद्याचं कठोर पालन करणारी ‘क्रेन बेदी’ एका बाजूला कर्तव्यकठोर, तर तिहार जेलचा कायापालट करीत कैद्यांचं मतपरिवर्तन करणारी सुधारक अधिकारी दुसऱ्या बाजूला... यामुळे किरण बेदी आयकॉन झाली. राँग साईडला पार्किंग केलेल्या गाड्या क्रेनने उचलण्यापेक्षाही तुरुंग सुधारण्याचा तिचा प्रयोग हा जास्त महत्त्वाचा व व्यवस्था-परिवर्तनाचा आहे. दुर्गाशक्तीनं तिचा आदर्श ठेवावा, ही अपेक्षा.

मी स्वत: जिल्हाधिकारी असताना साखरेची साठेबाजी झाली म्हणून तीन लाख टन साखर जप्त केली, त्याची केवढी चर्चा; पण व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीमचा व एसएमएस सेवेचा वापर करून केरोसिन व धान्याचा काळाबाजार रोखला, त्याची साधी चर्चा नाही... असो.  आज ज्या तडफेनं दुर्गानं कठोर कायदापालनांचं उदाहरण प्रस्तुत केलं, तिनं उद्या तेवढ्याच धडाडीनं नाउमेद न होता महिला सबलीकरणासाठी व विकास प्रशासनासाठी अशीच आऊट ऑफ बॉक्स कामे केली, तर ती दुसरी किरण बेदी निश्चित होईल!

Tags: किरण बेदी डॉ. संपत खिलारी दुर्गाशक्ती नागपाल लक्ष्मीकांत देशमुख दुर्गाशक्ती : दुसरी किरण बेदी? लास्ट पेज Kiran Bedi Dr. Sampat Khilari Durgashakti Nagpal Laxmikant Deshmukh Durgashakti: Second Kiran Bedi ? Last page weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in

भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके