डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डेक्कन कॉलेज परिसरात केशवरावांची आठवी मुलाखत

शिक्षकी हा पेशा आहे. त्यात अध्ययन आणि अध्यापन हे दोन्ही गृहीत आहेत. म्हणजे सतत शिकत राहणे आणि शिकवत राहणे हे त्यांचे काम. ज्यांचे शिकत राहणे थांबते त्यांच्या शिकवत राहण्याला फारसा अर्थ नसतो. मला सांगा, या राज्यातील किती शिक्षकांनी मागील दीड वर्षात ही दुहेरी प्रक्रिया चालू ठेवली? ‘तो आकडा 15 टक्के पेक्षा जास्त आहे’,  असे मनापासून म्हणण्याची हिम्मत आज कोणामध्ये आहे? एखादी शिक्षक संघटना तसा दावा करू शकेल? एखादा शिक्षणाधिकारी स्वत:च्या कार्यक्षेत्रापुरता तरी तसा दावा करू शकेल?

मागील आठवड्यात बातम्या झळकल्या, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालये सुरू होणार. त्यामुळे अनेकांनी मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली. कोविड 19 ने संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. भारतात सर्वाधिक परिणाम झाला महाराष्ट्र राज्यावर. आणि राज्यात सर्वाधिक परिणाम झाला पुणे व मुंबई या शहरांवर. सर्वच क्षेत्रांचे कमी-अधिक नुकसान झाले, पण आता मागे वळून पाहिल्यावर वाटते, सर्वाधिक नुकसान झालेय शिक्षणक्षेत्राचे. त्यातही अधिक प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे. आता तब्बल दीड वर्षानंतर शाळा-महाविद्यालये पूर्ण ताकदीने सुरू होणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात शिक्षणक्षेत्रातील सर्वांनी झपाटून कामाला लागायला हवे, असे इतरांप्रमाणेच आम्हालाही वाटू लागले आहे. दीर्घ विश्रांतीनंतर विद्यार्थी, शिक्षक नवी उमेद आणि नवा विश्वास घेऊन धावायला लागतील अशी आशा वाटू लागली आहे. पण ती धाव भरकटलेली असून नये यासाठी कोणत्या घटकांनी काय करायला हवे, याबाबत जाणून घेण्यात आणि आपल्या वाचकांना अवगत करण्यात आम्हाला रस वाटू लागला आहे.

म्हणून आम्ही गेल्या महिनाभरात, या ना त्या नात्याने शिक्षणक्षेत्राशी संबंधित असलेल्या लहान-थोरांशी थोडाबहुत संवाद केला. त्यांच्याकडून काही शक्यता व सूचना आल्या. मात्र आमचे पुरेसे समाधान झाले नाही. म्हणून ठरवले केशवरावांना जाऊन भेटावे, त्यांच्याकडून काही तरी वेगळे हाती लागेल. त्याची कारणे दोन. एक तर आज त्यांचे वय दिडशे पार आहे,  1920 ची स्पॅनिश फ्लू साथ आली तेव्हा ते पन्नाशीत होते आणि 1897 चा प्लेग आला तेव्हा त्यांनी पंचविशी पार केलेली होतीच. म्हणजे संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या आणि भारतातून त्या दोन्ही वेळेला कोटी-दीड कोटी बळी मिळवणाऱ्या त्या साथींचे साक्षीदार आहेत केशवराव. कदाचित आजच्या जगातील एकमेव साक्षीदार. दुसरे कारण असे की, मागील सव्वाशे वर्षांतील भारतातील शैक्षणिक वाटचालीचेही ते साक्षीदार आहेत.

तर मोठ्या अपेक्षेने त्यांची मुलाखत घ्यायला गेलो, नेहमीप्रमाणे भल्या पहाटे. डेक्कन कॉलेज परिसरात ते फिरायला येतात त्या नेहमीच्या जागेवर. अर्थातच या वेळीही ते क्षितिजाकडे शून्य नजरेने पाहत बसलेत असेच दृश्य होते. तेव्हा झालेला संवाद असा...

प्रश्न : केशवराव, आज जास्त चिंताग्रस्त दिसताय, तब्येत बरी नाहीये का?
- तब्येतीला काही नाही झालेले, पण आता पुढील दिवस पाहायला नको वाटते आहे.

प्रश्न : अरे, असे का म्हणताय? चांगली बातमी आली काल-परवा, तुम्ही तर आनंदित असायला हवे. तब्बल दीड वर्षानंतर शाळा महाविद्यालये सुरू होणार आहेत आता नव्या जोमाने...
- भाबडे आहात तुम्ही. जोमाने नाही, रडतखडत सुरू होणार आहेत.

प्रश्न : असे कसे म्हणताय? विद्यार्थी कंटाळले आहेत घरात बसून, शिक्षकांचेही हात आणि तोंड शिवशिवत आहेत शिकवण्यासाठी.
- किती टक्के विद्यार्थी आणि किती टक्के शिक्षकांबद्दल बोलताय तुम्ही हे? तुम्हीच मागच्या संपादकीयात त्या अझीम प्रेमजींचा सिद्धांत मांडला होता तो विसरलात वाटतं...

प्रश्न : हो तर, कसा विसरेल! 15 टक्के शिक्षक स्वयंप्रेरणेने काम करीत राहतात, त्यांना कोणत्याही प्रोत्साहनाची व प्रशिक्षणाची गरज नसते. 15 टक्के शिक्षक असे असतात ज्यांना कोणतेही प्रोत्साहन व प्रशिक्षण देऊन फार उपयोग होत नाही. आणि उर्वरित 70 टक्के असे असतात ज्यांना प्रोत्साहन व प्रशिक्षण मिळाले तर ते चांगले काम करत असतात.
- चला, एवढे आठवतेय म्हणजे कॉपी करून किंवा पोपटपंची करून परीक्षा देण्याची सवय नसावी तुम्हाला.

प्रश्न : धन्यवाद! आमच्याविषयी प्रथमच का होईना चांगला निकाल दिल्याबद्दल. पण तुम्हाला खरेच असे वाटतेय का, की कोविडनंतर त्या टक्केवारीत काही बदल होणार नाही?
- बिलकुल बदल होणार नाही त्या टक्केवारीत. अशी संकटे आली म्हणून आणि संत, सुधारक, वैज्ञानिक वा महामानव जन्माला आले म्हणून भौतिक जग झपाट्याने बदलत गेले हे निश्चित, पण मानवी मन मात्र संथ गतींनेच बदलत आले आहे.

प्रश्न : मग आता सांगा, मागील दीड वर्षात आपल्या देशातील, या राज्यातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यात कितपत बदल झाले असावेत?
- मला कळलेला कोविड 19 चा निकाल सांगण्यासारखा नाही, अप्रिय आहे. माझ्याविषयी कटुता निर्माण करणारा ठरेल म्हणून नको सांगायला.

प्रश्न : केशवराव, ब्रिटिश राजवटीतही तुम्ही कोणाच्या कटुतेला घाबरला नाहीत, आता स्वराज्यात कोणाची पर्वा करताय?
- ऐका तर मग. कोविड 19 चा मला कळलेला निकाल, ‘‘सर्व विद्यार्थी पास, बहुतांश शिक्षक नापास!’’

प्रश्न : अहो केशवराव, फारच धक्कादायक आणि स्फोटक विधान करताय तुम्ही हे! जाहीर सभेत येऊन असे बोललात तर शिक्षकवर्ग म्हणेल ‘वेड लागलेय तुम्हाला.’
- तसे कोणी म्हणणार असेल तर त्याला आम्ही अजिबात हरकत घेणार नाही. पण आम्ही बोलतोय ते पूर्ण जबाबदारीने. आणि खरे म्हणजे यात धक्कादायक म्हणावे असे काही नाही. हे साधे सत्य आहे. या राज्यातील सर्व शाळा-महावद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता किंवा परीक्षा घेतली आहे असे दाखवून पास करण्यात आलेले आहे. हे तर सार्वत्रिक सत्य आहे ना?

प्रश्न : हो, ते बरोबर आहे. पण बहुतांश शिक्षक नापास कसे?
- शिक्षकी हा पेशा आहे. त्यात अध्ययन आणि अध्यापन हे दोन्ही गृहीत आहेत. म्हणजे सतत शिकत राहणे आणि शिकवत राहणे हे त्यांचे काम. ज्यांचे शिकत राहणे थांबते त्यांच्या शिकवत राहण्याला फारसा अर्थ नसतो. मला सांगा, या राज्यातील किती शिक्षकांनी मागील दीड वर्षात ही दुहेरी प्रक्रिया चालू ठेवली? ‘तो आकडा 15 टक्के पेक्षा जास्त आहे’,  असे मनापासून म्हणण्याची हिम्मत आज कोणामध्ये आहे? एखादी शिक्षक संघटना तसा दावा करू शकेल? एखादा शिक्षणाधिकारी स्वत:च्या कार्यक्षेत्रापुरता तरी तसा दावा करू शकेल?

प्रश्न : म्हणजे 85 टक्के शिक्षक नापास आहेत कोविड 19 च्या निकालानुसार, असे म्हणायचे आहे तुम्हाला?
- हो, मला कळलेल्या निकालानुसार. कदाचित तो आकडा आणखी मोठा करावा लागेल!

प्रश्न : छे, छे...! तुम्ही शिक्षकांवर अन्याय करीत आहात, त्यांचा नाईलाज लक्षात घेत नाही आहात तुम्ही...
- घेतो ना लक्षात. त्यांना स्वत:ला किंवा कुटुंबातील कोणाला एकदा का होईना कोरोना होऊन गेला आहे. नातेवाईकांमध्ये कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे. भयग्रस्त वातावरणात सतत वावरावे लागले आहे. शासनाचे आदेश होते शाळा पूर्ण बंद ठेवण्याचे. मध्येच काही शालाबाह्य कामे सोपवली गेली त्यांच्यावर. पालक आणि गावातील लोकही इच्छुक नव्हते बराच काळ मुलांना बाहेर पाठवण्यासाठी.

प्रश्न : पण मग अशा परिस्थितीत त्यांनी काय करायला पाहिजे होते?
- सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे या काळात त्यांनी स्वतः भरपूर शिकायला पाहिजे होते! कधी नव्हे इतका अनुकूल काळ आला होता शिकण्यासाठी. हाताशी चिक्कार वेळ होता, प्रामुख्याने घरातच राहायचे होते, बाहेरचे व्यत्यय जवळपास नव्हते.  आणि शिकण्यासाठी अनेक प्रकारची साधनेही उपलब्ध होऊ शकत होती, थोडी खटपट केली असती तर. थोडा वेळ ऑनलाईन शिकवण्याचे आदेश होते आणि थोड्या लोकांना शालाबाह्य कामे थोडी थोडी करावी लागली; पण शिकण्यासाठी भरपूर अनुकूलता होती हे निर्विवाद! प्रत्यक्षात किती आणि काय शिकले आपले शिक्षक लोक?

प्रश्न : त्यांनी स्वतः शिकण्याबद्दलचे म्हणत असाल तर त्यांची बाजू मोठ्या हिरीरीने लावून धरता येईल असे नाही वाटत आम्हालाही. पण त्यांनी शिकवले नाही, यासाठी फार दोष नाही देता येणार त्यांना.
- तुम्ही शिक्षणाबद्दल फारच अर्धवट विचार करताय का? अहो, कोविड काळात हे शिक्षक शिकत राहिले असते तर त्याच काळात विद्यार्थ्यांना आपापल्या घरात गुंतवून ठेवण्यासाठी बऱ्यापैकी यशस्वी झाले असते ते! आणि आता विद्यार्थांना शाळेत शिकवण्यासाठी किती युक्त्या, कल्पना लढवल्या असत्या त्यांनी. सर्जनशीलतेला बहर आला असता त्यांच्या. इतकी तयारी झाली असती त्यांची की, कदाचित मागील दीड वर्षात झालेले नुकसान पुढील दीड वर्षात भरून काढता आले असते.

प्रश्न : केशवराव, खूपच आदर्शवादी विचार मांडत आहात तुम्ही?
- आदर्शवादाची अपेक्षा शिक्षणक्षेत्राकडून नाही करायची तर कुठून करायची? बरे तो आदर्शवाद ठेवू बाजूला,  सर्व शिक्षकांना अन्य क्षेत्रांच्या तुलनेत बऱ्याच जास्त  सुट्ट्या कशासाठी आहेत? घरची कामे करता यावीत यासाठी आणि जोडधंदा करता यावा यासाठी? अन्य सरकारी क्षेत्रांच्या तुलनेत वेतनही चांगले असते, कशासाठी? पूर्ण वेळ अध्ययन व अध्यापन यांवर लक्ष केंद्रित करता यावे यासाठीच ना? समाजातील आदर्शवादाची जपणूक करता यावी, त्यात भर टाकता यावी यासाठीच ना?
 

प्रश्न : ते बरोबर आहे, पण आदर्शवादाचे थोडे थोडे ओझे डॉक्टर, पत्रकार-संपादक इत्यादी पेशातील लोकांनीही  वाहायला हवे ना?
- त्यांना कुठे क्लीनचीट देतोय आम्ही. पण मला सांगा, या संपूर्ण दीड वर्षाच्या काळात शिक्षक लोकांनी स्वअध्ययन हे अर्धे काम केलेले नसेल आणि अध्यापन हे उर्वरित अर्धे काम या ना त्या कारणाने फार करता आलेले नसेल तर? तर त्यांनी पूर्ण वेतन घ्यावे का? पूर्ण व अर्धे वेतनही सोडा, आम्ही आमच्या वेतनातील एक छोटासा वाटा सरकारी तिजोरीत देऊ इच्छितो असे म्हणायला किती शिक्षकसंघटना पुढे आल्या? संघटना ही फक्त हक्काबाबत बोलायला असते का,  कर्तव्याबाबत नाही?

प्रश्न : पण ही जबाबदारी केवळ शिक्षकांची असू शकत नाही. School is an extension of home असे म्हटले जाते. त्यामुळे मुलांचे पालक आणि कुटुंबातील इतर लोकांचीही ती जबाबदारी आहे.
- हो, निश्चितच! अनौपचरिक शिक्षण घरातून व सभोवतालातून मिळत असते, त्या-त्या घटकांवर निश्चितच काही जबाबदारी आहे. पण भारतासारख्या अनेक प्रकारची विषमता व अभावग्रस्तता असलेल्या देशात अनौपचारिक शिक्षणाला मोठ्या मर्यादा पडतात. त्या ओलांडण्यासाठीच तर सार्वत्रिक शिक्षणाचा आग्रह असतो. सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण ही तरतूदही त्यासाठीच असते. त्यामुळे मुलांची शाळा आणि तिथले शिक्षक अधिक चांगले असतील तर त्या मुलांच्या घरातील वातावरणही बदलू शकते. 

प्रश्न : असो. तर कोविड 19 चा तुम्हाला कळलेला निकाल आहे, ‘सर्व विद्यार्थी पास, बहुतांश शिक्षक नापास.’ पण विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता किंवा घेतली आहे असे दाखवून पास केले ते शिक्षकांनी. आणि शिक्षकांची तर परीक्षाच घेतली गेलेली नाही, त्यांचे वेतन चालू ठेवले आहे, नोकऱ्या कायम ठेवल्या आहेत. म्हणजे सरकारने शिक्षकांनाही पास केले आहेच की! तर मग तुम्हाला कळलेल्या कोविड 19 निकालानुसार, हे सरकार आणि त्यातील शिक्षणखाते पास आहे की नापास?
- चला, उशीर झालाय, निघतो मी... 
 

Tags: शाळामहाविद्यालये शिक्षणक्षेत्र कोविड शिक्षण कोविड 19 मध्ये शिक्षण education in covid 19 covid19 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके