डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

दगडावरची पेरणी करणारा सुधारक

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे पहिले सचिव म्हणून सय्यदभाई यांची निवड आधीच झाली होती आणि मंडळाचे अध्यक्ष म्हणून बाबूमियाँ बँडवाले यांची निवड त्यानंतर काहीच दिवसांनी झाली. 1970 नंतरची सात वर्षे हा मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा झंझावाती कालखंड होता. मंडळाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. वैचारिक भूमिका ही भारतीय संविधानाच्या चौकटीत बसेल अशीच ठरवण्यात आली. सर्व कृतिकार्यक्रम सनदशीर मार्गाने व लोकशाहीला बळकट करणारे असतील याची निश्चिती करण्यात आली. देशाची एकता व अखंडत्व टिकविण्यासाठी प्रयत्नशील राहायचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करायचा यांवरही शिक्कामोर्तब करण्यात आले.

6 एप्रिल 1936 रोजी हैदराबाद येथे जन्मलेले सय्यद महबुब शहा कादरी ऊर्फ सय्यदभाई यांचे 8 एप्रिल 2022 रोजी, पुणे येथे निधन झाले. वयाच्या ऐन पंचविशीत त्यांनी मुस्लिम समाजातील काही अनिष्ट प्रथांविरोधात विचार व कृती करायला सुरुवात केली आणि अखेरपर्यंत ते कार्यरत होते. म्हणजे तब्बल साठ वर्षे ते सामाजिक कार्यात होते. ‘दगडावरची पेरणी’ हे त्यांचे कार्यकथन 2009 मध्ये अक्षरमानव प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. त्याचे अनुवाद इंग्रजी, उर्दू, हिंदी इत्यादी सहा भाषांमध्ये झाले आहेत. ‘दगडावरची पेरणी’ हे मराठीतील माईलस्टोन म्हणावे असे पुस्तक आहे. ते जाणकार वाचकांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पोहोचले असले आणि त्याला प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले असले तरी, सर्वसामान्य मराठी वाचकांपर्यंत ते पुस्तक पोहोचलेले नाही. आणि मुस्लिम समाजातील लोकांपर्यंत तर अत्यल्प पोहोचले आहे. मात्र काळ जसजसा पुढे जाईल तसतसे त्या पुस्तकाचे महत्त्व अधिकाधिक ठळकपणे अधोरेखित होत जाईल. आणि मराठीतील ‘एकमेवाद्वितीय’ पुस्तकांच्या पंक्तीत जाऊन बसेल. मराठीत फक्त एकच पुस्तक लिहून अजरामर झालेल्या व्यक्तींची ती रांग आहे. म्हणजे लक्ष्मीबाई टिळक यांचे ‘स्मृतिचित्रे’, रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’, प्र.ई.सोनकांबळे यांचे ‘आठवणींचे पक्षी’ इत्यादी पुस्तकांचे मराठी ग्रंथविश्वात जे स्थान आहे, त्यांच्या रांगेत सय्यदभाईंचे पुस्तकही जाऊन बसेल. तर असे हे सय्यदभाई नेमके होते तरी कोण आणि त्यांनी केले तरी काय?

एका सर्वसामान्य गरीब मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेल्या सय्यदभाईंना जेमतेम प्राथमिक शिक्षण मिळाले आणि तेही उर्दू माध्यमातून. त्यांचे वडील पुणे येथील दारूगोळा कारखान्यात काम करून घर चालवत होते. जगण्याच्या संघर्षाचा भाग म्हणून कुमार वयातील सय्यदभाईंवर घरखर्चाला हातभार लावण्याची जबाबदारी आली. मग पुणे येथील भारत पेन्सिल या छोट्या कारखान्यात ते काम करू लागले. तेव्हा कामात व वर्तनात सफाईदारपणासाठी त्या कारखान्याचे मालक तात्या मराठे यांची शिकवण त्यांना उपयुक्त ठरली. मराठीत लिहायला व वाचायलाही सय्यदभाई तिथेच शिकले. दरम्यानच्या काळात सय्यदभाईंची लहान बहीण खतिजा हिचा विवाह वयाच्या चौदाव्या वर्षी झाला होता आणि एकोणिसाव्या वर्षी तिला तिच्या पतीने तोंडी तलाक दिला. त्यावेळी ती दोन मुलांची आई होती. त्या तोंडी तलाकच्या विरोधात तरुण सय्यदभाईंनी आपले नातलग, मित्र-मंडळी, मुल्ला-मौलवी, समाजातील शहाणी समजली जाणारी माणसे यांच्याकडे खतिजाची कैफियत मोठ्या पोटतिडकीने मांडली. पण प्रत्येक वेळी त्यांच्या वाट्याला निराशा व नकारघंटा आली. पुरुषांना स्त्रियांच्यापेक्षा जास्तीचे हक्क आहेत आणि असणार, हे सर्वांनी सय्यदभाईंना बजावून सांगितले. ‘तसेच रितीरिवाज आहेत, तोच धर्माचा आदेश आहे’ असेही ते सांगणे होते. सय्यदभाईंना तो अन्याय वाटत होता. मात्र धर्माच्या, रितीरिवाजाच्या व संस्कृतीच्या नावाखाली चालू असलेला तो प्रकार ‘अन्याय’ आहे, हे मान्य करणारे सय्यदभाईंना मुस्लिम समाजातून कोणीही भेटत नव्हते. 1968 या वर्षी तसा एक माणूस सय्यदभाईंना भेटला, त्याचे नाव हमीद दलवाई.

हमीद दलवाई तेव्हा वयाच्या पस्तिशीत होते. कोकणात जन्मलेले दलवाई वयाच्या पंधराव्या वर्षी मुंबईत दाखल झाले होते. राष्ट्र सेवादलातून सुरुवातीची जडणघडण आणि समाजवादी पक्षात वैचारिक घुसळण होत असतानाच दलवाईंनी, ‘थोडेच पण उत्कृष्ट लिहिणारे ललित लेखक’ म्हणून चांगलेच नाव कमावले होते, शिवाय आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ दैनिकात त्यांनी पत्रकारिता केलेली होती. 1965 मध्ये आलेल्या ‘इंधन’ या कादंबरीमुळे आणि 18 एप्रिल 1966 रोजी मुंबई येथे सात तलाकपीडित महिलांचा मोर्चा काढल्याने त्यांचे नाव महाराष्ट्रात दुमदुमत होते. त्याच दरम्यान त्यांनी उत्तर भारतात आणि पूर्व व पश्चिम पाकिस्तानच्या सीमारेषेवर जाऊन लिहिलेले रिपोर्ताज भलतेच गाजले होते. अशी सर्व पार्श्वभूमी असलेले हमीद दलवाई 1968 च्या दरम्यान पूर्ण वेळ समाजकार्यात उतरले होते आणि मुस्लिम समाजातील सुधारणांसाठी एक संघटना स्थापन करण्याच्या तयारीत होते. त्या प्रक्रियेचा भाग म्हणून व्याख्याने, चर्चासत्रे, वादसंवाद आणि बैठका यांचा त्यांनी धडाकाच लावला होता. इंडियन सेक्युलर सोसायटी ही संस्था त्यांच्या मागे आधाराला होती. अ.भि.शहा, नरहर कुरुंदकर यांच्यासारखे काही विचारवंत आणि भाई वैद्य, बाबा आढाव यांच्यासारखे काही कार्यकर्ते-नेते खंबीर पाठीराखे म्हणून पुढे आले होते. आणि अशाच एका बैठकीत भाई वैद्य यांच्या घरी हमीद दलवाई व सय्यदभाई यांची भेट झाली. ‘खतिजा ही माझ्या बंडखोरीमागची प्रेरणा होती’ असे म्हणणाऱ्या सय्यदभाईंना हमीद दलवाईंच्या रूपाने मित्र, मार्गदर्शक व तत्त्वचिंतक भेटला. त्यानंतर पुढील दशकभर सय्यदभाई हे हमीदभाईंच्या सोबत प्रत्येक लहान-मोठ्या प्रसंगात ठामपणे उभे राहिले.

1968 नंतरची दोन वर्षे दलवाईंनी महाराष्ट्रात व देशभर भ्रमंती केली. आणि मग 22 मार्च 1970 रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. हा स्थापनादिनाचा कार्यक्रम साधना साप्ताहिकाच्या त्यावेळच्या इमारतीत ‘आंतरभारती हॉल’मध्ये झाला. त्या कार्यक्रमाचे व त्याच्याआधीच्या तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन सय्यदभाई यांनी ‘दगडावरची पेरणी’मध्ये प्रत्ययकारी पद्धतीने केले आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे पहिले सचिव म्हणून सय्यदभाई यांची निवड आधीच झाली होती आणि मंडळाचे अध्यक्ष म्हणून बाबूमियाँ बँडवाले यांची निवड त्यानंतर काहीच दिवसांनी झाली. 1970 नंतरची सात वर्षे हा मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा झंझावाती कालखंड होता. मंडळाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. वैचारिक भूमिका ही भारतीय संविधानाच्या चौकटीत बसेल अशीच ठरवण्यात आली. सर्व कृतिकार्यक्रम सनदशीर मार्गाने व लोकशाहीला बळकट करणारे असतील याची निश्चिती करण्यात आली. देशाची एकता व अखंडत्व टिकविण्यासाठी प्रयत्नशील राहायचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करायचा यांवरही शिक्कामोर्तब करण्यात आले. मुस्लिम सत्यशोधक मंडळ जरी मुस्लिम समाजासाठीच काम करणार असले तरी, अंतिम उद्दिष्ट राष्ट्रीय एकात्मतता व आधुनिक समाजाची निर्मिती हेच होते.

राहिला होता प्रश्न, धर्माचे काय करायचे? कारण मुस्लिम समाजातील कोणत्याही सुधारणेला हात घालायचा तर ‘धर्म’ या नावाखाली या ना त्या प्रकारे व्यत्यय येणार! पहिला मुद्दा येणार होता शिक्षणाचा. सर्वांना शिक्षण, स्त्री-पुरुषांना शिक्षण, मुला-मुलींना एकत्रित शिक्षण, मातृभाषेतून शिक्षण, धार्मिक नव्हे तर आधुनिक शिक्षण! दुसऱ्या मुद्दा येणार होता- स्त्रीपुरुष समतेचा. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क असणार का, तोंडी तलाक धर्माने संमत केला असेल तर तो हक्क स्त्रियांना का नाही? बहुपत्नीत्वाचा अधिकार पुरुषांना का असावा? समान नागरी कायदा का नसावा? ही यादी तशी बरीच मोठी होती. आजचे समाजहित लक्षात घेऊन धर्मातील जे अनिष्ट आहे ते त्याज्य समजायचे, अशी ती भूमिका होती. पण अगदी सुरुवातीच्या, साध्या वा प्राथमिक वाटाव्यात अशा सुधारणांसंबंधातही प्रचंड विरोध होऊ लागला, मोठे अडथळे निर्माण होऊ लागले. सभा उधळून लावणे, मोर्चे अडवणे, त्यात सामील होणाऱ्यांना धमक्या येणे, कार्यकर्त्यांवर हल्ले होणे असे सर्व सुरूच होते. आणि तरीही त्या सर्वांचा सामना करीत हमीद दलवाई यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम सत्यशोधक मंडळ दमदार वाटचाल करीत होते. तेव्हा सय्यदभाई हे हमीदभाईंच्या खांद्याला खांदा लावून उभे होते.

1977 मध्ये हमीद दलवाईंचे निधन झाले. तेव्हा मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील अनेक नेते व कार्यकर्ते कार्यरत होते. अब्दुल कादर मुकादम, फकरुद्दीन बेन्नूर, हुसेन जमादार, अन्वर शेख, वझिर पटेल, अन्वर राजन इत्यादी. हमीदभाईंच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई याही नंतर सक्रिय झाल्या. मात्र या सर्वांना जोडून घट्ट ठेवणारे नेतृत्व नव्हते. त्यामुळे मुस्लिम सत्यशोधक मंडळाला गळती लागली. कधी नेतृत्वाच्या मुद्यावरून, कधी कार्यशैलीवरून, कधी प्राधान्यक्रमावरून तर कधी वैचारिक भूमिका काय घ्यावी यावरून. त्यात भर म्हणजे ज्या समाजासाठी काम करायचे तिथले सर्वसामान्य लोक पाठिंबा देऊ शकत नाहीत, त्यांच्यावर गारूड करून असणारे मुल्ला-मौलवी कडवा विरोध करून काफिर ठरवताहेत, हिंदुत्ववादी शक्ती त्यांना सोईचा भाग घेऊन विपर्यास करताहेत आणि कोणताच राजकीय पक्ष जवळीक दाखवायला तयार नाही अशी ती स्थिती होती. तरीही दलवाईंच्या नंतर सात-आठ वर्षे फाटाफुटी होत असूनही सत्यशोधक मंडळ चांगले कार्यरत राहिले. मात्र 1986 मध्ये राजीव गांधी यांच्या काळात शाहबानो खटल्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरवण्यात आला. त्याचा गैरफायदा हिंदुत्ववादी संघटना, रा.स्व.संघ व भाजपा यांनी घ्यायला सुरुवात केली. बाबरी मशीद पाडून राम मंदिर उभारण्यासाठी आंदोलन सुरू झाले. परिणामी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे होते ते पाठीराखेही अंतर राखू लागले, काहीजण बाहेरच पडले. त्यानंतर दोन दशके मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणखी मर्यादित झाले. मात्र गेल्या दशकभरात शमसुद्दीन तांबोळी अध्यक्ष झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था प्राप्त होऊ लागली. या संपूर्ण प्रक्रियेत सय्यदभाईंनी ना मंडळाची साथ कधी सोडली, ना हमीद दलवाईंचा चा विचार व भूमिका यापासून अंतर राखले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष 2020 मध्ये संपले. तेव्हापर्यंत ते कार्यरत होते. अध्यक्षपद व सचिवपद हा कालखंड संपल्यावरही ते तेवढेच सक्रिय राहिले. म्हणजे दलवाईंच्या विचारांची संपूर्ण 55 वर्षे साथ करणारा व त्यापासून तसूभरही न ढळलेला सय्यदभाई हा एकमेव कृतिशील कार्यकर्ता होता, तो आता गेला आहे.

सय्यदभाईंच्या काही वर्तनासंदर्भात मागील दशकात काही नाराजीचे सूर पुरोगामी वर्तुळातून उमटले. उदा. तोंडी तलाक प्रश्नावर सय्यदभाईंनी (सत्यशोधक मंडळासह) पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली तेव्हा, मुंबई येथील चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला तेव्हा, दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने दिलेला पद्मश्री सन्मान स्वीकारला तेव्हा. या प्रसंगांत सय्यदभाईंच्या निष्ठा व विचार याविषयी शंका नाही आली कोणाला, पण त्यांच्या अशा वर्तनामुळे हिंदुत्ववादी शक्ती त्याचा गैरफायदा घेतील असा तो आक्षेप होता. मात्र इतकी वर्षे सार्वजनिक जीवनात वावरलेल्या सय्यदभाईंना ते कळत नव्हते असे थोडेच आहे? ‘विरोधक मित्र’ हा त्यांचा आवडता शब्द होता आणि ‘मतभेद असू द्या, चर्चा/संवाद व्हायलाच  हवेत’ अशी त्यांची धारणा होती, हे लक्षात घेतले तर त्यांच्या त्या वर्तनाचे आश्चर्य वाटण्याचे आणि त्यांच्याविषयी गैरसमज/मनात अढी ठेवण्याचे काहीच कारण नाही.

सय्यदभाईंविषयी आणखी एक कारण मनात अढी ठेवणाऱ्या हितचिंतकांना आणि विपर्यास करणाऱ्या हिंदुत्ववादी शक्तींना मिळाले आहे. ते म्हणजे सय्यदभाई यांनी मरणोत्तर देहदानाचा निर्णय घेतला होता, तशी नोंदही केली होती, मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तसे न करता दफन केले आहे. हे खरे आहे की, सय्यदभाई ज्या पद्धतीने जगले ते पाहता त्यांची इच्छा प्रत्यक्षात आणणे हे त्यांच्या कुटुंबीयांचे कर्तव्य होते, त्यांचा सन्मान वाढवणारे ठरले असते. पण तसे नाही घडले म्हणून समर्थक व विरोधक यांच्यापैकी कोणीही गहजब करू नये. कारण सय्यदभाईंनी सांगूनच ठेवले आहे, ‘मी दगडावरची पेरणी करत आलोय, त्यातून उवगते कमीच आणि उशिरा!’


हेही पाहा : सय्यदभाईंच्या मुलाखतीचा व्हिडिओ

Tags: मुस्लिम सत्यशोधक मंडळ हमीद दलवाई सय्यदभाई sayyadbhai muslim satyashodhak samaj weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके