डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

चमत्काराचा भुलभुलैय्या आणि विवेक

एखाद्या व्यक्तीच्या अंगात सोमनाथाचा संचार होतो. संचार- अवस्थेत अशा व्यक्तीच्या हातातून आपोआप विभूती अथवा रुद्राक्ष निघू लागतात. याबाबतची वस्तुस्थिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चित्रफितीच्या साहाय्याने भरभक्कमपणे मांडते; तरीही या सिद्धीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्ताने 25 डिसेंबरला भव्य समारोहाचे आयोजन केले जाते. पक्षभेद विसरून आमदार, खासदार त्यात उत्साहाने सामील होतात. 

एखाद्या व्यक्तीच्या अंगात सोमनाथाचा संचार होतो. संचार- अवस्थेत अशा व्यक्तीच्या हातातून आपोआप विभूती अथवा रुद्राक्ष निघू लागतात. याबाबतची वस्तुस्थिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चित्रफितीच्या साहाय्याने भरभक्कमपणे मांडते; तरीही या सिद्धीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्ताने 25 डिसेंबरला भव्य समारोहाचे आयोजन केले जाते. पक्षभेद विसरून आमदार, खासदार त्यात उत्साहाने सामील होतात. 

राष्ट्रवादीचे आमदार संयोजनाचे अध्यक्षपद स्वीकारतात. मुख्यमंत्र्यांचे बंधू कार्यक्रमास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणण्याचा शब्द देतात. या सर्व घडामोडींच्या मोठमोठ्या बातम्या झळकतात. फुले-शाहू-आंबेडकर यांचा उठताबसता जप करणाऱ्या महाराष्ट्रातील हे दारुण सामाजिक वास्तव आहे. मसले चौधरी (ता.मोहोळ, जि.सोलापूर) येथे अनुराधाबाई देशमुख यांच्या सिद्धीप्राप्तीचा रौप्यमहोत्सव 25 डिसेंबरला घडून येत आहे.

बहुसंख्य लोकांचा असा पारंपरिक विश्वास आहे की, विश्वाचे नियंत्रण करणारी अलौकिक शक्ती आहे. चमत्कार करण्याचे बाबांचे सामर्थ्य हे त्या शक्तीच्या कृपाप्रसादाचे रूप आहे. सत्यसाईबाबा स्पष्टपणे सांगतातच की, माझे चमत्कार हेच माझे व्हिजिटिंग कार्ड आहे सत्यसाईबाबांना त्या व्हिजिटिंग कार्डाद्वारे लोकांनी समजून घ्यावे, ते हेच की आपल्या मुक्तीसाठी जगन्नियंत्याने पाठवलेला हा महामानव आहे. चमत्कार करण्याचे दैवी सामर्थ्य लाभलेला हा बाबा आपले प्रारब्ध समजू शकतो, ते बदलू शकतो. बाबांच्या रूपाने जणू देवच बोलतो, असे त्यांच्या भक्तांना वाटते. त्यामुळे बाबा वापरत असलेले आत्मा, ब्रह्म, मोक्ष, परमार्थ हे शब्द गूढ वाटण्याऐवजी ओळखीचे वाटतात. म्हणजे चमत्कार व या शब्दांचा वापर यांद्वारे भक्तगणांच्या मनावर हे बाबा अथवा महाराज लोक कब्जा मिळवू शकतात. 

ही सर्व मानसिकता अव्वल दर्जाच्या बौद्धिक गुलामगिरीचे लक्षण आहे. ही गुलामगिरी राजकीय गुलामगिरीपेक्षा अधिक पक्की व जटिल आहे. परंपरेने चालत आले आहे ते उत्तम आहे आणि जे उत्तम नाही ते अपरिहार्य आहे, अशी बहुसंख्य भारतीयांची भावना आजही आहे. याबाबत चिकित्सा नको असते. मग सुधारणा तर दूरच राहिली. बदल करावयाचा असेल, तर तो ईश्वरी अवताराने करावा हे मनावर बिंबवले गेले आहे. म्हणजे चमत्कार ही अवतारी पुरुषाची एक खूण मानल्यास, चमत्कार करणारा बाबा लोकांची शरणागत मानसिकता बळकट करत असतो, असेच म्हणावे लागेल. आपल्या कर्तृत्वाने समर्थ व समृद्ध व्हावे, याऐवजी स्वतंत्र प्रज्ञेला सोडचिट्ठी देऊन विभूतीला शरण जावे, ही खोडच समाजाला लागली आहे. 

अशा विभूती छोट्या-मोठ्या चिल्लर चमत्कारांचे आविष्कार करत गावोगावी मौजूद आहेत आणि लोकही आपली बुद्धी गहाण टाकून आपल्या दैनंदिन प्रश्नांविषयी उदासीन बनत आहेत. चमत्कार करणारे बाबा हे संकट अधिक सोपे भासवून अधिक गडद करतात. ज्या देशाच्या घटनेत कार्यकारणभावावर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोन हे नागरिकांचे कर्तव्य सांगितले आहे, त्या देशात असे बाबा व त्यांचे चमत्कार यांच्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाची हत्या करण्याचा कारखानाच जणू चालवला जातो. 

यातून या समाजाची सुटका कधी आणि कशी होणार, हा एक अव्वल दर्जाचा सामाजिक प्रश्न आहे. बहुसंख्य बाबा हेच सांगतात की, जग मिथ्या आहे, क्षणभंगुर आहे. यामुळे समाजाची जिज्ञासा मरते, निवृत्ती वाढते, दैववाद व अंधश्रद्धा बोकाळते. अन्यायाची चीड, प्रतिकाराची तळमळ, स्वकर्तृत्वाने बदलण्याची पुरुषार्थी वृत्ती या जाणिवा, चमत्काराची बुवाबाजी खोडून आणि खणून काढते. चमत्कार करणाऱ्या बाबाच्या मागे लागलेला समाज आळशी आणि उदासीन बनण्याचा धोका असतो.

हे सारे घडत असून देखील बाबांच्याकडे जाणाऱ्या लाटा अध्यात्माच्या नावाने उसळत आहेत. भोंदूगिरी करणारा बाबा आध्यात्मिक कसा राहू शकतो, हे एक न समजणारे कोडे आहे. प्रत्येक बाबा आध्यात्मिक कल्याणाची ग्वाही देतो. परंतु प्रत्येक धर्माचे, पंथाचे आणि बहुदा प्रत्येक बाबा महाराज स्वामी बापू यांचे अध्यात्म वेगळे असते. अनेकदा ते परस्परविरोधीही असते. 

तरीही बौद्धिक प्रतिवादाने माणसाच्या मनातील या कथित आध्यात्मिकतेचा बुरखा फाडला जाऊ शकत नाही. म्हणून शब्दबंबाळपणाच्या आध्यात्मिक परिभाषेपलीकडे जाऊन प्रश्न असा उपस्थित करावयास हवा, की खरा आध्यात्मिक पुरुष ओळखायचा कसा? त्याची सोपी खूण अशी की, व्यक्ती जीवनात संयमी आणि सदाचारी असते, अपरिग्रही राहते. भौतिक सुखापलीकडे जीवनाचे श्रेयस आहे व ते भौतिक सुखापेक्षा अनंतपटीने मोलाचे आहे, असे त्या व्यक्तीला वाटते. मात्र या सगळ्याचा डांगोरा पिटत खरी आध्यात्मिक व्यक्ती शांत वसत नाही. ती करुणेने मानवसन्मुख कृती करते. अध्यात्म ही त्या व्यक्तीच्या आंतरिक मानसिक विकासाची साधना असते. त्यामुळे जीवनात शुचिता आणि पावित्र्य येते व त्याचा सहज प्रत्यय इतरांना येतो. 'जे आचरणात येते ते अध्यात्म, बाकीची सर्व पोकळ बडबड वा पोपटपंची', या निकषावर महाराजांची आध्यात्मिकता तपासता येते, तपासावयास हवी. यासाठी गाडगेबाबांसारखे चांगले उदाहरण शोधूनही सापडणार नाही. 

अंगठावहाहर वाबांनी कोटघवधी रुपये जमवले, खर्च केले, पै नू पैचा हिशोब चोख ठेवला. आयुष्यभर स्वतःची मालमत्ता म्हणून त्यांच्याकडे होती ती फक्त हातातील काठी अंगावरच्या चिंध्या आणि डोक्यावरचा खापराचा तुकडा. स्वतः पैसे मिळवून बांधलेल्या धर्मशाळेतील एका खोलीत आपली मुलगी राहत आहे, हे समजताच त्यांनी तिला तेथून बाहेर काढले. 

जन्मभर चमत्कारांना कठोर विरोध केला. हे वैराग्य, अध्यात्म आणि डोळसपणा कुठे, आणि आजच्या कोणत्याही लोकप्रिय बाबा बुवा-महाराज बापू-स्वामी माताजी यांचे वर्तन कुठे? महागडया आलिशान गाड्या, पंचतारांकित आश्रम, देशोदेशी पसरलेले भव्य संगमरवरी प्रासाद, स्वतःचे विमानतळ, कोट्यवधींचे विश्वस्त निधी आणि त्याचे सर्व अधिकार स्वतःच्या अथवा घरच्यांच्या अथवा होयवांच्या ताव्यात ठेवण्याची धडपड या बाबा-युवांची असते. संयम, सदाचार, अपरिग्रह, शुचिता, चारित्र्य या खन्या आध्यात्मिक कसोटा मानल्या, तर कथित बाबांचे व गुरूंचे वस्त्रहरण फार लवकर व स्पष्टपणे होऊ शकते.

आज आर्थिक असुरक्षितता फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यातून अगतिकता व अस्थिरता येते. दुसऱ्या बाजूला चंगळवादी उपभोग-संस्कृतीचा रतीब विविध प्रसारमाध्यमांद्वारा घरोघरी घातला जात आहे. अशा वातावरणात चमत्काराचा भुलभुलैय्या निर्माण करणारा बाबा फार हवाहवासा वाटतो. त्याबरोबरच त्याची आध्यात्मिक परिभाषा दिलासा देणारी वाटते आणि मग या भुलभुलैय्यात शिरून आपण काय कमावले, काय गमावले याचा विचार करण्याची गरज राहात नाही. ही वाट व्यक्तीच्या आणि समाजाच्या अधोगतीकडे जाते, परिवर्तनाला दूर लोटते.

या भुलभुलैय्यातून स्वतःला आणि समाजाला दूर ठेवण्यासाठी असा संकल्प करावयास हवा की, मी स्वतःवरचा विश्वास गमावणार नाही. माझी अक्कल चमत्कार करणाऱ्या बाबा-महाराज-बापू-माताजी-देवी यांच्या चरणावर गहाण टाकणार नाही. स्वतःच्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे व धैर्याने जगणे यात माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वतःचे प्रश्न काय आहेत, ते कसे सोडवायचे, ते कुठपर्यंत सुटू शकतात याचे भान आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद यांचा वापर करून येते. 

सर्वमान्य नीतिसंकेतांचे पालन करण्याने आचरणात कणखरता येते. जो गुरू चमत्काराचा दावा करतो, चमत्कारांना, स्वतःकडे असलेल्या दैवीशक्तीचा आविष्कार मानतो आणि त्याद्वारे भक्तांच्या सर्व प्रश्नांची कायमस्वरूपी उत्तरे देण्याची जबाबदारी घेतो, तो खरे तर भक्ताला अधिकाधिक गाळात नेतो, परावलंबी बनवतो. खरा गुरू भक्ताला स्वतःच्या पायावर उभे राहून जीवनसंघर्षाच्या रणधुमाळीत लढण्याची ताकद व हिंमत देतो. त्याला सजग, समर्थ व डोळस बनवतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या रूपाने असा एक गुरू प्रत्येक व्यक्तीकडे असतोच. चमत्काराच्या भुलभुलैय्यात अडकल्यानंतर हा वैज्ञानिक दृष्टिकोन पद्धतशीरपणे दुबळा, पांगळा आणि आंधळा बनवला जातो. हे तर माणसाचे माणूसपणच संपवणे झाले. म्हणूनच माणसाचे विवेकी स्वातंत्र्य राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी चमत्काराचा भुलभुलैय्या भेदून टाकावयास हवा.

Tags: बाबा महाराज स्वामी बापू बौद्धिक गुलामगिरी राजकीय गुलामगिरी अलौकिक शक्ती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सत्यसाईबाबां weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके