डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मोदीत्वाचा विजय : मर्यादा आणि इशारा

गुजरात विधानसभा निवडणुकीत मोदींची लोकप्रियता, त्यांची आक्रमक कार्यशैली, हिंदुत्व आणि विकास यांची सांगड घालण्याची रणनीती 'क्लिक' झाली. कार्यक्षम कारभाराला धार्मिक व प्रादेशिक अस्मितेचे अस्तर आणि त्याला उठाव देणारे धडाकेबाज वा कणखर व्यक्तित्व यातून मोदीत्व साकार झाले.

गुजरात विधानसभा निवडणुकीत मोदींची लोकप्रियता, त्यांची आक्रमक कार्यशैली, हिंदुत्व आणि विकास यांची सांगड घालण्याची रणनीती 'क्लिक' झाली. कार्यक्षम कारभाराला धार्मिक व प्रादेशिक अस्मितेचे अस्तर आणि त्याला उठाव देणारे धडाकेबाज वा कणखर व्यक्तित्व यातून मोदीत्व साकार झाले. मायावतीच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगाने देशातील राजकारणाच्या जातीय समीकरणांना हादरा बसला. 'मोदीत्व' नावाचा हिंदुत्वाचा नवा बँड मोदींनी यशस्वी करून दाखविला. हे हिंदुत्व केवळ कपाळी भगवा टिळा वा गळ्यात भगवे रुमाल मिरवणारे नाही, त्याला विकासाची, कार्यक्रम प्रशासनाची जोड आहे. 

तमाम गुजराती उद्योग- व्यापारी समूह, स्टॉक मार्केट ब्रोकर्स, नवीश्रीमंत, अनिवासी गुजराती (मुख्यत: अमेरिकेतील) मोदीच्या बाजूने उभे राहिले, यापुढे ते अधिकच ठामपणे राहतील. मात्र या साऱ्या राजकारणाचा आत्मा हिंस्र हिंदुत्ववाद हाच आहे, याचे विस्मरण होऊ देता कामा नये. आता अटलबिहारींच्या उदारमतवादी मुखवट्याची व आम्हीच खरे सेक्युलर असे दांभिकपणे पुकारण्याची गरज या हिंदुत्वाला नाही. त्यामुळे भारतीय धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादापुढचा धोका वाढला आहे आणि गुंतागुंतीचा झाला आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

गुजरातमध्ये काँग्रेस कडवी लढत देईल अशी अपेक्षा होती. त्या लढतीची बरीचशी मदार भाजपमधील बंडखोरीवर होती. केशुभाई पटेल यांची 'पटेल अस्मिता', गुजराती अस्मितेला छेद देईल असे भाकित वर्तवले जात होते. भाजपने केशुभाई व इतर बंडखोरांवर शिस्तभंगाची कारवाई केली नाही, यामुळे केशुभाईंचा दबदबा वाढला होता. प्रत्यक्षात सौराष्ट्र या केशुभाईंच्या बालेकिल्ल्यातही भाजपचे कसलेच नुकसान झाले नाही. काँग्रेसची झोळी रिकामीच राहिली. यामुळे केशुभाई पटेल व काँग्रेस दोन्ही निष्प्रभ झाले. 

'महात्मा गांधींच्या गुजरातने मोदींना निवडून देऊन चूक केली, पण ती यावेळी नक्की सुधारली जाईल. दलित, ओबीसी, आदिवासी व मुस्लिम समाज मोदींविरुद्ध मतदान करतील' असा मतप्रवाह होता. जाणकारांच्या मते जातीची समीकरणे काँग्रेसने अधिक चांगली मांडली होती. गुजरातमधील विकास हा श्रीमंतांचा विकास असल्याने ग्रामीण भागातील 'आम आदमी' लोकसभा निवडणुकीप्रमाणे काँग्रेसला साथ देईल असे म्हटले जात होते, हे सर्व तर्क फोल ठरले. 

सलग वीस वर्षे गुजरातवर राज्य करण्याची संधी भाजपला फक्त गुजरातमध्ये मिळाली आहे. गुजरात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे असे मानले जाते. परंतु त्यातील ही यशसिद्धी भाजपलाही काही नवेच प्रश्न निर्माण करणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपच्या इतिहासात प्रथमच त्यातील एखाद्या व्यक्तीने, संघपरिवार व पक्ष या पलीकडे स्वत:ला प्रक्षेपित करून भली मोठी प्रतिमा उभी केली. संघ परिवार, विश्व हिंदू परिषद, भाजपमधील सहकारी या सर्वांना नरेंद्र मोदी यांनी अजिबात जुरमानले नाही. 

संघ परिवार व पक्ष यांच्या पलीकडे स्वत:च्या राजकारणाचा व्यक्तिकेंद्री पाया उभा करण्याचा मोदींचा हा प्रयत्न, संघ व भाजपच्या शिस्तीला परवडणारा नाही. जननेते असलेल्या अटलबिहारी वाजपेयी वा लालकृष्ण अडवाणी यांनीही अशी हिंमत केलेली नाही. संघटना ही नेहमीच व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, फक्त मोदी आणि मोदी आणि मोदीच ही घंटा संघ परिवाराला भावी काळासाठी भयसूचक ठरू शकते.

मोदींच्या एका चाहत्याने विजयाची प्रतिक्रिया देताना 'गुजरात म्हणजेच भारत' असे उद्गार काढले आहेत. वास्तव वेगळे आहे, विरोधी आहे. नरेंद्र मोदी भले गुजरातमधले हीरो असतील, पण राजकीय पाया प्रादेशिक भावनेचा आणि मुस्लिम विरोधी प्रतिमा यामुळे त्यांच्या भारतीय पातळीवरील नेतृत्वाच्या शक्यतेला मर्यादा येतात. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये भाजपाबरोबर राहिलेले अनेक पक्ष, या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील वा प्रभावाखालील भाजपाबरोबर जाताना दहा वेळा विचार करतील. 

भारताचे स्वरूप इतके व्य व गुंतागुंतीचे आहे की प्रादेशिक राजकारणातील देदिप्यमान यशाची राष्ट्रीय पातळीवर पुनरावृत्ती करणे शक्य होत नाही. गुजरात हे देशातील सर्वाधिक विकसित राज्य आहे. त्यामधील राजकीय यशाचा फॉर्म्युला उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड यांसारख्या मागास राज्यांना लागू होणार नाही, हीदेखील मोठी मर्यादा आहेच.

लोकसभा निवडणुकीनंतर सोनिया गांधी यांना स्वत:च्या बळावर कोठेही घसघशीत विजय मिळवता आलेला नाही. काँग्रेसपरंपरेत पराभवाला स्थानिक नेतृत्व जबाबदार असते, विजय मात्र केवळ गांधी घराण्यामुळेच मिळतो. गुजरात काँग्रेसमध्ये माधवसिंह सोळंकी यांच्यानंतर नवे नेतृत्व आलेले नाही. पक्ष संघटनेत तरुणांना दिलेले स्थान आणि त्यांना गुजरातच्या निवडणूक प्रचारात उतरविणे याचा फायदा झालेला नाही. डॉ. मनमोहन सिंग यांची प्रतिमा सभ्य माणसाची आहे, धुरंधर पंतप्रधानाची नाही. सत्तात्यागाच्या वलयापलीकडे सोनिया गांधी यांच्या नावावर गेल्या साडेतीन वर्षांत फारसे काही कर्तृत्व जमा नाही. 

पक्ष म्हणून काँग्रेसचा असलेला सुस्तपणा तर उबग आणणारा आहे. अशा परिस्थितीत या निवडणुकीच्या निकालाने काँग्रेस पक्षाने अंतर्मुख होण्याची गरज आहे. वर्षभरात मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली येथील विधानसभा निवडणुका आणि त्या पाठोपाठ लोकसभा निवडणुका होतील, त्यावेळी काँग्रेसला मतदारांनी का स्वीकारावे याचे कारण व तशी करणी काँग्रेस पक्षाच्या आजच्या राजकारणात दिसत नाही. विकसित असलेल्या आणि गुजरातसारखेच झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या महाराष्ट्रातील सत्तारूढ काँग्रेसचा कारभार इतका आत्मसंतुष्ट व म्हणून लोकपराङ्मुख आहे की गुजरातकडून येणारे वारे महाराष्ट्रावर वाहणारच नाहीत असे नाही. म्हणून मोदीत्वाच्या विजयाने स्पष्ट झालेल्या वास्तवातून मिळणारे हे इशारे काँग्रेसने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

Tags: गुजरात विधानसभा निवडणुक मोदीं अनिवासी गुजराती नवीश्रीमंत स्टॉक मार्केट ब्रोकर्स गुजराती उद्योग- व्यापारी समूह weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके