डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शेतीला सर्वच विकासोन्मुख देशांत अग्रस्थान द्यावे लागते. चीनही त्याला अपवाद नाही. त्या खालोखाल या देशांना छळणारा प्रश्न ऊर्जेचा आहे श्रमिक आणि यंत्रे याची उपासमार कोणालाच परवडण्यासारखी नसते!

विकसित आणि विकासोन्मुख देशातील ही दरी वाढत जाण्याची लक्षणेच सध्या तरी अधिक दिसत असून येत्या हजार आठवड्यात म्हणजे वीस वर्षांत जर ही दरी बुजवता आली नाही तर ती कधीच बुजवता येणार नाही.

शेती, उद्योगधंदे, संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत आद्यतन असले पाहिजे असा चीनचा प्रयत्न आहे. त्यांनी अशा शंभरावर क्षेत्रांची जंत्री केली असून आठ क्षेत्रांना अग्रक्रम दिला आहे.

शेतीला सर्वच विकासोन्मुख देशांत अग्रस्थान द्यावे लागते. चीनही त्याला अपवाद नाही. त्या खालोखाल या देशांना छळणारा प्रश्न ऊर्जेचा आहे श्रमिक आणि यंत्रे याची उपासमार कोणालाच परवडण्यासारखी नसते!

नादातील ध्वनिलहरींचा वापर

ऊर्जा संपादनासाठी परंपरागत आणि नव्या अशा दोन्ही मार्गाचा उपयोग केला पाहिजे, असे चीनचे याबाबत धोरण आहे. चीनमध्ये वादातीत ध्वनिलहरींचा (अल्ट्रा सॉनिक) वापर खनिज तेलाच्या शोधासाठी केला जात असून चीनचे हे वैशिष्टय आहे. जळणाचा अधिक कार्यक्षम उपयोग व्हावा यासाठीदेखील नादातीत ध्वनिलहरींचा वापर चीन करीत आहे. पेट्रोल आणि डिस्टील्ड वॉटर यांचा संयोग नादातीत ध्वनिलहरींनी करून पेट्रोलची ज्वलनशक्ती वाढवण्याचा प्रयत्न चीन करीत आहे. कच्चा मालासंबंधीही चीनमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. उत्पादन वाढवण्यासाठी गणकयंत्राचा उपयोग उद्योगधंद्यात वाढत्या प्रमाणावर चीन करीत आहे.

अवकाश संशोधनाकडे चीन बारकाईने लक्ष देत असून अवकाश छायाचित्रणाचा वापर पीक निरीक्षणासाठी चीन करीत आहे. विज्ञान तंत्रज्ञानाची प्रौढी शिक्षणाशी गाठ घालून लोकांना विज्ञानाभिमुख करण्याचा प्रयत्न चीनमध्ये शिक्षणाच्या अनुरोधाने होत असून अनुवंश रचनाशास्त्राकडे (जेनेटिक इंजिनियरिंग) विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे. शेतीपद्धतीत यामुळे अनेक क्रांतिकारक बदल घडून आले आहेत. तांदुळाच्या पाचपट पौष्टिक नव्या जाती तयार करण्यात आल्या आहेत. जीव रसायनाचा सखोल अभ्यास चीनमध्ये सुरू आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांशी चीनने संधान बांधले आहे.

वरदान आणि शाप

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाने एका बाजूला मानवजातीपुढे समृद्धीचे वरदान दिले असले तरी दुसऱ्या बाजूला मानवाला आत्मघाताच्या कडेलोटापाशीही आणून उभे केले आहे. माणसाला समृद्धीच्या वरदानाने नुसते लालचावण्याऐवजी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांनी त्याला सावधानतेचा इशारा देण्याची समयज्ञताही दाखवली पाहिजे. माणसाची अमर्याद उपभोगपरायणता त्याला विनाशाकडे घेऊन जाईल अशी भीती आहे.

वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण मानवी जीवित धोक्यात आणीत आहे. पण त्याचे पुरेसे भान आपल्याला नाही. पेट्रोल, खनिज तेले आणि अन्य इंधनांचा वापर हे सुसंकृतपणाचे गमक मानले जात असल्याने कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण तथाकथित सुसंस्कृत राष्ट्रोमुळेच वातावरणात वाढत आहे. सामान्यतः वृक्षवनस्पती हा कार्बन डायऑक्साईड पचवून ऑक्सिजन उपलब्ध करून देतात पण शहराच्या वाढीने निसर्गाचे हे रहाटगाडगे मोडण्याची भीती आहे. काचेच्या भिंगातून सूर्यप्रकाश आरपार जातो तेव्हा जसे परिणाम होतात तसेच परिणाम कार्बन डायऑक्साइडच्या थरातून सूर्यकिरण पृथ्वीच्या पाठीवर येतात त्याही वेळी होतात. पण ही निर्माण झालेली उष्णता वातावरणाबाहेर जाऊ शकत नाही आणि त्यामुळे हवा अधिकाधिक गरम होत जाते. येत्या तीस-चाळीस वर्षांत पृथ्वीचे उष्णतामान 3 ते 5 अंशांनी वाढेल. त्याचा परिणाम असा होईल की उष्णकटिबंधांतील देश वाळवंटी प्रदेश बनतील आणि शीतकटिबंधातील बर्फाचे थर वितळून समुद्राच्या पाणी पातळी अनेक मीटर्स वाढेल.

हे पांघरून गेले तर... 

पृथ्वीच्याभोवती ऑझोन वायूचाही एक पर लपेटलेला आहे. ह्या थरात अल्ट्राव्हायोलेट किरण शोषून घेतले जातात. हा थर माणूस आपल्या बेभानपणाने पातळ करीत असून त्यामुळे सूर्यकिरणांनी माणसाची कातडी भाजून निघेल आणि त्वचेचा कर्करोग अनेकांना ग्रासून टाकील अशी शक्यता आहे. कार्बन डायऑक्साइडच्या वाढीने ओझोनचे संरक्षक कवच नाहीसे होण्याचा धोका फार मोठा आहे. ओझोनचे हे कवच येत्या शतकाअखेर 10 ते 20 टक्के कमी होईल. पण त्याचा परिणाम केवळ माणसालाच भोगावा लागेल असे नाही. वृक्ष-वनस्पती आणि अन्न धान्यांवरही त्यांचा परिणाम होईल.

शेष द्रव्यांचा प्रश्न

अणुऊर्जेच्या वाढत्या वापराबरोबरच त्यातून निर्माण होणाऱ्या निरुपयोगी अवशेषांचे काय करायचे हाही प्रश्न बिकट होत जाणार. ही किरणोत्सर्जी निरुपयोगी द्रव्ये कुठे टाकायची ही एक नवी डोकेदुखी पुढारलेल्या जगाला झाली आहे. ह्या द्रव्यांचे किरणोत्सर्जन हजारो वर्षे चालू राहाते आणि ते आरोग्यदृष्टया फार घातक असते. अण्वस्त्रांच्या विध्वंसक शक्तीबद्दल तर न बोललेलेच बरे. आज सहा राष्ट्रांजवळ अण्वस्त्रे आहेत. जगातला तिसरा हिस्सा समृद्ध राष्ट्रांचा आणि बाकीचा हिस्सा वंचितांचा ही विषमता अण्वस्त्र युद्धाला जन्म देण्याची भीती आहे.

दारिद्रय, उपासमार, लोकसंख्यावाढ आणि रोगराईने त्रस्त झालेल्या बहुसंख्य लोकांना त्याच अवस्थेत रहावे लागले तर स्फोट होईल. हे टाळायचे तर देश-काल-पात्र यांचा विचार करून विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून विकास साधावा लागेल. अल्पप्रमाण यंत्र कार्यक्षम असू शकत नाही असे म्हणायला जागा नाही. पण विकासोन्मुख देशांनी मूलभूत संशोधनाच्या नादी लागू नये. त्यांनी उपयोजित तंत्रज्ञानाचा आसरा करावा असे म्हणण्यात अर्थ नाही. मुलभूत संशोधन करता करताच नवी प्रशिक्षित माणसे तयार होत असतात.

ही भीषण विषमता

जगात विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधन आणि विकास यासाठी जो एकूण खर्च होतो त्यातला फक्त 2 टक्के खर्च विकासोन्मुख देशांत होतो आणि 18 टक्के विकसित देशांत होतो. जगात आज जे एकूण क्रियाशील शास्त्रज्ञ आहेत त्यांतले 90 टक्के औद्योगिक दृष्टया विकसित देशांत सामावलेले आहेत. विविध संशोधनांचे स्वाधिकार नोंदवले जातात. त्यापैकी फक्त 1 टक्का नोंदणी विकासोन्मुख देशांतून झालेली असते विकसित आणि विकासोन्मुख देशातील ही दरी वाढत जाण्याची लक्षणेच सध्या तरी अधिक दिसत असून येत्या हजार आठवड्यात म्हणजे वीस वर्षांत जर ही दरी बुजवता आली नाही तर ती कधीच बुजवता येणार नाही. पण हे करायचे तर मुलांपासून प्रारंभ करावा लागेल. त्यांच्यांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल नव्या जाणिवा निर्माण कराव्या लागतील. त्यासाठी त्यांना यांत्रिक व वैज्ञानिक खेळणी आधी द्यावी लागतील. निदान दहा लाखामागे एक तंत्रनिकेतन निर्माण करावे लागेल.

हे काम कडा चढून जाण्याइतके बिकट आहे. पण दमछाक करणारी ही चढण एकदा चढून झाली की मग मोकळ्या वाऱ्याचा आस्वाद त्यांना घेता येईल. आपल्या पद्धतीने ते विज्ञानाचा व तंत्राचा वापर करू शकतील.

स्वीकारण्याचे पथ्य

असे घडते असे की विज्ञान-तंत्रज्ञान आत्मसात करणारा तरुण स्वतःलाच जणू पारखा होतो! तो जणू परदेशचा प्रतिनिधी बनतो. खरे तर विज्ञान-तंत्रज्ञानाचा स्वीकार त्याने आपल्या जनसमाजाचा प्रतिनिधी म्हणून केला पाहिजे. पण दिसते असे की विज्ञान-तंत्रज्ञान संपादन करून एकदा तो यंत्रोद्योगात शिरला की, विदेशी संघटनातंत्रांचा वापर करून तो स्वतः सधन बनतो आणि आपल्याच दरिद्री आणि मागासलेल्या बांधवांची आर्थिक स्थिती पालटावी म्हणून काहीच करीनासा होतो! विज्ञान-तंत्रज्ञान हे स्वभावतःच जागतिक असते हे खरे, पण त्याचा वापर करताना आपल्या देशाच्या व समाजाच्या परिस्थितीचा विचार करून त्याचा वापर केला पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करताना पाश्चिमात्यांच्या विचारसरणीच्या खुंटयाला इथल्या विज्ञान-तंत्रज्ञांनी बांधून घेता कामा नये.

समुचित तंत्राचा प्रश्न

समुचित विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रश्न या संदर्भात फार महत्त्वाचा बनतो. कृषी उत्पादनाच्या वाढीच्या दृष्टीने त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि त्या उत्पादनाच्या पायावर उद्योगधंद्यांची वाढ कशी करता येईल त्याचा शोध घेतला पाहिजे. पाश्चात्य तंत्रज्ञानाची जशीच्या तशी यंत्ररूपाने उसनवारी त्यांना करता येणार नाही मानवबळाचा विनियोग कमाल प्रमाणात करून घेणारे विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यांना पाश्चात्यांकडून मिळालेल्या शिक्षणाच्या आधारे विकसित करावे लागे

भारताची आघाडी

या दृष्टीने विविध देशांत अनेक तऱ्हेने अभ्यास सध्या केला जात आहे. विशेषत: शेती हा विषय जमिनीशी निगडित असल्याने समुचित तंत्राचा विकास करणे त्या क्षेत्रात क्रमप्राप्तच होते भारतात अन्नधान्याची झालेली उत्पादन वाढ हे त्याचे एक प्रतीक म्हणता येईल. 1965 साली भारतातील डाळींचे उत्पन्न सात कोटी टन होते ते आता साडे बारा कोटी टनांवर पोचले आहे. चीन आणि ब्राझीलनेही नेत्रदीपक प्रगती केल्याचे आढळून येते. पिकांवरील रोगांचा बंदोबस्त करतानाही अशाच प्रकारे नवी स्थानिक तंत्र विकसित करावी लागतात. नायजेरियातोल कासावाचे पीक वाचवणारे तंत्र असेच विकसित झाले. क्लोनिंगचे तंत्र वापरून मलेशियात नारळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. नेहमीच्या पीक सुधारण्याच्या पद्धतींचा वापर करून अशी एकसारखी नारळीची बने उभी दिसली नसती.

टाळावयाचा धोका

थायलंडमध्ये टिनची भांडी तयार करण्याच्या बाबतीत अनेक प्रयोग करण्यात आले. स्वयंचलित यंत्रे त्यासाठी आयात केली. पण ती चालवण्यासाठी जी हातांची व बुद्धीची कुशलता हवी ती नसल्याने श्रीमाधारित उत्पादनाइतकेही उत्पादन त्या स्वयंचलित यंत्रोद्योगातून निघू शकले नाही. छोट्या उद्योगात दरडोयी मजुरी फार कमी पडली आणि दर भांड्यागणिक उत्पादन खर्च जास्त लागला. पण अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रोद्योगातला भांडयागणिक खर्च त्यापेक्षाही जास्त आला! भारतातील दुग्धोत्पादन विकास करताना कृत्रिम गर्भधारणेचे तंत्र वापरावे लागणे अपरिहार्य आहे तसेच वाढत्या दूध उत्पादनाचा यथोचित उपयोग करायचा तर वाहतुकीसाठीही नव्या पद्धतीची साधने वापरावीच लागतील. विकेंद्रित उत्पादन म्हणजे ओबडधोबड मागास तंत्राचा वापर नव्हे. गुरांच्या रोगप्रतिबंधासाठी आद्यतन तंत्रे वापरणे क्रमप्राप्तच होते. ग्रामीण भागाची समृद्धी वाढवण्यासाठी तसे करावेच लागते. म्हणजे विकसित देशांतील विज्ञान-तंत्रज्ञानाच्या शोधांचा फायदा घेऊन मानवी शक्तीचा वापर अधिक होईल अशी यंत्रसामग्री तयार करायची आणि काम करणाऱ्याचे कौशल्य वाढत जाईल तसतशी अधिक प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञाने वापरायची. टप्प्याटप्प्यावर जड आणि गतानुगतिक होण्याचा जो धोका असतो तो जागरूकपणे टाळलाच पाहिजे.

निवडीतील अडचणी

उत्पादनवाढीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान निवडताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आणि त्यांतली काही कारणे तर्कांपलीकडची असतात. आहार शास्त्रापेक्षा कित्येकदा चवीचा मुद्दाच महत्वाचा ठरतो. ह्या चवीच्या मुदयाला सांस्कृतिक असे म्हणता येईल की अन्य काही नाव देता येईल त्याचा निर्णय विद्वानांनी करावा. केनया हा आफ्रिकेतला देश. मका हे तिथले मुख्य खाणे. मक्याचे पीठ करून नंतर त्याचे पदार्थ करतात. वाटून, घोटून, कांडून, दळून असे अनेक तऱ्हेने मक्याचे पीठ काढले जाऊ शकते. गिरणीत अर्थातच मक्याचे पीठ चांगले निघते. बारीक दळले जाते. पण तिथे कुटण्याचे यंत्र बसवून मक्याचे पीठ करायची सुरवात केली, अगदी जाते नाही बसवले, त्यामुळे भरडण्याऐवजी कुटण्याची यंत्रे आली. यांत्रिक कुटाईत गिरणी पेक्षा जास्ती माणसांना रोजगार मिळतो आणि छोट्या प्रमाणावर उत्पादन होते. कुटाई केलेले पीठ दळाईइतके बारीक नसते, पण त्यात दळाईपेक्षा अधिक पुष्टिद्रव्ये शिल्लक राहतात दळाईच्या गिरण्या बडे राष्ट्रीय आणि आन्तरराष्ट्रीय भांडवलदार चालवतात, भरपूर जाहिरातबाजी करतात, शहरांवर गिरणीपीठाचा मारा करतात. भावही जास्त घेतात. परिणाम असा होतो की अधिक लोकांना मजुरी देणारी, अधिक पुष्टिदायक पीठ देणारी कुटाई मागे पडून दळाई भरभराटते. दळाईवर मात करण्याइतके लोकशिक्षण न झाले तर प्रचाराला फावते. भारतात साबू, कापड, जोडे, काडेपेटया अशी कितीतरी उदाहरणे या संदर्भात देता येतील. पुरेसे लोकशिक्षण न केल्याने टाटा-गोद्रेज, मफतलाल-ग्वाल्हेर, वारा-कारोना, व्हिमको हे प्रचाराच्या जोरावर बाजी मारतात आणि खादी ग्रामोद्योग व इतर विकेंद्रित उद्योग योग्य लोकशिक्षणा अभावी भरभराटत नाहीत.

लोभापायी बदल

बहुराष्ट्रीय कंपन्यांचाही परिणाम विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची निवड करण्यावर होऊ लागल्याचे दिसते. विकसित देशांत श्रमिक जागृत, संघटित असल्याने त्यांच्यासाठी फार खर्च करावा लागतो व उत्पादन महाग पडते आणि नफा घटतो. त्यामुळे बहुराष्ट्रीय उद्योगांनी आपला मोर्चा आता विकासोन्मुख राष्ट्रांकडे वळवला आहे. श्रम स्वस्त, श्रमिक हक्कांबाबत अज्ञानी आणि असंघटित त्यामुळे वाहातूक खर्च वाढला तरी भांडवल गुंतवणुकीवर नफा जास्ती मिळू शकतो. विकसित देशांत ज्या कामासाठी जे श्रमतास लागतात त्याच्या पाच सहा पट श्रमतास विकासोन्मुख देशांत लागूनही बहुराष्ट्रीय उद्योगांना ते किफायतशीर ठरते. त्यामुळे विकासोन्मुख देशांत आपले भाडंवलप्रधान विकसित तंत्र घेऊनच ते नेहमी जातात असे नाही. विकसित देशांतील संघटित श्रमिकांच्या जाचाला कंटाळून ते आता अविकसित देशांच्या दिशेने धावताना दिसत आहेत.

वर्गसंघर्षाचे नवे क्षितीज

विकसित देशांतील कामगार संघटना आता बहुराष्ट्रीय उद्योगांच्या स्थलान्तराला विरोध करू लागल्या आहेत. भारतासारख्या खंडप्राय देशातही उद्योगांच्या स्थलान्तराकडे कल दिसू लागला आहे. बंगालमधील कामगार संघटनांच्या कटकटींना वैतागून कमी कुशल परंतु असंघटित आणि अजागृत कामगार उपलब्ध असणाऱ्या प्रदेशांकडे उद्योगधंदे आणि त्या अनुषंगाने विज्ञान आणि तंत्रज्ञान स्थलांतरित होताना दिसत आहे! संघटित कामगारांच्या दबावामुळे बहुराष्ट्रीय उद्योगांचे व्यवहार नियंत्रित करण्यासाठी आचारसंहिता तयार करण्यासाठी युनोलाही पुढाकार घ्यावा लागला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारात आर्थिक कारणांमुळे असा काही अडथळा येत असेल अशी आपल्याला कल्पनाही नसते.

भांडवलदारांचे आडाखे

बहुराष्ट्रीय उद्योग विकासोन्मुख देशांत त्याच्या उमाळ्याने जात नाहीत हे विकासोन्मुख देशांच्या सरकारांना कळत नाही असे नाही. पण त्या उद्योगांच्या निमित्ताने नवे विज्ञान, तंत्रज्ञान आपल्याकडे येईल, श्रमांना कुशलतेची जोड मिळेल ह्या लोभापायी त्या बहुराष्ट्रीय उद्योगांच्या लोभाला वाव ही सरकारे करून देतात. या उद्योगांना जे कुशल कामगार लागतात त्यांना तांत्रिक शिक्षण देण्याचा खर्च अंगावर घेऊनही हे उद्योग किफायतीत चालतात. आपल्याला शिक्षण देऊन पोटाला लावणाऱ्याबद्दलची कृतज्ञता बुद्धी कामगारांच्या संघटना झाल्या तरी त्यांना आक्रस्ताळे होऊ देत नाही. उद्योग स्वतःच्या तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या करतात आणि सरकारी संस्थांपेक्षा अधिक कार्यक्षम रीतीने चालवतात, शिवाय शिकणाऱ्याला रोजगाराची हमी देतात. आजच्या विकसित देशांतील उद्योगांनाही ह्या अवस्थेतून जावे लागले आहे. बहुराष्ट्रीय उद्योग आपल्या देशांत आरोग्यदृष्टया अपायकारक ठरलेली यंत्रे-तंत्रे स्वार्थापोटी विकासोन्मुख देशांत बेगुमानपणे स्थलांतरित करतात आणि ते देश भाबडेपणाने त्यांना येऊही देतात. पण विकसित देशांतील कामगार संघटना या सर्व प्रकारांकडे तिऱ्हाईतपणे बघत राहतील असे समजण्याचे कारण नाही. त्या कामगार संघटना अविकसित देशांतील कामगार नेत्यांना आमंत्रण देऊन प्रशिक्षणासाठी पाचारण करतात आणि उद्योगधंद्यात आरोग्य व सुरक्षा या दृष्टीने कोणत्या, कशा चळवळी करणे आवश्यक असते त्याचे शिक्षण देतात. बहुराष्ट्रीय उद्योगांमुळे नवे उत्पादन तंत्र स्थलांतरित झाले की त्याचा पाठलाग करीत श्रमिकांच्या संघटनेचे तंत्रही येऊन पोचतेच. ब्रिटन, फ्रान्स, इटली, पश्चिम जर्मनी आणि स्कॅडिनेव्हियन देशातल्या कामगार संघटनांनी विकासोन्मुख देशातील कामगार कार्यकर्त्यांना प्रतिक्षित करण्याची खटपट जोमाने चालवली आहे. विकासोन्मुख देशांतील कामगारांची फसवणूक करून उत्पादन केलेला बहुराष्ट्रीय उद्योगांचा माल आपल्या देशांत आयात केला जाऊ नये म्हणून विकसित देशातील कामगार संघटना स्वदेशी-बहिष्काराची चळवळ देखील सुरू करतील तर आश्चर्य वाटायचे कारण नाही! विकासोन्मुख देशांची सरकारे आपल्या कामगारांच्या शोषणाची किंमत देऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान मिळवण्यासाठी तयार आहेत असे दिसते. वर्गसंघर्ष आता नव्या क्षितिजावर पोचणार आहे. 

एक कामगार नेता या संदर्भात म्हणाला की, मी जर माझ्या संघटनेच्या सभासदांना असे सांगू लागलो की कॅरेबियन देशांनी कच्ची साखर पक्की करण्यासाठी ब्रिटनमध्ये पाठवण्याऐवजी तिथेच प्रक्रिया करून ती पक्की करणे चांगले, तर ब्रिटनमधील माझ्या कामगार संघटनेचे सभासद मला फाडून खायला कमी करणार नाहीत! तर्कशुद्धतेपेक्षा किफायतशीर रोजगार हा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. उद्योग-विज्ञान-तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित मंडळींनी अगदीच पायापुरते पाहून धोरणे न ठरवता जरा लांबचा विचार करून धोरणे ठरवावी असे वातावरण त्यासाठी निर्माण करावे लागेल. रक्त-घाम-अश्रूंची किंमत मोजूनच बहुधा हे शिक्षण घ्यावे लागेलसे दिसते.

Tags: capitalism Developing countries Labour union Multinational companies Chin United nation organization nuclear weapons Nuclear energy Science Global warming Polution Genetic engineering Technology Agriculture भांडवलदार  वर्गसंघर्ष युनो कामगार संघटना बहुराष्ट्रीय कंपन्या उत्पादन विकासोन्मुख देश विकसीत देश अणवस्त्र अणुऊर्जा जागतिक तापमानवाढ प्रदूषण जेनेटिक इंजिनिअरिंग चीन तंत्रज्ञान विज्ञान उद्योगधंदे शेती weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके