डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नानासाहेब, घेतला वसा टाकणार नाही...

वडिलधारी माणसे एकामागून एक निघून जातात आणि आपल्या मनाला येणारी पोरकेपणाची भावना अधिकाधिक गडद होत जाते. जे घडते ते नैसर्गिक असते आणि ते थोपविणे आपल्या सर्वांच्या शक्तीपलीकडचे असते. प्रत्येक सांसारिकाला हा अनुभव आयुष्यात मोजून दोन-तीन वेळा येतो.

वडिलधारी माणसे एकामागून एक निघून जातात आणि आपल्या मनाला येणारी पोरकेपणाची भावना अधिकाधिक गडद होत जाते. जे घडते ते नैसर्गिक असते आणि ते थोपविणे आपल्या सर्वांच्या शक्तीपलीकडचे असते. प्रत्येक सांसारिकाला हा अनुभव आयुष्यात मोजून दोन-तीन वेळा येतो. पण ज्यांनी आपल्या संसाराचा परीघ घरकुलाच्या अंगणा एवढाच बंदिस्त ठेललेला नसतो त्यांना वडिलधाऱ्यांच्या वियोगाचे दुःख वारंवार भोगणे भागच असते. त्यातही त्या वडिलांची उंची डोंगराएवढी असली आणि मन आषाढ मेघाएवढे असले म्हणजे आपल्या जीवनात त्यांच्या निधनाने निर्माण होणारी पोकळी कल्पनेच्या कवेत न मावण्याएवढी असते. आपल्या पूर्वजांनी, चिरवियोगाने व्याकुळ होऊन माणसाने घुंघट घालून बसू नये म्हणून काही जुजबी उपाय शोधून काढले होते. घरचे माणूस गेल्यावर मुद्दाम गोडधोडाचे जेवण करणे आणि त्यासाठी आप्तमित्रांना पाचारण करणे, प्रतिवर्षी श्राद्ध करणे असल्या कर्मकांडांचा मूळ हेतू असाच काहीसा असणार. पण थोर पुरुषांच्या निधन दुःखावर असले पोरकट उपचार काही कामाचे नाहीत. त्यांच्या जन्मदिनी म्हणजे जयंतीला आणि मृत्युदिनी म्हणजे पुण्यतिथीला म्हणूनच आपण मेळावे भरवून त्यांचे सामुदायिक स्मरण करतो. त्यांचा वारसा आठवणी. त्यांनी दिलेली व्रते घासूनपुसून लखलखीत करून घेतो आणि त्यांनी उजळलेल्या मार्गावरून चालण्याचा आपला निर्धार पुन्हा एकदा मनातल्या मनात उच्चारतो.

आमचे काही मित्र म्हणतात. तुम्हा 'साधना'करांची आम्हाला दया येते. वर्षातून कितीतरी दिवस तुमच्या साप्ताहिकाच्या जीवनात असे येतात की तुम्ही मुखपृष्ठावर महापुरुषांची छबी छापता, त्यांच्या जन्मदिनाची आणि स्मृतिदिनाची आठवण करता आणि त्यांच्या विचारांचा परवचाही म्हणता. हे सारे कशासाठी तुम्ही करता? आम्ही न कंटाळता त्यांना सांगू इच्छितो की, आम्ही या गोष्टी न कंटाळता करणारच आहोत. सृष्ट जीवनात सर्वांना मातापिता असतात, तसे ते आम्हांलाही असावेत हे ठीकच आहे. आम्हाला त्यांचा लळा असावा आणि त्यांनी आपल्या ममतेची पाखर आमच्यावर घालावी हे देखील सृष्टीच्या नियमांना धरूनच आहे. पण उच्चतर अर्थाने आमचे भरण पोषण करणारे, आमच्या जीवनाला आकार देणारे आमचे मायबाप वेगळेच असतात. जन्मदात्यांवरील प्रेमात जराही उणेपणा न आणता या आमच्या परमार्थाने पितृवत् असणाऱ्या थोरांविषयी आमच्या मनातील प्रेम, आदर, कृतज्ञता अशा मन शुद्ध करणाऱ्या अनेक भावना अंतःकरणात उसळतात. त्यांच्या आठवणींच्या बळावर आम्ही आमचे पोरकेपण विसरतो आणि आम्हा अनिकेतांच्या वाट्याला वैशाखवणवा आला तरी आमच्या माथ्यावर त्यांच्या कृपेची आभाळाएवढी छत्रच्छाया आहे याचे स्मरण अवश्य करतो.

साधनेचेच पहा ना! गेल्या पंचेचाळीस वर्षांत साने गुरुजी गेल्यापासून अलीकडे नानासाहेब गोरे जाईपर्यंत ज्यांनी ज्यांनी आम्हांला 'चाल चाल माते' करीत चालायला शिकविले, अशी किती मोठी माणसे काळाच्या पडद्याआड गेली! तरी आम्ही जेथे जातो तेथे ती आमच्या सांगाती येतात. आम्हाला हाती धरून चालवितात. आम्ही बरळ बोलू लागलो तर ते नीट करतात. आम्ही शरमिंदे झालो तर धिटावा देतात. एका एक एप्रिलला एसेम गेले आणि एक एक मे उजाडला तो नानासाहेबांच्या मृत्यूचे सावट आभाळभर पसरून. या गोष्टीला आता वर्ष झाले. पण यांनीच तर आम्हांला हिंमत हरू नका, असा धडा दिला आहे. शरीरे नाशिवंतच असतात पण त्यांच्या नाशानंतर त्यांचे स्फुरण पावत राहिलेले चैतन्य तुम्हांला प्रेरणा देईल, हाच अबोध बोध त्यांनी न बोलता आम्हांला दिला. नानासाहेबांनी माणसाच्या ज्ञात इतिहासातल्या विचारयात्रेची गती आणि प्रगती आमच्या डोळ्यांसमोर साक्षात उभी केली. प्रगतीच्या चक्राला ज्ञानाने दिलेली दिशा आणि विज्ञानाने दिलेली गती त्यांनी हजार प्रकारांनी आम्हांला उलगडून दाखविली. आमच्या डोळ्यांत जिज्ञासेचे अंजन घातले. दूरदृष्टीची अतर्क शक्तीची दुर्बिण त्यांनीच उपलब्ध करून दिली. आणि हे सर्व करीत असताना करुणेची शीतलछाया पीडितांना, संतप्ताना द्यायला विसरू नका याचीही जाण दिली.

तर मग आम्ही त्यांचे कृतज्ञ स्मरण कसे करणार नाही? नुसते स्मरण करून आम्ही थांबणार नाही. ऑलिम्पिक खेळ सुरू होतात, तेव्हा जी ज्योत चेतवतात ती प्रतीकात्मक असते. ती संदेश देत असते- चैतन्य विझू देऊ नका, मनाची उभारी ज्वलंत ठेवा. आमच्या हातीही एक अशीच अदृश्य मशाल वडीलधाऱ्या, पुरुषार्थी कृतिशूरांनी दिली आहे. तिचा संदेश आहे ज्ञानविज्ञानाने पुनीत केलेले आणि करुणाजळाने सुखशीतल केलेले नवे जग तुमच्या कर्तुकीच्या बळावर या सस्यश्यामल धरित्रीवर नांदू दे. या संदेशाच्या कैफातच आम्ही जीव पाखडला आणि पाखडणार आहोत- निदान प्रगतीची मशाल पुढील पिढीच्या हाती देईपर्यंत.

आज आहे नानासाहेबांचा प्रथम स्मृतिदिन. पण आपल्या परंपरेनुसार एका थोर पूर्वजांच्या सश्रद्ध स्मृतीसह त्याच्याही पूर्वीच्या समस्त पूर्वजांचे अभिमंत्रासह स्मरण करावे. मनोमन त्या सर्वांची शपथ वाहून आपण नानासाहेबांचा नामोल्लेख करून सांगू या- नानासाहेब, आम्ही घेतला वसा टाकणार नाही.

Tags: ऑलिंपिक खेळ. महापुरुष साधना नानासाहेब Olympic Games Legends Sadhana #Nanasaheb weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके