एसेमचे आपले सारेच वेगळे ! शतक जवळ येत चालले म्हणून मनोवैज्ञानिक का काय म्हणतात तसला दबाव या फलंदाजाला माहीत नाही. अजून बोलण्याला खळ नाही. मनमोकळे हसणे आणि तिरिमिरीत सात्त्विक संतापणे, क्षणात एक तर क्षणात दुसरे. उत्साह तर असा उदंड की सिनेमातल्या नट्यांपासून राजकीय रंगभूमीवरील नटसम्राटांपर्यंत सर्वांवर अखंड टीकाटिप्पणी चालू. अर्वाच्यपणाही अजून असा की ऐकणाऱ्या जवान श्रोत्यांनाही ठसका लागावा.
12 नोव्हेंबर 1984. एसेम ऐन ऐंशीत आले आहेत. हे वय धावपळीत गुरफटून घेण्याचे, गुरगुट्या भात खाऊन पंगलेल्या डोळ्यांनी नाती आणि नातसुना यांना ऊन पाणी आणायला सांगण्याचे. बारीक सारीक दुखणी गऱ्हांणी तर नित्याचीच, त्यांच्याविषयी आल्यागेल्या माणसाला तपशीलवार माहिती पुरविण्याची ही दशा. वाचन लेखन केले त्याला निदान दहा वर्षे उलटून गेलेली, पण आता मननही जवळजवळ मिटलेले. नव्या पिढीचा तर या वयात असा संताप येतो की, मुला-नातवांनी थाऱ्याला उभे राहू नये. याला म्हणायचे वयाची ऐंशी गाठणे.
एसेमचे आपले सारेच वेगळे ! शतक जवळ येत चालले म्हणून मनोवैज्ञानिक का काय म्हणतात तसला दबाव या फलंदाजाला माहीत नाही. अजून बोलण्याला खळ नाही. मनमोकळे हसणे आणि तिरिमिरीत सात्त्विक संतापणे, क्षणात एक तर क्षणात दुसरे. उत्साह तर असा उदंड की सिनेमातल्या नट्यांपासून राजकीय रंगभूमीवरील नटसम्राटांपर्यंत सर्वांवर अखंड टीकाटिप्पणी चालू. अर्वाच्यपणाही अजून असा की ऐकणाऱ्या जवान श्रोत्यांनाही ठसका लागावा. हे सारे अधूनमधून. सतत चालते ती विश्वाची चिंता. कधीच कोमेजत नाही ती युयुत्सु वृत्ती. मनात नेहमी जागा असतो तो स्वताला खडसावणारा कठोर परीक्षक. अस्वस्थता आहे पण तिच्या वयालाही आता साठ वर्षे झाली. दीनदुबळ्यांचा कैवार घेताना एक डोळा पाणावतो आणि अन्यायाविरुद्ध कडाडताना दुसरा डोळा लाल होतो. एक मिचमिचतो तेव्हा दुसरा मोठा होतो.
संन्यास, वैराग्य यांची तर बातच सोडा, पण वानप्रस्थाचीही ऐसी की तैसी! हाती घेतलेली कामे संपताहेत कुठे! पुष्कळ काम केलं असलं तरी अजून कितीतरी काम करायचं पडलंय. उद्या हातपाय थकतीलही कदाचित. पण मन तर शाबूत राहील ना? ते अखेरपर्यंत थरथरत राहील, कुरण पावेल. ते मन कोणाला शोधावं लागणार नाही. डोळ्यांच्या खिडक्यांतून जे बाहेर डोकावतं आणि मोकळ्या हसण्यामधून जे थुईथुई नाचत असतं त्याचं दर्शन समोर येणाऱ्या प्रत्येकाला होतच रहाणार.
राजकारण आणि समाजकारण, सत्याग्रह, संघर्ष, नाना प्रश्नांची उकल या सर्व भानगडीत एसेम कितपत यशस्वी झाले आणि कितपत पराभूत याचा हिशोब मांडायला पुष्कळ मंडळी समर्थ आहेत. पण या ताळेबंदापलीकडे जो माणूस आहे तोही काही कमी तोलाचा नाही. अर्थात एसेम म्हणजे कोणी 'काकाजी' नाहीत किंवा रसीलेपणाने जिंदगी उधळून देणारे कोणी बेहोष रंगराव नाहीत. आणि म्हणून तर त्यांच्या खुल्या दिलाचं अधिकच अप्रूप वाटतं. सार्वजनिक आयुष्यात वावरणारी माणसं मुळात बेरकी नसली तरी नंतर होतात. त्यांचे हिशेबठिशेब पक्के असतात. त्यांना डाव टाकता येतात. प्यादी खर्ची घालून मोहरी कशी वाचवायची ते या तरबेजांना पक्के माहीत असते. राजकारणात तर, हा दोष न समजता गुणच मानण्यात येतो.
फक्त एसेम हा अपवाद आहे. अब्राहम लिंकन असाच झिडपिड्या होता, असाच विनोदप्रिय होता आणि असाच झुंजारही होता. त्याच्याशी एसेमचे खूप साम्य आहे. पण त्याच्याजवळ असा अवखळपणा आणि फटिंगपणा असेल असे वाटत नाही. दुनियेच्या बाजारात उभा राहून तिला धुत्कारणाऱ्या कबीराप्रमाणे एसेमचा आत्माही बाजारात खडा आहे. लबाडी करावीशी वाटली तरी आपण अशी लबाडी करणार आहोत हे दहाजणांना अगोदर सांगतील. आता पहा कसा घोडा अडीच घरे उडवतो असे सांगून आपली खेळी खेळणारा ग्रँड मास्टर एकच एसेम.
गेले काही महिने पाठीच्या कण्यांच्या मुळाशी या बेट्या कॅन्सरने नखे रोवायचा प्रयत्न केला, पण त्याला ते जमलेले नाही. एसेमची थोडी दमछाक झाली; नाही असे नाही. पण ते हरले नाहीत. नेटाने आणि निर्भयतेने ऑक्टोपस दूर करावा लागतो हे प्रत्येक पाणबुड्याला माहीत असते. एसेमनी थेट याच तन्हेंने या व्याधीशी झुंज घेतली आहे. आल्यागेल्याला ते सांगत असतात, "अरे, अजून दहा वर्षे तरी मिळतील महणताहेत डॉक्टर. पुष्कळ झाली की दहा वयात पुष्कळ काही करता येइल!" अनेक नाटकांतून, चित्रपटांतून आपल्या दुर्धर रोगाचे दुःख विसरून, इतरांनाही विसरायला लावून, उलट सभोवतालच्या सर्वांना हसतखेळत ठेवणारे नायक किंवा नायिका आपण पहातो. असल्या कथा आपल्याला भावविवश करतात, विव्हळ करतात. एसेमची कथा वेगळी. त्यांचे सारे कसे सहज, स्वाभाविक मोकळेपणाचे. त्यात विशेष काही साधल्याचा जरा देखील लेप नाही. पूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात, 'डांगे एसेमला गिळंकृत करणार' असे कोणीतरी म्हणताच हे बुवाजी हसले आणि म्हणाले, 'गिळून पहा म्हणावे, माझी हाडं नरडीला टोचत राहातीला तात्पर्य, या चिवटपणाला मर्यादा कसली ती नाही.'
कोणाचा ऐनपणा सोळाव्या वर्षी सुरू होतो आणि दहावीस यांनी संपून जातो. कोणी ऐन पंचविशीत उमेदीत असतात पण ऐन चाळिशीतच त्यांना म्हातारचळ लागतो. ज्यांचा साठीचा समारंभ होतो त्याही सगळ्यांनाच चिरतरुण म्हणून गौरवणारे पाचदहा तरी वक्ते निघतात; पण त्या उत्सवमूर्तीना मात्र मनोमन आपला वकूब माहीत असतो. किती उन्हाळे किंवा पावसाळे देहाने पाहिले याच्यावर आपण वय मोजत असतो. झाडाच्या खोडाचा छेद काढला तर त्यातले वर्तुळाकृती थर मोजून झाड किती वर्षाचे असावे याचा अंदाज करता येतो. पण ज्याचा देह म्हणजे अंतर्यामीने केवळ नाइलाजाने घातलेला बुरखा असतो त्याचे वय कोणी आणि कसे मोजायचे? म्हणून तर एसेमचे ऐनपण ऐशी वर्षांच्या उत्कट जगण्यानंतरही मावळलेले नाही. 'ज्योति मृत्युंजय प्रबळ पिंडाहुनी' या कविवर्य भास्करराव तांबे यांच्या वचनाचा कोणाला उलगडा हवा असेल तर त्याला फार लांब जायला नको. ऐशीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एसेमचे दर्शन घेतले तर सर्व अर्थ समजेल आणि कायमचा मनावर ठसेल.
Tags: संपादकीय एस एम जोशी s m joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या