डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

झाला प्रकार एवढाच की सिटिझन्स नामक किरकोळ पत्रात सेनाप्रमुखांचा अवमान करण्यात आला होता. मराठवाड्याच्या मोहिमेवर निघालेल्या सेनापतींच्या मार्गावर केशरमिश्रित पाण्याच्या सिंचनाने वातावरण सुगंधी झाले होते, कमानींची इंद्रधनुष्ये झळकत होती, तोरणांच्या बलाकमाला स्वागतासाठी विहार करीत होत्या, दुंदुभी झडत होत्या आणि रणशिंगांचे तीव्र चीत्कार अक्षरशः गगन भेदून स्वर्गातील देवतांच्या कानांवर आदळत होते.

कळले का, ठोकशाहीचा प्रचंड विजय झाला. लोकशाहीचा पाडाव झाला. शिवसैनिकांचे छत्रपती औरंगाबादेत गेले आणि त्यांच्या इशाऱ्या सरशी दे दणादण धूम मचली. आपला कावा गनिमी असल्यामुळे नव्या फतव्यानुसार एकमेव सेनाप्रमुख असलेल्या शिवसेनेच्या सेनापतींनी पत्रकारांना आपल्या छावणीत आमंत्रण पाठवून बोलावून घेतले आणि ते आपल्या गोट्यात येताच हर हर महादेव करीत वाघनखांनी कोथळेच बाहेर काढले, एकूण तेरा असामी जायबंदी केले. त्यांतले दोन तर भुईवर लोटले. ते सांप्रत चीं चीं करीत इस्पितळाची हवा खात आहेत. पत्र आणि शस्त्र यांत शस्त्रांचा विजय झाला, पत्रांचा पाडाव झाला. लोकशाहीने माघार घेतली आणि ठोकशाहीने सामना गाजवला.

झाला प्रकार एवढाच की सिटिझन्स नामक किरकोळ पत्रात सेनाप्रमुखांचा अवमान करण्यात आला होता. मराठवाड्याच्या मोहिमेवर निघालेल्या सेनापतींच्या मार्गावर केशरमिश्रित पाण्याच्या सिंचनाने वातावरण सुगंधी झाले होते, कमानींची इंद्रधनुष्ये झळकत होती, तोरणांच्या बलाकमाला स्वागतासाठी विहार करीत होत्या, दुंदुभी झडत होत्या आणि रणशिंगांचे तीव्र चीत्कार अक्षरशः गगन भेदून स्वर्गातील देवतांच्या कानांवर आदळत होते. हिंदुहृदयसम्राटाचे असे अतिभव्य स्वागत झाले असूनही 'बाळासाहेब ठाकरे यांचे थंडे स्वागत' अशा दिशाभूल करणाऱ्या मथळ्याखाली सिटिझन्स पत्राने धादांत खोटे वृत्त छापले, याबद्दल या पत्राला अद्दल घडविणे सेनापतींचे कर्तव्यच होते. प्रेस कौन्सिलकडे तक्रार करणे, संपादकांचा निषेध करणे अथवा त्यांना कोर्टात खेचणे असले खुळचट मार्ग पुळचट लोकशाहीवाद्यांना लखलाभ असोत. मग शिवसेनेने या प्रक्रियेत होणारे कालहरण टाळण्यासाठी आणि न्याय, सत्य इत्यादींची सत्वर प्रतिष्ठापना करण्यासाठी सर्व शहाणपणाचे संकेत धाब्यावर बसविण्याचा दरोबस्त निर्णय घेतला. त्यांनी पत्रकार परिषद बोलावली. तिथे, आगंतुक नव्हे तर निमंत्रित म्हणून, सिटिझन्सचे वार्ताहर हजर झाले. सावजे आयती आपल्या टप्प्यात स्वतःच्या पायांनी चालत आली असता कोणता रणमर्द हिंदुहदयसम्राट हातची शिकार सोडील? सेनाप्रमुखांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी शिवसैनिकांनी एकाएकी मारपीट सुरू केली. तेरा जणांना चौदावे रत्न दाखवून त्यांनी वठणीवर आणले. ज्यांनी मार खाल्ला त्यांनी माफी मागावी अशा वीरोचित मागणीचा धोशा लावण्यात आला. तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना या चोराच्या उलट्या बोंबा वाटत होत्या. हिंदुहृदयसम्राटांनीच माफी मागावी अशी उलटी मागणी त्यांनी सुरू केली. सम्राट प्रथम अगदीच हटून बसले. मग बिचाऱ्या पत्रकारांची कणव येऊन म्हणा की बिकट समयी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे पटल्यामुळे म्हणा, त्यांनी सारवासारवीची भाषा सुरू केली. याला राजकारण म्हणतात. कधी चढा सूर लावावा कधी नरमाई आणल्यासारखे दाखवावे, मग मैदान पाहून पुन्हा डरकाळी फोडावी यालाच म्हणतात गनिमी काव्याचे राजकारण. 'मी व्यंगचित्रकार, तुम्ही पत्रकार आपल्यात भांडण कशाला असा सवाल शिवसेनाप्रमुख आता करीत आहेत. नका हो नका, बाळासाहेब असे म्हणू नका. तुम्ही व्यंगचित्रकारच आहात. 'देव पहावया गेलो, तेथे देवचि होउनी ठेलो. या संतवचनाप्रमाणे 'व्यंगचित्रात रंगलो, मीच व्यंगचित्र झालो'... असे सारूप्य लाभणे हे केवढे भाग्य आहे!

सोनेरी टोळीचा विक्रमी दरोडा 

शहर पुण्याच्या परिसरात सोनेरी टोळी वावरत असावी आणि भलेभले लोक भोळसटपणाने तिच्या मायाजालात अडकावेत या भोगाला काय म्हणावे, कळत नाही! लोखंडाचे सोने करण्याची किमया करण्याचा बहाणा करणारे ठग खेड्यापाड्यातील अज्ञ जनतेला गोडगोड बोलून फसवतात ही गोष्ट आता काही नवीन राहिलेली नाही. नोकरीचे आमिष दाखवून बेकार तरुणांकडून हजारो रुपये उकळणारे भामटेही बेशरमपणाने गरजूंना बुचाडत असतात. अगदी अलीकडे वडवले नावाचा ठकसेन पोलिसांच्या जाळ्यात सापडला असता कोर्टने त्याला जामिनावर सोडले. त्याने बेमुर्वतपणे तोच उद्योग पुण्याऐवजी मुंबईच्या परिसरात सुरू केला. या ठकसेनाने एकूण साठ लाखांची रक्कम लुबाडली असे म्हणतात. पण हा केवळ भुरटा चोर वाटावा असा विक्रमी महाठक शेकडो पुणेकरांना सफाईने बनवून कोट्यवधींची कमाई करून नाहीसा झाला आहे. 'सनराइज कन्सल्टन्सी' नावाची बोगस वित्तपुरवठा कंपनी काढून फसवणुकीचा मायाबाजार करणारा एम. डी. विजयराज हा तो भामटा. साठ दिवसांत तुमचे पैसे दुप्पट करून देतो अशी भूलथाप देऊन त्याने हजारोंना गंडवले. जे गंडले ते कोणी तेली-तांबोळी, हमाल-हेलकरी नव्हते. व्यापारी, वकील डॉक्टर, राजकारणी बँकर्स अशी तथाकथित सुशिक्षित मंडळी हातोहात अशी बनली हे एक कोडेच आहे. आरंभी आरंभी शंभर रुपयांचे दोनशे रुपये करून विजयराजने विश्वास विकत घेण्यात भांडवल गुंतवले. गुंतवणूक करणारे भांडवल वाढवायला लागल्यावर त्याने चक्क आपले एजंट नेमले. काही एजंटांना दिवसाला पाचशे रुपये कमिशन तो देत असे. वर्षाच्या आत ठेवींच्या रकमा कोटीच्या घरात गेल्या. शेकडो लोकांनी घरातले दागिने विकून या दुपटीच्या खेळात पैसे गुंतवले. कोणी कर्जे काढून तर कोणी घरे मोटारी विकून ते पैसे विजयराजच्या स्वाधीन केले. लुबाडल्या गेलेल्या या भोट भोलानाथात बारा नगरसेवक, चार पोलीस अधिकारी, काही आर.टी.ओ.आणि रेल्वेचे अधिकारी, चाळ मालक अशी सधन मंडळीही आहेत. मुख्य म्हणजे ज्या पोलिसांनी कायद्याची बूज करायची आणि गुन्हेगारांना गजाआड करायचे त्यांचेच वर्तन भ्रष्टाचाराने बरबटलेले असावे असा आता वहीम येतो. न्यायदेवता ही आंधळी खरीच. कारण एप्रिल 1993 मध्ये विजयराजला पुराव्याअभावी सोडून देण्यात आले.

आता फसवणूक शिगेला पोचून अभूतपूर्व गवगवा होऊ लागल्यावर विजयराज नाहीसा झाला आहे. अनेक थरांवर पोलिसयंत्रणा त्याला सामील असल्याशिवाय त्याला जाता आले नसते, असे पिंपरी- चिंचवडमधले लोक उघडउघड बोलतात.

एकगोष्ट स्पष्ट आहे, रात्रीच्या अंधारात घोडा उधळला आणि क्षितिजापार दौडत गेला. आता तबेला बांधण्यासाठी वासे आणि पत्रे येऊन पडले आहेत. दुनिया झुकते. तिला झुकवणारे असतातच! आणि पोलीस? त्यांना चुकवणारे असतातच.'

Tags: एम.डी. विजयराज वडवले सोनेरी टोळी 'सनराइज कन्सल्टन्सी' गनिमी काव्याचे राजकारण प्रेस कौन्सिल बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट औरंगाबाद ठोकशाही M.D. Vijayraj Vadavale Soneri Toli Sunrise Consultancy Politics of Guerrilla Poetry Press Council Balasaheb Thackeray Hindu Heart Emperor Aurangabad Thokshahi #Weekly sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके