डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अरिशिनेमी पिसा झाला आणि त्याने तुला घडवले खरे, आता या जगाकडे पाठ फिरवून काय साधणार ? ह्या हजार लुच्यांत चार दोन तरी असे सच्चे असतील ना की करुणेचा संदेश जे निरपेक्षपणे आचरीत असतील ? 

मेघमालेचे उदर विदारू पाहाणारी उत्तुंग गोपुरे असलेली, सहस्त्र खांबानी तोलून धरलेली, वरून बैलगाडी जाईल इतक्या रुंद प्राकारांनी वेष्टित अशी मंदिरे उभारून कंटाळलेल्या अरिशिनेमी मूर्तिकाराने तुझा आकार त्या अजस्त्र शिलाखंडातून छिन्नून काढता काढता ज्या क्षणी तुझ्या डाव्या पायाची करंगळी कोरून संपवली. त्या क्षणी हातातली हातोडा व छिन्नी त्याने खाली ठेवली आणि तुझ्या त्या दिगंबर ध्यानाकडे एकदाच नजर टाकून त्याने तेथेच लोटांगण घातले. तृप्तीने आणि भक्तीने त्याचे मन भरून येऊन तोंडोतोंड पाणी भरलेल्या घागरीसारखे जड झाले होते आणि पारव्याच्या पिसासारखे हलकेही. भुईवरून न उठताच अरिशिनेमी अर्धवट स्वतःशी व अर्धवट मोठयाने म्हणाला,"देवा, ही अवजारे मी पुनश्च हातात धरणार नाही. ती तुमच्या चरणी अर्पण केली आहेत. त्यांचं काम संपलं. माझंही संपलं. निरोप द्या मला आता." एवढे बोलून अरिशिनेमी उठला आणि इंद्रगिरीची टेकडी उतरून झरझर खाली मैदानात आला. मागे मुरडून एकदाच त्याने त्या महाकाय आकाराकडे बधितले, त्याच्या दगडी ओठावरचे दिसे न दिसे असे स्मित आणि त्याच्या अर्ध्या उघड्या नेत्राच्या पापणीमधून झिरपलेसे वाटणारे कारुण्य त्याने आपल्या नजरेने टिपून घेतले आणि मग तो पाय नेतील त्या वाटेने गेला. असे म्हणतात की अरिशिनेमी पुन्हा कोणाच्याही दृष्टीस पडला नाही. 

त्या घटनेला आज हजार वर्षे लोटली याची जाणीव हे बाहुबली तुला आहे? हजार वर्षे तू उन्हात तापतो आहेस. पावसात भिजतो आहेस. हजार वर्षे पावसाळयात तुझ्या पावलापाशी शेवाळाचा मखमली गालीचा पसरतो आहे आणि सुकून जातो आहे. विजेचा सोनेरी किरिट तुझ्या मस्तकी क्षण दोन क्षण लखलखतो आहे आणि अदृश्य होतो आहे शरदाच्या शुभ्र रात्री तुझ्या सर्वांगावर चांदण्याचा चंदनी लेप चढतो आहे तर कृष्ण रात्री आकाशगंगेच्या वेलीतली उल्काफुले तुझ्यावर बरसत राहिली आहेत. हजार वर्षे वसंतात पोपटाच्या रंगाची पाने तुझ्या भोवतालच्या राईमधल्या वृक्षावर लवलवली आहेत आणि पळसांनी आपल्या कुसुंबी फुलांच्या दीपज्योती भर दुपारी तुझ्याभोवती पेटवल्या आहेत. हजार वर्षे तुझ्या पायथ्यापासून प्रारंभ होणाऱ्या काळीत शेतकऱ्यांच्या पन्नास पिढयांनी आपला घाम गाळून साळी पिकवल्या आहेत आणि आयुष्याच्या अखेरीला त्याच काळीच्या कुशीत ते विसावले आहेत. हजार वर्षात एकशे आठ लढाया जिंकणाऱ्या चामुंडरायाचे घराणे संपले, विजयनगर हंपीचे सम्राट नाहीसे झाले. आदिलशाहीचे पडसाद गोलघुमटातही ऐकू येईनासे झाले, श्रीरंगपट्टणाच्या वेशीवर टिपू वाघाने प्राणार्पण केले. आंग्लाई आली आणि गेली. असे हे ऋतुचक्र आणि संसारचक्र तुझ्या अविचल मूर्तीभोवती गरगरत राहिलेले तू पाहिलेच असशील. 

गंगेच्या खोऱ्यात महावीर स्वामींनी प्रवर्तित केलेले धर्मचक्र घेऊन तू कर्नाटकात पोचलास. कर्मकांडात आणि चार्तुवर्ण्यात रुतून बसलेली वैदिक धर्माची दोन्ही चाके एका बाजूने भगवान गौतमाने आणि दुसऱ्या बाजूने भगवान् महावीरांनी उचललीं आणि मानव धर्माचा गाडा पुनरपि मार्गस्थ व्हावा म्हणून अपार कष्ट केले. महावीरांचा संदेश जगाला ऐकवण्यासाठीच ना तू कष्टत राहिलास? पण तुझ्या ध्यानात आले असेल की सर्व प्रेषितांच्या प्रेरणांची जी गत होते तीच महाविरांच्या संदेशाची झाली. जो शब्द समस्त मानव जातीसाठी उच्चारला गेला होता तो विशिष्ट धर्माच्या डबीत बंदिस्त होऊन पडला. असीम आकाशात भ्रमण करण्यासाठी निघालेल्या गरुडाचे पंख कापण्यात आल्यावर लोककल्याणाचा अमृतकुंभ तो आणणार कसा? साडेतीन हात देहाच्या कोणाही मानव पुत्राने फार उंच होऊ नये, मोठी उडी मारू नये, अमृतपुत्र होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगू नये असे तर नियतीचे सूत्र नसेल? त्या मुळेच का स्वर्गातून अग्निहरण करून आणण्याच्या प्रोमिथिअसला जिवंतपणी गिधाडाकडून खाववण्यात आले? म्हणूनच का येशूला त्याच्याच जमातीच्या लोकांनी क्रुसावर खिळवून मारले ? त्यासाठीच का वेदाना बहुजनापासून दडवून ठेवण्यात आले ? दालनात दालने असलेली दगडी मंदिरे बघून जगतोद्धारा- साठी निघालेल्या देवांना गर्भागाराच्या अंधारकोठड्यातून स्थानबद्ध करण्यात आले ? प्रत्येक प्रेषिताभोवती भक्तांनी कडे केलेले असते. प्रत्येक उच्च विचाराचा मक्ता ते घेतात. त्याचे दुकान मांडले जाते आणि त्यासाठी जो अधिकात अधिक पैका मोजील त्याला तो विकला जातो. त्याच्या नावाने पेढया निघतात, राजकीय पक्ष निघतात, युद्धेदेखील खेळली जातात आणि त्या युद्धात जे हरतील. त्यांच्या मुडदयांच्या राशीवर धर्मध्वज गाडून त्याचा जयजयकार केला जातो. 

तथापि हे तीर्थंकरा, पृथ्वीतलावर तू शरीराने हिंडत-फिरत होतास. त्यावेळची सृष्टी जशीच्या तशीच राहिलेली आहे असे मात्र नाही. गौतमाने जरा पाहिली, व्याधी पाहिली, मृत्यू पाहिला आणि तो म्हणाला सर्व दुःखम् | सर्व क्षणिकम् | सर्व नष्टम् | त्याला वैराग्य प्राप्त झाले. पण तेव्हापासून आम्ही मानव होतो. तिथेच कुचंबलेले नाही. आम्ही सगळया जगाचे रूप पालटून टाकलेले आहे. समुद्रांनाच नव्हे तर गगनालादेखील आम्ही पालाण घातलेले आहे. अनेक रोगांना आम्ही हद्दपार केलेले आहे. भूमीला खरोखर सस्यश्यामला बनवली आहे. महावीर स्वामी पाटलीपुत्राहून श्रावस्तीला जात असतील किंवा गौतम बुद्ध सारनाथहून वाराणशीला जात असतील त्यापेक्षाही कमी श्रमात आम्ही चंद्रलोकावर जाऊन येऊ शकतो. हे विज्ञान आम्ही मानवांनी नव्याने मिळवलेले आहे. आता ह्या जगात भूक, तहान, दारिद्रय, रोग, युद्ध राहाण्याचे कारण नाही. देशादेशातल्या सीमा राहाण्याचेही कारण नाही. माणसा-माणसांना परस्परांपासून दूर ठेवणारे धर्म खरे बोलायचे तर आता कालबाह्य झालेले आहेत.

परंतु आमचे विज्ञान एक मिश्रफळ ठरलेले आहे. ते अर्धे अमृतफळ आहे आणि अर्धे विषफळ. ज्या आइनस्टाइन मुनीने आम्हाला अणूचे स्वरूप दाखवले त्याचा वापर करून आम्ही मानवजातीला नष्ट करण्याची शक्ती असलेले ब्रह्मास्त्र तयार केले. हिरोशिमांतील हजारो स्त्री-पुरुषांची आणि मुलाबाळांची राख-रांगोळी करणारा अणुगोलक ज्या वेळी एक लाख अंश तपमान असणारी आग एका क्षणात ओकू लागला त्या वेळच्या किंकाळया ऐकल्यावर तर तुला मानवाच्या सामर्थ्याची कल्पना आली असेल ना ?आणि चंद्रलोकाच्या वाळूवर मानवाची पावले चरचरलेली ऐकल्यावर आमच्या प्रगतीची झेप ही तुला समजली असेल ना ? 

हे भद्रा, दानवांची अघोर शक्ती आणि देवांचे मंगलसामर्थ्य आज मानवाच्या ठायी एकवटले असून त्याचे मन ह्या दोन शक्तींचे रणांगण बनलेले आहे. त्यापैकी कोणते सामर्थ्य विजयी होते ते तू एक-दोन शतकात पाहाशीलच. मात्र धीर सोडू नको. 

इंद्रगिरीवरून विश्वाची भरती ओहोटी गेली हजार वर्षे न्याहाळीत उभ्या राहिलेल्या है स्थानपुरुषा, आज तुझ्या मस्तकावर हेलिकॉप्टरमधून होणारी पुष्पवृष्टी पाहून खिन्न होऊ नको. मस्तकांपासून पावलापर्यंत वाहत राहिलेले दही, दूध, मध, तूप यांच्या ओघळांमुळे विटून जाऊ नको; तुझ्या पायाशी पडलेला पंतप्रधानांचा चांदीचा नारळ पाहून रागावू नको; तुझ्या भालप्रदेशावर रित्या करण्यात येणाऱ्या कलशासाठी शंभर, हजार, लाख रुपयांचे लिलाव बोलणाऱ्या नगरश्रेष्ठींनी 'तुझ्या' अभिषेकाचासुद्धा सट्टे बाजार केलेला आहे, म्हणून विषण्ण होऊ नको. आणि तुझ्या अंगावरून वाहणाऱ्या पंचामृताचे जे डबके खाली साठलेले आहे ते कटोरे भरभरून तीर्थ म्हणून घरी घेऊन जाणाऱ्या भक्तांवर चिडू नको. प्रत्येक भावनेचा आणि दिव्य संदेशाचासुद्धा बाजारभाव विचारणारी संस्कृती हीच आजच्या युगातली प्रमुख संस्कृती आहे. तुझ्या सभोवार जमलेले हे डोंगळयासारखे लोक, पंतप्रधानापासून भिक्षेकऱ्यापर्यंतची ही माणसे पाहून तुझ्या शिल्पकार आरिशिनेमीने काय केले असते ते मला ठाऊक आहे. तो आपल्या पायाखालच्या धुळीत पचकन् युंकून म्हणाला असता ' म्या लई गाडवपना क्येला पगा. त्या शिळेला म्या छिन्नी लावायाच नग व्हती. मग यवढा कालवा झाला नस्ता.'

पण अरिशिनेमी पिसा झाला आणि त्याने तुला घडवले खरे, आता ह्या जगाकडे पाठ फिरवून काय साधणार? ह्या हजार लुच्च्यांत चार दोन तरी असे सच्चे असतीलच ना की तुझा उदार करुणेचा संदेश जे निरपेक्षपणे आचरीत राहातील ? मग झाले तर. तेच तुझ्या हजार वर्षाच्या तपश्चर्यला अर्थ प्राप्त करून देतील. 

Tags: आइनस्टाइन तीर्थंकर येशू भगवान गौतम महावीर स्वामी आदिलशाही चामुंडराया बाहुबली इंद्रगिरी अरिशिनेमी Einstein Tirthankar Yeshu Bhagwan Gautam Mahavir Swami Aadilshahi Chamundraya Bahubali Indragiri Arishinemi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ना. ग. गोरे

स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके