डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा

महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्याचे प्रयोग केले आणि या सत्यशोधनात जे मौलिक आढळले ते जगापुढे मांडले. परंतु हे विविध विषयांवरील विचार आहेत. तत्त्वज्ञ ज्याप्रमाणे आपल्या जीवनविषयक सर्व विचारांचा आकृतिबंध जगापुढे ठेवतो तसे गांधीजींनी केले नाही. त्यामुळे गांधीवाद हा तत्त्वप्रणाली म्हणून शब्दप्रयोग करता येत नाही.

स्वातंत्र्य लढ्याच्या काळात अनेक नेते होऊन गेले. ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध कसे लढावे याबाबत त्यांनी आपले विचार मांडले. परंतु भारताच्या भावी जीवनात सामाजिक व आर्थिक रचना कशी असेल याचा संपूर्ण आराखडा मात्र गांधीजींनीच देशापुढे ठेवला. त्यांचे मुख्य विचार आजही कालबाह्य झालेले नाहीत. किंबहुना जगाची परिस्थिती आज सर्व बाजूंनी ढासळलेली असताना, गांधीजींच्या विचारांतच आज अनेकांना आशेचा किरण दिसत आहे. मानवी जीवनात तात्कालिक आणि चिरंतन असे दोन भाग असतात. केवळ तात्कालिक समस्यांमध्ये गुंतून पडलेले नेते काळात कालबाह्य होतात. केवळ चिरंतन मूल्यांबद्दल विचार करणारे तत्त्वज्ञ मोठे असले तरी कृतिशील तरुण पिढीस त्यांच्या विचारांचे महत्त्व वाटत नाही. म. गांधींनी भारताचे पारतंत्र्य या तात्कालिक समस्येला सामोरे जाताना चिरंतन मूल्यांचाही विचार केला. मानवी जीवन सुखी व समाधानी होण्यासाठी जीवनाला नैतिक आधार असला पाहिजे आणि व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहतानाच व्यक्ती समाजाभिमुख असली पाहिजे हा विचार गांधीजींनी सतत मांडला. 

महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्याचे प्रयोग केले आणि या सत्यशोधनात जे मौलिक आढळले ते जगापुढे मांडले. परंतु हे विविध विषयांवरील विचार आहेत. तत्त्वज्ञ ज्याप्रमाणे आपल्या जीवनविषयक सर्व विचारांचा आकृतिबंध जगापुढे ठेवतो तसे गांधीजींनी केले नाही. त्यामुळे गांधीवाद हा तत्त्वप्रणाली म्हणून शब्दप्रयोग करता येत नाही. असे असले तरी गांधीजींच्या विचारांची प्रमुख सूत्रे मांडून ती आज किती प्रमाणात भारताने स्वीकारली आहेत हे पाहणे शक्य आहे. माझ्या मते म. गांधींच्या विचारांची प्रमुख सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत : 1. अन्यायाचा सतत प्रतिकार केला पहिजे. 2. हा प्रतिकार अहिंसक मार्गानि केला पाहिजे. 3. उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी शुद्ध साधने वापरली पाहिजेत. 4. शारीरिक श्रमांची प्रतिष्ठा समाजात मान्य झाली पाहिजे. 5. व्यक्ती आणि समाज निर्भय असला पाहिजे. 6. उत्पादन व्यवस्था आणि राज्य व्यवस्था विकेंद्रित असले पाहिजेत. 7. समाजात उच्च-नीच असा भेद असता कामा नये. सर्व जातिधर्माचे स्त्री-पुरुष समान आहेत आणि त्यांना समानतेने वागविले पाहिजे. 8. नीती हे सर्व धर्मांचे सार असून नीतीचे पालन केले पाहिजे. 9. सत्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. 10. निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये संतुलन असले पाहिजे.

म. गांधींनी केवळ व्यक्तीने कसे वागावे हे सांगितले नाही. समाजजीवनात व्यक्तीला समाधान व सुख लाभण्यासाठी समाजाची आर्थिक व सामाजिक व्यवस्था कशी असावी हेही सांगितले. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे म. गांधींचे ध्येय होते आणि त्यांचे अनेक विचार ध्येयसापेक्ष व कालसापेक्ष होते. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध करावयाचा लढा अहिंसक मार्गाने करावा असे गांधीजींनी सांगितले आणि आपली चळवळ शक्य तो अहिंसक ठेवली. परंतु स्वतंत्र राष्ट्राच्या राज्यकर्त्यांना जनतेचे संरक्षण करण्यासाठी शस्त्रे वापरावी लागतील हे त्यांना मान्य होते. काश्मीरमध्ये पं. नेहरूंनी जेव्हा सैन्य पाठविले तेव्हा गांधीजींनी विरोध केला नाही, हे विसरून चालणार नाही.

गांधीजींनी माणूस यंत्राचा गुलाम होता कामा नये असा सतत आग्रह धरला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरणाला त्यांचा विरोध होता. परंतु पंडित नेहरूंना मात्र भारत हे आधुनिक राष्ट्र बनविण्यासाठी आणि भारताच्या संरक्षण यंत्रणेचा पाया घालण्यासाठी औद्योगिकीकरण करणे, मोठे पोलाद प्रकल्प उभे करणे मोठी धरणे बांधणे आवश्यक वाटत होते, आणि त्यामुळे त्यांनी मं. गांधींना अभिप्रेत असलेली विकेंद्रित अर्थव्यवस्था बाजूस सारली.पं. नेहरूंनी स्वातंत्र्यपूर्व कालातही आपली मते उघडपणे मांडली होती, आणि तरीही गांधीजींनी त्यांना आपले राजकीय वारस म्हणून मान्यता दिली होती. पं. नेहरूंनी पंचवार्षिक योजना आखून जी विकासनीती स्वीकारली ती स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या कालखंडात योग्यच होती. त्या विकास नीतीमुळे म. गांधींना अभिप्रेत असलेल्या विकासनीतीचा पराभव झाला हे मान्य केले पाहिजे. म. गांधींचे अनुयायी म्हणविणाऱ्या कार्यकत्यांनी- यांमध्ये आचार्य विनोबा भावे हे प्रमुख होते- खादी, ग्रामोद्योग यांचे जरी समर्थन केले तरी औद्योगिकीकरणाविरुद्ध लढा दिला नाही. गांधीवादी कार्यकर्त्यांबाबत पूर्ण आदर बाळगून हे मान्य केले पाहिजे की म. गांधी त्यांना मान्य नसलेल्या गोष्टींना विरोध करीत, तसे त्यांनी केले नाही. पं. नेहरूंनी गांधीवादी मंडळींना सांभाळले, मान दिला आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केला नाही. परंतु औद्योगिकीकरणाचा व मोठे प्रकल्प उभारण्याचा कार्यक्रम चालू ठेवला. त्या वेळी त्यांना विरोध न करणारे गांधीवादी हेच गांधीवादाच्या पराभवास कारणीभूत आहेत .

राजकारणात शुद्ध साधने वापरली पाहिजेत आणि नीती हे समाजजीवनाचे अधिष्ठान असले पाहिजे, ही म. गांधीजींची अपेक्षा दुर्दैवाने धुळीस मिळाली आहे. याला राज्यकर्ते हेच मुख्यतः जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे ज्या विरोधी पक्षनेत्यांनी नैतिकतेचा सतत आग्रह धरला असे जयप्रकाश नारायण यांच्यासारखे नेतेही भ्रष्टाचाराविरुद्ध देशव्यापी आंदोलन उभे करू शकले नाहीत. 1974 साली जयप्रकाशजींनी आंदोलन सुरू करताना 'भ्रष्टाचार हटाओ' ही घोषणा केली परंतु प्रत्यक्षात त्या चळवळीचे रूपांतर 'इंदिरा हटाओ' या राजकीय चळवळीत झाले.

सत्याग्रह ही गांधीजींची जगाला देणगी आहे असे मी मानतो. अन्यायाचा अहिंसक मार्गाने प्रतिकार करण्याची त्यांची शिकवण मार्टिन ल्यूथर किंग, अ‍ॅक्किनो आदींनी स्वीकारली. जगात स्वकीयांच्या अन्यायाविरुद्ध जेव्हा जेव्हा लढावे लागेल तेव्हा सत्याग्रह हाच मार्ग स्वीकारावा लागेल. या बाबतीत म. गांधींचा पराभव होऊच शकणार नाही असे माझे स्पष्ट मत आहे. मात्र गांधीजी ज्या गांभीर्याने सत्याग्रह या शस्त्राचा वापर करीत ते गांभीर्य विरोधी पक्षांनी न पाळल्यामुळे सत्याग्रह हे शस्त्र आम्ही बोथट करून टाकले. त्यामुळे काही वेळा योग्य रीतीने हे शस्त्र वापरले जात असताही त्याचे महत्त्व आपल्याला समजत नाही. मेधा पाटकर या सत्याग्रही मार्गानेच लढत आहेत आणि स्वतंत्र भारतात त्यांनीच खऱ्या अर्थाने सत्याग्रहाचे महत्त्व देशाला दाखवून दिले आहे. अन्य अनेकांनी सत्याग्रह उथळपणे केला आणि राज्यकर्त्यांनीही सत्याग्रहींची लागलीच सुटका करण्याचे तंत्र अवलंबून अनेक सत्याग्रह हास्यास्पद करून टाकले. हा गांधीजींचा पराभव नाही. 'सत्याग्रही हा कधी पराभूत होत नाही' असे गांधीजी म्हणत असत. त्याचप्रमाणे सत्याग्रह पूर्ण गांभीर्याने केला असेल आणि त्याला नैतिक अधिष्ठान असेल तर अन्यायाच्या प्रतिकाराचे ते सर्वश्रेष्ठ साधनच ठरेल, असे माझे स्पष्ट मत आहे.

समाज निर्भय असला पाहिजे, आर्थिक व सामाजिक विषमतेचे निर्मूलन झाले पाहिजे, ही म. गांधींची अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही, हा गांधीवादाचा पराभव नाही. हा आपला पराभव आहे. गांधीजींनी आपल्या आचरणाने समाजाची उभारणी कशी करावी हे सांगितले. काही बाबतीत परिस्थिती बदलल्यामुळे त्यांचे विचार कालबाह्य झाले आहेत. परंतु जगातील अनेक विचारवंतांना गांधीजीचे 'अहिंसक प्रतिकार आणि मानवाला निर्भय करण्यासाठी उत्पादन पद्धतीचे व राज्यव्यवस्थेचे विकेंद्रीकरण' हे विचार आजही जगाला मार्गदर्शक ठरतील असे वाटते. सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ शूमाकर याने 'स्मॉल इज ब्युटिफूल' या ग्रंथात विकेंद्रीकरणाचाच पुरस्कार करणारी पर्यायी विकासनीती सांगितली आहे. टॉफलर यांनी ' थर्ड वेव्ह' या पुस्तकात जगात संस्कृतीची तिसरी लाट कशी येईल यासंबंधी जे दिग्दर्शन केले आहे त्यात म. गांधींच्या विचारांचे महत्त्व मान्य केले आहे. त्यांच्या मते आज विज्ञानाने केलेली प्रगती स्वीकारून तिचा वापर करताना विकेंद्रित उत्पादन व्यवस्था निर्माण केली, तरच मानवाला सुख व समाधान मिळू शकेल. त्यांच्या पुस्तकातील एका महत्त्वाच्या प्रकरणात 'गांधी आणि सॅटलाईट' एकत्र आणले पाहिजेत आणि उत्पादन व्यवस्थेचा घटक 'इलेक्ट्रॉनिक्स असलेली झोपडी' हा असला पाहिजे, असे प्रतिपादन केले आहे. म. गांधींच्या विचारांचा हा विजयच आहे असे माझे स्पष्ट मत आहे. आज आपल्या देशासमोर जी पर्यायी विकासनीती मांडली जात आहे तिचा आधार म. गांधींचा विचार हाच आहे. म. गांधींनी खादीचा पुरस्कार करताना खादीच्या उत्पादनात कोट्यवधी हातांना काम मिळेल आणि देश स्वावलंबी होईल अशी अपेक्षा ठेवली होती. आज देशातील बेकारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि नरसिंह राव सरकारची नवी अर्थनीती देशाला परावलंबी करीत आहे. अशा वेळी आपण सर्वांनी अंतर्मुख होऊन देशाच्या भवितव्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. तंत्रविज्ञानात जे झपाट्याने बदल होत आहेत त्यांच्यामुळे आपण सर्व बाबतीत स्वावलंबी होऊ शकणार नाही, हे मान्य केले पाहिजे. परंतु ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांच्या उत्पादनामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचा वरचष्मा होणे सर्वथैव अनिष्ट आहे. गांधीजींनी सर्व लोकांच्या मूलभूत गरजा भागल्या पाहिजेत हा आग्रह धरताना लोकांनी उपभोगवादी होऊ नये हे स्पष्टपणे सांगितले. 'सर्वांची गरज भागवील एवढा भारत समर्थ आहे, चैनबाजीसाठी त्याची मुळीच कुवत नाही.' हे गांधीजींचे उद्गार आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतील.

म. गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पर्यायी विकासनीतीचा आग्रह धरणाऱ्या व्यक्तींनी आणि संघटनांनी एकत्र येऊन म. गांधींच्या विचारांचा व कृतीचा वारसा पुढे चालविला पाहिजे.

महात्मा गांधींच्या पवित्र स्मृतीस आमचे शतशः प्रणाम.

Tags: गांधीजींचे वारस गांधीवादी विचारधारा महात्मा गांधी गांधीवाद Gandhians Ideology Gandhi Gandhian thought Mahatma Gandhi #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके