डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाकिस्तानने भारताविरुद्ध अत्यंत दुष्ट प्रचार केला तरी जो कोणी निःपक्षपातीपणाने काश्मीर प्रश्नाची माहिती घेईल त्याला भारताने आपल्या राष्ट्राचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी सैन्यबळ वापरलेच पाहिजे असा निर्णय द्यावा लागेल. परंतु क्लिंटनसारखा हलक्या कानाचा, बदसल्लागारांनी वेढलेला, अपरिपक्क माणूस आपल्या पदाचा गैरवापर करून अकारण भारताविरुद्ध गरळ ओकीत आहे.

पाकिस्तानने भारताशी अघोषित युद्धच सुरू केले आहे आणि युद्धातील सर्व डावपेचांचा अवलंब पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो या करीत आहेत. 1965 आणि विशेषतः 1971 मध्ये भारताच्या लष्करी सामर्थ्याचा तडाखा बसल्यामुळे भारताशी उघड युद्ध करणे शक्य नाही हे पाकिस्तान जाणून आहे. म्हणूनच सर्व डावपेच पाकिस्तान उपयोगात आणीत आहे. प्रचाराच्या आघाडीवर भारताला बदनाम करण्याचे सर्व मार्ग बेनझीर भुत्तो वापरीत आहेत. भारताकडून काश्मीरमध्ये मानवी हक्कांचा भंग होत आहे म्हणून पाकिस्तान डांगोरा पिटत आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्या भागात जर कोणी भारतापासून फुटून निघण्याचा प्रयत्न केला तर लष्कराच्या बळावर तो हाणून पाडलाच पाहिजे. या कृत्याला पर्याय नाही. जे अतिरेकी लष्करावर, दूरदर्शन कार्यालयावर आणि नागरी वस्त्यांवरही रॉकेट्चा मारा करतात त्यांचे निर्मूलन शस्त्र- बळानेच केले पाहिजे. पंजाबमधील अतिरेकी हा धडा शिकले. काश्मीरमधील अतिरेक्यांनाही काही दिवसांनी शरणागतीशिवाय अन्य पर्याय नाही हे समजून येईल. जगात आज अनेक राष्ट्रांना दहशतवादाला तोंड द्यावे लागत आहे. दहशतवादापुढे गुडघे टेकले तर ते राष्ट्र जगूच शकणार नाही. गैरमार्गाने जाणाऱ्यांना, देशद्रोह करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणे हेच शासनकर्त्यांचे कर्तव्य असते. 

पाकिस्तानने भारताविरुद्ध अत्यंत दुष्ट प्रचार केला तरी जो कोणी निःपक्षपातीपणाने काश्मीर प्रश्नाची माहिती घेईल त्याला भारताने आपल्या राष्ट्राचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी सैन्यबळ वापरलेच पाहिजे असा निर्णय द्यावा लागेल. परंतु क्लिंटनसारखा हलक्या कानाचा, बदसल्लागारांनी वेढलेला, अपरिपक्क माणूस आपल्या पदाचा गैरवापर करून अकारण भारताविरुद्ध गरळ ओकीत आहे. मध्यंतरी पंजाब प्रकरणी क्लिंटन जे बोलला त्याला भारताने मुहतोड जबाब दिला हे योग्य झाले. भारताची आंतरराष्ट्रीय प्रचार आघाडी यापेक्षा अधिक समर्थ असली पाहिजे असे मात्र खासच वाटते. 

आज जगामध्ये भाडोत्री गुन्हेगार हे तस्करी, अमली पदार्थांचा चोरटा व्यापार असे गुन्हे करताना शस्त्रांचीही चोरटी निर्यात करीत असतात. पाकिस्तान अशा गुन्हेगारांचा उपयोग करून भारताला त्रास देत आहे. अफगाणिस्तानातील हजारो मुजाहिदीन काश्मीरच्या सीमेवर आले असून घुसखोरी करण्याचा त्यांचा इरादा आहे. या घुसखोरांचा बंदोबस्त करण्यास भारतीय लष्कर समर्थ आहे असा विश्वास आज सर्व भारतीयांना वाटतो. मानवी हक्क परिषदेत तसेच यूनोमध्येही बेनझीर भुत्तो भारतावर हवे ते आरोप करतील. त्यांचे खंडन आपल्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी केले पाहिजे. परराष्ट्र विभाग सध्या दिनेशसिंग या विकलांग मंत्र्याकडे आहे, हे इष्ट नाही. कोणातरी तडफदार व बुद्धिमान व्यक्तीकडे परराष्ट्र खाते सोपविले पाहिजे. पंतप्रधान हे का करीत नाहीत ते आम्हाला समजत नाही. पाकिस्तानची अंतर्गत राज्यव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्यामुळे लोकांचे लक्ष या अपयशाकडून दुसरीकडे जावे यासाठी भारताविरुद्ध सतत क्षोभ निर्माण करण्याशिवाय बेनझीर भुत्तोंना गत्यंतरच नाही.

काश्मीरचा प्रश्न हा अत्यंत जटिल होऊन बसला आहे याची आम्हाला जाणीव आहे. अशा वेळी सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन देशात या प्रश्नावर एकमत घडवून आणणे आणि आपल्या सेनेला व बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला खंबीर आधार देणे ही जबाबदारी गृहमंत्र्यांचीच आहे. परंतु शंकरराव चव्हाणांकडून या मुत्सद्देगिरीची अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही. ज्यांना काँग्रेस पक्षातही सर्वांचा विश्वास संपादन करता येत नाही ते देशात एकमत कसे घडवून आणणार? समस्या कितीही गंभीर व बिकट असली तरी राज्यकर्त्यांनी कार्यक्षम व निष्कलंक अशी स्वतःची प्रतिमा देशात उभी केली तर सर्व देश निर्धाराने एकत्र येतो. आज ते घडत नाही याचेच आम्हाला दुःख वाटते.

मुंबईमध्ये डॉ. अन्सारी या इसमाबद्दल जी माहिती अलीकडे प्रसिद्ध झाली आहे, जो कबुलीजबाब त्याने दिला आहे त्यावरून पाकिस्तानच्या पंचमस्तंभी कारवाया किती वर्षे चालू आहेत आणि त्यांनी भारतात अनेक ठिकाणी कसे सुरुंग पेरले आहेत याची कल्पना येते. ही परिस्थिती भयावह आहे. आपल्या देशातील गुप्त-पोलीस यंत्रणा जर पुरेशी जागरूक व कार्यक्षम असती तर मुंबईत स्फोट झालेच नसते. शत्रूला दुष्ट म्हणून नावे ठेवण्यात अर्थ नसतो. त्या दुष्ट कारवायांचे वेळीच निर्मूलन करण्याची ताकद व कुशलता राज्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे. 

आपले सेनादल, नौदल आणि वायुदल ही तिन्ही दले पहिल्या दर्जाची आहेत. परंतु राजकीय गुन्हेगारी हुडकून काढण्यात आपली यंत्रणा आज अपुरी पडत आहे. यामुळे आजवर अकारण निरपराध व्यक्तींचे बळी गेले. या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होता कामा नये.

भारतात युद्धज्वर निर्माण व्हावा असे आम्हाला वाटत नाही. परंतु आपले शासन दक्ष आहे, देशाच्या संरक्षणासाठी सर्व यंत्रणा सिद्ध आहे आणि सरहद्दीवर वा देशामध्ये पंचमस्तंभीयांना निपटून टाकले जाईल असा विश्वास जनतेत निर्माण होणे आवश्यक आहे. ते घडेल तो सुदिन!

औचित्यपूर्ण, उद्बोधक अध्यक्षीय भाषण 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्राचार्य राम शेवाळकर यांनी जे भाषण केले, ते त्या पदास साजेसे, विचारपरिप्लुत आणि उद्बोधक होते. शेवाळकरांनी सुरुवातीसच, आजच्या जगातील भीषण परिस्थितीत माणुसकी कशी हरपत चालली आहे याचे रेखीव वर्णन करून या आवर्तात सापडलेल्या माणसाचे आजच्या मराठी साहित्यात चित्रण आहे का, असा रोखठोक सवाल विचारलेला आहे. ते म्हणतात, 'मानवाच्या, पशू किंवा दानव यामध्ये होणाऱ्या रूपांतरामागील कारणमीमांसा उलगडण्याबाबत जिज्ञासा उगवण्याची शक्यता आहे काय? या विराट विश्वाच्या मुळाशी असणाऱ्या गूढ शक्तीपुढे आजचा विज्ञानवीर, अहंपीडित माणूसही नगण्य आणि केविलवाणा का होऊन जावा हे कधी जाणून घेता येईल काय?...हे खरे म्हणजे माणसाच्या कुतूहलाचे सनातन विषय असावयास हवेत. या कुतूहलपूर्तीच्या प्रयत्नांतूनच त्याला जीवनाबद्दलची खोल उमज प्राप्त होईल व त्याची दृष्टीही विशाल होईल.' प्राचार्य शेवाळकर यांनी या विवेचनातून आजच्या साहित्यिकांच्यात, आजच्या समस्यांच्या मुळाशी जाण्याचे कुतूहल तरी आहे का, आणि ते नसल्यास ते साहित्य रसिकांच्या मनाचा वेध कसा घेऊ शकेल, हा प्रश्न उपस्थित केला आहे.

प्राचार्य शेवाळकर यांच्या भाषणातील, आविष्कारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा भाग आम्हांला विशेषच महत्त्वाचा वाटतो. समाजात माजलेल्या झुंडशाहीमुळे आणि काही समाजांतील धर्माधतेमुळे सलमान रश्दी, तस्लीमा नसरीन यांच्यावर जे भयावह संकट आले, त्यासंबंधी शेवाळकरांनी चिंता व्यक्त केली आहे. हे तर योग्य आहेच. त्याचबरोबर आम्हांला असे वाटते की, शासनाच्या बोटचेपेपणामुळे ही झुंडशाही वाढत असते हे शेवाळकरांनी अधिक स्पष्टपणे सांगावयास हवे होते. विशेषतः इतिहासाच्या संदर्भाबाबत, अप्रिय परंतु कटु सत्य मांडले गेल्यास ते स्वीकारण्याची शासनकर्त्यांची तयारी नसते आणि झुंडशाहीपुढे माघार घेऊन ते साहित्यिक वा संशोधक यांना झोडपतात, याचा निषेध अधिक स्पष्टपणे यावयास हवा होता. आचार्य जावडेकर, प्रियोळकर, कविवर्य माधव ज्यूलियन आणि गिरीश या थोर साहित्यिकांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष. प्रा.शेवाळकरांनी त्यांच्या योगदानाविषयी उचित शब्दांत आदर व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'गांधीजींच्या जन्माला 125 वर्षे पूर्ण होण्याच्या सुमारास 'आधुनिक भारत'कारांचे आणि महाराष्ट्र-गोमंतक संबंधाच्या नव्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर प्रियोळकरांचे स्मरण होणे अपरिहार्य आहे.' माधव ज्यूलियन आणि गिरीश यांनी मराठी रसज्ञतेचे क्षितिज विस्तीर्ण केल्याबद्दल शेवाळकरांनी त्यांना कृतज्ञतेने अभिवादन केले आहे.

प्राचार्य शेवाळकर यांनी कधी स्फटिक-मीनारात स्वतःला बंदिस्त करून घेतलेले नाही. ते सतत लोकांत वावरले आणि जनसामान्यांच्या सुखदुःखांशी एकरूप झाले. त्यामुळे त्यांच्या भाषणात, महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या भीषण भूकंपाचा आणि त्यात बळी गेलेल्या हजारो व्यक्तींचा भावपूर्ण उल्लेख आलेला आहे. नियतीच्या या खेळात मानव कसा हतबल बनतो, याचा उल्लेख करून शेवाळकर म्हणतात, 'या माणसाच्या मनाची विचारपूस करणे साहित्य-निर्मात्यांकडून अपेक्षित नाही काय?' साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून आशयघन भाषण करून आणि मराठी साहित्यिकांना व जनतेलाही त्यांच्या कर्तव्याची जाणीव देऊन प्राचार्य शेवाळकर यांनी आपली जबाबदारी सुयोग्य रीतीने पार पाडली आहे. या वर्षात शेवाळकरांची महाराष्ट्रात जी अनेक भाषणे होतील, त्यांच्यामुळे मराठी माणसांच्या अभिरुचीवर सुसंस्कार होईल आणि नवोदित साहित्यिकांपुढे कोणती आव्हाने आहेत, याची जाण त्यांना येईल असा दिलासा या अध्यक्षीय भाषणातून खासच मिळतो.

Tags: मराठी रसज्ञतेचे क्षितिज मुजाहिदीन आविष्कारस्वातंत्र्याचा पुरस्कार प्राचार्य राम शेवाळकर उद्बोधक अध्यक्षीय भाषण औचित्यपूर्ण नागरी वस्त्यांवरही रॉकेट्चा मारा काश्मीर लष्करी सामर्थ्याचा तडाखा भारताशी अघोषित युद्ध पाकिस्तानची कांगावखोरी Rocket Military War Indo-Pak Pakistan #Weekly sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके