डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आंतरराष्ट्रीय परिवार वर्षाच्या निमित्ताने

मध्यंतरी फर्ग्युसन महाविद्यालयीन एका विद्यार्थ्याने आपल्या वर्गातील प्रेयसीचा खून करून नंतर आत्महत्या केली. या घटनेमुळे समाजाला धक्का बसला. पुन्हा कुटुंबपद्धतीबद्दल लोक विचार करू लागले आहेत. कुटुंबामध्ये प्रेमाचे, जिव्हाळ्याचे वातावरण असले पाहिजे, मुलांवर सुसंस्कार झाले पाहिजेत आणि कुटुंबामुळे जीवनात सुरक्षितता आली पाहिजे, या किमान अपेक्षा असतात. या दृष्टीने कुटुंबाबरोबरच शाळा, कॉलेजे, स्वयंसेवी संस्था, वृत्तपत्रे व प्रसार माध्यमे आदींचीही कर्तव्ये काय आहेत हे निश्चित ठरले पाहिजे.

अण्णासाहेब शिंदे यांना लोक-महर्षी म्हणतात कारण त्यांचे विचार, बोलणे आणि कृती यांमध्ये एकवाक्यता होती. महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यतेचे निर्मूलन झाले पाहिजे, हा विचार तर मांडलाच; शिवाय ते स्वतः दलित वस्तीत राहावयास गेले. ते व त्यांची बहीण जनाबाई दलित मुलांची हाताने स्वच्छता करीत. महर्षी शिंदे यांनी अहिल्याश्रम ही संस्था काढून दलितांना शिकविण्याचेही कार्य केले.
 

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय परिवार वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. मानवी जीवनात कुटुंब संस्थेमुळेच स्वास्थ्य आणि सुरक्षितता निर्माण होऊ शकेल, या जाणिवेतूनच हा निर्णय घेतला गेला आहे. शेतीप्रधान समाजरचनेत एका वेळी एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंबसंस्था हा त्या परिस्थितीत जीवनाचा आधार होता. स्त्री पुरुषांनी शेतावर एकत्र कष्ट करावेत, घरात स्त्रियांनी एकत्रपणे कष्ट करून रांधण्यापासून स्वच्छतेपर्यंत सारी कामे करतानाच मुलांना वाढविण्याचे काम करावे ही तेव्हा रीत होती. एकत्र कुटुंबात म्हाताऱ्या माणसांनाही त्यांच्या वयाला आणि प्रकृतीला अनुरूप असे काम असे. सख्खी, चुलत भावंडे एकत्र वाढत. थोरली भावंडे धाकट्यांना सांभाळीत असत. गरजा किमान असत पण जे असे ते सगळेजण सारखे वाटून घेत. कुटुंब प्रमुखाचा मोठा दरारा असे आणि त्याच्या आज्ञेबाहेर कोणी सहसा जात नसे. या व्यवस्थेत अन्याय नव्हता असे नाही. कर्त्या पुरुषाची बायको धाकट्या जावांवर, सुनांवर अधिकार गाजवीत असे. माहेरी परत आलेल्या विधवा स्त्रीस सगळ्या बाबतीत डावलले जाई. काहीजण दुष्ट, काही लबाड, असे माणसांचे सर्व प्रकार कुटुंबात असत. मत्सर, मोह हे कोणाला सुटले नव्हते. भांडणे होत, काही वेळा माणसे वर्दळीवर येत, परंतु सारे विसरून पुन्हा एकत्र राहत. एकमेकाला अडचणींत आपत्तीत सांभाळून घेत. स्वतःला मुरड घालून इतरांशी जमवून घेत. एकत्र कुटुंब हे एक छोटे जगच असे. खाण्यात भेदभाव नसे आणि सगळ्या मुलांचे कपडे सारखे असत. पुढे माणसांना स्वत्वाची अधिक जाणीव होऊ लागली. त्याचबरोबर नोकरी निमित्ताने काहीजण बाहेर पडले. या चाकरमान्यांचे कुटुंब वेगळे झाले तरी सुरुवातीस घराशी नाते तुटलेले नसे. काही कुटुंबांत शिकणाऱ्या मुलांचे शहरात एकत्र बिर्‍हाड होई. एक महत्वाची गोष्ट म्हणजे अडचण, आपत्ती यावेळी सर्व जण एकत्र येत. आजारपण, बाळंतपण, यावेळी सारे हेवेदावे विसरले जात. यामुळे कुटुंबात सर्वांना सुरक्षितता वाटे. दुसऱ्या महायुद्धानंतर सारेच पालटले. माणसे शहरांत राहू लागली. घरातील स्त्रियांनाही नोकऱ्या करणे भाग पडले. जीवनाबद्दलची आकांक्षा वाढली. या परिस्थितीत कुटुंबे विभक्त होणे अटळ होते. गुण्यागोविंदाने भाऊ भाऊ वेगळे होत आणि वेगळे राहूनही प्रेमाने राहात असत. किंबहुना रोजच्या किरकोळ कटकटी नसल्यामुळे मनात अढी नसे. पण असे असले तरी अडचण, आजारीपण यावेळी प्रत्येक कुटुंबालाच आपापले संकट सोसावे लागे.

गेल्या काही वर्षांत परिस्थिती फारच झपाट्याने बदलली आहे. पाश्चात्य देशांमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर विभक्त कुटुंब पद्धती होती. तरीही कुटुंबाचे मुले वाढविण्याबाबतचे कर्तव्य कसोशीने पाळले जाई. गेल्या काही वर्षांमध्ये कुटुंब पद्धतीस अनेक धोके निर्माण झाले आहेत. आई आणि वडील यांच्यामध्ये बेबनाव असल्यावर मुलांचे भावनिक जीवन उद्ध्वस्त होणारच. लहान वयात असा मानसिक धक्का बसलेली मुले मोठेपणी वेडीवाकडी वागतात. तसेच नोकरीमुळे आई वडिलांना मुलांकडे पाहण्यास वेळ नसला की टी.व्ही.वरील विकृत कार्यक्रम, आजूबाजूची दुर्गणी मुले यांचा प्रभाव पडून मुले बिघडतात, हे आजवर सधन देशात होत होते. आता आपल्याकडे मध्यमवर्गातील कुटुंबामध्ये हे तणाव वाढत चालले आहेत. शहरांतून झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलांवर अनिष्ट परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्याभोवती असतात. समाजातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, हिंसेचे वातावरण इत्यादींमुळे कुटुंबसंस्था धोक्यात येऊ लागली आहे. मध्यंतरी फर्ग्युसन महाविद्यालयीन एका विद्यार्थ्याने आपल्या वर्गातील प्रेयसीचा खून करून नंतर आत्महत्या केली. या घटनेमुळे समाजाला धक्का बसला. पुन्हा कुटुंबपद्धतीबद्दल लोक विचार करू लागले आहेत. कुटुंबामध्ये प्रेमाचे, जिव्हाळ्याचे वातावरण असले पाहिजे, मुलांवर सुसंस्कार झाले पाहिजेत आणि कुटुंबामुळे जीवनात सुरक्षितता आली पाहिजे, या किमान अपेक्षा असतात. या दृष्टीने कुटुंबाबरोबरच शाळा, कॉलेजे, स्वंयसेवी संस्था, वृत्तपत्रे व प्रसार माध्यमे आदींचीही कर्तव्ये काय आहेत हे निश्चित ठरले पाहिजे. शासनाच्याही या बाबतीत जबाबदाऱ्या आहेतच. समाज जीवन बिघडू नये यासाठी सतत आणि जागरूकतेने प्रयत्न झाले तरच कुटुंबातील व्यक्तिजीवन सुधारु शकेल. हे सर्व होण्यासाठी आपणच आपले मन पवित्र ठेवण्याचा कसोशीचा प्रयत्न केला पाहिजे. चांगले साहित्य, पालखीसारखे भक्तिमार्गाने चालणारे कार्यक्रम यांचा सुसंस्कार सतत होत राहिला पाहिजे. कुटुंबाचे स्वतंत्र अस्तित्व असतानाच, समाज हे एक कुटुंब आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. जो समाज अन्याय व विषमतेवर आधारलेला असेल तेथे कुटुंबातही स्वार्थ, लबाडी या प्रवृत्ती वाढणारच. यासाठी समाजही सुधारला पाहिजे आणि व्यक्तीही सुधारी पाहिजे, तरच कुटुंबसंस्था टिकू शकेल, मानवी जीवनास उपकारक, पोषक होऊ शकेल.

जगात 1994 हे ‘परिवार वर्ष’ म्हणून साजरे करावयाचे ठरले, याचा अर्थ प्रत्येक देशातील आपापल्या समाजात याबाबत नव्या जाणिवा निर्माण कराव्यात, विविध धर्म, जाती आणि पंथांच्या नेत्यांनी आपापल्या अनुयायांना त्यांच्या कर्तव्याची शिकवण द्यावी, शाळा, वृत्तपत्रे व अन्य प्रसारमाध्यमे यांनी आपापल्या जबाबदर्‍या ओळखाव्यात आणि मुख्यतः प्रत्येक कुटुंबातील जाणत्या व्यक्तींनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि आपले कर्तव्य पार पाडावे, हा आहे. या वर्षासंबंधी राजकीय ठराव होऊन चालणार नाहीत. ज्या व्यक्तींना समाजाला काही सांगण्याचा नैतिक अधिकार आहे अशा व्यक्तींचे शब्दच आपल्याला ‘परिवार वर्ष’ कसे पाळावे याचे मार्गदर्शन करू शकतील. मदर तेरेसा नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना म्हणाल्या, 'मुले ही परमेश्वराची पवित्र देणगी आहे. त्यांचे पालन- पोषण करणे, त्यांच्यावर सुसंस्कार करणे हे आपले परम पवित्र कर्तव्य माता-पित्यांनी आणि इतर सर्वांनी पार पाडले पाहिजे'

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना विनम्र अभिवादन 

महर्षी विठ्ठल रामजी तथा अण्णासाहेब शिंदे हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक आणि निस्सीम देशभक्त. दोन जानेवारीस त्यांची पन्नासावी पुण्यतिथी होती. महर्षी अण्णासाहेब शिंदे यांचे त्यागी आणि तपस्वी जीवन प्रेरणादायी आणि स्फूर्तिप्रद होते. जमखिंडी या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणी वडिलांच्यामुळे त्यांच्यावर भागवत धर्माचे संस्कार झाले. ते पुण्यास फर्ग्युसन कॉलेजात शिकण्यासाठी आले आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी साहित्य आणि सामाजिक जीवन आणि राजकारण या विषयांवरील अनेक ग्रंथ वाचले आणि तत्कालीन समस्यांविषयी स्वतंत्रपणे विचार केला. 1895 साली पुण्याला भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्वयंसेवकाचे काम केले, तेथील भाषणांचा त्यांच्या मनावर मोठा प्रभाव पडला आणि ते राष्ट्रीय वृत्तीचे बनले. शिंदे यांच्या मनात भक्तिभाव होता आणि त्यामुळेच ते प्रार्थना समाजाकडे आकृष्ट झाले. प्रार्थना समाजातर्फे धर्माच्या तौलनिक अभ्यासासाठी परदेशात जाण्याचे ठरले त्या वेळी बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी त्यांना मोठे साहाय्य केले. शिंदे हे दोन वर्षे ऑक्सफर्ड विद्यापीठात होते. तेथे असताना त्यांनी केलेले वाचन, चिंतन, अनेक विचारवंतांचा त्यांना लाभलेला सहवास आणि अनेक देशांचा प्रवास या मुळे त्यांचे मन प्रगल्भ आणि निष्ठावान बनले.

विठ्ठल रामजी शिंदे कॉलेजमध्ये असताना टिळक आणि आगरकर यांचे वादविवाद वाचून त्यांना वाईट वाटत असे. देशातील राष्ट्रवादाचे आणि सुधारणावादाचे प्रवाह एकत्र आले पाहिजेत असे त्यांना वाटे. 1908 साली शिंदे हे प्रार्थना समाजाचे काम करीत असताना लो. टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांची शिक्षा झाली. त्या वेळी पुण्यात प्रार्थना समाजाच्या व्यासपीठावरून त्यांनी सहवेदना व्यक्त केली. प्रार्थना समाजाचे प्रमुख डॉ. भांडारकर यांना हे रुचले नाही तेव्हा शिंदे म्हणाले, 'ईश्वरापुढे उभा राहून प्रार्थना करत असताना भारताचे संकलित भवितव्य पाहून प्रार्थना करणे हे माझे पवित्र कर्तव्य आहे. आपला विश्वास असेल तरच मला जागेवर ठेवा. पण माझ्या कामात मला ईश्वराला जबाबदार राहू द्या.’

म. गांधींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवाद आणि सामाजिक सुधारणावाद हे दोन प्रवाह एकत्र आहे, याचे विठ्ठल रामजी शिंदे यांना समाधान वाटले. सामाजिक परिवर्तनाचे काम करतानाच त्यांनी राजकीय जागृतीचेही कार्य केले. माँटेग्यु-चेम्सफर्ड सुधारणांनुसार जेव्हा निवडणुका घेण्याचे ठरले तेव्हा अण्णासाहेब शिंदे यांनी निवडणुकीस उभे राहण्याचे मान्य केले परंतु मराठा समाजासाठी राखीव असलेल्या जागेवर उभे राहण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. 1930 सालच्या सत्याग्रहात अण्णासाहेब शिंदे हे अग्रभागी राहिले आणि त्यांनी कारावास स्वीकारला. महाराष्ट्रातील बहुजन समाजास यामुळे मोठीच प्रेरणा मिळाली. केशवराव जेधे हे अण्णासाहेब शिंदे यांना गुरुस्थानी मानत असत. महर्षी शिंदे हे फार बुद्धिमान आणि व्यासंगी होते. 'बहिष्कृत भारत' आणि ‘अनटचेबल इंडिया’ या त्यांच्या ग्रंथातून त्यांच्या व्यासंगाची साक्ष पटते.

अण्णासाहेब शिंदे यांनी शेतकरी समाजाबद्दल अत्यंत आपुलकीने लिहिले असून शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हे सडेतोडपणे लिहिले. 1932 साली लिहिलेल्या लेखांतून त्यांनी भांडवलशाहीमुळे श्रमिकांची पिळवणूक कशी होते ते सांगितले. 1911 साली त्यांनी मुरळी प्रतिबंधक परिषद घेऊन देवदासी प्रथेस विरोध केला होता. स्त्रियांना समानतेने वागविले पाहिजे असे केवळ ते बोलत नसत, आपल्या बहिणीस शिकवून त्यांनी आपल्याबरोबर समाजकार्यात सामील करून घेतले.

अण्णासाहेब शिंदे यांना लोक-महर्षी म्हणतात कारण त्यांचे विचार, बोलणे आणि कृती यांमध्ये एकवाक्यता होती. महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यतेचे निर्मूलन झाले पाहिजे, हा विचार तर मांडलाच; शिवाय ते स्वतः दलित वस्तीत राहावयास गेले. ते व त्यांची बहीण जनाबाई दलित मुलांची हाताने स्वच्छता करीत. महर्षी शिंदे यांनी अहिल्याश्रम ही संस्था काढून दलितांना शिकविण्याचेही कार्य केले. अण्णासाहेब हे भावुक ध्येयवादी नव्हते. प्रत्येक कामाला ज्ञानाचे अधिष्ठान असले पाहिजे असे ते मानत. प्रखर देशभक्ती, समाजसुधारणेची उत्कट तळमळ आणि अखंड ज्ञानोपासना असा त्रिवेणी संगम अण्णासाहेब शिंदे यांच्या जीवनात झाला होता.

महर्षी अण्णासाहेब शिंदे हे कमालीचे सहिष्णु व उदारमतवादी होते. म. फुले आणि डॉ. आंबेडकर यांची कठोरता त्यांच्या ठायी नव्हती. अण्णासाहेबांचे मन संवेदनशील होते. त्यांच्या डायरीतील पाने वाचल्यावर त्यांची रसिकता, ज्ञानोपासक वृत्ती, त्यांची संयमी व सहिष्णु वृत्ती, त्यांचे निसर्गप्रेम यांचे मनोज्ञ दर्शन होते. महर्षी शिंदे यांच्या मराठी लेखनाची शैली प्रसन्न आणि ओघवती आहे. 

महर्षी शिंदे यांचे व्यक्तिमत्व प्रेमळ आणि इतरांवर प्रभाव टाकणारे होते. त्यांची छातीवर रुळणारी दाढी आणि जटांसारखे केस यामुळे ते ऋषीसारखेच दिसत. त्यांचे भाषण ऐकले आणि लेखन वाचले म्हणजे त्यांची ऋजुता आणि महात्मता यांचा स्पर्श मनाला होत असे. 

महर्षि अण्णासाहेब शिंदे यांच्या पवित्र स्मृतीस शतशः प्रणाम.

Tags: अनटचेबल इंडिया बहिष्कृत भारत पुणे ऑक्सफर्ड विद्यापीठ लोकमान्य टिळक बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आंतरराष्ट्रीय परिवार वर्ष संयुक्त राष्ट्रसंघ Untouchable India Bahishkrut Bharat Pune Oxford University Lokmanya Tilak Babasaheb Ambedkar Mahatma Phule Maharshi Vitthal Ramaji Shinde International Family Year United Nations weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके