डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साने गुरुजींची 63 पत्रे

‘सुंदर पत्रे’ या  पुस्तकातील  पत्रांमधून गुरुजी आपले बालपण, अनुभवलेला परिसर, प्राणी व वनस्पतिसृष्टी आणि एकूणच निसर्गाविषयी व्यक्त होतात. आणि अर्थातच मानव्याविषयीही! तर ‘श्यामची पत्रे’ गुरुजींनी तेव्हा नव्यानेच सुरू झालेल्या सेवादलातील तरुणांना समोर ठेवून लिहिली आहेत. परंतु त्याला सर्व संदर्भ आहेत ते तेव्हाचा काँग्रेस पक्ष बळकट करण्याचे, समाजवाद प्रत्यक्षात आणण्याचे, जातीयवादी व धर्मांध शक्तींना दूर ठेवण्याचे, गांधीवाद व समाजवाद यातील दरी दूर करण्याचे.

हा अंक छापायला गेला 11 जूनला. या दिवशी साने गुरुजींचा 69 वा स्मृतिदिन होता. याच दिवशी साने गुरुजींची दोन पुस्तके छापायला सोडत आहोत, दोन्ही पुस्तके मागील काही वर्षे आऊट ऑफ प्रिंट होती. आता त्यांच्या नव्या आवृत्त्या तर येत आहेतच, पण त्यांचे वाचन/पुनर्वाचन नव्या संदर्भात केले पाहिजे.

त्यातील एक पुस्तक आहे ‘सुंदर पत्रे’. गुरुजींनी आपली पुतणी सुधाला उद्देशून ती लिहिली होती. अर्थातच, निमित्त 14 वर्षांच्या सुधाचे होते, प्रत्यक्षात ती पत्रे महाराष्ट्रातील किशोरवयीन मुला-मुलींना उद्देशून लिहिली होती. साधना साप्ताहिकातून 10 जून 1949 ते 10 जून 1950 या वर्षभरात ती पत्रे प्रसिद्ध झाली. ती एकूण 42 पत्रे आहेत. साधारणत: बाराशे ते पंधराशे शब्दांचे प्रत्येक पत्र म्हणजे छोटे छोटे लेख. पण त्यात हितगुज आहे, किशोरवयीन मुला-मुलींशी आणि स्वत:शीही. त्या पत्रांमधून गुरुजी आपले बालपण, अनुभवलेला परिसर, प्राणी व वनस्पतिसृष्टी आणि एकूणच निसर्गाविषयी व्यक्त होतात. आणि अर्थातच मानव्याविषयीही! 

त्या पत्रांमध्ये व्यक्तिगत व कौटुंबिक तपशिल केवळ निमित्तमात्र आहेत. व्यापक व संवेदनशील जीवनदृष्टी आणि उदात्त ध्येयवाद त्यातून प्रतिबिंबित झालेला पहायला मिळतो. या पत्रांचा संग्रह गुरुजींच्या निधनानंतर लगेचच पुस्तकरूपाने आला, त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. गुरुजींनी ज्या ‘सुधा’ला उद्देशून ती पत्रे लिहिली होती, त्या सुधाताईंनी आता गुरुजींना लिहिलेले पत्र ‘सुंदर पत्रे’च्या नव्या आवृत्तीत समाविष्ट केले आहे. (या अंकातही ते घेतले आहे.) 

गुरुजींचे दुसरे पुस्तक नव्याने येत आहे, त्याचे नाव- ‘श्यामची पत्रे’. यात 21 पत्रे आहेत. 1940 मध्ये म्हणजे ‘चले जाव’चा लढा सुरू होण्याच्या आधी लिहिलेली ही पत्रे आहेत. ही पत्रे ‘प्रिय वसंता’ असे संबोधून लिहिली आहेत. वसंता हा गुरुजींचा पुतण्या (सुधातार्इंचा भाऊ.) हा वसंता तेव्हा 20 वर्षांचा होता. वसंता तेव्हा नुकताच आयुर्वेदिक डॉक्टर झाला होता, कम्युनिस्ट विचारसरणीकडे झुकला होता, कॉ.गोदावरी परुळेकर यांच्यासोबत काही काळ राहिला होता. या वसंतावर गुरुजींचा भारी जीव होता. अर्थातच, ही पत्रे महाराष्ट्रातील त्यावेळच्या तरुणाईला उद्देशून लिहिली होती, वसंता केवळ निमित्तमात्र होता. 

वसंता कम्युनिझमकडे झुकलेला होता, पण पहिलेच पत्र गुरुजींनी रा.स्व.संघाकडे झुकलेल्या वसंताला उद्देशून लिहिले आहे. यातून गुरुजींना तेव्हा मोठा धोका कोणाचा वाटत होता हे ध्वनित होते. ‘श्यामची पत्रे’ गुरुजींनी तेव्हा नव्यानेच सुरू झालेल्या सेवादलातील तरुणांना समोर ठेवून लिहिली आहेत. परंतु त्याला सर्व संदर्भ आहेत ते तेव्हाचा काँग्रेस पक्ष बळकट करण्याचे, समाजवाद प्रत्यक्षात आणण्याचे, जातीयवादी व धर्मांध शक्तींना दूर ठेवण्याचे, गांधीवाद व समाजवाद यातील दरी दूर करण्याचे. या पुस्तकाची नवी आवृत्ती वाचताना त्यावेळचे काही संदर्भ नीट लागणार नाहीत, काही संदर्भ बदलले आहेत. पण या पत्रांचा गाभा व आवाका मात्र पूर्वीपेक्षा जास्त मननीय आहे, अनुकरणीय आहे. ही पत्रे नव्या संदर्भात कशी वाचली जावीत हे स्पष्ट करणारी चैत्रा रेडकर यांनी लिहिलेली प्रस्तावना नव्या आवृत्तीला जोडली आहे. तर गुरुजींनी लिहिलेली ही 63 पत्रे वाचायला हवीत, शक्य तितकी आचरणात आणायला हवीत.  
 

Tags: श्यामची पत्रे सुंदर पत्रे साने गुरुजी Sane Guruji Sunder Patre Shyamachi Patre weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके