डिजिटल अर्काईव्ह

उपमुख्यमंत्री क्रमांक 2 यांचे (व्यक्त न झालेले) मनोगत

सर्वांनाच थोडे थोडे वाटप करायचे, आणि सर्वांनाच उपाशी ठेवायचे हे काही मला पटत नाही. अनेकांचा तोच विचार असतो, त्यांचा त्यांना लखलाभ असो. एक थोडे जास्त स्पष्ट सांगतो, एकेकाला इतके भक्कम करून ठेवायचे की त्यांची भविष्याची चिंता मिटली पाहिजे, ही आपली कार्यपद्धती आहे. आणि तेवढे मी करून देणार असेल, तर त्यांनी माझ्यामागे बिनबोभाट उभे राहिले पाहिजे, ही अपेक्षा चुकीची कशी म्हणाल तुम्ही? आणि तसे नाही झाले, तर मला ताकद कुठून मिळणार, मला सत्ता कशी मिळणार आणि मग पुढचा विकास मी कसा करणार? अजून एक सांगतो. केंद्रात एक लोहपुरुष आणि एक विकासपुरुष आहे, असे भले भले लोक म्हणतात. पुढची पाच वर्षे सुखासुखी मिळाली ना, तर माझ्यात ते दोन्ही गुण आहेत हे दाखवून देतो.

हे पहा, अजित पवार म्हणतात मला. परखड बोलणे हा माझा स्वभाव आहे, मिळमिळीतपणा मला चालत नाही. हे खरे की सर्वच गोष्टी जाहीरपणे सांगता येत नाहीत. पण आतले एक आणि बाहेरचे एक असे मला पटत नाही. त्यामुळे अनेक लोकांना माझा स्वभाव आवडत नाही, पण अनेक लोक त्यामुळेच माझे चाहते झालेत. असो. सांगायचे काय, तर कालच्या 23 नोव्हेंबरला विधानसभेचे निकाल लागले, त्याला उद्या एक महिना होईल. महायुतीला इतके प्रचंड बहुमत मिळाले, विरोधी पक्ष सुपडा साफ झाले. तरीही मुख्यमंत्र्यांची निवड व्हायला आणि आम्हा तिघांचा शपथविधी व्हायला दोन आठवड्यांचा वेळ जावा लागला. त्यानंतर आठवडाभराने मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला. आणि त्यालाही आठवडा उलटला तरी खाते वाटप नाही. हे काही शोभत नाही महायुती म्हणवून घेणाऱ्यांना. विशेषतः मोदी आणि शहासाहेब देशाचे सर्वेसर्वा असताना. इतका घोळ घालणे अजिबात समर्थनीय नाही. या महिनाभरात किती निर्णय फटाफट झाले असते, किती तरी निधी वाटप करता आला असता, पण आमच्या या दोन्ही मित्र पक्षांना विकासाबाबत माझ्याइतकी पोटतिडीक नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पण हरकत नाही. खाते वाटप झाले की, मी माझ्या बाजूने तरी धडाधड निर्णय घेऊन कामे मार्गी लावेल. आपला कामाचा झपाटा सर्वांना माहिती आहे, पहाटे पाच वाजता मी काम सुरू करतो आणि रात्री बारापर्यंत आपले काम चालू राहते. त्यामुळे या महिनाभरात खोळंबलेले निर्णय पुढच्या चार दिवसांत मार्गी लावणार. पण इतर मंत्र्यांचे काय, त्यांना नाही जमणार माझ्याइतके!

आता खाते वाटपाची चर्चा चालू आहे. गृहमंत्री पद एकनाथरावांना हवे, अशा बातम्या आल्यात बाहेर. आणि अर्थ खाते जणू काही मला आंदण दिले आहे, असे समजून चाललेत सर्व जण. पण वस्तुस्थिती तशी नाही. अर्थ खातेसुद्धा मला सहजासहजी मिळू द्यायचे नाही, असे डावपेच आहेत, भाजपचे आणि देवेंद्रचे. आणि मी म्हणतो, तसे त्यांनी का करू नये? तब्बल 132 म्हणजे स्वबळावर सत्ता मिळू शकते इतक्या जागा आल्यात त्यांच्या, त्यामुळे राज्याची तिजोरी आपल्या हातात असावी असे त्यांना वाटणे साहजिक. पण मी तिथे जरा आग्रह धरलाय. ते खूपच अडून राहिले तर पुढील अडीच वर्षे तरी अर्थ खाते राहू द्या, असे म्हणेल मी. तरीही नाहीच मानले त्यांनी तर दुसरे चांगले खाते घेईल, चांगला विकास करता येईल असे. त्यामुळे, थोडं कमी-जास्त होईल. पण सत्ता पाहिजे हे मात्र खरं. आता हेही खरं की, राज्यातील भाजप नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. अन्य दोन पक्षांचे लोढणे कशाला, असे त्यांना वाटणेही साहजिक. पण बेट्यांनो, एकनाथरावांनी आणि मी तुमचा किती दीर्घकालीन फायदा करून दिला आहे, याचा जरा विचार करा. बलाढ्य पक्ष फोडणे हे काम यापूर्वी अनेकांनी केले, पण दोन बलाढ्य पक्षांचे चालक-मालक यांनाच उपरे ठरवणे असे भारताच्या इतिहासात नजीकच्या काळात घडल्याचा एखादा तरी पुरावा आहे? असेल तर दाखवून द्या.

माझ्या तुलनेत एकनाथरावांना जास्त बक्षिशी मिळाली. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद त्यांच्या ध्यानीमनीही नसणार. पण असते एकेकाचे नशीब. त्यामुळे एकनाथरावांनी आता 'भरून पावलो' अशा पद्धतीने वागायला हवे. त्यांच्या पक्षाला 57 जागा मिळाल्यात आणि माझ्या पक्षाला 41 जागा. पण तुम्हाला सांगतो, माझ्या पक्षाला मिळाल्यात, तेवढी आमची ताकद आहे. एकनाथरावांना मात्र त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त मिळाल्यात. हे कसे घडले, परमेश्वराला ठाऊक. पण त्यांच्याकडचे अनेक जण पूर्वी आमच्याबरोबर होते, त्यातील काहींना कधी काळी मीच पुढे आणले. त्यामुळे एकनाथरावांचे अनेक सहकारी मॅनेज करता येणे मला काही अवघड नाही, त्यांच्या मतदारसंघांत धडाधड निधी पुरवला, कामे मार्गे लावली की ते सगळे आमदार खूश होतील. आणि तसेही पुढच्या चार-पाच वर्षांत त्यातले काही माझ्याबरोबर येतील, काही भाजपबरोबर जातील. मी तर म्हणेन, त्यानंतर उरलेसुरले घेऊन एकनाथरावांनी भाजपमध्ये जावे. एक अख्खा पक्ष चालवणं म्हणजे काही पोरखेळ नाही.

आता माझ्यापुढची खरी अडचण एकच, भाजपला कसे हाताळायचे? कारण भाजपचे स्थानिक नेते, भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि संघ परिवार यांच्यात (मला कसे हाताळावे यावरून) सतत धुसफूस चालू राहणार. आणि देवेंद्रने सांगितले ते बरोबरच आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी त्यांची वैचारिक आघाडी आहे आणि माझ्या राष्ट्रवादीशी त्यांची राजकीय आघाडी आहे. खरे तर त्यांना म्हणायचे होते, एकनाथरावांच्या शिवसेनेशी त्यांची भावनिक जवळीक आहे आणि माझ्या राष्ट्रवादीशी व्यावहारिक जवळीक आहे. मला भावनिक होणे रुचत नाही, कारण त्यामुळे माणूस कमजोर होतो. आणि वैचारिकतेचे अवडंबर माजवणेही खपत नाही, कारण त्यामुळे माणूस निष्क्रिय होतो. आणि तसे पाहिले तर, विचार कोण नाही करत? सर्व जण करतात. माझे एकच म्हणणे आहे, 'विकास हाच विचार', तो केला की बाकी सगळे आपोआप येऊन जाते. सरकारने राज्याचे हित पाहायचे म्हणजे विकास करायचा. आणि तो करताना नैतिकतेच्या गप्पा मारायच्या असतील, तर सत्तेचे राजकारण करू नये. प्राप्त परिस्थितीत काय शक्य आहे, कुठे निधी कमी पडतो, कुठल्या योजना मार्गी लावायच्या, हाच खरा विचार. अर्थात, ते करताना भाबडेपणा चालत नाही. ज्यांनी आपल्याला पूर्वी मदत केली, त्यांचेच काम करायचे किंवा जे आपल्याला भविष्यात मदत करू शकतील, त्यांचेच निर्णय मार्गी लावायचे. तुम्ही म्हणाल, बाकीच्यांचे काय? तर त्याचे उत्तर, त्यांचे त्यांनी बघून घ्यावे, त्यासाठी स्वतःची माणसे सत्तेवर आणावीत. सरकार सर्वांचे असते, असे म्हणणे कागदावर ठीक आहे, लिहायला बोलायलाही ठीक आहे. व्यवहारात असे करून चालत नाही. तिजोरीला काही मर्यादा आहेत. सर्वांनाच थोडे थोडे वाटप करायचे, आणि सर्वांनाच उपाशी ठेवायचे हे काही मला पटत नाही. अनेकांचा तोच विचार असतो, त्यांचा त्यांना लखलाभ असो. एक थोडे जास्त स्पष्ट सांगतो, एकेकाला इतके भक्कम करून ठेवायचे की त्यांची भविष्याची चिंता मिटली पाहिजे, ही आपली कार्यपद्धती आहे. आणि तेवढे मी करून देणार असेल, तर त्यांनी माझ्यामागे बिनबोभाट उभे राहिले पाहिजे, ही अपेक्षा चुकीची कशी म्हणाल तुम्ही? आणि तसे नाही झाले, तर मला ताकद कुठून मिळणार, मला सत्ता कशी मिळणार आणि मग पुढचा विकास मी कसा करणार? अजून एक सांगतो. केंद्रात एक लोहपुरुष आणि एक विकासपुरुष आहे, असे भले भले लोक म्हणतात. पुढची पाच वर्षे सुखासुखी मिळाली ना, तर माझ्यात ते दोन्ही गुण आहेत हे दाखवून देतो.

आता माझ्या पक्षात मला कोणी आव्हान देईल असे दिसत नाही. भुजबळ साहेबांनी संयम सोडला आणि मराठा- ओबीसी तेढ विनाकारण वाढवली, मग त्यांना मंत्रीमंडळात तरी का घेऊ? बरे, आता तेही 77 वर्षांचे झालेत, त्यांनी थांबावे, स्वतःची इस्टेट सांभाळावी. गप्प राहणार असतील तर दुसरी काहीतरी व्यवस्था लावून देऊ त्यांची. फक्त मला अजून हे नीट कळत नाही की, ते स्वतः किती अस्वस्थ आहेत आणि देवेंद्र व भाजप त्यांना किती फूस देताहेत ? त्यामुळे, काहीही झाले तरी देवेंद्रजींशी चांगले संबंध ठेवावे लागतील. अर्थात, मोदी-शहा यांच्यात देवेंद्रवरून थोडी मतभिन्नता आहे. त्यामुळे देवेंद्रला सांभाळून, त्या दोघांचाही विश्वास टिकवणे ही तारेवरची कसरत आहे, ती करावी लागेल. या तिघांना नीट सांभाळता आले तर बाकी मला काही चिंता नाही. संघाचे लोक सोवळेपणा दाखवतील अधूनमधून. परवाच नाही का संघ कार्यालयात सर्व आमदार व मंत्र्यांना निमंत्रण होते नागपुरात, एकनाथराव गेले लवाजम्यासह. मी नाही गेलो, आमच्यातला एक आमदार गेला, ते ठीक आहे. अधूनमधून इतर गेले तर माझी हरकत नाही. पुढे कधीतरी एखाद्या वेळी तोंड दाखवून येईल. पण त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. मी देवेंद्रमार्फत सांगून टाकेल त्यांना, 'मला काही त्यात अडकवू नका.' सांस्कृतिक संघटना आहे ना तुमची, माझी हरकत नाही. पण मला कोणत्याही सांस्कृतिकतेची गरज वाटत नाही. तुमच्या मनात पूज्य भाव आहे तर मी कुठे हरकत घेतली? 'मनी नाही भाव तरी देवा मला पाव', हे मला नाही जमणार. संघाची काही कामे असतील विकासाच्या संदर्भात, तर ती सांगा ना, फटाफट मार्गी लावतो. मी काँग्रेसमध्ये होतो, राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हा आणि आताही सर्व जण फुले, शाहू, आंबेडकरांचा जयघोष करतात, म्हणून मीपण करतो वेळप्रसंगी. वर्षातून एकदा कराडला जाऊन यशवंतरावांच्या समाधीवर फुले वाहायची प्रथा आहे, म्हणून मी जातो तिथे. पण तुम्ही त्याचा वैचारिकतेशी फार संबंध जोडू नका.

आता राहिला प्रश्न शरदराव पवार साहेबांचा. निर्णय कटू होता, पण घ्यावा लागला. साहेबांना किती तरी काळ सांगत होतो, जाऊ आपण तिकडे. पण ते झुलवत ठेवत होते सर्वांना. इतरांचे ठीक आहे, पण मलाही झुलवत ठेवावे त्यांनी ? शिवाय, देशात आलेल्या मोदी लाटेत, सत्तेच्या बाहेर राहून जगणे म्हणजे पाण्याविना मासा. 2014 नंतरची पाच वर्षे घालवली कशीबशी, पण नंतरची पाच वर्षेही सत्तेशिवाय ? गळ्याशी आलं तरीही? इतर आमदार सारखे माझ्यामागे लागत होते, 'दादा बघा ना तुम्ही, समजवा ना साहेबांना.' साहेबांचेही ठीक आहे, दहाचा आकडा कधी ओलांडता आला नाही आम्हाला लोकसभेत, तरी त्यांना केंद्रात मान होता सर्वच पक्षांकडून. डावपेच आणि कटकारस्थानात माहीर आहेत ते, म्हणून. राहुल आणि अदानी यांची भेट एकापाठोपाठ घेऊन, त्या दोघांनाही खूश करू शकतात ते. एवढेच काय, त्यांनी ठरवलेच तर एकाच आठवड्यात मोदी आणि शहा यांच्याशी कधी नव्हे इतकी जास्त जवळीक साधू शकतात ते. त्यांचे तेवढे एकच कसब मला आत्मसात करता आले नाही, बाकीचे (मला आवश्यक तेवढे) त्यांचे गुण आत्मसात केलेच की मी.

तर सांगत असं होतो की, साहेबांनी हट्ट सोडला असता तर अशी कटू परिस्थिती निर्माण झाली नसती. मागील सव्वा वर्ष किती छी थू झाली माझी. माझा गुन्हा काय, तर मी भाजपबरोबर सत्तेत गेलो. त्याचा कळस गाठला लोकसभा निवडणुकीत. हे खरे की, माझ्या पत्नीला सुप्रियाविरुद्ध उभे करण्याचा माझा निर्णय चुकलाच. पण मी त्याची कबुली द्यायला वेळ लावला का? तरीही मी केली ती चूक साहेबांनी केली. विधानसभा निवडणुकीत युगेंद्रला माझ्याविरुद्ध उभा केले त्यांनी. मला आता वाटतं, एका अर्थाने त्यांनी ती मदतच केली मला. व्यक्तिगत पातळीवर सख्खा भाऊ दुरावला, पण 'पवार साहेबांनीही अजितसारखीच चूक करावी आणि तीही या वयात?' हे कोणाला कसे आवडेल? खरे सांगा, तुम्हाला तरी ते आवडले का? आणि आमचे बारामतीकर आमच्या दोघांपेक्षा हुशार, व्यवहारी, धोरणी निघाले. मतलबी म्हणा वाटले तर. त्यांनी अजिबातच घोळ घालायचा नाही हे खूपच आधी ठरवले होते. 'लोकसभेत सुप्रिया आणि विधानसभेत अजितदादा', हे तिथली बारकीसारकी पोरे सांगत होती आणि म्हातारीकोतारी माणसेही सांगत होती. शहाण्या सुरत्यांचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आम्ही दोघांनी बारामतीकरांना हुशार केले की बारामतीकरांमुळे आम्ही एवढे हुशार झालोत, हा एक मोठाच विषय आहे. परवा माझा सत्कार आहे, बारामतीला. तिथे सांगावे का हे स्पष्टपणे, असा विचार चालू आहे मनात.

आता पुढे काय ? तीन पक्षांचे सरकार चालवायचे आहे. देवेंद्र खूश नाही, हे ठीक आहे. एकनाथरावांना नाखूश असायचे कारण नाही, पण त्यांना असुरक्षित वाटायला लागलंय. भविष्यात आपली कितपत दखल घेतली जाईल असे त्यांना वाटते. आणि म्हणून त्यांचे थोडे नाटक चालू आहे, थांबेल काही दिवसांत. अर्थात, आमची दोघांची उपयुक्तता असेपर्यंतच ठेवतील भाजपवाले महायुती सरकार. माझा अंदाज आहे, पुढील तीन-चार वर्षे ते सरकार चालू देतील. मात्र आम्ही केलेल्या उपकाराची परतफेड झाली असे त्यांना वाटेल आणि स्वबळावर सत्ता येऊ शकते असे वाटेल, तेव्हा ते काही तरी कुरापती काढतील. त्यामुळे भाजपला पुढच्या पाच वर्षांत स्वबळावर सत्तेवर येण्यापासून कसे रोखायचे, यासाठीचे डावपेच आखावे लागतील. त्यासाठी एका बाजूला एकनाथची माणसे, दुसऱ्या बाजूला शरदरावांच्या बरोबर असलेली माझीच माणसे, तिसऱ्या बाजूला उद्धव आणि आदित्य, चौथ्या बाजूला काँग्रेसवाले या सर्वांशी वेगवेगळे संबंध ठेवावे लागतील. वेळ येईल तेव्हा यांपैकी कोणीही मला परके मानणार नाहीत. त्यामुळे पुढच्या वेळी फाटाफूट होऊन (आणि ती होणारच) भाजपचे सरकार आले तर त्यांच्यासोबत आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आले तर त्यांच्याबरोबर मी जाणार, जाणार म्हणजे जाणार! शरदरावांचे राजकारण पुढच्या पाच वर्षांत संपेल. त्यामुळे यथावकाश सुप्रियाला सांगेल, 'विसरून जा मधल्या काळातील सगळं. लोकसभेत कायम भाषणे करता येतील, आणखी संसद रत्न पुरस्कार मिळवता येतील एवढी खात्री देतो तुला.' युगेंद्रला सांगेल, 'राजकारण हा तुझा प्रांत नाही आणि तुझ्या पित्याचा (म्हणजे माझ्या भावाचा) ही नाही. उत्तम व्यवसाय कर, त्यासाठी जे काही लागेल ते मला सांग.' रोहित पवार आणि रोहित पाटील या दोघांना भेटायला बोलावून सांगणार आहे, 'आता मी वयाच्या पासष्टीत आहे, आणखी दहा वर्षे माझी आहेत. तुम्ही तरुण आहात, आततायीपणा करू नका. चालू ठेवा तयारी, साधनसंपत्ती गोळा करा, नेटवर्क वाढवा. पुढचा काळ तुमचा आहे.’

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी