Diwali_4 सहा देशांतील सहा मुले
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

गेल्या वर्षीच्या सहा मुला-मुलींच्या अंकाने ज्या प्रकारचे बौद्धिक व भावनिक खाद्य वाचकांना पुरवले त्यामुळे, ‘आणखी एकदा तशाच प्रकारची सहा वेगवेगळ्या देशांतील मुले-मुली वाचायला आवडतील का?’ या आमच्या प्रश्नाला एकही ‘नकारात्मक’  प्रतिक्रिया आली नाही. म्हणून यावर्षी स्वीडन,  अमेरिका, घाना, टांझानिया, ब्राझील व भारत या सहा देशांतील मुला-मुलींच्या पराक्रमाच्या लेखवजा गोष्टी अंकात घेतल्या आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे १५ ऑगस्ट १९४८ रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. गेली ७०  वर्षे ते अखंड प्रकाशित होत आहे. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते. हे करताना साधनाची भूमिका भारतीय संविधानातील मूल्यांना पुढे घेऊन जाणारी राहिली आहे. गुरुजींच्या नंतर आलेल्या आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, नानासाहेब गोरे, वसंत बापट, ग. प्र. प्रधान, डॉ. नरेंद्र दाभोलकर या संपादकांनी साधनाची ओळख वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक अशी निर्माण केली. परंतु या सर्व ७० वर्षांच्या काळात साधनातून किशोरवयीन मुला- मुलींसाठी गोष्टी, लेख, बालविभाग व कुमार विशेषांक सातत्याने प्रसिद्ध होत राहिले. कारण साने गुरुंजींना मुलांचे अगत्य सर्वाधिक होते.

या पार्श्वभूमीवर, साधनाच्या हीरकमहोत्सवी वर्षापासून (२००८ पासून) अतिशय नियमितपणे १० ते १५ वर्षेवयोगटासाठी बालकुमार दिवाळी अंक प्रकाशित करायला सुरुवात झाली. आशयसंपन्न मजकूर, दर्जेदार निर्मिती, तरीही किंमत कमी आणि सवलत जास्त ही चतु:सूत्री वापरून हे अंक मागील दहा वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोचवता आले. पहिल्या वर्षी केवळ ११ हजार प्रती काढलेला बालकुमार दिवाळी अंक नंतरच्या नऊ वर्षांत दरवर्षी सरासरी तीन लाख प्रती इतक्या मोठ्या प्रमाणात वितरीत झाला. अर्थातच या सर्व प्रक्रियेत अनेक व्यक्ती, संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण व प्रशासन या क्षेत्रांतील अधिकारी अशा अनेकांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे बालकुमार दिवाळी अंकांची मोहीम वाचनसंस्कृती अभियानाप्रमाणेच राबवता आली.

गेल्या वर्षी (२०१७ मध्ये) काढलेला साधना बालकुमार दिवाळी अंक दहावा होता, त्या अंकात सहा देशांतील सहा मुले-मुली होती (कॅनडा, ब्रिटन, केनिया, मलावी, पाकिस्तान, भारत). ती सर्व अशी मुले-मुली होती, ज्यांनी कुमारवयात गाजवलेले कर्तृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलपात्र ठरले होते. त्या अंकाला सर्व स्तरांतील वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळणे साहजिक होते. पण त्यामुळेच एक मोठी समस्या निर्माण झाली. ती अशी की, २०१८ चा अंक कशावर काढायचा? कारण,  इतक्या उंचीवर गेल्यानंतर अशी कोणती थीम आहे की,  त्या अंकापेक्षा अधिक सरस अंक काढता येईल?

या समस्येवर उपलब्ध वेळेत आम्हाला उत्तर काढता आले नाही,  म्हणून या वर्षीही ‘सहा देशांतील सहा मुले-मुली’ हीच थीम घेतली. अर्थात,  गेल्या वर्षीच्या सहा मुला-मुलींच्या अंकाने ज्या प्रकारचे बौद्धिक व भावनिक खाद्य वाचकांना पुरवले त्यामुळे, ‘आणखी एकदा तशाच प्रकारची सहा वेगवेगळ्या देशांतील मुले-मुली वाचायला आवडतील का?’ या आमच्या प्रश्नाला एकही ‘नकारात्मक’  प्रतिक्रिया आली नाही. म्हणून यावर्षी स्वीडन,  अमेरिका, घाना, टांझानिया, ब्राझील व भारत या सहा देशांतील मुला-मुलींच्या पराक्रमाच्या लेखवजा गोष्टी अंकात घेतल्या आहेत. या अंकातील सर्व गोष्टींतील मुले-मुली आता १५ ते २५ वर्षे या वयोगटात आहेत आणि सर्वांच्या मुलाखती व भाषणांचे व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना या अंकातील गोष्टींचा अनुभव व आनंद अधिक परिणामकारक पद्धतीने घेता येणार आहे. आणि १५ ऑक्टोबर या वाचनप्रेरणा दिवसाच्या पार्श्वभूमीवर हा अंक येत असल्याने तो आनंद द्विगुणीत होणार आहे.

Tags: प्रेरणादायी सहा देशांतील सहा मुले बालकुमार दिवाळी अंक 2018 संपादकीय विनोद शिरसाठ Vinod Shirsath Balkumar Diwali ank 2018 editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात