डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

साने गुरुजींच्या चार आत्मकथनात्मक कादंबऱ्या

1921 पूर्वीचे (म्हणजे वयाच्या 22 वर्षांपर्यंतचे) साने गुरुजी या चार पुस्तकांतून कळतात. त्यामधून गुरुजींची बाल, कुमार व युवा या तिन्ही काळातील जडणघडण, त्यांचे कुटुंब व भावजीवन, त्यांचे वैचारिक भरण-पोषण हे तर कळतेच; पण तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय परिस्थिती व संस्कृती यांचेही दर्शन घडते. म्हणजे 1921 च्या आधीची दोन दशके- शंभर वर्षांपूर्वीचे समाजजीवन- समजून घेण्याच्या दृष्टीने ही चार पुस्तके विशेष मोलाची आहेत.

24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य साने गुरुजींना मिळाले. त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध म्हणजे वादळी झंझावात होता. सव्वाशेहून अधिक पुस्तकांचे लेखक; छात्रालय, विद्यार्थी, काँग्रेस, कर्तव्य, साधना या नियतकालिकांचे संस्थापक-संपादक; शेतकरी व कामगार वर्गासाठी लढे, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन तुरुंगवास, ‘चले जाव’ चळवळीत भूमिगत होऊन परकीय सत्तेविरूद्ध रान उठवणे; स्वातंत्र्य दाराशी आल्यावर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठीही खुले व्हावे यासाठी लढा, आणि असे बरेच काही... त्यांच्या या वादळी  झंझावाताची आंतरिक प्रक्रिया घडली ती त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धात!

कसा होता तो पूर्वार्ध? वय वर्षे 10 पर्यंत म्हणजे इयत्ता चौथीपर्यंत पालगड (मधली सहा महिने मामाकडे मुंबईत). नंतर सहा महिने मामाकडे पुण्यात आणि मग चार वर्षे आतेकडे दापोली, तिथे आठवीपर्यंत (म्हणजे इंग्रजी चौथी) शिक्षण. त्यानंतर सहा महिने औंध आणि मग सहा वर्षे पुण्यात मॅट्रिक व महाविद्यालयीन शिक्षण राम या मित्राच्या घरी  राहून. त्यानंतर वयाच्या 23 व्या वर्षी तत्त्वज्ञान शिकण्यासाठी अमळनेर, तिथे एक वर्ष घालवल्यानंतर पुढील साडेसहा वर्षे अमळनेर येथेच शिक्षक आणि मग वयाच्या तिशीत स्वातंत्र्यलढ्यात उडी!

म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड व दापोली, सातारा जिल्ह्यातील औंध, मुंबई व पुणे शहर आणि जळगाव जिल्ह्यातील अमळनेर असे होते साने गुरुजींचे वयाच्या तिशीपर्यंतचे आयुष्य. त्यानंतरची वीस वर्षे त्यांनी काय काय केले यावर बरेच लेखन उपलब्ध आहे. अमळनेर येथील साडेसात वर्षांत काय काय केले, याविषयीही बऱ्यापैकी लेखन झाले आहे. मात्र त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या 22 वर्षांच्या कालखंडाविषयी काही किरकोळ अपवाद वगळता फारसे कोणी लिहिलेले नाही. त्यासाठी त्यांनी स्वतःच लिहिलेल्या चार आत्मकथात्मक कादंबऱ्या हाच काय तो मुख्य दस्तावेज. श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवनविकास याच त्या चार कादंबऱ्या.

गुरुजींना वयाच्या सहाव्या वर्षापासूनचे सारे काही लख्ख आठवत होते. त्यामुळे साधारणतः वय वर्षे 6 ते 12 हा कालखंड ‘श्यामची आई’मध्ये आला आहे. त्यानंतरच्या चार वर्षांचा म्हणजे वय वर्षे 16 पर्यंतचा कालखंड ‘श्याम’मध्ये आला आहे. त्यानंतरची साधारणतः तीन वर्षे म्हणजे वय वर्षे 19 पर्यंतचा कालखंड ‘धडपडणारा श्याम’मध्ये आला आहे. आणि त्यापुढील साधारणतः तीन वर्षांचा म्हणजे वयाच्या 22 व्या वर्षांपर्यंतचा कालखंड ‘श्यामचा जीवनविकास’मध्ये आला आहे. 

‘श्यामची आई’मध्ये गुरुजींनी आपल्या आईला केंद्रस्थानी ठेवून बालपण मांडले आहे, त्यात नंतरचा काळही थोडा येऊन जातो. ‘श्याम’ या पुस्तकात पाचवीसाठी पुण्यात मामाकडे येणे, सहा महिन्यानंतर पुणे सोडून दापोलीत जाऊन चार वर्षे आतेकडे राहून शिक्षण घेणे हा कालखंड आला आहे. ‘धडपडणारा श्याम’मध्ये दापोलीहून शिक्षणासाठी औंधला जाणे, सहा महिन्यांनी औंध सोडून पुण्यात येऊन मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेणे हा कालखंड आला आहे. ‘श्यामचा जीवनविकास’मध्ये मॅट्रिकचे वर्ष आणि महाविद्यालयीन शिक्षणाची तीन वर्षे येतात, पण हा कालखंड पूर्ण आणि विस्ताराने येत नाही.

गुरुजींनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक 1933 मध्ये नाशिकच्या तुरुंगात असताना पाच दिवसांत लिहिले, ते 1935 मध्ये प्रकाशित झाले आणि चांगलेच वाखाणले गेले. त्यानंतरच्या तीन वर्षांत म्हणजे 1936 ते 38 या काळात श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवनविकास ही तीन पुस्तके लिहिली गेली. त्यांच्याविषयी फार तपशील गुरुजींच्या किंवा अन्य कोणाच्या लेखनात मिळत नाहीत, मात्र तो धकाधकीचा काळ पाहता गुरुजींनी ही तीनही पुस्तके एकेका झपाटलेल्या अवस्थेत लिहून पूर्ण केली असणार हे उघड आहे. त्यातील श्यामचा जीवनविकास हे पुस्तक इंग्रज सरकारने जप्त केले होते आणि बंदी आणली होती (‘मानमोडी’ व अन्य काही लेखांमुळे), त्यामुळे 1946 पर्यंत ते उपलब्ध नव्हते असा एक तपशील तेवढा मिळतो.

गुरुजींनी ‘श्यामची आई’ला प्रस्तावना लिहिली आहे. त्यात असे म्हटले आहे की, ‘या पुस्तकावरून कोणी माझे आत्मचरित्र बनवू नये.’ मात्र त्याच प्रस्तावनेत ते असेही म्हणतात की, ‘या पुस्तकातील एखादा प्रसंग व एखादा उद्‌गार अपवाद केला तर काल्पनिक असे काही नाही.’ तसाच प्रकार अन्य तीन आत्मकथनात्मक कादंबऱ्यांबाबत झाला असणार. त्यांनी या तिन्ही पुस्तकांना प्रस्तावना किंवा निवेदन लिहिल्याचे आढळत नाही. राजा मंगळवेढेकर यांनी अनेक अस्सल कागदपत्रे गोळा करून साधार व अभ्यासपूर्ण मांडणी करणारे ‘साने गुरुजींची जीवनगाथा’ हे समग्र चरित्र 1975 मध्ये लिहिले, त्याची सुधारित आवृत्ती 2000 मध्ये आली. त्या पाचशे पानांच्या पुस्तकातील सुरुवातीची शंभर पाने प्रामुख्याने गुरुजींच्या या चार आत्मकथनात्मक कादंबऱ्यांवर आधारलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा पूर्वार्ध समजून घेण्यास हीच पुस्तके मुख्य स्रोत मानावी लागतात.

थोडक्यात काय तर, 1921 पूर्वीचे (म्हणजे वयाच्या 22 वर्षांपर्यंतचे) साने गुरुजी या चार पुस्तकांतून कळतात. त्यामधून गुरुजींची बाल, कुमार व युवा या तिन्ही काळातील जडणघडण, त्यांचे कुटुंब व भावजीवन, त्यांचे वैचारिक भरण-पोषण हे तर कळतेच; पण तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय परिस्थिती व संस्कृती यांचेही दर्शन घडते. म्हणजे 1921 च्या आधीची दोन दशके- शंभर वर्षांपूर्वीचे समाजजीवन- समजून घेण्याच्या दृष्टीने ही चार पुस्तके विशेष मोलाची आहेत. या चारही पुस्तकांचे मोठेपण वा त्यांचे वेगळेपण सांगण्यासाठी कोणतेही विवेचन करण्याची इथे गरज नाही, मात्र ही पुस्तके वाचताना काळाचे टप्पे लक्षात घेणे खूप आवश्यक आहे, म्हणून ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न इथे केला आहे.

साने गुरुजींच्या विशेष महत्त्वाच्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या साधना प्रकाशनाकडून आणण्याची प्रक्रिया आम्ही अडीच वर्षांपूर्वी सुरू केली. त्यातून सुंदर पत्रे, श्यामची पत्रे, श्यामची आई ही तीन पुस्तके याआधी प्रकाशित केली आहेत, आता श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवन विकास ही तीन पुस्तके प्रकाशित करीत आहोत. गुरुजींचे 125 वे जयंती वर्ष आणखी अडीच वर्षांनी येणार आहे. तोपर्यंत त्यांच्या राजकीय-सामाजिक म्हणाव्यात अशा दहा कादंबऱ्या, गोड गोष्टींचे दहा भाग, मानवजातीची कथा व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची कहाणी ही दोन अनुवादित पुस्तके, भारतीय संस्कृती व इस्लामी संस्कृती ही दोन आणि आणखी काही पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प आहे. याशिवाय, राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेल्या ‘साने गुरुजींची जीवनगाथा’ या पुस्तकाची नवी आवृत्तीही लवकरच येत आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके