Diwali_4 आहे ऐसा मनी अनुभवावा
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

गेल्या वर्षभरात काही कार्यक्रमांना गेलो, काही कार्यक्रम स्वीकारता आले नाहीत, काही कार्यक्रम स्वीकारूनही जाता आले नाही. जिथे गेलो आणि बोललो तिथे बरेच कौतुक झाले, पण मुख्य म्हणजे डॉ.दाभोलकरांचा माणूस किंवा त्यांनी निवडलेला माणूस म्हणून लोकांना माझ्यापेक्षा तुमचेच अधिक कौतुक वाटत होते. तेव्हा उदासीमिश्रित आनंद होत होता.

प्रिय डॉक्टर, गेल्या वर्षीचा 20 ऑगस्ट मंगळवारी आला होता, तो रक्षाबंधनाचा दिवस होता. त्या दिवशी तुमची हत्या झाली. इतकी अनपेक्षित व इतकी धक्कादायक घटना माझ्या आयुष्यात त्यापूर्वी कधीही घडली नव्हती, पण तरीही बळ एकवटून दुसऱ्या दिवशी साधनाचे संपादकीय लिहावे लागले होते. तेव्हा आपण काय लिहिणार आहोत, की जागा कोरी सोडणार आहोत, याबद्दल माझ्या मनाचा निर्णय होत नव्हता. पण ‘प्रिय डॉक्टर’ हे शब्द कागदावर उतरवले आणि त्यानंतरच्या पंधरा-वीस मिनिटांत जे काही लिहून झाले तेच ‘हत्तीचे बळ आणायचे कुठून?’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले. तोच लेख ‘लोकसत्ता’मध्येही प्रसिद्ध झाल्याने महाराष्ट्रातील लाखो वाचकांपर्यंत पोहोचला. तुमच्या व माझ्या नात्याची ओळख लोकांना त्या लेखामुळे झाली. गेल्या वर्षभरात भेटलेले असे कितीतरी लोक आहेत जे मला केवळ त्या लेखामुळे ओळखतात...

काल 10 ऑगस्ट, रविवारचा दिवस होता, रक्षाबंधनचा सण होता. म्हणजे इंग्रजी कालगनणेप्रमाणे, तुमची हत्या झाली त्या घटनेला एक वर्ष होण्यासाठी एक आठवडा बाकी आहे, पण भारतीय कालगणनेच्या दृष्टीने पाहिले तर कालच एक वर्ष पूर्ण झाले आहे. आणि आज पुन्हा एकदा पत्रवजा संपादकीय लेख लिहायला बसलो आहे. गेल्या वर्षीचे पत्र लिहिताना ‘आपण खवळलेल्या समुद्राच्या मध्यभागी सापडलो आहोत’ अशी माझ्या मनाची स्थिती होती. आता हे पत्र लिहिताना मनाची स्थिती कशी आहे? बरीच वाताहत करून शांत झालेल्या समुद्राच्या काठावर उभे राहून लाटा-लहरींकडे विषण्णतेने पाहणाऱ्या नाविकासारखी!

वर्ष होत आले तरी तुमच्या मारेकऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही, त्यामागील सूत्रधारांचेही धागेदोरेही पुढे आल्याचे दिसत नाही. तपासअधिकारी हताश आणि निष्प्रभ झाल्याचे उघड झाले आहे. सरकारची उदासीनताही लपून राहिलेली नाही. विरोधी पक्षांनी जोर लावलाय, असे कधीच झाले नाही. हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा, असा आदेश न्यायालयाने दिला; त्याची खंत सत्ताधारी पक्षांकडून व्यक्त झाली नाही. गृहमंत्री आर.आर.पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार या तिघांकडून जरा अधिक अपेक्षा होत्या. त्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केलेही असतील; त्यांच्या अशा सांगता न येणाऱ्या काही अडचणीही असतील... पण ते काहीही असले तरी त्यांच्याविषयी ‘बरे राजकारणी’ म्हणून वाटत असलेल्या आदरात बरीच घट होत गेली. गुलाबराव पोळ व प्लँचेट प्रकरण उघड झाले तेव्हा तर ‘आपल्या जखमेवर मीठ चोळले जातेय’ असे वाटले. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि गुलाबराव पोळ यांना अटक करावी अशी जाहीर मागणीही करावीशी वाटली, पण ते अरण्यरुदनच ठरणार असल्याने नाही केली...

पुरोगामी/उदारमतवादी व्यक्ती, संस्था, संघटना, चळवळी-आंदोलने यातील कार्यकर्ते यांच्यासाठी मागील वर्ष खूपच वाईट गेले. तुमच्या हत्येचा आघात इतका जबरी होता की, कित्येकजण अद्याप त्यातून सावरलेले नाहीत. मन उद्‌ध्वस्त होणे आणि हतबलतेची भावना मनात घर करून राहणे हा प्रकार अनेकांच्या बाबतीत झाला. ज्यांच्याशी तुमचा क्वचितच किंवा अप्रत्यक्ष संबंध आला होता, असे लोकही खूप हळहळले. राज्याच्या सार्वजनिक जीवनात तुमच्या हत्येचे पडसाद वर्षभर उमटत राहिले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील माध्यमांनी, संस्था-संघटनांनी त्याची दखल घेतली... याच वर्षात लोकसभा निवडणुका झाल्या आणि  कधी घडू नये किंवा घडणार नाही असे वाटत होते ते घडून आले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, कित्येक पुरोगामी व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यासाठी हा एक मोठा आघात होता. त्यामुळे अनेकांच्या आत्मविश्वासालाच सुरूंग लागला. निराश व हताश अवस्था येणे आणि लढण्याचे अवसानच गळून पडणे असा प्रकारही खूप लोकांच्या बाबतीत झाला...

पण डॉक्टर, तुमची मुख्य ओळख सांगणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मात्र लढा चालू ठेवला आहे. सेनापती धारातीर्थी पडल्यावर सैनिकांनी गर्भगळीत होणे आणि हिंमत हरणे स्वाभाविक ठरले असते, पण तसे झालेले नाही. अविनाशच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते लढत आहेत. हमीद आणि मुक्ता त्या लढ्यात ज्या धैर्याने उतरले आणि टिकून राहिले, त्यामुळे अंनिसच्या काही वैचारिक विरोधकांनीही दाद दिली. असलेल्या ताकदीचा व उपलब्ध साधनसंपत्तीचा विचार केला तर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी खूप काही केले आहे, आणि अर्थातच खूप काही करणे बाकी आहे याची त्यांना जाणीव आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा व समाजचिंतकांचा आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वास उडेल असे काहीही त्यांच्याकडून झालेले नाही. त्याचे बरेच मोठे श्रेय, तुम्ही अंनिसला प्राप्त करून दिलेली वैचारिक बैठक व आखून दिलेली कार्यपद्धती याकडे जाते. ‘प्रवास चालूच राहील, वाट संपणार नाही’ अशीच तुमची भूमिका होती ना...!

साधनाबद्दल काय आणि किती सांगू? तुमची हत्या झाल्याची बातमी आली आणि साधनाच्या सर्व विश्वस्तांनी ‘आपल्याला लढत राहायचे आहे’ असाच संदेश पाठवला. जयसिंगपूरहून आप्पासाहेब व गणपतराव ते अमेरिकेतून सुनील देशमुख या दरम्यानच्या सर्व विश्वस्तांनी, हितचिंतकांनी ‘खचून जाऊ नकोस’ असाच निरोप पाठवला. सहकार्याचा हात पुढे करणाऱ्यांची संख्या खूपच जास्त होती. आणि मुळात तुम्ही ‘साधना’ची घडी व्यवस्थित बसवलेली होती. त्यामुळे ‘त्रास’ म्हणावा असे फार काही झाले नाही आणि छोट्या छोट्या अडचणींचा, समस्यांचा बाऊ करण्याची आवश्यकता कधीच वाटली नाही. वितरण, व्यवस्थापन, अर्थकारण या प्रकारातील वाटप केलेली कामे जो तो आपापल्या क्षमतेनुसार करीत राहिला. खांब कलथून गेल्याने, आलेल्या जबाबदारीचे भान सर्वांनीच बऱ्यापैकी ठेवले. त्यामुळे निराशेचे क्षण फारसे वाट्याला आले नाहीत. जाधवसर, जे.बी.पाटील, दत्ता वान्द्रे आणि हेमंत नाईकनवरे यांच्या बरोबरीने नियमित बैठका होत राहिल्या. आप्पासाहेब, विजयाताई, सुनील देशमुख सतत संपर्कात राहिले. तुमच्या पाठोपाठ अण्णा धारियाही गेल्याने आधारवड कोसळल्याची भावना आली होती. हमीद आणि डॉ. टिकेकर विश्वस्त मंडळात आल्याने आधार वाढला.

धोरणात्मक निर्णय कमीच घ्यावे लागले, कारण आपली दिशा व ध्येयनिश्चिती बऱ्यापैकी सुस्पष्ट आहे. प्रश्न आहे तो केवळ दैनंदिन कार्यपद्धतीचा व अंमलबजावणीचा. अर्थात, तेच मोठे जिकिरीचे काम आहे आणि त्यात सातत्य ठेवणे हे खरे आव्हान आहे. गेल्या वर्षभरात ते आव्हान आम्हाला बरऱ्यापैकी पेलवता आले, पण म्हणून ढिलेपणा ठेवून चालणार नाही याचेही भान आहे. उलट, यापुढे अधिक ताकद लागणार आहे, कारण लोकांची मदत व सहानुभूती तेव्हाच असते व वाढत राहते जेव्हा आपण चांगले काम करीत असतो...

गेल्या वर्षभरात सर्व अंक नेहमीप्रमाणे वेळेवर (म्हणजे वेळेशी स्पर्धा करीत) छापायला गेले. तुमची हत्या झाली तेव्हा बालकुमार अंक, दिवाळी अंक आणि महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारांची निवडप्रक्रिया अशा तीन आघाड्यांवर कामे चालू होती. ती तीनही कामे अपेक्षित उद्दिष्टांसह साध्य झाली. बालकुमार अंक हा आपला सर्वांत यशस्वी व लाडका उपक्रम, त्याची नोंदणी व वितरण ही जिकिरीचे मोहीम तुमच्याच तालमीत तयार झालेल्या गोपाळने यशस्वीपणे पार पाडली आणि चार लाख प्रतींचा टप्पा ओलांडला. दिवाळी अंकाची जाहिरात मोहीम वांद्रेसर व मनोहर पाटील यांनी राबवली. अर्थातच आप्पासाहेबांनी नेहमीपेक्षा अधिक मोठा वाटा उचलला.

महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कारवितरण सोहळा अधिक संस्मरणीय ठरला. आपले कार्यालयीन सहकारी जबाबदारीचे भान ओळखून काम करीत राहिले. त्यामुळे साधना चांगली चालत राहील, असा विश्वास जनमानसात निर्माण व्हायला फार वेळ लागला नाही. परिणामी, वितरणासाठी अधिक वेगळे असे कोणतेही प्रयत्न न करता, वर्षभरात जवळपास एक हजार वर्गणीदार वाढले. गेल्या वर्षी सहा हजारांपेक्षा थोडे अधिक वर्गणीदार होते, आता सात हजारांच्या पुढे आहेत. दरवर्षी पाच-सहा पुस्तके आपण प्रकाशित करीत असतो, या वर्षी नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संस्थात्मक कारभार करताना तुम्ही घालून दिलेला व मला विशेष ‘अपिल’ झालेला धडा हा होता की, तत्कालीन व दीर्घकालीन हेतू असलेले असे दोन प्रकारचे उपक्रम एकाच वेळी राबवले पाहिजेत आणि भावी गुंतवणुकीसाठी खर्च व  खर्चात बचत अशा दोन पद्धतीने विचार एकाच वेळी केला पाहिजे. त्यासंदर्भात अनेक योजना आमच्या मनाशी आहेत, काही उपक्रम हाती घेतले आहेत. ‘गुणात्मक व संख्यात्मक या दोनही प्रकारची वाढ झाल्याशिवाय विकास ही संज्ञा वापरता येणार नाही’ हे तर आपण गेल्या काही वर्षांत ध्येयवाक्य केले आहे. हे वाक्य उच्चारायला आकर्षक आहे, पण कार्यवाहीला कठीण आहे हे आपण अनुभवले आहे.

ध्येयवादाचा पुकारा करीत असतानाच, व्यावसायिक नीतीमूल्यांची जोपासना केली तरच ते शक्य आहे, या निष्कर्षाप्रत आपण आलो होतो. आणि त्या दिशेने बरीच दूरवर व दिमाखदार वाटचाल करण्याचे ठरवले होते. एवढेच नाही तर ‘एका मर्यादेनंतर अंकाचा दर्जा हा व्यवस्थापन, वितरण व अर्थकारण यावरच अवलंबून असतो’ हे आपले मुख्य विधान (Key Statement) बनवले होते. आता त्या दिशेने धिम्या गतीने पण दमदार पावले टाकण्याची तयारी करीत आहोत. अंकाची वितरणप्रणाली सुधारण्यासाठी व वर्गणीदार वाढीसाठी काही योजना आखत आहोत. कार्यालयातील सॉफ्टवेअरप्रणाली अधिक अद्ययावत करणे आणि साधनाची वेबसाईट अधिक सुसंवादी करण्याचे काम चालू आहे.

बालकुमार अंक सहा वर्षांचा झाला आहे आणि मागील तीनही वर्षे तो साडेतीन ते साडेचार लाख यादरम्यान गेला आहे. त्यामुळे एकट्या बालकुमार अंकाच्या दरवर्षी वितरित होणाऱ्या प्रती व वर्षभरातील साधनाच्या अन्य 47 अंकांच्या एकूण प्रती यांची संख्या आता समान झाली आहे. आणि एकट्या बालकुमार अंकाच्या विक्रीतून होणारी आर्थिक उलाढाल व वर्षभराच्या अन्य 47 अंकांच्या वितरणातून होणारी आर्थिक उलाढाल जवळपास सारखी आहे. त्यामुळे एका मर्यादित अर्थाने विचार केला तर, बालकुमार अंकाच्या यशामुळे गेल्या पाच वर्षांत साधना दुप्पट झाली आहे. तुम्ही असताना हे जुळलेले गणित लक्षात आणून दिले असते, तर तुम्ही जाम खूष झाला असता आणि मोठ्या खुबीने या गणिताचा उपयोग साधनाच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी केला असता.

आता, साधना तिप्पट करण्याच्या दिशेने पावले टाकत आहोत. या वर्षीपासून बालकुमार अंकाच्याबरोबरच युवा दिवाळी अंकही काढायला सुरुवात करीत आहोत. या वर्षी, 60 पानांचा संपूर्ण रंगीत असा युवा दिवाळी अंक अवघ्या 20 रुपयांत देण्याचा उपक्रम राबवणार आहोत, त्यासाठी एक लाख प्रतींच्या विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याला अपेक्षित यश मिळत गेले तर एका मर्यादित अर्थाने पुढील चार-पाच वर्षांत साधना तिप्पट झालेली असेल...

गेल्या वर्षभरात, अंकातील लेखन व संपादकीय भूमिका यांचे साधारणत: स्वागतच झाले आहे. काही नाराजीचे, तक्रारीचे व टीकेचे सूरही निघाले, पण त्यातील बहुतांश सूर माहितीच्या किंवा संवादाच्या अभावातून निघाले आहेत. अर्थातच, काही टिका-टिप्पणी रास्त होती, आणि ती स्वीकारण्यात कसलाच कमीपणा वाटला नाही. भाषेची सभ्यता पाळून, विषयांतर वा विपर्यास न करता लिहिल्या गेलेल्या विरोधी/टीकात्मक पत्रांना अंकात प्राधान्याने जागा दिली. संपादकीय लेख लिहिताना कधीही विचलित झालो नाही, पण लिहून झाल्यावर मात्र हे ‘अनसर्टिफाइड’ आहे, अशी भावना उफाळून यायची. कारण मागील साडेनऊ वर्षांत माझा असा एकही लेख नसेल, जो तुम्ही वाचलेला नव्हता. त्यावरील तुमची एक-दोन वाक्यांचीच पण नेमकी कॉमेंट मला ऊर्जा देणारी असायची...

गेल्या वर्षभरात काही कार्यक्रमांना गेलो, काही कार्यक्रम स्वीकारता आले नाहीत, काही कार्यक्रम स्वीकारूनही जाता आले नाही. जिथे गेलो आणि बोललो तिथे बरेच कौतुक झाले, पण मुख्य म्हणजे डॉ.दाभोलकरांचा माणूस किंवा त्यांनी निवडलेला माणूस म्हणून लोकांना माझ्यापेक्षा तुमचेच अधिक कौतुक वाटत होते. तेव्हा उदासीमिश्रित आनंद होत होता.

दोन आठवड्यांपूर्वी, शैलातार्इंशी फोनवर बोलत असताना त्यांनी नकळतपणे सांगितले की, साधनाचे संपादक झाल्यानंतर बरेच दिवस तुम्ही त्या खुर्चीवर बसत नव्हता. साने गुरुजी ते प्रधानसर यांच्यापर्यंतची मोठी माणसं ज्या खुर्चीवर बसली त्या खुर्चीवर बसायचा संकोच तुम्हाला वाटत होता... (ही माहिती मला मात्र तुम्ही कधीच सांगितली नव्हती.) गेल्या वर्षभरात माझीपण अवस्था तीच होती. तुम्हाला ज्या कारणामुळे संकोच वाटत होता ते कारण तर होतेच, पण दुसरेही एक कारण होते... डॉक्टर आता राहिले नाहीत, या समजुतीतून मी काम करीत नव्हतो; डॉक्टरांच्या अनुपस्थितीत आपण काम करीत आहोत अशीच माझी भावना होती.

(जयंत नारळीकर, गोविंद पानसरे व सुनील देशमुख यांचे लेख उशिरा आल्यामुळे या अंकात जाऊ शकले नाहीत, ते पुढील अंकात प्रसिद्ध होतील.- संपादक)

Tags: डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिअंक. हत्तीचे बळ आणायचे कुठून लोकसत्ता शरद पवार पृथ्वीराज चव्हाण आर.आर.पाटील गुलाबराव पोळ नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुक युवा अंक बालकुमार साधना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती नरेंद्र दाभोलकर सुनील देशमुख प्रिय डॉक्टर संपादकीय Dr. Narendr Dabholkar Smrutianak Hattiche Bal Anayache Kuthun Loksatta Sharad Pawar Pruthaviraj Chavhan R.R. Patil Gulabrao Pol Narendr Modi Loksabha Nivdnuka Yuva Ank Baalkumar Sadhana Maharashatra Andhsharddha Nirmulsn Samiti Narendr Dabholkar Sunil Deshmukh Priy Docter Sampadkiy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात