डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांना पत्रं

नरेंद्र मोदी सरकारने कालच्या २७ मे रोजी चार वर्षे पूर्ण केली, त्यावर सर्व माध्यमांनी बरीच चर्चा केली. पण नेहरूंच्या जयंतीचे म्हणून विशेष असे काही कार्यक्रम- उपक्रम झाले नाहीत, म्हणून त्यांचे स्मरण करायला हवे. त्यासाठी ‘लेटर्स फॉर अ नेशन’ हा सर्वोत्तम दस्तावेज आहे. इथे ‘सर्वोत्तम’ हा शब्द काहींना अतिशयोक्तीपूर्ण वाटण्याची शक्यता आहे. कारण ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, द डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि ॲन ऑटोबायोग्राफी हे तीन ग्रंथ नेहरूंचे प्रसिद्ध आहेत. पहिल्यात जगाचे ओझरते दर्शन घडवले आहे, दुसऱ्यात भारताचा शोध घेतला आहे आणि तिसऱ्यात स्वत:विषयी लिहिले आहे. या सर्वांमधून लोकशाही, स्वातंत्र्य आणि न्याय या संकल्पनांचा वेध घेणारे व त्यांचा जोरदार पुरस्कार करणारे नेहरू दिसतात. या तीन ग्रंथांचे विषय, भाषा आणि त्यातील प्रतिपादन पाहून जगभरातील अनेक नामवंतांनी असे म्हटले आहे की, नेहरू राजकारणात नसते तर जागतिक स्तरावरील महत्त्वाचे लेखक म्हणून मान्यता पावले असते.

१५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ अशी पावणेसतरा वर्षे जवाहरलाल नेहरू भारताच्या पंतप्रधान पदावर होते. यातील सुरुवातीचे दोन महिने आणि अखेरचे पाच महिने वगळले तर उर्वरित सोळा वर्षांत त्यांनी भारतातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महिन्यातून दोन याप्रमाणं पत्रं लिहिली. प्रत्येक महिन्याच्या १ व १५ या तारखांना त्यांनी ही पत्रं लिहिली (क्वचित काही वेळा चार- दोन दिवस पुढे-मागे झाले.) या सोळा वर्षांत मिळून जवळपास ४०० पत्रं त्यांनी लिहिली. ती सर्व तीन खंडांमध्ये पस्तीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. लवकरच त्या खंडांची आवृत्ती संपली आणि नंतर पुन्हा कधीच नवीन आवृत्ती आली/आणली नाही (याला काँग्रेसचा नतद्रष्टपणा म्हणायला हरकत नाही.) परंतु त्यातील निवडक सव्वाशे पत्रांमधील उताऱ्यांचे संकलन-संपादन करून माधव खोसला या अभ्यासकाने “Letters for a Nation From Jawaharlal Nehru to Chief Ministers” या नावाचे पुस्तक चार वर्षांपूर्वी (२०१४) मध्ये तयार केले, ते पेंग्विन प्रकाशनाकडून आले. अर्थातच त्याला निमित्त ठरले ते नेहरूंची सव्वाशेवी जयंती व पन्नासावा स्मृतिदिन. हे दोनही दिवस २०१४ या वर्षी आले आणि तुलनेने दुर्लक्षित राहिले. एवढेच नाही तर नेहरूंच्या पन्नासाव्या स्मृतिदिनी (२७ मे २०१४ रोजी) नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आणि नेहरूंची सव्वाशेवी जयंती (१४ नोव्हें. २०१४) आली तोपर्यंतच्या सहा महिन्यांत, त्यांचे नामोनिषाण मिटवण्याचा जणू कार्यक्रम आखला गेला, असे वर्तन केंद्र सरकारचे राहिले. अर्थातच या दोनही महत्त्वाच्या प्रसंगी आधीच गर्भगळित झालेल्या काँग्रेसने उदासीनतेचे प्रदर्शन घडवले.

नरेंद्र मोदी सरकारने कालच्या २७ मे रोजी चार वर्षे पूर्ण केली, त्यावर सर्व माध्यमांनी बरीच चर्चा केली. पण नेहरूंच्या जयंतीचे म्हणून विशेष असे काही कार्यक्रम- उपक्रम झाले नाहीत, म्हणून त्यांचे स्मरण करायला हवे. त्यासाठी ‘लेटर्स फॉर अ नेशन’ हा सर्वोत्तम दस्तावेज आहे. इथे ‘सर्वोत्तम’ हा शब्द काहींना अतिशयोक्तीपूर्ण वाटण्याची शक्यता आहे. कारण ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, द डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि ॲन ऑटोबायोग्राफी हे तीन ग्रंथ नेहरूंचे प्रसिद्ध आहेत. पहिल्यात जगाचे ओझरते दर्शन घडवले आहे, दुसऱ्यात भारताचा शोध घेतला आहे आणि तिसऱ्यात स्वत:विषयी लिहिले आहे. या सर्वांमधून लोकशाही, स्वातंत्र्य आणि न्याय या संकल्पनांचा वेध घेणारे व त्यांचा जोरदार पुरस्कार करणारे नेहरू दिसतात. या तीन ग्रंथांचे विषय, भाषा आणि त्यातील प्रतिपादन पाहून जगभरातील अनेक नामवंतांनी असे म्हटले आहे की, नेहरू राजकारणात नसते तर जागतिक स्तरावरील महत्त्वाचे लेखक म्हणून मान्यता पावले असते. नेहरूंच्या आयुष्यातील तुरुंगवासाचा एकूण कालखंड दहा वर्षांपेक्षा अधिक आहे. आणि हे तीनही ग्रंथ तुरुंगात असतानाच लिहिले गेल्याने, त्याला मूलगामी चिंतनाची डूब लाभलेली आहे. पण तीनही ग्रंथ नेहरूंनी स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिलेले आहेत, आणि तेव्हा ते स्वातंत्र्यलढ्याचे नेते होते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर व पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र असा ग्रंथ लिहिलेला नाही. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांच्या नावाने जे काही प्रसिद्ध झाले ते भाषणसंग्रह किंवा पत्रसंग्रह या रूपातच आहे. अर्थातच त्यांची काही शे भाषणे व काही हजार पत्रे प्रसिद्ध आहेत. त्यातील काही भाषणे व पत्रे  यासाठी इतरांनी साहाय्यही केले असेल, पण ‘लेटर्स फॉर अ नेशन’मधील पत्रे नेहरूंनी स्वत: लिहिलेली आहेत (पंतप्रधानांचे वा सरकारचे आदेश, सूचना इत्यादी प्रकारची ही पत्रे नाहीत.) यातून राष्ट्राचा कार्यकारी प्रमुख राज्यांच्या कार्यकारी प्रमुखांशी हितगुज करतो आहे.

१५ ऑक्टोबर १८४७ रोजी पाठवलेल्या पहिल्याच पत्रात नेहरूंनी सर्व मुख्यमंत्र्यांना लिहिले की, ‘मी तुम्हाला दर महिन्याच्या १ व १५ तारखेला पत्र लिहिणार आहे आणि तुम्ही मला महिन्यातून दोनदा पत्रं लिहावीत अशी अपेक्षा आहे.’ नेहरूंनी स्वत:चा संपूर्ण कार्यकाळ तो संकल्प पूर्णत्वास नेला, पण त्या काळातील किती मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या कार्यकाळात नेहरूंना इतक्या सातत्याने पत्रं लिहिली हे कळावयास मार्ग नाही (कोणीतरी शोध घ्यायला हवा.) नेहरूंची ही सर्व पत्रं वाचताना ते स्वत:ला ‘फर्स्ट अमंग इक्वल्स’ मानतात असे जाणवते, असे निरीक्षण संपादक माधव खोसला यांनी नोंदवले आहे आणि ते खरे आहे! यासाठी नेहरूंना वेगळी दाद दिली पाहिजे, कारण त्या १६ वर्षांच्या काळात नेहरूंना पक्षातून कोणी स्पर्धक नव्हते, चारही विरोधी पक्षांकडून (कम्युनिस्ट, समाजवादी, जनसंघ, स्वतंत्र पक्ष) देशव्यापी म्हणावे असे आव्हान नव्हते, १९५२, ५७ व ६२ या तीनही लोकसभा निवडणुका नेहरूंनी मोठ्या बहुमताने जिंकलेल्या होत्या आणि बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाचीच सरकारे होती. आणि तरीही नेहरूंनी स्वत:ला फर्स्ट अमंग इक्वल्स मानले असेल तर त्यांच्या व्यक्तित्त्वात स्वातंत्र्य व लोकशाही या संकल्पना किती पुरेपूर भिनलेल्या असतील!

‘लेटर्स फॉर अ नेशन’ या संग्रहाची माधव खोसला यांची प्रस्तावना अनेक मर्मभेदी निरीक्षणे नोंदवणारी आहे. प्रस्तावनेचा प्रारंभच त्यांनी नेहरूंच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मधील विधानाने केला आहे : ‘मी जरी राजकारणाने व्यापलो असलो आणि त्याचा बळीही ठरत असलो तरी मी राजकारणी नाही’. याचे स्पष्टीकरण देताना नेहरूंनी म्हणाले की, राजकारणी लोकांना सतत दबावाखाली काम करावे लागते आणि न संपणाऱ्या मागण्यांचा सामना करावा लागतो. आता प्रश्न असा आहे की, नेहरू जर राजकारणी नव्हते तर कोण होते? त्यांच्या कन्येने (इंदिरा गांधी) पंतप्रधान झाल्यानंतर इटलीची प्रख्यात पत्रकार ओरियाना फलाचीला दीर्घ मुलाखत देताना सांगितले की, ‘नेहरू राजकारणी नव्हते, ते मुत्सद्दी होते’. आणि पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते, ‘मुत्सद्दी असणे सोपे आहे, राजकारणी बनणे अवघड आहे.’ ही तीनही परस्परपूरक विधाने नीट जुळवली आणि त्यांचा अर्थबोध केला तर नेहरूंची कर्तव्यबुद्धी काय दर्जाची असली पाहिजे, याचा अंदाज बांधता येतो.

या पुस्तकात समाविष्ट केलेले सव्वाशे पत्रातील उतारे पाच प्रकारात विभागलेले आहेत. नागरिकत्व आणि राष्ट्र, लोकशाही संस्था, राष्ट्रीय नियोजन व विकास, युद्ध आणि शांतता, भारत आणि जग हेच ते पाच विभाग. आणि सहाव्या छोट्या विभागात गांधीजी, सरदार पटेल, असफअली, रफि अहमद किडवाई यांच्या मृत्यूनंतर लिहिलेली पत्रं आहेत. या सर्व पत्रांवर नजर फिरवली तरी लक्षात येते की, १९४७ ते १९६४ या काळातील सर्व प्रमुख चांगल्या व वाईट घटनाप्रसंगी/निमित्ताने ही पत्रं लिहिली आहेत. देशाची फाळणी, गांधीजींची हत्या, हैद्राबाद मुक्तिसंग्राम, काश्मीरचा प्रश्न, राज्यघटनेची निर्मिती, पहिल्या सार्वत्रिक निवडणुका, गोवा मुक्ति संग्राम, चीनबरोबरचे युद्ध, नियोजन आयोगाची स्थापना, पंचवार्षिक योजना, अलिप्त राष्ट्रांची संघटना, अमेरिका व सोव्हिएत युनियन या महासत्ता, मोठी धरणे आणि कारखाने, शेती आणि अन्नाचा तुटवडा, डाव्या व उजव्या शक्तींचे उद्रेक इत्यादी अनेक विषय त्यात येऊन गेले आहेत. प्रत्येक पत्र अत्यंत मोठी कोंडी अधोरेखित करते आणि त्यातून बाहेर पडण्याचा रॅशनल मार्ग दाखवते, पण काही वेळा त्यातून बाहेर पडता येणे किती कठीण आहे हेही सूचित करते. या पत्रांमधून नेहरूंचा द्रष्टेपणा व शहाणपणा तर प्रतिबिंबीत होतोच, पण भविष्यकालीन संकटांची चाहूल व देशाच्या सद्यस्थितीची त्यांची जाण किती पक्की होती, याचा अचंबा वाटत राहतो. त्यामुळे ही सर्व पत्रं आजच्या भारताला समजून घेण्यासाठी व भविष्यकालीन वाटचाल कमी ताणाची करण्यासाठीही उपयुक्त ठरणारी आहेत.

माधव खोसला यांनी प्रस्तावनेत केलेले एक विधान असे आहे की, स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास लिहायचा असेल तर त्याचा प्रारंभबिंदू (स्टार्टिंग पॉर्इंट) म्हणून नेहरूंनी सर्व मुख्यमंत्र्यांना लिहिलेली ही ४०० पत्रं वाचायला हवीत. किती खरे आहे ते! एका मुत्सद्याने सोळा वर्षे पंतप्रधानदावर असताना सर्व राज्यांच्या प्रमुखांजवळ केलेले हे प्रकट चिंतन, वर्णन, सूचना, अपेक्षा, इशारे,  भाकिते, समजून घेतल्याशिवाय देशाचा इतिहास लिहिला तर तो कितपत परिपूर्ण होईल?

राष्ट्रनिर्माण कसे करायचे, देशाची एकात्मता व अखंडत्व कसे राखायचे, लोकशाहीची रूजवणूक व संवर्धन कसे करायचे, सर्व समाजघटकांना मुख्य प्रवाहात कसे आणायचे, विविधतेत एकता का टिकवायची या सर्वांचा ऊहापोह, कारणमीमांसा व दिशा दाखवणारी ही पत्रं अधिकारवाणीने लिहिलेली आहेत, पण त्यात आदेश तर सोडाच सूचनाही नाहीत. पहिल्याच पत्रात (ऑक्टो. १९४७) मध्ये ते म्हणतात की, ‘देशात अशी एक चर्चा होत आहे की, केंद्र सरकारचे मुस्लिमांच्या संदर्भातील धोरण दुबळे आहे. परंतु असे म्हणणे हा मूर्खपणा आहे. या देशात अल्पसंख्य म्हटले जातात ते मुस्लिम संख्येने इतके जास्त आहेत की, ते इथेच राहणार आहेत ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे आणि त्यांना नागरिकत्वाचे सर्व अधिकार मिळालेच पाहिजेत. हे केवळ मुस्लिमांच्या नाही तर देशाच्या हिताचे आहे, अन्यथा संपूर्ण देशाचा नाश ठरलेला आहे. यावर युक्तिवाद करून वाद घालण्याचा प्रयत्न कोणी करू नये.’ याच पत्रात दुसरा मुद्दा ते सांगतात की, ‘लष्कर आणि सर्व प्रकारच्या नागरी सेवा (प्रशासन) धर्मवादी राजकारणापासून दूर राहिल्या पाहिजेत.

 दुसऱ्या पत्रात नेहरू सांगतात, ‘पक्षपात करायचा नाही, पण आपली धोरणे व आपले आदर्श यांना कोणी आव्हान देत असेल तर पूर्ण ताकदीनिशी त्यांचा सामना केला पाहिजे.’ तिसऱ्या पत्रात लिहितात, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभर ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन चालवले आहे (हा फाळणीनंतरचा काळ), कलम १४४ अंतर्गत त्यांच्यावर काही ठिकाणी कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही, पण संघाने खाजगी लष्कराचे रूप धारण केले आहे आणि त्यांचे संघटनाबांधणीचे तंत्र जर्मनीतील नाझी संघटनेप्रमाणे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. संघाला आपल्या विचारांचा प्रसार करता येईल, पण त्यांच्याकडून मर्यादा ओलांडली जात नाही ना, यांवर बारीक नजर ठेवून आवश्यक तिथे कारवाई झाली पाहिजे. जर्मनीत नाझी संघटना कशी वाढली तर, सवंग प्रचार व कडवी शिस्त यांच्या साह्याने कनिष्ट मध्यमवर्गातील अशा तरुणांना त्यांनी आकर्षित केले जे विशेष बुद्धिमान नसतात. संघाची कार्यप्रणाली देखील अशीच आहे’.

चौथ्या पत्रात नेहरूंनी, काश्मीर प्रश्न ‘युनो’मध्ये भारत सरकारने का नेला याची कारणमीमांसा केली आहे. पाचवे पत्र गांधींच्या उपोषणासंदर्भात आहेत. गांधींचे ते पाऊल सुप्रिम स्टेप आहे, सुप्रिम ट्रॅजेडी टाळण्यासाठी गांधींचे म्हणणे ऐकले पाहिजे असे त्यात लिहिले आहे. आणि त्यानंतरच्या लगेचच्या पत्रात गांधीहत्या ही सुप्रिम डिझास्टर आहे असे म्हटले आहे. याच पत्रात हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांनी स्वत:चे विसर्जन केल्याचा आणि रा.स्व.संघावर बंदी घातली त्याचा उल्लेख आहे. त्यात पुढे त्यांनी लिहिले, ‘पाकिस्तानात प्रतिगामी शक्तींची सरशी झाली असून, बॅ.जीना शरियत कायद्याचे समर्थन करीत आहेत. तिथे पुरोगामी शक्तींचा राजसत्तेवर दबाव निर्माण होण्यासाठी किती काळ लागेल याबाबत भाकित करता येणे अवघड आहे. याउलट गांधीजींचे धैर्य आणि आदर्श यामुळे भारतात पुरोगामी शक्तींची सरशी झालेली आहे, पण ती टिकवण्यासाठी अधिक ताकदीने लढावे लागेल. भारताला एक सेक्युलर व डेमोक्रॅटिक स्टेट म्हणून उभे करण्यासाठी मुस्लिम लीगला राजकीय पक्ष म्हणून उभे राहताच येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.’ आणि ६ डिसेंबर १९४८ च्या पत्रात ते लिहितात, ‘काँग्रेसला विरोधक असणे मान्यच आहे. पण रा.स्व.संघ ही अशी संघटना आहे जिथे मोठ्या संख्येने छोट्या मनाचे तरुण आहेत, त्यांच्याकडे दूरदृष्टी तर सोडाच, कॉमन सेन्सचा अभाव आहे आणि त्यांची समजबुद्धीही बेताची आहे.’’ ही वानगीदाखल काही उदाहरणे. या पत्रभांडारात खूप काय काय दडलेले आहे असो.

काही महिन्यांपूर्वी रा.स्व.संघाच्या केरळमधील मुखपत्रातील एका लेखात असे प्रसिद्ध झाले होते की, ‘नथुरामने चूक केली. त्याने गांधीऐवजी नेहरूंना मारायला हवे होते.’ नेहरूंविषयी संघाच्या भावना इतक्या तीव्र का आणि मोदी सरकारची दृष्टी इतकी वक्र का? असा प्रश्न जर कोणाला पडत असेल, तर त्याचे उत्तर नेहरूंच्या या पत्रसंग्रहात अनेक ठिकाणी मिळते आणि संघपरिवाराला स्वत:च्या बळावर केंद्रिय सत्ता मिळवण्यासाठी नेहरूंच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षे जावी लागली, त्याचे प्रमुख कारण नेहरूंनी केलेली पायाभरणी हेच होते, यावरही शिक्कामोर्तब होते. आणि म्हणून मोदी सरकारची चार वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने नेहरूंचे स्मरण करायला हवे.                  

Tags: Constituency Constitute UNO Secular State Democratic State Narendra Modi Nathuram Godse Muslim League Goa Muktisangram Election The Discovery of India Hydrabad Muktisangram Kashmir Madhav Khaosla Rafi Ahemad Kidvai Rafi Ahamad Kidwai Asafali Sardar Vallabhbhai Patel Letter Javaharlal Nehru Jawaharlal Neharu Chief Minister Prime Minister युनो डेमोक्रॅटिक स्टेट सेक्युलर स्टेट नथुराम गोडसे मुस्लिम लीग गोवा मुक्ति संग्राम निवडणुका द डिस्कव्हरी ऑफ इंडिया राज्यघटनेची निर्मिती काश्मीरचा प्रश्न हैद्राबाद मुक्तिसंग्राम माधव खोसला रफि अहमद किडवाई असफअली सरदार पटेल गांधीजी पत्र कॉंग्रेस जवाहरलाल नेहरू मुख्यमंत्री पंतप्रधान weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके