डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

काही वाचकांना या अंकातील अनेक लेखांतून व्यवस्थेविषयी व सभोवतालच्या परिस्थितीविषयी जास्त निराशाजनक चित्र रंगवले गेले आहे असे वाटण्याची शक्यता आहे. पण समाजातील विशिष्ट वास्तवाचा वेध घेणारे साहित्य व प्रत्यक्ष समस्यांना भिडणाऱ्या कार्यकर्त्यांचे अनुभव दाहक असणे स्वाभाविक आहे. व्यापक परिप्रेक्ष्यात समाजाचा व व्यवस्थेचा विचार करताना असे व इतके निराशाजनक चित्र दिसत नसले तरी, वंचित व शोषित वर्गातील एका-एका घटकाचा विचार करताना बरेचसे चित्र असेच असते. हे लक्षात घेतले तर पुरस्कारार्थी व्यक्तींचे विचार व कार्य यांच्याकडे यथायोग्य दृष्टीने पाहता येईल. 

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी व्यक्तींनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने 1994 पासून साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना तर 1996 पासून सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय व अनुकरणीय योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरविले जाते. पुर्वी या पुरस्कारांचे संयोजन मुंबई येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने केले जात होते, गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांचे संयोजन साधना ट्रस्टच्या वतीने केले जात आहे. 

मागील दोन वर्षांप्रमाणेच या वर्षीही, या पुरस्कारांच्या निमित्ताने साधना साप्ताहिकाचा पुरस्कार विशेषांक प्रसिद्ध होत आहे. या वर्षी एकूण 13 पुरस्कारप्राप्त व्यक्तींवर प्रत्येकी दोन लेख (‘मनोगत’ व ‘ओळख’) या अंकात समाविष्ट केले आहेत. पुरस्कारार्थींच्या कार्याचे मूल्यमापन किंवा चिकित्सा नाही तर, त्यांच्या विचारांकडे व कार्याकडे लक्ष वळवणारे हे लेख आहेत. पुरस्कारप्राप्त लेखकांच्या साहित्याचा व कार्यकर्त्यांच्या कार्याचा विस्तृत परिचय करून घेण्याची जिज्ञासा वाचकांच्या मनात उत्पन्न व्हावी असा हेतू हे सर्व लेख लिहून घेताना होता, आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे असे वाटते.

काही वाचकांना या अंकातील अनेक लेखांतून व्यवस्थेविषयी व सभोवतालच्या परिस्थितीविषयी जास्त निराशाजनक चित्र रंगवले गेले आहे असे वाटण्याची शक्यता आहे. पण समाजातील विशिष्ट वास्तवाचा वेध घेणारे साहित्य व प्रत्यक्ष समस्यांना भिडणाऱ्या कार्यकर्त्यांचे अनुभव दाहक असणे स्वाभाविक आहे. व्यापक परिप्रेक्ष्यात समाजाचा व व्यवस्थेचा विचार करताना असे व इतके निराशाजनक चित्र दिसत नसले तरी, वंचित व शोषित वर्गातील एका-एका घटकाचा विचार करताना बरेचसे चित्र असेच असते. हे लक्षात घेतले तर पुरस्कारार्थी व्यक्तींचे विचार व कार्य यांच्याकडे यथायोग्य दृष्टीने पाहता येईल. 

पुरस्कारांचे संयोजन साधनाकडे आल्यानंतर, मागील दोनही वर्षी पुरस्कारांसाठी निवडलेल्या व्यक्तींमध्ये महिलांचे प्रमाण कमी आहे, अशी टीका झाली आणि ती रास्त होती. म्हणून या वर्षी सर्वच पुरस्कार निवड समित्यांनी त्या टिकेची विशेष नोंद घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही केली आहे.

महाराष्ट्र फाउंडेशनच्या या पुरस्कारांच्या लौकिकात भर पडेल असे संयोजन करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत आणि या संयोजनामुळे साधना साप्ताहिकाच्या विकास व विस्ताराला मदत होत आहे असा अनुभवही घेत आहोत. साधनाचे वाचकही याबाबत सहमती दर्शवतील, असा आम्हाला विश्वास वाटतो. या वर्षीच्या पुरस्कार वितरण समारंभाला महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयुक्त, नीला सत्यनारायण व ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ हे दोघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, याचा आम्हाला आनंद वाटतो. या अंकाच्या शेवटी त्या दोघांचा परिचय करून देणारे लेख आहेत, त्यावरून ते किती योग्य पाहुणे आहेत हे लक्षात येईल. या गौरव सोहळ्याचे स्वरूप उत्साहवर्धक व प्रेरणादायी असावे अशीच आमची इच्छा आहे, अंकाच्या मुखपृष्ठातूनही तेच अधोरेखित होत आहे.   
 

----

महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार निवडीचे निकष 

मराठी ललित किंवा वैचारिक साहित्याच्या क्षेत्रांत आपल्या आयुष्यभराच्या कार्याने मोलाची भर घालणाऱ्या साहित्यिकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याचा गौरव करण्यासाठी दोन लक्ष रुपये आणि मानचिन्ह असा एक गौरव पुरस्कार दिला जातो. दरवर्षी ललित किंवा वैचारिक यांपैकी एकाच विभागात हा पुरस्कार दिला जातो. 

या जीवनगौरव पुरस्कारासाठी नावांचा विचार करताना खालील बाबी विचारात घेतल्या जातात. 

जीवनगौरव : ललित साहित्याच्या संदर्भात... 

0 ज्यांच्या साहित्यातून मानवी स्वातंत्र्य, समता, न्याय यांच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक परिवर्तनाची जाणीव व्यक्त झाली आहे. 
0 ज्यांच्या साहित्यातून मानवी जीवनाचे समर्थ दर्शन घडविले गेले आहे. 
0 ज्यांच्या साहित्यातून सार्वकालीन व सार्वजनिक मूल्यांचा आविष्कार झाला आहे. 
0 ज्यांच्या साहित्यामुळे मराठी साहित्याच्या संचितात मोलाची भर पडली आहे किंवा ज्यांचे साहित्य मराठी साहित्याच्या इतिहासात महत्त्वाचे ठरले आहे. 

जीवनगौरव : वैचारिक साहित्यिकांच्या संदर्भात... 

इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान, साहित्य-संशोधन व समीक्षा यांसारख्या वैचारिक क्षेत्रात ज्यांच्या मराठी लेखनामुळे त्या त्या विषयाच्या संदर्भात महत्त्वाची भर पडली आहे. 

0 त्या त्या क्षेत्रात ज्या साहित्यिकांनी नि:स्पृह वृत्तीने व निर्भयपणे तात्त्विक सत्याचा शोध घेतला आहे. 
0 ज्यांची जाणीव मानवी स्वातंत्र्य, समता व न्याय यांच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरणेने उद्युक्त झाली आहे. 
0 मराठी समाजाच्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने ज्यांचे लेखन महत्त्वाचे ठरणारे आहे. 

ग्रंथांसाठी पुरस्कार : 

समकालीन मराठी साहित्याला प्रोत्साहन म्हणून चार मराठी ग्रंथांना प्रत्येकी पंचवीस हजारांचे पुरस्कार दिले जात आहेत. पुरस्कार दिल्या जाणाऱ्या वर्षालगतच्या मागील तीन वर्षातील पुस्तकांचा विचार केला जातो. या वर्षी जानेवारी 2008 ते डिसेंबर 2010 या तीन वर्षांतील पुस्तके विचारात घेण्यात आली.  

रा. शं. दातार नाट्य पुरस्कार 

नाटक या प्रकारासाठी 2003 सालापासून हा विशेष पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जात आहे. एखाद्या महत्त्वाच्या सामाजिक समस्येविषयी आशयसंपन्न नाट्यकृती सादर करण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या नाट्यकर्मींना हा पुरस्कार देण्याची योजना आहे. 

समाजकार्य पुरस्कार 

‘समाजकार्य पुरस्कार योजना’ 1996 पासून सुरू झाली. महाराष्ट्रात परिवर्तनवादी सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती व संस्था यांच्या कार्याचे मोल जाणून घेऊन त्याबद्दल त्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करावा या हेतूने हे पुरस्कार सुरू केले. 

समाजप्रबोधन, स्त्रियांचे प्रश्न व पर्यावरण-संतुलन, संरक्षण तसेच परिवर्तनक्षम शैक्षणिक कार्य, दलितांचे प्रश्न आणि जातीय सलोखा या क्षेत्रांतील व्यक्तींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा पुरस्कार व सन्मानचिन्ह देण्यात येते.

2005 पासून समाज बदलाच्या चळवळींमध्ये अविरत काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या गौरव पुरस्कारांसाठी व्यक्तींच्या नावाचा विचार करताना खालील बाबी विचारात घेतल्या. 

1. ज्या व्यक्ती आपले कार्य व विचार यांच्या साहाय्याने विवेकनिष्ठा, वैज्ञानिक दृष्टी व सामाजिक न्याय ही मूल्ये रुजवण्यासाठी सातत्याने प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. 

2. पर्यावरण संतुलनाचा ध्यास घेऊन त्यासाठी संशोधन, प्रयोग, लोकशिक्षण, जनसंघटन यांसारख्या विविध मार्गांनी निसर्गाच्या संरक्षणाकरता ज्या व्यक्ती अविरत कार्य करीत आहेत. 

3. ज्या व्यक्तींच्या कार्यामुळे स्त्रियांमध्ये स्वावलंबन व स्वातंत्र्य यांविषयीच्या जाणीवा वाढत आहेत आणि अन्यायाविरुद्ध झगडण्याची त्यांची ईर्ष्या जागृत होत आहे. 

परिवर्तनशील समाजकार्य करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या योजनेअंतर्गत युवा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. 25 ते 40 वयोगटातील पुरोगामी स्वरूपाचे समाजकार्य करणारा युवक किंवा युवती या पुरस्कारास पात्र आहे. पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

महाराष्ट्र फाउंडेशनच्या कोणत्याही पुरस्कारासाठी अर्ज करावे लागत नाहीत. निवड समित्यांचे सदस्य त्या त्या क्षेत्रांतील जाणकारांशी चर्चा करून प्रत्येक पुरस्कारासाठी तीन नावांची शिफारस अमेरिकेतील निवड समितीला करतात आणि त्यातून अंतिम निवड केली जाते.   

Tags: Social service Special Award Datar Natya Purskar contemporary Cultural development Social science Philosophy History Research Literature Justice equality Human independence ideological Fine literature Marathi Life achievement Selection Criteria Maharashtra Foundation Purskar युवा पुरस्कार समाजकार्य विशेष पुरस्कार दातार नाट्य पुरस्कार समकालीन साहित्य सांस्कृतिक विकास समाजशास्त्र तत्वज्ञान इतिहास संशोधन साहित्य न्याय समता मानवी स्वातंत्र्य वैचारिक साहित्य ललित मराठी महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार निवडीचे निकष साधना ट्रस्ट पुरस्कार संयोजन २६ लेख १३ पुरस्कारार्थी जीवनगौरव साधना विशेषांक सामाजिक क्षेत्र कला क्षेत्र अमेरिका महाराष्ट्र फाउंडेशन यथायोग्य दृष्टीकोन संपादकीय Organiser Sadhana Works Winners Thoughts 26 Articles 13 award winner Sadhana Special issue Awards Social Sector Art sector Maharashtra Foundation Award Yathayogya Drushtikon Editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके