Diwali_4 अशी नाटके कालबाह्य व्हायला हवीत...!
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

अशी नाटके कालबाह्य व्हायला हवीत...!

या अंकाचा मूळ विषय ‘मनाचे दरवाजे उघडा’ हाच आहे. मानवी मनाला अनेक दरवाजे असतात आणि त्यातील काही पूर्णतः बंद केलेले असतात. या पूर्णतः बंद दरवाजांमुळे जीवनप्रवाह आटतो, त्याला साचलेपण येते. अशा साचलेपणामुळे मानवी संस्कृती अधिकाधिक उन्नत व उदात्त होण्याऐवजी लहान-मोठी डबकी तयार झालेले समाज आकाराला येतात. मग स्तरीकरण रंग-रूप धारण करते. कप्पे तयार होतात. अनेक समाजघटक त्या परिस्थितीचा गैरफायदा घेतात, काही घटकांची मक्तेदारी निर्माण होते. त्यातून अनेक अपप्रवृत्ती फोफावतात. अशा वेळी मार्ग काय राहतो? लोकांच्या मनाचे दरवाजे उघडण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागते. त्यासाठी जोर-जबरदस्ती उपयोगाची ठरत नाही, आर्जव करावे लागते. समाजमनाची मशागत करावी लागते. त्यांचा प्रभाव मर्यादित असतो. म्हणून दीर्घकालीन वाटचाल अपरिहार्य बनते. पण हा दीर्घ काळ तरी किती असावा, याला काही मर्यादा?

साधना साप्ताहिकाचे संस्थापक साने गुरुजी यांचा 11 जून हा स्मृतिदिन. दर वर्षी त्या निमित्ताने एखादा विशेष अंक प्रकाशित केला जातो. अर्थात, गुरुजींना अगत्य होते असे विषय अनेक आहेत. मात्र त्यांना विशेष जिव्हाळा होता, असा एक विषय म्हणजे आंतरभारती. भारतीय संस्कृती ही अनेक लहान-मोठ्या संस्कृतींच्या घुसळणीतून व देवाण-घेवाण प्रक्रियेतून आकाराला आलेली आहे, अशी त्यांची धारणा होती. ती घुसळण व ती प्रक्रिया अधिक बळकट करायची असेल तर भाषा हे माध्यम सर्वांत महत्त्वाचे आहे, याबद्दल त्यांची खात्री झाली होती. किंबहुना, भाषा हीच संस्कृतीची वाहक असते असे ते मानत होते. म्हणून स्वातंत्र्यलढ्याच्या ऐन धामधुमीत अनेक आघाड्यांवर लढत असतानाही, भारतातील विविध भाषांमधील साहित्याचा परिचय मराठी वाचकांना व्हावा, यासाठी त्यांनी स्वतः अनेक भाषांतरे व रूपांतरे केली. स्वातंत्र्यानंतर ती प्रक्रिया अधिक गतिमान व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. कारण आता आपल्याला नव्या व आधुनिक राष्ट्राची उभारणी करायची आहे, अशीच त्यांची भूमिका होती.

या वर्षीचा 11 जून हा त्यांचा 70 वा स्मृतिदिन आहे. मागील सात दशकांत यानिमित्ताने आंतरभारती या संकल्पनेवर साधनाने बरेच काही प्रसिद्ध केलेले आहे. प्रस्तुत अंक त्याच साखळीतील पुढची कडी आहे.

हा अंक आकाराला आला तो काहीसा अनपेक्षितपणेच. मागील अडीच महिने संपूर्ण भारत आणि जगातील अनेक देश कोरोना संकटामुळे लॉकडाऊनचा म्हणजे संपूर्ण टाळेबंदीचा अनुभव घेत आहेत. अत्यावश्यक म्हणावे असे चलन-वलन सोडले, तर एकूण जीवनव्यवहार थांबलेलाच आहे. जगाच्या ज्ञात इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे. या पार्श्वभूमीवर दि.2 मेच्या अंकात ‘बंद दरवाजाआड मनाची कवाडे उघडा!’ या शीर्षकाचा संपादकीय लेख प्रसिद्ध केला होता. पण तशाच आशयाची मनोभूमिका त्या काळात अनेक लोकांच्या मनात उफाळून येत होती. त्यामुळे कदाचित त्यानंतर एकाच आठवड्याने भारत सासणे यांच्याकडून या अंकाचा प्रस्ताव आला.

भारत सासणे हे मराठीतील प्रथितयश लेखक आहेत, हे मराठी साहित्याचे वाचन असणाऱ्या सर्वांना चांगलेच ठावुक आहे. कथा, कादंबरी, नाटक, ललित लेखन, बालसाहित्य इत्यादी साहित्यप्रकार त्यांनी उत्तम प्रकारे हाताळले आहेत. साधना दिवाळी अंकांतून मागील दोन-अडीच दशके त्यांनी महत्त्वाचे लेखन केले आहे. त्या काळातील वसंत बापट, ग.प्र.प्रधान, डॉ.नरेंद्र दाभोलकर या संपादकांच्या मनातही सासणे यांच्या लेखनाविषयी ममत्व होते. त्यांची ‘दोन मित्र’ ही स्वतंत्र कादंबरी आणि ‘दंतकथा’ ही त्यांनी अनुवाद केलेली कादंबरी साधना दिवाळी अंकांतूनच प्रसिद्ध झाली होती. डॉ.दाभोलकर यांना फिक्शन या प्रकारातील साहित्यात कमी रुची होती आणि ते वाचण्यासाठी वेळही कमी मिळत असे. मात्र ‘दोन मित्र’ या कादंबरीचा गौरवपूर्ण उल्लेख ते अनौपचारिक संभाषणात अनेक वेळा करीत असत, इतकी त्यांच्या मनाची पकड त्या कादंबरीने घेतली होती. दोन भिन्न जातींतील मित्र आणि आंतरजातीय विवाह, हा विषय त्या कादंबरीच्या मध्यवर्ती होता. ‘दंतकथा’ हा बिस्मिल्ला खान यांच्या हिंदी कादंबरीचा अनुवाद होता. त्यात एका कोंबड्याची आत्मकथा सांगितली गेली होती.

अशा या भारत सासणे यांच्याकडून असा प्रस्ताव आला की, ‘कृष्ण चंदर या लेखकाचे ‘दरवाजे खोल दो’ हे 1964 मध्ये प्रसिद्ध झालेले उर्दू नाटक त्यांनी अलीकडेच वाचले आहे आणि आजच्या या कठीण काळात ते इतके प्रस्तुत ठरते आहे की, त्याचा अनुवाद प्रसिद्ध करायला हवा. त्या नाटकाच्या पुस्तकात कृष्ण चंदर व ख्वाजा अहमद अब्बास या दोघांची चिंतने म्हणावीत असे दोन लेख आहेत आणि तेही अनुवाद करून नाटकासोबतच प्रसिद्ध करावेत असे आहेत.’ हे सर्व प्रसिद्ध करायचे ठरले तर साधनाचा एक अंक लागणार, हे उघड होते.

अडचण अशी होती की, ते नाटक व ते दोन लेख उर्दू लिपीत असल्याने आणि प्रस्तुत संपादक उर्दू लिपीबाबत पूर्णतः अनभिज्ञ असल्याने निर्णय घेता येणे अवघड होते. शिवाय, ते लेखन इंग्रजी वा हिंदीत सध्या तरी उपलब्ध असलेले दिसत नाही आणि असेल तरी या लॉकडाऊन काळात मिळवता येणे अवघड होते.

पण निर्णय तर घ्यायचा होता. भारत सासणे यांच्या अभिरुचीचा व ते शिफारस करीत असलेल्या लेखनाच्या दर्जाविषयी प्रश्न नव्हताच. प्रश्न वेगळाच होता. साधना साप्ताहिकाचे वाचक विविध स्तरांतील व भिन्न अभिरुचीचे असल्याने आणि नाटक हे प्रामुख्याने ऐकले-पाहिले जाते, हे लक्षात घेता- असा अंक वाचनीय होईल का, असा तो प्रश्न होता. परंतु अतिशय गांभीर्याने लेखन करणारे सासणे अलीकडच्या चार-पाच वर्षांत उर्दू भाषा खूप चिकाटीने शिकताहेत, हे आम्हाला माहीत होते; शिवाय कृष्ण चंदर व ख्वाजा अहमद अब्बास या दोघांचे उर्दू व हिंदी साहित्यातील स्थान लक्षात घेता, हा अंक वाचनीय होणार असा अंदाज आम्ही बांधला आणि होकार दिला. त्यानंतरच्या तीन-चार आठवड्यांत सासणे यांनी ते तीन अनुवाद तर पूर्ण केलेच, पण हे सर्व का करावेसे वाटले हे सांगणारे समर्पक मनोगतही लिहिले. सर्व ऐवज अनुवाद होऊन हाती आल्यावर एकत्रित वाचला, तेव्हा आशय व विषय कमालीचा कालसुसंगत आहे याची तर खात्री पटलीच; पण अधिक आश्चर्य वाटले ते याचे की नाटक, दोन चिंतने व अनुवादकाचे मनोगत यातील विचार व धारणा कमालीची सुसंगत आहे. शिवाय, ते तीनही अनुवाद इतके प्रवाही झाले आहेत की, जर हे अनुवाद आहेत असे सांगितले नाही तर, हे लेखन मूळ मराठीच आहे, असे चांगल्या वाचकांनाही वाटू शकेल.

हे सर्व लेखन जुळवून अंक तयार केला तेव्हा लक्षात आले, चित्रे व अन्य सजावट यासाठी फार वाव नाही आणि ओढून-ताणून काही छायाचित्रे वा चित्रे देण्यात अर्थ नाही. त्यामुळे अंकात पाच पाने शिल्लक राहताहेत, त्यांचा वापर कसा करायचा याचा विचार करायचा होता. अर्थातच, अनेक चांगले पर्याय होते. पण सर्वोत्तम व औचित्यपूर्ण पर्याय निवडायचा होता. तेव्हा असा शोध लागला की, कृष्ण चंदर यांची ‘जामून का पेड’ ही कथा केंद्रीय शाळांच्या इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकात आहे आणि सहा महिन्यांपूर्वी शिक्षण खात्याकडून शाळांना असा आदेश देण्यात आलेला आहे की- 2020 व 21 या शैक्षणिक वर्षांत ती कथा विद्यार्थ्यांना शिकवण्यात येऊ नये, तिच्यावर परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ नयेत. याचाच अर्थ, ती कथा अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहे. 2015 पासून ती कथा पाठ्यपुस्तकात आहे आणि लक्षावधी प्रती छापून तयार असलेल्या पाठ्यपुस्तकातून ती काढता येत नाही, म्हणून हा आदेश आहे. म्हणजेच हे पाठ्यपुस्तक पुन्हा छापले जाईल, तेव्हा त्यात ही कथा नसेल.

शिक्षण खात्याने तो आदेश का काढला आहे याचे स्पष्टीकरण दिलेले नाही, कारणमीमांसा केलेली नाही. म्हणून ती कथा अनुवाद करून या अंकात घ्यावी आणि वाचकांना सादर करावी, असे ठरवले. ऐन वेळी निवडलेल्या या कथेचा अचूक व प्रवाही अनुवाद तत्परतेने करून देण्यासाठी चंद्रकांत भोंजाळ हेच नाव आमच्यासमोर प्रथमदर्शनी आले. (त्यांनी पन्नासहून अधिक हिंदी पुस्तकांचे उत्तम अनुवाद केलेले आहेत.) त्यांनी आमच्या विनंतीचा स्वीकार केला आणि चोवीस तासांच्या आत या कथेचा अनुवाद करून पाठवला.

असा हा अनपेक्षितपणे आकाराला येत गेलेला अंक कमालीचा वाचनीय झाला आहे, नेहमीच्या अंकांपेक्षा कमी वेळेत वाचून होईल असा झाला आहे.

या अंकाचा मूळ विषय ‘मनाचे दरवाजे उघडा’ हाच आहे. मानवी मनाला अनेक दरवाजे असतात आणि त्यातील काही पूर्णतः बंद केलेले असतात. या पूर्णतः बंद दरवाजांमुळे जीवनप्रवाह आटतो, त्याला साचलेपण येते. अशा साचलेपणामुळे मानवी संस्कृती अधिकाधिक उन्नत व उदात्त होण्याऐवजी लहान-मोठी डबकी तयार झालेले समाज आकाराला येतात. मग स्तरीकरण रंग-रूप धारण करते. कप्पे तयार होतात. अनेक समाजघटक त्या परिस्थितीचा गैरफायदा घेतात, काही घटकांची मक्तेदारी निर्माण होते. त्यातून अनेक अपप्रवृत्ती फोफावतात. अशा वेळी मार्ग काय राहतो? लोकांच्या मनाचे दरवाजे उघडण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागते. त्यासाठी जोर-जबरदस्ती उपयोगाची ठरत नाही, आर्जव करावे लागते. समाजमनाची मशागत करावी लागते. त्यांचा प्रभाव मर्यादित असतो. म्हणून दीर्घकालीन वाटचाल अपरिहार्य बनते. पण हा दीर्घ काळ तरी किती असावा, याला काही मर्यादा?

‘दरवाजे खोल दो’ हे नाटक 1964 मध्ये लिहिले गेले, त्या काळात त्याचे काही प्रयोगही झाले. त्यानंतर 65 वर्षे उलटली. पण त्या नाटकात छोट्याशा कथानकातून आणि पाच-सहा प्रसंगांतून उपस्थित केलेले प्रश्न व ती समस्या आजही कायम राहावी का?

कमलकुंज नावाची मोठ्ठी इमारत, त्या इमारतीचा मालक पंडित रामदयाळ, त्याचा मुलगा कमलकांत आणि त्यांचा मुनीम मिर्झा हे या नाटकाच्या मध्यवर्ती आहेत. ते तिघे आणि त्यांच्याकडील सदनिकांमध्ये राहण्यासाठी येऊ इच्छिणारे भाडेकरू यांच्याभोवती हे नाटक फिरते आहे. जेमतेम अर्ध्या दिवसाचा कालखंड असणारे हे कथानक आहे. म्हटले तर साधे-सरळ, म्हटले तर बाळबोध. पण त्यातून उपस्थित केलेले प्रश्न व समस्या मात्र कमालीची गंभीर व दाहक!

वरवर पाहिले तर जात, धर्म, वंश इत्यादी कारणांमुळे घर भाड्याने मिळणे किती अवघड आहे ही समस्या दिसते. पण खरी समस्या ही दिसते आहे की, घर भाड्याने देणे-न-देणे यातून जात, धर्म, वंश यांच्याविषयीचा दुरभिमान खूप दाहक असू शकतो, समाजमनाची दारे-खिडक्या तो बंद ठेवू शकतो. यासंदर्भात ठळक म्हणावीत अशी उदाहरणे कितीही देता येतील. विसाव्या शतकाच्या प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान बडोदा संस्थानच्या सयाजीरावमहाराज करतात, पण त्याच डॉ.आंबेडकरांना बडोद्यात घर भाड्याने मिळवण्यासाठी अवहेलना सहन करावी लागली होती. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीचे उदाहरण द्यायचे तर प्रसिद्ध सिनेअभिनेत्री शबाना आझमी यांना मुंबईतील एका सोसायटीत घर विकत घ्यायचे होते, तेव्हा नकार आला होता. आजही बहुतांश लहान खेडेगावांत दलित वस्ती गावकुसाबाहेर असते. आणि मोठ्या शहरांमधील अनेक इमारतींमध्ये मुस्लिम कुटुंबांना सदनिका देण्यासाठी, जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन निव्वळ व्यावसायिक दृष्टिकोन असणारे मालकही नाखूष असतात. कारण काय, तर त्यामुळे इमारतीमधील अन्य सदनिकांचे भाव कमी होतात.

तर, अशा समस्या अधोरेखित करणारी नाटके कालसुसंगत ठरतात तेव्हा प्रश्न पडतो; त्या नाटककारांच्या द्रष्टेपणाचे कौतुक करायचे की, ती नाटके कालबाह्य ठरत नाहीत याबाबत खंत व्यक्त करायची...? ‘दरवाजे खोल दो’, या नाटकात कृष्ण चंदर यांनी पंडित रामदयाळ व कमलकांत या पिता-पुत्रांच्या संवादांमधून दोन पिढ्यांतील अंतर दाखवले आहे, नवी पिढी कशी बदलत आहे, हेही अधोरेखित केले आहे. ती समाधानाचीच बाब वाटते. पण नव्या पिढीतील गावोगावचे लहान-मोठे कमलकांतही जास्त बदलत नाहीत. ऐन उमेदीत ते आधुनिकतेची व बदलाची भाषा बोलतात खरे, पण आयुष्य पुढे सरकत जाते तसतशी त्यांच्यातील बदलांची गती मंदावते आणि काही वेळा तर ते आपापल्या पित्यांइतकेच- किंबहुना, अधिक कर्मठ होत असतात; अन्यथा अशी नाटके कालबाह्य झाली असती...!

असो. उघडा, दरवाजे उघडा...! हे अनुवादित नाटक वाचकांसमोर आणून, त्यानिमित्ताने एक संपूर्ण अंक काढून  ‘राष्ट्रीय एकात्मता’ या जुन्याच विषयाकडे नव्याने लक्ष वेधता आले. असा योग गेल्या दहा वर्षांत तिसऱ्यांदा आला आहे. मे 2010 मध्ये ‘दलपतसिंग येती गावा’ आणि जानेवारी 2013 मध्ये ‘सत्यशोधक’ या दोन नाटकांच्या निमित्ताने विशेषांक काढले होते. पहिल्यातून माहितीचा अधिकार देणारा कायदा आणि त्यानिमित्ताने ग्रामीण विकास या विषयावर प्रकाशझोत टाकला होता; दुसऱ्या नाटकातून महात्मा फुले यांच्या विचारकार्यावर दृष्टिक्षेप टाकून, सामाजिक सुधारणांचा किती प्रवास अद्याप बाकी आहे, हे अधोरेखित केलेले आहे. ती नाटकेही कालबाह्य व्हायला तयार नाहीत...!

Tags: संपादकीय आंतरभारती विशेषांक साने गुरुजी स्मृती दिन साने गुरुजी विनोद शिरसाठ special edition visheshank smrutidin sane guruji saneguruji antarbharati vinod shirsath weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात