डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

समाजजीवनाचे प्रतिबिंब पाहण्यासाठी

भारत सासणे यांची दीर्घ मुलाखत साधना साप्ताहिकात प्रसिद्ध करावी असे आम्हाला वाटणे साहजिक होते. मात्र यापूर्वी त्यांच्या काही मुलाखती अन्यत्र प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यातील संजय आर्वीकर यांनी ‘पद्मगंधा’ दिवाळी अंकासाठी घेतलेली मुलाखत विशेष लक्षवेधी आहे. मात्र ती प्रसिद्ध होऊनही आता दोन दशकांचा काळ उलटला आहे. त्यामुळे अधिक विस्तृत व सखोल मुलाखत कोण घेऊ शकेल याचा शोध आम्ही घेत होतो. आणि नेमके त्याच वेळी आजचे आघाडीचे कवी दासू वैद्य यांच्या मनात सासणे यांची दीर्घ मुलाखत घेण्याचा विचार आकार घेत होता. थोडेच पण विचारगर्भ लिहिण्यासाठी (गद्य असो वा पद्य) दासू यांची ओळख आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची दीर्घ मुलाखत घेतली होती, ती साधनातून मुखपृष्ठकथा म्हणून प्रसिद्ध झाली होती.

मराठी साहित्य आणि संस्कृती यांच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात चर्चिला जाणारा व सर्वाधिक दखल घेतला जाणारा उत्सव म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचाच उल्लेख करावा लागतो. तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा त्याला आहे. मुख्य प्रवाहाचे संमेलन असे त्याला संबोधले जात असले तरी किंबहुना म्हणूनच त्या संमेलनाच्या निमित्ताने दरवर्षी काही ना काही वाद झडतात, आक्षेप घेतले जातात, आरोप-प्रत्यारोप होतात. परिणामी त्यावर बहिष्कार टाकण्यापासून पर्यायी संमेलने भरवली जाण्यापर्यंतचे प्रकार घडतात. हे सर्व प्रकार काही प्रमाणात दुही वा कटुता निर्माण करणारे ठरत असले तरी अंतिमत: मराठी साहित्य व संस्कृतीचे पोषणच करतात. त्यामुळे सर्व प्रकारच्या व सर्व प्रवाहांच्या लहान मोठ्या साहित्य संमेलनांचे स्वागत करीत असतानाच ‘मुख्य प्रवाहातील’ असे नामाभिधान प्राप्त झालेल्या अ.भा.म.साहित्य संमेलनाचेही स्वागतच करायला हवे. त्याच्या आयोजनातील सर्व मर्यादा लक्षात घेऊनही!

या वर्षीचे अ.भा.म.साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीर या तालुक्याच्या गावी 22 ते 24 एप्रिल 2022 असे तीन दिवस होत आहे. कडक उन्हाळ्यात ते होत आहे, पण दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर पूर्णत: निर्बंधमुक्त वातावरणात होत असल्याने, शिवाय मराठवाड्यातील लहान गावात आयोजन असल्याने ते अधिक दखलपात्र ठरायला हवे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी भारत सासणे यांची निवड झालेली आहे. ते मूळचे मराठवाड्यातील आहेत आणि त्यांचा वास्तव्याचा/नोकरीचा काळ मराठवाड्यातच जास्त होता, या दोन्ही मुद्यांना फारसे महत्त्व आतापर्यंत तरी दिले गेलेले नाही ही समाधानाची बाब आहे. वस्तुत: त्यांचे अध्यक्ष होणे हे मागील आठ वर्षे तरी चर्चेत होते. 2016 मध्ये घुमान येथे संमेलन झाले तेव्हा ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभेही होते. आणि 2018 नंतर निवडणूक न घेता अध्यक्ष निवडण्याची पद्धती सुरू झाली. तेव्हापासून दरवर्षी त्यांचे नाव संभाव्य अध्यक्ष म्हणून घेतले जात होते, याचे कारण साहित्याच्या क्षेत्रात गुणात्मक व संख्यात्मक सातत्यासाठी ते ओळखले जात होतेच. मात्र मराठी साहित्यविश्वात त्यांचा असा गोतावळा फार नव्हता, नाही. शिवाय त्यांचे लेखन विविधांगी व विपुल असले तरी अगदी सर्वसामान्य वाचकवर्गापर्यंत ते पुरेसे पोहोचलेले नाही. मात्र अभिजन नाही पण चोखंदळ व औरस-चौरस वाचकांनी मात्र  सासणे यांचे काही ना काही वाचलेले असते, आणि जे काही थोडे वाचलेले असते ते या ना त्या प्रकारे कमी-अधिक प्रभाव टाकून गेलेले असते. एवढेच नाही तर, अनेक चांगल्या वाचकांच्या ‘आगामी काळात वाचायचे आहे’ किंवा ‘वाचायचे राहून गेले’ या यादीत भारत सासणे यांची चार-दोन पुस्तके तरी असतातच. हे वैशिष्ट्य दिसायला लहान वाटले तरी, मराठी साहित्यविश्वातील विविधता व विपुलता लक्षात घेता विशेष महत्त्वाचे मानले पाहिजे. असो.

तर अशा या भारत सासणे यांची लहान-मोठी अशी तीन डझन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात अर्धा डझन लघुकथा संग्रह, डझनभर दीर्घकथा संग्रह, चार-पाच कादंबऱ्या, चार-पाच नाटके, चार-पाच बालसाहित्याची पुस्तके, दोन अनुवादित पुस्तके आणि एक लेखसंग्रह आहे. शिवाय, विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध मात्र पुस्तकरूपाने न आलेले असे लेखन शिल्लक आहे ते वेगळेच. आणि अद्यापही त्यांचे लेखन चालू आहे, लेखनाचे नियोजित प्रकल्प त्यांच्या मनाशी आहेत. पुढील किमान दशकभर तरी ते त्यासाठी अधिक वेळ व ऊर्जा खर्च करू शकतील असे दिसते. त्यांचे लेखन प्रतिष्ठित नियतकालिकांतून व दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेले आहे आणि त्यांची पुस्तके मान्यवर प्रकाशनसंस्थांकडून आलेली आहेत. साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन हे जरी ललित साहित्य कमी प्रमाणात प्रकाशित करीत असले तरी भारत सासणे यांचा त्यात छोटा पण महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. 1990 नंतर म्हणजे मागील साडेतीन दशकांत त्यांनी साधनात केलेले लेखन, साधनाच्या वृत्ती-प्रवृत्तीशी बरेच जुळणारे आहे.

वसंत बापट व डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या संपादकपदाच्या काळात सासणे यांनी कथा व कादंबऱ्या साधना दिवाळी अंकांमधून लिहिल्या आहेत. त्यातील एक कादंबरी व एक अनुवाद यांचा उल्लेख करायलाच हवा. ‘दोन मित्र’ ही कादंबरी इ.स. 2001 च्या साधना दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती, त्या अंकाची पाऊणशे पाने व्यापणारी ती कादंबरी आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर मुळात ललित साहित्य कमी वाचत असत, पण तेही त्या कादंबरीचा उल्लेख ‘विशेष आवडलेली’ असा अनेक वेळा करीत असत. समाजमनातील जातीसंस्थेचे ताणेबाणे तरलतेने आणि प्रचलित रूढ पद्धतीपेक्षा वेगळ्या प्रकारे दाखवले गेले म्हणून त्यांना ती कादंबरी विशेष भावली होती. असाच प्रकार ‘दंतकथा’ या लघुकादंबरीबाबत झाला होता. 2002 च्या साधना दिवाळी अंकात ती प्रसिद्ध झाली होती. अब्दुल बिस्मिल्लाह या हिंदी भाषेत लेखन करणाऱ्या उत्तर प्रदेशातील साहित्यिकाची ही जेमतेम पन्नास-साठ पानांची लघुकादंबरी (एक दीर्घकथा वाटावी अशी) आहे.

एका कोंबड्याची आत्मकथा अशी मध्यवर्ती कल्पना असलेल्या त्या कादंबरीतून माणूस नावाचा प्राणी आणि मानवी समाज यांच्या वृत्तीप्रवृत्तीचे घडविलेले दर्शन खूपच प्रत्ययकारी झालेले आहे. त्या कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेली ‘घुसमट’ त्यानंतरच्या वीस वर्षांत वाढत गेलेली आहे. परिणामी ती कादंबरी अधिकाधिक आजची वाटत आलेली आहे. आणि याच कारणामुळे डॉ.नरेंद्र दाभोलकरांना ती लघुकादंबरी ‘दोन मित्र’ इतकीच भावली होती. त्या अनुवादाचे पहिले महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, भारत सासणे यांनी केलेला तो पहिला अनुवाद आहे. त्या अनुवादासाठी अब्दुल बिस्मिल्लाह यांची परवानगी मागताना सासणे यांनी त्यांना जे पत्र पाठवले होते, त्यात लिहिले होते, ‘‘ही कादंबरी तुम्ही लिहिली नसती तर मीच लिहिली असती, इतकी मला ती जवळची आहे.’’ एका मराठी सर्जनशील लेखकाने एका हिंदीतील सर्जनशील लेखकाला दिलेली दाद एवढ्यापुरताच हा मुद्दा मर्यादित नाही; तर एकाच काळात दोन भिन्न भाषा-संस्कृती व सामाजिक पर्यावरणात वावरणारे लेखक, एकाच वेळी मानवी जीवनाचा किती सारखा विचार करतात हे त्यातून लक्षात येते आणि साहित्याच्या वैश्विकतेची प्रचितीही त्यातून येते. आणि दुसरा मुद्दा असा की, ते पुस्तक अनुवादित आहे असे वाटतच नाही, इतका तो अनुवाद प्रवाही व अर्थवाही झाला आहे.

असाच एक छोटा पण तितकाच महत्त्वाचा अनुवाद सासणे यांनी त्यानंतर वीस वर्षांनी म्हणजे 2020 मध्ये केला आहे. कृष्ण चंदर हे हिंदी व उर्दू भाषेतील महत्त्वाचे लेखक, स्वातंत्र्योत्तर भारतातील नेहरूयुगाचे प्रतिनिधी म्हणता येतील असे! म्हणजे आधुनिक भारत कोणत्या मूल्यांवर उभा राहिला पाहिजे याबाबत नेहरूंशी पूर्णत: सहमत असणारे आणि त्यासाठीच आपली लेखणी झिझवणारे. त्यांनी ‘दरवाजे खोल दो’ हे लघुनाट्य/नभोनाट्य 1960 च्या दशकात उर्दू भाषेत लिहिले होते. एका नव्या इमारतीत भाडेकरू म्हणून कोणाला घ्यायचे आणि कोणाला नकार द्यायचा हे ठरवणारा त्या इमारतीचा मालक, त्याच्या धार्मिक व सांस्कृतिक जाणीवा आणि त्यातून आलेले आग्रह-दूराग्रह अशी त्या नाटकाची मध्यवर्ती कल्पना आहे. पण ‘नवी इमारत’ हे प्रतीक आहे, नवा भारत उभा करण्याचे! नव्या भारतात जात, धर्म, प्रदेश, संस्कृती इत्यादी भेदभावांना अजिबात थारा देऊन चालणार नाही, हा विचार त्यात मार्मिकपणे पेरला गेला आहे. या नाटकाचा अनुवाद सासणे यांनी केला, त्याची दोन वैशिष्ट्ये सांगता येतील. एक म्हणजे वयाच्या साठीनंतर, जिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी उर्दू भाषा लिहिण्या-वाचण्यासाठी शिकवणी लावली होती.

पुणे येथील अतिक शेख हे त्यांचे शिक्षक होते. सासणे यांना ती भाषा चांगली लिहिता वाचता यायला लागल्यानंतर अतिक शेख यांनी कृष्ण चंदर यांचे ते छोटे पुस्तके सासणे यांना भेट दिले होते. आणि त्या उर्दू स्क्रिप्टमधील पुस्तकाचा सासणे यांनी जो अनुवाद केला तोसुद्धा ‘दंतकथा’ प्रमाणेच अर्थवाही व प्रवाही आहे. दुसरे वैशिष्ट्य असे की, ‘दरवाजे खोल दो’ हे पुस्तक त्यांनी अनुवाद करायला घेतले ते कोरोना संकटाचा प्रारंभ झाला तेव्हा. त्या काळात जगातील मानवजातीवरच संकट आले होते. मात्र संकट काळातही काही माणसे आग्रही-दूराग्रही राहतात आणि त्यांना राजकीय-सामाजिक पक्ष-संघटना कसे खतपाणी घालतात, याचे दर्शन घडत होते. त्या काळात सासणे यांनी तो अनुवाद केला होता. त्याचा आशय व विषय लक्षात घेऊन आम्ही साने गुरुजींच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, आंतरभारती कल्पनेशी जोडून 11 जून 2020 च्या साधना साप्ताहिकाचा पूर्ण अंक म्हणून प्रसिद्ध केला होता. त्या नाटकाच्या सोबतच लेखक कृष्ण चंदर यांचे मनोगत आणि त्या नाटकाच्या संदर्भात ख्वाजा अहमद अब्बास यांचे भाष्य असे दोन अनुवादित लेखही त्या अंकात समाविष्ट केले होते.

गेल्या वर्षी ‘दंतकथा’ व ‘उघडा, दरवाजे उघडा!’ हे सासणे यांनी केलेले अनुवाद साधना प्रकाशनाकडून पुस्तकरूपात (आकर्षक पद्धतीने) आणले आहेत. याशिवाय आणखी काही लेख व कथा त्यांनी साधनासाठी लिहिल्या. पण त्यातील दोन लेखांचा उल्लेख इथे करणे आवश्यक वाटते. 2013 मध्ये ‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा’ या साधना विशेषांकात त्यांनी व्ही.शांताराम दिग्दर्शित ‘नवरंग’वर लेख लिहिला होता. कलाविषयक जाणीवा समृद्ध व्हाव्यात असे वाटणाऱ्याने हा सिनेमा पाहिला पाहिजे असे भाष्य त्यांनी त्या लेखात केले आहे. आणि 2021 मध्ये ‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ हा साधना विशेषांक आला, त्यात सासणे यांनी नाथमाधव यांच्या ‘वीरधवल’ या कादंबरीवर लिहिले आहे. बालकुमार वयात अद्‌भुत रसाचे सेवन करायला न मिळालेली माणसे पुढील आयुष्यात खुरटी, रुक्ष व कोरडी निपजण्याची शक्यता जास्त असते, असे प्रतिपादन त्यांनी त्या लेखात केले आहे.

अशा या भारत सासणे यांची दीर्घ मुलाखत साधना साप्ताहिकात प्रसिद्ध करावी असे आम्हाला वाटणे साहजिक होते. मात्र यापूर्वी त्यांच्या काही मुलाखती अन्यत्र प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यातील संजय आर्वीकर यांनी ‘पद्मगंधा’ दिवाळी अंकासाठी घेतलेली मुलाखत विशेष लक्षवेधी आहे. मात्र ती प्रसिद्ध होऊनही आता दोन दशकांचा काळ उलटला आहे. त्यामुळे अधिक विस्तृत व सखोल मुलाखत कोण घेऊ शकेल याचा शोध आम्ही घेत होतो. आणि नेमके त्याच वेळी आजचे आघाडीचे कवी दासू वैद्य यांच्या मनात सासणे यांची दीर्घ मुलाखत घेण्याचा विचार आकार घेत होता. थोडेच पण विचारगर्भ लिहिण्यासाठी (गद्य असो वा पद्य) दासू यांची ओळख आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची दीर्घ मुलाखत घेतली होती, ती साधनातून मुखपृष्ठकथा म्हणून प्रसिद्ध झाली होती.

त्याच वेळी त्यांना असाही प्रस्ताव दिला होता की, ‘वर्षातून एक तरी दीर्घ मुलाखत तुम्ही साधनासाठी घ्यावी.’ तो धागा त्यांच्या मनात होता. पण दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, दासू यांची ओळख जरी मुख्यत: कवी अशी असली तरी, त्यांनी त्यांच्या एम.फिल व पीएच.डी अभ्यास-संशोधनासाठी भारत सासणे यांचे साहित्य निवडले होते, त्यातही ‘कथा’ केंद्रस्थानी ठेवली होती. साहजिकच दासू यांच्याकडून अधिक सखोल व रूढ पद्धतीपेक्षा वेगळी मुलाखत घेतली जाणार हे आम्ही गृहीत धरले होते. त्याप्रमाणे त्यांनी सासणे यांच्या घरी जाऊन दिवसभर निवांतपणे चर्चा करून तीन-साडेतीन तास मुलाखत रेकॉर्ड केली. तिचे शब्दांकन खूप मोठे होणार हे उघड होते. पण मुलाखत घेणारा, मुलाखत देणारा आणि मुलाखत प्रसिद्ध करण्याचे औचित्य हे तिन्ही घटक लक्षात घेऊन ती संपूर्ण मुलाखत एकाच अंकात प्रसिद्ध करणे आवश्यक वाटले. अर्थातच त्यामुळे वाचकांची अधिक सोय होणार आहे. 

साधनातून राजकीय-सामाजिक आशय-विषय प्रामुख्याने हाताळले जातात. मात्र ‘साहित्य’ हे आपल्या समाजजीवनाचे अभिन्न अंग आहे, किंबहुना त्यातच समाजजीवनाचे प्रतिबिंब पाहता येते. त्यामुळे साहित्यावर वर्षभरातून चार दोन अंक त्या-त्या निमित्ताने येत असतात. गेल्या महिन्यात ‘तीन कवींच्या मुलाखती’ हा मिनी विशेषांक सादर केला होता, त्याचे सर्व स्तरांतील वाचकांकडून चांगले स्वागत झाले होते. हा मिनी विशेषांक त्याचीच पुढची कडी आहे.

(या मुलाखतीचे ऑडिओ रेकॉर्डिंग प्रत्येकी 15 ते 20 मिनिटांचे आठ तुकडे kartavyasadhana.in वर ऐकता येतील.)

Tags: वाङ्मय ललित साहित्य सर्जनशीलता लेखन मराठी पुस्तके दासू वैद्य कादंबरी कविता साहित्यविषयक मुलाखती उदगीर मराठी साहित्य मराठी साहित्यिक संमेलनाध्यक्ष साहित्य संमेलन मुलाखत bharat sasne books अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भारत सासणे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके