Diwali_4 देशासमोरील सर्वांत मोठी समस्या कोणती?
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

देशासमोरील सर्वांत मोठी समस्या कोणती?

भ्रष्टाचार ही देशासमोरील सर्वांत मोठी समस्या आहे, असे उत्तर बऱ्याच लोकांकडून येऊ शकेल. कारण भ्रष्टाचार सर्वत्र आहे आणि प्रत्येकाला त्याची झळ कमी-अधिक प्रमाणात बसते. परंतु बहुतांश वेळा लोक स्वेच्छेने भ्रष्टाचारात सामील होतात, भ्रष्टाचार करणाऱ्यांचे त्यांना कौतुक वाटते आणि तो रोखण्यासाठी प्रयत्न करताना खूप कमी लोक दिसतात. म्हणजे भ्रष्टाचाराचा अंगिकार इच्छेने वा अनिच्छेने केल्यामुळे तो आपल्या समाजाच्या व देशाच्याही अंगवळणी पडला आहे, असे म्हणता येते.

कालच्या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याला 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्य म्हणजे संधी आणि स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, असे साने गुरुजी म्हणत असत. म्हणजे ती संधी सर्वांना मिळायला हवी आणि त्या जबाबदारीचे भान सर्वांना यायला हवे. त्या अर्थाने विचार केला तर खरे स्वातंत्र्य अद्याप आलेले नाही. आणि केवळ स्वातंत्र्य नको, स्वराज्य यायला हवे, असे गांधीजी म्हणत असत. तो पल्ला तर अद्याप खूपच दूर आहे. म्हणजे स्वातंत्र्य व स्वराज्य या कल्पनांचे मूळ अर्थ लक्षात घेतले, तर त्या ‘आदर्श’ वा ‘स्वप्न’ वाटतात. आणि आदर्शांचा व भव्यदिव्य स्वप्नांचा प्रवास समाजाला, देशाला व जगालाही शतकानुशतके चालू ठेवावा लागतो. त्या तुलनेत दशकांचा कालावधी बराच लहान मानावा लागतो आणि म्हणूनच सात दशकांच्या स्वातंत्र्योत्तर भारतात काय घडले आणि काय घडले नाही, याचा विचार करताना अतिउत्साही राहून किंवा अतिनिराशा बाळगून चालणार नाही.

आताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर, मागील 70 वर्षांत आपल्या देशाने काय कमावले, काय गमावले किंवा देशात काय व किती इष्ट-अनिष्ट घडले याबाबत बरीच मांडणी झालेली आहे. व्यक्ती, संस्था, संघटना या स्तरांवर ती झाली आहे. तशीच विविध घटकांच्याकडून झाली आहे आणि विविध दृष्टिकोनांतूनही झालेली आहे.

आता यापुढे अधिक लक्ष केंद्रित करायला हवे, आज आपल्या देशासमोर आव्हाने कोणती आहेत आणि संधी कोणत्या आहेत, यावर! आव्हाने आणि संधी हातात हात घालूनच येत असतात. म्हणून आपापल्या कार्यक्षेत्रात समस्या कोणत्या आहेत, आणि त्या सोडवण्याचा मार्ग कोणता आहे, या चौकटीत विचार करावा लागतो. अर्थातच, असा विचार भिन्नभिन्न दिशांनी करता येतो. पण सर्व क्षेत्रांना लागू होईल, असाही विचार करता येईल. तसा विचार एका प्रश्नावर करून पाहू. आपल्या देशासमोरील आजची सर्वांत मोठी समस्या कोणती?   

वरील प्रश्न ज्याने-त्याने स्वत:ला व आपापल्या आप्तस्वकीयांना, मित्र-सहकाऱ्यांना विचारून पहावा. साधारणत: आठ-दहा वेगवेगळी उत्तरे येतील. एक शक्यता ही आहे की, पाकिस्तान आणि पर्यायाने काश्मीर प्रश्न ही आपल्या देशासमोरील सर्वांत मोठी समस्या आहे, असे उत्तर येईल. अर्थातच, पाकिस्तान व काश्मीर ही मोठी समस्या आहे, पण सर्वांत मोठी म्हणता येईल का? राजकीय-सामाजिक बाबतीत विशेष जागरूक असणारा वर्ग त्या संदर्भातील बातम्या-वृत्त यामुळे त्याविषयी विचार-चर्चा करीत असतो, पण अन्य लोकांसाठी तो विषय क्वचितच चर्चेचा बनतो. सीमेवर लढणारे जवान ज्या गावातील आहेत, तिथे तो विषय जिव्हाळ्याचा बनतो. भारत-पाक सीमेजवळील प्रदेशातील जनता यांच्यासाठी ती समस्या सर्वांत मोठी असते, पण उर्वरित भारतासाठी तेवढी मोठी नसते.

दहशतवाद ही या देशासमोरील सर्वांत मोठी समस्या आहे, असे एक उत्तर मिळू शकते. परंतु दहशतवादाच्या सर्व लहान- मोठ्या प्रकारांचा विचार केला तरी लक्षात येते ते हेच की, देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत फारच कमी लोकांना दहशतवादाची झळ पोहोचते. म्हणजे ती समस्या मोठी व महत्त्वाची आहे, पण ‘सर्वांत मोठी’ म्हणता येत नाही.

भ्रष्टाचार ही देशासमोरील सर्वांत मोठी समस्या आहे, असे उत्तर बऱ्याच लोकांकडून येऊ शकेल. कारण भ्रष्टाचार सर्वत्र आहे आणि प्रत्येकाला त्याची झळ कमी-अधिक प्रमाणात बसते. परंतु बहुतांश वेळा लोक स्वेच्छेने भ्रष्टाचारात सामील होतात, भ्रष्टाचार करणाऱ्यांचे त्यांना कौतुक वाटते आणि तो रोखण्यासाठी प्रयत्न करताना खूप कमी लोक दिसतात. म्हणजे भ्रष्टाचाराचा अंगिकार इच्छेने वा अनिच्छेने केल्यामुळे तो आपल्या समाजाच्या व देशाच्याही अंगवळणी पडला आहे, असे म्हणता येते. अर्थातच, भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येतात तेव्हा त्या व्यक्तीची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते आणि राजवटीही बदलल्या जातात किंवा कोसळतात. परंतु तरीही, भ्रष्टाचार  देशात खूप आहे म्हणून काही लोक चिंताग्रस्त बनून वावरतात असे दिसत नाही. त्यामुळेच, भ्रष्टाचार ही खूप मोठी समस्या आहे, पण ‘सर्वांत मोठी’ म्हणता येईल का? दुमत होऊ शकते.

धर्मांधता व जातीयता, ही आपल्या देशासमोरची मोठी समस्या आहे. विशेषत: दलित-मुस्लिम या समाजघटकांना या समस्येचा सामना अधिक तीव्रतेने व अधिक काळ करावा लागतो. परंतु उर्वरित धर्म व जाती समूहातील लोकांना त्या समस्येची झळ फारशी पोहोचत नाही. उलट उर्वरित लोकसमूह जातीयता व धर्मांधता ही समस्या जतन करण्यात आनंद मानतात, त्यातच स्वत:चे अहंकार किंवा हितसंबंध जोपासतात. त्यामुळे जातीयता व धर्मांधता ही खूप मोठी समस्या आहे, परंतु संपूर्ण देशाला ती ‘सर्वांत मोठी’ वाटेल का? शक्यता कमीच आहे.

स्त्री-पुरुष विषमता ही या देशासमोरील सर्वांत मोठी समस्या आहे, असे मत बऱ्याच जास्त लोकांचे असू शकते. कारण प्रत्येक घराला व प्रत्येक व्यक्तीला या समस्येचा जाच कमी-अधिक प्रमाणात सहन करावा लागलेला असतो. परंतु स्त्री-पुरुष समता हवी आहे, अशी मागणी करणारा आणि त्यासाठी लढणारा समूह तुलनेने खूपच कमी असतो. एवढेच नाही तर त्या समस्येची जाणीवच अद्याप झालेली नाही, असा समूह खूप मोठा आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष विषमता ही आपल्या देशासमोरील सर्वांत मोठी समस्या आहे, असे चित्र अद्याप तरी सर्वमान्य झालेले दिसत नाही.

काही लोकांकडून ‘सर्वांत मोठी समस्या कोणती?’ या प्रश्नाच्या उत्तरादाखल आर्थिक विषमता, गरिबी, दारिद्य्र किंवा बेरोजगारी हे शब्दप्रयोग पुढे केले जातील. विषमता- गरिबी-बेरोजगारी निर्माण करण्यासाठी व टिकविण्यासाठी मतलबी समाजघटक आणि व्यवस्थेतील प्रस्थापित वर्ग सतत प्रयत्नशील असतो हे खरेच आहे. परंतु हेही कटुसत्य आहे की, त्या प्रक्रियेत भरडले जाणारे अनेक लोक त्याबाबत बेफिकिरी, निष्काळजीपणा दाखवणारे असतात. आणि त्यातील बरेच लोक त्यांचे वर्गांतर झाल्यावर पूर्वप्रस्थापित व गर्भमतलबी वर्गाप्रमाणेच वागू लागतात, त्यांच्या सर्व अवगुणांचा स्वीकार आनंदाने करू लागतात. त्यामुळे गरिबी, दारिद्य्र, आर्थिक विषमता या देशासमोरील मोठ्या समस्या आहेत, पण ‘सर्वांत मोठ्या’ असे म्हणता येत नाही. त्यासाठी कारणीभूत असलेल्या सर्वांना आणि त्यात भरडल्या जाणाऱ्या कित्येकांना तसे वाटत नाही.

शेतीची समस्या आजच्या भारतातील सर्वांत मोठी आहे, असे म्हणणारे लोक आता वाढत आहेत. वर्षानुवर्षे सत्ताधाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष, वाढती लोकसंख्या व घटती जमीन यांसह इतर अनेक कारणे आणि अस्मानी संकटाची नेहमीच टांगती तलवार, यामुळे ‘शेती’ ही समस्या विदारक चित्र दाखवते आहे. परंतु शेतीबाह्य घटकांना त्या समस्येची तीव्रता तितकीशी जाणवत नाही. शेतीशी कधीही संबंध न आलेल्यांना आणि कधी काळी संबंध होता, पण आता राहिलेला नाही त्यांनाही ‘शेती’ ही मोठी समस्या वाटते, पण सर्वांत मोठी नाही.

आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही समस्यांना ‘सर्वांत मोठी’ असे म्हणणारे लोक पुढे येतील. परंतु या दोन्ही स्तरांवर वर्षानुवर्षे सुविधा वाढतच आहेत, आणि फार मोठा समूह त्यांचा लाभ घेत आहे. अद्याप प्रचंड मोठा वर्ग त्या सुविधांपासून वंचित आहे, हे उघड आहे आणि त्या दोन्ही क्षेत्रात अपप्रवृत्तींनी किती धुमाकूळ घातला आहे, याची रसभरित वर्णने आपण रोज ऐकत-वाचत असतो. परंतु या दोनही क्षेत्रांतील प्रगतीमुळे आणि वाढत्या संधींमुळे बरेच काही चांगले घडताना दिसते आहे, आशादायक म्हणावे असेही खूप काही मार्गावर आहे. त्यामुळे ‘सर्वांत मोठी समस्या’ म्हणताना शिक्षण व आरोग्य यांना निर्विवाद स्थान मिळणार नाही.

वरीलप्रमाणेच त्रोटक विवेचन, भाषा, प्रांत, पर्यावरण, पाणी अशा काही समस्यांचेही करता येईल. परंतु ‘सर्वांत मोठी समस्या’ असे त्यांच्याबाबत म्हणता येणार नाही. अर्थातच वरील प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती अधिक व्यापक व खोलवर मांडणी करून, तीच कशी देशासमोरील सर्वांत मोठी समस्या आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करू शकेल. असो.

आता दुसऱ्या बाजूने विचार करू, म्हणजे तुमच्या क्षेत्रातील प्रमुख तीन-चार समस्या सांगा असा प्रश्न विचारून पाहू. सर्व क्षेत्रांतील लोकांना रोज सतावणारी आणि तरीही सर्वांत मोठी न वाटणारी एक समस्या पुढे येईल, तिचे नाव ‘कुशल मनुष्यबळाचा अभाव.’ ही समस्या प्रत्येक क्षेत्रातील उच्चपदस्थांच्या यादीमध्ये तिसऱ्या-चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर आहे.

अगदी तळपासून सुरुवात करा. शेतकऱ्यांना विचारा, तुमच्यासमोरील मोठ्या समस्या काय आहेत? उत्तर येईल पाऊस व पाणी वेळेवर आणि पुरेसे येत नाही, शेतमालाला भाव नाहीत, कर्ज वा भांडवल मिळत नाही. परंतु शेतकरी पुढची मोठी समस्या सांगेल, शेतात कामाला चांगली माणसे मिळत नाहीत; म्हणजे कुशल मनुष्यबळाचा अभाव.  लहान-मोठ्या दुकानदाराला किंवा हॉटेल-मालकाला विचारा, ‘तुमच्या समस्या काय आहेत?’ उत्तर येईल- मोक्याची जागा नाही, गुंतवायला भांडवल नाही. पण पुढे ते सांगतील, कामाला चांगली माणसे नाहीत; म्हणजे कुक, वेटर, हरकामे मिळत नाहीत.

कोणताही उद्योग-व्यापार करणाऱ्या जरा उच्चपदस्थाला विचारा, तुमच्या समस्या काय आहेत? उत्तर येईल : जागा, भांडवल, लालफितीचा कारभार, गुंडाचे वा राजकीय लोकांचे हप्ते. परंतु पुढची मोठी समस्या ‘कुशल मनुष्य पुरेसे मिळत नाही’ हीच ऐकावी लागते. शिक्षणक्षेत्रातील अधिकाऱ्यांना व मुख्याध्यापक-प्राचार्य यांना विचारा. ते समस्या सांगतील : संस्थाचालकांचा जाच, विद्यार्थीपालक यांची अनास्था, अभ्यासक्रमातील क्लिष्टता, सरकारी धोरणांमधील धरसोडपणा. मात्र पुढची मोठी समस्या ‘चांगले शिक्षक नाहीत’ हीच ऐकायला मिळते. आणि संस्थाचालकांना विचारले तर ते इतर दोन-तीन मोठ्या समस्या सांगून म्हणतील, चांगले शिक्षक- प्राध्यापक-प्राचार्य मिळत नाहीत हो. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारले तर राजकीय हस्तक्षेप, प्रसारमाध्यमांचा दबाव किंवा ब्लॅकमेल करण्याची वृत्ती अशा समस्या सांगून झाल्यावर म्हणतील, ‘आमच्या हाताशी चांगले सहकारी-अधिकारी असतील तर खूप काही करता येईल.’ प्रसारमाध्यमांच्या चालकांना म्हणजे मालक, प्रकाशक, संपादक यांना विचारा. इतरांप्रमाणेच जागा, भांडवल अशा दोन-तीन समस्या सांगून ते म्हणतील, ‘चांगले पत्रकार, लेखक, अनुवादक, प्रुफे तपासणारे यांचा अभाव ही आहे मोठी समस्या.’

एवढेच कशाला स्वेच्छेने काम स्वीकारले जाते त्या राजकीय-सामाजिक क्षेत्राची स्थिती काय आहे? सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था-संघटनांच्या प्रमुखांना विचारा, तुमच्या मोठ्या समस्या? त्यातील बहुतांश लोक सांगतील, पहिल्या क्रमांकावरची समस्या आहे कार्यक्षम व सचोटीच्या कार्यकर्त्यांचा तुटवडा. सर्व छोटे-मोठे राजकीय नेते म्हणतील, ज्यांच्यावर विश्वास टाकून काम सोपवावे असे कार्यकर्तेच मिळत नाहीत.

अशाच प्रकारे एक-एक क्षेत्र पादाक्रांत करीत थेट माननीय मुख्यमंत्र्यापर्यंत जा. ते म्हणतील, हायकमांडचा त्रास आहे, पक्षांतर्गत विरोधक आहेत, प्रसारमाध्यमे नारदाप्रमाणे वागतात, अर्थकारण तकलादू आणि मागण्या करणारे भरपूर. या आहेत आमच्यासमोरील मोठ्या समस्या. ‘आणखी पुढे’, असे विचारले तर ते हळूच कानात सांगतील (ऑफ द रेकॉर्ड म्हणतील), मंत्रिमंडळात घेण्यासाठी हुशार व प्रामाजिक माणसे नाहीत हो. सर्व राज्यांच्या सर्व पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना विचारा. उत्तर हेच येईल.

एवढेच कशाला, आज सर्वशक्तिमान मानले जातात त्या आपल्या पंतप्रधानांना विचारा. ते आधी ‘समस्याच नाही’ म्हणतील. पण नंतर प्रेमाने व विश्वासात घेऊन विचारले तर काश्मीर, चीन, अर्थकारण, भ्रष्टाचार, प्रसारमाध्यमातील टीका करणारे लोक, स्वकीयांच्या उपद्रवी संघटना, पुरोगामी लेखक-कलावंत यांचे उद्रेक अशी छोटीशी यादी देतील आणि ‘या किरकोळ समस्या आहेत,’ असे म्हणतील. पण नंतर खडबडून जागे झाल्यासारखे म्हणतील, ‘या सर्वांपेक्षा माझी मोठी समस्या आहे, चांगले मंत्री आणि प्रत्येक खात्याला चांगले सचिव मिळत नाहीत.’ खरेच आहे ना. मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक त्यांना तपासावे लागते, मंत्री लोक आचारसंहितेचे पालन करताहेत की नाही यासाठी पाळत ठेवावी लागते. दोन-अडीच महिन्यांपूर्वी त्यांना सचिवांच्या बैठकीतून रागाने उठून जावे लागले, का तर वरिष्ठ आयएएस अधिकारी असलेले सचिव होमवर्क न करता आले होते (सहा महिन्यांपूर्वीचेच प्रस्ताव नव्या वेष्टनात घेऊन आले होते.) आणि कालपरवा पंतप्रधानांनी आपल्या खासदारांनाच दम भरला, संसदेत उपस्थित राहिला नाहीत तर 2019 मध्ये पाहून घेईन. म्हणजे पुढचे दीड वर्ष मी काहीच करू शकत नाही, अशी ती हतबलतेची भावना आहे.

तर अशी ही प्रत्येक क्षेत्रातील तिसऱ्या-चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावरची समस्या : कुशल मनुष्यबळाचा अभाव. म्हणजे विश्वासार्हता, गुणवता व कार्यक्षमता यांचा संयोग झालेली कुशलता, ही आहे आजच्या आपल्या सार्वजनिक जीवनातील मोठी समस्या! प्रत्येक लहान- मोठ्या ठिकाणी ती समस्या आहे (तिला मसावि म्हणता येईल), तिच्यामुळे सर्वांचेच गाडे अडते किंवा घोडे अडखळते. त्यामुळे कार्याची गती मंदावते, गुणवत्ता किंवा दर्जा अपेक्षेइतका उंचावता येत नाही. परिणामी राष्ट्राची हानी होते. म्हणून आम्हाला वाटते की, आपला देश स्वातंत्र्याची 70 वर्षे पूर्ण करत असताना अधिक गतीने वाटचाल करण्याच्या मार्गातील सर्वांत मोठी समस्या आहे, कुशल मनुष्यबळाचा अभाव. असो. या समस्येची कारणमीमांसा आणि तिच्या निराकरणाची दिशा ‘शिक्षण’क्षेत्रातून जाते, पण त्याविषयी पुन्हा केव्हातरी... 

Tags: कुशल मनुष्यबळ स्वातंत्र्य दिन देशासमोरील सर्वांत मोठी समस्या कोणती? संपादकीय विनोद शिरसाठ vinod shirsath Lack of skilled Human Resource Deshasamoril Sarvat mothi samasya konati? 70th anniversary of indian independence Sampadakiya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात