Diwali_4 ‘आप’ के लिए सब थे बेकरार
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

त्या काळात प्रशासन व राजकारण त्यांनी जवळून पाहिले होते. आणि म्हणूनच ते बदलण्याच्या महत्त्वाकांक्षेने पेटून उठत, त्यांनी अण्णा हजारेंना घेऊन आंदोलन उभे केले होते. त्या आंदोलनाला त्यावेळची देशभरातील अस्वस्थता आणि त्यावेळचे केंद्र सरकार व काँग्रेस पक्ष यांचे विस्कटलेपण प्रामुख्याने कारणीभूत ठरले होते. मात्र दुसरी बाजू अशी होती की, आधीच्या दशकभरात केजरीवालांनी दिल्लीत जी पायाभरणी केली होती त्यामुळेच त्या आंदोलनाला नीट उभे राहता आले होते. थोडक्यात काय तर केजरीवालांनी आधी दहा वर्षे दिल्लीच्या जमिनीची मशागत केली, नंतरची दोन-तीन वर्षे पेरणी केली आणि  त्यामुळेच मागील तिन्ही निवडणुका जिंकता आल्या आहेत. म्हाणजे हे यश अनपेक्षित नाही. यामागे बरेच कष्ट आहेत, बरीच किंमत चुकवलेली आहे. त्यासाठी केजरीवालांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला व कार्यशैलीला बरीच मुरड घातली आहे.

गेल्या आठवड्यात दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने (आप) पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवून सत्ता प्राप्त केली. 14 फेब्रुवारी 2014 ते 14 फेब्रुवारी 2020 या सहा वर्षांच्या काळात दिल्लीत तीन विधानसभा निवडणुका झाल्या आणि तिन्ही वेळा आप सत्तेवर आला. पहिल्यांदा त्यांना सत्ता मिळवता आली ती काँग्रेसच्या सहा सदस्यांच्या पाठिंब्यावर. तेव्हा अवघ्या दोन महिन्यात त्यांनी आपल्या आक्रस्तळ्या वर्तनाने ती सत्ता सोडली. अर्थात त्यानंतर सार्वत्रिक लोकसभा निवडणुका होत्या आणि ‘आप’ला देशभर आपले उमेदवार उभे करायचे होते, केजरीवालांना नरेंद्र मोदींच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवायची होती, हे त्यामागील खरे कारण होते.

मात्र त्या निवडणुकीत ‘आप’च्या भ्रमाचे भोपळे फुटले आणि मग वास्तवाचे भान आले. इतके की त्यांनी त्यानंतर आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुका ‘पाच साल केजरीवाल’ या मुख्य घोषणेच्या आधारावर लढवल्या. दोन महिन्यांत सत्तेतून बाहेर पडण्यात चूक झाली, याची स्पष्ट कबुली दिली आणि काही झाले तरी पुढील पाच वर्षे दिल्लीची सत्ता सोडणार नाही असे ठोस आश्वासन दिले, मात्र त्यासाठी दिल्लीच्या जनतेने स्पष्ट बहुमत द्यावे असे आवाहनही केले. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून, फेब्रुवारी 2015 च्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी म्हणावे असे बहुमत (70 पैकी 67 जागा) जनतेने ‘आप’ला दिले आणि मग केजरीवाल व त्यांच्या पक्षाने खरोखरच पाच वर्षे पूर्ण लक्ष केंद्रित करून दिल्ली राज्य चालवले. त्याचीच पावती म्हणून आताही दिल्लीच्या जनतेने जवळपास पूर्वीइतकेच बहुमत (70 पैकी 63 जागा) ‘आप’ला दिले आहे. यासाठी केजरीवालांचे आणि दिल्लीकर जनतेचेही अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.

विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी त्यांनी मिळवलेल्या विक्रमी विजयाचा आनंद भाजप सोडून देशातील सर्व पक्षांना (भाजपच्या मित्रपक्षांनाही) झाला होता. याचे कारण त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवून नरेंद्र मोदीप्रणित भाजप सरकार केंद्रिय सत्तेवर आले होते आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व पक्ष नामोहरम झाले होते. एवढेच नाही तर पुढील काळात राज्याराज्यांत भाजपची विजयी घोडदौड चालू राहणार, अशी भीती सर्वत्र निर्माण झाली होती. अशा पार्श्वभूमीवर ‘आप’ने तेव्हा भाजपचा अश्व रोखला होता.

आताही असेच झाले आहे. मागील पाच वर्षे देशभरात भाजपचा अश्व चौखूर उधळत राहिला, त्याने ठिकठिकाणचे गड उद्‌ध्वस्त केले होते, त्यामुळे काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष गर्भगळित झाले आहेत. एवढेच नाही तर चौथा आणि पाचवा स्तंभ (अनुक्रमे माध्यमे आणि सामाजिक संस्था/संघटना) निस्तेज भासत आहेत. प्रशासनातील उच्चपदस्थही दबावाखाली वावरत आहेत. आणि न्यायसंस्थेकडून मिळणाऱ्या दिलाशाबाबत अधूनमधून शंका उपस्थित होत आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम, संपूर्ण देशभरातील विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आग्रही असलेल्या वर्गाला विशेष काळजी वाटते आहे. अर्थकारण व उद्योग क्षेत्रांमध्येही काहीसे चिंतेचे वातावरण आहेच.

आणि या सर्वांवर कडी म्हणून, दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. पंतप्रधान, गृहमंत्री, अन्य अनेक मंत्री व खासदार आणि राज्याराज्यांतील नेते व कार्यकर्ते इतकी सारी फौज या निवडणुकीत भाजपने उतरवली होती. हेही कमी म्हणून की काय, सर्व प्रकारचा अपप्रचार करून व विखार पसरवून निवडणुकीचे वातावरण कलुषित केले होते. आणि म्हणून, संपूर्ण देशातील सर्व प्रमुख समाजघटकांचे लक्ष्य या निवडणुकीकडे लागले होते.

यातील बहुतांश घटकांना केजरीवाल व ‘आप’ यांच्याबाबत प्रेम नाही, पण भाजपविषयी मात्र राग वा भय आहे. किंबहुना यातील सर्वच घटकांनी पाच-सहा वर्षांपूर्वी केजरीवाल व आप यांच्यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कडवी टीका केलेली आहे. तरीही ते सर्वजण केजरीवाल व आप यांचा जय व्हावा अशी प्रार्थना मनोमन करीत होते. अर्थातच, याचे एक कारण गेल्या पाच वर्षांत केजरीवाल व त्यांचे नेते क्रमाक्रमाने सौम्य होत गेले; मागील काही महिन्यांत तर भाजपच्या उचकवण्याच्या डावपेचांना बळी न पडता चिकाटीने व धैर्याने पाय रोवून प्रचार करत राहिले; स्वत:च्या सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीवरच प्रामुख्याने बोलत राहिलेे आणि पुढील पाच वर्षांच्या विकासकामांबाबत वाजवी आश्वासने देत होते. मात्र त्यांचा विजय व्हावा असे अन्य घटकांना वाटत होते, याचे खरे कारण दुसरेच होते. ते असे की, केंद्र सरकार व भाजप यांना रोखले जाणे आवश्यक आहे, याबाबत सर्वसाधारण सहमती त्या सर्व घटकांमध्ये आहे. आणि म्हणून ‘आप’च्या विजयासाठी ते सर्व बेचैन होते. (आप के लिए सब थे बेकरार) आता ती बेचैनी संपली आहे, सुटकेचा म्हणावा असा श्वास अनेकांनी घेतला आहे.

मात्र यापैकी काहींना आता ‘आप’च्या अशा विजयाची पुनरावृत्ती अन्यत्र होऊ शकेल का, अशी स्वप्ने पडू लागली आहेत. आप आए बहार आयी अशी काहीशी ती अवस्था असेल तर मात्र त्यांचा भ्रमनिरास ठरलेला आहे. याचे कारण ‘आप’चा विजय किती मर्यादित भूभागातला आहे, एवढेच नाही. म्हणजे दिल्ली राज्य हे मुंबईसारख्या मोठ्या महापालिकेएवढे आहे हे खरे असले तरी, त्याहून अधिक महत्त्वाचा मुद्दा ‘आप’च्या संदर्भात लक्षात घेतला पाहिजे; तो असा की, केजरीवाल यांनी दिल्लीच्या भूमीची मशागत मागील वीस वर्षे केलेली आहे (तशी स्थिती त्यांच्याबाबत अन्यत्र कुठेही नाही.) 2012 नंतरची दोन-अडीच वर्षे अण्णा हजारेंप्रणित आंदोलनामुळे केजरीवाल खऱ्या अर्थाने देशभर पोहोचले आणि त्याचवेळी ‘आप’ची बीजपेरणी झाली हे खरे. मात्र त्याच्याही दहा वर्षे आधी इ.स.2000 पासून  केजरीवाल यांनी ‘परिवर्तन’ या संस्थेच्या माध्यमातून दिल्ली शहर वा राज्य जवळपास पिंजून काढले होते.

त्या काळात प्रशासन व राजकारण त्यांनी जवळून पाहिले होते. आणि म्हणूनच ते बदलण्याच्या महत्त्वाकांक्षेने पेटून उठत, त्यांनी अण्णा हजारेंना घेऊन आंदोलन उभे केले होते. त्या आंदोलनाला त्यावेळची देशभरातील अस्वस्थता आणि त्यावेळचे केंद्र सरकार व काँग्रेस पक्ष यांचे विस्कटलेपण प्रामुख्याने कारणीभूत ठरले होते. मात्र दुसरी बाजू अशी होती की, आधीच्या दशकभरात केजरीवालांनी दिल्लीत जी पायाभरणी केली होती त्यामुळेच त्या आंदोलनाला नीट उभे राहता आले होते. थोडक्यात काय तर केजरीवालांनी आधी दहा वर्षे दिल्लीच्या जमिनीची मशागत केली, नंतरची दोन-तीन वर्षे पेरणी केली आणि  त्यामुळेच मागील तिन्ही निवडणुका जिंकता आल्या आहेत. म्हाणजे हे यश अनपेक्षित नाही. यामागे बरेच कष्ट आहेत, बरीच किंमत चुकवलेली आहे. त्यासाठी केजरीवालांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला व कार्यशैलीला बरीच मुरड घातली आहे.

क्विक लर्नर असल्यानेच केजरीवाल असे करू शकले. त्यांच्यात किती परिवर्तन झाले हे पाहायचे असेल तर, मागील आठ वर्षांतील त्यांच्या भूमिकांवर ओझरता दृष्टिक्षेप टाकला पाहिजे. आक्रस्तळेपणाकडून सौम्यतेकडे आणि संघर्षाकडून सामंजस्याकडे असा त्यांचा प्रवास चालू असल्याचे दिसते. ‘मुझे चाहिए पुरा स्वातंत्र्य’ किंवा ‘मुझे चाहिए स्वराज’ अशी वाक्ये त्यांनी गिळून टाकली आहेत, ‘लोकपाल’ या संकल्पनेचे विस्मरण होऊ दिले आहे. मुख्य म्हणजे प्राप्त परिस्थितीत, आहे त्या साधसंपत्तीसह त्यातल्या त्यात चांगले प्रशासन देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. याचप्रकारे त्यांची वाटचाल होणार असेल तर ती निश्चितच दीर्घकालीन असेल, त्यासाठी आमच्या शुभेच्छा! पाच वर्षांपूर्ची याच जागेवर लिहिलेल्या लेखातही (हम ‘आप’के है कौन? : साधना 21 फेब्रुवारी 2015) हीच भूमिका आम्ही मांडली होती!

Tags: विनोद शिरसाठ दिल्ली निवडणूक आप अरविंद केजरीवाल vinod shirsath sampadakiy editorial delhi elections aao arvind kejariwal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात