अवचटांच्या फक्त ‘माणसं!’नंच नाही तर इतरही पुस्तकांनी गरीब, शोषित समाजाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्यानंतर त्यांनी वेश्या, देवदासी, यंत्रमाग कामगार, थिएटरमधले डोअरकीपर्स, हळदीच्या पेवात उतरून धोकादायक काम करणारे कामगार... अशा बऱ्याच विषयांवर लिहिलं. काही काही प्रश्नांचा सांगोपांग अभ्यास करून ‘प्रश्न आणि प्रश्न’ हे पुस्तक लिहिलं. याच पद्धतीने त्यांनी दलित अत्त्याचाराबाबत ‘कोंडमारा’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या ‘धार्मिक’ आणि ‘संभ्रम’ या पुस्तकांतील लेखांनी महाराष्ट्रातल्या बुवाबाजीचा बुरखा फाडला. अनेक स्त्री-पुरुषांना फसवणाऱ्या व त्यांचं शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांविरुद्ध लढा पुकारला गेला. अवचटांच्या या लेखनापासून प्रेरणा घेऊन पुढच्या दोन पिढ्यांतले किती तरी पत्रकार या पद्धतीचे रिपोर्टाज लिहू लागले. अवचटांचा जाणवण्याजोगा ठसा या साऱ्या लेखक- पत्रकारांवर आहे.
1944 ला पुणे जिल्ह्यातील ओतुर या खेड्यात जन्मलेल्या अनिल अवचट यांनी 1970 च्या दशकात लेखनाला सुरुवात केली, आणि ऐन तारुण्यात (वयाच्या पंचविशीच्या आत) साधना साप्ताहिकाचं कार्यकारी संपादकपदही भूषवलं. त्या काळात त्यांनी 1972च्या दुष्काळावर काढलेला साधनेचा विशेषांक, त्यातील भेदक उपहास, ब्लॅक ह्यूमर आजही अनेक वाचकांच्या लक्षात आहे. ‘युक्रांद’च्या चळवळीची पार्श्वभूमी त्यांना सामाजिक विषयांवर लेखन करण्यासाठी उपयोगी पडली. समाजातील उपेक्षित, दलित, सर्वहारा यांच्याविषयी असणारा अपरंपार जिव्हाळा, कळकळ व प्रेम आणि त्यांच्या जोडीला असणारा भेदक व धारदार विनोद हे त्यांच्या सुरुवातीच्या लेखनाचं वैशिष्ट्य मानता येईल. त्यातून वाचकांना अस्वस्थ करणाऱ्या लेखनाची सुरुवात झाली.
सुरुवातीच्या ‘छेद’, ‘वेध’ या लेखमालांमधून अवचट इथल्या शोषित जनतेचे प्रतिनिधी बनून समाजातल्या दोषांवर अचूक बोट ठेवतात. ‘पूर्णिया’ या पुस्तकात तरुण आणि संवेदनाक्षम अवचट दरिद्री बिहारची सैर घडवतात. साहित्य म्हणजे ‘मध्यमवर्गीयांनी मध्यमवर्गीय लोकांच्यासाठी लिहिलेला काही तरी ललित लोलुत मजकूर’ असा जो समज पूर्वी होता, तो अवचटांनी साफ पुसून काढला, आणि साहित्याचा सांधा जनसामान्याच्या जीवनाशी जोडण्याचा मनापासून प्रयत्न केला. ज्या माणसांबद्दल ते लिहीत होते, ती माणसं कोण होती? तर आपल्याच आजूबाजूला दिसणारी आणि आपापलं जिणं जगणारी सामान्य माणसं होती. पण त्यांची ‘माणूस’ म्हणून दखल घ्यायची असते, हेच कुणाच्या गावी नव्हते. त्यांच्याकडे पाहण्यासाठी ‘सहवेदने’ची नजर अवचटांनी मध्यमवर्गीय वाचकांना दिली.
ते अगदी साध्या, सोप्या शैलीत वाचकांचं लक्ष समाजातल्या या उपेक्षित घटकांकडे वेधत होते. आपण ‘ललित साहित्य लिहितो आहोत’ असा त्यांचा अजिबात दावा नव्हता. आपण लिहितो ते ‘रिपोर्टाज’ आहेत आणि ते लिहीत राहणं ही काळाची गरज आहे, याचं पुरेपूर भान त्यांना होतं. आणि एक ‘मिशन’ म्हणूनच ते लिहीत होते. मात्र आपण समाजशास्त्रीय काहीतरी लेखन करतो आहोत, असा त्यांचा बिलकुल समज नव्हता. त्यांनी लिहिलेल्या ‘माणसं!’ या पुस्तकाच्या आजवर अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत. ‘मौजे’च्या दिवाळी अंकांतून लिहिलेले हे लेख आहेत. त्यात दुष्काळात गाव सोडून शहरांत आलेले आणि जगणारे लोक आहेत. त्यांच्या आयुष्याची फरफट अवचट आपल्यापर्यंत पोचवतात.
त्यांचा हमालांवरचा लेखही असाच आहे. अलीकडेच ‘माणसं या पुस्तकाविषयी बोलताना अवचट लिहितात, ‘...हमालांमधील लक्ष्मणराव सुद्रिक हे ज्येष्ठ हमाल दवाखान्यात येऊन बसायचे. त्यांच्या एका वाक्याने मला असंच हलवलं. म्हणाले, ‘‘या शहरात कुठलीही अशी गोष्ट नाही की जिला हमालाची पाठ लागलेली नाही.’’ मी म्हटलं, ‘‘असं कसं?’’ ते म्हणाले, ‘‘तुमच्या पोटातलं अन्न... ती धान्याची पोती आम्हीच उतरवलीत. तुमच्या पायाखालची फरशी, या बिल्डिंगचं सिमेंट, तुमच्या दवाखान्यातल्या औषधांचे बॉक्स कुणी उतरवलेत, आम्हीच ना?’’ या वाक्याने मला हादरवलं. हमाल पंधरा एक वर्षंच कामं करतात, पण बंदिस्त गुदामात-धुरळ्यात काम करून त्यांना टीबीसारखे रोग जडतात.. वगैरे मी ऐकत होतोच. पण सुद्रिकांच्या त्या वाक्याने मला एक उलगडा झाला. उलगडा असा, की या सगळ्याचे आरोपी, गुन्हेगार नंबर एक आपणच आहोत. आपण त्यांच्या दु:खांची जबाबदारी टाळूच शकत नाही. त्या दृष्टीने मला लेखाची थीम सापडली. मनात आलं, हा लेख म्हणजे हमालांच्या परिस्थितीचं नुसतं वर्णन नसणार, तर त्यांच्या दु:खाची जबाबदारीही आपणा सर्वांची, हे तो मान्य करणार. त्यांच्याविषयी कृतज्ञ राहणार... मिरची हमाल, सिमेंट हमाल, जड ओझी उचलणारे हमाल... प्रत्येकाची समस्या वेगळी, दुःख वेगळं! ...त्या वेळी मी शिबिरात सर्वत्र बोलताना एक वाक्य बोलायचो, ‘‘ज्यांच्या डोक्यावर छप्पर आहे, ज्यांच्या घरात दोन वेळ अन्न शिजतं, ज्यांना मुलं शाळेत पाठवता येतात त्यांनी समाजाकडे आता काही मागू नये. कारण हेही नसलेली किती तरी माणसं जगत आहेत. त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे.’’ या पाहणीतून आणि लेख लिहिल्यावर हे समजलं.
लेख लिहिणं ही मलाच शहाणं करण्याची एक प्रक्रिया होती. माझ्या भोवतीच्या जगाकडे मी वेगळ्या दृष्टीने पाहू लागलो...’ ही शहाणी करून सोडणारी प्रक्रिया अवचटांच्या लेखनानं वाचकांनाही अनुभवास येऊ लागली. निपाणीतील विडी कामगारांच्या- विशेषतः स्त्री- कामगारांच्या शोषणाला (आणि त्यातील लैंगिक शोषणालाही) अवचटांनी वाचा फोडली. ते लिहितात, ‘निपाणीवरचा लेख मी ‘पुरोगामी सत्यशोधक’मधे छापला. तो हिंदीमधे भाषांतर करून ‘गांधी मार्ग’मध्ये आला. तिथून तो हिंदीतील दिनमान’मधे पुनर्मुद्रित झाला. हमालांप्रमाणे याही लेखाच्या हजार प्रती काढून निपाणीला पाठवल्या. त्यांचं तिथे वाचन झालं. या विषयावर गावात आतापर्यंत चिडीचूप होतं, पण या लेखामुळे तो विषय ढवळला गेला.
त्यानंतर एका मालकाने एका महिलेवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला, तेव्हा सगळ्या महिलांनी एकत्र येऊन त्या मालकाला चपलेने बडवत एका मैदानात आणलं. मग त्या सुभाष जोशीकडे आल्या. म्हणाल्या, ‘‘सर, आम्हाला तुमच्या युनियनमधे यायचंय.’’ ज्या महिला साधं बोलायला तयार नव्हत्या त्या महिला या प्रसंगाने हजारोंच्या संख्येने युनियनमध्ये आल्या. नंतर तसे अत्याचार स्त्रियांवर कधी झाले नाहीत. कामाच्या वेळा निश्चित झाल्या... असं बरंच काही घडलं.’ अवचटांच्या हमालांवरच्या लेखाची, निपाणीतल्या तंबाखू कामगारांवरील लेखाची चळवळीला अशी थेट मदत झाली.
तशीच मदत ‘माणसं’ या पुस्तकातील भटक्या समाजावरील लेखामुळेही झाली. अवचट याबाबत म्हणतात, ‘...लेख वाचल्यावर लक्ष्मण माने म्हणाला, ‘‘मी त्या जातीत जन्मलो पण आमच्यात एवढ्या जाती आहेत हे मलाही माहीत नव्हतं.’’ नंतर त्याने ‘उपरा’ लिहिलं. भटक्या विमुक्तांची संघटना काढली. लक्ष्मण गायकवाड याने ‘उचल्या’ हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर त्यांची संघटना लढेही देऊ लागली. भटक्या समाजावर मी लेख लिहिला, तेव्हा कुणाचा आधार नव्हता. यावर कुणी लिहिलेलं पुस्तक नव्हतं की ना त्यांच्यात काम करणारं कोणी होतं...’ म्हणजे ही चळवळ उभी राहण्याला नक्कीच अवचटांच्या लेखनाचा हातभार लागला.
अवचटांच्या फक्त ‘माणसं!’नंच नाही तर इतरही पुस्तकांनी गरीब, शोषित समाजाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्यानंतर त्यांनी वेश्या, देवदासी, यंत्रमाग कामगार, थिएटरमधले डोअरकीपर्स, हळदीच्या पेवात उतरून धोकादायक काम करणारे कामगार... अशा बऱ्याच विषयांवर लिहिलं. काही काही प्रश्नांचा सांगोपांग अभ्यास करून ‘प्रश्न आणि प्रश्न’ हे पुस्तक लिहिलं. याच पद्धतीने त्यांनी दलित अत्त्याचाराबाबत ‘कोंडमारा’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या ‘धार्मिक’ आणि ‘संभ्रम’ या पुस्तकांतील लेखांनी महाराष्ट्रातल्या बुवाबाजीचा बुरखा फाडला. अनेक स्त्री-पुरुषांना फसवणाऱ्या व त्यांचं शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांविरुद्ध लढा पुकारला गेला. अवचटांच्या या लेखनापासून प्रेरणा घेऊन पुढच्या दोन पिढ्यांतले किती तरी पत्रकार या पद्धतीचे रिपोर्टाज लिहू लागले. अवचटांचा जाणवण्याजोगा ठसा या साऱ्या लेखक- पत्रकारांवर आहे.
चळवळीला पोषक ठरणाऱ्या ‘माणसं’, ‘पूर्णिया’, ‘छेद’, ‘वेध’, ‘कोंडमारा’, ‘कार्यरत’, ‘धागे उभे आडवे’, ‘प्रश्न आणि प्रश्न’, ‘रिपोर्टिंगचे दिवस’, ‘वाघ्या-मुरळी’, ‘धार्मिक’, ‘संभ्रम’ अशा पुस्तकांचा विचार केला तर अवचट नावाचा लेखक कळतो आणि माणूसही! अशा या लेखक माणसाला महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळतो तेव्हा माझ्या पिढीला विशेष आनंद वाटणे साहजिक आहे.
Tags: जीवनगौरव महाराष्ट्र फाउंडेशन ‘संभ्रम’ ‘धार्मिक’ ‘वाघ्या-मुरळी’ ‘रिपोर्टिंगचे दिवस’ ‘प्रश्न आणि प्रश्न’ ‘धागे उभे आडवे’ ‘कार्यरत’ ‘कोंडमारा’ ‘वेध’ ‘छेद’ ‘पूर्णिया’ ‘माणसं’ रिपोर्ताज साहित्य लेखक आणि माणूस अनिल अवचट mukund taksale editorial sampadakiy weekly sadhana 06 january 2018 sadhana saptahik मुकुंद टाकसाळे संपादकीय साधना साधना साप्ताहिक 06 जानेवारी 2018 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या