डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

अण्णा भाऊंचे स्मरण का करायचे?

असा हा अंक वाचून एवढे तरी निश्चित होईल की, आपण अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे दालन पाहिलेच नाही, असे अनेक चांगल्या वाचकांना वाटेल. बऱ्याच दिवसांपासून मनात आहे, पण या ना त्या कारणाने वाचायचे राहून जाते आहे ते वाचकही लवकर वळतील. पण हे इतके पुरेसे नाही. हे खरे आहे की, साहित्याचे असो वा सामाजिक बदलांचे प्रवाह हळूहळू वाहत राहतात आणि मग व्यापक बनतात. पण हळूहळू म्हणजे तरी किती? आपल्याकडे ती गती लाजीरवाणी म्हणावी इतकी कमी आहे. जे सामाजिक स्थित्यंतर एका पिढीत व्हायला हवे, त्यासाठी चार-चार पिढ्या जाव्या लागतात.

अण्णा भाऊ साठे (1 ऑगस्ट 1920 - 18 जुलै 1969) यांना फक्त 49 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातील अखेरची तीन दशके त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची होती. सांगली जिल्ह्यातील एका लहान खेड्यात व गावकुसाबाहेर ठेवलेल्या समाजात त्यांचा जन्म झाला. त्यांना शालेय शिक्षण मिळाले ते जेमतेम अक्षरओळख होईल इतपतच. वयाच्या अकराव्या वर्षी ते कुटुंबीयांसोबत मुंबईत गेले, चार-पाच वर्षांनी कुटुंबासह गावात परत आले आणि पुन्हा चार-पाच वर्षांनी ते मुंबईत गेले. त्यानंतरची जवळपास तीन दशके मुंबईतच राहिले, पण त्या काळात त्यांचे आपल्या गावाला जाणे-येणे चालूच राहिले. त्यांचे बालपण, कुमारवय आणि तारुण्य या तिन्ही अवस्था बऱ्याच धकाधकीच्या व वेगवान म्हणाव्यात अशा होत्या. अकाली प्रौढत्व येणे हा शब्दप्रयोग त्यांच्याबाबत थिटा म्हणावा लागेल. आपल्या सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे नको तितके भान, नको तितक्या लवकर त्यांना आले आणि राजकीय समज-उमजही फारच लवकर आली. म्हणजे त्यांच्या कारकिर्दीची अखेरची तीन दशके समजून घ्यायची असतील, तर त्यांच्या जडण घडणीची आधीची दोन दशके उकलून बघावी लागतील.

वयाच्या वीस-बावीसपर्यंतच्या कालखंडात म्हणजे बाल आणि तरुणवयात त्यांनी ग्रामीण भाग आणि तेथील उपेक्षित व वंचित समाजघटक पाहिले. मधली कुमारवयातील वर्षे मुंबईत राहिल्यामुळे तिथल्या तळाच्या समाजघटकांचे जीवन पाहिले; खरे तर पाहिले व अनुभवले असे म्हणणे तितकेसे बरोबर नाही. त्या दोन्ही ठिकाणी ते त्या समाजजीवनाचा भाग होते. त्यामुळे त्या समाजाचे सर्व बरे-वाईट हलाहल त्यांनी पचवले. तिथे केवळ दुःख व दैन्य नव्हते, लहान-मोठ्या विद्रोहाच्या ठिणग्याही होत्या. मुद्दा होता- त्यातून भडका उडण्याचा, वणवा लागण्याचा. पण तटबंदी इतकी भक्कम होती की, क्रांतीची मशाल अशी इतक्या सहज पेटणार नव्हती. मात्र अण्णा भाऊ ते स्वप्न पाहात होते. कारण तारुण्यात असतानाच ते कम्युनिस्ट पक्षाच्या संपर्कात आले होते.

अण्णा भाऊंनी कोणते व किती साहित्य लिहिले? तब्बल 32 कादंबऱ्या आणि 20 कथासंग्रह (म्हणजे शे-सव्वाशे कथा) ही माहिती छाती दडपून टाकणारी आहे. त्यात दोनेक डझन पोवाडे, तितकेच लोकनाट्य/तमाशे, त्याहून अधिक लावण्या आणि अन्य किरकोळ लेखन यांचा विचार केला तर कोणीही थक्क व्हावे. शिवाय या सर्वांमधून कोणीही न हाताळलेले विषय आणि कोणाचेही लक्ष गेलेले नाही असे कानाकोपऱ्यातील समाजघटक, त्यांनी शब्दबद्ध केले. त्या सर्वांचा आशय कमालीचा प्रागतिक व क्रांतिकारी आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि कम्युनिस्ट चळवळ यासाठी शाहिरी व कलापथके यांच्याद्वारे त्यांनी निर्माण केलेला झंझावात वेगळाच. आणि हे सर्व कोणत्या आर्थिक परिस्थितीत व ओढग्रस्त कौटुंबिक-सामाजिक जीवनात हे लक्षात घेतले तर, बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व यांच्या प्रचलित व्याख्या खुज्या वाटायला लागतात.

अशा या अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाची अखेर होत असताना साधनाचा हा विशेषांक येत आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व व कार्य यांना इतके आयाम आहेत की, त्या सर्वांवर प्रकाशझोत टाकणे एका अंकातून शक्य नाही. म्हणून त्यांच्या साहित्याविषयी कुतूहल निर्माण व्हावे, त्या साहित्याच्या दालनात प्रवेश करण्याची इच्छा नव्या वाचकांस व्हावी आणि ज्यांना ते दालन किती मोठे आहे याची कल्पना नाही त्यांना ती यावी, इतकाच माफक उद्देश हा अंक काढताना होता. त्यानुसार आठ लेख या अंकात घेतले आहेत.

अण्णा भाऊंच्या लेखनाची खुमारी कळावी यासाठी त्यांची एक कथा किंवा त्यांच्या कादंबरीतील एखादा तुकडा  या अंकात घ्यावा असा विचार होता. मात्र त्यांच्या एकमेव प्रवासवर्णनातील पहिला भाग घेतला आहे, याचे कारण ते त्यांचे विशेष महत्त्वाचे पण तुलनेने दुर्लक्षित पुस्तक आहे. 1961 मध्ये त्यांनी रशियाचा दौरा केला होता, तिथल्या 40 दिवसांच्या वास्तव्याचा आलेख सांगणारे ‘माझा रशियाचा प्रवास’ हे जेमतेम 60 पानांचे पुस्तक, एकाच बैठकीत वाचून होईल इतके वाचनीय आहे. त्यातून त्यांना रशिया कसा दिसला हे तर रोचक शैलीत आले आहेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यातून त्यांच्या कलंदर व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. भाषा, शैली आणि विचारांची बैठक या दृष्टीने तर ते वाचायला हवेच, पण त्यातील मार्मिक निरीक्षणे त्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेची ओळख करून देतात.

अण्णा भाऊंची वैचारिक जडणघडण कशी झाली किंवा त्यांचा राजकीय विचार कसा आकाराला येत गेला, यावर काही कवडसे टाकणे आवश्यक होते. या अंकातील अर्जुन डांगळे यांची मुलाखत त्यासंदर्भात विशेष उपयुक्त ठरणारी आहे. त्याचप्रमाणे अण्णा भाऊ यांचा सामाजिक परिसर आणि त्यांच्या साहित्याचे पर्यावरण नीट समजून घ्यायचे असेल तर उत्तम कांबळे यांचा लेख खूपच महत्त्वाचा आहे.

‘अण्णा भाऊंच्या साहित्याची उपेक्षा झाली’ अशी खंत अनेक जाणकार लहान-थोर व्यक्तींकडून ऐकायला मिळत असते. ती खंत कितपत बरोबर आहे आणि असेल तर त्याचे कारण काय, या दोन्ही प्रश्नांच्या उत्तराची दिशा राजन गवस यांच्या लेखात आहे. काळाच्या पुढचे पाहणारा लेखक, या शीर्षकातून त्यांनी तेच ध्वनित केले आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांचा लेख तोच धागा पुढे घेऊन जातो आणि प्रेमचंद ही प्रेरणा असलेल्या प्रगतिशील लेखक संघात त्या वेळी मराठी साहित्यातील अण्णा भाऊ हेच एकमेव का होते, याचे वेगळे कारण शोधायची गरज त्यामुळे भासत नाही.

इतके पैलू असणाऱ्या व इतकी अलौकिक घडण असलेल्या अण्णा भाऊ यांचे व्यक्तिगत व कौटुंबिक जीवन कसे होते, याबद्दल भल्याभल्यांना कुतूहल वाटणे साहजिक आहे. अशा व्यक्तींच्या कुटुंबातील एखाद्याने लिहिलेले पुस्तक गूढतेचे वलय कमी करते, ती व्यक्ती तुमच्या-आमच्यासारखीच सामान्य होती, हे त्यातून पुढे येते. ते वाचून काही बाबतीत अपेक्षाभंग होतो, क्वचित निराशाही येते. मात्र महान कार्य घडवून आणलेल्या व्यक्ती अखेर हाडामासाची माणसेच होती, हा संदेश जाणे केव्हाही चांगले. यासंदर्भात अण्णा भाऊंचे धाकटे बंधू शंकर भाऊ साठे यांनी लिहिलेल्या पुस्तकाची संयत व नेमकी ओळख मनोहर जाधव यांच्या लेखातून झाली आहे.

अण्णा भाऊ यांच्या सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपट आले आहेत. ‘फकिरा’ हा चित्रपट वगळता उर्वरित सर्व त्यांच्या मृत्यूनंतर आलेत. ते चित्रपट फार चालले नाहीत, त्याला अनेक कारणे आहेत. पण त्या कादंबऱ्यांवर चित्रपट करताना त्यांचे पटकथा व संवाद लिहिण्याचे काम मराठीतील नामवंत लेखकांकडे (उदा. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील) सोपवले होते आणि ‘फकिरा’साठी ख्वाजा अहमद अब्बास सहभागी झाले होते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली  तर त्यांच्या साहित्याची ताकद किती होती, याबाबत शंका राहात नाही. कारण ताकदीचे कथानक असणे ही त्या काळातील (चालणाऱ्या) चित्रपटांची प्रमुख गरज होती. आणि म्हणून विस्मरणात गेलेले ते चित्रपट व त्या कादंबऱ्या यांच्यावर प्रस्तुत अंकात एक विशेष विभाग करण्याचा विचार केला होता. मात्र त्या चित्रपटांची उपलब्धी (आणि तेही या कोरोना संकटाच्या लॉकडाऊन काळात) अवघड होती. म्हणून ‘वारणेचा वाघ’ ही कादंबरी आणि त्याच नावाचा चित्रपट यांच्यावरील लेख राजा शिरगुप्पे यांना लिहायची विनंती केली होती. हा लेख वाचून एवढी तरी जाणीव होते की, आपले किती तरी सांस्कृतिक संचित नीट न जपल्यामुळे अक्षरशः वाया गेले आहे.

या अंकातील समारोपाचा छोटा पण महत्त्वाचा लेख अगदी शेवटच्या क्षणी अनपेक्षितपणे जुळून आला आहे. अण्णा भाऊ रशियात गेल्यावर मॉस्कोमध्ये ज्या हॉटेलात राहिले होते, तिथे राहण्याचा योग आल्यावर आणि त्या हॉटेलमध्ये वास्तव्य करून गेलेल्या जगप्रसिद्ध व्यक्तींची तैलचित्रे पाहिल्यावर संजय देशपांडे यांना तिथे अण्णा भाऊंचे तैलचित्र लावण्याचे सुचणे, ती कल्पना प्रत्यक्षात येणे आणि नंतर अण्णा भाऊंचा पुतळा तिथल्या प्रतिष्ठित ग्रंथालयात बसविला जाण्याचा निर्णय होणे इथपर्यंतचा प्रवास त्यांनी या लेखात भरभर सांगितला आहे. मात्र सव्वा वर्षातील ती प्रक्रिया आणखी रोचक असणार.

असा हा अंक वाचून एवढे तरी निश्चित होईल की, आपण अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे दालन पाहिलेच नाही, असे अनेक चांगल्या वाचकांना वाटेल. बऱ्याच दिवसांपासून मनात आहे, पण या ना त्या कारणाने वाचायचे राहून जाते आहे ते वाचकही लवकर वळतील. पण हे इतके पुरेसे नाही. हे खरे आहे की, साहित्याचे असो वा सामाजिक बदलांचे प्रवाह हळूहळू वाहत राहतात आणि मग व्यापक बनतात. पण हळूहळू म्हणजे तरी किती? आपल्याकडे ती गती लाजीरवाणी म्हणावी इतकी कमी आहे. जे सामाजिक स्थित्यंतर एका पिढीत व्हायला हवे, त्यासाठी चार-चार पिढ्या जाव्या लागतात.

वस्तुतः अण्णा भाऊंना जाऊन 51 वर्षे झाली आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षे त्यांच्या साहित्याची उपेक्षा झाली, मात्र 1990 नंतरच्या पाव शतकात परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. महात्मा फुले यांची स्मृतिशताब्दी आणि डॉ.आंबेडकरांची जन्मशताब्दी हा टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर तळागाळातल्या समूहांचे नायक पुढे आले. अर्थातच ग्रामीण भागातून व बहुजन समाजातून शिक्षण घेऊन पुढे आलेल्या पिढ्यांनी शिक्षण, प्रशासन, साहित्य व राजकारण ही क्षेत्रे पादाक्रांत सुरुवात केली होती, त्याचा हा परिणाम होता. त्यामुळे इतर अनेकांप्रमानेच अण्णा भाऊ यांचे साहित्यही पुन्हा चर्चेत येऊ लागले. इतके की त्यांच्या नावाने स्वतंत्र साहित्य संमेलन भरू लागले. आज स्थिती अशी आहे की, उपेक्षित व शोषित यांच्यासाठी प्रबोधन व संघर्ष करणारे कोणतेही प्रमुख गट-तट अण्णा भाऊंच्या साहित्याला जाहीरपणे नाकारत नाहीत. ही किमया व्यक्तीची नाही, तिच्या विचारांची व कार्याची आहे.

मात्र इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, अजूनही साहित्याच्या मध्यवर्ती प्रवाहातील वाचक, लेखक, समीक्षक व साहित्य संस्था आणि प्रसारमाध्यमे हे सर्वजण अण्णा भाऊंच्या साहित्यापासून कोसो दूर आहेत. त्यातील काही विशिष्ट प्रकारच्या आकसातून वा श्रेष्ठत्वाच्या कल्पनेतून वा तुच्छतावादाच्या भावनेतून बाहेर आलेले नाहीत, हे खरे आहे. पण त्याच प्रवाहातील बहुसंख्य लोक आकलनाच्या अभावातून अण्णा भाऊ व या प्रकारच्या साहित्याकडे वळलेले नाहीत. या बहुसंख्य लोकांपर्यंत हे साहित्य जावे यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत, आताचा काळ त्यासाठी अधिक अनुकूल आहे. तसे झाले तर अण्णा भाऊ किती मोठे होतील हा भाग बाजूला ठेवला तरी साहित्याचा प्रवाह रुंदावत जाईल. (अर्थात साहित्याचे केंद्र सरकत चालले आहे व साहित्याचा मध्यवर्ती प्रवाह बाजूला ढकलला जातो आहे.)

अर्जुन डांगळे यांनी मुलाखतीत असे म्हटले आहे की, नव्या पिढीतील संशोधक व समीक्षक अण्णा भाऊंना न्याय देतील. इथे काहींच्या मनात असा प्रश्न येईल की, म्हणजे काय करायचे? अण्णा भाऊंच्या साहित्याला मध्यवर्ती व प्रतिष्ठेचे स्थान मिळणे हा त्याचा एक अर्थ आहे. पण त्याचा खरा अर्थ, त्यांनी जे विषय व जे समाजघटक चित्रित केलेत त्यांची दखल घेणे, त्यांच्यावरील अन्याय्यासाठी लढत राहणे असा आहे. पूर्वीच्या तुलनेत परिस्थिती खूप बदलली आहे, मात्र या देशातील शेकडो समाजघटक आणि कोट्यवधी लोक अद्यापही शोषित व उपेक्षित आहेत. त्यांचे जीवन अद्याप दृष्टीआडच आहे, त्या जीवनाचे चित्रण होणे बाकी आहे. मात्र असे घटक व अशी माणसे फक्त दुर्गम भागात व  डोंगर-दऱ्यांत आहेत, असे मानणे म्हणजे वास्तवापासून दूर जाणे. तो शोध घेण्यासाठी दूरवर जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या सभोवताली डोळे उघडे ठेवले तरी ती पाहायला मिळतात, भले आपण शहरात राहत असू वा खेड्यात. आणि ही माणसे व समाजघटक फक्त या देशात नाहीत, जगातल्या प्रत्येक देशात ती कमी-अधिक संख्येने व भिन्न प्रकारांमध्ये आहेत, त्यांच्यात नित्य भर पडतेच आहे, पडत राहणारच आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Rohit Kanavaje- 17 Aug 2020

    Nice Article

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात