डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

ग्रेसफुल लीडर आणि हम्बल फार्मर

ही व्यथा-वेदना केवळ देवेगौडा यांची नाही तर या देशाच्या माजी पंतप्रधानाची आहे. देवेगौडांना 18 वर्षांपूर्वी जवळपास  दहा महिने पंतप्रधानपद भूषविण्याची संधी मिळाली होती. तेव्हा हिंदी अजिबात बोलता न येणे,  सभा-संमेलनात डुलकी लागणे  आणि स्वत:ला हम्बल फार्मर म्हणवून घेणे यामुळे देवेगौडांची ओळख लोकांना जास्त झाली होती.

दि. 21 फेब्रुवारी 2014 रोजी पंधराव्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन समाप्त झाले.  त्या दिवशी खरे तर सभागृहात, मागील पाच वर्षांच्या कामाबद्दलचे समाधान आणि आगामी  निवडणुका लढवण्यासाठीचा उत्साह असे वातावरण असायला हवे होते. काही सदस्यांच्या  मनात तशी दुहेरी भावना असेलही, पण एकूण लोकसभेच्या आणि प्रमुख राजकीय पक्षांच्या  बाबतीत तशी स्थिती दिसली नाही. दहा वर्षांच्या केंद्रीय सत्तेनंतर काँग्रेसची पक्षसंघटना  विस्कळीत झाल्याचे आणि आत्मविश्वास कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपमध्ये  मोदींच्या घोडदौडीमुळे एका स्तरावर उत्साहच नव्हे तर उन्मादही दिसत आहे, पण भाजपचे  केंद्रीय व राज्य स्तरावरील अनेक नेते मोदींच्या ‘ॲरोगन्स’मुळे असमाधानी आहेत. केंद्रीय  सत्तेचा व राजकारणाचा अजिबात अनुभव नसलेल्या मोदींना ज्या पद्धतीने पुढे केले गेले आणि  इतर अनेक दिग्गजांना मागे सारले ते पाहता, ही अवस्था साहजिक आहे. देशाच्या  राजकारणातील तिसरा प्रवाह कम्युनिस्टांचा आहे, अणुकराराच्या वेळेपासून त्यांची घसरण  चालू आहे आणि ममतांनी प.बंगालची सत्ता हिरावून घेतल्यापासून तर ते निस्तेज अवस्थेत  आहेत, त्यांचे खच्चीकरणच झाले आहे. मुलायमसिंह, मायावती, ममता, जयललिता, नवीन  पटनाईक, नीतिशकुमार हे बलशाली नेते अद्यापि आपापले गड राखून आहेत, पण राष्ट्रीय  स्तरावर वावरण्याच्या त्यांच्या अपुऱ्या क्षमता व मर्यादा पूर्वीच अधोरेखित झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या गर्जना होण्याची शक्यता उरलेली नाही.

अशा या मरगळलेल्या  पार्श्वभूमीवर सर्वांचे डोळे आगामी निवडणुकीकडे आणि त्यातही मोदी पंतप्रधान होतील की  नाही, यावर लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पंधराव्या लोकसभेतील शेवटच्या दिवशी लालेल्या दोन  व्यक्तींविषयींच्या बातम्यांकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नाही. एक बातमी आहे सोनिया गांधी  यांच्या संदर्भात आणि दुसरी बातमी आहे एच.डी. देवेगौडा यांच्या संदर्भात.  या लोकसभेत शेवटचे भाषण करताना सुषमा स्वराज यांनी सत्ताधारी आघाडीच्या  नेत्या सोनिया गांधी यांच्या ग्रेसफुलनेसचा उल्लेख विशेषत्वाने केला. त्यांच्या विधानाला इतके  महत्त्व देण्याचे कारण दहा वर्षांपूर्वीचा प्रसंग ज्यांना आठवत असेल, त्यांना कळेल. मे 2004  मध्ये चौदाव्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि सोनिया पंतप्रधान  होणार हे निश्चित झाले तेव्हा, त्यांच्या विरोधात उजव्या आघाडीकडून देशभर उद्रेक  करण्याचा प्रयत्न झाला, त्यात सुषमा स्वराज यांचे वक्तव्य जबरदस्त ठिणगी टाकणारे होते. सोनिया पंतप्रधान झाल्या तर मी डोक्यावरचे केस पूर्णत: काढून टाकीन, असे सुषमा स्वराज  म्हणाल्या होत्या. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतरचा भाजपचा उदारमतवादी चेहरा म्हणून  तेव्हाही सुषमांचेच नाव घेतले जात होते. त्यामुळे सुषमांनी इतकी आक्रस्ताळी भूमिका घेणे  आश्चर्यकारक मानले गेले होते.

त्याआधी कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघात सोनियांच्या  विरोधात निवडणूक लढवण्यासाठी सुषमांना उतरवले गेले होते. 15 व्या लोकसभा  निवडणुकीनंतर सुषमांकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवले गेले, त्यामागे सोनियांच्या समोर  प्रभावशाली नेतृत्व उभे करणे हाच भाजपचा प्रमुख हेतू होता. हे सर्व लक्षात घेतले तर सुषमांनी  सोनियांना ग्रेसफुल लीडर संबोधण्याला विशेष अर्थ आहे. गेल्या दशकभरात सोनियांनी  पक्षाच्या स्तरावर आणि केंद्र व राज्य सरकारांच्याही स्तरावर ज्या संयमाने व अदबशीर  पद्धतीने परिस्थिती हाताळली ती पाहता,  सुषमांचे ते वक्तव्य केवळ औपचारिकता म्हणून आलेले नसावे हे लक्षात घेतले पाहिजे. अलीकडच्या काळात सोनिया व सुषमा यांच्यात  मैत्रीपूर्ण संवाद होत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे,  अनुभवले आहे. पण त्यामुळे तर सुषमांच्या ‘ग्रेसफुल’  या शब्दाचे वजन  वाढले आहे, त्याचा अर्थही व्यापक झाला आहे. सोनियांनी पंतप्रधानपद नाकारणे आणि नंतर त्या पदाची अपेक्षा सोडून देऊन  कार्यरत राहणे यामुळे ही जादू झाली आहे. पण याच लोकसभेच्या शेवटच्या दिवशी, माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांची ‘द हिंदू’च्या प्रतिनिधीने प्रतिक्रिया  घेतली, ती मात्र कोणाही भारतीय नागरिकाला अस्वस्थ करणारी आहे. त्यातही आणखी दु:खाची बाब म्हणजे, ती प्रतिक्रिया  त्या वर्तमानपत्राच्या आतल्या पानावर व अगदी छोटी बातमी या स्वरूपात आली आहे; त्यामुळे आणखीच दुर्लक्षित राहिली  आहे.

देवेगौडा हे आताच्या लोकसभेत कर्नाटकातील ‘हसन’ या मतदारसंघातून निवडून आले होते. देवेगौडा म्हणतात, ‘‘लोकसभेत मला योग्य तो मान दिला गेलेला नाही. शेवटच्या दिवशी मी लोकसभेत आलो होतो, पण शेवटच्या बाकावर  एकटाच बसलो होतो. मागील पाच वर्षांत लोकसभेत जेव्हा जेव्हा चर्चा होत असत, तेव्हा मला बोलण्यासाठी 13 वा क्रमांक  आणि केवळ तीन मिनिटांचा वेळ दिला जात असे. माझी बोलण्याची वेळ संध्याकाळी कामकाज संपताना येत असे आणि त्या  वेळी बहुतेक खासदार सभागृहातून बाहेर पडण्याच्या तयारीत असत. काही वेळा तर मला भाषण करण्याऐवजी ते लिखित भाषण  संसदेच्या पटलावर ठेवायला सांगण्यात आले होते. त्यामुळे माझा आत्मसन्मान दुखावला जाऊन डोळ्यांत पाणी येत असे, ते  मी कसेबसे सावरत असे. लोकसभेत सरकारला बहुमत सिद्ध करण्याची वेळ यायची तेव्हा मात्र पंतप्रधान मनमोहनसिंग माझ्याशी  संवाद साधत असत.’’  ही व्यथा-वेदना केवळ देवेगौडा यांची नाही तर या देशाच्या माजी पंतप्रधानाची आहे. देवेगौडांना 18 वर्षांपूर्वी जवळपास दहा महिने पंतप्रधानपद भूषविण्याची संधी मिळाली होती. तेव्हा हिंदी अजिबात बोलता न येणे,  सभा-संमेलनात डुलकी लागणे  आणि स्वत:ला हम्बल फार्मर म्हणवून घेणे यामुळे देवेगौडांची ओळख लोकांना जास्त झाली होती.

पण पंतप्रधानपदाचा  राजीनामा देताना केलेल्या भाषणात त्यांनी अतिशय बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते आणि ‘मी असे काम करीन की, या  सभागृहात पंतप्रधान म्हणून पुन्हा येईन’ असे वक्तव्य केले होते. पण त्यानंतरच्या काळात राष्ट्रीय स्तरावरून ते नाहीसे झाले आणि  कर्नाटकातही एच.डी.कुमारस्वामी या आपल्या मुलाच्या मुख्यमंत्रिपदासाठी संकुचित राजकारण करत गेले. मधल्या एका  लोकसभा निवडणुकीत तर ते एकाच वेळी दोन मतदारसंघांत उभे राहिले आणि दोन्हीकडे पराभूत झाले. त्याच दरम्यान कर्नाटकाचे  मुख्यमंत्री पुन्हा व्हायला आवडेल का, या प्रश्नावर ‘राजाजी गव्हर्नर जनरलपदावरून निवृत्त झाल्यावर मद्रास राज्याचे मुख्यमंत्री  झाले होते तर मी कर्नाटकाचे मुख्यमंत्रिपद का स्वीकारू नये?’  असे वक्तव्य त्यांनी केले होते. वस्तुत: माजी पंतप्रधान हे बिरूद  एकदा चिकटल्यावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावरच वावरायला हवे होते. तसे केले असते तर पंतप्रधानपद नाकारलेल्या सोनिया गांधी  यांच्याप्रमाणे नाही, पण औट घटकेचे पंतप्रधानपद लाभलेल्या चंद्रशेखर यांच्याइतके तरी ग्रेसफुल ते दिसले असते... आणि मग आताची व्यथा-वेदना व्यक्त करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, त्यांचे स्वत:चे आणि देशाच्या माजी पंतप्रधानांचे  अवमूल्यन टाळता आले असते.  

Tags: पंतप्रधान द हिंदू चंद्रशेखर राव भाजप नरेंद्र मोदी कुमारस्वामी एच.डी हसन सोनिया गांधी अटल बिहारी वाजपेयी सुषमा स्वराज एच.डी.देवगौडा कॉंग्रेस लोकसभा संपादकीय The Hindu Chandrshekhar Rao Bjp Narendr Modi H.D KumarSwami Pantpradhan H.D Devgoda Congress Loksabha Hasan Soniya Gandhi Atal Bihari Vajpeyi Sushma Swaraj Editorial Samapdkiy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके