डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रामदेवबाबांचा परिचय : एक पुनर्भेट

रामदेवबाबांच्या आंदोलनाच्या संदर्भात ‘जालियनवाला बाग’ आणि ‘आणीबाणी’ यांचे उल्लेख केले गेले, हा उथळपणाचाच उत्तम नमुना आहे. अण्णा हजारे यांच्याकडून ‘दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई’ आणि ‘गोरे इंग्रज-काळे इंग्रज’ हे शब्दप्रयोग वापरून परिस्थितीचे सिंप्लिफिकेशन केले गेले. या लोकांना एवढेही कळत नाही की, सरकारचे नाकर्तेपण व स्वत:चे मोठेपण अवास्तव पद्धतीने सांगण्याच्या नादात आपण ऐतिहासिक वस्तुस्थितीचे गांभीर्य व महत्त्व कमी करीत आहोत. अपुरे आकलन असलेली ही माणसे ‘आम्हांला सर्व देशाचे (आध्यात्मिक क्षेत्रातील लोक तर विश्वाचे) रहस्य उलगडले’ अशा आविर्भावात भाषणे-मुलाखती देतात, रामबाण उपाय सुचवतात. फाशी द्या, घरी बसवा, रद्द करा अशा मागण्या बेधडकपणे करतात तेव्हा यांच्यात हुकूमशाही प्रवृत्तीचे अंश दडलेले असल्याचे लक्षात येते. भ्रष्टाचार करणाऱ्यांना फाशी द्या अशी मागणी करणाऱ्या रामदेवबाबांनी स्वत:च्या भक्तगणांतील भ्रष्टाचाऱ्यांना दूर ठेवले तर त्यांना अनुयायीच मिळणार नाहीत आणि त्यांच्या ट्रस्टचे सर्व व्यवहार तपासले तर कदाचित फाशी देणाऱ्यांच्या यादीत रामदेवबाबांचेही नाव येईल.

(काही व्यक्ती व विषय इतके चघळले गेलेले असतात की, त्यावर पुन:पुन्हा काय बोलायचे व लिहायचे असा प्रश्न सार्वजनिक जीवनातील कोणाही जबाबदार घटकांना पडत असतो. मात्र त्या व्यक्ती व त्यांनी उपस्थित केलेले विषय बरेच विघातक असतात, त्यामुळे नाईलाजाने त्यावर व्यक्त व्हावे लागते. अशीच एक व्यक्ती व विषय म्हणजे बाबा रामदेव आणि त्यांची योगविद्या. मागील दशकभरात या बाबांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. विद्यमान केंद्र सरकार व भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या परिवारातील संस्था संघटना यांनी या रामदेवांचे स्तोम अतोनात माजवले आहे. गेल्या वर्षभरात करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण बरे करण्याच्या संदर्भात अनेक तारे तोडले आहेत आणि गेल्या आठवड्यात त्यांनी आधुनिक वैद्यकशास्त्र व आयुर्वेद यांच्यासंदर्भात काही बाष्कळ विधाने केली आहेत, त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. अशा वेळी या बाबांच्या संदर्भात आणखी काही वेगळे सांगण्यापेक्षा, ते राष्ट्रीय स्तरावर खऱ्या अर्थाने उदयाला आले तेव्हा म्हणजे 2010 व 2011 मध्ये साधनात लिहिलेल्या दोन संपादकीय लेखांमधील काही भाग पुनर्भेट म्हणून सादर करीत आहोत. त्यातील एका लेखाचे शीर्षक होते ‘रामदेवबाबांचा राजयोग’ आणि दुसऱ्याचे ‘रामदेवबाबांचा हठयोग’.) 

1953 मध्ये हरियानातील एका लहानशा खेड्यात जन्माला आलेल्या, जन्मत:च अर्धांगवायू झालेल्या रामकिसन यादवने इयत्ता आठवीनंतर औपचारिक शिक्षणाला रामराम ठोकून संस्कृत भाषा आणि योगविद्या यांचे शिक्षण घेतले. त्यानंतर रामदेवबाबा हे नाव धारण करून संन्यास घेतला, काही काळ हिमालयात भ्रमण केल्यानंतर हरियाणातील खेड्यापाड्यांत फिरून योगा प्रशिक्षण शिबिरे घेतली. 1995 मध्ये ‘ओम योग साधना’ हा कार्यक्रम ‘झी’ टीव्हीवर झळकला आणि मग रामदेवबाबांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संचार देशाच्या कानाकोपऱ्यात होऊ लागला. सध्या भारतात व जगभरात रामदेवबाबांचे योगा कार्यक्रम रोज टी.व्ही.वर पाहणाऱ्यांची संख्या दोन कोटी आहे असे सांगितले जाते आणि टी.व्ही. व व्हिडिओद्वारे रामदेवबाबांचे अनुकरण करून योगा करणाऱ्यांची संख्या साडेआठ कोटी आहे असा दावा केला जात आहे. 

त्यांच्या योग शिबिरात विस्तीर्ण मैदानावर एकाच वेळी वीस हजारांचा समूह अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने योगाची प्रात्यक्षिके करतो आणि लाखांचा समुदाय ‘पिन ड्रॉप सायलेन्स’चा अनुभव घेत त्यांची भाषणे ऐकतो ही एक प्रकारची जादूच आहे. रामदेवबाबांनी ही जादू केली ती मुख्यत: जनसामान्यांची नाडी ओळखून आणि मार्केटिंगचे तंत्र वापरून! रामदेवबाबांनी आधी मोफत योग प्रशिक्षण शिबिरे घेतली आणि नंतर भरपूर फी आकारायला सुरुवात केली. आधी शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी योगा असा प्रचार केला आणि नंतर सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार अशी मांडणी करून आयुर्वेदिक औषधांची जोरदार विक्री सुरू केली. आधी इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाहिरात करून प्रसिद्धी मिळवली आणि नंतर मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन चक्क मीडियालाच प्रक्षेपणाचे हक्क विकायला सुरुवात केली. 

गेल्या दशकभरात रामदेवबाबांनी काही वादळे निर्माण केली आणि त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या वादांनाही ते पुरून उरले. एड्‌स बरा होऊ शकतो असा दावा रामदेवबाबांच्या आश्रमातील अनुयायांनी केला तेव्हा आणि रामदेवबाबांच्या औषधोपचारांनी आमचा कॅन्सर बरा झाला असे छातीठोकपणे सांगणारे काही भक्त पुढे आले तेव्हा, काही वैज्ञानिक व डॉक्टर्स यांनी त्यांना आव्हान दिले. रामदेवबाबांच्या औषधात प्राण्यांच्या व माणसांच्या हाडांचा वापर केलेला असतो असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या खासदार वृंदा करात यांनी केला. पण त्या प्रत्येक वेळी रामदेवबाबांनी स्वत:ची सुटका तर करून घेतलीच, पण त्यानंतर त्यांची लोकप्रियताही वाढली आणि त्यांच्याकडे औषधोपचारांसाठी येणाऱ्यांची संख्याही वाढली. विशेष म्हणजे त्यानंतर त्यांना उत्तरप्रदेशातील अमेठी विद्यापीठाने व ओरिसातील कलिंगा विद्यापीठाने डॉक्टरेट बहाल केली. आणि भारताच्या राष्ट्रपतींनी थेट राष्ट्रपती भवनात त्यांचे योग प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. युरोप, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया खंडातील काही देशांत रामदेवबाबांची योगसाधना पोहोचली असून, अगदी अलीकडेच त्यांना स्कॉटलंडमध्ये 700 एकर जागा मिळाली आहे. जगभरात योगा पोहोचविण्यासाठी तिथे अतिविशाल आश्रम उभारला जाणार आहे. रामदेवबाबांना नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी देशविदेशातील त्यांचे शिष्य प्रयत्न करीत आहेत. 

या पार्श्वभूमीवर भारत योगमय करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून रामदेवबाबा भारत स्वाभिमान पक्ष स्थापन करीत आहेत. याची पूर्वतयारी म्हणून त्यांनी मागील वर्षभर भारत स्वाभिमान आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर भारताचा झंझावाती दौरा केला आहे. लाखोंच्या जनसमुदायासमोर त्यांनी दोन-दोन तास भाषणे करून देशातील राजकीय पुढाऱ्यांचे अक्षरश: वाभाडे काढले आहेत. उद्योग, अर्थकारण, परराष्ट्र धोरण, आरोग्य, कृषी व शिक्षण व्यवस्था यांबाबत आमुलाग्र परिवर्तनासाठी क्रांतिकारक म्हणावेत किंवा ‘अघोरी’ समजावेत असे काही उपाय सुचवले आहेत. त्यांची मांडणी क्रांतिकारकांनाच शोभेल अशा भाषेत आणि युगपुरुषाच्या आवेशात होत आहे. त्यांची ही भाषणे दिव्यदृष्टी असलेल्या शक्तीची अमृतवाणी अशा आविर्भावात होत आहेत. शंभर टक्के मतदान, शंभर टक्के राष्ट्रवादी विचार, शंभर टक्के विदेशी कंपन्यांवर बहिष्कार, शंभर टक्के राष्ट्रीय एकात्मता आणि शंभर टक्के योगमय भारत हा त्यांच्या पक्षाचा पंचसूत्री कार्यक्रम आहे. (हा सर्व प्रकार भाजपच्या शतप्रतिशत हिंदुत्वाची आठवण करून देणारा नाही?) 

शिक्षणाच्या व आरोग्याच्या बाबतीत पूर्णत: स्वदेशी, भारतीय उद्योग आणि कृषिप्रधान भारत, हिंदी व भारतीय भाषांतूनच व्यवहार हा त्यांच्या धोरणांचा गाभा राहणार आहे. भ्रष्टाचाराचे संपूर्ण उच्चाटन ही त्यांच्या कार्यातील पहिली पायरी ठरणार आहे. स्वीस बँकेतील सर्व पैसा परत आणण्याचा व राजकारणातील रावणांना संपवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. काश्मीरमधील दहशतवाद मात्र योगानेही बरा होणार नाही, कारण तो आनुवांशिक आहे असे त्यांचे ठाम मत आहे. ज्यांच्या दोन-तीन पिढ्या दहशतवादात अडकल्या आहेत, त्यांच्या पुढच्या पिढीत तो अनुवांशिकतेचा भाग म्हणून प्रवेश करतो; त्यामुळे सर्व दहशतवाद्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी लागेल, त्याशिवाय दहशतवादाचे मूळ नष्ट होणार नाही, अशी त्यांची धारणा आहे. विशेष म्हणजे रामदेवबाबांचे राज्य आले तर ढोंगी बाबांनाही मृत्युदंडाची शिक्षा दिली जणार आहे, याचा अर्थ योगविद्येला म्हणजेच रामदेवबाबांना न मानणारे साधू ढोंगी ठरणार आहेत. थोडक्यात काय तर नव्या बाटलीत जुनी दारू, या प्रकारचे हे आधुनिक अध्यात्म आहे. 

अण्णा हजारे यांच्या ‘जंतर मंतर’ येथील आंदोलनाचा अनपेक्षित भडका उडाल्याने पोळून निघालेले केंद्र सरकार रामदेवबाबांचे आंदोलन नको तितके जपून हाताळायला लागले होते, पण ‘ब्लॅक मनी’च्या नावाखाली रामदेवबाबा आपल्याला खेळवताहेत, आपल्या जखमेवर मीठ चोळताहेत आणि त्यामुळे सरकार फारच कमकुवत असल्याचा संदेश देशभरात पोहोचलाय हे लक्षात आल्यावर केंद्र सरकारच्या ‘थिंक टँक’ने अचानक चढाईचे धोरण स्वीकारून एका रात्रीत रामदेवबाबांचे आंदोलन मोडून काढले. त्या रात्रीच्या कारवाईबद्दल बहुतेक सर्व विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीका झाली आहे आणि जनतेतूनही नाराजीचा सूर ठळकपणे उमटला आहे. त्यामुळेच कदाचित खुद्द पंतप्रधानांनीही त्या कारवाईचे वर्णन ‘दुर्दैवी पण अपरिहार्य’ असे केले आहे.

वस्तुत: त्या कारवाईबद्दल प्रसारमाध्यमांतून व समाजमन घडविण्याची जबाबदारी असलेल्या घटकांकडून ‘उशीरा पण स्वागतार्ह’ असा सूर ठळकपणे उमटायला हवा होता. तसे झाले नाही याचे एक कारण या सर्व घटकांच्या मनात सरकारविषयी असलेला राग हे तर आहेच, पण दुसरे कारण अधिक महत्त्वाचे आहे, ते म्हणजे रामदेवबाबा यांच्याविषयीचे अपुरे आकलन! 

आंदोलन मोडून काढल्यावर रामदेवबाबांनी स्वसंरक्षणासाठी अकरा हजार तरुणांचे सशस्त्र दल उभारण्याची घोषणा केली तेव्हा गृहमंत्री पी.चिदंबरम म्हणाले, ‘रामदेवबाबांनी आपले खरे रंग दाखवले.’ खरे तर रामदेवबाबांचे हे रंग मागील चार-पाच वर्षांपासून दिसत होते आणि गेल्या दोन वर्षांत तर त्यांनी हे रंग उत्तर भारतात झंझावाती दौरा करून असंख्य ठिकाणी उधळले होते. स्वदेशीचा अवास्तव आणि अव्यवहारी पुरस्कार करणारे आक्रस्ताळे लोक (ज्यात हिंदुत्ववादी संघटनांचे, संघपरिवाराचे लोक आघाडीवर आहेत) रामदेवबाबांच्या मागे राहून आंदोलन चालवत आहेत, हे काही नवे सत्य नाही. 

दरम्यानच्या काळात प्रत्येक योगशिबिराच्या ठिकाणी रामदेवबाबा केंद्र सरकारच्याच नाही तर या राज्यव्यवस्थेच्या विरोधात आग ओकणारी भाषणे करीत होते, त्यातून राजकारणाविषयी द्वेष पसरवणारी आणि समाजात विघटनाची बीजे टाकणारी विषारी वक्तव्ये करीत होते. त्यामुळे रामदेवबाबांवर कारवाई करण्यासाठी पुरेशी ठरतील अशी किती तरी कारणे त्यांच्या या आंदोलनापूर्वी मिळालेली होती, केंद्र सरकारच्या गृहखात्याला ती दिसत नव्हती असे नाही, तर राजकीय दृष्टीने परवडण्यासारखी नव्हती. 

आता रामलीला मैदानावर झालेल्या रामदेवबाबांच्या आंदोलनावरील कारवाईबद्दल टीका करणाऱ्या सर्वांकडून एकच भावनिक मुद्दा उपस्थित केला जातो आहे, तो म्हणजे इतक्या रात्री लोक झोपलेले असताना अशी कारवाई करायला नको होती, पोलिसांनी लाठीमार केल्याने अनेक मुले-महिला जखमी झाल्या इत्यादी... पण मुळात पाच हजार लोकांच्या योगशिबिरासाठी परवानगी घेतलेले मैदान, पन्नास हजार लोक गोळा करून राजकीय आंदोलनासाठी वापरणे, हेच बेकायदेशीर, अनैतिक आणि बेजबाबदारपणाचे आहे. 

त्यातच हिंदुत्ववादी व माओवादी या दोनही उजव्या-डाव्या अराजकवाद्यांनी (केंद्र सरकार कात्रीत सापडतेय म्हणून) त्या आंदोलनाला पाठिंबा देणे, आणखी काही लाख लोक पुढील दोन-तीन दिवसांत त्या ठिकाणी जमा होणे आणि या सर्वांसमोर प्रक्षोभक भाषणे करणे याचा परिणाम किती भयानक होऊ शकला असता हा विचार भावनिक मुद्दा उपस्थित करणारे लोक करीत नाहीत. 

पण आपल्या राजकीय पक्षांत ‘सत्ताधाऱ्यांची’ व ‘विरोधकांची’ अशा दोनच प्रकारच्या मानसिकता वास्तव्याला असल्याने काही अपवाद वगळता सर्व राजकीय पक्षांनी त्या कारवाईच्या संदर्भात जनतेच्या भावनांच्या लाटावर स्वार होणे पसंत केले, त्यात नीतिशकुमार, प्रकाश करात, चंद्राबाबू नायडू, मायावती हेसुद्धा होते.

अर्थातच एका रात्रीत आंदोलन मोडून काढल्याने केंद्र सरकार बलवान झाल्याचे दु:ख हे त्याचे आणखी एक कारण असावे. हे सर्व विरोधी पक्ष मूलभूत मुद्दा लक्षात घेत नाहीत. तो म्हणजे केवळ विरोधाला विरोध आणि नको तितका लोकानुनय ही जबाबदार व प्रगल्भ विरोधी पक्षाची लक्षणे असू शकत नाहीत. किंबहुना हे बाबा आणि अण्णा इतके पॉवरफुल्ल भासताहेत, जनतेचा पाठिंबा मिळवताहेत हा आपले (सत्ताधारी व विरोधी) राजकीय पक्ष पुरेसे प्रगल्भ नसल्याचाच पुरावा आहे. 

रामदेवबाबांचे आंदोलन सरकारने मोडून काढल्याच्या निषेधार्थ अण्णा हजारे यांनी लोकपाल समितीच्या 6 जूनच्या बैठकीवर बहिष्कार टाकणे आणि 8 जूनला राजघाटावर उपोषण करणे या दोनही कृतींमागे, रामदेवबाबांच्या तुलनेत आपण मागे पडू आणि सरकार आणखी वरचढ होईल ही भीतीही आहे. 

रामदेवबाबांच्या आंदोलनाच्या संदर्भात ‘जालियनवाला बाग’ आणि ‘आणीबाणी’ यांचे उल्लेख केले गेले, हा तर उथळपणाचाच उत्तम नमुना आहे. अण्णा हजारे यांच्याकडून ‘दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई’ आणि ‘गोरे इंग्रज-काळे इंग्रज’ हे शब्दप्रयोग वापरून परिस्थितीचे सिंप्लिफिकेशन केले गेले. या लोकांना एवढेही कळत नाही की, सरकारचे नाकर्तेपण व स्वत:चे मोठेपण अवास्तव पद्धतीने सांगण्याच्या नादात आपण ऐतिहासिक वस्तुस्थितीचे गांभीर्य व महत्त्व कमी करीत आहोत. 

अपुरे आकलन असलेली ही माणसे ‘आम्हांला सर्व देशाचे (आध्यात्मिक क्षेत्रातील लोक तर विश्वाचे) रहस्य उलगडले’ अशा आविर्भावात भाषणे-मुलाखती देतात, रामबाण उपाय सुचवतात. फाशी द्या, घरी बसवा, रद्द करा अशा मागण्या बेधडकपणे करतात तेव्हा यांच्यात हुकूमशाही प्रवृत्तीचे अंश दडलेले असल्याचे लक्षात येते. 

भ्रष्टाचार करणाऱ्यांना फाशी द्या अशी मागणी करणाऱ्या रामदेवबाबांनी स्वत:च्या भक्तगणांतील भ्रष्टाचाऱ्यांना दूर ठेवले तर त्यांना अनुयायीच मिळणार नाहीत आणि त्यांच्या ट्रस्टचे सर्व व्यवहार तपासले तर कदाचित फाशी देणाऱ्यांच्या यादीत रामदेवबाबांचेही नाव येईल. ‘जे पापी नाहीत, त्यांनी दगड मारावा’ आणि ‘ज्या घरात मृत्यू झालेला नाही, त्या घरातील माती आणावी’ या पुराणकथा सर्वच बाबा-बुवा आपल्या भक्तगणांना सांगत असतात, रामदेवबाबांनीही सांगितल्या असतील. पण आध्यात्मिक क्षेत्रात तर्कशुद्ध विचारांना थारा नसतो, त्यामुळे त्यांना असे प्रतिप्रश्न विचारण्यात अर्थ नसतो हेच खरे!  

Tags: विनोद शिरसाठ संपादकीय रामदेवबाबांचा हठयोग रामदेवबाबांचा राजयोग पुनर्भेट कोविड बाबा रामदेव patanjali covid baba ramdev weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके