डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

‘मोदीमय’ झालेल्यांना आणखी एक उत्साहाचा डोस मिळाला आणि मोदी सत्तेवर आल्याने जे अस्वस्थ आहेत, त्यांना आणखी एक कडू गोळी चाखावी लागली. पण आणखी चार-सहा महिने तरी ‘नव्याचे दिवस’ राहणार असल्याने, या भाषणाच्या संदर्भात लगेचच मोठे अर्थ काढून तावातावाने ढोल बडवणे येाग्य ठरणार नाही. अर्थात, हे भाषण संस्कारक्षम वयातील काही कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे, याची नोंद सुजाण नागरिकांनी व ओपिनियन मेकर्स वर्गातील लोकांनी घेतली पाहिजे आणि याच निमित्ताने साधना साप्ताहिकाच्या बालकुमार दिवाळी अंकाचे यश व युवा दिवाळी अंकाची भावी वाटचाल याकडे लक्ष वेधणे आम्हाला आवश्यक वाटते. 

या वर्षीचा शिक्षकदिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामुळे गाजला. मनुष्यबळ विकासमंत्री स्मृति इराणी यांच्या म्हणण्यानुसार, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शिक्षकदिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांसमोर भाषण केले. खरेही असेल ते! त्यातही अधिक महत्त्वाचे हे आहे की, हे भाषण देशभरातील शाळांमधून दाखवण्यात/ऐकवण्यात आले. त्यासाठी शिक्षणखात्यांकडून खास परिपत्रक काढण्यात आले, शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या, भाषण ऐकवणे सक्तीचे केले गेले वगैरे, उलटसुलट बातम्या आल्या आणि पटकन विरल्याही. पंतप्रधान आक्षेपार्ह किंवा प्रचारकी थाटाचे/ वेगळी विचारसरणी लादणारे असे काही बोलले नाहीत, त्यामुळे हे भाषण वादग्रस्त ठरले नाही. आणि फार नवे किंवा पूर्वी न मांडले गेलेले मौलिक असे काही त्यांच्या भाषणातून आले नाही, म्हणून त्या भाषणावर कौतुकाचा वर्षावही झाला नाही. त्यामुळे मागील एक-दीड वर्ष जो ट्रेंड होता त्यात विशेष बदल झालेला नाही. 

म्हणजे ‘मोदीमय’ झालेल्यांना आणखी एक उत्साहाचा डोस मिळाला आणि मोदी सत्तेवर आल्याने जे अस्वस्थ आहेत, त्यांना आणखी एक कडू गोळी चाखावी लागली. पण आणखी चार-सहा महिने तरी ‘नव्याचे दिवस’ राहणार असल्याने, या भाषणाच्या संदर्भात लगेचच मोठे अर्थ काढून तावातावाने ढोल बडवणे येाग्य ठरणार नाही. अर्थात, हे भाषण संस्कारक्षम वयातील काही कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे, याची नोंद सुजाण नागरिकांनी व ओपिनियन मेकर्स वर्गातील लोकांनी घेतली पाहिजे आणि याच निमित्ताने साधना साप्ताहिकाच्या बालकुमार दिवाळी अंकाचे यश व युवा दिवाळी अंकाची भावी वाटचाल याकडे लक्ष वेधणे आम्हाला आवश्यक वाटते. 

2008 मध्ये साधनाच्या हीरकमहोत्सवाचा समारोप राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत झाला आणि त्याच आठवड्यात बालकुमार अंकाची मुहूर्तमेढ रोवली गेली. गेल्या सात वर्षांत गुणात्मक व संख्यात्मक या दोनही प्रकारच्या वाढीवर लक्ष केंद्रित करून बालकुमार अंकाला मिळालेले यश साधना वाचकांना माहीत आहे. मागील सलग चारही वर्षे सरासरी चार लाख इतक्या प्रती महाराष्ट्रातील पाचवी ते दहावी या वयोगटातील विद्यार्थ्यांपर्यंत (आणि त्यांचे पालक व शिक्षक यांच्यापर्यंतही) पोहोचल्या आहेत. हे यश अपघाताने घडून आलेले नाही. डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी अनेक घटकांचे सहकार्य मिळवून बालकुमार अंक नावारूपास आणला आहे. आणि आता या वर्षीपासून काढत असलेला युवा अंकही दीर्घकालीन नियोजनप्रक्रियेचाच एक भाग आहे. सर्व विद्याशाखांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समोर ठेवून हा अंक काढला जात आहे. या अंकाचीही गुणात्मक व संख्यात्मक वाढ करण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था, संघटना यांचे सहकार्य आम्हाला हवे आहे. त्यासाठी वाचकांना विनंती आहे की, त्यांनी बालकुमार व युवा अंकाची विक्री-वितरण मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही प्रकारे हातभार लावावा. 

1. आपण स्वत: बालकुमार किंवा युवा अंकाच्या पन्नास/शंभर/दोनशे प्रती खरेदी करून आपली शाळा/महाविद्यालये किंवा गावातील, मोहल्ल्यातील मुला-मुलींना भेट द्याव्यात. 

2. महाराष्ट्रातील दुर्गभ भागात आणि शहरातही अशी कितीतरी मुले-मुली आहेत, जी अंक खरेदी करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी एक-दोन-तीन-पाच हजार रुपये साधनाकडे पाठवावेत. आम्ही त्यांना अंक पाठवण्याची व्यवस्था करू. 

3. आपल्या ओळखीच्या/माहितीतील ज्या व्यक्तींचा शिक्षणक्षेत्राशी/शाळा- महाविद्यालयांशी या ना त्या प्रकारचा संबंध आहे, त्यांना बालकुमार व युवा अंक खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.  

Tags: प्रतिभाताई पाटील युवा बालकुमार दिवाळी अंक स्मृति इराणी नरेंद्र मोदी शिक्षक दिन डॉ. नरेंद्र दाभोलकर संपादकीय Pratibhatai Patil Yuva Balkumar Diwali Ank Smruti Irani Narendr Modi Shikshak Din Dr. Narendr Dabholkar Samapadkiy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके