डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डेक्कन कॉलेजचे द्विशताब्दी वर्ष आल्यावर केशवरावांच्या मनात आलेले विचार...

एका बाकड्यावर तेवढे एक तेजस्वी व रुबाबदार म्हणावेत असे आजोबा क्षितिजाकडे नजर लावून बसलेले दिसले. साहजिकच कुतूहल चाळवले गेले. त्यांच्या जवळ जाऊन बसलो. तर कळले की, ते या कॉलेजचे माजी विद्यार्थी. गेली अनेक वर्षे ते रोज पहाटे या कॉलेजच्या आवारात फिरायला येतात. किती वर्षांपूर्वी तुम्ही इथे विद्यार्थी होता, असा प्रश्न केला तर ते म्हणाले सव्वाशे. नीट ऐकायला आले नाही, असे समजून पुन्हा विचारले तर उत्तर तेच. मग हसत, त्यांना वय विचारले तर म्हणाले, दीडशे पार केलीत कधीच. आता जागेवरच उडणे तेवढे बाकी होते. पण आजोबांशी बोलत राहण्यात मजा आहे, हे एव्हाना कळले होते. म्हणून त्यांना विचारले, आमच्या साप्ताहिकासाठी या कॉलेजचे माजी विद्यार्थी या नात्याने मुलाखत देता का? त्यांनी प्रतिप्रश्न केला, तुम्ही कोण आणि तुमचे साप्ताहिक कोणते? उत्तर दिल्यावर थोडी ओळख असल्यासारखे पुसटसे हसले आणि म्हणाले, ‘तुम्ही स्वतः तर आगरकरवादी, मग कालच्या 1 ऑगस्टला टिळकांवर विशेषांक का काढला होता?’ आम्ही आजोबांना सांगितले, आज तुमची मुलाखत करू, पुढे कधी तरी तुम्ही आमची घ्या... मग उघड हसलेआणि मुलाखतीला तयार झाले. त्याचेच हे शब्दांकन...  

प्रिय वाचकहो,

गेल्या महिन्यात ‘दोन केशवांची कहाणी सर्वोच्च न्यायालयाची जबानी’ या शीर्षकाचा लेख या स्तंभात आम्ही लिहिला होता. त्यातील एक होते उत्तर प्रदेशातील केशवसिंह आणि दुसरे होते केरळमधील केशवानंद भारती. केशवसिंह हे समाजवादी कार्यकर्ते तर केशवानंद हे एका मठाचे अधिपती. केशवानंद यांचे निधन झाले आणि म्हणून केशवसिंह यांची आठवण झाली होती. कारण दोघांच्याही नावाने दोन न्यायालयीन खटले ओळखले जातात. ते दोघे न्यायालयात गेले वेगळ्याच कारणासाठी आणि त्यांचे खटले अनेक वाटा-वळणे घेत पोहोचले भलत्याच उंचीवर. 

त्या खटल्यांच्या कहाण्याच इतक्या रोचक आहेत की, त्या थोडक्यात लिहून आम्ही थांबलो होतो. त्यांचे विश्लेषण करायचे टाळून, त्या-त्या लढायांचा अन्वयार्थ काढण्याचे काम वाचकांवरच सोपवले होते. त्या लेखाला महिना होत नाही तोच हे कोण तिसरे केशव आता आणले, असा प्रश्न काही वाचकांच्या मनात येणे साहजिक आहे. पण हे प्रकरणही तितकेच रोचक आहे. इथेही आम्ही फार विश्लेषणाच्या भानगडीत पडणार नाही. जे घडले ते सांगून मोकळे व्हावे आणि पुढील अन्वयार्थ वाचकांवर सोपवावा हेच बरे. तर त्याचे असे झाले. कालच्या 6 ऑक्टोबरला पुणे येथील डेक्कन कॉलेजने 200 व्या वर्षात पदार्पण केले, ही बातमी वाचनात आल्यावर आम्ही ठरवले, यानिमित्ताने डेक्कन कॉलेजच्या परिसरात फेरफटका मारून यावे. तसेही कोरोना कालखंड असल्याने कॉलेजच्या वतीने द्विशताब्दी वर्षाचा कार्यक्रम होणार नाही आणि त्या परिसरात नेहमीपेक्षा जास्त शुकशुकाट असणार, तर जरा निवांत फिरता येईल. या कॉलेजसंदर्भात पूर्वी फुटकळ स्वरूपात जे काही वाचले आहे, त्याच्या काही खाणाखुणा सापडतील कदाचित, असाही विचार मनात येऊन गेला. म्हणून कधी नव्हे ते भल्या पहाटे उठून कॉलेजच्या विस्तीर्ण आवारात प्रवेश केला. 

अंदाज बरोबर ठरला. कमालीचा शुकशुकाट. शंभराहून अधिक एकरांचा परिसर. पण पूर्ण शांत. एका बाकड्यावर तेवढे एक तेजस्वी व रुबाबदार म्हणावेत असे आजोबा क्षितिजाकडे नजर लावून बसलेले दिसले. साहजिकच कुतूहल चाळवले गेले. त्यांच्या जवळ जाऊन बसलो. तर कळले की, ते या कॉलेजचे माजी विद्यार्थी. गेली अनेक वर्षे ते रोज पहाटे या कॉलेजच्या आवारात फिरायला येतात. किती वर्षांपूर्वी तुम्ही इथे विद्यार्थी होता, असा प्रश्न केला तर ते म्हणाले सव्वाशे. नीट ऐकायला आले नाही, असे समजून पुन्हा विचारले तर उत्तर तेच. मग हसत, त्यांना वय विचारले तर म्हणाले, दीडशे पार केलीत कधीच. आता जागेवरच उडणे तेवढे बाकी होते. पण आजोबांशी बोलत राहण्यात मजा आहे, हे एव्हाना कळले होते. म्हणून त्यांना विचारले, आमच्या साप्ताहिकासाठी या कॉलेजचे माजी विद्यार्थी या नात्याने मुलाखत देता का? त्यांनी प्रतिप्रश्न केला, तुम्ही कोण आणि तुमचे साप्ताहिक कोणते? उत्तर दिल्यावर थोडी ओळख असल्यासारखे पुसटसे हसले आणि म्हणाले, ‘तुम्ही स्वतः तर आगरकरवादी, मग कालच्या 1 ऑगस्टला टिळकांवर विशेषांक का काढला होता?’ आम्ही आजोबांना सांगितले, आज तुमची मुलाखत करू, पुढे कधी तरी तुम्ही आमची घ्या... मग उघड हसलेआणि मुलाखतीला तयार झाले. त्याचेच हे शब्दांकन...  

प्रश्न : आजोबा, तुम्ही सव्वाशे वर्षांपूर्वी इथे विद्यार्थी होता, त्या काळात तुमचे असलेले मित्र नंतर आपापल्या क्षेत्रात बरेच कर्तबगार झाले असतील. काही नावे सांगता का? 

उत्तर : किती नावे सांगू आणि कोणा-कोणाला आठवू... पण तुम्ही पत्रकारिता करता तर त्या क्षेत्रातील एका मित्राचे नाव सांगतो. शि. म. परांजपे. 

प्रश्न : अरेच्च्या, ‘काळ’कर्ते परांजपे? 1898 ते 1908 या काळात ते काळ हे साप्ताहिक चालवत होते. असे सांगतात की, केसरीपेक्षाही जास्त वाचला जायचा काळ, काही वेळा. नंतर त्यावर ब्रिटिश सरकारने बंदी आणली, अडीच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा दिली शिवरामपंतांना. आधी ते टिळकांचे अनुयायी होते, नंतर गांधींच्या चळवळीत गेले. आयुष्याच्या अखेरच्या काळात तर मुळशी सत्याग्रहात सामील झाले. धरण बांधण्याविरोधात झालेला जगातील पहिला लढा मानला जातो तो... 

उत्तर : पत्रकार असूनही वाचन बरे आहे तुमचे... 

प्रश्न : आमचे सोडा हो, आज तुमची मुलाखत करायची आहे. शि. म. परांजपे तुमचे वर्गमित्र होते हेच किती रोमांचक आहे... 

उत्तर : फारच घनिष्ट मित्र. त्यांच्याशीच फक्त आम्ही आमच्या मनातले बोलायचो. बाकीच्यांचे फक्त ऐकत रहायचो... 

प्रश्न : ग्रेट... तर हे कॉलेज सोडल्यावर तुम्ही काय काय केले, म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय... 

उत्तर : काही काळ न्यायाधीश होतो... सोडले मध्येच. नंतरचे सांगण्यासारखे काही नाही... 

प्रश्न : हरकत नाही. पण इतका वेळ झाला, तुमचे नाव विचारायचे राहून गेले. ते सांगण्यात काही अडचण? 

उत्तर : केशवराव म्हणतात मला... 

प्रश्न : काय सांगताय काय? नाव केशवराव, काही काळ न्यायाधीश आणि शिवरामपंतांचे वर्गमित्र... म्हणजे ‘काळ’मध्ये आलेला आणि प्रचंड गाजलेला पण आता विस्मरणात गेलेला लेख तुमच्यासंदर्भात आहे? ‘डेक्कन कॉलेजकडे पाहून केशवरावांच्या मनात आलेले विचार...’ 

उत्तर : हो, माझीच व्यथा पोहोचवली त्या मित्राने सर्वदूर. पण ती व्यथाही आता कालबाह्य झाली. 

प्रश्न : म्हणजे? व्यथा संपुष्टात आली, तुमचे दुःख कमी झाले, अन्न-पाणी गोड लागते, रात्री सुखाची झोप येते. अलगुज वाजवणाऱ्या गोवाऱ्याचा तुम्हाला आता हेवा वाटेनासा झाला? 

उत्तर : कशाला जखमेवरच्या खपल्या काढताय? दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे... असह्य होत चालले आहे, राग-संताप आवरत नाही, आणि आपण काहीच करू शकत नाही ही हतबलताही आहेच. 

प्रश्न : पण का इतके निराश होताय? तुम्ही ती व्यथा मांडली तेव्हा देश पारतंत्र्यात होता, आता आपली लोकशाही पाऊण शतकाची होत आलीय. 

उत्तर : देश ज्या कारणांसाठी स्वतंत्र हवा होता, त्यांचे काय झाले? लोकशाही आली खरी, पण पुरेशी प्रगल्भ झाली का? आणि आता पुढे चाललीय की मागे? शिक्षण इतके सर्वदूर पोहोचले, पण त्या प्रमाणात माणसे शिक्षित झालीत का? 

प्रश्न : पण आता देशातील शिक्षणाचे प्रमाणही वाढलेय. तुमच्यावेळी जेमतेम पाच टक्के लोक साक्षर होते, आता तो आकडा पाऊणशेच्या पुढे गेलाय ना? 

उत्तर : म्हणजे शाळा महाविद्यालये वाढली, विद्यापीठांची संख्या वाढली, ज्ञान-विज्ञानाच्या असंख्य शाखा आल्या, अनेक प्रकारची संशोधने झाले, कित्येक विषयांवर अभ्यास होऊ लागले, पण या सर्व ठिकाणी दर्जाचे काय? आणि शाळाबाह्य मुला-मुलींची संख्या इतकी जास्त का? 

प्रश्न : जातीभेद कमी झाले, धर्माचा जाच कमी झाला, स्त्रियांचे स्वातंत्र्य वाढले, याचे थोडेफार समाधान तर वाटत असेल ना? 

उत्तर : धर्माच्या आधारावर केंद्रीय कायदे होताहेत, बलात्काराची प्रकरणे राज्य सरकारकडून दडपली जातात, जातिभेदाबद्दल तर काय बोलू? प्रश्न : देश स्वयंपूर्ण झाला अन्नधान्याच्या बाबतीत... 

उत्तर : शेतकरीवर्गाचे शाप घेऊन स्वयंपूर्ण? आणि स्वयंपूर्ण आहे तर अजूनही अर्धपोटी व कुपोषित यांची संख्या काही कोटींमध्ये कशी? 

प्रश्न : आरोग्याच्या क्षेत्रात बरेच काम झाले, सरासरी आयुर्मान वाढले किती तरी... 

उत्तर : खासगी दवाखाने किती लोकांना परवडतात? सरकारी हॉस्पिटल्सची अवस्था काय आहे? जेमतेम हजार लोक बाधित असताना अख्खा देश लॉकडाऊन करण्याची वेळ का आली? 

प्रश्न : विज्ञान व तंत्रज्ञानाने किती तरी सुखकर केले जीवन हे तरी मान्य कराल? 

उत्तर : हो, पण कशाच्या बदल्यात, पर्यावरणाचे काय केलेत? 

प्रश्न : प्रशासन आता पूर्वीइतके संथ राहिलेले नाही, पूर्वी साधी माहितीसुद्धा मिळायला यातायात करावी लागत होती. 

उत्तर : प्रशासनातील भ्रष्टाचार कमी झालाय का, माहिती अधिकारासाठी इतका संघर्ष का करावा लागला? 

प्रश्न : ‘काळ’ आणि ‘केसरी’ यांच्या अग्रलेखांवर वाढलाय तुम्ही, तर आजच्या प्रसारमाध्यमांवर तुमचा रोष असणार हे ओघानेच आले ना? 

उत्तर : तुम्हीच कबुली दिलीय ना, दर्पणाचे काम नको तितके जास्त होतेय आणि आणि दिग्दर्शनाचे काम करताच येत नाही म्हणून... 

प्रश्न : केशवराव, मी तुमची मुलाखत घेतोय आणि तुम्ही उत्तरे देण्याऐवजी मलाच प्रतिप्रश्न विचारत चाललात... 

उत्तर : माझी मुलाखत घेण्याएवढी क्षमता तुमच्यात आहे? आणि तसेही शिवरामपंतांना जे काही सांगितले त्यापेक्षा वेगळे काही मला आजही सांगायचे नाही... 

प्रश्न : पण आमच्या वाचकांसमोर ही मुलाखत ठेवल्यावर त्यांचे समाधान होणार नाही... 

उत्तर : मग शिवरामपंतांनी लिहिलेला तो लेख त्यांना वाचायला द्या... 

प्रश्न : ही कल्पना चांगली आहे, पण तुमचे आजही तेच मनोगत कायम आहे? 

उत्तर : होय, तेच! मी ते मनोगत व्यक्त केले तेव्हा डेक्कन कॉलेजचे शताब्दी वर्ष दशकभर दूर होते, आता द्विशताब्दी वर्ष सुरू झाले आहे... 

प्रश्न : आमच्या वाचकांना हे खरे नाही वाटणार की, डेक्कन कॉलेजचा सव्वाशे वर्षांपूर्वीचा विद्यार्थी भेटला, त्याचे वय दिडशे वर्षे आहे. आणि त्याची ही मुलाखत आहे... कारण रेकॉर्ड असे सांगते की, दिडशे वर्षांची व्यक्ती आजच्या जगात अस्तित्वात नाही. 

उत्तर : खरे वाटणे गरजेचे नाही. डेक्कन कॉलेज हे प्रतीक आहे एका शक्तीचे आणि केशवराव हे प्रतीक आहे एका वृत्तीचे. तेवढे खरे वाटले म्हणजे पुरे... 

प्रश्न : आता शेवटचा प्रश्न, तुम्ही काही काळ न्यायाधीश म्हणून काम केले होते. तर आजच्या न्यायसंस्थेबद्दल काही सांगाल? 

उत्तर : चला, उशीर झालाय.. निघतो मी...   

Tags: डेक्कन कॉलेज आगरकर टिळक केसरी काळ शिवराम महादेव परांजपे विनोद शिरसाठ केशवराव संपादकीय vinod shirsath deccan collage nyayadhish judiciary sadhana editorial Kesavrao weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

 1. Prashnat Arwey- 13 Oct 2020

  क्या बात है सुंदर

  save

 1. Neelima Deshpande- 13 Oct 2020

  कल्पना खूप छान वाटली.'काळ'मधला तो लेख छापला तर आवडेल.

  save

 1. Yashwant Ranshevre- 19 Oct 2020

  Excellent interview

  save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके