डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

लक्ष्मीकांत देशमुख यांचे ‘आऊट ऑफ द बॉक्स’

लक्ष्मीकांत देशमुख हे प्रशासनात असतानाचेच नव्हे तर प्रशासनातून निवृत्त झाल्यानंतरच्या आठ-दहा वर्षांतील त्यांचे विचार व कार्य समजून घेण्यासाठीही हे पुस्तक विशेष उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा व आवाका या पुस्तकात प्रतिबिंबित झाला आहे. त्यामुळे त्यांच्याशी वा त्यांच्या लेखनाशी कमी-अधिक परिचय असणाऱ्यांना हे पुस्तक अनेक धागे जुळवता आल्याचा व नव्याने काही कळले याचा बौद्धिक आनंद देईल. आणि जे लोक लक्ष्मीकांत यांच्याशी व त्यांच्या लेखनाशी अजिबात परिचित नाहीत, त्यांच्या मनात तो परिचय करून घेण्याचे बौद्धिक कुतूहल निर्माण करण्याची क्षमता या पुस्तकात निश्चित आहे!

लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी माझी पहिली भेट पंधरा वर्षांपूर्वी झाली. जानेवारी 2007 मध्ये, मी साधना साप्ताहिकात युवा संपादक या नात्याने पूर्णवेळ काम करू लागलो. तेव्हा डॉ.नरेंद्र दाभोलकर साधनाचे संपादक होते. त्यांनी मला केलेली पहिली सूचना अशी होती की, युवकांना वाचायला आवडेल असा एक स्तंभ सुरू करायला हवा. त्यावर मी ‘व्यासपीठ’ या शीर्षकाचा स्तंभ सुचवला होता. त्यानुसार साहित्य, संस्कृती, समाजकारण, प्रशासन, आरोग्य, शिक्षण, विज्ञान, उद्योग, व्यापार कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रांतील बारा व्यक्तींचे लेखन मिळवायचे. या कल्पनेचा विस्तार असा होता की, विशिष्ट क्षेत्रांत नितीमूल्ये जपत परिणामकारक काम केलेल्या आणि 40 ते 50 या वयोगटात असणाऱ्या व्यक्तींना प्रत्येकी तीन लेख लिहायला सांगायचे. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोण, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य हे चार घटक केंद्रस्थानी ठेवून त्यांनी ते लेख लिहावेत, अशी अपेक्षा होती. मग त्या नियोजित लेखमालेसाठी आम्ही वेगवेगळे निकष लावून बारा व्यक्तींची निवड केली. त्या सर्वांनी ठरल्याप्रमाणे लेख लिहिले. ती लेखमाला वर्षभर प्रसिद्ध झाली, विशेष लोकप्रिय ठरली आणि नंतर लगेचच पुस्तकरूपाने आली, ‘झपाटलेपण ते जाणतेपण’ हे त्या पुस्तकाचे शीर्षक. त्या पुस्तकातील काही लोकांशी तोपर्यंत माझा जुजबी परिचय होता, तर काहीही अजिबात नव्हता. मात्र लेखमाला संपल्यावर त्या सर्वांशी चांगली ओळख झाली आणि त्यानंतर अधूनमधून भेटी होत राहिल्या. त्यातील काहींनी नंतरही साधनामध्ये वेळप्रसंगी लिहिले. मात्र लक्ष्मीकांत देशमुख हे असे एकमेव आहेत; ज्यांच्याशी त्यावेळी प्रथमच भेट झाली आणि नंतरची पंधरा वर्षे ते साधनाशी अधिकाधिक जोडले गेले, मी त्यांच्या अधिक अधिक संपर्कात राहिलो.

2007 च्या सुरुवातीला मी त्यांना त्या लेखमालेची कल्पना सांगून तीन लेख लिहिण्याचे आमंत्रण द्यायला गेलो, तेव्हा ते महाराष्ट्र राज्याचे क्रीडा संचालक होते आणि त्यांचे कार्यालय पुणे येथील सेंट्रल बिल्डिंग मध्ये होते. त्यावेळी पुणे येथे होणाऱ्या युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची जय्यत तयारी चालू होती आणि त्यांच्या कार्यालयात क्रीडास्पर्धेविषयीच्या भेटीगाठी चालू होत्या; अधिकाऱ्यांच्या आणि खेळाडूंच्या, त्यांच्या पालकांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्यामुळे ते प्रसारमाध्यमांतून विशेष चर्चेत होते.

त्यानंतर वर्ष दीड वर्षाने ते कोल्हापूरचे जिल्हाधिकारी झाले, तिथल्या चार वर्षांच्या काळात त्यांची ख्याती उपक्रमशील व स्वागतशील जिल्हाधिकारी अशी आहे, हे मला अधूनमधून वाचायला व ऐकायला मिळत होते. कारण साधनाचे सर्वात जास्त लेखक, वाचक, हितचिंतक कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. त्या काळात त्यांना मी प्रशासनातील अनुभवांविषयी साधनात लेखमाला लिहावी, अशी विनंती केली होती. पण त्यांनी त्याऐवजी ‘बखर भारतीय प्रशासनाची’ या लेखमालेचा प्रस्ताव ठेवला आणि मग ती लेखमाला साधनातून पाक्षिक स्वरूपात दीड वर्ष क्रमशः प्रकाशित झाली. त्या लेखमालेचे पुस्तक करायचे ठरले तेव्हा त्या पुस्तकाचे उपशीर्षक ‘सम्यक व सकारात्मक दृष्टिकोनातून’ असे मी त्यांना न विचारता दिले होते, कारण त्या लेखमालेचा गाभा तो होता. (नंतर तीन वर्षांनी माझ्या एका पुस्तकाचे शीर्षक मी ‘सम्यक सकारात्मक’ दिले आहे.)

त्यानंतर प्रशासकीय सेवेतील त्यांची शेवटची नियुक्ती मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी)चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली, ते तिथे असताना ‘संविधान’ या हिंदी-इंग्रजी मालिकेची निर्मिती श्याम बेनेगल यांनी राज्यसभा टीव्हीसाठी केली, त्या मालिकेच्या संहितेचा (स्क्रिप्टचा) अनुवाद लक्ष्मीकांत यांना करावासा वाटला. तो साधनातून क्रमशः प्रसिद्ध करावा, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आणि मग ती मालिका साधनातून वर्षभर प्रसिद्ध झाली. तो अनुवाद आहे आणि त्यांनी पहिल्यांदा केलेला अनुवाद आहे हे सांगितले असते तर कोणालाही खरे वाटले नसते. त्यानंतर थोड्याच काळात म्हणजे 2014 मध्ये ते प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या शेवटच्या प्रशासकीय काळात मी त्यांना विचारत असे की, निवृत्तीनंतर सरकार दरबारच्या विविध प्रकारच्या पोस्ट तुम्हाला ऑफर केल्या जातील, तुम्ही कशाला प्राधान्य द्याल? तेव्हा त्यांनी प्रत्येक वेळी दिलेले उत्तर असेच होते की, ‘मी लेखन आणि प्रशासन दोन्ही एन्जॉय केले आहे, मात्र निवृत्तीनंतर सरकारचे कोणतेही प्रशासकीय पद घेणार नाही. कारण लेखनाच्या आणि साहित्याच्या क्षेत्रात मला माझा उर्वरित काळ आनंदाने व्यतीत करायचा आहे.’ त्यांचे ते शब्द त्यांनी खरे करून दाखवले, गेल्या आठ वर्षांत त्यांनी राज्य व केंद्र सरकारचे कोणतेही पद स्वीकारले नाही. या काळात आठ ते दहा पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. दरम्यान 2018 मध्ये ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले.

म्हणजे 2007 ते 2018 या बारा वर्षांत मी त्यांना जवळून पाहत आलो, ऐकत आलो; त्यांच्याशी संवाद करत आलो. त्यांचे साधनातील व अन्यत्र प्रसिद्ध झालेले काही लेखन वाचत आलो, काही किमान माहिती करून घेत आलो. या बारा वर्षांपैकी आधीची सात वर्षे डॉ.नरेंद्र दाभोलकर साधनाचे संपादक होते, त्यांचे आणि लक्ष्मीकांत यांचे सूर उत्तम प्रकारे जुळत होते. तसे पाहता लक्ष्मीकांत हे कुमारवयापासून साधनाचे वाचत होते. कुमार दिवाळी अंकात त्यांची एक छोटी कविता बक्षीसपात्र ठरून प्रसिद्धही झाली होती. त्यानंतरही ते अधूनमधून साधनात लिहीत होते. 2001 दरम्यान डॉ.दाभोलकरांनी साधना साप्ताहिकाचे दहा हजार वर्गणीदार करण्याचे अभियान राबवले होते. तेव्हा लक्ष्मीकांत हे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, त्यांनी त्या अभियानात मोठा वाटा उचलला होता. त्यानंतर 2009 पासून साधना बालकुमार दिवाळी अंकाची प्रकाशनपूर्व नोंदणी मोहीम डॉ. दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर राबवली गेली. सुरुवातीच्या तीन वर्षी त्या नोंदणीचे आकडे अनुक्रमे दीड लाख, साडेतीन लाख, साडेचार लाख प्रती असे होते. त्या तिन्ही वर्षी कोल्हापूर जिल्ह्याने या अभियानात सिंहाचा वाटा उचलला होता आणि त्यासाठीची मुख्य प्रेरणा व प्रोत्साहन लक्ष्मीकांत यांचे होते. 2011 मध्ये कोल्हापूर येथे साधना साहित्य संमेलन ‘कथा’ या विषयाला केंद्रस्थानी ठेवून आयोजित केले होते, या संयोजनाच्या केंद्रस्थानी लक्ष्मीकांत देशमुख होते.

तर या संपूर्ण बारा वर्षांच्या काळात लक्ष्मीकांत यांची माझ्या मनावर अधिकाधिक ठसत गेलेली प्रतिमा म्हणजे त्यांच्यातील लेखक व प्रशासक तोडीस तोड आहेत, त्यातील कोणीही दुसऱ्यापेक्षा कमी वा जास्त नाही. दोन्ही भूमिकांमध्ये ते सारख्याच तन्मयतेने व उत्साहाने वावरतात. दोन्ही भूमिकांमधील ताणतणाव आणि यश अपयश ते सहजतेने स्वीकारतात. दोन्ही भूमिका निभावताना सर्जनशीलता लागते याची त्यांना जाणीव आहे. आणि तरीही एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर ते समांतर वाटचाल करतात, दोन्ही ठिकाणी ते आउट ऑफ द बॉक्स असे काही तरी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांच्यातील लेखक व प्रशासक हे अविभाज्य आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे! आणि हे त्यांना सहजसाध्य झाले आहे, असे ते म्हणत असले तरी ते तितकेसे खरे नाही. कारण ते इतके सोपे असते तर अशी उदाहरणे जास्त आढळली असती. लक्ष्मीकांत यांना ते साध्य झाले याचे कारण त्यांची उदारमतवादी मानसिक जडणघडण आणि पक्की वैचारिक बैठक हे तर आहेच, पण त्यांची वृत्ती प्रवृत्ती कशी आकाराला आली हे समजल्याशिवाय त्यांच्यातील लेखक व प्रशासक अविभाज्य असण्याचे आणि आऊट ऑफ द बॉक्स विचार व कृती करता येण्याचे रहस्य उलगडता येणार नाही.

प्रशासनात तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी काम केले, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक हे त्यांचे प्रशासकीय कारकिर्दीतील प्रमुख टप्पे. यातील कोणतेही पद केवळ शोभेचे वा प्रतिष्ठेचे नाही. या सर्व पदांना दैनंदिन काम हे आहेच आणि अधिकार जेवढे जास्त तेवढे वेळ ऊर्जा श्रम जास्त खर्च करावे लागतात, ताण-तणावांचा सामनाही जास्त करावा लागतो. आणि आश्चर्य हे आहे की, हे सर्व काम चालू असताना त्यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक लेख, स्तंभलेखन, अनुवाद इत्यादी इत्यादी चालू ठेवले. हे सर्व लेखन वाचनीय व वाचकप्रिय झालेले आहेच, पण त्यांनी त्यासाठी जे विषय निवडले ते विशेष महत्त्वाचे आहेत आणि त्यातून घेतलेल्या भूमिका व मांडलेले दृष्टिकोन त्याहून अधिक महत्त्वाचे आहेत, रॅशनॅलिटीच्या जवळ जाणारे आहेत. उदाहरणार्थ ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’ या बृहत्‌कादंबरीचा विषय अफगाणिस्तान हा आहे, ‘नंबर वन’ हा कथासंग्रह पूर्णतः क्रीडाक्षेत्रातील कहाण्या सांगणारा आहे, ‘पाणी पाणी’ हा कथासंग्रह नावातूनच मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करणारा आहे, ‘प्रशासननामा’ या पुस्तकात प्रशासनातील अनुभव आहेत हे स्वयंस्पष्ट आहे. तर असे हे लेखक व प्रशासक अभिन्न असलेले व्यक्तिमत्व घडले कसे, काम कसे करीत आले, याचे कुतूहल मला त्यांच्या पहिल्या भेटीपासून होते आणि दिवसेंदिवस ते अधिकाधिक वाढत गेले होते. त्यामुळे त्यांचे ते रहस्य अधिक सविस्तर व नेमकेपणाने उकलून घ्यावे आणि वाचकांसमोर ठेवावे, अशी गरज मला साधनाचा संपादक या नात्याने वाटत होती, तशी संधी 2018 या वर्षी आली.

बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला, तेव्हा त्यांची दीर्घ मुलाखत घेऊन साधना साप्ताहिकाचा एक पूर्ण अंक प्रसिद्ध करावा अशी मूळ कल्पना होती. मात्र दिवाळी सुट्ट्या आणि इतर काही कारणांमुळे उपलब्ध वेळेत ते होऊ शकले नाही. म्हणून ठरवले की, त्यांची दीर्घ मुलाखत घ्यावी आणि संमेलन संपल्यावर साधनातून क्रमशः काही अंकांत प्रसिद्ध करावी. अर्थातच ती मुलाखत घेण्यासाठी तशी आवड, समज आणि क्षमता असणारी व्यक्ती आवश्यक होती. शिवाय, लक्ष्मीकांत यांच्याशी थोडा तरी परिचय आणि त्यांच्याविषयी बऱ्यापैकी कुतूहल त्या व्यक्तीच्या मनात असणे आवश्यक होते. आणि अर्थातच प्रशासन चालते कसे, तिथे काय प्रकारचे ताणतणाव असतात, तिथली निर्णयप्रक्रिया कशी आकार घेते, याबाबतही मुलाखत घेणारी व्यक्ती जाणकार असणे आवश्यक होते.

वरील सर्व निकषांचा विचार करून आमचा तरुण मित्र किशोर रक्ताटे याला विचारले आणि त्याने ती मुलाखत घेण्यासाठी आनंदाने संमती दिली. मग मुलाखतीचा ढोबळ आराखडा आम्ही तिघांनी एकत्र बसून तयार केला. कालखंडानुसार पुढे पुढे जावे असे ठरले, म्हणजे त्या-त्या प्रशासकीय कारकिर्दीच्या टप्प्यावर किंवा दरम्यानच्या काळात कोणते लेखन कसे आकार घेत गेले हे स्पष्ट होत जाईल, असे ते गृहीतक होते. त्याप्रमाणे किशोरने त्यांच्याशी पाच-सहा बैठकांमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग केले, नंतर त्याचे शब्दांकन केले. त्यावर लक्ष्मीकांत यांनी शेवटचा हात फिरवला आणि मग एप्रिल-मे 2018 या काळातील सलग आठ अंकांमध्ये ही दीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली. अर्थातच ती विशेष वाचकप्रिय ठरली, मला स्वतःला त्यांच्या आयुष्याचा परिप्रेक्ष (परस्पेक्टिव्ह) त्यात दिसला. त्यांना स्वतःलाही आपल्या आयुष्याचे असे सिंहावलोकन व विहंगमावलोकन काळाच्या टप्प्यांत करता आल्याने, काही गोष्टी नव्याने कळल्या असाव्यात, काही नवे धागेदोरे हाती लागले असावेत. ही लेखमाला ‘प्रशासकाच्या आत दडलेला लेखक’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाली. मात्र पुस्तकरूप देताना त्यांच्यातील लेखक व प्रशासक हे दोन्ही आयाम नेमकेपणाने पकडू शकेल, असे सोपे व आकर्षक शीर्षक हवे होते. ते शीर्षक या मुलाखतीमधील उत्तरांमधून शब्दश: किंवा अप्रत्यक्षपणे डोकावत होते ‘आऊट ऑफ द बॉक्स’.

ही मुलाखत साधनात प्रसिद्ध झाली 2018 मध्ये, तिचे पुस्तक आणावे असा विचारही तेव्हापासून मनात होता; मात्र या ना त्या कारणाने ते दोनेक वर्षे मागे पडले. त्यानंतरची दोन वर्षे कोरोना संकटाची होती. आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून, उदगीर येथे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, ते औचित्य समोर ठेवून मुलाखतीचे हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत. या मुलाखतीत लक्ष्मीकांत हे प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले तोपर्यंतचा म्हणजे 2014 पर्यंतचा कालखंड समोर ठेवला आहे. त्यानंतरची चार वर्षे आणि संमेलनाध्यक्ष झाल्यानंतरची चार वर्षे म्हणजे मागील आठ वर्षांत ते पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने लिहीत आहेत, वेगवेगळे विषय हाताळत आहेत. या प्रक्रियेतून गेल्या सात-आठ वर्षांत त्यांची आठ-दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. दरम्यानच्या काळात ते साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रातही योगदान देत आहेत, प्रशासकीय कौशल्यांचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे लक्ष्मीकांत हे प्रशासनात असतानाचेच नव्हे तर प्रशासनातून निवृत्त झाल्यानंतरच्या आठ-दहा वर्षांतील त्यांचे विचार व कार्य समजून घेण्यासाठीही हे पुस्तक विशेष उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा व आवाका या पुस्तकात प्रतिबिंबित झाला आहे. त्यामुळे त्यांच्याशी वा त्यांच्या लेखनाशी कमी-अधिक परिचय असणाऱ्यांना हे पुस्तक अनेक धागे जुळवता आल्याचा व नव्याने काही कळले याचा बौद्धिक आनंद देईल. आणि जे लोक लक्ष्मीकांत यांच्याशी व त्यांच्या लेखनाशी अजिबात परिचित नाहीत, त्यांच्या मनात तो परिचय करून घेण्याचे बौद्धिक कुतूहल निर्माण करण्याची क्षमता या पुस्तकात निश्चित आहे!

(‘आऊट ऑफ द बॉक्स’ या पुस्तकाला लिहिलेले हे प्रास्ताविक आहे.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके