Diwali_4 उलट्या पावलांचा प्रवास रोखायलाच हवा!
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

उलट्या पावलांचा प्रवास रोखायलाच हवा!

अनेक समाजसुधारणा व राजकीय चळवळींचे नेतृत्व आधुनिक काळात ब्राह्मण जातीमधील व्यक्तींनी केले आहे. या संमेलनाने हा वारसा अर्थहीन केला. ज्ञान आणि अध्यापन क्षेत्रातील अनेक शतकांच्या एकाधिकारशाहीने ब्राह्मणांना गुरुत्व लाभले. त्यामुळे ब्राह्मण समूह आरक्षण मागूच शकत नाही. आजही प्रशासन, प्रसारमाध्यमे,अर्थकारण अशा अनेक ठिकाणी लोकसंख्यातील टक्केवारीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात ब्राह्मण आहेत.त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरजही नाही. संमेलनातील भाषणांचे सूर, ठरावाद्वारे व्यक्त होणारे विचार ही भूमिका ज्यांचा ब्राह्मणांनाच सार्थ अभिमान होता त्या प्रागतिक विचारधारेशी न जुळणारे आहेत. स्वत:ला अध्मात्मिक नेते मानणाऱ्या कोण्या ‘बापूनी केलेले ‘विरोध करणाऱ्यांना चोपण्याची क्षमता ठेवा हे आवाहन आणि ‘डोक्यापेक्षा डोक्यांना महत्त्व असते' हे वेदशास्त्रसंपन्न संयोजकांचे प्रतिपादन म्हणजे एकतर ‘अगतिकता आहे, नाहीतर ‘अति'पणा. पुढारलेल्या जातीचे हे संकुचित विचार म्हणजेही उलट्या पावलांचा प्रवास आहे.

दशहतवादाच्या संदर्भात ‘राजा, रात्र वैऱ्याची आहे, जागा रहा!’  हा इशारा सध्या समाजात परत-परत दिला जात आहे. तो रास्तच आहे. पण जातिव्यवस्था हा तर या देशाचा ‘महावैरी’ आहे. संत,समाजसुधारक, स्वातंत्र्यलढा, संविधान यांनी आपापल्या पद्धतीने ही बाब पुन: पुन्हा अधोरेखित केली आहे.मात्र आज त्या वैऱ्याचेच पायघड्या घालून, महामेळावे भरवून स्वागत केले जात आहे. ज्यांना परंपरेने अनेक शतके ज्ञानसत्तेचे नेतृत्व करावयास मिळाले त्या ब्राह्मण समाजाचा अखिल भारतीय बहुभाषिक मेळावा अलीकडेच पुणे येथे झाला. त्यामध्ये शेंडी, टिळा, जानवे, संध्यापठण ही ब्राह्मणाची लक्षणे म्हणून गौरविली गेली. ‘जातीतच लग्ने करा’ हा मंत्र दिला गेला. राजकीय विचारधारेपलीकडे जाऊन ब्राह्मण जातीचे उमेदवारच सत्तेच्या सिंहासनावर स्थानापन्न होतील यासाठी प्रयत्नशील रहाण्याचे ठराव करून, तसे संकल्प सोडण्यात आले. हा सारा उलट्या पावलाचा प्रवास आहे!

जातीचे संघटन हे वास्तव आज बहुपदरी, बहुआयामी व अत्यंत गुंतागुंतीचे बनले आहे. सर्वच जाती आरक्षणासाठी, सत्तेसाठी संघटित होत आहेत. मग ब्राह्मण महासंमेलनालाच लक्ष्य का करायचे, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणूनच हा गुंता नीट समजून घ्यावयास हवा.

जातिव्यवस्थेमुळे झालेला अन्याय दूर करून एकसंध राष्ट्र तयार व्हावे, या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आरक्षणाची तरतूद केली गेली. आरक्षणाच्या साहाय्याने मागास जाती समूह पुढे येतील,समाजातील अभिसरण वाढेल, जातिनिर्मूलनाच्या दृष्टीने वाटचाल होईल हा उद्देश त्यामागे होता.आरक्षणाचा सामाजिक न्यायासाठी फायदा नक्कीच झाला, पण जातिनिर्मूलनासाठी मात्र झाला नाही.आरक्षण समर्थनासाठी जाति आधारित संघटने तयार झाली, निवडणुकीच्या राजकारणासाठी त्याचा वापर प्रभावीपणे होऊ लागला आणि संघटना टिकवण्यासाठी समतेच्या तत्त्वा ऐवजी जातीची अस्मिता अधिकाधिक टोकदार बनवणे चालू झाले. यामुळे आरक्षण समर्थक फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा जप करत राहिले आणि प्रत्यक्षात यात्र जाति अंताच्या भूमिकेपासून दूर जात राहिले. शिवाय, आरक्षणाचा फायदा त्या-त्या प्रवर्गातील अधिक अडचणीत असलेल्या जातींना आणि त्या-त्या जातीतीलही अधिक अडचणीत असलेल्या गरजू व्यक्तींना व्हावा यासाठी सर्व पातळीवरील आरक्षणात क्रिमी लेअरचे सूत्र लावावे, (मात्र त्या त्या प्रवर्गातील जागा भरताना नॉन-क्रिमीलेअर उमेदवार मिळाला नाही, तर त्या जागा त्याच प्रवर्गातील क्रिमी लेअर उमेदवारासाठी आरक्षित राहतील.) या धोरणाची मागणी दलित ओबीसी नेतृत्वाने स्वत: होऊन केली पाहिजे, या विचाराला तीव्र विरोध झाला. अंमलबजावणीतील या मोठ्या उणिवेने सवर्णातील आरक्षणविरोधी मानसिकतेला बळकटी दिली आणि सामाजिक समतेचा प्रश्न आरक्षणाच्या मुद्यावरही अडखळूनच राहिला.

ज्ञानाची प्रतिष्ठा संपादन करण्याच्या संधींबरोबरच सत्ता हस्तांतरणाचाही प्रश्न होताच. महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाच्या राजकीय धुरिणत्वाकडून राजकारणाची सूत्रे मराठा समाजाकडे गेली. ते योग्यच होते.पण हीच परंपरा पुढे जाऊन ओ.बी.सी., दलित, भटके विमुक्त या घटकांच्याकडे राजकीय सत्ता जाण्याची क्षमता निर्माण व्हावयास पाहिजे होती. त्यानंतर मग त्याच क्रमाने जातिधर्माच्या पलीकडे जाऊन कार्यक्षम व स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार निवडण्याची क्षमता दृष्टीपथात येऊ शकेल. प्रत्यक्षात मात्र जातीच्या संख्या बळाच्या दबावगटाचे मैदान असे स्वरूप राजकारणाला प्राप्त झाले. ओबीसींमधील

प्रबळ जाती यात थोड्यातरी प्रभाव दाखवू शकल्या. पण ओबीसींमधील अनेक छोट्या जाती व दलित, भटके-विमुक्त यांच्यातील बहुसंख्य साधनविहीन, अज्ञानी, असंघटितच राहिले. राजकारणात त्यांचा दबावगट निर्माण होणे अवघडच झाले. ब्राह्मणासारख्या ज्या जाती परंपरेने संघटित व सत्ताधिष्ठित आहेत त्यांनी महासंमेलन भरवणे,‘कोणत्याही पक्षातील ब्राह्मण उमेदवारालाच मत द्याव असे आवाहन करणे, याचा अर्थ सत्तेच्या फेरवाटपाला सुरूंग लावला जात आहे असाच होतो. म्हणजे हा देखील उलट्या पावलाचाच प्रवास आहे.

अर्थात, एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी की, त्या मेळाव्यातील ठराव मान्य नसलेला ब्राह्मण समूहही मोठा आहे. मेळाव्याला गेलेले कित्याकजण शेंडी ठेवणे आणि जातीमध्येच लग्न या कल्पना स्वीकारणार नाहीत. परंतु तरीही ही दिशाच चूक आहे, याचा जाहीर उच्चार ठामपणे करायलाच हवा! सर्वच राजकीय पक्षांचे नेते मोठ्या उत्साहाने संमेलनात सहभागी होतात, जातीपलीकडे जाऊन सकल हिंदू संघटित करण्याचे जीवनकार्य यानणाऱ्या संघटना पुढारलेल्या जातीच्या या उद्दाम अलगतावादी ठरावावर मौन गिळून गप्प बसतात, त्यावेळीतर हे अधिक महत्त्वाचे ठरते. आम्हांला याची कल्पना आहे की मेळाव्याला न आलेल्या बहुसंख्य ब्राह्मणसमाजाला मेळाव्यातील मतप्रदर्शन, ठराव मान्य आहेत असे नाही. पण आजचे त्यांचे मौन ही मूकसंमती मानली जाण्याचा मोठा धोका आहे. म्हणून आम्ही ही जातधार्जिणी, अलगतावादी विचारसरणी राष्ट्रीय एकात्मतेसाठी ठामपणे नाकारतो, हा आवाज बुलंद आणि संघटित होण्याची कधी नव्हे एवढी गरज आज आहे. जातनिर्मूलन हा अग्रक्रमाचा विषय आहे, असे मानणाऱ्या समतावादी संघटनांपुढचे हे मोठे व महत्त्वाचे आव्हान आहे असे आम्हांला वाटते.

अनेक समाजसुधारणा व राजकीय चळवळींचे नेतृत्व आधुनिक काळात ब्राह्मण जातीमधील व्यक्तींनी केले आहे. या संमेलनाने हा वारसा अर्थहीन केला. ज्ञान आणि अध्यापन क्षेत्रातील अनेक शतकांच्या एकाधिकारशाहीने ब्राह्मणांना गुरुत्व लाभले. त्यामुळे ब्राह्मण समूह आरक्षण मागूच शकत नाही. आजही प्रशासन, प्रसारमाध्यमे,अर्थकारण अशा अनेक ठिकाणी लोकसंख्यातील टक्केवारीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात ब्राह्मण आहेत.त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरजही नाही. संमेलनातील भाषणांचे सूर, ठरावाद्वारे व्यक्त होणारे विचार ही भूमिका ज्यांचा ब्राह्मणांनाच सार्थ अभिमान होता त्या प्रागतिक विचारधारेशी न जुळणारे आहेत. स्वत:ला अध्मात्मिक नेते मानणाऱ्या कोण्या ‘बापूनी केलेले ‘विरोध करणाऱ्यांना चोपण्याची क्षमता ठेवा हे आवाहन आणि ‘डोक्यापेक्षा डोक्यांना महत्त्व असते  हे वेदशास्त्रसंपन्न संयोजकांचे प्रतिपादन म्हणजे एकतर ‘अगतिकता आहे, नाहीतर ‘अति पणा. पुढारलेल्या जातीचे हे संकुचित विचार म्हणजेही उलट्या पावलांचा प्रवास आहे.

प्रश्न पुणे येथील ब्राह्मण महामेळाव्यातील विचारमंथनाचाही नाही. खरा मुद्दा आहे- जातनिर्मूलनाचा निर्धार कसा प्रगट होईल? संत आणि समाजसुधारक यांनी जातीप्रथेला विरोध केला ते बरोबर की चूक, याचे उत्तर येते ‘बरोबर. जन्मजात उचनीचता जोपासणारी जात असावी की नसावी, याचे उत्तर येते ‘नसावी . राष्ट्रीय एकात्मतेला जात तारक की मारक, याला जबाब मिळतो ‘मारक . पण ही सारे उत्तरे देणाऱ्यांना पुढचा प्रश्न जर विचारला की‘तुम्हांला तुमच्या जातीचा अभिमान आहे का?  तर मात्र उत्तर ठामपणे होकारार्थी येते. संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनात तीस वर्षांपूर्वी जय प्रकाशजींनी घोषणा दिली, ‘जानवे तोडा- माणसे जोडा आणि आज वाटचाल चालू आहे, ‘जानवी जोडा- माणसे तोडा.

यावरचा उपाय सोपा नाही. स्वजातीचे कठोर टीकाकार बनावयास हवे, जाणीवपूर्वक आंतरजातीय विवाहांना पाठबळ द्यावयास हवे, जात ही संपूर्णत: अवैज्ञानिक व राष्ट्रीय एकात्मतेला घातक बाब आहे, असा थेट संस्कार शालेय स्तरापासून रुजवावयास हवा. जातिअंताचा हा लढा खूप अवघड आहे. कारण तो मानसिक परिवर्तनाबरोबरच व्यवस्था परिवर्तनाचाही संघर्ष आहे. पण जातनिर्मूलनाचा कृतिशील संवाद तरी चालू करावयास हवा. त्याचा तपशील स्वतंत्रपणे पुढील पानावर दिला आहे. अवघ्या पन्नास वर्षांपूर्वी ज्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंध होता,अशा वंशाच्या व्यक्तीला आज अमेरिका राष्ट्राध्यक्ष बनवते आहे, गतीचा कायदा पाळल्याची ती खूण आहे. आणि आम्ही मात्र पाच हजार वर्षांपासून करत असलेली चूक दुरुस्त करण्याचे सोडून पुन्हा भूतकाळाकडे पावले टाकत आहोत. म्हणून अतिशय खेदाने म्हणावे लागते: ‘हे त्यांच्या वेदसंमत परमेश्वरा, त्यांना क्षमा कर. कारण, ‘आपण काय करत आहोत हे त्यांना कळत नाही.

Tags: bramhin samuha ब्राह्मण समूह samajsudharana समाजसुधारणा akhil bhariya bahubhashik melava अखिल भारतीय बहुभाषिक मेळावा jativyavstha जातिव्यवस्था aswad spandanache utasav आस्वाद स्पंदनांचे उत्सव ulatya pavalancha pravas rokhayalach hava उलट्या पावलांचा प्रवास रोखायलाच हवा! casteism weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात