डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

लोकशाहीला लागलेले ग्रहण : तमिळनाडूतील तमाशा

तमिळनाडूत लोकशाहीची जी पायमल्ली झाली, तीवरून लोकशाहीविरोधी प्रवृत्तीचे जहर भारताच्या शरीरात कसे भिनू लागले आहे हे आपणाला कळून चुकले आहे. या विषयावरील उतारा काय असावा हे गांधीजींनी आपल्याला दाखवून दिले आहे. त्यांच्या मार्गाने जाण्याचे सामर्थ्य भारतीय जनतेत निर्माण करणे हे आज सर्व लोकशाहीवाद्यांचे कर्तव्य आहे. लोकशाहीला खग्रास ग्रहण लागण्यापूर्वी या ग्रहणातून लोकशाहीची सुटका केली पाहिजे.

लोकशाही यशस्वी करून दाखविणे ही सोपी गोष्ट नाही. कारण लोकशाही ही केवळ राज्यपद्धति नसून ती एक जीवनपद्धती आहे. एखाद्या राष्ट्राची ती जीवन पद्धती होणे ही प्रक्रिया अल्पकाळात घडणारी नाही. या मार्गात खाचखळगे असणारच. परंतु तमिळनाडूत गेल्या आठवड्यात जे घडले तो एक प्रचंड खड्डाच होता. सत्तेसाठी, संकुचित स्वार्थासाठी 'लोकशाही गेली खड्यात' असे मानणाऱ्या राजकीय क्षेत्रातील गुंडांनी जो धुडगूस मद्रास विधानसभेच्या सभागृहात घातला त्यामुळे सर्व लोकशाहीप्रेमी भारतीयांची मान शरमेने खाली झाली. भारताच्या राजकीय जीवनाला काळिमा फासणाऱ्या या गुंडांना कितीही कठोर शिक्षा दिली तरी ती अपुरीच ठरेल. स्वातंत्र्यलढ्याच्या प्रारंभीच्या काळात ध्येयवादी आणि दूरदर्शी नेत्यांनी ज्या लोकशाही मूल्यांचे बीजारोपण केले, स्वातंत्र्य संग्रामात ज्या मूल्यांचा संस्कार भारतीय जनतेवर झाला, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीने भारताच्या भावी जीवनाचा आकृतिबंध ठरविताना जी लोकशाही मूल्य आधारभूत मानून जनसामान्यांना सार्वभौम सत्ताधारी बनविले, ती लोकशाही मूल्ये पायदळी तुडविण्याचा हिडीस प्रकार तमिळनाडूत घडला. मात्र हा केवळ अपघात नाही. लोकशाही पद्धतीने कारभार करताना काही चुका या होणारच. त्या इंग्लंडमधील सत्ता-धान्यांकडूनही झाल्या आहेत व पं. नेहरूंच्या हातूनही झाल्या आहेत, परंतु अशा चुकांवर मात करता येते. न्यायासाठी चाललेल्या राजकीय चळवळी जर योग्य मार्गाने चालविल्या तर सत्ताधान्यांकडून प्रमाद झाले तरी लोकशाही प्रक्रिया मजबूत आणि निर्मळ राहू शकते. परंतु गेल्या दीड तपात भारतीय लोकशाहीचा पायाच हादरावा अशा तऱ्हेच्या अनिष्ट घटनांची मालिकाच सुरू आहे. 1975 च्या जूनमध्ये परचक्राची भीती नसताना आणि अंतर्गत बंडाळी माजण्याची शक्यता नसतानाही त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यानी आणीबाणी जाहीर करून जयप्रकाश नारायण आदि मान्यवर देशभक्त नेत्यांना तुरुंगात डांबले. त्यांच्या या कृतीमुळे भारतातील लोकशाही परंपरेवर प्रचंड आघात झाला. त्या कालखंडात संजय गांधी हे ज्या रितीने राजकीय क्षितिजावर धूमकेतूप्रमाणे अवतरले, तोही लोकशाहीवरील आघातच होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संजयला मोठेपण देऊन घराणेशाहीची अनिष्ट प्रथा रूढ केली. याचाच परिपाक म्हणजे इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. ज्या तरुण माणसाने राजकारणात कधी काम केले नाही त्याला पंतप्रधान करून काँग्रेस पक्षाने घराणेशाही भारतावर लादली आणि एका विशिष्ट परिस्थितीत विरोधी पक्षांवरील अविश्वासामुळे येथील जनतेनेही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. याच कालखंडात चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय नट राजकीय नेते म्हणून वावरू लागले. आम्ही चित्रपटसृष्टीला कमी लेखत नाही. परंतु एका क्षेत्रातील मोठेपण दुसऱ्या क्षेत्रावर लादून घेणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. प्रत्येक क्षेत्रात कला, क्रीडा, राजकारण इ.- तपश्चर्या करावी लागतेच. अशा एकनिष्ठ आणि प्रदीर्घ तपश्चर्येनंतर व्यक्तींना आपापल्या क्षेत्रात मान्यता मिळते. एखादा गायक ज्याप्रमाणे वर्षानुवर्षे गानतपस्या करतो, एखादा संशोधक ज्या प्रमाणे अविरत दीर्घकाळ ज्ञानोपासना करतो, त्याच प्रमाणे राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनाही अनेक वर्ष अभ्यास, लोकसंग्रह आणि न्यायासाठी संघर्ष करावे लागतात. पूर्वी कम्युनिस्ट व समाजवादी पक्षांमध्ये कार्यकराला पक्षात प्रवेश देण्यापूर्वी त्याची वैचारिक तयारी करून घेत, तसेच त्याला चळवळीमध्ये जबाब- दारीची कामे करावी लागत. असे काही न करताना एन. टी. रामाराव हे आंध्रामध्ये नेते बनले. एम्. जी. रामचंद्रन यांचा अण्णा द्रमुक पक्षाशी संबंध असला तरी ते विचारवंत नव्हते आणि राजकारणातील दैनंदिन चळवळीतही कधी त्यानी मोठी जबाबदारी पार पाडली नव्हती. चित्रपटसृष्टीत मात्र त्यांना अमाप लोकप्रियता प्राप्त झाली होती. या लोकप्रियतेच्या जोरावरच ते करुणानिधीना बाजूस सारून नेते बनले. त्यांच्या मुत्यूनंतर ए. आय. डी. एम. के. मध्ये वीरप्पन विरुद्ध नेडूशेळियन असा संघर्ष मुख्यमंत्री पदासाठी झाला असता तर आम्ही आक्षेप घेतला नसता. राजकारणात सत्तेसाठी संघर्ष हा चालणारच आणि पक्षांतर्गत संघर्षही तीव्र असतात याची आम्हाला पुरी जाणीव आहे; परंतु ए. आय. डी. एम. के. मध्ये नेतृत्वाचा झगडा रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी आणि त्यांची मैत्रीण जयललिया यांच्यातच सुरु झाला. घराणेशाहीचे हे बीभत्स स्वरूप आहे. जानकी यांचा राजकारणाशी सुतराम संबंध नसताना केवळ रामचंद्रन यांच्या पत्नी म्हणून त्यांच्यावर नेतृत्व लादून त्यांना कळसूत्री बाहुलीप्रमाणे वागवून सत्ता हाती ठेवायची हा वीरप्पन यांचा डाव होता. यामुळे ए. आय. डी. एम. के. मधील या संघर्षाला राजकीय संघर्ष दूरान्वयानेही म्हणता येणार नाही. एकदा सत्ता संघर्षाने इतकी नीच पातळी गाठल्यावर त्याचे पर्यवसान कशात होणार हे समजण्यासाठी साधे व्यवहारज्ञानही पुरे. तमिळनाडूमधील राज्यपाल खुराना यांनी जानकी सरकारला मान्यता देताना अकारण घाई केली. एकदा सत्ता हातात आल्यावर, विरोधकांचा निःपात करण्या साठी पांडियन-वीरप्पन यांनी वाटेल ते केले. पांडियन या इसमास स्पीकर ज्यांनी केले त्यांनी संसदीय कार्य पद्धतीचे थडगेच रचले असे म्हणावयास हरकत नाही. पूर्वीही या गृहस्थांचे वर्तन आक्षेपार्ह होतेच. या वेळी तर त्यांनी बेवकूबपणाने वागण्याची परिसीमा गाठली. कारण न देता त्यांनी विधानसभेची बैठक तहकूब केली. पक्षांतरविरोधी कायद्याचा आधार दाखवून नेडुशेळिअन आदि सहा मंत्र्यांचे सभासदत्व रद्द केले, मात्र काँग्रेस पक्षाचा आदेश धुडकावून जानकी सरकारला पाठिंबा देणाऱ्या चार आमदारांच्या विरुद्ध कोणती ही कारवाई केली नाही. स्पीकरच्या खुर्चीवर बसू पाहणाऱ्या शिव रामनला खाली पाडणे ही पांडियन यांचीम मर्दुमकी; आणि पडल्यावर पुन्हा उठून पांडियन यांच्या मांडीवर बसणे ही शिवरामन् यांची बहादुरी! यापेक्षा अधिक म्हणजे सभागृहात पोलिसांना बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला व संसदीय कार्यपद्धतीच्या नरडीला नख लावण्यात आले. सभागृहात कोणी वेडेवाकडे वागले तर मार्शलकरवी त्या आमदारास बाहेर काढले जाते. एखादे वेळी गोंधळ अनावर झाल्यास सभापती सभागृहाचे काम स्थगित करतात. परंतु कोणत्याही परिस्थितीत पोलिसांना सभागृहात बोलाविले जात नाही. तमिळनाड असेंब्लीत मात्र अधिकारारूढ गटाने पोलिसांना बोलावून आपल्या विरोधी असलेल्या आमदारांना झोडपून काढले, पोलिसांच्या मागोमाग, आत गुंड कमी होते म्हणून की काय बाहेरचे आत घुसले व मग बेछूट हाणामारी सुरू झाली. या भाऊगर्दीत काय  घडले याचा तपशील आम्ही देऊ इच्छित नाही कारण तो कमालीचा हिडीस आहे. कोण जिंकले कोण हरले यापेक्षा भारतीय लोकशाही इथे साफ हरली. याला ज्याप्रमाणे काही गुंड माणसे जबाबदार आहेत, त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळी लोकशाहीचा पाया खचत गेला, त्या त्या वेळी भारतातील जनतेची सदसद्विवेकबुद्धी जागृत करण्यास असमर्थ ठरलेले सज्जन विचारवंत, हेही जबाबदार आहेत. आम्हीही अपराधी आहोत. अघ:पाताच्या गर्तेत देश जात असताना गांधीजी ज्याप्रमाणे प्रथम नोआखलीत आणि नंतर कलकत्त्यात गेले, तसे व्यक्तिशः अगर सामुदायिकरित्या करण्याचे धैर्य कोणी दाखविले नाही. आम्हाला जाणीव आहे की गांधीजी युगायुगांतून एकदाच जन्माला येतात; त्यांच्या मानाने आजचे नेते सुजे असले तरी सामुदायिक पुरुषार्थ पडवून आणण्यासाठी संघटित प्रयत्न झाले नाहीत हीच खरी शोकांतिका आहे. आम्हाला असे वाटते की अद्यापही वेळ गेलेली नाही. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातील समर्पणभावनेचा स्फुल्लिंग अद्यापही चेतविता येईल. धर्मांधता, देशघातकी फुटीरपणा आणि बेलगाम स्वार्थ, यांच्या विरुद्ध निर्धाराने उभे राहून खंबीरपणे चळवळ करावी लागेल. हे करताना काही व्यक्ती, काही संघटना, यांना बलिदानही करावे लागेल, परंतु याशिवाय लोकशाहीची विझु पाहणारी मशाल अन्य कोणत्याही मार्गाने पुन्हा प्रज्वलित करता येणार नाही. तमिळनाडूत लोकशाहीची जी पायमल्ली झाली, तीवरून लोकशाहीविरोधी प्रवृत्तीचे जहर भारताच्या शरीरात कसे भिनू लागले आहे हे आपणाला कळून चुकले आहे. या विषयावरील उतारा काय असावा हे गांधीजींनी आपल्याला दाखवून दिले आहे. त्यांच्या मार्गाने जाण्याचे सामर्थ्य भारतीय जनतेत निर्माण करणे हे आज सर्व लोकशाहीवाद्यांचे कर्तव्य आहे. लोकशाहीला खग्रास ग्रहण लागण्यापूर्वी या ग्रहणातून लोकशाहीची सुटका केली पाहिजे.

Tags: संविधान तमिळ नाडू   ए. आय. डी. एम. के. लोकशाही Constitution Tamil Nadu AIDMK Democracy Weekly sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके