Diwali_4 आनंद यादव यांची माघार ही तर ऐतिहासिक चूक!
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

आनंद यादव यांची माघार ही तर ऐतिहासिक चूक!

आपल्या सार्वजनिक जीवनात आयुष्याचे संचित पणाला लावण्याचे प्रसंग क्वचितच येतात, ती एका अर्थाने ऐतिहासिक संधी असते. आनंद यादव यांना त्यांच्या सुदैवाने अशी संधी आली होती, पण ती त्यांनी गमावली याचे वैषम्य वाटते. ‘संत सूर्य तुकाराम’या कादंबरीत काही आक्षेपार्ह भाग आहे असे त्यांना स्वत:ला वाटत असेल आणि तशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली असती तर त्यांची प्रतिमा उजळून निघाली असती. आणि त्या कादंबरीत काहीही आक्षेपार्ह भाग नाही, तो सर्जनशील लेखनप्रकाराचा आविष्कार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे अशी ठाम भूमिका घेऊन त्यांनी सांस्कृतिक पोलिसगिरी करणाऱ्यांची अरेरावी झुगारून दिली असती तर कदाचित अध्यक्षपद गेले असते, पण ते ‘हिरो’ठरले असते. परंतु त्यांनी या दोन्हींपैकी काहीही केले नाही. ‘कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो आणि कादंबरी मागे घेतो’ असे आनंद यादव म्हणतात तेव्हा ते मराठी साहित्याबद्दलही बोलत नाहीत आणि मराठी समाजाबद्दलही! स्वत:ला ‘विचारवंत’ म्हणवून घेणारे आपल्या विचारांची किंमत चुकवणार नसतील तर ते समाजात निष्प्रभ होणार नाहीत तर काय? आणि साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रातील नेतृत्वाला इतका बाणेदारपणा दाखवता येत नसेल तर त्यांनी राजकीय नेतृत्वाकडून कणखरपणाच्या अपेक्षा बाळगणे हे अवास्तवच नाही काय?

ऑगस्ट 2008 मध्ये प्रकाशित झालेल्या आनंद यादव लिखित ‘संतसूर्य तुकाराम या चरित्रात्मक कादंबरीत संत तुकारामांची बदनामी केलेली आहे असा शोध वारकरी संप्रदायातील एका गटाला गेल्या आठवड्यात लागला. मग या गटाने ‘आनंद यादव यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्याअध्यक्षपदावर झालेली निवड रद्द करावी अशी मागणी केली. त्यासाठी एक दिवस तुकारामांचे जन्मस्थान असलेल्या देहू गावात बंद पाळून, आनंद यादवांच्या पुतळ्याचे दहन करून दहशत निर्माण केली. आणि त्याही पुढे जाऊन ‘संत साहित्याबद्दल लिहायचे असेल तर यापुढे आमची परवानगी घ्यावी लागेल अशा आशयाचा ठराव करून हुकूमशाही प्रवृत्तीचे दर्शन घडवले. शेवटी, आनंद यादवांनी ‘या कादंबरीमुळे कोणाच्याही भावना दुखावत असतील तर मी माफी मागतो’ असे सांगून ती कादंबरी मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे निर्माण झालेला वाद हे ‘पेल्यातील वादळ’ ठरले. पण यातून साहित्य-संस्कृतीबद्दल आस्था असणाऱ्यांच्या मनात दोन प्रश्न निर्माण झाले.

1)वारकरी संप्रदायातील त्या गटाने इतकी टोकाची भूमिका का घेतली?

2)आनंद यादव यांनी माघार का घेतली?

मूळात वारकरी संप्रदायाच्या भूमिकेबाबत मुख्य प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे त्यांचा ‘संतसूर्य तुकाराम’या कादंबरीला विरोध आहे की आनंद यादवांना? एक मोठी शक्यता ही आहे की आनंदयादव यांची अ.भा.म.सा. संमेलनाच्या अध्यक्षपदावर झालेली निवड त्यांच्या हितशत्रूंना रुचलेली नाही. हे हितशत्रू आनंद यादवांनी साहित्य क्षेत्रातील मुशाफिरीमुळे निर्माण केलेले असतील किंवा पूर्वीते ज्या समरसता मंचाचे नेतृत्व करीत होते त्यातील असतील. दुसरी शक्यता ही आहे की वारकरी संप्रदायातील एका समूहाला संतांची, त्यांच्या साहित्याची चिकित्सा तर मान्य नाहीच; पण हे संत तुम्हा-आम्हा सारखी हाडामांसाची माणसेच होती हेच मान्य नाही. तुकाराम हे जन्मत:च संत होते अशी त्यांची समजूत (श्रद्धा) आहे. या दोन्ही शक्यता गृहीत धरल्या तर लक्षात येते ते हेच की ‘संत सूर्य तुकाराम’या कादंबरीला किंवा आनंद यादवांना विरोध करणारे लोक तुकारामांचा ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा खरा वारसा जाणतच नाहीत. कारण ‘संतसूर्य तुकाराम’या कादंबरीत तुकाराम नावाच्या एका सामान्य तरुणाचे रुपांतर मानवी जीवनाचा वेध घेणाऱ्या एका संतामध्ये कसे झाले याचाच आलेख आहे.

हा आलेख मांडताना तुकारामांच्या स्खलनशीलतेचे जे उल्लेख आलेले आहेत.  ते तुकारामांच्या काही अभंगांचा आधार घेऊनच आलेले आहेत आणि ते फारसे अनपेक्षित किंवा नवीन नाहीत. आपले सर्व कीर्तनकार, हरदासबुवा आणि अभ्यासकही तुकारामांच्या अभंगांचे आपापल्या सोयीनुसार अर्थ लावतात आणि तुकारामांचे चरित्र रेखाटतात. आनंद यादवांनीही कादंबरी लिहिताना असेच स्वातंत्र्य घेतले आहे, कारण 400 वर्षांपूर्वीच्या त्या कालखंडाचे आकलन करून घेण्यास अन्य साधनेच नाहीत.म्हणून अशा लोकोत्तर महापुरुषांच्या चरित्रात्मक लेखनाकडे व चरित्रात्मक कादंबऱ्यांकडे उदार दृष्टिकोनातूनच पाहिले पाहिजे. त्यामुळे अशा लेखनातील काही उल्लेखामुळे आमच्या भावना दुखावल्या असे म्हणणारे लोक कांगावा तरी करीत आहेत किंवा त्यांच्या भावना फारच उथळ आहेत असे म्हटले पाहिजे. आपले अनेक प्राचीन ग्रंथ, पोथ्या, पुराणे यांतून आलेली विकृत वर्णने आणि प्रसंग मिटक्या मारत कथन करण्याची परंपरा आपल्या कीर्तनकारांनी व हरदासबुवांनी निर्माण केलेली आहे; तीचालवून घेणाऱ्यांना ‘संतसूर्य तुकाराम’ कादंबरीतील मजकूर आक्षेपार्ह वाटत असेल तर याहून मोठी हास्यास्पद गोष्ट नाही. आनंद यादवांनी या कादंबरीत ‘पोटभरू, उथळ, कीर्तनकारांचा सुळसुळाट’ असे उल्लेख (अर्थात,तुकारामांच्या अभंगांचा आधार घेऊन) केलेले आहेत, ते आक्षेपार्ह वाटून कोणी संताप व्यक्त केला असता तर तो समजून घेता आला असता.

या वादाच्या संदर्भातला दुसरा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आनंद यादव यांनी सपशेल माघार का घेतली? गेली जवळपास पन्नास वर्षे ते मराठीच्या साहित्यक्षेत्रात आहेत. त्यांनी विविध साहित्यप्रकार हाताळले असले तरी त्यांची खरी ओळख झोंबी, नांगरणी, घरभिंती या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांमुळे आहे आणि अलीकडे ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ व ‘संतसूर्य तुकाराम’या चरित्रात्मक कादंबऱ्यांमुळे त्यांचे नाव चर्चेत आहे.1980च्या दशकात महाराष्ट्रात जी ग्रामीण साहित्य चळवळ झाली (असे मानले जाते) त्यात ते आघाडीवर होते.ते आपली वाटचाल ‘शेतमजूर ते विचारवंत’ अशी सांगतात. (स्वत:ला ‘विचारवंत’ म्हणवून घेण्याचे धाडस महाराष्ट्रात किती लोकांनी केले याचा शोध घेतला पाहिजे!) त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेअध्यक्षपद महत्व प्रयासाने (तिसऱ्या) मिळवले आहे; म्हणजे मराठी भाषा, मराठी साहित्य व मराठी समाज यांचे नेतृत्व करण्याची तीव्र इच्छा त्यांना आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी या वादातून घेतलेली माघार अधिक क्लेशदायक आहे.

आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर त्यांना ‘राज ठाकरे यांच्या भूमिके विषयी तुमचे काय मत आहे?’ असा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी उत्तर द्यायचे टाळले होते. खरे तर आगामी वर्षभरासाठी मराठी समाजाचे सांस्कृतिक नेतेपद मिळालेल्या व्यक्तीने त्या महत्त्वाच्या प्रश्नावर भाष्य न करणे हेच आक्षेपार्ह होते, पण ते फारसे कोणाच्या लक्षात आले नव्हते. आता तर ‘माफी मागणार नाही, आक्षेप घेणाऱ्यांना कादंबरी या वाङ्‌मय प्रकाराचे भान नाही’, असे म्हणूनही नंतर मात्र सपशेल माफी मागून कादंबरी मागे घेण्याची नामुष्की पत्करली आहे. त्यामुळे संमेलनाचे अध्यक्षपद हे कवचकुंडले गमावलेल्या सेनापतीसारखे झाले आहे.किंबहुना, संमेलनाच्या अध्यक्षपदावर राहण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहिलेला नाही.

आपल्या सार्वजनिक जीवनात आयुष्याचे संचित पणाला लावण्याचे प्रसंग क्वचितच येतात, ती एका अर्थाने ऐतिहासिक संधी असते. आनंद यादव यांना त्यांच्या सुदैवाने अशी संधी आली होती, पण ती त्यांनी गमावली याचे वैषम्य वाटते. ‘संत सूर्य तुकाराम’या कादंबरीत काही आक्षेपार्ह भाग आहे असे त्यांना स्वत:ला वाटत असेल आणि तशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली असती तर त्यांची प्रतिमा उजळून निघाली असती. आणि त्या कादंबरीत काहीही आक्षेपार्ह भाग नाही, तो सर्जनशील लेखनप्रकाराचा आविष्कार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे अशी ठाम भूमिका घेऊन त्यांनी सांस्कृतिक पोलिसगिरी करणाऱ्यांची अरेरावी झुगारून दिली असती तर कदाचित अध्यक्षपद गेले असते, पण ते ‘हिरो’ठरले असते. परंतु त्यांनी या दोन्हींपैकी काहीही केले नाही. ‘कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो आणि कादंबरी मागे घेतो’ असे आनंद यादव म्हणतात तेव्हा ते मराठी साहित्याबद्दलही बोलत नाहीत आणि मराठी समाजाबद्दलही! स्वत:ला ‘विचारवंत’ म्हणवून घेणारे आपल्या विचारांची किंमत चुकवणार नसतील तर ते समाजात निष्प्रभ होणार नाहीत तर काय? आणि साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रातील नेतृत्वाला इतका बाणेदारपणा दाखवता येत नसेल तर त्यांनी राजकीय नेतृत्वाकडून कणखरपणाच्या अपेक्षा बाळगणे हे अवास्तवच नाही काय?

विशेष म्हणजे ‘संतसूर्य तुकाराम’या कादंबरीला प्रस्तावना लिहून, संदर्भ ग्रंथांची यादी जोडून पहिल्या पानावर ‘संतसूर्य तुकाराम’या शीर्षकाच्या खाली कंसात ‘संशोधनपूर्वक सिद्ध केलेली वास्तववादी चरित्रात्मक कादंबरी’ असे भारदस्त स्पष्टीकरण दिलेले आहे. तुकारायांच्या कोणत्याही चरित्रापेक्षा अस्सल अशी ही कादंबरी आहे, हेच त्यांना यातून सूचित करायचे आहे. ‘केवळ भौतिक मूल्ये मानणाऱ्या भोगासक्त युगात तुकारामांचे कार्य समजून घेणे आवश्यक आहे आणि आजच्या शिक्षित समाजाला संत, संतवाङ्‌मय,संतजीवन आणि संतकार्य नीटपणे, त्याला मानवेल अशा आधुनिक वाङ्‌मयाच्या साहित्य प्रकाराच्या द्वारा समजून देण्याची गरज आहे असे वाटल्यानेच ही कादंबरी लिहिली’ असे आनंद यादव यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ‘मानियले नाही बहुमता’, ‘नाठाळांच्या माथी हाणू काठी’ असे एकापेक्षा एक प्रेरणादायी अभंग लिहिणाऱ्या तुकोबांच्या चरित्रातून आनंद यादवांना ‘संतसूर्य तुकाराम’साठी लढायला आत्मबळ मिळाले नाही याचे आश्चर्य वाटते.

चरित्रात्मक कादंबऱ्यांपासून दूर रहा!

‘आत्मचरित्र’ हा सर्वांत सोपा; तर ‘चरित्र’ हा सर्वांत अवघड लेखनप्रकार. मराठीत चांगली आत्मकथनात्मक पुस्तकं बरीच आली, पण नाव घ्यावं अशी ‘आत्मचरित्रं’ फारच थोडी आहेत. याउलट चांगली चरित्रं मात्र अनेक आली. आत्मचरित्रात ‘प्रामाणिकपणा’ महत्त्वाचा, तर चरित्र लेखनात ‘नीरक्षीरविवेक’ वृत्तीचं स्थान महत्त्वाचं. आत्मसमर्थन वा उदात्तीकरण हे दोष या दोनही लेखनप्रकारात कळत-नकळत येतच असतात. व्यक्तीच्या आयुष्यातील निवडक घटना, त्याच्या जडण-घडणीवर परिणाम करणारे प्रसंग, सभोवतालची सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक-आर्थिक परिस्थिती, यांच्या परखड विश्लेषणावरच चरित्र व आत्मचरित्राचं मोठेपण ठरत असतं. प्रत्येक व्यक्ती अनेक छोट्या-मोठ्या समूहांचा एक भाग असते, समाजाचा-व्यवस्थेचा एक घटक असते. त्यामुळे समाज व्यक्तीच्या जडण-घडणीवर परिणाम करतो आणि व्यक्तीही समाजाच्या जडण-घडणीत महत्त्वाचं योगदान करू शकते. ही परस्पर संबंधांची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असते. या सर्वप्रक्रियेचं ‘रेकॉर्ड’ ठेवणं शक्यच नसतं, त्यामुळे अनेक बाबतीत सुस्पष्ट आकलन होतच नाही.

व्यक्तीच्या भूतकालीन आयुष्यातील घटना,प्रसंग व विचार यांना तत्कालीन परिस्थिती व मन:स्थिती यांची पार्श्वभूमी असते; पण ते सर्व वर्तमानकाळाच्या कसोटीवर तपासून लिहिलं जातं. आत्मचरित्र लिहिणाऱ्या व्यक्तीला अनेक प्रसंगांचं विस्मरण झालेलं असतं, अनेक प्रसंगांचा कार्यकारणभाव कळलेला नसतो; आणि तिच्यावर अनेक पूर्वग्रहांचा पगडा असतो. चरित्र लेखनात तर हे कार्य फारच अवघड झालेलं असतं. चरित्रनायक हयात असेल, चरित्रकाराला त्याचा सहवास लाभलेला असेल आणि दोघांकडेही सारासार विचार व विश्लेषण करण्याची क्षमता असेल, तर चरित्र लेखनाचं कार्य काहीसं सोपं होतं; पण चरित्रनायक फार आधी होऊन गेलेला असेल आणि चरित्रकार त्या काळाचाही साक्षीदार नसेल तर- चरित्रनायकाच्या जीवनातील प्रसंग, भाषणं, लेखन, पत्रव्यवहार या तुटपुंज्या भांडवलावरच चरित्राची उभारणी करावी लागते.

ही शोधप्रक्रिया अतिशयरंजक असू शकते आणि मती गुंग करणारीही असू शकते. त्यामुळे मानसशास्त्र, समाजशास्त्र व इतिहास यांचं सम्यक आकलन चरित्रकाराला आवश्यक असतं. चरित्रनायकाचं जीवन, विचार व कार्य यांच्या विषयी असलेल्या माहितीचं वर्गीकरण-विश्लेषण करून त्यातील समान धागेदोरे शोधून भाष्य करणं, हे चरित्रकाराचं काम असतं. हे करताना चरित्र नायकाचं भूत-वर्तमान-भविष्य काळातील मोठेपण वा महत्त्व विशद करायचं असतं. त्यामुळे चरित्रलेखन हा एक प्रकारचा इतिहासही असतो- एखाद्या व्यक्तीला केन्द्रस्थानी मानून त्याच्या सभोवतालच्या समाजाचा, परिस्थितीचा व काळाचा लिहिलेला इतिहास. ‘ऑल हिस्ट्रीज आर कंटेंपररी’ असं म्हटलं जातं;‘बायोग्राफी’च्या बाबतीतही हे विधान खरं आहे. चरित्रकाराचे विचार व दृष्टिकोन यांचं प्रतिबिंब त्यांनी लिहिलेल्या चरित्रात पडत असतं;त्यामुळे कोणताही इतिहास किंवा चरित्र परिपूर्ण असूच शकत नाही. चरित्र नायकाशी व त्याच्या काळाशी समरस होणं, पण त्याच वेळीआवश्यक तितकी अलिप्तता राखणं, ही चरित्रकाराची मोठी कसोटी असते. या कसोटीला उतरण्यासाठी चरित्रकाराने ‘तपशील’ अचूक असल्याची काळजी घेणं जितकं आवश्यक असतं, तितकंच किंबहुना अधिक आवश्यक असतं ‘भावना व कल्पना’यांना थारा न देणं. घटना व प्रसंगाचा विपर्यास करणं, सोयीचे पुरावे निवडणं, अर्धसत्य सांगणं हे इतिहास वा चरित्रलेखनातले अक्षम्य गुन्हे मानले जातात.

युरोपात 18व्या व 19व्या शतकांत अनेक लोकात्तर व्यक्तींची चरित्रं लिहिली गेली. महाराष्ट्रात व विशेषत: मराठी भाषेत मात्र 20वंशतक हा ‘चरित्रग्रंथांचा’ सुवर्णकाळ होता. या शतकात अनेक चरित्रं लिहिली गेली, पण ‘चरित्रकार’ हे लेबल लावावं अशी (न.र. फाटक,द.न. गोखले, धनंजय कीर, म.दि. ‘डके इ.) फारच थोडी नावं आहेत. आपली उभी हयात पुरावे गोळा करण्यात, कागदपत्रांची जुळवणीकरण्यात, त्यांचं विश्लेषण करण्याच खर्च करून, पुढच्या पिढीचं वैचारिक भरण-पोषण करणारी चरित्रं लिहिणं हे चळवळी व आंदोलनं करण्याइतकंच महत्त्वाचं असतं. एकेका व्यक्तीची चरित्रं, अनेक व्यक्तींकडून व वेगवेगळ्या काळात लिहिली जाणं आणि त्यांचं पुनर्मूल्यांकन होत राहणं, हे समाज प्रगल्भतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चिन्ह मानलं जातं. पण त्याच वेळी चरित्रलेखनात काही अपप्रवृत्ती शिरकाव करणार नाहीत, याचीही काळजी घेतली पाहिजे. पुराव्यांची मोडतोड करून, घटना-आख्यायिका यांची सरमिसळ करून,कल्पनेच्या भराऱ्यामारून आणि भावनिक दृष्टिकोनातून केलेलं लेखन नाकारलं पाहिजे. या प्रकारचं लेखन ‘चरित्रात्मक कादंबरी’या नावाखाली खपवलं जातं.

पुराणातील एखाद्या व्यक्तीबद्दल चरित्रात्मक कादंबरी लिहिणं समजू शकतं; पण इतिहासकालीन व्यक्तींवर अशा कादंबऱ्या लिहिणं म्हणजे त्यांचं अवमूल्यन करण्यासारखंच आहे. ‘अल्पशिक्षित व सामान्य वाचकांसाठी आमच्या या चरित्रात्मक कादंबऱ्या आहेत’ असा युक्तिवाद त्या लेखकांकडून व प्रकाशकांकडून केला जातो. पण हा सामान्य वाचक त्या कादंबऱ्यांनाच ‘इतिहास’ समजून चालतो; त्यातल्याघटना, प्रसंग व निष्कर्ष यांनाच अंतिम सत्यसमजू लागतो. त्यामुळे अशा ऐतिहासिक व चरित्रात्मक कादंबऱ्या सामान्य वाचकांची फसवणूक करतात. कायद्याच्या दृष्टीने असं लेखन करण्यात काही गैर नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करता अशा कादंबऱ्या लिहायला परवानगीही नाकारता येणार नाही; पण नैतिक दृष्टीने हे चूकच आहे. हा एक प्रकारचा वैचारिक भ्रष्टाचार आहे!

चरित्रात्मक व ऐतिहासिक कादंबऱ्या रंजक व गोष्टीवेल्हाळ पद्धतीने लिहिलेल्याअसतात. हे लेखक अशा आविर्भावात लिहित असतात- जणू काही ते तिथे उपस्थित होते. त्यात चरित्रनायकाचे उदात्तीकरण केलेले असते आणि इतर समकालीन व्यक्तींवर नकळत अन्याय केलेला असतो. म्हणजे वास्तवापासून दूर घेऊन जाण्याचं काम या कादंबऱ्या करतात. म्हणून वाचकांना आवाहन करावेसे वाटते-वास्तवापासून दूर जायचं टाळण्यासाठी ऐतिहासिक व चरित्रात्मक कादंबऱ्यांपासून दूर रहा!

[ 6 मे 2006च्या ‘साधना’ अंकातील संपादकीय लेख (संक्षिप्त)]

Tags: नरेंद्र दाभोलकर संपादकीय वाचक मराठी कादंबरी तुकाराम sahitya chalaval साहित्यचळवळ Marathi sahitya मराठी साहित्य bharatiya maratji sahitya भारतीय मराठी साहित्य tukaramache karya तुकारामांचे कार्य abhanga अभंग chariratragrantha चरित्रग्रंथ charitratamak kadambari चरित्रात्मक कादंबर santsurya tukaram संतसूर्य तुकाराम anand yadav आनंद यादव anand yadav yanchi maghar hi tar etihasik chukach आनंद यादव यांची माघार ही तर ऐतिहासिक चूक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात