डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील या देशाच्या वाटचालीवर पुन्हा एकदा दृष्टिक्षेप टाकला आणि देशाची अवाढव्यता लक्षात घेतली तर पुढे येईल ते हेच की, असे अनेक समाजविघातक घटक या देशाने पचवले आहेत. हे समाजविघातक घटक एकूण लोकसंख्येचा विचार केला तर अत्यल्प आहेत. जसे सत्प्रवृत्त लोक अल्प (एक टक्का) आहेत, तसेच असत्‌ प्रवृत्तीचे लोकही अल्पच (एक टक्का) आहेत. उरलेला खूप मोठा समूह (98 टक्के) या दोहोंच्या सीमारेषेवर आहे. हा समूह इकडे तिकडे झुकत असतो. पण वेळ येते तेव्हा मोठी मोठी सिंहासने उलथवून टाकू शकतो, त्यामुळे विद्यमान केंद्रिय राजवटीचेही शंभर दिवस भरणार आहेत हे निश्चित!

सार्वजनिक जीवनात वावरताना काही माथेफिरू माणसे भेटतात, काही मध्ययुगीन मानसिकतेची माणसे भेटतात, ‘प्रतिगामी’ या शब्दालाही लाजवेल अशी माणसे भेटतात; तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हा बहुतांश वेळा योग्य पर्याय असतो. विशेषत: त्यांच्या तोंडून निघणारी मुक्ताफळे जोपर्यंत खासगी स्वरूपात व चारचौघात उधळली जातात तोपर्यंत तरी, त्यांना अदखलपात्र ठरवणेच योग्य असते. मात्र ती माणसे संघटितपणे व जाहीर कार्यक्रमांतून अद्वातद्वा बोलू लागतात तेव्हा त्यांची दखल घ्यावी लागते, त्यांच्या वक्तव्यांमुळे समाजातील वातावरण कलुषित होणार असेल तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईचा आग्रहही धरावा लागतो. आणि तशी कारवाई करण्यास शासनसंस्था कचरत असेल किंवा जाणीवपूर्वक टाळत असेल तर न्यायालयीन व अन्य सनदशीर मार्गांनी लढा द्यावा लागतो. अन्यथा, लोकशाही प्रक्रियेलाच बाधा निर्माण होत असते.

हे आता सांगण्याचे कारण, तशा प्रकारची मुक्ताफळे उधळणारी माणसे पूर्वीपासून सर्वत्र आहेत; पण गेल्या काही वर्षांत या देशात त्यांचे प्रमाण वाढत चालले आहे, आणि गेल्या महिन्याच्या अखेरीस त्या प्रकाराने सर्व सीमारेषा पार केल्या आहेत. दि. 17 ते 19 डिसेंबर 2021 हे तीन दिवस उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे झालेल्या धर्मसंसदेत तसा प्रकार घडला आहे. ‘इस्लामिक भारत में सनातन (हिंदू धर्म) का भविष्य’ अशी विचित्र थीम घेऊन ती धर्मसंसद झाली आहे. हिंदू रक्षा सेनेने ही धर्मसंसद आयोजित केली होती, तिच्यात हजारांहून अधिक तथाकथित संत-महंत व साधू-साध्वी सहभागी झाले होते. त्यात विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित माथेफिरूंचे प्रमाण जास्त होते. डोकी ठिकाणावर आहेत अशी माणसे तिथे अपवादानेच असावीत, कारण तेथील भाषणे असह्य होऊन केवळ एका साधूने ती धर्मसंसद सोडून निघून जाण्याचा विवेक दाखवला आहे, ‘इथली भाषणे समाजविघातक आहेत, म्हणून ही सभा सोडून मी जात आहे’ असे म्हणण्याचे धैर्य दाखवले आहे.

तिथे जी विषारी भाषणे केली गेली त्यातील काही भाषणांचे निवडकच तुकडे आतापर्यंत बाहेर आले आहेत. सर्व भाषणांचे संपूर्ण व्हिडिओ मिळाले तर किती भयानक वातावरणनिर्मिती तिथे झाली असेल याची कल्पना येईल. वस्तुत: सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या व्हिडिओंच्या दोन-चार मिनिटांच्या तुकड्यांतील वक्तव्ये शब्दांकन करून देणे म्हणजे, त्या वक्तव्यांना आणखी सर्वदूर पोहोचवण्यास हातभार लावणेच ठरणार आहे. पण तरीही, फोफावत चाललेल्या विषवल्लीचा धोका लक्षात यावा म्हणून त्यांनी जी गरळ ओकली, त्यातील काही विधाने तरी माहीत करून घेतली पाहिजेत.

रा.स्व.संघाचे पूर्वीचे प्रचारक व हिंदू रक्षा सेनेचे प्रमुख प्रबोधानंद गिरी यांनी उघडपणे असे सांगितले की, ‘म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांचे जसे शिरकाण करण्यात आले तसे भारतातील मुस्लिमांबाबत करायला हवे.’ याला त्यांनी ‘सफाई अभियान’ असे संबोधले आहे. हिंदू महासभेच्या सचिव अन्नपूर्णा भारती यांनी असे म्हटले की, ‘आपल्यातले शंभर लोक असे तयार व्हायला हवेत, जे वीस लाख मुस्लिमांना ठार करू शकतील. स्वत: मरण्याची व तुरुंगात जाण्याची तयारी असणारे हिंदू लोक पुढे आल्याशिवाय हिंदू राष्ट्र अस्तित्वात येणार नाही.’ सांभवी धाम आखाड्याचे प्रमुख स्वामी आनंदस्वरूप म्हणाले, ‘हरिद्वारमध्ये ख्रिसमस साजरा करू देऊ नका आणि मुस्लिम विक्रेत्यांवर बहिष्कार टाका.’ ते पुढे असेही म्हणाले की, ‘धर्मसंसदेत बोलला गेलेला प्रत्येक शब्द ईश्वरी वाणी आहे, त्यामुळे सरकारने ती ऐकलीच पाहिजे. अन्यथा 1857 सारख्या युद्धाला तयार राहिले पाहिजे.’

या धर्मसंसदेचे आयोजक नरसिंहानंद सरस्वती यांनी म्हटले आहे की, ‘हिंदूंनी भरपूर मुले जन्माला घालावीत आणि चांगली शस्त्रे जवळ बाळगावीत. मुस्लिम व्यक्ती 2029 मध्ये पंतप्रधान होण्यापासून रोखायचे असेल तर हे करायला हवे.’ ते आणखी एका व्हिडिओमध्ये म्हणतात, ‘हिंदूंचा प्रभाकरन होऊन एलटीटीईप्रमाणे काम करणाऱ्या हिंदू तरुणांना मी एक कोटी रुपये देईल. आणि हे काम तो जर एक वर्षाहून अधिक काळ करणार असेल तर 100 कोटी रुपये उभे करीन.’ पाटणा येथील धर्मदास महाराज म्हणाले, ‘मी जर खासदार असतो तर मनमोहनसिंग पंतप्रधान होते त्याच काळात संसदेत जाऊन त्यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून सहा गोळ्या झाडल्या असत्या.’ भारताचे संविधान हटवले पाहिजे आणि भगवे संविधान आणले पाहिजे, असे म्हणण्यापर्यंतची मजल तेथील अनेकांनी मारली आहे. या सर्व भाषणांना तिथे उपस्थित असलेल्या हजारोंनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. अलीकडेच वसिम रिझवी नावाच्या व्यक्तीने (उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचा प्रमुख राहिलेल्या) मुस्लिम धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला आणि जितेंद्र नारायण त्यागी असे नाव धारण केले आहे. धर्मसंसदेत सहभागी झालेल्या या व्यक्तीच्या मनातील मुस्लिमांबद्दलचा विखार तर आणखी अचंबित करणारा आहे.

त्याचदरम्यान (योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या) हिंदू युवा वाहिनीचे संमेलन दिल्लीत झाले. तिथे नाझी पद्धतीने सलामी देत एक प्रतिज्ञा उपस्थितांना देण्यात आली. ‘आम्ही आमच्या अंतिम श्वासापर्यंत लढत राहू. मुस्लिमांना मारू, स्वत: मरू, पण असे हिंदू राष्ट्र अस्तित्वात आणू, जिथे फक्त हिंदूंचेच वास्तव्य असेल.’ ही प्रतिज्ञा देणारी व्यक्ती म्हणजे ‘सुदर्शन न्यूज’ या टीव्ही वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, नंतर त्यांनी ही प्रतिज्ञा ट्वीट करून त्यांच्या पाच लाख फॉलोअर्सपर्यंत पोहोचवली आहे. या धर्मसंसदेच्या दरम्यानच छत्तीसगढमध्ये एका संमेलनात कालीचरण दास या साधूने नथूराम गोडसेंचा गौरव केला आहे. ‘मोहनदास गांधी यांची हत्या करून नथूरामने खूपच मोठे काम केले आहे, त्याला मी वंदन करतो.’ असे हे कालीचरण म्हणाले आहेत.

आणखी विशेष हे आहे की, हे व्हिडिओ बाहेर आल्यावर आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्या प्रत्येकाने ‘आम्ही जे बोललो त्यावर ठाम आहोत’ असे म्हटले आहे. ‘आम्ही पोलिसांना घाबरणार नाही, आमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही’ असे निर्लज्जपणे म्हटले आहे. ती प्रतिज्ञा देऊन झाल्यावर सुरेश चव्हाणके तर लगेच म्हणाले की, ‘या प्रतिज्ञेतील काही शब्दांमुळे कोणाला वाईट वाटले असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण तसे वाटावे अशीच आमची इच्छा आहे.’

वरील वक्तव्ये केवळ काही तुकडे आहेत, अशी शेकडो विधाने पुढे आली आहेत आणि आश्चर्य म्हणजे ही वक्तव्ये बाहेर येऊन व्हिडिओ प्रसारित होऊन आठवडा उलटला तरी एकाही व्यक्तीला अटक झालेली नाही. तीन-चार व्यक्तींच्या नावाने पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे एवढेच.

वेगवेगळ्या काळात सुट्या सुट्या व्यक्तींनी किंवा एकाच कार्यक्रमात एखाद-दुसऱ्या व्यक्तीने अशी भाषणे करण्याची उदाहरणे खूप आहेत, पण अशा प्रकारची व इतकी विखारी वक्तव्ये एकाच कार्यक्रमात व एकाच काळात होण्याची स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असावी. विशेष म्हणजे धर्मसंसद पार पडल्यावर हे व्हिडिओ तुकडे बाहेर आले आहेत आणि त्यानंतरच्या आठवड्यात जगभर पसरत चालले आहे. इंग्रजी व हिंदी प्रसारमाध्यमांनी त्यातही डिजिटल व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्यांची अधिक दखल घेतली आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि काही राजकीय पक्षांनीही निषेध केला आहे. भारतीय नौदलाचे माजी प्रमुख ॲडमिरल अरुण प्रकाश यांनी ‘हा सर्व प्रकार म्हणजे भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला आव्हान आहे’ असे म्हटले आहे. त्यांच्याशी सहमती दाखवणारी प्रतिक्रिया भारताचे माजी लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी दिली आहे आणि ‘संबंधितांवर कठोर कारवाई तातडीने केली पाहिेजे’ असेही म्हटले आहे. याशिवाय देशातील 75 नामवंत वकिलांनी व न्यायाधीशांनी देशाचे सरन्यायाधीश रमणा यांच्याकडे पत्र पाठवून ‘सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण स्वत:कडे घ्यावे’ असे म्हटले आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, ‘हा केवळ भारताच्या एकतेचा व एकात्मतेचा प्रश्न नसून, भारतातील कोट्यवधी मुस्लिमांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.’ जगभरातील अनेक राष्ट्रांकडून या प्रकाराबद्दल आणि दहा दिवस उलटून गेल्यानंतरही कोणतीच कारवाई केंद्र व राज्य सरकारने न केल्याबद्दल कठोर टीका केली आहे.

हा अंक 1 जानेवारीला छापायला गेला तोपर्यंत तरी केंद्रिय गृहमंत्री व पंतप्रधान यांनी या प्रकाराबद्दल चकारशब्दही काढलेला नाही. उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर असल्याने भाजप, रा.स्व.संघ, उत्तर प्रदेश सरकार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सर्वांनीच हा प्रकार घडवून आणला आहे किंवा पाठिंबा दिला आहे, किंवा मूकसंमती दिली आहे असे सर्वत्र बोलले जात आहे. तरीही औपचारिकता किंवा ढोंग म्हणूनही त्या घटनांचा निषेध करायला पंतप्रधान व गृहमंत्री तयार नाहीत. दाखवण्यापुरती कारवाई करायचेही नाव घेत नाहीत. याचा अर्थ उघड आहे- हिंदू राष्ट्र हे त्यांचे अंतिम स्वप्न आहे आणि उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक हे तत्कालीन उद्दिष्ट आहे. कोणत्या वेळी काय उपयुक्त ठरेल याबाबत त्यांचे आडाखे पक्के आहेत. म्हणजे तात्त्विक आणि व्यावहारिक या दोन्ही बाजूंनी त्यांना हे हवेच आहे! अन्यथा साधूंच्या वेषातील सैतान त्यांनी मैदानात उतरवलेच नसते.

या पार्श्वभूमीवर कोणत्याही सुबुद्ध माणसाला प्रश्न पडेल, ‘मग आता करायचे काय? प्रसारमाध्यमे आवाज उठवतील, न्यायालयीन कारवाई संथ गतीने होत राहील, विरोधी पक्ष व काही संघटना आंदोलने करतील, जगभर मोदी सरकारची छी: थू होईल; पण निगरगट्ट आणि जनमताचा मोठा पाठिंबा असलेल्या मोदी सरकारवर त्याचा काय परिणाम होणार? विरोध पक्ष दुर्बल आहेत, केंद्रिय सत्ता हटवता येणार नाही आणि हटवली तरी ही विषवल्ली नष्ट होणार नाही मग पुढे काय?’

या चिंतेवर ठोस असे उत्तर निश्चितच नाही, पण स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील या देशाच्या वाटचालीवर पुन्हा एकदा दृष्टिक्षेप टाकला आणि देशाची अवाढव्यता लक्षात घेतली तर पुढे येईल ते हेच की, असे अनेक समाजविघातक घटक या देशाने पचवले आहेत. हे समाजविघातक घटक एकूण लोकसंख्येचा विचार केला तर अत्यल्प आहेत. जसे सत्प्रवृत्त लोक अल्प (एक टक्का) आहेत, तसेच असत्‌ प्रवृत्तीचे लोकही अल्पच (एक टक्का) आहेत. उरलेला खूप मोठा समूह (98 टक्के) या दोहोंच्या सीमारेषेवर आहे. हा समूह इकडे तिकडे झुकत असतो. पण वेळ येते तेव्हा मोठी मोठी सिंहासने उलथवून टाकू शकतो, त्यामुळे विद्यमान केंद्रिय राजवटीचेही शंभर दिवस भरणार आहेत हे निश्चित!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके