Diwali_4 डिकन्स आणि ल्यूथर
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

तब्बल 29 वर्षे ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक राहिलेल्या गोविंद तळवलकरांच्या संपादकीय व लेखन कारकिर्दीची जी काही वैशिष्ट्ये सांगितली जातात, त्यात ‘त्यांनी मराठी वाचकांना इंग्रजी लेखक व इंग्रजी पुस्तके यांच्याकडे वळवले’ हे वैशिष्ट्य हमखास सांगितले जाते. डिकन्स हा तर तळवलकरांचा आवडता लेखक, त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांत त्यांनी डिकन्सचे व डिकन्सविषयीचे जे काही वाचले त्याचे सार या लेखात आले आहे.

इंग्रजी साहित्याचा जुजबी परिचयही नसलेल्या मराठी वाचकांना शेक्सपियर हे नाव माहीत असते आणि त्यानंतर ज्या काही इंग्रजी लेखकांची नावे कानावर किंवा दृष्टीस पडून परिचयाची झालेली असतात त्यात चार्ल्स डिकन्सचा नंबर कदाचित सर्वांत वरचा असेल. अशा वाचकांना शेक्सपियरच्या हॅम्लेट, ऑथल्लो, मॅकबेथ, ज्युलियस सिझर, किंग लियर, रोमिओ ॲन्ड ज्युलिएट अशा पाच-सात नाटकांची नावे माहीत असतात; त्याचप्रमाणे डिकन्सच्या पिकविक पेपर्स, डेव्हिड कॉपरफील्ड, ऑलिव्हर टि्वस्ट, हार्ड टाइम्स, ए टेल ऑफ टू सिटीज इत्यादी पाच-सहा कादंबऱ्यांची नावे ओळखीची वाटत असतात. मात्र इंग्रजी वाङ्‌मयाचे प्राध्यापक व विद्यार्थी आणि काही हौशी पत्रकार-अभ्यासक व वाङ्‌मयप्रेमी वगळले तर मराठी वाचकांनी शेक्सपियर वाचलेला नसतो तसा डिकन्सही. या पार्श्वभूीवर 7 फेब्रुवारी 2012 रोजी येत असलेल्या डिकन्सच्या 200 व्या जयंतीच्या निमित्ताने 20 पानी लेख प्रसिद्ध करीत आहोत.

तब्बल 29 वर्षे ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक राहिलेल्या गोविंद तळवलकरांच्या संपादकीय व लेखन कारकिर्दीची जी काही वैशिष्ट्ये सांगितली जातात, त्यात ‘त्यांनी मराठी वाचकांना इंग्रजी लेखक व इंग्रजी पुस्तके यांच्याकडे वळवले’ हे वैशिष्ट्य हमखास सांगितले जाते. डिकन्स हा तर तळवलकरांचा आवडता लेखक, त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांत त्यांनी डिकन्सचे व डिकन्सविषयीचे जे काही वाचले त्याचे सार या लेखात आले आहे. डिकन्सचे व्यक्तिमत्त्व, विचार, साहित्य व त्याचा सामाजिक प्रभाव यांचा परामर्श घेणारा हा लेख वाचकांना एका गूढरम्य दालनातून फेरफटका घडवून आणतो, पण लेखातील अनेक सौंदर्यस्थळांचा आस्वाद घ्यायचा असेल तर हा लेख किमान दोन वेळा वाचायला हवा. या लेखात अनेक जागतिक कीर्तीच्या लेखकांचे, अनेक पुस्तकांचे आणि त्या त्या काळातील परिस्थितीचे संदर्भ देऊन अतिशय मार्मिक विवेचन सोप्या भाषेत व ओघवत्या शैलीत केले आहे. हा लेख वाचून काही वाचक डिकन्स वाचायचा निश्चय करतील, काही वाचक भविष्यात कधीतरी डिकन्स वाचायला हवा असे मनोमन म्हणतील. आणि उरलेल्या सर्व वाचकांची इतकी पूर्वतयारी या लेखाने केलेली असेल की, यानंतर जेव्हा केव्हा डिकन्सचा वा त्याच्या लेखनाचा उल्लेख येईल तेव्हा त्यांना त्यात अधिक रूची वाटेल. काही लेख असे असतात जे वाचून झाल्यावर वाचकांना आपल्या कक्षा रुंदावल्याची जाणीव होते, हा लेख त्या प्रकारातील आहे. थोरामोठ्यांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करण्याचे प्रयोजन तरी याहून वेगळे कोणते असते?

डिकन्स वरील या लेखाबरोबरच ‘द इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकात गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या ‘हाऊ ल्यूथर वेन्ट व्हायरल’ या लेखाचा अनुवाद या अंकात प्रसिद्ध करीत आहोत. पाचशे वर्षांपूर्वी म्हणजे सोळाव्या शतकात मार्टिन ल्यूथर या धर्मगुरुने जर्मनीत पोपच्या अधिकारांना आव्हान देऊन धर्मसुधारणेची चळवळ सुरू केली. ‘बायबल’ हा दैवी ज्ञानाचा एकमेव स्रोत मानणारा आणि ज्यूंच्या विरोधात भूमिका मांडणारा ल्यूथर हे त्या काळातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते, तरीही त्याच्या चळवळीमुळे ख्रिस्ती जगताला अनेक धक्के बसले. त्या काळातील नव्या सोशल मीडियाचा वापर करून ल्यूथरने त्या चळवळीला कशी गती दिली या संदर्भातील हा लेख, अलीकडच्या काळात मध्यपूर्वेत झालेल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील उठावाच्या पार्श्वभूीवर मननीय आहे.

डिकन्स व ल्यूथर यांच्या संदर्भातील हे दोनही लेख स्थळ-काळाचे व सामाजिक बदलांचे भान देणारे आणि विचार व पुनर्विचार करण्यास उद्युक्त करणारे आहेत.  

Tags: मार्टिन ल्यूथर गोविंद तळवलकर महाराष्ट्र टाइम्स चार्ल्स डिकन्स शेक्सपियर Martin Luther Govind Talvarkar Maharashtra Times charles dickens Shakespeare weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात