डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गांधी जे उदार धोरण शीख व मुसलमान यांच्या बाबतीत स्वीकारीत होते, तेच अस्पृश्यांच्या बाबतीत स्वीकारून अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ देण्यास त्यांनी मान्यता द्यावी, असा माझा आग्रह होता. अल्पसंख्याकांच्या प्रश्नासंबंधी राउंडटेबल कॉन्फरन्समध्ये एकमत होत नाही, हे उघड झाल्यावर पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनल्ड यांनी प्रतिनिधींना सांगितले की, त्यांना लवाद म्हणून नेमल्यास ते या प्रश्नावर निर्णय देतील. प्रतिनिधींनी ही सूचना मान्य करून मॅक्डोनल्ड यांना लवाद म्हणून निर्णय घेण्यास सांगितले. या बाबतीतील समितीच्या पत्रावर माझ्याप्रमाणेच गांधीजींचीही सही होती.

पहिली आणि दुसरी राउंडटेबल कॉन्फरन्स

युवा पत्रकार : मला आज आपण पहिल्या राउंडटेबल कॉन्फरन्ससंबंधी सांगावे.

डॉ. आंबेडकर : ते तर सांगेनच, पण त्यापूर्वी माझ्या जीवनातील एका दुःखद अनुभवासंबंधी मी तुला थोडे सांगणार आहे.1928 मधील ही घटना म्हणजे माझे तरुण मित्र श्रीधर बळवंत टिळक यांची आत्महत्या. मी समाज समता संघ स्थापन केल्यानंतर त्यांचा आणि माझा संबंध जुळून आला. त्यांचे विचार सामाजिक सुधारणेच्या बाबतीत जहाल होते, गायकवाड वाड्यात समाज समता संघाची शाखा स्थापन करून, त्यांनी आपल्या वाड्यात सहभोजनही घडवून आणले. त्यांचा आणि माझा संबंध सख्ख्या भावासारखा होता. सामाजिक सुधारणेच्या कार्याला गती देण्याची धडाडी त्यांच्या स्वभावात होती. केसरीच्या संपादकमंडळात श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास हवा होता. श्रीधरपंत फार भावनाप्रधान होते. 25 मे 1928 रोजी त्यांनी रेल्वेगाडीसमोर उडी टाकून आत्महत्या केली. मला त्यांच्या आत्महत्येची वार्ता कळल्यावर मोठा धक्का बसला आणि फार दुःख झाले. त्यांनी मृत्यूपूर्वी मला जे पत्र लिहिले होते, ते अजूनही मला आठवते. श्रीधरपंतांचा मृत्यू हा एक दैवदुर्विलास होता. आमच्या चळवळीचे त्यांच्या निधनामुळे फार मोठे नुकसान झाले. त्यांच्या निधनाने मला फार निराशा वाटत असताना मी जुलै महिन्यात साताऱ्याला गेलो. तिथे गेल्यावर मला असे समजले की, भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांचे एक बोर्डिंग काढले असून तिथे स्पृश्य व अस्पृश्य मुले एकत्र राहतात.

मला ते बोर्डिंग पाहण्याची फार ओढ लागली आणि संध्याकाळी मी तिथे गेलो. तेव्हा स्पृश्य व अस्पृश्य मुले एकमेकांच्या मांडीला मांडी लावून जेवायला बसली होती आणि त्या मुलांपैकीच काही जण त्यांना जोंधळ्याची भाकरी, चटणी, आमटी वाढत होते. हे विद्यार्थीच आपला स्वैपाक करतात, भांडी घासतात हे ऐकल्यावर मला फार आनंद झाला. मी भाऊरावांकडे जोंधळ्याची भाकरी मागितली आणि तिथेच बसून खाल्ली. मी भाऊरावांच्या संस्थेला 20 रुपयांची देणगी दिली. हा अनुभव मला पूर्वी कुठेही कधी आला नव्हता. भाऊराव पाटलांनी त्या गरीब मुलांच्या शिक्षणाची, राहण्याजेवणाची व्यवस्था केलेली पाहून मी त्यांना म्हणालो, ‘‘भाऊराव, तुम्ही खरे कर्ते सुधारक आहात.’’

युवा पत्रकार : आपण आता पहिल्या गोलमेज परिषदेसंबंधी सांगता ना? 

डॉ. आंबेडकर : 1930 मध्ये ब्रिटिश सरकारने ही परिषद भरविण्याचे ठरवले. सरकारने मला या कॉन्फरन्सला येण्याचे निमंत्रण दिले होते. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी मी पहिल्या राउंडटेबल कॉन्फरन्ससाठी इंग्लंडला पोहोचलो. मी आणि रावबहादूर श्रीनिवासन यांनी अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांचा पंधरा पानांचा खलिता कॉन्फरन्सला सादर केला. हिंदुस्थान स्वतंत्र होईल तेव्हा राज्यकारभाराची सूत्रे बहुसंख्याक जातीच्या हातांत राहतील, अशा वेळी अस्पृश्यांचे हितरक्षण करण्याच्या दृष्टीने भावी राज्यघटनेत आठ गोष्टींचा समावेश करणे जरुरीचे आहे, असे आम्ही सुचवले होते. या आठ गोष्टींमध्ये अस्पृश्यांना समान नागरिकत्व आणि कायदेमंडळात भरपूर प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, त्यांना समान हक्कांचा निर्वेध उपभोग घेता आला पाहिजे. भेदभावापासून संरक्षण मिळाले पाहिजे आणि गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात अस्पृश्यांचे प्रतिनिधी घेतले पाहिजेत अशा प्रमुख मागण्या आम्ही केल्या होत्या.मायनॉरिटी सबकमिटीकडे मी अस्पृश्यांना संयुक्त मतदारसंघ असले पाहिजेत, अशी भूमिका मांडली. 

युवा पत्रकार : म्हणजे आपण त्या वेळी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मागितले नाहीत?

डॉ. आंबेडकर : नाही. त्या वेळी मी अस्पृश्यांसाठी संयुक्त मतदारसंघ असावेत असे म्हटले होते. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात अस्पृश्यांना कायदेमंडळात जागा असल्या पाहिजेत, अशी मागणी मी केली होती. काँग्रेसने पहिल्या राउंडटेबल कॉन्फरन्सवर बहिष्कार पुकारला होता. त्या वेळी मिठाच्या सत्याग्रहाची चळवळ चालू होती आणि गांधी व इतर अनेक पुढारीही तुरुंगात होते. परंतु व्हॉईसरॉय यांनी गांधी व अन्य पुढाऱ्यांना मुक्त केले आणि काँग्रेसतर्फे गांधी हेच एकटे प्रतिनिधी दुसऱ्या राउंडटेबल परिषदेला जातील असे ठरले. मी दुसऱ्या राउंडटेबल कॉन्फरन्सला जाण्यापूर्वी, गांधींनी मला भेटीला बोलावले म्हणून गेलो. त्या भेटीत मी त्यांना सांगितले की, मुसलमान, शीख वगैरे अल्पसंख्याक समाजाप्रमाणे अस्पृश्य समाजाचेही स्वतंत्र अस्तित्व पहिल्या राउंडटेबल कॉन्फरन्सने मान्य केले आहे. हे आपणास मान्य आहे का? असे विचारले, तेव्हा गांधी म्हणाले, ‘‘स्पृश्य आणि अस्पृश्य ही दोन्ही एकाच समाजाची अंगे आहेत. म्हणून राजकीय बाबतीत त्यांना भिन्न करण्यास मी तयार नाही.’’मला गांधीचे हे अंतरंग कळल्यामुळे, दुसऱ्या राउंडटेबल कॉन्फरन्समध्ये त्यांच्याशी माझा संघर्ष होईल याची मला कल्पना आली. मी गांधींना म्हणालो,  ‘‘अस्पृश्य हे हिंदुधर्मीय असले तरी हिंदुधर्मात त्यांना काय हक्क आहेत? आमची स्थिती असह्य आहे.’’गांधी यावर म्हणाले, ‘‘तुम्ही काँग्रेसमध्ये या व काँग्रेसला तुमच्या म्हणण्याप्रमाणे करावयास लावा.’’ या उत्तरामुळे मी फार नाराज झालो.

युवा पत्रकार : आता आपण मला दुसऱ्या राउंडटेबल कॉन्फरन्सबद्दल सांगा. 

डॉ. आंबेडकर : दुसरी राउंडटेबल कॉन्फरन्स 7 सप्टेंबर ते1 डिसेंबर 1931 पर्यंत चालली. मायनॉरिटिज कमिटीच्या, माझ्या कल्पनेप्रमाणे 8 किंवा 10 बैठका झाल्या. 30 सप्टेंबरला रात्री आगाखान व इतर मुसलमान प्रतिनिधी यांची माझ्याबरोबर चर्चा झाली. त्यानुसार आम्ही सर्व अल्पसंख्याकांनी मिळून राजकीय हक्कांचा एक मसुदा तयार केला. कमिटीत गांधींनी त्यांची भूमिका मांडली, त्यात अस्पृश्य हे हिंदू समाजाचेच घटक आहेत, हेच त्यांनी आग्रहाने सांगितले. गांधींनी सर्व अल्पसंख्याकांशी बोलून एकमुखी राजकीय मागणी करण्याची जबाबदारी त्यांच्या अंगावर घेतली. परंतु इतर अल्पसंख्याकांप्रमाणेच अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ हवेत, या मागणीवर मी ठाम होतो. त्यामुळे गांधींनी आपणांला एकमुखी राजकीय मागणी करण्यात अपयश आले आहे, अशी कबुली दिली. आम्ही मुसलमान, अस्पृश्य, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपिअन सदस्यांनी एकमुखाने जो मसुदा तयार केला होता, तो राउंडटेबल कॉन्फरन्सच्या प्रोसीडिंग्जमध्ये छापला आहे. मी तो तुला वाचायलाच देतो, (मसुदा पत्रकारास देतात.)

गांधींनी राउंडटेबल कॉन्फरन्समध्ये अशी भूमिका घेतली की, काँग्रेस हीच सर्व भारतीयांची व पर्यायाने अस्पृश्यांचीही प्रतिनिधी आहे. मी या भूमिकेला कसून विरोध केला. कारण, गांधीजींचा हा दावा खोटा होता असे माझे मत होते. आजवर गांधीजींनी आणि काँग्रेसने अस्पृश्यता निवारणाचे कोणतेही भरीव कार्य केले नव्हते. गांधी जे उदार धोरण शीख व मुसलमान यांच्या बाबतीत स्वीकारीत होते, तेच अस्पृश्यांच्या बाबतीत स्वीकारून अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ देण्यास त्यांनी मान्यता द्यावी, असा माझा आग्रह होता. अल्पसंख्याकांच्या प्रश्नासंबंधी राउंडटेबल कॉन्फरन्समध्ये एकमत होत नाही, हे उघड झाल्यावर पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनल्ड यांनी प्रतिनिधींना सांगितले की, त्यांना लवाद म्हणून नेमल्यास ते या प्रश्नावर निर्णय देतील. प्रतिनिधींनी ही सूचना मान्य करून मॅक्डोनल्ड यांना लवाद म्हणून निर्णय घेण्यास सांगितले. या बाबतीतील समितीच्या पत्रावर माझ्याप्रमाणेच गांधीजींचीही सही होती.

पुढे 14 ऑगस्टला मॅक्डोनल्ड यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. मॅक्डोनल्ड यांच्या निवाड्याप्रमाणे अस्पृश्य हे शीख व मुसलमानांच्या प्रमाणेच स्वतंत्र अल्पसंख्यांक घटक असल्यामुळे त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते. अस्पृश्य हेच त्यांचे प्रतिनिधी निवडतील आणि स्पृश्य हिंदूंच्या निवडणुकीतही त्यांना मतदान करण्याचा अधिकार असेल, हा निवाडा होता. लवाद नेमण्याच्या संमतिपत्रावर गांधींनी सही केली होती, त्यामुळे लवादाने दिलेला निवाडा त्यांच्यावर बंधनकारक होता, असे माझे मत होते.                      संकलक : ग. प्र. प्रधान

Tags: भूमिका गांधीजी व आंबेडकर अस्पृश्यांच्या मागण्या दुसरी गोलमेज परिषद त्यांच्याच शब्दांत जीवनप्रवास डॉ. आंबेडकर Role Gandhiji and Ambedkar Demands of the Untouchables Second Round Table Conference in his own words Jeevanpravas Dr. Ambedkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके