डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डॉ . बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत : पुणे करार

मी मनाने अस्पृश्यच आहे. आपण सर्व एक आहोत. हिंदू समाजामध्ये होणारी फाटाफूट टाळण्यासाठी माझा प्राण द्यायला मी सिद्ध आहे.’’ मी म्हणालो, ‘‘प्राथमिक निवडणुकांची पद्धत दहा वर्षांनी रद्द करावी. परंतु अस्पृश्यांचे सार्वमत पंधरा वर्षांनी घ्यावे, असा माझा आग्रह आहे.’’ यावर गांधी म्हणाले, ‘‘सार्वमत पाच वर्षांनी घ्यावे.’’ आमच्या चर्चेतून अखेर तोडगा असा निघाला की, विधिमंडळात 148 जागा अस्पृश्यांना मिळाव्यात आणि मध्यवर्ती विधिमंडळातील हिंदूंना मिळणाऱ्या एकूण जागांपैकी 10 टक्के जागा अस्पृश्यांना द्याव्यात.

युवा पत्रकार : आज आपण मला पुणे करारासंबंधी काय ते सविस्तर सांगावे.

डॉ. आंबेडकर : राउंड टेबल कॉन्फरन्सहून गांधी भारतात परतताच सरकारने त्यांना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले. तुरुंगात असतानाच त्यांना रॅम्से मॅक्डोनल्ड यांनी लवाद म्हणून दिलेला निर्णय समजला. तो समजल्यावर गांधीजींनी जाहीर केले की, अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची योजना ब्रिटिश सरकार रद्द करीत नाही, तोपर्यंत ते आमरण उपोषण करतील. त्यानंतर लागलीच येरवडा तुरुंगात त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. मला गांधींच्या उपासाच्या संदर्भात ठक्करबाप्पा भेटले, तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, माझ्या अस्पृश्य वर्गाचे हक्क कमी करण्यास मी कधीही मान्यता देणार नाही. 19 सप्टेंबर 1932 रोजी मुंबईला पंडित मदनमोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व प्रमुख नेत्यांची परिषद भरली होती. त्या परिषदेस मी हजर होतो. मी परिषदेत सांगितले, ‘‘गांधीजींकडून तुम्ही पर्यायी योजना आणा, म्हणजे मी तिचा विचार करीन. मात्र अस्पृश्य बांधवांच्या हिताच्या विरोधी ती योजना असेल तर त्यात मी सहभागी होणार नाही.’’ 21 सप्टेंबरला राजगोपालाचारी आणि बॅरिस्टर जयकर यांच्या समवेत मी येरवडा तुरुंगात गांधीजींना भेटायला गेलो. मी माझी भूमिका सांगितली. त्यावर गांधीजी म्हणाले, ‘‘तुमच्या म्हणण्याला माझी पूर्ण सहानुभूती आहे.’’ यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘मला ही सहानुभूतीची भाषा आवडत नाही. मला तुमची दया नको, तुमची सहानुभूती नको. मला न्याय पाहिजे. त्या संबंधी काय ते बोला.’’ यावर गांधीजी म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणता त्या बहुतेक बाबतीत मला तुमचे म्हणणे पटले.

मॅक्डोनल्ड यांनी दिलेल्या कम्यूनल ॲवॉर्डप्रमाणे अस्पृश्यांना मिळालेले हक्क सोडण्यास तुम्ही तयार नाही, हे मी जाणतो. तुमची पॅनेलची पद्धती मी मान्य करतो. मात्र ही पॅनेलपद्धती तुमच्या सर्व राखीव जागांना लागू करावी, हे माझे म्हणणे तुम्ही मान्य करावे. तुम्ही जन्माने अस्पृश्य आहात. मी मनाने अस्पृश्यच आहे. आपण सर्व एक आहोत. हिंदू समाजामध्ये होणारी फाटाफूट टाळण्यासाठी माझा प्राण द्यायला मी सिद्ध आहे.’’ मी म्हणालो, ‘‘प्राथमिक निवडणुकांची पद्धत दहा वर्षांनी रद्द करावी. परंतु अस्पृश्यांचे सार्वमत पंधरा वर्षांनी घ्यावे, असा माझा आग्रह आहे.’’ यावर गांधी म्हणाले, ‘‘सार्वमत पाच वर्षांनी घ्यावे.’’ आमच्या चर्चेतून अखेर तोडगा असा निघाला की, विधिमंडळात 148 जागा अस्पृश्यांना मिळाव्यात आणि मध्यवर्ती विधिमंडळातील हिंदूंना मिळणाऱ्या एकूण जागांपैकी 10 टक्के जागा अस्पृश्यांना द्याव्यात. सार्वमताच्या मुदतीवर एकमत होईना, तेव्हा मुदतीचा नामनिर्देश न करता करारास अंतिम रूप द्यावे असे ठरले. गांधीजींनी करार मान्य केला. नंतर दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी करारावर सह्या केल्या. अस्पृश्यांच्या बाजूने मी आणि सवर्ण हिंदूंच्या बाजूने मदनमोहन मालवीय यांनी सही केली.

मुंबईला दुसऱ्या दिवशी भरलेल्या परिषदेत बोलताना मी म्हणालो, ‘‘गांधीजी, सप्रू आणि राजगोपालाचारी यांच्या सहकार्याने आपण या प्रश्नाचा निर्णय लावू शकलो. अशा तऱ्हेची वृत्ती गांधीजींनी गोलमेज परिषदेत दाखवली असती आणि माझ्या म्हणण्याचा त्यांनी त्याच वेळेस विचार केला असता तर त्यांच्यावर अशा तऱ्हेच्या दिव्यातून जाण्याचा प्रसंग आला नसता.’’ (थोडे थांबून...)

परिषदेमध्ये मी जे जाहीरपणे बोललो नाही, ते तुला आज सांगतो. गांधीजी मला चर्चेच्या वेळी म्हणाले, ‘‘आपला करार ही राजकीय घटना आहे, परंतु अस्पृश्यता हा शतकानुशतके चाललेला अमानुष अन्याय आहे. त्याचे निर्मूलन करावयाचे असेल तर सवर्ण हिंदूंच्या मनांतच परिवर्तन घडवून आणले पाहिजे. यासाठी मी माझ्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करीन.’’ गांधीजींच्या सद्हेतूबद्दल माझ्या मनात संदेह नव्हता. पण त्यांच्याशी बोलताना मला असे दिसून आले की, गांधीजींच्या विचारांना ज्ञानाचे अधिष्ठान नाही. ते त्यांच्या अंतःप्रेरणेप्रमाणे वेगवेगळे विचार मांडतात. त्यामुळेच प्रश्न बिकट होतात. पुणे करारात त्यांनी जे मान्य केले, ती भूमिका त्यांनी राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये घेतली नव्हती. त्या वेळी अस्पृश्यांतर्फे बोलण्याचा त्यांनाच अधिकार आहे, असे ते अहंकाराने आणि हट्टाने म्हणाले. पुणे कराराच्या वेळी अस्पृश्यांतर्फे मी जे बोललो, ते त्यांनी समजून घेतले. हे त्यांनी पूर्वीच करावयास हवे होते.

युवा पत्रकार : पुणे करार ही एक राजकीय घटना होती. राजकारणात मतभेद होतातच. मला आपल्याला असे विचारायचे आहे की, अस्पृश्यतेकडे पाहण्याच्या आपल्या आणि गांधीजींच्या भूमिकेत काही मूलभूत फरक होता का? 

डॉ. आंबेडकर : बरे झाले तू हा प्रश्न विचारलास. मी गांधीजींचे जे लेखन वाचले आणि त्यांच्याशी जे बोललो, त्यावरून मला असे स्पष्टपणे दिसून आले की, चातुर्वर्ण्य आणि जातिसंस्था याच्या नेमक्या स्वरूपाचे गांधींना आकलनच झाले नव्हते. त्यामुळे या विषयावर लिहिताना ते अधिकाधिक वैचारिक गोंधळात गुरफटून जात असत. या प्रश्नाबाबतचा त्यांचा दृष्टिकोन बालिश होता आणि ते लहान मुलाप्रमाणे स्वतःची फसवणूक करीत, असे मला वाटते. मला आश्चर्य वाटले आणि समाधानही वाटले की, 1945 नंतर गांधीजींनी चातुर्वर्ण्य आणि जातिसंस्था यांबद्दल पूर्वीपेक्षा वेगळी आणि योग्य भूमिका घेतली. परंतु या भूमिकेची तर्कशुद्ध वैचारिक मांडणी त्यांनी विस्ताराने तपशीलवार करावयास हवी होती ती केली नाही. तो त्यांचा स्वभाव नव्हता. त्यांचा वैचारिक आचरणावरच भर होता. पुणे करारानंतर ज्या देवळात हरिजनांना प्रवेश नसे, त्या देवळात ते गेले नाहीत. तसेच 1945 नंतर ज्या लग्नात वधू किंवा वर अस्पृश्य समाजातील असेल त्या लग्नालाच ते हजर रहात. अन्यथा निकटवर्तीयांच्या लग्नालाही ते जात नसत. हा त्यांचा प्रामाणिकपणा मी मान्य करतो. परंतु मला वैयक्तिक आचरणापेक्षा सामाजिक कृती महत्त्वाची वाटते. गांधीजी काँग्रेसमधील त्यांच्या अनुयायांकडून अस्पृश्यता निर्मूलनाबाबत काही करवून घेऊ शकले नाहीत.

युवा पत्रकार : काँग्रेस हा राजकीय पक्ष होता आणि त्या पक्षात सामाजिक प्रश्नांवर भिन्न मते होती? 

डॉ. आंबेडकर : गांधींनी ज्याप्रमाणे 'काँग्रेसजनांनी खादी वापरावी' ही अट घातली, तशी अट त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाबाबत घालावयास हवी होती. परंतु या बाबतीत त्यांच्या अनुयायांनी त्यांचा पराभव केला आणि गांधींनी तो मुकाट्याने सहन केला. दुसरीही मला खटकलेली एक गोष्ट मी तुला सांगतो.  पुणे करारानंतर काही दिवसांनी गांधीजींनी हरिजन फंड काढला आणि प्रत्येक जाहीर सभेत गांधीजी तो फंड गोळा करीत. त्यांनी हरिजन फंडासाठी अखिल भारतीय कमिटी करण्याचे ठरवले आणि मी या कमिटीवर यावे असे सुचवले. त्या वेळी मी त्यांना सांगितले की, हरिजन फंडापैकी काही भाग त्यांनी मला द्यावा. माझी मागणी गांधीजींनी मान्य केली नाही. त्यामुळे मी त्यांच्या समितीत गेलो नाही.

युवा पत्रकार : आपण आणि गांधीजी या दोघांनाही अस्पृश्यतेचे निर्मूलन व्हावे असे वाटत असताना, आपणां दोघांमध्ये मतभेद का झाले याबद्दल समाजवादी विचारवंत मधु लिमये यांनी त्यांच्या 'प्राइम मूव्हर्स' या पुस्तकात आपल्यावरील प्रकरणात सविस्तर विश्लेषण केले आहे. 

डॉ. आंबेडकर : मी ते वाचलेले नाही. आमच्यांत मतभेद का झाले ते मी काही वेळापूर्वी सांगितले. आमच्या दोघांच्या जीवनदृष्टींत मूलभूत फरक होता. माझ्या जीवनाला ज्ञानाचे अधिष्ठान होते. गांधीजींचा त्यांच्या अंतःप्रेरणेवर विश्वास होता. मी सतत बुद्धिनिष्ठ (रॅशनल) भूमिका घेतली आणि गांधी हे सतत त्यापेक्षा अगदी वेगळी (इर्ऱ्याशनल) भूमिका घेत. त्यामुळे आमचा संघर्ष होणे अपरिहार्य होते.

माझे आणि गांधीजींचे अनेक बाबतीत मतभेद झाले तरी त्यांनी केलेले एक उपोषण मात्र मला अत्यंत योग्य वाटले. रत्नागिरीचे पटवर्धन हे गांधींचे निष्ठावान अनुयायी होते. अस्पृश्यतेचे निर्मूलन व्हावे अशी त्यांची प्रामाणिक तळमळ होती. कायदेभंग करून ते तुरुंगात गेले असताना त्यांनी जेलच्या अधिकाऱ्यांकडे त्यांना भंग्याचे, म्हणजे संडास सफाईचे काम द्यावे अशी विनंती केली. परंतु तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी पटवर्धनांना 'नियमाप्रमाणे असे करता येणार नाही' असे सांगून त्यांची विनंती फेटाळली. त्या वेळी पटवर्धनांना पाठिंबा देण्याकरिता आणि त्यांची विनंती मान्य करून त्यांना भंग्याचे काम द्यावे म्हणून गांधीजींनी उपोषण केले. माझ्या मते गांधीजींचे म्हणणे या बाबतीत पूर्णपणे रास्त होते. सरकारने पटवर्धनांना त्यांच्या इच्छेप्रमाणे भंग्याचे काम करू द्यावयास हवे होते. जातिभेद आणि त्यातून निर्माण झालेली अस्पृश्यता नष्ट व्हायची असेल तर पटवर्धनांची विनंती मान्य करायलाच हवी. संडास साफ करण्याचे, मैला डोक्यावरून वाहून नेण्याचे घाणेरडे काम वंशपरंपरागत भंग्यांनी करण्याची रूढी आहे. सरकारनेही हे काम तुरुंगातदेखील भंग्यानेच केले पाहिजे, असे म्हणून जातिभेदाचे आणि एका अनिष्ट रूढीचे रक्षण केले. या रूढीविरुद्धची पटवर्धनांची मागणी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी गांधीजींनी केलेला उपवास मला अत्यंत स्वागतार्ह आणि योग्य वाटतो. सरकारने अखेर त्यांचे म्हणणे मान्य केले.

मी सतत सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून अस्पृश्यांच्या हक्कांसाठी झगडलो. गांधीजी मात्र हा प्रश्न मानवतावादी दृष्टिकोनातून सोडवला पाहिजे, असे म्हणत असत. मला त्यांची ही सहानुभूतीची भाषा मुळीच आवडत नसे. सामाजिक न्यायासाठी संघर्ष करताना माझे सर्व बोलणे, वागणे सुसंगत होते. परंतु हा प्रश्न हाताळताना गांधीजींच्या उक्तीमध्ये आणि त्यांच्या वेगवेगळ्या वेळेच्या कृतींमध्येही अशी सुसंगती दिसणार नाही. मी बुद्धिनिष्ठ होतो. गांधीजींच्या जीवनात श्रद्धेलाच आद्य स्थान होते. मी गांधींवर केलेली टीका तात्त्विक पातळीवरची होती. एकदा माझ्याकडे आलेल्या दलित कार्यकर्त्याने गांधींबद्दल काही अपशब्द वापरले. त्या वेळी मी त्याला म्हणालो, ‘‘मी गांधींच्यावर वैचारिक टीका करतो. तुम्ही त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करता ते बरोबर नाही. खेड्यात किंवा अन्यत्र कोठेही अस्पृश्यांवर अत्याचार झाले तर गांधीच तुमच्या बाजूने उभे राहतील, हे लक्षात ठेवा."           संकलक : ग. प्र. प्रधान

Tags: मतभेद आणि मतैक्य गांधीजी व आंबेडकर एक राजकीय घटना पुणे करार त्यांच्याच शब्दांत जीवनप्रवास बाबासाहेब आंबेडकर differences and consensus Gandhiji and Ambedkar a political event Pune Agreement in his own words Jeevanpravas Babasaheb Ambedkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके