डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चतु:सूत्रीमधील एका सूत्राकडे लक्ष वेधणारा अंक

हा संपूर्ण अंक वाचून, विज्ञान ही मूलतः विचारपद्धती आहे आणि मानवजातीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तिचा अंगिकार जास्तीत जास्त झाला पाहिजे, असेच चित्र पुढे येईल. डॉ.दाभोलकरांना तरी आणखी वेगळे काय हवे होते?

डॉ. नरेंद्र दाभोलकर (1 नोव्हेंबर 1945 - 20 ऑगस्ट 2013) यांना 67 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांतील चाळीस वर्षे ते सार्वजनिक जीवनात वावरले. शेवटची तीस वर्षे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात आणि त्याच वेळी शेवटची पंधरा वर्षे साधना साप्ताहिकाचे संपादक अशी त्यांची कारकीर्द होती. आज ते हयात असते तर येत्या 1 नोव्हेंबर रोजी 75 वर्षांचे झाले असते. सात वर्षांपूर्वी त्यांची हत्या झाली, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील साामाजिक क्षेत्रांना धक्का बसला. देशभर त्याचे तीव्र पडसाद उमटले. हत्येचा तपास आधीचे एक वर्षभर महाराष्ट्र पोलिसांकडे होता आणि नंतरची सहा वर्षे सीबीआयकडे आहे. अनेक पोलीस अधिकारी व त्यांच्या नेतृत्त्वाखाली तपासपथके नियुक्त केली गेली. प्रत्येक वर्ष दीड वर्षाने मोठी कारवाई करून काही गुन्हेगारांना पकडण्यात आले, न्यायालयासमोर उभे करण्यात आले, तुरुंगात ठेवण्यात आले. मात्र अद्यापही खऱ्या गुन्हेगारांबाबत संदिग्धता आहे. ही हत्या राजकीय आहे, असे त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले. ही हत्या दहशतवादी कृत्याचा भाग आहे, असे सीबीआय सांगते आहे. मात्र तपास अद्याप पूर्ण नाही.

वस्तुतः डॉ.दाभोलकर हे एका बाजूने पाहिले तर अजातशत्रू होते. म्हणजे ते जे काही विचार मांडत होते, संघर्षात्मक काम करीत होते ते सार्वजनिक हिताचेच होते, त्यात न पटण्यासारखे काही नव्हते, असे कोणत्याही नॉर्मल माणसांना वाटत आहे. काही लोकांचे त्यांच्या विचारकार्याबद्दल गैरसमज होते, मात्र डॉक्टरांची एखादी भेट किंवा त्यांचे एखादे भाषण वा पुस्तक ते गैरसमज दूर होण्यास पुरेसे ठरत होते. कारण जबरदस्त कन्व्हिसिंग पॉवर हे त्यांचे प्रधान वैशिष्ट्य होते. एकाच वेळी क्लास व मास या दोहोंच्या भावना व विचार यांना आवाहन करून परिवर्तनाला गती देण्याची ताकद त्यांच्यात होती. म्हणूनच दुसऱ्या बाजूने पाहिले तर, काही माथेफिरू व काही समाजद्रोही  लोकांच्या / गटांच्या दृष्टीने डॉ.दाभोलकर हे त्यांचे सर्वांत मोठे शत्रू होते. कोण होते हे माथेफिरू व समाजद्रोही गट? धर्माच्या नावाखाली समाजाला गाळाताच ठेवू पाहणारे आणि विज्ञानाला विरोध करून समाजाला मागे खेचू पाहणारे हे लोक / गट आहेत. आणि म्हणून त्यांच्यापैकी काहींनी डॉ. दाभोलकर यांची हत्या केली हे उघड आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या विचारकार्यातून अंनिसची चतु:सूत्री आकाराला आली होती. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे, कालसुसंगत धर्मचिकित्सा करणे आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे. ही चार सूत्रे लक्षात घेता, तो केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाचा कृतिकार्यक्रम नव्हता; समाजपरिवर्तन आणि व्यवस्थापरिवर्तन या मार्गावरची ती धाव होती. अर्थात, आपण ज्या कार्यक्षेत्रात आहोत, तिथे कामाचा विचार दशकांच्या नव्हे तर शतकांच्या कालावधीत करावयास हवा, याचे त्यांना पुरेपूर भान होते. धर्म आणि विज्ञान यांच्यातील संघर्ष पुरातन आहे आणि विज्ञानयुगात जगत असलेल्या समाजावर खऱ्या/खोट्या धर्माचा पगडा किती जबरदस्त आहे, याचा प्रत्यय त्यांना रोज येत होता. म्हणूनच ‘आम्हीच खरे धार्मिक’ या विषयावर दोन तासांचे भाषण डिझाईन करायचे आणि वर्षभर वेळ काढून त्याच एका विषयावर महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख लहान-मोठ्या गावांमधून ती भाषणे देत फिरायचे, अशी महत्त्वाकांक्षी योजना त्यांच्या मनात घोळत होती.

या पार्श्वभूमीवर, डॉ.दाभोलकर यांची स्मृती म्हणून ‘धर्म आणि विज्ञान’ या दोन्ही विषयांवर साधनाने मागील सात वर्षांत अनेक लेख व काही विशेषांक सादर केले आहेत. हमीद दलवाई यांचे विचार व कार्य यांना नव्याने उजाळा देण्याचा प्रयत्न हा त्याच प्रक्रियेचा भाग होता, ‘विज्ञान आणि समाज’ या विषयावर काढलेला विशेषांकही त्यासाठीच होता. आणि तीच साखळी पुढे घेऊन जाण्यासाठी ‘विज्ञानाने मला काय दिले?’ आणि ‘धर्माने मला काय दिले?’ या दोन विषयांवर स्वतंत्र विशेषांक करण्याची कल्पना आमच्या मनात होती. त्यातील पहिल्या विषयावरील विशेषांक आज सादर करीत आहोत, दुसऱ्या विषयावरील विशेषांक पुढील वर्षी सादर करणार आहोत.

‘विज्ञानाने मला काय दिले?’ या विषयावर विशेषांक करण्याची कल्पना जरी बऱ्याच दिवसांपासून विचाराधीन असली तरी, इतर अनेक व्यापांमुळे ती प्रत्यक्षात आणायचा निर्णय घेतला तेव्हा हाताशी वेळ कमी होता. म्हणून डॉ.दाभोलकर व साधना यांच्याशी भावबंध असलेल्या निवडक दहा-बारा मान्यवरांना अवघ्या दहा दिवसांपूर्वी पत्र पाठवले होते. आम्हाला याची पुरेपूर कल्पना आहे की, विज्ञानशाखेत औपचारिक शिक्षण न झालेले किंवा पूर्णतः निरक्षर असलेली काही माणसेही या विषयावर उत्तम लेख लिहू शकतील. मात्र उपलब्ध कमी वेळेत अंक तयार करायचा असल्याने आणि विषयाचा गाभा इकडे-तिकडे सरकू नये याची काळजी म्हणून, सर्व मान्यवर असेच निवडले ज्यांचे औपचारिक शिक्षण विज्ञानशाखेत झालेले आहे. दुसरा भाग असा आहे की, लेख लिहिण्यासाठी आमंत्रित केलेले सर्वजण उपयोजित विज्ञानाच्या क्षेत्रात या ना त्या प्रकारे कार्यरत होते किंवा आहेत. मूलभूत विज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे लोक याच विषयावर लिहितील तेव्हा याला पूरकच पण वेगळे सूत्र पुढे येऊ शकेल; त्या विषयावरही पुढे कधी तरी विशेषांक करता येईल. तिसरा भाग असा की, 40 ते 85 वर्षे या वयोगटातील हे लोक आहेत, त्यामुळे तीन पिढ्यांचे प्रतिनिधीत्व आपोआप येईल. आणि चौथा भाग असा होता की, लेख लिहिताना ‘विज्ञानाने मला काय दिले’, असा प्रश्न स्वतःला विचारला जाईल तेव्हा साहजिकच तो लेख ‘जगाला काय दिले’ याकडे वळेल.

प्रस्तुत अंकासाठीचे पत्र गेल्यावर खूप कमी वेळ असूनही (जयंत नारळीकर यांचा अपवाद वगळता) सर्वांनी मोठ्या आत्मीयतेने लेख लिहिले आहेत. प्रभाकर देवधर आणि दत्तप्रसाद दाभोळकर या दोघांनी एक-दोन मार्मिक प्रश्न उपस्थित केले, पण सर्वांत आधी लेख पाठवले. अंकाचे मुखपृष्ठ काय असावे, याचा विचार करताना विज्ञान किंवा तंत्रज्ञान या विषयावरील पायाभूत म्हणावे असे चित्र घ्यावे असा विचार मनात होता आणि  त्यासाठी तरफेचा वापर हा एक पर्याय होता, मात्र डॉ.अभय बंग यांचा लेख आल्यावर त्या पर्यायावर शिक्कामोर्तब केले. मग सव्वादोन हजार वर्षांपूर्वीचा महान वैज्ञानिक आर्किमिडीज मुखपृष्ठावर आला. पूर्णतः निरक्षर व्यक्तीही या विषयावर लिहिण्यासाठी सक्षम असू शकते, असे आम्ही त्या पत्रात लिहिले खरे, पण आमच्या मनात तसे मोठे उदाहरण त्या वेळी तरी नव्हते. विवेक सावंत यांचा लेख आल्यावर गाडगेबाबा हे खूपच उत्कृष्ट उदाहरण पुढे आले, त्याच निकषावर कदाचित कवयित्री बहिणाबाई चौधरी हे आणखी एक मोठे उदाहरण होऊ शकते. पंडित विद्यासागर यांचा लेख वाचल्यावर, विज्ञानक्षेत्रातील त्यांची मुशाफिरी शब्दबद्ध झाली तर ती बरीच रोचक असू शकते असे वाटले. आजच्या घडीला मानसोपचार क्षेत्र ऐरणीवर असल्याने, डॉ.आनंद नाडकर्णी व डॉ. हमीद दाभोलकर या दोनही तज्ज्ञांचे लेख विशेष महत्त्वाचे आहेत. लेखक व प्रशासक या दोन्ही नात्यांनी लक्षणीय काम केले आहे ते लक्ष्मीकांत देशमुख दिवसेंदिवस राजकीय-सामाजिक बाबतीत अधिक स्पष्टपणे व्यक्त होत आहेत, या लेखातही त्याचा चांगला प्रत्यय येतो आहे. मराठी लेखनाच्या क्षेत्रात मागील एक-दीड दशक तरी, पर्यावरण हा शब्द उच्चारला तर अतुल देऊळगावकर यांचे नाव घेतले जाते, त्यांनी या लेखातही त्या विषयाकडे लक्ष वेधले आहे. सत्यजित रथ यांनी प्रत्येक माणूस आणि आपण सर्व विज्ञानाचा भाग आहोत असे सांगून, ‘विज्ञानाने मला काय दिले’ या प्रश्नालाच प्रतिप्रश्न करून मार्मिक लेख लिहिला आहे. डॅनिअलने आपल्या लेखात ‘धर्म आणि विज्ञान’ या विषयाला स्पर्श करून, पुढील वर्षीच्या नियोजित विशेषांकाची गरज अधोरेखित केली आहे.

डॉ. दाभोलकर यांनी लिहिलेले सर्व लेखन व प्रमुख भाषणे प्रसिद्ध झालेली आहेत, ते सर्व पुस्तकरूपात उपलब्धही आहेत. शिवाय, त्यांच्यावर आतापर्यंत अनेक लोकांनी अनेक लेख लिहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारकार्याची ओळख मराठी विचारविश्वात चांगली झालेली आहे. म्हणून त्यांचे किंवा त्यांच्यावरचे असे काही लेखन या अंकात घेतलेले नाही. त्याऐवजी, दोन लेख परिशिष्ट म्हणून घेतले आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची सहा पुस्तके गेल्या वर्षी हिंदीमध्ये आली आणि आता आणखी सहा पुस्तके आली आहेत. त्या अनुवादप्रकल्पाचे मुख्य संपादक म्हणून सुनीलकुमार लवटे यांनी केलेले काम पाहता, त्यांना डॉ.दाभोलकर यांचे साहित्य एकत्रित वाचताना कसे भावले, हे कळणे आवश्यक होते. त्यांच्या लेखातून ते खूपच चांगल्या व धारदार पद्धतीने प्रतिबिंबित झाले आहे. दुसरे परिशिष्ट म्हणून, प्रस्तुत संपादकाने दहा महिन्यांपूर्वी लिहिलेला व ‘कर्तव्य’वर प्रसिद्ध झालेला लेख इथे पुनर्मुद्रित केला आहे. ‘कर्तव्य’वरील लेख साधनात नसतात आणि साधनातील लेखही ‘कर्तव्य’वर नसतात, त्याला क्वचितच अपवाद केले जातात. इथे तसा अपवाद केला आहे. कारण डॉ.दाभोलकरांच्या सहवासात त्यांचा साधनातील निकटचा सहकारी म्हणून दहा वर्षे वावरताना त्यांचे जीवनचित्र (लाईफ स्केच) कसे दिसले त्याची झलक त्यात दाखवली आहे. नव्या वाचकांना ते अधिक उपयुक्त वाटेल आणि परिशिष्ट एकला ते पूरक ठरेल.

हा संपूर्ण अंक वाचून, विज्ञान ही मूलतः विचारपद्धती आहे आणि मानवजातीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तिचा अंगिकार जास्तीत जास्त झाला पाहिजे, असेच चित्र पुढे येईल. डॉ.दाभोलकरांना तरी आणखी वेगळे काय हवे होते?

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके