डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेबांनी दलितांच्या दुःखाला वाचा फोडली. त्यांच्या जीवनातून आणि लेखनातून प्रेरणा घेतलेल्या काही अनुयायांनी आपल्या जीवनातील व्यथा भेदक शब्दांत समाजापुढे मांडल्या. आधुनिक दलित साहित्याचा मूलस्रोत बाबासाहेबांचे विचार हाच आहे. या विद्रोही साहित्यामुळे मराठी साहित्य संपन्न झाले आहे. या साहित्यामुळे पांढरपेशा जगात राहणाऱ्या अनेकांना जाग आली आहे.

‘राष्ट्राचा इतिहास म्हणजे त्या राष्ट्रातील थोर पुरुषांचे चरित्रच होय’, अशा अर्थाचे एक सुप्रसिद्ध इंग्रजी सुभाषित आहे. इतिहासाकडे पाहण्याचा हा विभूतिपूजक दृष्टिकोन आम्हाला मान्य नाही. राष्ट्राचा इतिहास घडविण्यात जनसामान्यांचाही मोठा वाटा असतो. अर्थात् काही थोर नेते या जनसामान्यांची सुप्त शक्ती आणि कर्तृत्व जागृत करतात, हे सत्य आम्हाला मान्य आहे. आधुनिक भारताच्या जीवनात जनसामान्यांचे कर्तृत्व जागृत करणाऱ्या नेत्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान फार उच्च आहे. स्वातंत्र्य संग्रामात लो. टिळक, म. गांधी, पं. नेहरू, सुभाषचंद्र बोस आदींनी भारतीय जनतेला प्रेरणा आणि स्फूर्ती दिली हे खरेच. परंतु राष्ट्रप्रेम ही सर्वांच्या ठिकाणी असलेली सहजप्रेरणा असते आणि त्यामुळे पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्याचे आवाहन जनमानसाला चटकन जाऊन भिडत असते. 

डॉ. आंबेडकरांचे कार्य यापेक्षा किती तरी अवघड होते. हिंदू समाजातील चातुर्वर्ण्याच्या चक्रात जो समाज शतकानुशतके भरडून गेला होता त्या दलित समाजाचा स्वाभिमान जागृत करून आपण माणूस म्हणून जगले पाहिजे, हा निर्धार त्यांच्या मनात डॉ. आंबेडकरांना निर्माण करावयाचा होता. हिंदू धर्माचा पगडा या समाजावर होताच. पूर्वजन्मातील पापांमुळे आपण शूद्र म्हणून जन्मलो, या जन्मी वाट्याला आलेला भोग मुकाटयाने भोगला पाहिजे असेच त्यांना वाटत होते. हिंदू धर्माने शूद्र आणि अतिशूद्र यांना दैनंदिन जीवनात शृंखलाबद्ध केले आणि त्याचबरोबर कर्मविपाकाचा सिद्धांत त्यांच्या गळी उतरवून आपल्याला बांधून टाकणाऱ्या साखळ्यांचा काच सोसणे हेच धर्माचरण आहे, अशी त्यांची समजूत करून दिली. जन्म कोणी कोठे घ्यावयाचा हे कोणाच्या हातात नसते. परंतु हिंदू धर्मात जन्माधिष्ठित विषमता चातुर्वर्ण्य पद्धतीने रूढ केली. एका बाजूस, आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत असे म्हणायचे आणि त्याच वेळी काही मूठभर लेकरांना ज्ञान व संपत्ती मिळणार, असंख्य लेकरे ज्ञानापासून वंचित राहणार आणि अतिशूद्र मानला जाणारा समाज तर कोल्ह्याकुत्र्यापेक्षाही हीन अवस्थेत खितपत पडणार, अशी दुष्ट व्यवस्था करावयाची असे प्रत्यक्षात हिंदू धर्माचे दांभिक स्वरूप होते. 

या दुष्ट चक्रातून बाहेर पडले पाहिजे, हे गौतम बुद्धांनी सांगितले. बुद्धांना अनेक अनुयायी मिळाले. परंतु नंतर शंकराचार्यांनी पुन्हा वैदिक धर्माचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर बळकट झालेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या चौकटीबाहेर पडण्याचे धाडस हिंदू समाजात बसवेश्वर-चक्रधरांसारखे काही अपवाद वगळता, कोणी फारसे केले नाही. वैयक्तिक जीवनात माणुसकीने वागणारे एकनाथांसारखे काही जण होते. परंतु नाथांनीही धर्माविरुद्ध बंड केले नाही. म. गांधींना अस्पृश्यता हा हिंदु धर्मावरील कलंक वाटत होता. परंतु धर्माच्या चौकटीत राहूनच हा कलंक नाहीसा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म. फुले यांनी जातिव्यवस्था कशी निघृण आणि निर्दय आहे हे सांगून व्यक्तिगत जीवनात धडाडीने कार्य केले. तथापि त्यांचा विचार त्यावेळी समाजात रुजला असे म्हणता येणार नाही. काही व्यक्तींना फुले यांनी आधार दिला, परंतु दलित समाजाचा स्वाभिमान ते जागृत करू शकले नाहीत. आगरकर यांचे विचार क्रांतिकारक होते, परंतु प्रत्यक्ष कृतिशील जीवन ते जगू शकले नाहीत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यतेचे निर्मूलन झाले पाहिजे ही भूमिका खंबीरपणे मांडली. ते दलितांच्या जीवनाशी एकरूप झाले; परंतु महर्षी शिंदे यांना सामाजिक परिवर्तन हे समाजप्रबोधनाच्या मार्गानेच होऊ शकेल असे वाटत होते. शिवाय हे ही खरे की म. फुले आणि महर्षी शिंदे हे दलित समाजातील नसल्यामुळे दलितांना त्यांच्याबद्दल प्रेम व आदर वाटला तरी त्यांच्या शिकवणुकीकडे दलित समाज काहीसा दुरव्यानेच पाहात होता. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म. फुले यांना गुरुस्थानी मानले. अन्य विचारवंत आणि नेते यांच्या कार्याचे चिकित्सक मूल्यमापन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भावी कार्याची दिशा ठरविली. त्यांच्या विचारांत गतिमानता होती. प्रथम मंदिरप्रवेशाची चळवळ करणाऱ्या डॉ. आंबेडकरांना नंतर हिंदू धर्मात राहून आपल्याला न्याय मिळणार नाही असे वाटू लागले. केरळमध्ये नारायण गुरु या समाजसुधारकांनी इळावा समाजाला आपली वेगळी मंदिरे बांधण्यास सांगितले. परंतु कर्मवीर भाऊराव गायकवाड या डॉक्टरांच्या सहकारी मित्राचा अनुभव फारच कटू होता. त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या घरी एका पोथीचे वाचन करून त्याच्या पारायणाचा घरगुती समारंभ ठेवला असताना, सवर्ण हिंदूंनी त्यांच्या घरात शिरून भाऊरावांनी मांडलेली पूजा लाथेने उडवून दिली. या व अशा अनेक अनुभवांनंतर डॉ. आंबेडकरांना हिंदू धर्माचा त्याग करावा असे वाटू लागले. 

महात्मा गांधींच्या बरोबर पुणे करार करताना आंबेडकरांनी आपल्या मताला मुरड घातली होती. अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे हा गांधीजींचा प्रामाणिक आग्रह होता. परंतु पुणे कराराला मान्यता देणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी म. गांधींना केवळ तोंडदेखला पाठिंबा दिला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘आधी राजकीय सुधारणा’ या लो. टिळकांच्या भूमिकेचाच पगडा सतत राहिला. अप्पासाहेब पटवर्धन, गोपबंधू चौधरी, केल्लापन आदि निष्ठावान गांधीवादी कार्यकर्त्यांनी व्यक्तिशः अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न केले. स्वा. सावरकरांनी सहभोजनासारखे कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले. परंतु हे सर्व करताना दलितेतर जातींनी आपली उच्चभ्रू भूमिका सोडली नाही. या भूमिकेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तीव्र संताप येत असे. परंतु त्यांची प्रतिक्रिया केवळ भावनात्मक नसे. ज्ञान हे बाबासाहेबांच्या जीवनाचे अधिष्ठान होते. त्यांची भूमिका विवेकनिष्ठ आणि तर्कसंगत असे. हिंदू समाजाच्या इतिहासाचा त्यांनी सूक्ष्म अभ्यास केला होता. ‘शूद्र कोण होते?’ (हू वेअर दि शूद्राज्?) हा त्यांचा ग्रंथ आणि ‘जातिव्यवस्थेचा निःपात’ (अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्ट) हे त्यांचे भाषण वाचल्यावर त्यांची असामान्य बुद्धिमत्ता, गाढ व्यासंग, समाजशास्त्रीय विश्लेषण करण्याचे त्यांचे अपार सामर्थ्य यांचा पुरेपूर प्रत्यय येतो. 

दलितांना हिंदु धर्मात राहून कधीही न्याय मिळणार नाही अशी खात्री पटल्यावर डॉ. बाबासाहेबांनी ‘माझा जन्म हिंदू धर्मात झाला असला तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा केली. धर्मांतराचा निर्णय करण्यापूर्वी डॉ. आंबेडकरांनी जगातील सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला आणि अखेर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. बौद्ध धर्मात गेल्यानंतर दलित समाजाच्या मनाच्या शृंखला तुटून पडतील असा त्यांना पुरेपूर विश्वास वाटत होता. मानसिक गुलामगिरी नष्ट झाल्याशिवाय कोणताही समाज राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात न्याय्य हक्कांसाठी लढू शकणार नाही, हे बाबासाहेबांनी अचूक ओळखले होते. दलितांची मानसिक गुलामगिरी नष्ट करून त्यांची अस्मिता जागृत करणे हे महान कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. हे करतानाच, दलितेतर हिंदू समाजाची सदसद्विवेकबुद्धीही त्यांनी जागृत केली. जो दुसऱ्याला गुलाम करतो त्याचे नैतिक अध:पतन झालेले असते, हे त्यांनी स्पष्टपणे स्वतःला 'उच्चवर्णीय' समजणाऱ्या हिंदूंना सुनावले. मूठभर सनातनी सोडले तर अन्य कोणीही आंबेडकरांच्या भूमिकेचा प्रतिवाद करण्यास धजावले नाही. याचा अर्थ स्वतःला उच्च मानणाऱ्या जातीतील लोकांचे हृदयपरिवर्तन झाले, असा नाही; परंतु बौद्धिक पातळीवर आंबेडकरांची भूमिका त्यांना मान्य करावी लागली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्तिगत जीवनात कठोर बुद्धिवादी होते. कोठल्या धर्माच्या वा पंथाच्या आधाराची त्यांना आवश्यकता नव्हती. मात्र विश्वाच्या संदर्भात माणसाने संपादन केलेले ज्ञान किती अल्प आहे याची जाणीव त्यांना होती. काही थोड्या व्यक्ती बुद्धिनिष्ठ वृत्ती ठेवून नीतीने वागतील आणि अन्य माणसांबरोबर भ्रातृभाव ठेवू शकतील हे खरे असले तरी धर्म ही सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर योग्य ती बंधने घालणारी मोठी शक्ती आहे आणि बहुसंख्य माणसांच्या जीवनात धर्माला महत्त्वाचे स्थान आहे हे त्यांनी ओळखले होते. आपण आपल्या अनुयायांना जो नवा धर्म देणार तो नीतीवर अधिष्ठित असला पाहिजे, त्या धर्मामुळे माणसांना आपल्या दु:खित, पीडित बांधवांच्याबद्दल करुणा वाटली पाहिजे, तो कर्मकांडापासून अलिप्त असला पाहिजे असे बाबासाहेबांना वाटत होते आणि म्हणूनच त्यांनी स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन आपल्या अनुयायांना तो धर्म स्वीकारावयास लावला. बाबासाहेब प्रज्ञावान होते आणि त्यांच्या मनातील करुणेचे पाझर कधी आटले नाहीत; म्हणूनच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. 

ज्या धर्मातून मूलतत्ववाद निर्माण होईल आणि परिणामतः माणसे आक्रमक आणि हिंसक बनतील तो धर्म जगाला कल्याणकारक होऊ शकणार नाही अशी बाबासाहेबांची धारणा होती. सामाजिक क्रांतीला अग्रस्थान देणाऱ्या डॉ. आंबेडकरांना राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये समतेच्या तत्त्वाचा विजय झाला नाही तर सामाजिक क्रांती फलद्रूप होऊ शकणार नाही याचे पुरेपूर भान होते. ‘इंडिपेंडंट लेबर पार्टी’ स्थापन करताना भारतातील श्रमिकांची एकजूट करून राजकीय क्षेत्रात लोकशाहीचा झेंडा फडकावयाचा आणि आर्थिक क्षेत्रात समता आणावयाची, असे स्वप्न ते पाहात होते. ब्रिटिश उदारमतवादी तत्त्वज्ञानाबद्दल त्यांना आत्मीयता वाटत होती आणि या तत्त्वज्ञानाला आर्थिक समतेची जोड दिली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. डॉ. आंबेडकर यांनी अन्याय आणि विषमता यांवर प्रहार केला, परंतु हे करतानाच समाजाची विघटना न होता समतेच्या पायावर पुनर्रचना झाली पाहिजे हा विधायक दृष्टिकोन त्यांनी कधी सोडला नाही. हाच विधायक दृष्टिकोन त्यांना स्वतंत्र भारताच्या घटना समितीत मांडता आला. पं. नेहरू आणि पुरोगामी दृष्टिकोन असलेले अन्य काही सदस्य यांच्या समवेत घटना समितीत काम करताना डॉ. आंबेडकरांनी, भारताच्या भविष्यासंबंधीच्या त्यांच्या कल्पना आणि विचार हे निर्भयपणे आणि स्पष्टपणे मांडले. या विचारमंथनातूनच भारताची घटना निर्माण झाली.

एका अर्थाने डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा विजय झाला. परंतु केवळ घटना पुरोगामी केली म्हणजे राष्ट्र तात्काळ पुरोगामी बनेल, असा भ्रामक आणि उथळ आशावाद डॉ. आंबेडकरांनी बाळगला नाही. परंपराभिमानी हिंदू समाजात आणि विशेषतः ग्रामीण भागात नवे विचार रुजणे सोपे नाही हे ते पुरेपूर ओळखून होते. यामुळेच गांधीजींच्या ग्रामस्वराज्याच्या कल्पनेला त्यांचा विरोध होता. औद्योगीकरणानंतर शहरात जातिभेदाची तीव्रता कमी होईल हे बाबासाहेबांना ठाऊक होते. एकूण सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी नेमके काय करावयास हवे या दिशेने त्यांचे चिंतन चालू होते. परंतु दुर्दैवाने त्यांना मृत्यू आला आणि त्यांना अभिप्रेत असलेले कार्य अपुरे राहिले. 

डॉ. बाबासाहेबांनी दलितांच्या दुःखाला वाचा फोडली. त्यांच्या जीवनातून आणि लेखनातून प्रेरणा घेतलेल्या काही अनुयायांनी आपल्या जीवनातील व्यथा भेदक शब्दांत समाजापुढे मांडल्या. आधुनिक दलित साहित्याचा मूलस्रोत बाबासाहेबांचे विचार हाच आहे. या विद्रोही साहित्यामुळे मराठी साहित्य संपन्न झाले आहे. या साहित्यामुळे पांढरपेशा जगात राहणाऱ्या अनेकांना जाग आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना 'भारतरत्न' म्हणून गौरविण्यात आले, हे अत्यंत उचित झाले. भारताला ललामभूत होईल अशी थोर कामगिरी त्यांनी केली आहे. ज्ञान आणि कर्म यांचा मनोज्ञ संगम त्यांच्या जीवनात झाला होता. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांचे विचार देशाच्या सर्व भागांतील जनतेपर्यंत पोहोचविणे, सर्व भारतीय भाषांमध्ये त्यांच्या लेखसंग्रहांचे भाषांतर करणे ही कामे झालीच पाहिजेत. त्याचप्रमाणे तरुण क्रियाशील कार्यकर्त्यांनी त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास केला पाहिजे.

डॉ. आंबेडकरांची जन्मशताब्दी साजरी होत असतानाच आठदहा दिवसांपूर्वी घडलेल्या एका भीषण घटनेचा उल्लेख करणे आम्हाला आवश्यक वाटते. नांदेड जिल्हयातील टेंभुर्णी या गावात चंदर कांबळे या दलित तरुणास दगडांनी ठेचून मारण्यात आले. काही वर्षांपूर्वी नामांतर विरोधी चळवळीत याच टेंभुर्णी गावात चंदर कांबळे याच्या वडिलांना जिवंत जाळण्यात आले होते. अशा घटना झाल्यानंतर पुरावा कोर्टापुढे येणे कठीण असते. त्या खटल्यातील काही आरोपी खालच्या कोर्टात आणि उरलेले आरोपी हायकोर्टात निर्दोष म्हणून सुटले. आता चंदरचा निर्दयपणे खून करण्यात आला आहे. आपल्या समाजात जातीय अहंकाराचे विषबीज कसे रूजले आहे आणि काही व्यक्ती त्यामुळे अमानुष कृत्ये कशी करतात, हे या माणुसकीला काळिमा आणणाऱ्या घटनेवरून समजून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शताब्दी साजरी करण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होण्यासाठी समाजातील अशा दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध तरुणांची एकजूट उभी राहून तिने या प्रवृत्तीचे निर्मूलन केले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सामाजिक विषमतेविरुद्ध लढा देऊन जे महार ‘तराळ’ म्हणून लाचारीचे जीवन जगत होते त्यांना 'अंतराळा'चे विशाल दर्शन घडवले. या विशाल अंतराळाच्या दर्शनाने आपल्या समाजातील सर्व स्तरांमध्ये भ्रातृभाव निर्माण झाला, म्हणजेच आपण डॉ. आंबेडकरांची जन्मशताब्दी योग्य रीतीने साजरी केली असे म्हणता येईल. या थोर द्रष्टया विचारवंताच्या स्मृतीस शतशः प्रणाम!

Tags: भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके