Diwali_4 पुनर्भेट कशासाठी?
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

या अंकाचे संपादन करताना प्रकर्षाने लक्षात आलेला मुद्दा हा होता की, दलवाईंची तीनच पुस्तके (लाट, इंधन, राष्ट्रीय एकात्मता व भारतीय मुसलमान) उपलब्ध आहेत. त्यांचे ‘इस्लामचे भारतीय चित्र’ हे पुस्तक बऱ्याच वर्षांपासून उपलब्ध नाही, त्याची नवी आवृत्ती काढणे आवश्यक आहे. Muslim Politics in India हे त्यांचे पुस्तक मराठीत आलेले नाही. (दिलीप चित्रे यांनी दलवाईंचे साधनातील चार लेख इंग्रजीत अनुवाद करून आणि दलवाईंशी बोलून आठ लेख थेट इंग्रजीत केलेले आहेत.) त्याचा मराठी अनुवाद करून, ते पुस्तक प्रकाशित करणे आवश्यक आहे. शिवाय, दलवाईंच्या 12 कथा असंग्रहित आहेत, त्यांचेही एक पुस्तक होऊ शकेल. आणि या अंकातील चार लेख व अन्य आठ-दहा लेख यांचे मिळूनही एक नवे पुस्तक होऊ शकेल. सर्व संबंधितांचे सहकार्य मिळाले तर ही चारही पुस्तके साधना प्रकाशनाकडून येत्या 3 मेच्या आत  (दलवाईंचा स्मृतिदिन) प्रकाशित करणार आहोत.

साधना साप्ताहिकाचा 68 वा वर्धापनदिन (15 ऑगस्ट) आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा दुसरा स्मृतिदिन (20 ऑगस्ट) ही दोन निमित्ते साधून, हा विशेषांक प्रकाशित करीत आहोत.

महात्मा फुले-हमीद दलवाई-डॉ.नरेंद्र दाभोलकर हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे तिघांच्या विचारांत व कार्यात साम्यस्थळे आणि अंतर्गत सुसंगती बरीच आहे. कशी आणि किती?

1. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि बहुजनांच्या शिक्षणाचा (विद्येविना मती गेली) जोरदार पुरस्कार केला. हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली, त्यामागे महात्मा फुले यांच्या कार्याची प्रेरणा होती. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी महात्मा फुले यांना ‘सुधारकांच्या विद्यापीठांचे कुलपती’ असे संबोधले आणि स्वत:च्या मुलाचे नाव हमीद दलवाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ठेवले.

2. महात्मा फुले यांनी स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र यांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी काम केले. हमीद दलवाई यांनी मुस्लिम समाजातील तलाक पद्धतीचा तीव्र धिक्कार केला आणि आधुनिक शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला. नरेंद्र दाभोलकर यांनी शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करून, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार केला. महात्मा फुले यांनी ब्राह्मणी धर्मावर कठोर प्रहार केले, दलवाईंनी इस्लामची परखड चिकित्सा केली, दाभोलकरांनी ‘कालसुसंगत धर्मचिकित्सा’ हे सूत्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चतु:सूत्रीपैकी एक मानले. शोषण होत नसेल, अनैतिक वर्तनाचे समर्थन होत नसेल; तर या तिघांचाही धर्माला विरोध नव्हता, किंबहुना ‘आम्हीच खरे धार्मिक’ असा त्यांचा दावा होता.

3. धर्माच्या नावाखाली होत असलेल्या शोषणाला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विषमतेला विरोध करण्यासाठी तिघेही लढत होते, पण म्हणूनच केवळ त्या तिघांनाही ‘धर्मबुडवे’ हे विशेषण लावले गेले. महात्मा फुले यांचा खून करण्यासाठी मारेकरी पाठवले गेले होते; त्यातील एक नंतर त्यांचा अनुयायी झाला, हे आपल्याला माहीत आहे. हमीद दलवाईंच्या मृत्यूनंतर नरहर कुरुंदकरांनी लिहिले, ‘‘दलवाईंबाबत खऱ्या आश्चर्यकारक गोष्टी दोन आहेत. एक- आठशे वर्षांच्या परंपरेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या दलवाईंना चारशे अनुयायी मिळाले आणि दुसरे आश्चर्य- त्यांना नैसर्गिक मरण आले, हौतात्म्य पत्करावे लागले नाही.’’ पण दलवाई आणखी दहा-वीस वर्षे जगले असते आणि तेच काम करीत राहिले असते तर त्यांना नैसर्गिक मरण आले असते, असे छातीठोकपणे म्हणता येत नाही. आणि डॉ.दाभोलकरांची हत्या जरी 2013 मध्ये झाली असली, तरी मागील 25 वर्षे ते अशा प्रकारचा धोका पत्करून काम करीत होते की, जणू काही मृत्यूशीच खेळत आहेत.

गेल्या वर्षी हा काटकोन-त्रिकोण प्रकर्षाने लक्षात आल्यावर, डॉ. दाभोलकरांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी ‘हमीद दलवाई विशेषांक’ काढायचे ठरवले. त्याला आणखी एक कारण होते- महात्मा फुले व डॉ. दाभोलकर यांचे सर्व आणि त्यांच्याविषयी इतरांनी लिहिलेले बरेच लेखन पुस्तकरूपाने उपलब्ध आहे; हमीद दलवाई यांच्याबाबत तसे म्हणता येत नाही आणि नव्या पिढीला तर त्यांच्या विचारांची व कार्याची पुरेशी ओळखही नाही. पण दलवाई यांच्यावर विशेषांक काढायचा म्हणजे नेमके काय करायचे, असा प्रश्न पुढे आला. म्हणून प्रोसेसने जायचे ठरवले. दलवाईनी स्वत:  लिहिलेले व त्यांच्याविषयी इतरांनी लिहिलेले असे सर्व लेखन वाचायला घेतले. मग हळूहळू चित्र स्पष्ट होत गेले. अगोदर, आजच्या संदर्भात दलवाई आणि त्यांचे लेखन-कार्य-विचार यांवर नवीन लेख मिळवून विशेषांक काढायचे ठरवले; पण नंतर लक्षात आले की, दलवाईंच्या बरोबर वावरलेली अनेक माणसे काळाच्या पडद्याआड गेलेली आहेत आणि जे कोणी हयात आहेत, त्यांनी केलेले लेखन कुठल्या ना कुठल्या पुस्तकात उपलब्ध आहे. दरम्यान, दलवाईंचे व त्यांच्याविषयीचे 1950 ते 70 या काळात वृत्तपत्रांतून/नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले, पण अद्याप कोणत्याही पुस्तकात समाविष्ट न झालेले (आणि पूर्णत: नजरेआड राहिलेले) काही लेखन वाचायला मिळाले. त्यातील डझनभर कथा आणि दोन डझन लेख असे आहेत, जे पुढे आणायलाच हवेत. त्यामुळे हमीद दलवाईंच्या तीन कथा व चार लेख आणि त्यासोबत मेहरुन्निसा दलवाई व भाऊ पाध्ये यांचे कोणत्याही पुस्तकात समाविष्ट नसलेले दोन लेख या अंकात घेतले आहेत. (गोविंद तळवलकर यांचा लेख मात्र या अंकासाठीच लिहिलेला आहे.)

या अंकातील दलवाईंचे लेखन 1954 ते 1966 या काळातील आहे. म्हणजे वय वर्षे 22 ते 34 या काळातील दलवाईंचे हे लेखन आहे, याचे विस्मरण वाचकांना दोन कारणांसाठी व्हायला नको. एक- त्या काळाच्या पार्श्वभूमीवर या लेखनाचा विचार करावा आणि दुसरे- दलवाईंची बौद्धिक झेप आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच किती मोठी होती हे लक्षात यावे.

या अंकातील (तळवलकरांचा लेख वगळता) सर्व लेखन राजेंद्र बहाळकर या आमच्या मित्राने, सेवादल सैनिकाने मिळवून दिले आहे. एवढेच नाही तर, मेहरुन्निसा भाभींशी सतत संपर्क ठेवून अंकाला आवश्यक ते सहकार्य मिळवले आहे. किंबहुना हमीद दलवाई यांच्यावर अंक काढायचा आहे, हे सांगितल्यानंतर त्यानेच आमचा आणि इतरांचाही पाठपुरावा केला आहे. या अंकासाठी लेख व कथा निवडण्यासाठी हिनाकौसर खान या नव्या पिढीतील मुलीचे मत विचारात घेतले आहे. अंक तयार होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना सय्यदभाई व शमसुद्दीन तांबोळी यांची मदत झाली आहे. अमीर शेख या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या संस्थापक सदस्याने काढलेली अतिशय दुर्मिळ छायाचित्रे सय्यदभार्इंनी उपलब्ध करून दिली आहेत.

हमीद दलवाई यांचे ललित साहित्य व वैचारिक साहित्य यांवर विश्लेषणात्मक व दीर्घ लेख रझिया पटेल लिहिणार होत्या, पण वेळेअभावी तो पूर्ण झाला नाही. मात्र 29 सप्टेंबरच्या साधना अंकात (हमीद दलवाईंच्या जन्मदिनाचे निमित्त साधून) तो प्रसिद्ध करणार आहोत. डॉ.हमीद (दाभोलकर) लेख लिहिणार होता, त्याला हमीद दलवाई आयुष्याच्या तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर कसे भेटले या विषयावर! पण पुनर्भेट अंक हे स्वरूप निश्चित झाल्यामुळे तो लेख मागे ठेवला आहे. आता 2 ऑक्टोबरला युवा दिवाळी अंक प्रकाशित होईल, त्यात डॉ.हमीदचा लेख आणि त्यासोबत हमीद दलवाईंची ‘दहा रुपयांची नोट’ ही कथा प्रसिद्ध होईल. (ही कथा 1952 मधील आहे, त्यावेळी दलवाईंचे वय होते 20 वर्षे).

या अंकाचे संपादन करताना प्रकर्षाने लक्षात आलेला मुद्दा हा होता की, दलवाईंची तीनच पुस्तके (लाट, इंधन, राष्ट्रीय एकात्मता व भारतीय मुसलमान) उपलब्ध आहेत. त्यांचे ‘इस्लामचे भारतीय चित्र’ हे पुस्तक बऱ्याच वर्षांपासून उपलब्ध नाही, त्याची नवी आवृत्ती काढणे आवश्यक आहे. Muslim Politics in India हे त्यांचे पुस्तक मराठीत आलेले नाही. (दिलीप चित्रे यांनी दलवाईंचे साधनातील चार लेख इंग्रजीत अनुवाद करून आणि दलवाईंशी बोलून आठ लेख थेट इंग्रजीत केलेले आहेत.) त्याचा मराठी अनुवाद करून, ते पुस्तक प्रकाशित करणे आवश्यक आहे. शिवाय, दलवाईंच्या 12 कथा असंग्रहित आहेत, त्यांचेही एक पुस्तक होऊ शकेल. आणि या अंकातील चार लेख व अन्य आठ-दहा लेख यांचे मिळूनही एक नवे पुस्तक होऊ शकेल. सर्व संबंधितांचे सहकार्य मिळाले तर ही चारही पुस्तके साधना प्रकाशनाकडून येत्या 3 मेच्या आत  (दलवाईंचा स्मृतिदिन) प्रकाशित करणार आहोत.

हा सर्व आणि इतका खटाटोप कशासाठी, असा प्रश्न काही वाचकांच्या मनात येईल. त्याची दोन कारणे उघड आहेत. एक म्हणजे दलवाईंनीच त्यांच्या मृत्युपत्रात ‘स्मारक नको, रिसर्च इन्स्टिट्यूट उभारा’ अशी अंतिम इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे किमान त्यांचे लेखन उपलब्ध करून देण्यासाठी आपण हातभार लावला पाहिजे. दुसरे कारण : मुळात हमीद दलवाईंची जडणघडण व वाटचाल यासाठी राष्ट्र सेवादल, समाजवादी पक्ष- संघटना आणि साधना परिवार यांचा बराच मोठा सहभाग राहिला आहे, त्यामुळे दलवाईंचे विचार व कार्य यांचे दस्तावेज नव्या पिढीसमोर आणणे हे साधनाचे कर्तव्यच आहे. किंबहुना ध्येयवादी वारशाला नव्याने उजाळा देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. हमीद दलवाई आज हयात असते तर केवळ 83 वर्षांचे झाले असते. त्यांना केवळ 44 वर्षे आणि सात महिने (1932 ते 77) इतके अल्प आयुष्य मिळाले. साधारणत: पहिली बारा वर्षे लेखनाचा काळ आणि नंतरची बारा वर्षे मुस्लिम समाजातील सुधारणांसाठी प्रबोधन व संघर्षाचा काळ, असे त्यांचे सार्वजनिक आयुष्य राहिले आहे. म्हणजे अवघ्या 25 वर्षांच्या काळात त्यांनी जे काम केले आहे, ते थक्क करणारे आहे.

रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या Makers of Modern India या संपादित ग्रंथात ज्या 19 व्यक्तींविषयी लिहिले आहे, त्यात हमीद दलवाई एक आहेत. गुहा यांनी दलवाईंचा उल्लेख The Last Modernist असा केला आहे. ‘‘पंधरा वर्षांपूर्वी, मुंबईच्या फूटपाथवर Muslim Politics in India हे जुने पुस्तक 20 रुपयांत मिळाले आणि त्यानंतर अर्धा डझन वेळा तरी मी ते वाचले आहे.’’ असे गुहा यांनी त्यांच्या एका लेखात म्हटले आहे. दलवाईंच्या याच पुस्तकातील तीन दीर्घ उतारे गुहा यांनी ‘त्या’ संपादित पुस्तकात घेतले आहेत. गुहांच्या पुस्तकातील 19 व्यक्तींमध्ये सर सय्यद अहमद खान, बॅ.महमंद अली जिना आणि हमीद दलवाई या तीन मुस्लिम व्यक्ती आहेत. यासंदर्भात गुहा यांना दलवाईंना कुठून व का आणले?’ असा प्रश्न अनेकांनी विचारला. त्यावर त्यांचे म्हणणे इतकेच आहे की, ‘आजच्या भारताला आधुनिक करण्यासाठी दलवाईंच्या विचारांइतकी उपयुक्तता अन्य कोणा मुस्लिम सुधारकाची मला तरी दिसलेली नाही.’ असो...

हमीद दलवाईंच्या विचारांची व कार्याची उपयुक्तता अधोरेखित करण्यासाठी इतिहासकार रामचंद्र गुहा यांची साक्ष आम्ही दिली आहे. पण दलवाईंचे विचार व कार्य यांची आजच्या काळाच्या संदर्भात, अभ्यासपूर्वक चर्चा-चिकित्सा कोणी करणार असेल, तर त्या लेखनाला साधना साप्ताहिकातून पुरेशी जागा उपलब्ध करून दिली जाईल. कारण सेक्युलॅरिझम आणि रॅशनॅलिझम (धर्मनिरपेक्षता/धर्मातितता आणि विवेकवाद) बळकट करत जाणे, हे उद्दिष्ट भारतीय संविधानानेच आपल्यासमोर ठेवलेले आहे.

Tags: नरेंद्र दाभोलकर हमीद दलवाई महात्मा फुले पुनर्भेट कशासाठी? संपादकीय वर्धापनदिन विशेषांक Narendra Dabholkar Hamid Dalwai Mahatma Phule Punarbhet kashasathi? Editorial Anniversary special issue weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात