डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

कोरोना काळात साधना कशी चालली?

वरील पाचही विभाग हाताळणारे साधनाकडे पूर्णवेळ काम करणारे सहकारी फक्त 15 आहेत आणि त्यांच्या मदतीला आर्टिस्ट, प्रुफ तपासणारे, अक्षरजुळणी करणारे असे तीन सहकारी साधनासाठी हवे तेव्हा उपलब्ध असतात. त्याचबरोबर अनुवाद व शब्दांकन या दोन प्रकारच्या कामांसाठीही तीन-चार लोक उपलब्ध असतात. या सर्वांच्या मनापासूनच्या गुंतवणुकीमुळे व सातत्यपूर्ण सहभागामुळेच आम्ही हे करू शकलो. तांत्रिक व अन्य अडचणी तर वेळोवेळी येणार हे उघड होते. पण त्याला महत्त्व न देता किंवा त्या अडथळ्यांचा गाजावाजा न करता साधनाचे काम चालू राहिले. त्यातही अधिक आश्चर्य हे आहे की, या संपूर्ण काळात साधनाचा संपादक पुणे शहरात एकही दिवस न येता दूर अंतरावरील लहान गावात राहून काम करू शकत होता. त्याचे सर्व श्रेय वरील सर्वांच्या कार्यक्षमतेला व तत्परतेला द्यावे लागेल.

24 मार्च रोजी रात्री पंतप्रधानांनी देशाला उद्देशून भाषण केले आणि दुसऱ्याच दिवशीपासून संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन राहणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर तो लॉकडाऊन दोन वेळा (प्रत्येकी दोन आठवडे) वाढवण्यात आला. त्यामुळे दोन महिने देशातील सर्व व्यवहार ठप्प राहिले. त्यानंतर व्यवहार अंशत: सुरू करण्यात आले आणि क्रमाक्रमाने निर्बंध कमी करण्यात आले. ऑगस्टअखेरीस बहुतांश निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे मागील पाच महिने हा कालखंड कोरोनाचाच होता, असे म्हणावे लागते. देशातील व जगातील जनजीवन ठप्प राहिल्याचे आर्थिक, सामाजिक, मानसिक स्तरावर काय परिणाम होतील हे सध्या तरी कोणालाही ठोसपणे सांगता येत नाही. देश व जग कोरोनामुक्त होण्यास किती काळ लागेल, याबद्दल आणखी सहा महिने ते दीड वर्षे इतका अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत साधनाच्या याआधीच्या अंकांतून आम्ही बरेच काही प्रसिद्ध केले आहे, यानंतरही अगदी वेगळे व विशेष महत्त्वाचे जे काही पुढे येईल ते आम्ही प्रसिद्ध करणार आहोत.

आज मात्र कारोनाच्या काळात म्हणजे मागील पाच महिन्यांत साधना ही संस्था कशी चालली किंवा कार्यरत राहिली, याबद्दल साधनाच्या वाचकांना आम्ही अवगत करू इच्छितो. कारण जगाच्या इतिहासातील हा एक वैशिष्ट्यपूर्ण कालखंड म्हणून ओळखला जाईल आणि साधनाच्या सात दशकांच्या वाटचालीत या टप्प्याच्या नोंदी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

तर लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हा प्रस्तुत संपादक अहमदनगर जिल्ह्यातील आपल्या लहान गावात होता. साधनाचे दोन-चार कार्यालयीन सहकारी, साधना कार्यालयाच्या जवळपास वास्तव्य करीत होते. ते सहकारी रोज आवश्यकतेप्रमाणे कार्यालयात येऊ शकणार होते. त्यामुळे शक्य असेल तेवढी जास्त कार्यवाही चालू ठेवण्यासाठी काहीशी अनुकूलता होती. आणि अन्य 10 सहकारी पुणे शहरातील कानाकोपऱ्यांत वास्तव्य करीत होते, त्यातील काहीजण घरी राहून कामात सहभाग घेऊ शकणार होते.

साधना ट्रस्टच्या अंतर्गत पाच विभाग येतात. साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन, साधना मीडिया सेंटर, कर्तव्य साधना आणि साप्ताहिकाचे डिजिटल अर्काइव. यांपैकी साधना मीडिया सेंटर हे पुस्तकविक्री केंद्र पूर्णत: बंद ठेवावे लागणे अपरिहार्य होते. साधना प्रकाशनाच्या पुस्तकांची बरीच पूर्वतयारी सर्व संबंधितांना आपापल्या घरी राहून करता येणार होती. साधना साप्ताहिकाचे अंक छापता येणार नव्हते, पोस्टाद्वारे पाठवता येणार नव्हते, मात्र ऑनलाईन प्रसिद्ध करता येणार होते. कर्तव्य या डिजिटल पोर्टलचे आणि साप्ताहिकाचे डिजिटल अर्काइवचे काम मोठी ताकद लावून करता येणार होते.

त्यानुसार पहिला निर्णय असा होता की, साधना साप्ताहिकाचे अंक प्रत्येक शनिवारी तयार करायचे, त्याची सॉफ्ट कॉपी लगेच साधनाच्या वेबसाईटवर अपलोड करायची आणि ज्या वर्गणीदार वाचकांचे व्हॉट्‌सॲप नंबर व इ-मेल पत्ते आहेत, त्या सर्वांना ती सॉफ्ट कॉपी पाठवायची. एवढेच नाही तर, ही सॉफ्ट कॉपी कोणीही कोणालाही जरूर पाठवावी अशी विनंतीवजा सूचनाही प्रत्येक अंक पाठवताना केली जात होती. त्यामुळे साधनाचे साधारणत: 80 टक्के वर्गणीदार वाचक व वर्गणीदार नसलेले काही वाचक यांच्याकडे मिळून दहा हजारांपेक्षा अधिक लोकांकडे प्रत्येक अंकाची सॉफ्ट कॉपी जात होती, हे निश्चित. ते लोक आपापल्या स्तरावर फॉरवर्ड करीत राहिले किंवा ग्रुपवर टाकत राहिले, ती संख्या वेगळी धरावी लागेल. या सर्व सॉफ्ट कॉपीजचे वितरण विनामूल्य केले गेले. मागील पाच महिन्यांत अशा प्रकारे वितरित झालेल्या साधनाच्या एकूण अंकांची संख्या आहे 21, त्यात सहा विशेषांक आहेत. गंभीर मजकूर व दीर्घ लेख असलेल्या अंकाची सॉफ्ट कॉपी ऑनलाईन वाचणे हे काहीसे त्रासाचे ठरते, हे लक्षात घेतले आणि आलेल्या काही नेटवर्कच्या मर्यादा समजून घेतल्या तरी त्याचे झालेले स्वागत उत्तम म्हणावे असेच होते. मात्र ज्यांना छापील अंक वाचणेच सोईचे वाटते, त्यांच्यासाठी हा एकूण प्रकार दूधाची तहान ताकावर असाच होता.

साधना प्रकाशनाच्या पुस्तकांची छपाई बंद ठेवावी लागली होती, मात्र जी पुस्तके पुढील दोन वर्षांत छापायची आहेत असे नियोजन होते; त्यांची पूर्वतयारी म्हणजे अक्षरजुळणी, मुद्रितशोधन आणि मुखपृष्ठे व सजावट ही सर्व प्रक्रिया मागील पाच महिन्यांत बरीच मार्गी लावली आहे. त्यातून साने गुरुजींच्या एकूण 14 कादंबऱ्यांचे वरील प्रकारचे काम पूर्णत्वाच्या जवळ गेले आहे. त्यामुळे गुरुजींनी लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक चार, सामाजिक सहा व राजकीय चार अशा एकूण 14 कादंबऱ्या पुढील सहा ते आठ महिन्यांतच येऊ शकणार आहेत. याशिवाय नानासाहेब गोरे, ग.प्र.प्रधान व यदुनाथ थत्ते यांची मिळून दहा-बारा आऊट ऑफ प्रिंट पुस्तके नव्या आवृत्तीच्या स्वरूपात आणण्यासाठीही अर्ध्याहून अधिक काम मार्गी लावले आहे. याचबरोबर सध्याची 25 पुस्तके इ-बुक स्वरूपात आणण्याचे कामही जवळपास संपवले आहे. त्यामुळे लवकरच पुढील तीन-चार महिन्यांत साधना प्रकाशनाची वेबसाईट कार्यान्वित करणे आणि साधना प्रकाशनाची छापील पुस्तके व इ-बुक्स यांची खरेदी-विक्री सुलभ व जलद गतीने होऊ शकणार आहे.

साधना साप्ताहिकाचे मागील 12 वर्षांचे डिजिटल अर्काइव तयार करण्याचे काम दीड वर्षांपूर्वी हाती घेतले होते. मागील पाच महिन्यांत त्याला अधिक गती देऊन ते पूर्ण करण्यात आले आहे. अंकाची तारीख, लेखक, विषय, उपविषय व लेखनप्रकार इत्यादी प्रकारचे वर्गीकरण करून ते अंक आता वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ते सर्व अंक किंवा त्यातील कोणतेही लेख डाऊनलोड करता येतात, त्याचप्रमाणे इ-मेल वा व्हॉट्‌सॲपद्वारे पाठवता येतात. ही संपूर्ण सुविधा सध्या तरी विनामूल्य आहे. मागील साठ वर्षांचे अंक अशाच पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता विचाराधीन आहे. तो प्रकल्प अधिक वेळेची, अधिक मनुष्यबळाची व अधिक आर्थिक तरतुदीची मागणी करणारा आहे. हे सर्व केवळ अभ्यासकांसाठी नसून सर्वसामान्य वाचकांसाठीही आहे. अर्काइववर जाऊन जास्तीत जास्त वाचकांनी मुशाफिरी करावी, यासाठी आम्ही अधिक प्रयत्नशील राहणार आहोत.

कर्तव्य साधना हे डिजिटल पोर्टल 9 ऑगस्ट 2019 रोजी सुरू केले, त्याला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागील पाच महिन्यांत कर्तव्यची वाढ सर्वार्थाने शंभर टक्के झाली आहे. कारण त्यावर अपलोड होणाऱ्या लेखांची संख्या, त्याला भेट देणाऱ्या वाचकांची संख्या आणि त्यावरील किती लेख वाचले गेले ही संख्या, हे तिन्ही आकडे आता (मार्चच्या तुलनेत) दुप्पट झाले आहेत. या कोरोना काळात कर्तव्यवर व्हिडिओ अपलोड करण्यात मात्र अडथळा होता. त्या आघाडीवर दुय्यम दर्जाचे काही करण्यापेक्षा न केलेले बरे, असा निर्णय घेऊन ती ऊर्जा अन्य कामांकडे वळवण्यात आली. यानंतर व्हिडिओ/ऑडिओ विभाग कार्यान्वित करणार आहोत. याच पाच महिन्यांत कर्तव्यवरील इंग्रजी विभागावर थोडे जास्त लक्ष केंद्रित करता आले. त्या विभागासाठी आता एका पूर्णवेळ उपसंपादकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील काळात हा विभागही अधिक चांगले रूप धारण करील.

कर्तव्यवरील लेख साधनात घ्यायचे नाहीत आणि साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेले लेख कर्तव्यवर घ्यायचे नाहीत, असे ठरवले होते आणि ते (दोन-तीन वेळा अपवाद) पाळण्यात आले. प्रत्येक आठवड्यात कर्तव्यवर आठ ते दहा लेख प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस कर्तव्य हे स्वतंत्र साप्ताहिक म्हणूनच पुढे आले आहे. साप्ताहिकात जेवढा मजकूर प्रसिद्ध होतो, तितकाच कर्तव्यवर येतो आहे. पुढील वर्षभरात कर्तव्य हे लहान भावंड बरेच मोठे, व्यापक व परिणामकारक झालेले असेल यात शंका नाही.

साधना मीडिया सेंटर हा विभाग आधीची अडीच महिने पूर्ण बंद होता, नंतरची अडीच महिने हळूहळू कार्यान्वित झाला. मात्र त्याच्या वाढीसाठी काही योजना विचाराधीन आहेत.

वरील पाचही विभाग हाताळणारे साधनाकडे पूर्णवेळ काम करणारे सहकारी फक्त 15 आहेत आणि त्यांच्या मदतीला आर्टिस्ट, प्रुफ तपासणारे, अक्षरजुळणी करणारे असे तीन सहकारी साधनासाठी हवे तेव्हा उपलब्ध असतात. त्याचबरोबर अनुवाद व शब्दांकन या दोन प्रकारच्या कामांसाठीही तीन-चार लोक उपलब्ध असतात. या सर्वांच्या मनापासूनच्या गुंतवणुकीमुळे व सातत्यपूर्ण सहभागामुळेच आम्ही हे करू शकलो. तांत्रिक व अन्य अडचणी तर वेळोवेळी येणार हे उघड होते. पण त्याला महत्त्व न देता किंवा त्या अडथळ्यांचा गाजावाजा न करता साधनाचे काम चालू राहिले. त्यातही अधिक आश्चर्य हे आहे की, या संपूर्ण काळात साधनाचा संपादक पुणे शहरात एकही दिवस न येता दूर अंतरावरील लहान गावात राहून काम करू शकत होता. त्याचे सर्व श्रेय वरील सर्वांच्या कार्यक्षमतेला व तत्परतेला द्यावे लागेल.

अर्थकारणाच्या आघाडीवर काय स्थिती राहिली याचे कुतूहल अनेक वाचकांना असणे साहजिक आहे. कारण मुळात साधनाच्या कोणत्याही उपक्रमातून केलेल्या खर्चाच्या 10 ते 15 टक्के यापेक्षा अधिक मार्जीन ठेवले जात नाही.  तरीही आताच्या काळात साधनाचे सर्व कार्यालयीन सहकारी कायम राहिले. सर्वांना नियमितपणे पूर्ण वेतन/मानधन देण्यात आले. साप्ताहिक व कर्तव्य यांच्यासाठी लेखन करणाऱ्यांचे मानधन त्यांना नेहमीप्रमाणेच देण्यात आले. साधना प्रकाशनाच्या पुस्तकांची रॉयल्टीही मार्चअखेर हिशोब करून तत्परतेने देण्यात आली. या काळात किंवा त्याआधी अन्य घटकांनी केलेल्या कामाची कोणतीही देणी आठ-दहा दिवसांपेक्षा अधिक काळ लांबवायची नाही, याची दक्षता घेण्यात आली.

या संपूर्ण काळात तांत्रिक साह्य करण्यासाठी MKCL चे सहकारी आवश्यक तेव्हा उपलब्ध होते. सॉफ्टवेअरप्रणाली निर्माण करणे वा दुरुस्त करणे हे काम इव्होनिक्स टेक्नॉलॉजीज या कंपनीकडे सोपवले गेले होते आणि डिजिटल प्रकल्पासाठी IPSMF ने आर्थिक साह्य केलेले होते. याशिवाय काही हितचिंतकांनी लहान-मोठ्या देणग्या दिल्या होत्या. तरीही एकत्रित विचार करता, साधनालाही आर्थिक नुकसान सोसावे लागणारच आहे, ते भरून काढण्यासाठी काही उपाययोजना कराव्याच लागणार आहेत आणि नियोजित उपक्रमा’साठी म्हणजे साधनाच्या वाढीसाठी भरीव आर्थिक तरतूद उभी करावी लागणार आहे. मात्र या पाच महिन्यांच्या काळात अशी पायाभरणी झाली आहे, असा ऊर्जासंचय केला आहे की, कोरोनाच्या काळात गतिमान राहिलेली साधना आणखी पाच-सहा महिने याच पद्धतीने चालत राहिली तर कोरोना संकट गेल्यानंतर धावायला लागलेली असेल!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात